शनिवार, १२ जानेवारी, २०१९

चिपळूणचे वैभवशाली वस्तूसंग्रहालय


अफाट ग्रंथसंपदा, हजारो दुर्मीळ ग्रंथ अशी पैशात मोजता न येणारी बौद्धिक संपत्ती लाभलेल्या चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले ‘संग्रहालय’ अलीकडेच (२४ नोव्हेंबर २०१८) मूर्तिशास्त्र आणि मंदिरस्थापत्य या विषयातील अधिकारी व्यक्तिमत्त्व डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या शुभहस्ते पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासूंसाठी खुले केले. भगवान परशुराम यांचे वास्तव्यस्थान, क्रोकोडाईल टुरिझमसाठी प्रसिद्ध ‘ऑफबीट डेस्टीनेशन’ चिपळूणातील हे संग्रहालय कोकणच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षातल्या विविध वस्तूंचा दुर्मीळ ठेवा पाहायला उपलब्ध असलेले पनवेल ते पणजी दरम्यानचे हे एकमेव संग्रहालय आहे.

वस्तुसंग्रहालयाची पाहाणी, जुन्या रचनेच्या देखण्या प्रवेशद्वारापासूनच सुरु होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या कोपऱ्यातील लक्ष वेधून घेणाऱ्या दगडी वस्तू आपल्याला वस्तुसंग्रहालयाच्या जगात घेऊन जातात. दरवाजातून आतमध्ये गेल्यावर दिसणारी आकर्षक रचना आपले लक्ष वेधून घेते. आजच्या पिढीला माहिती नसणाऱ्या अनेक वस्तू इथे पाहाता येतात. भाकरी थापणारी कोकणी महिला आपल्याला ग्रामीण कोकणातल्या स्वयंपाकघरात घेऊन जाते. सहसा पाहायला न मिळणारे, आवर्जून बनवून घेण्यात आलेले इथले हरिक दळायचे जाते आपल्याला ‘हरिक’ म्हणजे काय ? या प्रश्नात टाकते. तीस-पस्तीस वर्षापूर्वीपर्यंत कोकणी लोकांच्या जेवणात मुख्य अन्न म्हणून हरिकाचा भात असे. पुढे कोकणचा ‘विकास’ आडवा आला, तांदळाची (भात) विविध बियाणी उदयास आली आणि पचायला हलका असणारा हरिकाचा भात मागे पडला. पर्यायाने हरिकाचे उत्पादन थांबले. हरिक हे तीळासारखे लहान असते. त्याचा भात पौष्टिक, चविष्ट असतो. हा भात साबुदाण्यासारखा फुलतो. सन १९५०-५५ सालात रत्नागिरी जिल्हय़ात प्रत्येक शेतकरी ९० टक्के हरिक आणि उर्वरितात वरी, नाचणी, वरिक आणि कडधान्ये-भाजीपाल्याची काही पिके घेतली जात असतं. या हरिकाच्या अत्यंत चिवट रोपकाडीचा उपयोग घरबांधणीसाठी काढाव्या लागणाऱ्या मातीच्या मापांमध्ये होत असे, असो ! एखाद्या प्रश्नातून जिज्ञासूला अशी अत्यंत ज्ञानरंजक माहिती उपलब्ध करून देण्याची क्षमता संग्रहालयामध्ये असते, म्हणूनच कशाच्याही निमित्ताने प्रवासाला दूरदेशी कोठेही गेलो, तर तेथील संस्कृतीची प्रतिक असलेली संग्रहालये आवर्जून पाहावीत असे म्हटले जाते.


                    


संग्रहालयात शिरल्यावर डाव्या बाजूने पाहात आत गेलो की मनाला थक्क करणाऱ्या अनेक वस्तू दिसतात. सुरुवातीलाच दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन दगडी हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधन, उत्खननात सापडलेली भांडी असा दुर्मीळ पुरातन वस्तूंचा खजिना दिसतो. इथल्या काही दगडी वस्तू, मातीची भांडी, खापऱ्या आपल्याला तब्बल किमान १२ लाख वर्षे (आदम पुराश्मयुग, मध्य पुराश्मयुग, उत्तर पुराश्मयुग, इतिहासपूर्व, नवपाषाण, सिंधुसंस्कृती, ताम्रपाषाण, महापाषाण) मागे घेऊन जातात. या वस्तू जागतिक कीर्तीच्या डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (डेक्कन अभिमत विद्यापीठ) पुणे यांनी कुलगुरू डॉ. वसंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. बालाजी गाजूल (अभिरक्षक, पुरातत्त्व संग्रहालय, डेक्कन कॉलेज पुणे) यांच्या सहकार्याने उपलब्ध झाल्या आहेत. याशिवाय पहिल्या शतकातील इराणी कुंभ, सातवाहनकालीन जाते, शहरातील वीरेश्वर मंदिर परिसरात मिळालेली देवीची महिषासुरमर्दिनी स्वरूप मूर्ती, भोम (ता. चिपळूण) येथील वाघजाई देवीची मूर्ती, बाराव्या शतकातले वीरगळ, कोरीव दगड, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, ढाल, तलवारी, तोफगोळा, भाला, जंबी, कट्यार आदि शिवकालीन शस्त्रे, दगडाच्या ठोकळ्यात कोरलेला चारशे वर्षपूर्व गणपती, कलात्मक कंदिल, दुसऱ्या महायुद्धात वापरलेली भूमापन दुर्बिण, वाळूचे घड्याळ, फोनचा प्रवास दर्शविणारे जुने लाकडी टेबलावरील, भिंतीवरील टेलिफोन, वैशिष्ट्यपूर्ण रचनायुक्त बहिर्वक्र भिंग, तिबेटीयन घंटा, कालबाह्य वजने, सायाळीच्या काट्यापासून बनविलेली पेटी, दक्षिण धृवावरील दगड, कोकणात मिळणारी अभ्रक (कणकवली), सिलिका (कासार्डे-तरळा), आयर्न ओव्हर (फोंडा-कणकवली), क्वार्ट्ज (वाटूळ-लांजा), बॉक्साईट (केळशी-दापोली), जांभा (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) आदि खनिजे, होकायंत्राची दिशा बदलविणारे दगड, जुना सारीपाटाचा खेळ वेगवेगळ्या आकर्षक रचनेत मांडण्यात आलेले आहेत.



                          


ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, माजी आमदार शिवाजीराव सावंत यांच्या संग्रहातील धोंडो केशव कर्वे, वि. स. खांडेकर, ना.सि. फडके, दत्तो वामन पोतदार, पां. स. साने, सानेगुरुजी, दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, जयप्रकाश नारायण यांच्या सन १९४० दरम्यान घेतलेल्या स्वाक्षऱ्या येथे पाहाता येतात. सावंत हे सन १९४० साली रत्नागिरीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजन समितीचे सदस्य होते. दोनशे वर्षपूर्व ब्रिटीशकालीन, होळकर संस्थान (इंदूर), सांगली संस्थान, श्रीमंत सरकार गायकवाड (बडोदे), जोधपुर सरकार यांचे स्टॅम्पपेपर, ग्रामर ऑफ संस्कृत हे सन १८०५ चे कलकत्यातून प्रकाशित झालेले पुस्तक, दोन आणे किमतीची भगवद्गीता प्रत, दोनशे वर्षे जुनी हस्तलिखिते, सन १७६३ सालचे झांशी संस्थानचे जमा-खर्चाचे कागद, सन १८३४ साली पार्थिवेश्वराला (पाथर्डी-चिपळूण) दिलेल्या सनदेची मूळप्रत, लोकमान्य टिळकांनी दिनांक १३ फेब्रुवारी १९२० रोजी चिपळूणला पाठविलेल्या पत्राची प्रत, ‘मु.पो. चिपळूण बंदर’ असा उल्लेख असलेली ईस्ट इंडिया कंपनीची पोस्टकार्ड आपल्याला इतिहासात घेऊन जातात. दोन हजार वर्षांपूर्वीपासून अगदी स्वातंत्र्यपूर्व ब्रिटीश कालखंडापर्यंतची नाणी येथे पाहाता येतात. ज्यात मौर्य, सातवाहन, कुषाणकाळ, शीलाहार, रोमन, पोर्तुगीज डच, शिवकालीन, पेशवेकालीन, इंदूर संस्थान, नागपूर संस्थान, झांशी संस्थान, ग्वाल्हेर संस्थानची पुरातन नाणी, पहिल्या महायुद्धात मिळालेली सन्मानपदके, १२ व्या शतकातील सोन्याचे पद्मटंक आणि शिलाहारकालीन (शतक नऊ ते अकरा) डाळीच्या एका दाण्याच्या आकाराचे सोन्याचे फनम संग्रहालयाच्या खजिन्याचे मूल्य वाढवित आहेत. विचारपूर्वक तयार करण्यात आलेले कोकणातल्या खेडेगावातील स्वयंपाकघर, तिच्यातली भाकरी थापणारी महिला, आजूबाजूचे चूल, चिमटा, फुकणी, तांब्या, लाकडाचा पलेता, पाटा-वरवंटा, गरम पाणी तापवण्याचे तपेले, कंदील, लाकडाची विळी, रॉकेलचा दिवा आदि साहित्य आपल्याला ग्रामीण लोकजीवनाचा नजरा दाखवते. त्या सोबतच कोकणी वापरातल्या कणगी, पाणी तापवायचा बंब, हरिक दळायचे जाते, पातेली, काथवट, लाकडी मापटी, घिरट, उखळ, शंभर वर्षपूर्व लाकडीपेटी, पंचपाळ, चौफुला, नारळाच्या करवंटीपासून बनविलेले जेवण वाढायचे डाव, तांब्या-पितळेचे हंडे-कळश्या यांसह कोकणी देवघरातील दोनशे वर्ष जुनी प्रभावळ, समई, फुलदाणी, आरतीचे ताट, पंचपाळ, संपुष्ट, तेल घालायचे भांडे, करा दिवा, पंचदीप, पूजेची उपकरणे, रक्तचंदन विष्णुमूर्ती आदि दोन-तीनशे वर्षापूर्वीच्या वस्तू आपल्याला कोकणाची सैर घडवून आणतात.







संग्रहालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वाचन मंदिराचे ‘कलादालन’ उभे राहते आहे. या कलादालनात आपल्या कर्तृत्त्वाने कोकणच्या लाल मातीचा सुगंध देशासह जगभर पोहोचविलेल्या निवडक ७५ कोकणरत्नांची तैलचित्रे पाहाता येतील. या सर्व कोकणरत्नांच्या कार्य-कर्तृत्त्वाची माहिती असलेली रंगीत पुस्तिकाही अल्पदरात उपलब्ध केली जाणार आहे. त्या माध्यमातून कोकणच्या मातीचा सुगंध सर्वांना अनुभवता येईल. दिनांक १ ऑगस्ट १८६४ रोज स्थापन झालेले अनेक दोलामुद्रित पुस्तके, जुन्या पोथ्या असा दुर्मीळ ग्रंथसंग्रह ३०० वर्षांपूर्वीची हस्तलिखिते, ग्रंथसंख्या ६२३४४, दुर्मिळ ग्रंथ १४२७, संबंधित लेखकांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या ३०० पुस्तकांची उपलब्धी असलेल्या वाचनालयाचे हे संग्रहालय आहे. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी हे वस्तूसंग्रहालय उभारण्याचे स्वप्न पहिले होते. त्यांच्यासह वाचन मंदिराचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले आणि सर्व संचालक मंडळाची मेहनत या संग्रहालय उभारणीमागे आहे. कमी जागेतही एखाद्या राष्ट्रीय संग्रहालयासारखी मांडणी हे वस्तुसंग्रहालयाचे वैशिष्ट्य असून त्या कौशल्यामागे ज्येष्ठ कला मार्गदर्शक प्रकाश राजेशिर्के यांची मेहनत आहे. या वस्तूसंग्रहालय दालनाएवढी चार दालने सामावतील एवढ्या जुन्या वस्तू, नाणी, हस्तलिखिते, ग्रामदेवता पालखी, दगडी वस्तू, इरलं, शेतीची औजारे आदि वाचनालयाला अद्यापी जागेअभावी मांडता आलेली नाहीत.

कोकणची सांस्कृतिक राजधानी, चिपळूण हे महाराष्ट्रात वेगाने विकसित झालेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील एक प्रमुख शहर आहे. कोकणात-चिपळूणात येणाऱ्या इतिहासप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटक, शालेय सहली, नव्या पिढीतील तरुणांनी हे संग्रहालय आवर्जून पाहायला हवे ! हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले असते. तिकीट दर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ५ रुपये तर इतरांसाठी १० रुपये इतका आहे. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : ०२३५५ – २५७५७३, मो. ९४२३८३१६६८.

धीरज वाटेकर

विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.                
मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com







आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...