शनिवार, ५ मार्च, २०२२

पूज्य भाऊ सहस्रबुद्धे : दत्त संप्रदायी सत्पुरुष

               प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज (श्रीक्षेत्र माणगाव) यांचे शिष्य, पूज्य श्री. बाळकृष्ण काशीनाथ उर्फ भाऊ सहस्रबुद्धे म्हणजे आपल्या अफाट तप सामर्थ्यातून सिद्ध झालेले एक अलौकिक दैवी व्यक्तिमत्त्व आहे. पूज्य भाऊ हे असंख्य शिष्यगणांच्या जीवनातील दीपस्तंभ आहेत. भाऊंचा मार्गदर्शन शब्द म्हणजे शिष्यांच्या मनात चैतन्य निर्माण करणारा अमृतकुंभ आहे. कोकणातल्या कुंब्रल (दोडामार्ग) गावी काहीतरी वेगळे घडावे, वेगळे उगवावे आणि या मातीचा गंध अध्यात्मिक क्षेत्रात सर्वत्र पसरवा असा जणू परमेश्वरी संकेत असल्यासारखे पूज्य भाऊ आपल्या संपूर्ण जीवनात वावरले आहेत. भाऊंचे गुरु पूज्य टेंब्येस्वामी महाराजांचा जन्म श्रावण कृष्ण पंचमी १३ ऑगस्ट १८५४ रोजी सावंतवाडी संस्थानातील माणगावी झाला होता. टेंब्येस्वामी महाराजांनी २४ जुलै १९१४ रोजी आषाढ शुद्ध प्रतिपदेला श्रीनर्मदा मातेच्या कुशीत गरुडेश्वर (गुजरात) येथे समाधी घेतली होती. यानंतर जवळपास २६ वर्षांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १४ फेब्रुवारी १९४० रोजी जन्मलेल्या आणि मानवी मनात आयुष्यभर दत्त संप्रदायी सत्पुरुष म्हणून स्थान निर्माण करणाऱ्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या तपस्वी जीवनाचा हा मागोवा.

अनादि काळापासून महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची हजारो वर्षांची सलग परंपरा लाभलेला महाराष्ट्रासारखा भूप्रदेश जगाच्या पाठीवर क्वचित कुठे सापडेल. साऱ्या संतांनी मानवी समुदायाला ईश्वरभक्ती शिकवत उदात्तपणे जीवन जगण्याचे तत्वज्ञानही शिकवले आहे. पूज्य भाऊंकडे पाहिल्यावरही हेच जाणवते. कष्टाळू, अभ्यासू, व्यासंगी भाऊंचं मार्गदर्शन हे नेहमीच त्यांचा आवाजातील प्रेमळपणा, कारुण्य, मार्दवता आणि विषयातील प्रभुत्व यांमुळे प्रभावी ठरलेले आहे. आयुष्यात माणसाला कितीही वैभव प्राप्त झालं तरीही पूर्ण समाधान लाभतंच असं नाही. म्हणून तर ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे ?’ असं समर्थ रामदासांनी तर संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनीही ‘सुख पाहता जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ म्हटलंय ते काही उगीच नव्हे. मानवातील विवेक काहीवेळा अडचणीच्या काळात ढळत असतो. अशावेळी त्याला देहरूपी गुरूंची खऱ्या अर्थाने गरज असते. आपल्या संपर्कात आलेल्या अगणितांची ही गरज भाऊंनी पूर्णत्वास नेलेली आहे. आकर्षक गौरवर्ण, नाकाने सरळ, तेजस्वी डोळे, कपाळावरील अष्टगंधाचा टिळा, साधा आणि स्वच्छ पोशाख, सदा हसतमुख चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले विलक्षण तेज आदींच्या समुच्चायातून साकारलेल्या पूज्य भाऊंरुपी सत्पुरुषाचे दर्शन-मार्गदर्शन अध्यात्मिक आनंदाचे अधिष्ठान आहे.

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण ‘सहस्रबुद्धे’ घराण्याचे मूळ गाव आहे. कोतवडे हे रत्नागिरी शहरापासून १५ कि.मी. अंतरावर आहे. मूळची गणपुलेअसलेली आणि कालांतराने चतुरस्र बुद्धी, व्यवहार कुशलता, बाणेदारपणा या अंगभूत गुणांमुळे ही मंडळी बुद्धी सहस्त्रेषुअर्थात सहस्रबुद्धे नावाने प्रसिद्ध झाली असावीत असे म्हटले जाते. कोतवडे गावात पेशव्यांच्या उत्कर्षाच्या काळात बांधलेले ‘सहस्रबुद्धे’ घराण्याशी संबंधित स्वयंभू जागृत श्रीदेव धामणेश्वराचे भव्य मंदिर आहे. हे बिनखांबी मंदिर पायापासून घुमटापर्यंत जांभ्या रंगाच्या विशाल चिऱ्याचे एकावर एक थर रचून बांधले आहे. अहमदनगर मधील प्रसिद्ध संत आणि शिर्डीच्या श्रीसाई संस्थानचे पहिले अध्यक्ष श्रीदासगणू महाराज (गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे ; ६ जानेवारी १८६८ ते २६ नोव्हेंबर १९६२) यांचेही मूळगाव कोतवडे होते. प्रस्तुत लेखात आपण ज्यांच्याविषयीची मांडणी करतो आहोत त्या पूज्य भाऊ सहस्रबुद्धे यांच्या घराण्याचे कोतवडे येथून विस्थापित झालेले मूळ पुरुष गोवा राज्यातील डिचोली तालुक्यातील ‘वेळगे’ गावी स्थिरावले होते. ‘वेळगे’ येथे याच सहस्रबुद्धेंपैकी ‘अनंत’ नामक व्यक्तीला तीन अपत्ये झाली. काशीनाथ हे त्यापैकी एक अपत्य होत. पुढे काशीनाथ यांना भालचंद्र नावाचे अपत्य झाले. भालचंद्र हे १९०७ दरम्यान वेळगे गावातून महाराष्ट्र-गोवा हद्दीवरील कुंब्रल (दोडामार्ग) या जैवविविधतेने संपन्न अशा गावात स्थायिक झाले. कुंब्रल मुक्कामी भालचंद्र यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये झाली. यातील मुलगा काशीनाथ हे पूज्य भाऊ यांचे वडील होत. काशीनाथ यांना सामाजिक कार्याची आवड होती. काशीनाथ यांना एकूण आठ अपत्ये झाली. भाऊ हे दुसरे अपत्य होय. पूज्य भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग सहस्रबुद्धे हे शिक्षक-साहित्यिक होते. शिक्षकी पेशात इमानेईतबारे सेवा बजावून निवृत्तीनंतर त्यांनी काहीशा उशीरा कथालेखनाला प्रारंभ केला होता. त्यांच्या कथांमध्ये आपल्याला दक्षिण कोकणी लोकजीवनातील सरळपणा, मिश्किलपणा, गांभीर्य, विनोद आणि वातावरणातील गूढता भेटते. त्यांच्या ‘अबोध’ कथासंग्रहाला प्रसिद्ध साहित्यिक ह. मो. मराठे यांनी प्रस्तावना लिहिली होती.

पूज्य भाऊंच्या आणि त्यांच्या भावंडांच्या प्राथमिक शिक्षणाकरिता वडील काशीनाथ यांनी आपल्या राहात्या घरी दोन शालेय शिक्षक (पंतोजी) नेमले होते. कुंब्रल भागात शाळा नसल्याने काशीनाथ यांनी कालांतराने रत्नागिरीपर्यंत पायपीट करून आपल्या घराच्या आवारात गावातील वीस विद्यार्थ्यांच्या कल्याणार्थ शाळेची परवानगीही मिळवली होती. पहिल्या दिवसापासून पूज्य भाऊंना लागलेली शिक्षणातील गोडी बालवयात एकदम दुसरीच्या वर्गात प्रवेश करू देण्यास उपयोगी पडली होती. भाऊंचे बालपण वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आकार घेत होते. आजोबा भालचंद्र यांचेही मार्गदर्शन भाऊंना लाभत होते. वयाच्या आठव्या वर्षी भाऊंची मुंज (उपनयन संस्कार) करण्यात आली. मुंजीचा ठरलेला कार्यक्रम काशीनाथ यांना अचानकच्या अडचणीस्तव महिनाभर लांबवावा लागला होता. महिन्याभरानंतर मात्र काशीनाथ यांनी भाऊंच्या मुंजीचा केलेला कार्यक्रम त्या काळात कुंब्रल पंचक्रोशीत आगळावेगळा ठरला होता. या कार्यक्रमात पूज्य भाऊंना पहिल्यांदा गायत्री मंत्राचा उपदेश झाला होता. भाऊंच्या मुंजीनंतर आई जानकी यांनी भाऊंच्या मनात दीक्षेद्वारे श्रीरामसेवेची आवड निर्माण केली होती. त्या अर्थाने आई जानकी या पूज्य भाऊंच्या पहिल्या गुरु होत. आईंच्या मार्गदर्शनाने पूज्य भाऊंची श्रीरामसेवा सुरु झाली. श्रीरामसेवा परिणामस्वरूप भाऊंच्या व्यक्तिमत्त्वात असलेली किंचितशी चंचलवृत्ती कायमची बदलली.

ग्रंथ वाचनाची आवड अधिक वाढल्यानंतर एके दिवशी भाऊंनी आपल्या घरातील श्रीगुरुचरित्र ग्रंथाची पोथी वाचनासाठी उघडली. या पोथीत भाऊंना त्या बालवयातील इवलाश्या तळहातावर मावेल इतका छोटासा एक फोटो मिळाला. हा फोटो पाहताच क्षणी भाऊंना फोटोतील व्यक्तीविषयी चमत्कारिक आकर्षण निर्माण झालं होतं. या आकर्षणाचा परिणाम इतका वाढला की, ‘हेच माझे गुरु आहेत’ असे शब्द भाऊंच्या तोंडून आपल्या बाहेर पडले होते. तेव्हा भाऊंचे आजोबा भालचंद्र हे शेजारीच बसले होते. भाऊंच्या तोंडचे हे वाक्य ऐकून आजोबा भालचंद्र यांनाही अचंबा वाटला. त्यांनी तातडीने भाऊंच्या जवळ येऊन पोथीत सापडलेला फोटो पाहिला तर तो फोटो श्रीक्षेत्र माणगावच्या प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा होता. आजोबांनी हा फोटो कोणाचा आहे हे ओळखल्यावर भाऊंना आणखी आनंद झाला. त्यांनी लगेच ‘मी त्यांना पाहाण्यास आतुर आहे. मला तेथे जावयाचे आहे.’ असे आजोबांना सांगितले होते. आजोबांनी टेंब्येस्वामी महाराजांनी समाधी घेतली असून ते हयात नसल्याचे सांगितले. बालवयातील भाऊंसाठी हा मोठा धक्का होता. त्याही वयात भाऊ क्षणभर स्तब्ध झाले होते. भाऊंच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि निराशेचे भाव पसरले होते. पण आंतरिक तळमळ भाऊंना शांत बसू देत नव्हती. भाऊ शेवटी आजोबांना पुन्हा म्हणाले, ‘ते नसले तरी मला त्यांची जन्मभूमी पाहायची आहे. दत्तदर्शन घ्यायचे आहे.’ भाऊंची ही अनामिक ओढ आजोबांना लक्षात न आली तर नवल ! आजोबांनी तातडीने आपल्या एका खात्रीच्या माणसासोबत भाऊंना श्रीक्षेत्र माणगाव येथे पाठवले. या पहिल्याच भेटीत भाऊंना प. प. श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंब्येस्वामी महाराज यांचा गुप्तरितीने उपदेश झाला. महाराजांच्या झालेल्या याच उपदेशावर नितांत श्रद्धा ठेवून पूज्य भाऊंनी आपले जीवनव्रत आरंभिले.

भाऊंना लौकिकार्थाने दोन गुरु मिळाले. गुरूंच्या उपदेशस्वरूप जीवनव्रत आरंभिल्याने भाऊंमध्ये ज्ञानवृद्धी होऊ लागली होती. भाऊंकडून वेगवेगळ्या देवतांच्या सेवा घडू लागल्या होत्या. वैदिक, पुराणोक्त मंत्रांचा अभ्यास, धार्मिक शिक्षण, दैनंदिन संध्या आणि पूजाअर्चा यांचे घरच्या घरी दोन वर्षे अध्यात्मिक बैठक असलेल्या गुरुजींकडून मार्गदर्शन मिळत होते. बालवयात स्वतःला संस्कारक्षम शिक्षण मिळाले नसल्याची सतत जाणवणारी उणीव वडील काशीनाथ यांनी आपल्या मुलांच्या जीवनात राहाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती. १९५२-५३ सालचे दरम्यान सावंतवाडी परीक्षा केंद्रावर पूज्य भाऊ इयत्ता सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी भाऊंना सावंतवाडी किंवा बांदा येथे जावे लागणार होते. आपल्या भागात सातवीच्या पुढील शाळा असायला हवी हा विचार काशीनाथ यांच्या मनात कित्येक वर्षे सुरूच होता. त्यावर्षी काशीनाथ यांनी जवळच्या कोलझरला शाळा सुरु केली. भाऊंचे मोठे बंधू पांडुरंग हे या शाळेवरचे पहिले शिक्षक होते. अवघ्या आठ मुलांना घेऊन ही शाळा सुरु झाली होती. आज या शाळेचा वटवृक्ष झालेला पाहायला मिळतो. ही शाळा आज भाऊंचे वडील काशीनाथ यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणीवेची साक्ष देत आहे. याच शाळेत भाऊंचे दहावी पर्यंतचे शिक्षण झाले. मात्र या पुस्तकी ज्ञानाने आपल्याला नोकरी व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर जावे लागेल, प्रसंगी सरकारी नोकरी पत्करावी लागेल वगैरे विचार पचनी न पडल्याने भाऊंनी दहावीची परीक्षा देणे टाळले. भाऊंनी संस्कृतचा विशेष अभ्यास सुरु केला. पोटापाण्यासाठी घरातील शेती व्यवसाय आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी दैनंदिन तपश्चर्या व साधनेत विशेष काळ घालविण्यास सुरुवात केली. वयाच्या १८व्या वर्षापासून भाऊंकडून पीडितांच्या पीडापरिहार्थ सेवा घडू लागली. अध्यात्मिक ग्रंथांच्या वाचनाने विविध अडचणीतील पीडितांना उपाय सुचविण्यास प्रारंभ झाला होता. भाऊंकडून पीडितांचा पीडापरिहार इतक्या सहजतेने घडू लागला की भाऊंकडे येणाऱ्यांची संख्या खूप वाढली होती. १९५९ साली वयाच्या विसाव्या वर्षी भाऊंना परांजपे नामक गुरुजी घरी येऊन वेदोक्त शिक्षणाचे मार्गदर्शन करीत राहिले होते. मंत्रसंहितांसह विविध संहितांचे अधिकचे ज्ञान भाऊंना याच काळात प्राप्त झाले होते.

हा तो काळ होता जेव्हा दक्षिण कोकणात गोवा राज्यबंदीचे वातावरण पसरले होते. स्थानबद्धतेचे वाँरट आलेले भाऊंचे गोव्यातील नातेवाईक सखाराम पांडुरंग बर्वे हे कुंब्रल मुक्कामी आले होते. ते चारेक वर्षे कुंब्रलला राहिले. आपल्या या वास्तव्यात बर्वे यांनीच भाऊंना संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भाऊंनी हार्मोनियम, तबला आणि गायनाचे शास्त्रोक्त शिक्षण पूर्ण केले. संगीत क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळावे म्हणून १९६३ साली भाऊ सावंतवाडी येथील जोशी यांच्याकडे गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्याच्या उद्देशाने अधिकच्या शिक्षणासाठी दाखल झाले. या परीक्षेला बसलेले भाऊंसोबतचे काही विद्यार्थी सहजगत्या ही परीक्षा पास होऊ लागल्याने आणि परीक्षेचा अभ्यास खूपच हलका वाटू लागल्याने भाऊंनी ती परीक्षा देणे ‘मध्यमात’ ऐन परीक्षा केंद्रावर जाऊन टाळले. परीक्षकांकडून याबाबतची विचारणा होताच, ‘परीक्षा अभ्यासक्रमापेक्षा बिंदूमात्र जास्त माझा अभ्यास झालेला आहे’ असं उत्तर भाऊंनी दिलं होतं. परीक्षकांनी मग लेखी पेपरनंतर होणारी १५ मिनिटांची तोंडी परीक्षा भाऊंसाठी खासबाब म्हणून तब्बल ७५ मिनिटे घेतली होती. यावेळी भाऊंनी दिलेली उत्तरे ऐकून अवाक् झालेल्या परीक्षकांची भाऊंच्या पाठीवर कौतुकाची थाप तर मारलीच परंतु पुढील काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची संधीही भाऊंना दिली होती.

भाऊंनी यानंतर मागे वळून पाहिले नाही. त्यांनी काही शास्त्रीय पुस्तके अभ्यासून वैयक्तिक साधनेद्वारे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास पूर्ण केला. तत्पूर्वी म्हणजे १९६१ पासूनच भाऊंचे अध्यात्म आणि ज्योतिष यांची सुयोग्य सांगड घालून येणाऱ्यांना घडणारे मार्गदर्शन खूपच प्रभावी ठरू लागले होते. समस्या घेऊन येणाऱ्या व्यक्तीची पत्रिका बघितल्यावर पत्रिकेत ज्या ग्रहांची तक्रार दिसते आहे त्या ग्रहांच्या देवतांची भाऊंकडून दिली जाणारी उपासना सेवा श्रेष्ठ ठरू लागली होती. लोकांना आपापल्या घरी बसून सहज करता येण्यासारखी उपाययोजना अनेकांना आपल्या समस्यांवर मात करण्याचे बळ देत होती. भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढत होती. भाऊंना वैयक्तिक अध्यात्मिक साधनेला वेळ अपुरा पडू लागला होता. म्हणून १९६९ मध्ये भाऊंनी आपला मुक्काम गोव्यातील ‘वेळगे’ या मूळगावी हलविला. १९७३ पर्यंत तिथेही भाऊंना येऊन भेटणाऱ्यांची संख्या वाढली. शेवटी भाऊ पुन्हा कुंब्रलला परतले. मात्र यावेळी घरी न थांबता भाऊ कोलझर येथील श्रीहनुमान मंदिरात वास्तव्याला आले. भाऊंनी आपली अध्यात्मिक सेवासाधना सुरु केली. कुटुंबापासून दूर राहून तपश्चर्या पूर्ण करण्यास आणि लोककल्याणार्थ भाऊंना पुरेसा वेळ मिळू लागला. जवळपास एक तपाहून अधिककाळ १९८६ पर्यंत भाऊंना श्रीहनुमंताच्या चरणी सेवेत राहून आपली विशेष तपश्चर्या रुजू करता आली. याकाळात भाऊंनी अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संत, सज्जनांची दर्शने आणि तीर्थक्षेत्री तीर्थाटने केली. तपश्चर्या फलित म्हणून शेकडो लोकांना अडचणीतून मोकळे होता यावे म्हणून भाऊंनी रामरक्षा, श्रीहनुमानस्तोत्र, श्रीव्यंकटेशस्तोत्र यांसह भगवान हनुमंताशी बोलणे करून आपल्याकडून प्रत्येक व्यक्तीला दिला जाणारा शब्द सत्कारणी लागेल याची काळजी घेतली. याच हनुमान मंदिरात भाऊंच्या अध्यात्मिक जीवनाला विलक्षण सामर्थ्य प्राप्त झाले. पुढे पुढे भाऊंना भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या इतकी वाढली की मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. दरम्यान ‘ज्याचे तोंडून श्रीराम हा शब्दही म्हटला जात नाही अशांना तू संकटमुक्त करून आम्हास अडचणी आणत आहेस. हे तू बंद कर. येणाऱ्यांना सेवा दे. ती हनुमंताकडून रुजू करून नंतरच शब्द दे.’ असा सूचनावजा आदेश भाऊंना सद्गुरुंकडून प्राप्त झाला. तेव्हापासून भाऊंनी लोकांना मार्गदर्शन करण्याची गणिते बदलली. तेव्हापासून आजतागायत पूज्य भाऊंनी भेटीस आणि मार्गदर्शनास येणाऱ्या प्रत्येकास प्रथम ग्रंथवाचन, जपरुपी सेवा देऊन नंतरच त्याच्या समस्येसंदर्भात अंतिम शब्द दिल्याचे अनेकांना ज्ञात आहे. पूज्य भाऊंनी सद्गुरूंचा आदेश शिरसावंद्य मानून श्रीरामदासस्वामी यांच्या त्रयोदशाक्षरी ‘श्रीराम जयराम जयजयराम’ या मंत्राप्रमाणे श्रीहनुमंतांच्या प्रेरणेने ‘जय जय जय श्री जय हनुमान’ हा मंत्र सिद्ध केला. विविध पीडा निवारण, लग्नकार्यादी अडचणी, नोकरी प्राप्तीतील समस्या, आदी कामांकरिता या मंत्राचा अनेकांना फलप्राप्त्यर्थ उपयोग झाला आहे.

आजन्म ब्रम्हचर्यपालन करत अध्यात्माकडे वळलेले पूज्य भाऊ हे आई जानकी यांच्या आज्ञेने १९८६ साली कुंब्रलला घरी परतले. आपलं घर, कुटुंब, शेती आणि संसार यात त्यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली. कुटुंबातील लग्नकार्ये, मुंज आदींत भाऊंनी लक्ष घातलं. कुटुंबातील वडिलोपार्जित भूखंडांची विभागणी, नव्याने घरबांधणी, घरी येणाऱ्यांना नियमित मार्गदर्शन सेवा सुरु केली. विशेष म्हणजे या काळात कालसर्पदोष शांतीसारख्या विविध धार्मिक मुद्द्यांवर छोटे छोटे उपाय सुचवून संत्रस्त लोकांना गुण प्राप्त करून दिला. काही हजार लोकांना रामरक्षा म्हणावयास सांगून त्याद्वारे लग्न आणि नोकरी यासारख्या प्रश्नांची उकल मिळणे, श्रीगणपती सहस्रआवर्तनातून नोकरीची उपलब्धी, श्रीशिवमंत्र आणि शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाच्या वाचनातून रोगमुक्ती तसेच पिढीजात दोष निवारणार्थ ६ किंवा १० अक्षरी प्रभावी मंत्राचा उपयोग करून लोकांना संकटमुक्त होण्यासाठी पूज्य भाऊ सहाय्यभूत ठरल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

२०११ सालच्या प्रारंभी पहिल्यांदा आम्ही एका अचानक योगावर पूज्य भाऊंच्या कुंब्रलमधील निवासस्थानी पोहोचलो होतो. या पहिल्या भेटीत आमचं भाऊंचे ज्येष्ठ बंधू पत्रकार आणि कथाकार स्वर्गीय पांडुरंग सहस्रबुद्धे यांच्याशी अधिक बोलणं झालेलं. त्यानंतरच्या जवळपास भेटीत आमच्या पूज्य भाऊ आणि पांडुरंग सहस्रबुद्धे सरांसोबत, शेणाने सारवलेल्या सुगंधित अंगणात कोकणी पद्धतीने शाकारणी केलेल्या मांडवाच्या सावलीत तासनतास रंगलेल्या गप्पा आठवतात. विशेष म्हणजे पूज्य भाऊ आणि सहस्रबुद्धे सरांसोबत स्वतंत्र संवाद व्हायचा. कधी कधी कुंब्रलला नुकत्याच सारवलेल्या अंगणातही आमचं आगमन व्हायचं तेव्हा त्या ओलेथर सारवणावर काढलेली ती छोटीशी पांढरी रांगोळी भारतीय संस्कृतीचं अलभ्य दर्शन घडवायची. पूज्य भाऊंच्या उपस्थितीतील तिथल्या वातावरणात अनामिक आनंदाची दुर्मीळ अनुभूती मिळायची. आमच्या २०११ सालच्या दिवाळीपूर्व भेटीत, आम्ही नाथसांप्रदायी असल्याचे कळताच पूज्य भाऊंनी आम्हाला जवळच्या मोरगाव येथील श्रीदेव म्हातारबाबा देवस्थान चरणी नतमस्तक होण्याची आज्ञा केली होती. त्याच दिवशी सूर्यास्तसमयी श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेताना आम्हाला आलेल्या आध्यात्मिक अनुभूतींची तुलना २००० साली गणेशगुळे येथे आलेल्या अनुभवाशी करण्याचा मोह आम्हाला अनावर झाला होता. श्रीदेव म्हातारबाबांचे दर्शन घेऊन आम्ही आमच्या घरी चिपळूणला मार्गस्थ झालो होतो. काळोख झालेला नव्हता पण अंधारून आलेलं होतं. त्याच रात्री आमच्या राहात्या घरी कुटुंबात आमच्याच खूर्चीत बसलेल्या अवस्थेतील श्री म्हाताराबाबांची दिव्यदर्शन‘स्वरूप’ उपस्थिती आम्हाला कळली तेव्हा ‘पूज्य भाऊ हेही आपले गुरुच !’ याची मनोमन खात्री पटली होती. म्हातारबाबा देवस्थान महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरील बांद्यापासून १० ते १२ किमी. अंतरावर आहे. हे स्थान किमान दोनेकशे वर्षपूर्व असावे. बांदा या गावातून घारपी, फुकेरी, कोलझर, कुंब्रल, उगाडे, तळकट, शिरवल, झोळंबे गावी जाणाऱ्या अतिदुर्गम जंगलातील पायवाटेवर हे ठिकाण आहे. येथे पूर्वीच्या काळी पैदल किंवा बैलगाडीने प्रवास चालायचा. रात्री-अपरात्री या रस्त्यावर मदतीसाठी कोणी नसायचं. त्यामुळे या ठिकाणावरून प्रवास करताना विशिष्ठ ठिकाणी थांबून खडे (दगड) टाकून देवाला मदतीसाठी हाक मारण्याची प्रथा रूढ झाली होती. कालांतराने कच्चा मार्ग झाल्यावर खडे टाकण्याची प्रथा मागे पडून चिलीम (विडी) ठेवण्याची प्रथा सुरू झाली. ही चिलीम एखादी वयस्कर व्यक्ती ओढत असावी असा रूढ समज होता. एके रात्री एक वाटसरू रात्री या वाटेने आपल्या घरी निघाले होते. निर्जन जंगलातून पुढे जायचा त्यांना धीर होईना. त्यांनी रूढ प्रथेप्रमाणे विशिष्ठ ठिकाणी उभे राहून, ‘मदत कर’ अशी विनंती केली. तेव्हा समोरून डोक्यावर फटकूर, हातात कंदील आणि दांडा धरलेली व्यक्ती वाटसरूला दिसली. त्यांनी वाटसरूला घरापर्यंत सोबत केली. घरातील वडीलधाऱ्या मंडळींशी बोलल्यावर रात्रीच्या वेळी सर्वांच्या मदतीला येणारी अदृश्यरूपी शक्ती हीच म्हातारबाबा असल्याचा उलगडा झाला होता. कालांतराने याठिकाणी आजचे मंदिर उभे राहिले. हे क्षेत्र श्रीगोरक्षनाथ यांचे शिष्य ‘गहिनीनाथांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. नजीकच्या इन्सुलीत (सावंतवाडी) प्रसिद्ध संत सोहिरोबानाथ अंबिये यांनाही एका वडाच्या झाडाखालच्या पाषाणी बसलेले असताना गहिनानाथांचा (गैबीनाथ) साक्षात्कार झाला होता. श्रीम्हातारबाबा क्षेत्री ‘उन्हाळी व पावसाळी’ पाण्याचे दोन झरे आहेत. आडाळी आणि मोरगावच्या हद्दीतील त्रिकोणात हे स्थान आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी येथे म्हातारबाबाची जत्रा भरते. श्रीम्हातारबाबा अडचणीत सापडलेल्या आणि त्यांना हाक मारणाऱ्या प्रत्येकाला संकटकाळात मदत करतात अशी या परिसरातील श्रद्धा आहे.विभिन्न वनदेवतांचे सूक्ष्म अध्ययन हवे’ असं इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटलेलं आहे, त्यामागे कदाचित हीच भावना असावी.

श्रीम्हातारबाबांच्या या अनुभूतीनंतर आम्ही जेव्हा जेव्हा आमच्या व्यावसायिक कामास्तव सिंधुदूर्गात गेलो तेव्हा तेव्हा पूज्य भाऊंच्या दर्शन-मार्गदर्शनार्थ कुंब्रलला जात राहिलो. साधारणतः दीडेक वर्षे या भेटी होत राहिल्या असतील. त्यानंतर एका विशेष प्रयोजनास्तव, १२ ऑक्टोबर २०१२ पासून भाऊंनीच आपला मुक्काम कुंब्रलमधून रत्नागिरीत हलवला होता. २०१५ साली रत्नागिरीतच पूज्य भाऊंचा अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन (पाद्यपूजन-दर्शन-मार्गदर्शन) सोहोळा सर्व शिष्यगणांनी संपन्न केला होता. किमान सहा वर्षे, २०१८ पर्यंत पूज्य भाऊंचे रत्नागिरीत वास्तव्य होते. याही काळात भाऊंनी अध्यात्म, दैवी संकेतांवर विश्वास असलेली अनेक माणसे नव्हे तर कुटुंबे रत्नागिरीत जोडली. आज शुभारंभ (६ मार्च २०२२) होत असलेल्या प्रस्तुतच्या साप्ताहिक ‘रत्नागिरी प्रतिनिधी’चे संपादक सुनील चव्हाण आणि कुटुंबीय यांपैकीच एक होत. पूज्य भाऊंच्या उण्यापुऱ्या ८३ वर्षांच्या जीवनाकडे तटस्थपणे पाहिल्यावर नियमबद्ध आचरण, कमालीची सत्यप्रियता, देशभक्ती आणि स्पष्टवक्तेपणा या गुणांमुळे भाऊंची समाजमनावरील छाप अधिकाधिक घट्ट बनल्याचे जाणवते. मानवी मनाला एखाद्या क्षणाचा सत्संग जरी घडला तरी जीवन सफल झाल्याचे समाधान भेटत असते. अशाच एखाद्या क्षणापुरते का होईना ? पूज्य भाऊंचे सानिद्ध्य लाभलेल्यांचा अनुभवही असाच आहे. भाऊंचे अध्यात्मिक जीवन, त्यांनी विविध गरजूंसाठी केलेले कार्य, लोकांना आलेले त्यांचे अध्यात्मिक अनुभव यातून अगणितांची जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी बदलून गेलेली आहे. रत्नागिरीतून सिंधुदूर्गात परतल्यावर पूज्य भाऊंचे आम्हाला कधी देवगडात कधी कुडाळात दर्शन-मार्गदर्शन लाभलेले आहे. तसे ते अनेकांना लाभलेले असेल. पण भाऊंना त्यांच्या कुंब्रलमधील अध्यात्मिक पवित्र्याने भारलेल्या निसर्गरम्य वातावरणातील ‘कुटी’त बैठक मारून बसलेलं असताना ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवणं, त्यांचं मार्गदर्शन आपल्या पदरात पाडून घेणं ही मानवी जीवनातील सर्वोत्तम अध्यात्मिक अनुभूती ठरावी.


धीरज वाटेकर, चिपळूण.

मो. ९८६०३६०९४८.

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात गेली २५ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)  





आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...