रविवार, २५ जुलै, २०२१

कोयनेच्या जंगलातील व्याघ्रदर्शन

 

पूर्वीच्या कोयना अभयारण्यामध्ये (सध्याचे सह्याद्री टायगर रिझर्व्ह) पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना सुरु झाली, तेव्हाची घटना. आपल्या जंगलांना प्राणीगणना नवीन नाहीत, त्या पूर्वीही व्हायच्या. २००८ पर्यंत प्राणीगणनेत भरपूर फिरायचं, हिंडायचं, जंगलं अनुभवायचं असं चालायचं. फॉरेस्ट गार्डस्, वनमजूर, पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक आदी मंडळी एकमेकांजवळ माहितीचं, अनुभवांचं आदानप्रदान करायचे. कोयनेच्या जंगलासाठी महाराष्ट्र शासनाकडून पहिल्यांदा २००९ मध्ये शास्त्रीय प्राणीगणनेचे आदेश आले. २०१० साली ही शास्त्रीय प्राणीगणना निश्चित झाली. त्यावेळी कोयनेच्या घनदाट जंगलात रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या बावीस मीटर अंतरावरून ऑनफूट वाघ पाहिला होता. जंगलातल्या त्यांच्या चित्तथरारक अनुभवाची ही कहाणी आहे.

सर्वाधिक घनदाट म्हणून प्रसिद्ध असलेले कोयनेचे अभयारण्य हे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. हे अभयारण्य कोयना धरणाच्या भिंतीमागील शिवसागर जलाशयाच्या साथीने पसरलेले आहे. शिवकालीन इतिहासापासून जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्याला जलाशयाची नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. या जलाशयाच्या पश्चिमेकडील बाजूचा अभयारण्याचा बहुतांश भाग घनदाट आहे. या अभयारण्याच्या पश्चिमेकडील सह्याद्रीची मुख्यरांग आणि दुसऱ्या बाजूच्या उपरांगेमधून कोयना नदी वाहते. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ‘बाबू कडा’, अभयारण्यातील सर्वोच्च वासोटा किल्ला या जंगलात आहे. दमट विषववृत्तीय सदाहरित जंगलात वर्षाला सरासरी ५००० मि.मी. पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्रातील वन्यप्राण्यांची सर्वाधिक घनता असलेल्या अशा या अभयारण्यात पहिल्यांदा शास्त्रीय प्राणीगणना होणार होती.


नियोजनानुसार गार्ड, फॉरेस्टर किंवा वनपाल यांचेकडून विविध बीटातील सहभागी सदस्यांना ठराविक जंगल क्षेत्रातील सर्वात महत्वाच्या भागात किमान हजारभर आणि कमाल दोन हजार मीटरच्या ट्रॅन्झॅक्ट लाईन टाकून तिचे २०० मीटरचे तुकडे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेने ही ट्रॅन्झॅक्ट मेथड लाईन (रेषा विभाजन पध्दती) विकसित केलेली होती. उत्तम नोंदींकरिता ओढ्या-नाल्यांना क्रॉसलाईन टाकली जाणार होती. प्राणीगणना करणाऱ्या टीम सोबत एक फॉर्म दिला जाणार होता. त्यात जंगलांचे आच्छादन, एक हजार मीटर ट्रॅन्झॅक्ट लाईनचे दोनशे मीटरचे तुकडे केल्यावर त्या प्रत्येक तुकड्यातील महत्त्वाच्या माहितीची नोंद होणार होती. जंगलातील पायवाटांच्या दुतर्फा चौकोन, काही ठिकाणी वर्तुळं आखली जाणार होती. एखादा प्राणी डावीकडून उजवीकडे किंवा उलट दिशेने पाणवठ्याकडे गेला आहे का ? जंगल वाटांवरून खाली किंवा खालून वर प्राणी गेला आहे का ? प्राण्यांच्या विष्ठा कोणत्या भागात मिळत आहेत ? आदी प्रत्यक्ष पाहिलेल्या नोंदी फॉर्ममध्ये करून वन्यजीवांचा अंदाज घेतला जाणार होता. तेव्हा आजच्यासारखे कॅमेरा ट्रॅप नव्हते.

वाघ किंवा बिबट्याच्या पायाचा ठसा मिळाला तर प्लॅस्टर कास्टिंग करून ठशाचे मोजमाप घेतले जाणार होते. एखादा ठसा साधारणत साडेसहा पावणेसात इंचापेक्षा अधिक असल्यास तो वाघाचा असल्याची शक्यता बळावणार हे नक्की होतं. एखादा ठसा थोडा छोटा असला तरी बिबट्या आणि वाघाच्या पिल्लाचा ठसा यातला भेद समजू शकणार होता. ही प्राणीगणना करताना पहिल्या दिवशी शाकाहारी प्राण्यांचा सर्व्हे, दुसऱ्या दिवशी मांसाहारी प्राणी, तिसऱ्या दिवशी वर्तुळासारख्या केलेल्या मार्किंगमधील विष्ठा पाहिल्या जाणार होत्या. पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे समजणारे आवाज नोंदवले जाणार होते. चौथ्या दिवशीपासून सकाळी ५ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष जंगल गस्त (पायदळ) सुरु होणार होती. प्रत्येक दिवसाचा दुपारचा शिधा सोबत घेण्याच्या सूचना होत्या. पायदळीतून एका जंगलाच्या मोठ्या पट्यातील कोणत्या बीटात कोणते प्राणी दिसताहेत ? पायांचे ठसे, कोणत्या प्राण्यांचे आवाज येत आहेत ? प्राण्यांच्या भ्रमणानुसार एका बीटातून दुसऱ्या बीटात जाण्यासाठी काही जवळचे मार्ग आहेत का ? एखाद्या प्राण्याची विष्ठा मिळाली तर ती ताजी आहे का ? की आठवड्याभरापूर्वीची आहे ? आदी नोंदींच्या आधारे संपूर्ण जंगलाची माहिती संकलित करण्याचे नियोजन होते. विष्ठा आदी गोळा करायला पुरेसी साधने, लिहायला लेटरपॅडसोबत असणार होती. वन्यप्राणी, वन्यपक्षी, ठिकाणचे नाव आदी दहाएक नोंदी केल्या जाणार होत्या. जंगलात महत्वाच्या ठिकाणी, पाणवठ्यावर प्राण्यांच्या पायांचे उमटलेले ठसे चटकन कळावेत, प्लॅस्टर कास्टिंग चांगलं व्हावं या दृष्टीने मातीच्या चौकोनात, पीआयपी (पगमार्क इम्प्रेशन पॅड) अर्थात अगदी पुळण (वस्त्रगाळ) माती तयार केली जाणार होती. इम्प्रेशन पॅडमुळे जंगलात गस्त करताना अचूक माहिती मिळायला मदत होणार होती. मागील ८/१० वर्षांपेक्षा ही प्राणीगणना काहीशी वेगळी होती.


कोयना धरण ते नदीचा उगम हे अंतर सत्तरेक किमी असावे. जलाशयाभोवती किमान शंभरएक गावे वसलेली आहेत. देशातील सर्वांत कमी मतदार असलेले मतदान केंद्र ‘खिरखंडी’ इथेच आहे. गावांचे दळणवळण लाँचसेवेवर अवलंबून आहे. संपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. कोयनेचा जंगलातील भूप्रदेश अत्यंत रमणीय आहे. सह्याद्रीच्या अवघड भौगोलिक रचनेमुळे इथे रस्ते नाहीत. जंगलात असंख्य खोरी आहेत. त्यातल्या झुंगटी, पाली, मालदेव, रोहिणे, करंजावडे, शिरशिंगे, झाडोली, डिचोली, किसरुळे, आंबेघर, आंबेगाव आदी पंधराएक गावांची बीट (खोरी/उपखोरी)तयार केली होती. या बीटातील टीमना ८४ हेक्टर, ९० हेक्टर अशी जंगलांची विभागणी करून देण्यात आली होती. प्रत्येक बीटात एक फॉरेस्ट मजूर किंवा गार्ड, बाकीचे तिघे पर्यावरण प्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आदी चार सदस्य सहभागी होते. संपूर्ण जंगलातल्या झुंगटी, पाली, मालदेव या बीटात वन्यजीवांच्या हालचाली तुलनेने अधिक असल्याची प्राथमिक माहिती होती. ऐकीव माहितीनुसार जंगलातील आडोस-माडोसपासून बामणोली पर्यंतच्या भागात पट्टेरी वाघाचा वावर होता. पट्टेरी वाघ अगदी चकदेव-परबत पर्यंत फिरायचा.

निलेश बापट यांचा समावेश असलेल्या बीटमध्ये, तीसेक वर्षे कोयनेच्या जंगलात मजूर म्हणून वावरणारे बापू गुरव हे जंगलातील दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. मध्यम उंची, काळ-सावळा रंग, प्रौढत्वाकडे झुकलेली पण काटक शरीरयष्टी, कंबरेला कोयता आणि अर्धेअधिक टक्कल पडलेल्या डोक्यावरील पांढऱ्या केसांचे धनी बापूंचा जन्म कोयनेच्या जंगलातला. जन्मापासून रात्री-अपरात्री जंगलातून चालायची सवय असल्याने त्यांना इथल्या सगळ्या वाटा माहित. कोयना भागात कोणीही अधिकारी आले तरी ते जंगल फिरताना बापूंना हमखास सोबत न्यायचे. कोयनेच्या जंगलाला वाहून घेतलेल्या बापूंचे योगदान इतके मोठे की आजही कोयनेच्या जंगलात काही ठिकाणी बापूंच्या फोटोची पूजा केली जाते. बापट यांच्यासारखे अनेक वन्यजीव अभ्यासक बापूंकडून बारकाईने जंगल वाचायला शिकलेले. तर असे हे बापू आपल्या बीटात असावेत असं प्रत्येकाला वाटायचं. निलेश आणि बापूंच्या बीटात तेव्हा चिन्मय ओक आणि आदित्य जोशी हे दोघे अन्य पर्यावरणप्रेमी होते.


आजचा पहिला दिवस हा सर्वांना विविध बीटाच्या भागात सोडण्यात जाणार होता. कोण कोणाच्या बीटात यांची नोंद आणि शिधावाटप वगैरे होऊन सगळ्यांना घेऊन कोयना धरणाच्या जवळून भन्नाट वाऱ्याच्या साथीने महाराष्ट्र शासनाची वनराणी लाँच निघाली. लाँचमधल्या काही जणांचे ट्रेनिंग झालेले होते. ट्रेनिंगमध्ये वाघाच्या ठश्यांचे प्लॅस्टर कास्टिंग कसे करायचे ? ठसे कसे मोजायचे ? ते कागदावर कसे उतरवायचे ? आदी माहिती देण्यात आली होती. जंगलात कोणत्याही प्रकारचे मद्यपान करायला बंदी होती. जंगलातील प्रत्येक पानावर जंगलाचाच हक्क असल्याने तिथून काहीही बाहेर न्यायला परवानगी नव्हती. मानवी गंध प्राण्यांना किमान १/२ किमीपर्यंत समजत असल्याने परफ्युम वगैरे वापरल्यास वन्यजीव दिसणं अशक्य होईल. यास्तव ते न वापरणे, जंगलात एकटे-दुकटे विनाकारण न फिरणे, जंगलात मोठ्याने बोलणे, हसणे टाळणे आदी सूचनांसह काच, लेटरपॅड, स्केचपेन, मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीस हे साहित्य आणि ७/८ किलो तांदूळ, तेल, मसाला असा शिधा सोबत देण्यात आला होता. कोयनेतून सुटलेली लाँच सर्वांना बीटनुसार सोडत पालीच्या खोऱ्यात पोहोचेपर्यंत सायंकाळचे ४ वाजले. पुढे ही लाँच कोयना जंगलाची शेवटची रेंज असलेल्या ताकवली-मालदेव बीटापर्यंत पोहोचली. तिथून परत फिरून बामणोलीला गेली.

बापू, निलेश, चिन्मय आणि आदित्य यांना लाँचनेज्या पालीच्या पट्ट्यात सोडले तिथे धरणाच्या बॅकवाटरला लागून असलेल्या गर्द जंगलात एक तीन मजली सिमेंट काँक्रीटचा वॉचटॉवर होता, अजूनही तो वॉचटॉवर आहे. वॉचटॉवरच्या तिसऱ्या मजल्यावर या चौघा मंडळींचा मुक्काम असणार होता. आवश्यकतेनुसार बॅटरी आणि चूल वगळता रात्रीच्या अंधारात आकाशातील चंद्रकोर हाच काय तो प्रकाश सोबतीला होता. आपण जंगलात आहोत याची सतत जाणीव करून देणारा रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज, अंगाला झोंबणारा गार वारा आणि जलाशयातील पाण्याच्या लाटांच्या चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक आवाजाच्या साथीने दिवस जाणार होते. सह्याद्रीची पर्वतरांग, घनदाट जंगल, हिवाळ्यात दिसणारे हिरवेगार डोंगर, जंगलातील पायवाट, पाणवठा, वन्य प्राण्यांचा सहवास, विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे, औषधी वनस्पती अशा वातावरणात रात्री घालवण्यात थ्रिलिंग असणार होते. मंडळींनी वॉचटॉवरच्या पायथ्याशी असलेल्या एका झाडानजीकची सवयीच्या जागेवरील चूल नीटशी केली. उघड्यावर जेवण करायचं होतं. पाऊस आला तर आडोश्याला थांबायचं नक्की होतं. कोयनेच्या जंगलात जानेवारीतही अचानक पाऊस भेटीला येत असल्यामुळे बचावासाठी सर्वांजवळ प्लास्टिक होतं. कोयनेतला हा पाऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरलाही पडत असतो. एप्रिल-मे महिन्यात तो सुरुवात करतो. असं वातावरण असतं, आजही होतं. जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब या सर्वांचा उत्साह वाढवित होते. चुलीवरच्या जेवणासोबत सर्वांच्या गप्पा सुरु झाल्या. बघता बघता जेवणही आवरलं. झोपायची वेळ झाली. वन विभागाचे ट्रेनिंग निलेशने पूर्ण केलेले होते. त्याने सर्वांना त्याची माहिती दिली. त्यानुसार कामाची विभागणी करायला हवी होती. तेवढ्यात बापू बोलू लागले, ‘तुम्हाला काय काय काम दिलंय ते तुम्ही बघा. मला काय त्यातलं समजत नाय ! मी काय अनपढ ! मी तुम्हाला जंगल दाखविण्याचं काम करतो.’ रात्री अकरा-सव्वा अकराच्या सुमारास सारे वॉचटॉवरवर आडवे झाले. झोपी गेले. सर्वानुमते प्राणीगणनेचे फॉर्म भरायची जबाबदारी चिन्मयने घेतली. त्यासाठीचा नोटपॅड सदैव त्याच्यासोबत असणार होता. जंगलमार्ग दाखवत जंगलाबाबतची समजेल ती माहिती बापू सांगणार होते. आदित्यकडे कॅमेरा असल्याने त्याच्याकडे फोटोग्राफीची जबाबदारी होती. बापूंच्या सहकार्याने नोंदींशी निगडीत साऱ्या बाबी तपासण्याचे काम निलेशकडे होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठले. मंडळींचा जंगलातून वाट काढत सुरु झालेला प्रवास त्यांना निसर्गाकडे घेऊन जाऊ लागला. प्रवासातून पावलागणिक नवी उर्जा मिळू लागली. आज त्यांनी कोयनेच्या जलाशयावरती आणि आजूबाजूच्या छोट्या-मोठ्या पाणवठ्यावरती बसून प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ऐकले. दिवसभरात ऐकलेल्या पक्ष्यांच्या आवाजानुसार सायंकाळी नोंदी अपडेट केल्या. चुलीवरचं आमटी-भाताचं जेवण सारे जेवले. बघता बघता असे दोन दिवस सरले.


तिसरा दिवस उजाडला. आज दिवसभर वाटेवर फिरायचं नियोजन होतं. प्राण्यांची विष्ठा, वनाचे आच्छादन बघण्याचा आजचा दिवस होता. दिवसभरात सारीवाट फिरून सायंकाळी वॉचटॉवरजवळ येऊन मंडळींनी नोंदी पूर्ण केल्या. तोवर अंधार पसरला. साधारणत सात-साडेसातची वेळ असावी. कोयनेच्या जलाशयाच्या पृष्ठभागावर पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब, पाण्याच्या लाटांवर उमटणारे त्याचे तरंग, जलाशया शेजारच्या भूपृष्ठावर तयार झालेली लाटांच्या रेषांची नक्षी पाहात चुलीवर जेवण बनविण्याचं काम सुरु झालं. मंडळींनी थोडी अधिक लाकडं जमवली. इतक्यात निलेशला लघुशंकेचा कॉल आला. तो जवळच्या आडोश्याला गेला. हा जिथे उभा राहिला तिथवरच्या जागेत पायाखाली पाण्याच्या लाटांमुळे निर्माण झालेल्या रेषांची नक्षी स्पष्ट जाणवत होती. निलेशला तिथे उभा राहता क्षणी पायाच्या अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये काहीतरी चावल्यासारखं जाणवलं. चुलीपासून तसं जवळचं उभं राहायचं असल्याने याने नेमकं तेव्हा पायात काही घातलेलं नव्हतं. काहीतरी चावल्यासारखा फील येताच याने तिथेच एकदोनदा पाय झटकला. चुलीजवळ परत आल्यावर, त्याने काहीतरी चावलं असल्याचं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं. तेव्हा रात्रीचे आठ वाजलेले. मग हे सारे बॅटरी घेऊन चावलेल्या जागी काही दिसतंय का ? म्हणून शोध घेऊ लागले. जंगलात जमिनीवर साठलेल्या पालापाचोळ्याची चाचपणी करताना बॅटरीच्या उजेडात यांना एक काळसर विंचू दिसला. ‘निलेशला काय चावलं असेल ?’ याचा सर्वांना अंदाज आला. आता तातडीने काही हालचाल करावी म्हटलं तर जवळ लाँच नव्हती. वॉकीटॉकीही नव्हता. या बीटातल्या चिन्मयकडे एक छोटा मोबाईल होता. पण त्याला जंगलात रेंज नव्हती. विचार करण्यात वेळ जात होता. तोवर तिकडे काही मिनिटांनी निलेशचा पाय हळूहळू वरच्या दिशेने मुंग्या येऊन सुन्न पडायला सुरुवात झालेली. बाकी मंडळी, ‘एवढ्याश्या विंचवाने निलेशला काहीही होणार नाही’, म्हणत त्याची मानसिकता सकारात्मक ठेवण्याच्या प्रयत्नात होते. इतक्यात चिन्मयला, त्याने आणलेल्या प्रथमोपचाराच्या साहित्यात सूर्यप्रकाश तेलाची बाटली असल्याचं लक्षात आलं. विंचूदंशात या तेलाचा उपयोग नक्की होणार होता. त्याने निलेशला हे तेल नाकात हुंगायला दिलं गेलं. विंचवाचा दंश झालेल्या जागेवर तेलाचे थेंब टाकायला सुरुवात केली. विंचू चावलेला असल्याने सर्वांनी रात्रभर न झोपण्याचा निर्णय घेतला. तोवर निलेशचा पाय गुडघ्यापर्यंत सुन्न पडत आलेला. आज त्याच्यासह सारे कसेबसे टॉवरवर चढले. गप्पांसोबत सूर्यप्रकाश तेलाचा थेंब-थेंब उतारा रात्रभर चालू राहिला.

सकाळचे साडेचार वाजले. तेव्हा पायाला आलेला सुन्नपणा काहीसा कमी झाल्याचे निलेशला जाणवले. आजच्या चौथ्या दिवशी ट्रॅन्झॅक्ट लाईन पार करून कोयना खोरे फिरायला सुरुवात करायचे नियोजन होते. पालीच्या वॉचटॉवरमागून कोकण कड्यापर्यंत ही ट्रॅन्झॅक्ट लाईन गेलेली होती. निलेशला आता फक्त अंगठ्याजवळ वेदना जाणवत होत्या. त्याने शांतपणे विचार केला आणि सर्वानुमते पहाटे पाच वाजता पायात बूट चढवले. साडेपाच वाजता कोकण कड्यापर्यंत जाणाऱ्या ट्रॅन्झॅक्ट लाईनच्या दिशेला लागणाऱ्या पहिल्या चढाच्या दिशेने मंडळींनी चालायला सुरुवात केली. चढ चढल्यावर यांना एक माळरान भेटलं. तिथे मोठं जंगल आहे. तेव्हा सकाळचे पावणेसात वाजले होते. तिथून पुढे एक पायवाट तिरकी होते आणि समोरच्या जंगलातून खाली उतरून पुन्हा वर जाते. यातल्या खाली उतरणाऱ्या वाटेवर मारलेल्या ट्रॅन्झॅक्ट लाईनला क्रॉस करून खालून वर आलेल्या अवस्थेत यांना कोण्या वन्यजीवाचा किमान पावणेसात इंचाचा पगमार्क मिळाला. तो पगमार्क पाहताच बापू उद्गारले, ‘वाघरू (ढाण्या) फिरलंय इकडे कुठंतरी !’ बापूंचं बोलणं ऐकताच सर्वांचे डोळे विस्फारले. तातडीने ठश्याचं प्लॅस्टर कास्टिंग केलं गेलं. तोवर सव्वा सात वाजले. पुढे चालताना काही अंतरावर टप्प्याटप्प्याने जमिनीवर विशिष्ठ पद्धतीची उकरण दिसून आली. कोयनेच्या जंगलात बापू वगळता इतरांसाठीहे नवीन होते. अजून थोडे चालल्यावर सर्वांना कोकण कड्याच्या एक किमी अलिकडे उतारावरील वळणात एका झाडावर विशिष्ठ स्क्रॅच मार्किंग दिसले. हे स्क्रॅच जवळपास बापूंच्या उंचीएवढ्या अंतरावर केलेले होते. सारे निरीक्षण सुरु असताना मंडळींना जवळच कोण्या वन्यजीवाने लघुशंका केल्याचे निदर्शनास आले. ती लघुशंकाही ताजी होती. जणू काही वेळापूर्वी केलेली ! बापूंनी हे सारं क्षणार्धात ओळखलं. २०१० सालचा जानेवारी महिना संपत आलेला. २९ तारीख. कोयनेतल्या कडाक्याच्या थंडीचे दिवस ते. जंगलात सर्वत्र धुकं पसरलेलं. लघुशंका पाहून निलेशने, ‘थंडीमुळे पानावरून पाणी गळलेले असेल’ अशी शंका बापूंना विचारण्याचा प्रयत्न केला. पण बापू, ‘वाघ मुतलेला आहे’ या आपल्या मतावर ठाम राहिले.


आता मंडळी जंगलातल्या त्या अरुंद पायवाटेवरून सावध पावलं टाकत चाललेली. पुढे एका टप्प्यावर यांना वन्यजीवाची विष्ठा मिळाली. पहिला पगमार्क आणि आत्ताची विष्ठा यातलं अंतर पाऊणएक किमी असेल. मागचे सारे संदर्भ डोक्यात घोळू लागल्याने बापू अत्यंत सावध झालेले. त्यांनी तशा सूचनाही इतरांना दिल्या. बापूंच्या मागे निलेश चालत होता. नोंदी आणि छायाचित्रे घेत मागोमाग चिन्मय, आदित्य येत होते. सारेजण एका वाटेवरून खाली उतरले तिथे यांना दोन-तीन मोठे दगड लागले. सर्वांना आता डोळ्यासमोर कोकणकडा दिसत होता. आता इथून तिथवर पोहोचायला जेमतेम दहाएक मिनिटे अजून हवी होती. पाऊल वाटेवरचे दगड पार करत असताना समोर बापूंचं लक्ष गेलं आणि ते म्हणाले, ‘अरे वाघ बसलाय ! वाघ बसलाय !’बापूंचे शब्द कानावर पडताच निलेशची नजर त्या दिशेला वळली. निलेशला डोळ्यासमोर एक बऱ्यापैकी विस्तारलेलं आंजणीचं झुडूप दिसत होतं. अजूनही ते झुडूप आहे. त्या झुडुपाच्या खाली पट्टेरी वाघ बसलेला होता. निलेशने अगदी हलक्या आवाजात पाठीमागच्या चिन्मय आणि आदित्यला हाक मारायला सुरुवात केली. ते दोघे मागच्या नोंदी करत आणि छायाचित्रे घेत सावकाश चालत येत होते. आवाज ऐकताच चिन्मय तसाच धावला. तोवर इकडे पाठमोऱ्या बसलेल्या वाघाला निलेश आणि बापूंच्या हालचालींची चाहूल लागली असावी. वाघ जागेवरून उठला. आंजणीच्या झाडामागून चालू लागला. तेव्हा चिन्मय या दोघांजवळ पोहोचला होता. हा वाघ संपूर्ण कोकण कड्यावरती फिरलेला असावा, असा कयास मंडळींनी बांधला. आंजणीच्या झाडामागून चालू लागलेल्या वाघाने काही अंतर कापल्यावर जवळच्या उतारावर दोनदा जोरदार डरकाळी फोडली. दूरवर असलेल्या आदित्यने डरकाळीचा हा आवाज ऐकला. बापू म्हणाले, ‘आता तो पुढे गेलाय. तो काय मागावर येणार नाही.’

पुढच्या तीनेक मिनिटात ही मंडळी पट्टेरी वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ पोहोचली. वाघ निघून गेलेला होता. हातात असलेल्या गोल टेपनं मंडळींनी आपल्यातलं आणि वाघामधलं अंतर मोजलं, तर ते होते अवघं २२ मीटर ! वाघ बसलेल्या आंजणीच्या झाडाजवळ एका वयस्क गव्याची विष्ठा पडलेली होती. त्या विष्ठेच्या एका कोपऱ्यावर वाघाच्या पायाचा ठसा उमटलेला होता. त्या वाघाच्या पायाच्या ठशाचे प्लॅस्टर कास्टिंग केले. त्या ठशाच्या ठिकाणी चारही बाजूंनी दगड लावले. जवळच वाघाचीही विष्ठा मिळाली, यांनी तीही ताब्यात घेतली. समोरच्या कोकण कड्यावर पोहोचल्यावर यांच्या मोबाईलला रेंज मिळाली. काही महत्वाची नोंद मिळाली तर तातडीने संपर्क करण्याबाबतच्या काही सूचना सर्वांना पूर्वीच दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर कुठेही संपर्क होईना म्हटल्यावर निलेशने वन खात्याच्या कोयना कार्यालयात २८४४९२ या क्रमांकावर फोन केला. तोही फोन कोणी उचलेना. शेवटी याने बामणोली फॉरेस्ट रेंजचे आर.एफ.ओ. दशरथ गोडसे यांना मोबाईल कॉल केला. तुलनेने त्यांना या ठिकाणी लवकर पोहोचणे शक्य होते. त्यांचा मोबाईल कॉल लागला. ते तेव्हा सातारा भागातील एका बीटात होते. निलेशने त्यांना कळवलं, ‘आमच्या बीटात आज सकाळी ८ वाजून १३ मिनिटांनी आम्ही प्रत्यक्ष वाघ बघितला. तुम्ही या. ’गोडसे साहेबांनी निलेशचं बोलणं ऐकलं. म्हणाले, ‘तुम्ही जंगलात गस्त करत राहा. मी सायंकाळी येतो.’

ही मंडळी सध्या उभी असलेल्या रस्त्यांनी खाली उतरलं की पाली आणि मालदेवच्या मधलं घनदाट जंगल लागतं. तिथल्या एका जवळच्या ओढ्यापर्यंत जायचं यांनी आज पहाटेच ठरवलेलं. आता अर्धा दिवस सरून गेलेला. दुपारचे साडेबारा वाजलेले. त्या पायवाटेवरून चालताना ठिकठिकाणी यांना जणू डिसेंट्री लागल्यासारखी ताजी पातळ विष्ठा पडलेली दिसली. सुरुवातीची काही मिनिटे, ‘ही विष्ठा कोणाची असेल ?’ याचा यांना नीटसा अंदाज येईना. तिथे थांबून विचार केल्यावर थोड्या वेळाने बापूंच्या लक्षात आलं, ही विष्ठा अस्वलाची होती. अंदाज लावून झाल्यावर सारेजवळच्या डुंग्यावर (छोटा डोंगर) पोहोचले. तेव्हा बापूंचा अंदाज खरा ठरल्याची खात्री पटली. डुंग्याला लागून वाहात असलेल्या ओढ्याच्या जवळपास अस्वलाचं एक पिल्लू फिरत होतं. बापूंनी ते पाहिलं. बापू सर्वांना ते पिल्लू दाखवेपर्यंत पिल्लाच्या आणि मंडळींच्या डावीकडे आणखी एक पिल्लू आणि मादी अस्वलही दिसलं. अस्वल हा जंगलातील वन्यजीवात सर्वात भयानक आणि बेभरवश्याचा प्राणी. त्याचा हल्ला ही भारतीय जंगलातील नियमित घटना आहे. तो शिकार खात नाही पण फाडून टाकतो. स्वातंत्र्यापूर्वी म्हैसूरच्या जंगलात एका अस्वलाने तेरा जणांचा जीव घेतल्याचे कॅप्टन विलियम्सनने आपल्या ओरिएंटल फिल्ड स्पोर्टस्या पुस्तकात लिहून ठेवले आहे. प्रसिद्ध वन्यजीव लेखक श्याम देशपांडे यांनी मेळघाटी सातपुडापुस्तकात, ‘मेळघाटातील कोरकू आदिवासी रात्री-अपरात्री जंगलात जाताना, वाघ-बिबट्यांना घाबरत नाहीत. परंतु आपल्याला जंगलात अस्वल भेटू नये अशा प्रार्थना देवतांना करीत धास्तावलेला प्रवास करतात’, असे लिहीले आहे. अर्थात प्रसंगावधान राखून बापूंनी सर्वांना डुंग्याच्या दिशेने धावण्याचा आणि दगड गोळा करण्याचा सल्ला दिला. सारे डुंग्यावर चढले. दगड गोळा केले. मोठमोठ्यांनी ओरडायला सुरुवात केली. तोवर अस्वल आपल्या दोन पिल्लांसह डुंग्याच्या खालपर्यंत आलेली. मग यांनी जमवलेले २५/३० दगड काही क्षणात खाली ढकलायला सुरुवात केली. डुंग्याखाली असलेली मादी अस्वल सुरुवातीला जमिनीवर लोळत होती. इकडे तिकडे मान हलवित होती. दगड टाकण्याने ती तिथेच थांबली. या मंडळींना वाघाच्या पाठीवर उंबराचं पाणी असलेल्या ज्या पायवाटेनं जायचं होतं नेमक्या त्याच पायवाटेनं मादी अस्वल निघून गेली. म्हणून मग यांनी आल्या वाटेनं परत जायचा निर्णय घेतला. डुंग्यासमोर यांना कोकणकडा आणि मालदेवमधील सह्याद्रीची हद्द दिसत होती. मंडळींना तिथे पोहोचायला किमान अडीच तास लागावेत. मनुष्याच्या दृष्टीने दूरवरच्या अशा ठिकाणापर्यंत ती मादी अस्वल यांच्या डोळ्यादेखत अवघ्या काही मिनिटात पोहोचली. वन्यजीवांमध्ये किती ताकत असते ? मनुष्य त्यांच्यासमोर किती कमकुवत आहे ? याची साक्ष पटविणारा तो अफलातून अनुभव होता. या दरम्यान कोकण कड्याच्या दिशेने चालताना मादी अस्वलीने ४/५ वेळा मागे वळून आपल्या पिल्लांकडेही पाहिलं. हा अनुभव गाठीशी जमा करून सायंकाळी पावणे सहाच्या दरम्यान मंडळी पालीतील लोखंडी वॉचटॉवरजवळ पोहोचली.

सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी यांना वॉचटॉवरजवळ बसल्या जागी पट्टेरी वाघाची डरकाळी पुन्हा ऐकू आली. आवाजाच्या दिशेने अंदाज घेतला तेव्हा सकाळी फिरलेल्या पट्ट्यात अजूनही वाघ असल्याचे लक्षात आले. यांची नजर आता समोरच्या शिवसागर जलाशयावर स्थिरावली होती. सकाळी संपर्क झालेला असल्याने वन खात्याचे अधिकारी आत्ताच हे पाहायला पोहोचायला हवेत अशी निलेशची भावना झालेली. तेव्हढ्यात जलाशयात दुरून वनराणीलाँच येताना दिसली. लाँच जसजशी जवळ आली तसतसा तिचा आवाज कानाला जाणवू लागला. वाघाचा आवाज जिथून येत होता ते अंतर मंडळींपेक्षा लाँचमधील अधिकाऱ्यांच्या अधिक जवळ होतं. अर्थात लाँचमधील अधिकाऱ्यांना वाघाच्या डरकाळ्या ऐकू येणे अभिप्रेत होते. संजय पवार नावाचा लाँचचा ड्रायव्हर होता. त्याने वाघाच्या डरकाळीचा आवाज ऐकल्यावर तत्काळ लाँचचं इंजिन बंद केलं. लाँचमधील गोडसे साहेबांना सांगितलं. पुढे ६ वाजून १० मिनिटांपासून साडेसहा वाजेपर्यंत १३ वेळा या भागात हा पट्टेरी वाघ ओरडला. त्याच्या डरकाळ्या सर्वांनी ऐकल्या. काळोख पडताना वनराणी लाँच पाली वॉचटॉवरजवळ पोहोचली. लाँचमधून उतरताच आर.एफ.ओ. गोडसे साहेब निलेशला म्हणाले, ‘आहे ! तुम्हाला वाघ दिसला हे खरं आहे. आम्ही लाँचमधून आवाज ऐकला.’ खूप आनंदी वातावरणात सर्वांचा गप्पांचा मूड जमलेला तेव्हा !


सहाव्या दिवशी सकाळी लाँच मालदेवला रवाना झाली. पाली बीटाची जबाबदारी असलेली ही मंडळी काल वाघाचा आवाज आलेल्या जलाशया समोरच्या जंगलात आज फिरली. त्यांनी तिथले पट्टेरी वाघाचे पगमार्क जमवले. दुपारी ३ वाजता मंडळी मालदेवच्या पठारावर पोहोचली. तेव्हा, मालदेव बीटमधील मंडळींनीही पालीच्या दिशेला वाघ बघितलेला होता हे समजलं. मालदेवचे स्थानिक शामराव कोकरे यांची म्हैस वाघाने मारली होती. शामरावांनी अनेकदा या भागात वाघ बघितलेला होता. गाडीच्या टायरच्या सोलांच्या चप्पला वापरणारे शामरावांचे भाऊ लक्ष्मण यांनीही २००७/०८ साली पालीच्या जंगलात जवळून चालताना पट्टेरी वाघ बघितला होता. नवजा गावातही काही लोकांनी २००७ ते २०१० सालात वाघ बघितला होता. ज्या पठारावर ही मंडळी भेटली तिथे बऱ्याच ठिकाणी वाघाच्या विष्ठा दिसून आल्या. सातव्या, शेवटच्या दिवशी अवसारी सेंटरवर सर्व बीटमधील सदस्यांची मीटिंग झाली. मिटींगमध्ये शिरसिंग्याच्या खोऱ्यात वाघ ओरडल्याची आणि वाघाने सांबर मारलेल्याची माहिती दाजी ढमाल यांनी दिली. डिचोली, आंबेघर मधील लोकांनीही वाघाचे ओरडण्याचे आवाज ऐकलेले होते. वन खात्याने अजूनही जंगलात राहून काम करू इच्छिणाऱ्यांना दोन दिवसांची जादा परवानगी दिली. निलेशसह इच्छुक १२/१५ जण शिरसिंग्याच्या टॉवरवर पोहोचले. तिथे मुक्काम करून आठव्या दिवशी सकाळी वाघाने सांबर मारलेल्या पाभळ्याच्या पाण्याजवळ आले. तिथल्या परिस्थितीवरून वाघाचे सांबर खाणे सुरु असल्याचे लक्षात आले. यातून एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येत राहिला तो म्हणजे, पालीत दिसलेला वाघ हा इकडे शिरसिंग्यात येऊन सांबर मारू शकत नव्हता. अर्थात हे दोन्ही वाघ वेगळे होते. नर की मादी हे कोणालाच कळले नाही. बापूंनी यापूर्वी जंगलात किमान ५/६ वेळा वाघ बघितला होता. या निमित्ताने निलेश आणि सहकाऱ्यांनी कोयनेच्या जंगलात पहिल्यांदा ‘ऑनफूट’ वाघ पाहिला.

नेहमीपेक्षा वेगळी, वन्यजीवांचे काही ठोस पुरावे मिळतात का ? या शास्त्रीय दृष्टीने केली गेलेली ही प्राणीगणना होती. यासाठी सहभागींना ट्रेनिंग देण्यात आलं होतं. या घटनेनं पट्टेरी वाघाचे कोयनेतील अस्तित्व निश्चित केलं. पालीतील प्रत्यक्ष दर्शन, शिरसिंगे येथील सांबराचे किल आणि मालदेव या ठिकाणी मिळालेल्या विष्ठा, पायांचे ठसे आदी पुराव्यांची बेंगलोरस्थित लॅबमध्ये शास्त्रीय तपासणी पूर्ण झाल्यावर २०११ च्या जानेवारी महिन्यात मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, बोर (वर्धा) आणि ताडोबा पाठोपाठ महाराष्ट्रातला सहावा कोयना व्याघ्र प्रकल्प घोषित झाला. १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा मिळालेल्या आणि जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या कोयना अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जा मिळाल्यावर वनविभागाने गवताळ प्रदेशाच्या निर्मितीसाठी विशेष प्रयत्न सुरु केल्याने जंगलात शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढू लागली.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com  

सर्व छायाचित्रे : आदित्य जोशी 


कोकण कड्यावरून दिसणारा तिवरे जलाशय


कोयना अभयारण्याची वनराणी लाँच


कोयनेच्या जंगलातील सूर्योदय


कोयनेच्या जंगलातून चालताना


डोळ्यादेखत काही मिनिटात 
अख्ख्या डोंगर चढून गेलेले मादी अस्वल आणि पिल्ले 


पट्टेरी वाघाची विष्ठा


पट्टेरी वाघाने केलेली उकरण


पट्टेरी वाघाने झाडावर केलेले स्क्रच मार्किंग


पाली बीटातील सहकारी डावीकडून अनुक्रमे 
आदित्य जोशी बापू गुरव निलेश बापट चिन्मय ओक


पालीचा वॉचटॉवर


मादी अस्वलाची विष्ठा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...