****************************************************************************
निसर्ग व पर्यावरण मंडळाची दिशा ठरविण्यासाठी अण्णा हजारे यांची भेट
६७ वृक्षांचे रोपण करून ‘वृक्षमित्र’ मोरे यांना
श्रद्धांजली ; कोकण प्रतिनिधींचा सहभाग
चिपळूण : कोकणात चिपळूण येथे २०१९ मध्ये चौथे
पर्यावरण संमलेन भरवून कोकणातील पर्यावरणाचे प्रश्न राज्यभरातील पर्यावरण अभ्यासक
आणि निसर्गप्रेमींच्या लक्षात आणून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, महाराष्ट्रातील
कृतीशील शिक्षक आणि कार्यकर्त्यांच्या बळावर निसर्ग व सामाजिक
पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची मुहूर्तमेढ रोवणारे वृक्षमित्र आबासाहेब मोरे (वय
६७) यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर मंडळाच्या कोकणसह राज्य
प्रतिनिधींनी दशक्रिया दिनी मोरे यांच्या मूळगावी (सुरेगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर)
जाऊन येथील स्मशानभूमीत मोरे यांच्या वयाइतक्या ६७ वृक्षांचे रोपण करून त्यांना श्रद्धांजली
वाहिली. यावेळी निसर्ग व पर्यावरण मंडळाची पुढील दिशा ठरविण्यासाठी ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांची भेटही घेण्यात आली.
वृक्षमित्र आबासाहेब मोरे
यांनी सन १९८२ सालापासून अण्णा हजारे यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले समाजकार्य
सुरु केले होते. शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या मोरे यांनी आपल्या संघटन
कौशल्याच्या बळावर राज्यातील पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि कार्यकर्त्यांना एकत्र
करून निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची उभारणी केली होती. या
मंडळाची यापूर्वी चार संमेलने संपन्न झाली. यात ‘भूतान’च्या आंतरराष्ट्रीय अभ्यास
दौऱ्याचा समावेश होता. कोरोना संक्रमण काळातील नियमावली शिथिल होत असल्याच्या
पार्श्वभूमीवर पुढील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमलेन घेण्याचा
त्यांचा मानस होता. त्याची तयारी सुरु असतानाच हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे
निधन झाल्याने मंडळाशी निगडीत राज्यभरातील पर्यावरणप्रेमींना मोठा धक्का बसला
होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या दशक्रिया विधीला राज्यभरातील
प्रतिनिधींनी सुरेगाव येथे एकत्र येऊन मोरे यांच्या त्यांच्या वयाइतक्या आणि सुमारे
१० फुट उंचीच्या बहावा, तिकोमा, सप्तपर्णी, वड, लिंब, करंज, आंबा, पिंपळ आदी ६७
झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्ष लागवड कार्यात श्रीगोंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने
मोलाचे योगदान दिले. यावेळी ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी आपली प्रवचन सेवा दिली.
दशक्रिया विधीनंतर पदाधिकाऱ्यांनी
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. अण्णांशी बोलून २५ व २६ डिसेंबर
२०२१ ला राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलन निश्चित करण्यात आले. यावेळी बोलताना अण्णा
हजारे यांनी, ‘हातून चांगलं कार्य घडायला कार्यकर्त्याला वेड लागावं लागतं. आबासाहेब
मोरे यांनी याच वेडाने प्रेरित होऊन पर्यावरणाचे काम केले’ असे म्हटले. आबासाहेब
मोरे यांचे विचार पुढे घेऊन जाणं, त्यांचा वारसा चालविणे ही त्यांना श्रद्धांजली
ठरेल, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या. आयुष्यात स्वतःसाठी जगणारी माणसं
कायमची मरतात. जी माणस जीवनात नैराश्य न येऊ देता आपला गाव आणि समाजाचा विचार आणि
कृती करून जातात ती खऱ्या अर्थाने सदैव जीवंत राहातात. आबासाहेबांप्रमाणे कौटुंबिक
प्रपंचात राहून हळूहळू तो प्रपंच सामाजिक स्तरावर मोठा करण्याचा सल्ला अण्णांनी
कार्यकर्त्यांना दिला. पर्यावरणाचा प्रश्न वैश्विक आहे. तापमान आणि प्रदूषण वाढतेय.
नवनवीन आजार येताहेत असेही अण्णा हजारे म्हणाले. मंडळाचे राज्य
सचिव आणि कोकण प्रतिनिधी धीरज वाटेकर श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले, वृक्षमित्र
आबांनी वयाच्या १० वर्षी आईच्या सोबतीने पहिलं झाड लावलं होतं. १९८२ साली अण्णा
हजारे नावाच्या परिसाचा स्पर्श झाल्यावर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. सक्रीय
काम करणारी व्यक्ती गेल्याने बसलेल्या धक्क्यातून सावरत माणसातील चांगुलपणाचा वसा
आणि वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. स्वर्गीय ‘वृक्षमित्र’ आबांनी
अण्णांच्या मार्गदर्शनाखाली लावलेलं आणि महाराष्ट्रभर पसरलेलं पर्यावरणाचं रोपं आपल्याला
अधिकाधिक ठिकाणी पसरवायचं आहे, असे वाटेकर म्हणाले.
मोरे यांना १९९१ मध्ये
महाराष्ट्र सरकारने ‘वनश्री’, १९९२ मध्ये भारत सरकारने ‘वृक्षमित्र’ तर २०१३ साली
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले होते. श्रीगोंदा येथील श्री छत्रपती
शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांनी ३२ वर्षे सेवा बजावली होती. अगदी अलिकडेच ‘राज्यातील शेकडो
कार्यकर्त्यांनी ‘पद्म’ पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे
केली होती. यावेळी मंडळाचे कोकण प्रतिनिधी आणि वरिष्ठ कार्याध्यक्ष
विलास महाडिक आणि राज्य सचिव धीरज वाटेकर यांच्यासह कार्याध्यक्ष प्रमोद काकडे, अग्निपंख
फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे, ‘वनश्री’ महेंद्र घागरे, राज्य सल्लागार
सदस्य ‘वनश्री’ बाळासाहेब जठार, राज्य उपाध्यक्ष प्रकाश केदारी, कार्यक्रम नियोजन राज्य सचिव सुभाष वाखारे, पुणे जिल्हाध्यक्ष
मारुती कदम, जळगाव जिल्हाध्यक्ष नाना पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष तुकाराम अडसूळ, राज्य
कार्यकारिणी सदस्य सुधाकर शेटे, राजाराम ढवळे, बाळासाहेब भोर, छायाचित्रकार
सतिश दलंगे आणि देशभर प्रसिद्ध असलेल्या ‘रानमळा’ पॅटर्नचे प्रणेते पोपट तुकाराम
शिंदे उपस्थित होते.
२८ सप्टेंबर २०२१, जागतिक पर्यटन दिन भूमिका
२ सप्टेंबर २०२०, जागतिक नारळ दिन कार्यक्रम
कुंभार्ली घाटात ‘बीजपेरणी’ अभियान, ६५ हजार स्वदेशी बियांची पेरणी
प्राथमिक शिक्षक समितीचा ५८ वा वर्धापन दिन ; निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे सहकार्य
चिपळूण : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या चिपळूण शाखेच्यावतीने आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या सहकार्याने, कै. भानुदास वालचंद शिंपी गुरुजी यांच्या प्रेरणेने पुण्यात स्थापन झालेल्या राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा ५८ वर्धापनदिन (२२ जुलै) नुकताच सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या जैवविविधतेने संपन्न असलेल्या सह्याद्री पर्वतातील कुंभार्ली घाट परिसरात बीजपेरणी अभियान राबवून साजरा करण्यात आला. यावेळी अर्जुन सादडा, रिंगी, बेहडा, कुसुम, बिब्बा, शमी, बहावा, आपटा, रामफळ, सीताफळ आदिंच्या ६५ हजार स्वदेशी जंगली बियाणांची पेरणी करण्यात आली.
प्रत्यक्ष बीजपेरणीपूर्वी समितीचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्धापनदिन कार्यक्रम संपन्न झाला. प्रास्ताविकातून सरचिटणीस आर. डी. मोहिते यांनी समितीच्या कामाबाबत सर्वांना माहिती दिली. जिल्हा सेकटरी संतोष सुर्वे आणि जिल्हा सल्लागार दीपक शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोरोना पार्श्वभूमीवर आलेल्या मानवी मर्यादेत वर्धापन दिन साजरा करताना निसर्गाच्या सानिद्ध्यात, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पर्यावरण मंडळाचे उपाध्यक्ष विलास महाडिक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम निवडण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. पर्यावरण मंडळाचे राज्यसचिव धीरज वाटेकर यांनी यावेळी ‘बीजपेरणी अभियान’ संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. यापूर्वी सन २०१६ साली चिपळूणात महेंद्रगिरी पर्वताच्या पायथ्याशी हे अभियान राबविण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. पर्यावरण मंडळाचे राज्याध्यक्ष ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे आणि बीज पुरवठादार ‘वनश्री’ डॉ. महेंद्र घागरे यांच्या माध्यमातून बियाणे उपलब्ध झाले. यावेळी शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन विनय घाणेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र
राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धापनदिन ‘बीजपेरणी अभियान’ कार्यक्रमाला
समितीच्या चिपळूण शाखेचे ज्येष्ठ सल्लागार चंद्रकांत जंगम, माजी सरचिटणीस मिलिंद चव्हाण,
तालुका कार्यालय सेक्रटरी विजय वाघमोडे, प्रवक्ते मौला नदाफ, ऑडिटर दत्तात्रय
नार्वेकर, आयुर्वेद अभ्यासक जगदीश थरवळ, संघटना प्रतिनिधी, डी. जी. शिंदे, गणेश
कोरनुळे, शिवाजी कोदारे, आरती घाणेकर, माया शिपटे, सुजाता जांबोटकर, आक्काताई
वाद्रे, अनुराधा पवार, निलम मोहिते, विनया देवरुखकर, लिना शिंदे उपस्थित होते. कोरोना
पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे आणि फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करून करून अभियान
संपन्न झाले. आभार विजय वाघमोडे यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा