शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

‘वाशिष्ठीनगर’च्या रंजक'स्मृति उलगडणारी आणि संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मृतिशलाका

‘स्मृतिशलाका’ ही भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मरणिका

अलोरेतील आगवेकर विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी प्रकाशन सोहळ्यात ‘पद्मश्री’ दादा इदाते यांचे प्रतिपादन

चिपळूण (रत्नागिरी) :: तालुक्यातील अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ या स्मरणिकेतून ‘एका गावची कथा’ (गोष्ट) आपल्या समोर येते. ती समजून घेण्यासारखी आहे. आपल्या देशात जवळपास सहा लाख गाव-खेडी आहेत. तितक्या कथा आहेत, पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशा सहा लाख गोष्टीरूप ग्रांथिक साहित्य साकारलं जाऊ शकतं. यातून आपण कोण आहोत? हे आपल्याला समजेल. ‘स्मृतिशलाका’ हा मौल्यवान ग्रंथ झाला आहे. वरवर पाहाता ही वाटचाल एका शिक्षण संस्थेच्या शाळेची आणि गावाची गावाची असं असलं तरी ती वाटचाल भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी आहे. असे प्रतिपादन ‘पद्मश्री’ दादा इदाते यांनी केले. 

अलोरेतील मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरे (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) शाळेच्या १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचा प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड, सौ. ऋजुता व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर, परशुराम एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, उपाध्यक्ष साईनाथ कपडेकर, कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, स्मरणिकेचे संपादक धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर, निर्माते व शाळा संस्था समन्वयक अरुण केशव माने व शशिकांत शंकर वहाळकर, प्रकाशक व मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत आदी होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘पद्मश्री’ दादा इदाते यांचा सत्कार शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांच्या हस्ते करण्यात आला. अलोरेचा वर्तमानकाळ, भूतकाळासह अमृतकाळाचा वेध घेणारी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका बौद्धिक स्मरण रंजन करणारी असल्याने प्रकाशनार्थ स्मरणिकेत लेख लिहिणारे आजी विद्यार्थी हर्ष मोहिते व सुजल साळवी यांच्या खांद्यावरून पालखीतून नकारात्मकता दूर करण्याचे गुण असलेल्या सोनपाकळ्यांच्या सान्निध्यात स्मरणिकेचे व्यासपीठावर आगमन होऊन प्रकाशन करण्यात आले.

यावेळी इदाते पुढे म्हणाले, एका संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षीच्या निमित्ताने एक संग्राह्य, महत्वपूर्ण दस्तऐवज केला आहे. स्मरणिका बनवताना खूप तपशिलात विचार केला आहे. शाळेच्या, गावाच्या दृष्टीने ही स्मरणिका अमूल्य अलौकिक ठेवा, संदर्भ ग्रंथ आहे. प्रत्येक काळाची कथा ही अशीच असते. भारतातील खेडं हे एक प्रातिनिधीक रूप आहे. भारतातील गावागावात, गांभीर्य, खोली, विविधता आहे. अलोरे शाळेच्या ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेतून पुढे आलेली 'एका शाळेची गोष्ट' ही अशाच एका भारतीय खेड्याचे रूप आहे. चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची शाळा अलोरेत येण्यात जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा खूप मोठा वाटा राहिला आहे. त्याकाळात आपल्या देशाचा मूलभूत संस्कार देणाऱ्या शिक्षणसंस्था उद्धवस्त झालेल्या होत्या. इंग्रजी बाबू तयार होतील असं शिक्षण आणि तशा संस्थांना पाठबळ मिळत होतं. अशावेळी अलोरेत ही संस्था येणं खूप मोठी उपलब्धी ठरलं. खरंतर आपल्याकडे शिक्षणाच्या माध्यमातून अनावश्यक शिकवलं गेल्याने अडचणी निर्माण झाल्यात. अशी मांडणी इदाते यांनी केली. लॉर्ड मेकालो यांनी आणलेल्या शिक्षण पद्धतीने कसे दुष्परिणाम झाले याचेही वर्णन त्यांनी केले. आम्ही कोण आहोत? हे आम्हाला कळेनासे झाले होते. तो काळ आता मागे पडला आहे. शोध घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे आज स्पष्ट दिसते आहे. आपला देश केवळ सदिच्छेने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने बदलत आहे. परिवर्तन होत आहे. हे जाणवत असल्याचे इदाते यांनी नमूद केले. 

*नेतृत्वाच्या आशेने जग भारताकडे पाहातंय – सीए. वसंतराव लाड*
शाळेचे पालक सीए वसंतराव लाड यांनी ‘जगाच्या अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान’ या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले, भारत आज खूप उन्नती करत आहे. जागतिक ब्रिक्स संघटनेची वाढ या विषयातील भारताचे योगदान, जगाला व्हक्सिन पुरवठा करण्याची क्षमता, धोकादायक चीनच्या पार्श्वभूमीवर उर्वरित जग नेतृत्व म्हणून भारताकडे पाहतोय. आज भारत जगातील मोठी पाचवी अर्थसत्ता आहोत. तिसऱ्या मोठया अर्थसत्तेच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आजचा भारत जागतिक उत्पादक ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत औषधांचे माहेरघर हैद्राबाद बनले आहे. जागतिक आयटी सेक्टर बेंगलोरला आहे. भारत देश जगासाठी आज आपण अँपल फोन बनवतो आहोत. आजच्या जागतिक बाजारपेठतील अनेक मोठ्या कंपन्या जागतिक उत्पादनासाठी भारतात येत आहेत. यासाठी लागणारं मनुष्यबळ हे कुशल हवे आहे. म्हणून शिक्षण पॉलिसीत बदल होत आहेत. कोरोनानंतर फक्त चीनवर अवलंबून न राहाता पर्याय म्हणून जग भारताकडे पाहाते आहे. भारत झपाट्याने बदलतो आहे. दळणवळणाने वेग घेतलेला आहे. 'उडाण' हा पंतप्रधान मोदी यांनी आणलेला कार्यक्रम महत्वाचा आहे. बरेचसे देश कर्जावर अवलंबून असतात. आपल्या देशालाही १९९१च्या काळात आर्थिक अडचणीस्तव वीस टन सोने विकावे लागले होते. अशातून आपण आपल्या देशाला वाचवलं होतं. आज आपले सहा हजार लाख रुपये ठेव स्वरूपात आहेत. म्हणजे आपला देश प्रगतीच्या मार्गावर आहे. वीजेवर चालणाऱ्या सर्वाधिक गाड्या भारतात तयार होत आहेत. भारतात काश्मिरमध्ये चित्र बदलतंय. पाकिस्तानची आजची स्थिती भयंकर वाईट आहे. जीवनावश्यक वस्तूंची कमतरता आहे. कलम३७० कुणाला हवं होतं? सामान्य माणसाला प्रगती, रोजगार हवा होता. आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. भारताला दुखावणे जगाला परवडणारे नाही. अबुधाबीमध्ये फेब्रुवारीत मोठ्या मंदिराचे उद्घाटन होत आहे. ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेत मांडलेले अलोरे प्रशंसनीय आहे. या स्मरणिकेचे महत्त्व खूप आहे. अलोरेची प्रकल्पीय वाटचाल १९६३ ते २०२३ अशी साठ वर्षांची आहे. गजबजण्याच्या पूर्वीच्या अलोरेतील आठवणीना लाड यांनी उजाळा दिला. 

*‘स्मृतिशलाका’ म्हणजे ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या इतिहासात वेगळी वाट दाखवणारा ‘दिवा’ – वाटेकर*
महाराष्ट्राच्या ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासातील एक वेगळी वाट चोखाळणारा दिवा अलोरे शाळेने आज प्रज्ज्वलित केला आहे. या वाटेवरून चालणाऱ्या भविष्यातील पांथस्थाला या शालेय क्षेत्रातील उजेडाचा दिलासा देण्याचं काम ही स्मरणिका करेल. असा विश्वास ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे संपादक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, दुतर्फी वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले अलोरे गाव ‘जावळी’तील इतिहासप्रसिद्ध राजे चंद्रराव मोरे यांच्यापैकी कोणा अज्ञात शाखापुरुषाने वसवलेले गाव आहे. गावचे ग्रामदैवत स्वयंभू श्रीशंकर, श्रीगंगादेव मंदिराच्या आवारात चंद्रराव मोरे यांचे स्मृतिमंदिर आहे. कोकणात अशा प्रकारचे स्मृतिमंदिर इतरत्र कोठेही नसावे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणी काळात, १९६०नंतर दोन्ही बाजूंनी वाशिष्ठी पात्राची सोबत लाभलेल्या अलोरे पंचक्रोशीस ‘वाशिष्ठीनगर’ नावाने ओळखले जात होते. १९व्या शतकात अलोरेत वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या डॉक्युमेंटेशनला महत्व आहे. घटना, वास्तव आणि सत्य समजून घेऊन आपण ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका संकलन-संपादन केले आहे. आपल्या कार्यसंस्कृतीचं संचित पुढच्या पिढीच्या हातात सुरक्षितपणे पोहोचावं हाही हेतू यामागे असल्याचे ते म्हणाले. ही स्मरणिका म्हणजे महाराष्ट्रातील अवघ्या दीड टक्का म्हणजे ३५ हजार ८९९ गावांपैकी खेड्यांसह ५३६ गावात वीजपुरवठा होत होता, तेव्हाची ही गोष्ट आहे. अलोरे गावाच्या विकासामागे असलेल्या १८७६-७८च्या दुष्काळापासून कोयना प्रकल्पाच्या आगमनापर्यंतच्या संपर्ण इतिहासाचे वर्णन वाटेकर यांनी केले.

शाळेतील सातव्या इयत्तेची विद्यार्थीनी सृष्टी प्रदीप शिंदे, ज्येष्ठ माजी विद्यार्थी सुरेश पालांडे, ज्येष्ठ शिक्षक रामचंद्र खोत, प. ए. सोसायटीचे कोषाध्यक्ष विजयकुमार ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केले. अलोरे संदर्भात अप्रतिम काम या स्मरणिकेने केले असल्याची भावना प्रमुख पाहुणे अमित मोरेश्वर आगवेकर यांनी व्यक्त केली. दादा इदाते यांचा परिचय शशिकांत वहाळकर यांनी करुन दिला. 'विकसित व्हावे अर्पित होऊनि जावे' हे गीत चंद्रकांत राठोड यांनी सादर केले. सूत्रसंचालन सौ. देवकी लाड यांनी केले. आभार प्रदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक विभाकर वाचसिद्ध यांनी ‘विचाराच्या निष्ठेला न्याय देण्यासाठी दादा इदाते आल्याचे नमूद करत उपस्थित इतर मान्यवरांचे आभार मानले.


चिपळूण (रत्नागिरी) :: कोकणातील चिपळूण तालुक्यातील कोयना जलविद्युत प्रकल्पाची वसाहत वसलेल्या अलोरे गावची पन्नास वर्षांपूर्वीची एक ओळख ‘वाशिष्ठीनगर’ अशी ओळख होती. तिच्या दुर्मीळ नोंदीसह पंचक्रोशीतील विविधांगी ऐतिहासिक व दुर्मीळ माहितीचा भरगच्च दस्तऐवज, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या १९१७ ते २०१२पर्यंतच्या सचित्र इतिहासाची मांडणी आणि कोयना प्रकल्पाचा पूर्वेतिहास कथन करणारी एका शाळेची गोष्ट लिहिलेली १५२ रंगीत पानांसह ४३६ पानी ‘स्मृतिशलाका’ स्मरणिका आज (दि. १० डिसेंबर) 'पद्मश्री' भिकुजी उर्फ दादा इदाते यांच्या हस्ते प्रकाशित होत आहे.

मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय विद्यालय आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालय अलोरेची (पूर्वाश्रमीचे अलोरे हायस्कूल अलोरे) ही सुवर्णमहोत्सवी स्मरणिका शाळेच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ४ ते ६ वाजता प्रकाशित होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड, सौ. अलका लाड आणि कुटुंबीय, सौ. व श्री. अमित मोरेश्वर आगवेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ‘एअर मार्शल’ हेमंत भागवत (निवृत्त), कार्याध्यक्ष मकरंद जोशी, सेक्रेटरी डॉ. संजय मोने, अलोरे शाळा समिती चेअरमन पराग भावे, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांची विशेष उपस्थिती राहाणार आहे.

विविध मान्यवरांच्या लेखनासह आजी-माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक यांच्या लेखनाने समृद्ध असलेली ही स्मरणिका महाराष्ट्रातील ग्रामीण शालेय स्मरणिकांच्या आजवरच्या इतिहासात वेगळी वाट शोधू पाहाते आहे. स्मरणिकेचे संपादन शाळेच्या दहावी १९९५ बॅचचे माजी विद्यार्थी, लेखक-पत्रकार धीरज मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांनी केले आहे. निर्मिती ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ अरुण केशव माने, ‘तंत्रशिक्षक’ शशिकांत शंकर वहाळकर यांनी केली आहे.

स्वर्गीय मो. आ. आगवेकर हे या शाळेचे, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापक पदावर सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले व्यक्तिमत्त्व होते. २०१८च्या मो. आ. आगवेकर नामकरण सोहोळ्यात शाळेने ‘श्रद्धा सुमन’ स्मरणिका प्रकाशित केली होती. तेव्हा ‘स्मृतिशलाका’ सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे बीज रोवले गेले होते. जगभर पसरलेल्या माजी विद्यार्थ्यांना अलोरे शाळा आज सातत्याने आठवावी लागते आहे. कालौघात अशा शाळा दुर्मीळ झाल्या आहेत. म्हणून शाळेच्या अनुषंगाने होणाऱ्या या डॉक्युमेंटेशनला विशेष महत्व आहे. १९५० ते १९९९ हा विसाव्या शतकाचा उत्तरार्ध अलोरे येथे वास्तव्य केलेल्या अनेकांसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा कालखंड राहिला आहे. या कालखंडातील इथल्या चाळवजा वसाहत संस्कृतीतील जगणे आणखी काही वर्षांनंतर एक दंतकथा बनून राहील इतके एकमेकांत मिसळलेले होते. नामकरण समारंभानंतर शाळेने विविध बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने अलोरे पंचक्रोशीतील चाळ संस्कृतीतील आठवणींचे उत्खनन करीत ‘स्मृतिरंजन’ करणाऱ्या ऐतिहासिक साधनांच्या लेखन-संकलनावर भर दिला होता. जितके संकल्पित रेकॉर्ड मिळवून तपासून ही स्मरणिका करायची ठरलं होतं त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आहे.

या स्मरणिकेत अलोरे शाळेच्या उभारणीत सहभाग असलेले आणि पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या’ स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३)ने सन्मानित शास्त्रज्ञ डॉ. माधवराव चितळे यांचा शुभसंदेश, शाळेचे सुवर्णमहोत्सवी गीत, शाळेचे मागील पन्नास वर्षातील दहावी-बारावीचे प्रथम यशाचे मानकरी, यशवंत व्यासपीठ कराड वक्तृत्व स्पर्धा, सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार विजेते आदींच्या नोंदी पाहायला मिळतील. ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ अशी ओळख असलेले डॉ. ज्ञानेश्वर मुळ्ये, निवृत्त एअरमार्शल आणि परशुराम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हेमंतजी भागवत यांचे ‘शिक्षण’ या विषयावरील चिंतनशील लेख यात आहेत. शाळेचे पालक सीए. वसंतराव लाड यांनी अत्यंत मनमोकळ्या शब्दात दुबईतील आपल्या कार्यक्षेत्रासह अलोरे गावातील प्रेरक आठवणी लिहिल्यात. ‘गुरुवर्य’ मा. ना. कुलकर्णी यांचे स्मरण, शाळेचे नूतन वास्तू उद्घाटन, शाळेचा रौप्य महोत्सव, शाळेची आठवणीतील गॅदरिंग, विविध कार्यक्रम-उपक्रम, पारितोषिक वितरण समारंभ, प्रशस्तिपत्रके, दहावीच्या विविध बॅच, शाळेची बदलती लेटरहेड्स, शाळेचे वाचनालय, वृत्तप्रसिद्धी, सुवर्णमहोत्सवी छायांकित दर्शन आदी ‘सचित्रस्मृति’रंजक ठेवा यात आहे. शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या पहिल्या अध्यक्षांसह अभियंता मनोगते, पालक मनोगते, ग्रामस्थ मनोगते, मुख्याध्यापक मनोगते, आजी-माजी शिक्षक-कर्मचारी मनोगते, ५४ आजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते व कविता, ४९ माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी मनोगते आणि अलोरे शाळेचा कोयना प्रकल्पीय पूर्वेतिहास कथन करणारी ‘एका शाळेची गोष्ट’ यात वाचायला मिळेल. स्मरणिकेच्या दस्तऐवजीकरणात अलोरे गावाचा १८७०चा नकाशा, ऐतिहासिक घराणे ‘चंद्रराव’ मोरे यांची कोकणातील एकमेव मंदिर’स्मृति’ सांभाळणाऱ्या अलोरे गावची पूर्वपीठिका, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा मागील शंभर वर्षांचा सचित्र ‘शोधक’ आढावा, परशुराम सहकारी साखर कारख्यान्यासह मंदार एज्युकेशन संकुल ‘स्मृति’दर्शन, आठवणीतील अलोरे-कोळकेवाडी पंचक्रोशी, एस.टी. प्रवासाची तिकिटे-पासेस, नाट्यसंस्कृती, चलतचित्र विभागाचे डोअर पासेस, प्रकल्प रुग्णालयासह पोस्ट ऑफिसच्या नोंदी, गणेशोत्सवाच्या मागील पन्नास वर्षांच्या अनुषंगिक आठवणी, विविध दुकानदारांची दुर्मीळ बीले संग्रहित केली आहेत. यावरून या स्मरणिकेची व्याप्ती ध्यानात यावी. 

अंकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रे ही शाळेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी आणि सातारा येथील प्रसिद्ध चित्रकार संजय भागवत यांची आहेत. अंकाची मांडणी सानिया डीटीपीच्या मुखत्यार मुल्लाजी यांनी तर छपाई कोल्हापूर येथील मिरर प्रिंटींग प्रेस यांनी केलेली आहे. अलोरे शाळेचे एक अर्धशतक संपले आहे. दुसरे सुरु झाले आहे. दोन्ही अर्धशतकात खूप मोठी तफावत असणार आहे. म्हणून अशा प्रकारचे दस्तऐवज करणे आवश्यक ठरते. शाळेचा विद्यार्थी वर्ग जगभर पसरला आहे. त्याला जोडण्याचा शाळेने सुरु केलेला प्रयत्न पुढील काळात अव्याहतपणे चालू ठेवण्यात ही स्मरणिका योगदान देईल, असे शाळेचे मुख्याध्यापक आणि ‘स्मृतिशलाका’ स्मरणिकेचे प्रकाशक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध यांनी म्हटले आहे.

‘स्मृतिशालाका’ स्मरणिकेचे स्वागतमूल्य एक हजार रुपये आहे. स्मरणिका हवी असल्यास कृपया मो. ९४२१२२७८५२, ९४२१२२७७१३ येथे संपर्क साधावा.

धीरज वाटेकर

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...