गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

झुंबर वेलीचं सौंदर्य !

        


चिपळूण शहरातल्या खेंड भागात राहायला आल्याला आम्हाला एक तप पूर्ण होत आलंय. तेव्हाचं भकास वाटणारं इथलं पर्यावरण आता पूर्णत: बदललंय. निसर्गातल्या गुजगोष्टीत नि परसदारातल्या बाळंतपणात ते रममाण झालंय. याच वातावरणात गेल्या ७/८ वर्षांपासून असलेलं एक जीवंत आश्चर्य आम्हाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ पाहातंय ! पण याची आम्हाला फारशी कल्पना नव्हती. इतकी की एकदा तर ‘अनावश्यक वाढ’ म्हणून आम्ही त्यावर ‘ट्री कटर’ चालवून मोकळे झालो होतो. अर्थात पूर्ण उलगडा झाल्याशिवाय कोणतंही झाड समूळ तोडायचं नाही हा विचार जपलेला होताच ! गेल्यावर्षी कोरोना संक्रमण काळात लॉकडाऊन एकने परसदारी निरखून बघायला जो ‘डोळस’ वेळ दिला त्यात सध्याच्या थंडीच्या दिवसात, वर्षाखेरीस आणि नववर्षारंभ काळात फुललेल्या या ‘दुर्मीळ’ झुंबर वेलीनं आम्हाला आकर्षित केलं होतं. तसं तिचं या मौसमातलं बहरणं आम्हाला सवयीचं झालेलं होतं. पण का ? कुणास ठाऊक ? अधिक बारकाईनं निरखल्यावर यंदाही बहरलेल्या ‘झुंबर’ वेलीचं प्रभावशाली सौंदर्य अधिक लोभस वाटलं.



क्लेरोन्डेन्ड्रम स्मिथियनम (
Clerondendrum Smithianum) हे सहज उच्चारायलाही कठीण असं शास्त्रीय नाव असलेल्या या दुर्मीळ फुलझाडाचं डोळ्यांनी दिसणारं फुललेलं सौंदर्य मात्र अफलातून आहे. याच वेलवर्गीय झाडाला लाईटबल्ब (Light Bulb) किंवा चेन ऑफ ग्लोरी (Chains of Glory) असंही म्हणतात. मराठीत मात्र याला ‘झुंबर वेल’ असं छान साजेसं नाव असल्याचं आम्हाला सोशल मिडीयावरून समजलं. सध्याच्या हिवाळ्याच्या मध्यापासून ते वसंतापर्यंत या झाडाच्या फुलांच्या बल्बच्या आकाराच्या कळ्या उमलल्यावर नजरेस जाणवणारे परागकणयुक्त लांबलचक पुंकेसर असलेल्या पांढर्‍या फुलांचे झुंबरासारखे सौंदर्य पाहणाऱ्याला जागीच खिळवून ठेवते. पूर्ण वाढ झालेल्या झुंबर वेलीच्या फुलपाखराच्या आकाराच्या फुलांवर सूर्याची कोवळी किरणे पडल्यानंतर तिचे सौंदर्य अधिक खुललेले दिसते. हिरव्यागार पानांच्या सान्निद्ध्यात या वेलीवरचा अनेक घड्यांनी युक्त झुंबरासारखा दिसणारा फुलोरा जमिनीच्या दिशेला झेपावत असताना, हलक्याश्या वाऱ्याची मंद झुळूक मदतीला आली की परसदारी जणू नृत्य करीत असल्याचा आभास निर्माण होतो.


अन्यवेळी वेलीच्या खुललेल्या पांढऱ्या फुलांपेक्षाही तिच्या फिक्कट पांढऱ्या कळ्या अधिक मनमोहक वाटतात. जणू त्या भारतीय मण्यांप्रमाणे भासाव्यात. टोकाला हलकासा लाल रंगाचा स्पर्श असलेल्या या फुलांचा देठ तांबूस रंगाचा असतो. ४ फुटाची पूर्ण वाढ झालेलं फुलझाड सहज बहरत असलं तरी ते ६ फुटापर्यंत सुलभतेने वाढतं. कधीकधी याची वाढ १० फुटही असू शकते. आपल्या जैवविविधतेतील घटक असलेल्या फुलपाखरांसह छोट्या पक्ष्यांनाही (Humming birds) झुंबरवेल आपल्याकडे आकर्षित करते. मात्र इतक्या आकर्षक फुलाला अजिबात सुगंध नाही हे आश्चर्यकारक आहे. हे सदाहरित वेलवर्गीय फुलझाड मूळचे थायलंडचे असल्याचे आमच्या वाचनात आले. आशिया आणि आफ्रिकेमध्ये क्लेरोन्डेन्ड्रमच्या सुमारे ४००हून अधिक प्रजाती असाव्यात. जगभरात मोजक्या भागात उपलब्ध असलेले हे फुलझाड ‘अमेझॉन’वर विक्रीला असल्याचे पाहून तर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.


आमच्यासोबत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळात कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी मित्र विलास महाडिक यांच्या नजरेला काही दिवसांपूर्वी आम्ही हे पूर्ण फुललेलं फुलझाडं आणलं. यापूर्वी कुठेही पाहिलेलं नसल्यानं त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी या फुलझाडाचा व्हिडीओ, सोशल मिडीयावरील दुर्मीळ फुलझाडांशी संबंधित एका ग्रुपवर पोस्ट केला. तेव्हा याच्या नावाचा आम्हाला उलगडा झाला. वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, हेमंत ओगले, रोहन कोरगावकर, दत्तात्रय मोरसे, प्रा. आदित्य तांबे, राहूल सोनवणे, संजय परांजपे, आकाश बाखडे आदिंमुळे या वेलीचं नाव समजणंं सोपं झालं. १३ जानेवारी २०२२ रोजी मिलिंद गडकरी यांनी आपल्या फेसबुक वालवर फुलाचा एक फोटो पोस्ट केला होता, तो झुंबर वेलीचा होता. हे रोप त्यांना गणपतीपुळे मंदिराच्या समोर मिळालेलं होतं. नावानुसार आम्ही याची अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता फारसं काही हाती लागलं नाही. तेव्हा पुरेशा प्रकाशात फुलणाऱ्या आणि फारसे दस्तऐवजीकरण न झालेल्या झुंबर वेलीची दुर्मीळता आमच्या ध्यानात आली. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या परसदारी बहरलेली जबरदस्त आकर्षक अशी ही ‘झुंबर वेल’ पाहाणं हे खरोखरच सुंदरतेचं प्रतिक आहे, असं वाटल्याने तिच्याविषयी लिहिलं.

 

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com   


'झुंबर वेल' फुलाची ही आणखी काही छायाचित्रे 








चांगभलं करणारं ‘पवतं’ !

    श्रावण शुक्ल त्रयोदशीचा दिवस होता. चार वर्षांपूर्वी (२०१६) आम्ही चिपळूण तालुक्यातील पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानच्या देवराईमध्ये वृक्षारोपण करण्याकरिता हरडा, नीव, गुलमोहर, सोनचाफा आदी जातींचे साठेक वृक्ष घेऊन गेलो होतो. तेव्हा मंदिरात ग्रामदेवतेला ‘पवतं’ अर्पण करून उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे ते पवतं बांधण्याचा कार्यक्रम सुरु होत होता. आमच्यासमोर ग्रामदेवतेला गुरवांनी ‘पवतं’ अर्पण करून, 'जसं हे ‘पवतं’ तुला घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ असं साकडं घातलं. ग्रामस्थांच्या हाती ग्रामदेवतेच्या नावाची पवत्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं. उपस्थित ग्रामस्थांनी एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलेलंही आम्ही ऐकलं. कुतूहलाने तेव्हा आयुष्यात पहिल्यांदाच हातावर ‘पवतं’ बांधलं. तेव्हापासून मनात ‘पवतं’ घर करून बसलं होतं. मानवी जीवनाचं ‘चांगभलं’ करलं अशी श्रद्धा असलेल्या ‘पवतं’विषयी लक्षात आलेलं काही म्हणूनच लिहावसं वाटलं.

कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावात ‘पवतं’ बांधण्याची परंपरा आजही सुरु आहे. त्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आपल्याला भेटतात. कोकणात ग्रामदेवतेला ‘पवतं’ बांधण्याचा कार्यक्रम सर्वत्र नागपंचमी ते नारळी पोर्णिमेच्या दरम्यान होत असावा. पारंपरिक महाराष्ट्रीय लोकगीतातील स्त्रीधन समजल्या जाणाऱ्या उखाण्यात, ‘पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेतें दोरं, आलं शिलंगान म्होरं’ अशा शब्दांनी पवतांना गौरविलं गेलं आहे. वरील उखाण्यातील उल्लेखानुसार पवतं पंचमीचं असलं तरी विविध ठिकाणी ते स्थानिक सोयीनुसार दिवस ठरवून बांधलं जाण्याची परंपरा आहे. ‘पवतं’ बांधण्याची आम्ही पाहिलेली पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघांबर देवस्थानची परंपरा ही श्रावण शुक्ल त्रयोदशीची आहे. फारपूर्वी या गावच्या खोत मंडळींवर हे पवतं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असायची. खोतांच्या घरी बसून कोष्टी (विणकर) समाजाचे मानकरी पवतं विणत असत. ही पद्धत आता बंद झाली. तेव्हा ग्रामदेवतेला पवतं अर्पण करण्याच्या आदल्या दिवशी देवाला ‘जागर’ व्हायचा. ‘जागर’ हा ग्रामदेवतेला रात्रभर जागवायचा कार्यक्रम होय. ही आदली रात्र जागविल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे देवाला रूपे (मुकुट) लावून सजवलं जायचं. या दिवसाला ‘जागर पोर्णिमा’ म्हणत. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला, नारळी पौर्णिमेच्या दोन दिवसपूर्व हे पवतं बांधलं जायचं. आजही असंच बांधलं जातं. फक्त रात्र जागविली जात नाही.

सध्याच्या काळात पवतं बनविण्याचा दोरा आणण्यासाठी कोष्टी समाजाच्या मानकऱ्यांना  गावाकडून पैसे दिले जातात. श्रीबाजी वाघंबर देवस्थान ग्रामदेवतेच्या पारंपरिक पद्धतीनुसार वर्षाच्या एकूण दिवसांइतकं बारीक पांढऱ्या दोऱ्याचं ढोपरांवर केलेलं ३६५ सलग फेऱ्यांचं एक अशी ७ पवतं (श्रीबाजी वाघंबर, श्रीसोमेश्वर, श्रीवाघजाई, श्रीकेदार, श्रीनवलाई, श्रीपावनाई, श्री चोपडाई) ७ देवतांसाठी कोष्टी समाजाकडून तयार करून घेतली जातात. ही तयार केलेली पवतं ग्रामदेवतेला अर्पण करण्यापूर्वी ‘गुरव’ विधिवत पूजा करतात. त्यानंतर गावाच्या उपस्थित खोतांकडून, ‘पवतं घालायला घ्यायची काय ?’ असा हुकूम मागितला जातो. हुकूम काढण्याची जबाबदारी अर्थात गुरवांची असते. ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करताना गुरवांच्या हातात धुपारती असते. त्यांच्या मागून पालवण-ढोक्रवली गावचे खोत, गावकर आदि ४/५ मंडळी ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करतात. देवाला अर्पण करून झालं की पवतं मंदिराच्या खांबाला, इमारतीला बांधलं जातं. उपस्थित सर्वांना बांधण्यासाठी स्वतंत्र पवतं आणलेलं असतं. ते घातलं जातं. गावकर मंडळी उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे पवतं बांधतात. गुरव देवाची आरती करतात. सोबत परिटांच्या घरचा एक माणूस दिवा दाखवायला असतो. एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं !’ असं म्हटलं जातं. ग्रामदेवतेला साकडं घातलं जातं. ‘आज जसं तुला हे पवतं घालतो आहे तसं तू आमचं रक्षण कर’ म्हणून देवाच्या नावाची दोऱ्याची गाठ हातावर बांधून बंधन केलं जातं. पवत्याचा हा दोरा काही ग्रामस्थांच्या हातात वर्षभर पाहायला मिळतो. नवा बांधायची वेळ आल्यावर जुना काढला जातो. हे पवतं हातात किंवा गळ्यातही बांधलं जातं. त्यादिवशी घरपट आलेला माणूस आपल्या घरातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे पवतं घेऊन जातो. पूर्वी गावचे गुरव पवतं वाटत घरपट फिरायचे. आजही कोकणातल्या काही गावात ही परंपरा कायम आहे. परंतु प्रस्तुतच्या ढोक्रवली आणि पालवण ग्रामदेवतेच्या मंदिरात नाही. पूर्वी हे मंदिर तीन गावचं होतं. इथे देवराई होती. तेव्हा या गावांना निवाचा कोंड (निवळी), पालाचा कोंड (पालवण) आणि ढोकाचा कोंड (ढोक्रवली) असं म्हटलं जायचं. कालांतराने निवळकरांनी आपलं श्रीनवलाई श्रीपावणाई ग्रामदेवतेचं स्वतंत्र मंदिर उभारलं. तर ग्रामदेवतेला पवतं बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मंदिरातला देव भंडारायला घेतला जातो. देवाची वस्त्रे आणि मुकुट उतरवून पेटीत पूर्ववत ठेवली जातात. ही पेटी गावकरांकडे पेटी सुपूर्द केली जाते. पूर्वी २/३ गावच्या ग्रामदेवतांची जबाबदारी असलेल्या गुरवांचा गळा यादिवशी पवतांनी भरून जायचा. मंदिरात न येऊ शकलेली मंडळी, लहान-लहान मुलं पवतं घ्यायला त्यांच्याजवळ यायची. गावोगावी हाती ग्रामदेवतेचं पवतं बांधलं गेल्यावर नारळी पौर्णिमेचं ‘रक्षाबंधन’ संपन्न व्हायचं, आजही होत असतं.

गेल्यावर्षी (२०२०) जिंतूरच्या (परभणी) प्रा. जी. एन. गडदे यांची नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ संबोधणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर आमच्या वाचनात आली आणि पुन्हा ‘पवतं’ आठवलं. मराठवाड्याच्या ग्रामीण भागात आजही जुन्या पिढीतील लोकं नारळी पौर्णिमेला ‘पवती पुनव’ म्हणतात. आजच्या पिढीला हा शब्द फारसा परिचित नाही. या दिवशी घरातल्या सर्वांच्या हाती पवतं बांधलं जातं. मराठवाड्यात ठिकाणी यालाच राखी म्हणूनही संबोधलं जातं. याच दिवसात कापसाला पातं लागायला सुरुवात होत असते. ते गळून पडण्याची शक्यता असते म्हणून एक दिवस शेतीची कामं बंद असतात. महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागात ५० वर्षांपूर्वी ‘राखी पोर्णिमा’ हा शब्दच बहुदा रूढ नसावा. कदाचित गावोगावी दूरदर्शन आल्यावर हे शब्द पोहोचले असा एक मतप्रवाह आहे. तेव्हा गावचे जंगम किंवा पुजारी भिक्षा मागताना सोबत ‘पवतं’ आणत. घरोघरी पुरुष, मुलांना बांधत. हे ‘पवतं’ घरच्या देवासह सायकल, गाडी, मशीन, दुकानातील तराजूंसह व्यवसायातील अवजारांना बांधलं जायचं. काही भागात नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर काढलेल्या नागोबांना हळदीने पिवळे केलेले दोरे चिकटवले जायचे. दुसऱ्या दिवशी तेच दोरे ‘पवतं’ म्हणून हातावर बांधले जात. काही भागात पावसाळ्यात खरिपाची पेरणी संपल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये बैलपोळ्यावेळी बैलांच्या शिंगानाही पवतं बांधली जायची. नारळी पौर्णिमेला, आजही महाराष्ट्रातील लाखो लोकांचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबालाही पवतं अर्पण केलं जातं. त्यानंतर पवित्र रक्षक धागा (पवतं) मिळवण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. राज्यातल्या काही ठिकाणी पूर्वी दानवीर महाबली राजा बळी यांना जे बांधलं गेलं तेच ‘रक्षासूत्र’ आज तुम्हाला बांधत आहे अशा अर्थाचा, 'येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:। हा मंत्र म्हणून पवतं बांधलं जात होतं.

चार वर्षांपूर्वी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष विलास महाडिक यांच्यासह आम्ही जेव्हा वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी ढोक्रवलीला गेलो तेव्हा आम्हाला ही ‘पवतं’ परंपरा पाहायला मिळाली. याबाबत लिहायचं ठरवल्यावर आम्ही पालवण मराठवाडी येथील सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे ज्येष्ठ ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांच्यासह नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक आणि त्यांचे चिरंजीव विकास महाडिक यांच्याशी चर्चा केली. अलिकडे सोशल मिडीयावर, ‘गणेशपूजेप्रसंगी बाप्पाला घालण्यात येणारं कापसाचं वस्त्र (पवतं) निर्माल्यात न टाकता भिजणार नाही अशा ठिकाणी अंगणातील एखाद्या झाडाला अडकवून ठेवा. याचा उपयोग पक्षी घरटे बांधताना करतात.’ अशा आशयाची पोस्ट वाचनात आली होती. तेव्हा आम्हाला परत ‘पवतं’ भेटलेलं. या कल्पनेचं अनेकांनी अनुकरण केलं. कापसाच्या पवतांचा पर्यावरणीय उपयोग साध्य करत एक पाऊल पुढं सरकलेल्या या ‘पवतं’ परंपरेनं आम्हाला लिहितं केलं.

 

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com 

परिटाचा दिवा !

    पाचेक वर्षांपूर्वी एका प्रेरणादायी शब्दकथेचं लेखन करताना परीटघडी, परिटाचा दिवा, परिटांचा अंगारा या शब्दांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. तसे हे शब्द माहितीतले होते. पण शब्दकथा लिहिण्याकारणे त्यांच्या अर्थांच्या अधिक जवळ जाता आलं होतं. कोकणात एकेकाळी हा  परिटाचा दिवा प्रसिद्ध होता. तेव्हा गावोगावी परीट समाजाकडून दिवाळीत, दिव्यांनी होणारी ओवाळणी सन्मानाची, प्रतिष्ठेची मानली जायची. नंतर जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशा गावोगावच्या परंपरा लुप्त होत गेल्या. काही परंपरा कालौघात बदलल्या तर काही अस्तित्त्वापुरत्या टिकून राहिल्या. ‘परंपरा’ म्हणून आजही आपलं अस्तित्व टिकवून असलेल्या असलेल्या दिवाळीतील परिटाच्या दिव्याविषयी जाणून घेऊयात !

देशातल्या ग्रामीण भागात आजही अनेकविध प्रथा परंपरा जोपासल्या जातात. गावागणिक त्यात बदलही पाहायला मिळतात. कोकणभूमीही गावोगावी उत्तमोत्तम परंपरा जोपासून आहे. प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या परीट समाजानेही आपल्या परंपरा जपल्या असून त्यात गावागणिक बदल असू शकतात. पूर्वी बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण खोबणीत लामणदिवा लावून परीट स्त्री घरोघरी जाऊन घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायची. तेव्हा दिवाळीपूर्वी परीट आळीत किंवा त्यांच्या घरी जाऊन स्त्रीयांना आमंत्रण केलं जायचं. ओवाळणी झाल्यावर परीट स्त्रीला फराळ आणि ओवाळणी दिली जायची. आपला परंपरागत गावगाडा अभ्यासता शंभर वर्षापूर्वीपर्यंत ही परंपरा अस्तित्वात असावी. प्रस्तुत लेखात नमूद चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील ज्ञात परंपरा ही पुरुषांकडे वर्ग झालेल्या काळापासूनची पाहायला मिळते. सध्याच्या काळात तर ही ओवाळणीची परंपरा श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेच्या मंदिरात दिवाळीच्या उत्सवी वातावरणात संपन्न होत असते. ओवाळणीच्या ताम्हणात साधा दिवा, अक्षता आणि हळदी-कुंकू असतं. चिपळूण तालुक्यातील निवळी गावचे रहिवासी आणि संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संस्थेचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ लिहिताना आम्हाला या परंपरांची माहिती झाली होती.

परीट हा बारा बलुतेदारांपैकी एक मेहनती समाज आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यांना गावकऱ्यांचे धुणे धुण्याचे काम लग्नकार्य आणि सोयर-सुतकप्रसंगी विशेषत्वाने करावे लागे. गावातील लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चादर धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा या समाजाकडे होती. देशभरात दहाएक कोटी लोकसंख्येचा, हा विखुरलेला समाज ग्रामीण भागात आपल्या प्रथा परंपरा, काही ठिकाणी इस्त्रीचा परंपरागत व्यवसायही सांभाळून आहे. संत गाडगेबाबा याच समाजात जन्मले. त्यामुळे या समाजाचं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे. पूर्वी नदीच्या काठाला बांधलेल्या घाटांवर परीट लोकं धुणं धुवायची. त्या बदल्यात सुरुवातीला त्यांना पोटाला खाणं मिळायचं. नंतरनंतर धान्य मिळू लागलं आणि कालौघात पैसा मिळायला सुरुवात झाली. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डोकावलं तर कोणा थोराड परटाच्या तोंडून, ‘आरं अलीकडंची पोरं तुम्ही कशी वळखशीला ! तुझी आज्जी आमच्याकडं द्यायची धडूती धुवायला !’ असे शब्द सहज कानी पडतील.

परटांकडून पूर्वांपार दिव्याची ही ओवाळणी गावच्या खोतांना आणि मानकऱ्यांना केली जायची. परीट समाजातले मानकरी पूर्वज प्रतिनिधी तेव्हा गावाच्या खोतांना घरोघरी ओवाळायला जायचे. तत्पूर्वी नरकचतुर्दशी-अभ्यंगस्नानाच्या पूर्वरात्री देवळात पहाटेच्या वेळी ग्रामदेवतेला रूपे लावली जायची. सकाळी ग्रामदेवतेच्या देवळात देवाला आणि उपस्थित मानकऱ्यांना हा दिवा दाखवला (ओवाळला) जायचा. दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याला गावाच्या खोतांना, मानकऱ्यांना घरोघरी हळदी-कुंकू लावून ओवाळलं जायचं. ओवाळणीवेळी ही मंडळी पाटावर किंवा घोंगडीवर बसायची. मानकरी परिटांकडून ओवाळल्यावर स्वेच्छेने ताटात ओवाळणी टाकली जायची. शिधा मिळायचा. ही परंपरा आबा महाडिक यांनी पुढे चालवायला सुरुवात केली तेव्हा परीट पुरुष घरपट जायचे. दिवसभरात असं ४०/५० घरात जाणं व्हायचं. ४०/५० वर्षापूर्वीपर्यंत ही घरपट जाऊन ओवाळण्याची परंपरा कायम होती. नंतर पिढी जसजशी शिकत गेली तसतशी ती कामधंद्यासाठी गावाबाहेर पडली. गावातलं शेतीकाम कमी झालं. परिणामस्वरूप वेळ देण्यावर बंधनं येऊन परंपरांमध्ये बदल होत गेला. अनेक गावांतून जुनी माणसं आणि नवीन माणसं यांच्यातील संवाद भेदांमुळेही परंपरांमध्ये बदल होत राहिला. सध्याच्या काळात परटाचा दिवा घेऊन घरपट जाणे होत नाही. ही ओवाळणी ग्रामदेवतेच्या मंदिरात होते. मंदिरातील दिवा ओवाळणीच्या परंपरेचा मूळ मान हा परीट समाजाचा आहे. कालांतराने त्यांच्या जोडीला मंदिराचे गुरव आणि ४/५ गावकर मंडळी जोडली गेली आहेत.

सध्याच्या काळात पहिल्या अंघोळीला, नरकचतुर्दशीला सकाळी श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेला रूपे (मुकुट) लावून झाल्यावर गुरवाकडून पूजा होते. पूजा आटपल्यावर गुरव हे गावाकडून आणि खोतांकडून, ‘परटांनी दिवा करायचा का ?’ असा हुकूम (परवानगी) घेतात. मंदिराच्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ एक पिठाचा दिवा प्रज्ज्वलित केला जातो. मंदिराला ५ फेऱ्या मारून देवाला नैवेद्य दाखविला जातो. नंतर गावातील खोतांना परटांचा दिवा दाखवून ओवाळले जाते. आता ओवाळण्याचे हे काम परीट कुटुंबातील पुरुष मंडळी करतात. ह्याही दिव्याने पहिल्यांदा ग्रामदेवतेला ओवाळले जाते. नंतर मंदिरात जमलेल्या खोत आणि मानकऱ्यांना ओवाळतात. ओवाळल्यानंतर त्यांच्याकडून ताटात स्वेच्छेने ओवाळणी टाकली जाते. यावेळी गुरवही एक दिवा घेवून सोबत असतात. त्यांच्या सोबत गावकर मानकऱ्यांपैकी ४/५ जण असतात. दिवा ओवाळण्याची ही परंपरा पहिल्या दिवाळीला आणि देव दिवाळीला अशी दोनवेळा संपन्न होते. याला पारंपरिक भाषेत दिवा चढवणे आणि दिवा उतरवणे असे म्हणतात. देवदिवाळीचा दिवा उतरवण्याचा कार्यक्रम मोठा असतो.

शिमगोत्सवादरम्यान होळीला दोन दिवस शिल्लक असताना श्रीबाजी वाघंबर मंदिरातील ग्रामदेवतेची पालखी पालवण गावच्या सहाणेवर आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी पालखीत देव बसवविले जात असताना ग्रामस्थ शिमग्याचा ‘माड’ आणायला जातात. सकाळी परीट समाजाचे मानकरी आपल्या घरून सहाणेवर पालखीजवळ पांढरे निशाण आणून ठेवतात. हे निशाण म्हणजे त्रिकोणी ‘पताका’ आकाराचा पांढरा ध्वज असतो. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या गावात आजही अस्तित्वात आहे. महत्वाच्या प्रसंगी पांढरे निशाण फडकवण्याचा हा परटांचा मान आजही अनेक गावात सुरु आहे. सायंकाळी होळीसाठीचा माड आणल्यावर त्याच्या शेंड्याला हे पांढरे निशाण बांधले जाते. माड उभा केला जातो. शिंपणे कार्यक्रमाच्यावेळी माडाचा शेंडा गावकराकडून तोडला जातो. माडाचा शेंडा आणि शेंड्यावरचा निशाणाचा पांढरा झेंडा गावकर हे खोतांच्या दारात आणून ठेवतात.

‘हाणून’ घेण्याची परंपरा

चिपळूण तालुक्यातील याच पालवण-ढोक्रवली गावात शिमगोत्सवात श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी सहाणेवर बसल्यावर नाभिक समाजातील मानाच्या २ व्यक्ती पालखीतील प्रत्येक देवाला दुरून आरसा दाखवतात. देवावर सूर्यकिरणोत्सव घडविला जातो. भद्रेच्या दिवशी (धुलीवंदन) सकाळी १०/११ वाजता गावाचा होम लागतो. होमाला प्रदक्षिणा केल्यावर होमाला प्रज्ज्वलित केले जाते. ग्रामदेवतेची सहाणेवर असलेली पालखी दुपारी ढोक्रवलीला रवाना होते. तत्पूर्वी पालखीसमोर खोतांकडून पुकार देऊन हाणून घेणाऱ्या मानकऱ्यांना बोलावलं जातं. बोलावणं झाल्यावर, देवाच्या पालखीसमोर खोतांनी आणून ठेवलेली तलवार (शस्त्र) आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून अन्य दोघे मानकरी आपल्या उघड्या अंगावर, पोटच्या बाजूला हाणून (स्वतःच्या अंगावर मारून) घेतात. परंपरेनुसार त्यांनी ३ वेळा आपल्या पोटावर तलवार हाणून घेतल्यावर गुरवांकडून, ‘पुरे...पुरे...पुरे !’ म्हटले जाते. मग हाणून घेणं थांबवलं जातं. हाणून घेण्याचं हे काम पूर्वी कोणी अन्य ग्रामस्थ करायचे. त्यांचा वंश संपुष्टात आल्याने त्यांनी हाणून घेण्याचे काम दुसऱ्या मानकऱ्यांकडे सोपवले आहे. तेच सध्या या परंपरेचे मानकरी आहेत.

शिमगोत्सवानंतर श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी देवळात पोहोचल्यावर मंदिरातला देव भंडारला जातो. तेव्हा देवतांना परिधान केलेली वस्त्रे ही धुण्यासाठी पासोड्यात (ग्रामदेवतेच्या पालखीवरील शाल किंवा वस्त्र) गुंडाळून याच परीट समाजाच्या महाडिक कुटुंबीयांकडे दिली जातात. त्यांच्याकडून ही वस्त्र धुवून इस्त्री करून (परिटघडी) करून गुरवाच्या स्वाधीन होतात. याकामी परिटांना एक नारळ आणि पासोडा भेटवला जातो. कधीकधी धुण्यासाठी म्हणून आलेल्या देवाच्या कपड्यांना अडकून, भाविकांनी नवसात अर्पण केलेला एखादा सोन्याचा दागिना, चांदीची फुलं सोबत येण्याची संभावना असते. अशावेळी ते दागिने गुरव किंवा गावकरांकडे आणून दिले जात असल्याची आठवण परटांची ही परंपरा सांभाळणाऱ्या विलास महाडिक यांनी सांगितली. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या तिन्ही गावात अस्तित्वात आहे. धुतलेली ही वस्त्रे देवांना पवतं अर्पण (नागपंचमी ते नारळीपोर्णिमा दरम्यान) करण्यावेळी पहिल्यांदा आणि त्यानंतर अनुक्रमे दसरा, दीपावली, देवदिवाळी आणि शिमग्याला परिधान केली जातात. प्रत्येकवेळी कार्यक्रम संपल्यानंतर वस्त्रे पूर्ववत पेटीत ठेवली जातात. ही वस्त्र धुण्याचे काम वर्षातून एकदाच केले जाते. ग्रामदेवतेचे कपडे धुणे, दिवाळीची ओवाळणी, शिमगा पालखीला निशाण लावणं आदी धार्मिक कामं करायची कोणी ? असा प्रश्न निर्माण झाल्यावर चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील खोतांनी आणि मानकऱ्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळमधून परीट समाजातील हे ‘महाडिक’ कुटुंब गावाची धार्मिक गरज म्हणून इथे आणून वसविलं आहे. पालवणच्या मंदिरामागील बाजूस, कोष्टेवाडीत या परटांचं जुनं घर होतं. तिथल्या विहिरीजवळ आजही या कुटुंबाचं जोतं पाहायला मिळतं. त्याकाळी सुरु झालेल्या परंपरा अनुषंगिक बदलांसह आजही पंचक्रोशीत कार्यरत आहेत.

प्रस्तुत गावच्या परंपरेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही पालवण मराठवाडी येथे सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे गावचे ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांनी जोपासलेली परिटांची परंपरा सांभाळणारे त्यांचे पुत्र विलास आणि विकास महाडिक यांनी आम्हाला याबाबतची माहिती दिली. गावगाड्यात जगणाऱ्या पूर्वीच्या माणसांकडे फार काही नसेलही ! पण त्यांच्याकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. आजची आमची पिढी घड्याळाच्या काट्याची गुलाम झाली आहे. याच गुलामीनं गावागावातील प्रथा-परंपरांना हद्दपार केलं आहे. तरीही काही ठिकाणी जुन्या-जाणत्या मोजक्या लोकांनी आपल्या या प्रथा-परंपरा शक्य तेवढ्या जपल्यात. त्यांचे हे काम अत्यंत प्रशंसनीय आहे.


धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com   

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...