बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

महायोगी “नाथपंथी” गुरू गोरक्षनाथ


भारतीय आणि महाराष्ट्रीयन लोकसंस्कृतीच्या जडणघडणीत नाथपंथाचे खूप महत्वाचे स्थान आहे. संपूर्ण देशभरात हा समाज विखुरलेला आहे. भारतीय संस्कृतीतील शैवसंप्रदायात नाथसंप्रदायाचा समावेश होतो. या संप्रदायाचा उगम भगवान शिव यांच्यापासून झाला, अशी मान्यता आहे. भगवान शिव हे जरी या पंथाचे मूळ प्रवर्तक असले तरीही त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ हे या पंथाचे पहिले गुरू होत. तदनंतर या संप्रदायाला नावारूपाला आणण्याचे श्रेय मात्र "गुरू गोरक्षनाथ" यांनाच जाते.

गोरक्षनाथ हे सुमारे नवव्या - दहाव्या शतकातील नाथ संप्रदायाचे  एक प्रवर्तक व प्रभावी प्रसारक होत. गोरक्षनाथाच्या जन्मस्थळाबाबत आणि काळाबाबत विद्वानांत विविध मते आहेत. दक्षिणेकडे गोदातीरी चंद्रगिरी, दक्षिणेतील बडव देश, काठेवाडात गोरखमठी आणि पंजाब अशी त्यांची विविध जन्मस्थाने सांगितली जातात. हजारीप्रसाद द्विवेदी त्यांचा काळ नवव्या शतकाचा उत्तरार्ध, तर रा. चिं. ढेरे तो १०५० ते ११५० च्या दरम्यानचा मानतात. काही दंतकथांत संत कबीर (साधारण काळ सुमारे १४८८ ते १५१२) आणि  गुरूनानक (साधारण काळ सुमारे १४६९ ते १५३८) यांच्याबरोबर गोरक्षनाथाचा संवाद झाल्याचे उल्लेख आढळतात. गोरक्षनाथ ह्या नावासंबंधी दोन मते प्रामुख्याने मांडली जातात, त्यानुसार गो म्हणजे इंद्रिये. “इंद्रिये ताब्यात ठेवणारा तो गोरक्षनाथ”, दुसरे मत असे, की गोरक्षनाथाचा जन्म मच्छिंद्रनाथाच्या अनुग्रहाने गोबरातून झाला म्हणून गोरक्षनाथ. हजारीप्रसाद गोरखनाथाची जात ब्राह्मण मानतात, तर श्री. ढेरे तो दक्षिणेत स्थायिक झालेल्या काश्मीरी ब्राह्मण कुलात जन्मल्याचे सांगतात. समाजाच्या तत्कालीन खालच्या स्तरात त्यांचा जन्म झाला असावा, असेही एक मत आहे. नाथ संप्रदायाच्या नवनाथांमध्ये तसेच चौऱ्याऐंशी सिद्धांमध्येही गोरक्षनाथाचा समावेश आहे. नाथ संप्रदायाचे आदिप्रवर्तक चार महायोगी मानले जातात. आदिनाथ म्हणजे प्रत्यक्ष शिवच. त्यांचे दोन शिष्य एक जालंधरनाथ आणि  मच्छिंद्रनाथ उर्फ मत्स्येंद्रनाथ होय. जालंधरनाथाचा शिष्य कृष्णपाद (कानीफा, कण्हपा, कान्हपाद) आणि मच्छिंद्रनाथाचा गोरक्षनाथ. पंचकारावर आधारलेली विवेकशून्य व आचरणभ्रष्ट साधना विशेष बोकाळलेली असलेल्या त्या काळी गोरक्षनाथाला मात्र ती मान्य नव्हती. त्यांनी योगमार्गाचा अवलंब केला. पतंजलीच्या अष्टांग योगाऐवजी त्याने षडंग योग (आरंभीची यम व नियम ही दोन अंगे गौण व इतर सहा अंगे प्रमुख) स्वीकारला. तो पुढे हठयोग म्हणून ओळखला गेला. गोरक्षनाथाच्या ग्रंथांत या साधनामार्गालाच अधिक महत्त्व दिलेले आहे. गोरक्षनाथाने प्रवर्तित केलेल्या योगमार्गाच्या वा  नाथ संप्रदायाच्या बारा शाखा वा पंथ आहेत. म्हणून बारहपंथीअसेही नाव या संप्रदायास आहे. या बारा शाखांपैकी पहिल्या सहा शाखा प्रत्यक्ष शिवाने व शेवटच्या सहा गोरखनाथाने प्रवर्तित केल्याचे मानतात. यात  भूजची (कच्छ) कंठरनाथी, पंजाब, पेशावर व रोहटकची पागलनाथी, पेशावर व अफगाणिस्तानची रावल, पुरी मेवास्थानेश्वर (थानेसर) व कर्णालची पंख किंवा पंक, मारवाडची बन, जोधपूरची गोपाल किंवा रामके, बंगालची चांदनाथ कपिलानी, टिला, अंबाला  कर्णाल येथील हेठनाथी, बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यातील चोलीनाथ आईपंथी, रतढोंडा मारवाडची बैरागपंथी, जयपूरची पावनाथी आणि शेवटची धजनाथी होय. सर्व नाथपंथीय जरी शिवापासूनच उत्पन्न झालेले असल्याचे मानत असले तरी, नाथ संप्रदाय अद्वैतवादी असून स्वला जाणून घेणे हेच खरे ज्ञान आहे मूलतः असे मानणारा आहे. आणि हा 'जाणीवेचा मार्ग' योगाच्या माध्यमानेच साधला जातो. कानाला भोके पाडण्याची पद्धतीही गोरक्षनाथांनी सुरू केली.
मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असताना चंद्रगिरी गावात  पोहोचले. त्या गावात सर्वोपदयाळ या नावाचा एक वसिष्ठगोत्री गौड ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती होते. ती अतिशय सद्गुणी होती. पुत्रसंतान नसल्यामुळे ती दुःखी होती. त्यांच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षा मागण्यास गेले. सरस्वतीने त्यांना भिक्षा घातली, नमस्कार केला. ‘आपणाला संतती नाही, उपाय सांगा,’ अशी तिने विनंती केली. मच्छिंद्रनाथांनी तिला सूर्यमंत्राने मंत्रून भस्म दिले व सांगितले, हे भस्म रात्री निजतेवेळी सेवन कर. हे भस्म ही नुसती राख नाही, नित्य उदयास येणारा हा साक्षात हरिनारायण आहे. तो तुझ्या उदरी येईल. तुझ्या त्या पुत्रास मी स्वतः येऊन उपदेश करीन. तो जगात कीर्तिमान होईल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील.” मच्छिंद्रनाथ जाण्यास निघाले तेव्हा तिने विचारले, महाराज, तुम्ही पुन्हा कधी याल ? यावर नाथ म्हणाले, बारा वर्षांनी मी परत येईन !”. सरस्वतीने ते भस्म पदरात बांधून ठेवले. ती नंतर शेजाऱ्याच्या घरी गेली. तिथे अनेक बायका जमल्या होत्या. सरस्वतीने त्यांना सांगितले, एक बाबा आला होता. त्याने मला पुत्र होण्यासाठी भस्म दिले आहे.” यावर त्या सर्वजणी हसल्या व म्हणाल्या, असल्या भस्माने का मुले होतात ? त्या सर्व बायकांनी तिच्या मनात किंतू भरवल्यामुळे तिने आपल्या घराजवळील गोठ्याजवळ शेण टाकण्याच्या खाचीत ते भस्म टाकून दिले. बारा वर्षानंतर मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात सरस्वतीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. त्यांना पाहून सरस्वती बाहेर आली. तिने नाथांना ओळखले. मुलगा कुठ आहे ? नाथांनी विचारले. मला मुलगा झालाच नाही, तिने सांगितले. खोट बोलू नकोस ! त्या भस्माचे काय झाले ? नाथांनी प्रश्न केला. मी ते शेण टाकण्याच्या जागी नेऊन टाकले. योगीराज, मला क्षमा करा ! , मला ती जागा दाखव. तिने नाथांना ती जागा नेऊन दाखविली.हे प्रतापवंता, हरिनारायणा, सूर्यसूता तू जर गोवऱ्यात असलास तर बाहेर ये !. गुरुराया, मी इथ आहे. गोवऱ्यांची रास मोठी आहे. तुम्ही मला बाहेर काढा, मच्छिंद्रनाथांनी लगेच खाच उकरून त्या मुलास बाहेर काढले. तो तेजःपुंज पुत्र बाहेर येताच सूर्यासारखा प्रकाश पडला. तेच पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्ध झाले. अन्य एका  उपलब्धीनुसार मच्छिंद्रनाथ व ती स्त्री त्या शेणाच्या ढिगाजवळ गेले व त्यांनी हाक मारली "चलो गोरक्ष !" त्याबरोबर त्या शेणातून एक मुलगा उभा राहिला व त्याने प्रत्युत्तर दिले "आदेश!" मच्छिंद्रनाथ त्या मुलाला घेऊन गेले. हेच पुढे गोरक्षनाथ म्हणून प्रसिद्धीस आले, अशी एक लोकप्रिय कथा आहे.
गोरक्षनाथांचे कार्य व्यापक आणि विविधांगी आहे. कुल, जात, वर्ण, धर्म इत्यादींच्या पलीकडे ईश्वरतत्त्व आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रखर वैराग्य, विशुद्ध चारित्र्य, सदाचार व ब्रह्मचर्य यांना त्याने स्वतःच्या आचरणाने महत्त्व देऊन तत्कालीन समाजातील अनैतिक, अविवेकी व अनाचारी वृत्तींना पायबंद घातला. ते एक महान संघटक होते. त्यांनी भारतीय आध्यात्मिक साधनेचे शुद्धीकरण केले आणि नंतरच्या अनेक महापुरुषांना कार्याची प्रेरणी दिली. त्याने योगमार्गाला सुसंघटित रूप देऊन योगसाधनांचे व्यवस्थापन केले. स्त्रिया व इतर समाजाच्या उद्धाराचा मार्ग मोकळा करून दिला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पायाही प्रथमत: त्यांनीच घातला. त्यांच्या  रावल शाखेत आजही मुस्लीम समाजाचा सहभाग आहे. शब्द प्रामाण्यापेक्षा आत्मानुभूतीच्या प्रत्यक्ष ज्ञानाला ते विशेष महत्त्व देतात. ते शिवोपासक व योगमार्गी होते. त्यांचे मठ आणि अनुयायी भारतात सर्वत्र तसेच नेपाळ आणि श्रीलंकेतही आढळतात. सर्व नाथसंप्रदायी योगी हे आपल्या विशेष पेहेरावामुळे त्वरित ओळखले जातात. मलिक मुहंमद जायसी, मीरा, सूरदास, कबीर, अरब पर्यटक इब् बतूता इत्यादींनी या वेषाची वर्णने केली आहेत. मच्छिंद्रनाथांनी भगवान शंकराला प्रसन्न करून त्याचा वेष प्राप्त केला, अशी एक आख्यायिका आहे. त्यांच्या नावावर संस्कृत, अपभ्रंश, हिंदी व इतर भारतीय भाषांतील विपुल ग्रंथरचना आहे. देशी भाषांत ग्रंथरचना करून त्यांनी त्या भाषांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. त्यांचे संस्कृत आणि अपभ्रंश भाषेतील अमनस्क, अमरौघशासनम्, गोरक्ष - पद्धति, गोरक्ष शतक, गोरक्ष संहिता, महार्थ –मंजरी  (अपभ्रंश), सिद्धसिद्धांत पध्दति, योगमार्तंड, योग बीज, योग चिंतामणी आदि ग्रंथ महत्त्वाचे होत. हिंदीत लहानमोठे जवळपास ४० ग्रंथ त्यांनी लिहिल्याचे अभ्यासक सांगतात. हे सर्व हिंदी ग्रंथ पीतांबरदत्त बडथ्वाल यांनी गोरखबानी या  नावाने सन १९४२ साली संकलित केले आहेत. नाथपंथाचा उल्लेखसिद्घपंथअसाही केलेला आढळतो. नाथ सिद्घांची संख्या बौद्घ सिद्घांप्रमाणेच ८४ मानली जाते. ८४ सिद्घ ही सिद्घांची संख्या मूळची वज्रयानी परंपरेतील असून नाथ संप्रदायाला नावारुपाला आणणारे गोरक्षनाथ ह्यांच्या प्रभावामुळे वज्रयान्यांचे अनेक समूह नाथपंथात प्रविष्ट झाले. त्यांनी आपल्या वज्रयानी पूर्वपरंपरेतील सिद्घ पुरुषांची आणि नंतर स्वीकारलेल्या नाथपंथातील सिद्घांची नामावली एकमेकांत मिसळली आणि नवनाथांप्रमाणेच नाथपंथाचीही विवक्षित सिद्घगणना सुरु झाली, असे डॉ. रा. चिं. ढेरे ह्यांचे मत आहे. संतपरंपरेतील नामदेव, एकनाथ अशा संतांनीही आपल्या अभंगांतून ८४ अशी नाथ सिद्घांची संख्या दिलेली आहे. आद्य शंकराचार्यांनंतर अखिल भारतीय जनमताला प्रभावित करणारा एवढा मोठा आचार्य मध्ययुगात झालेला नाही, असे मत हजारीप्रसाद द्विवेदी यांनी नोंदवून ठेवले आहे.
विशेषतः महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा विचार करता गोरखशिष्य अमरनाथ आणि प्रामुख्याने गहिनीनाथ हे महाराष्ट्रातील नाथ संप्रदायाचे मूळ पुरुष होत. ज्ञानेश्वर-नामदेवांसारखे वारकरी संप्रदायातील संत हे परंपरेने नाथ संप्रदायाशी संबद्ध असल्यामुळे नाथ संप्रदायातील विचारप्रवाह वारकरी संप्रदायात प्रविष्ट होऊन वाहू लागला. निवृत्तिनाथांकडून ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाचा वारसा मिळाला. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांचे गुरू गुंडम राऊळ आजेगुरू चांगदेव राऊळ हे दोघेही नाथसिद्ध होते. स्वतः चक्रधरांचा इतर अनेक नाथसिद्धांशी संबंध आला होता. दत्त संप्रदाय  नाथ संप्रदाय यांचाही निकटचा संबंध आहे. नाथ आणि दत्तात्रेय या दोघांनाहीअवधूतहे समनाव आहे. नाथ संप्रदायात गुरूचे स्थान महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आदर्श गुरू असलेल्या दत्तात्रेयाला नाथपंथी पूज्य मानतात. अनेक नाथांना दत्ताचा अनुग्रह होता. समर्थ संप्रदाय आणि नाथसंप्रदाय यांचा प्रत्यक्ष संबंध आढळत नसला, तरी समर्थ रामदासांनी त्यांच्या शिष्यांनी नाथांविषयीही आदर व्यक्त केला आहे. ज्ञानदेवपूर्व तीन-चार शतके तर हा संप्रदाय लोकमान्यतेच्या अगदी शिखरावर होता; परंतु इतके माहात्म्य असलेला हा संप्रदाय तदनंतर फार काळ आपला प्रभाव टिकवू शकला नाही. गोरखनाथ नाथ संप्रदाय यांच्याकडून अनेक संतमहात्म्यांनी प्रेरणा घेतली असली, तरी त्यांनी नाथ संप्रदायाहून वेगळे असे आपपाले पंथ चालू केले. महाराष्ट्रात हा पंथ चालू होतो होतो, तोच त्याच्याच तत्त्वांचा वारसा घेऊन वारकरी संप्रदाय प्रबळ झाला आणि मूळचा नाथ संप्रदाय क्षीण झाला. महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर हे नाथसंप्रदायाचे उगमस्थान मानले जाते. याच ठिकाणी गुरू गोरक्षनाथांनी नाथांना ८४ सिद्धांना उपदेश केला. ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपमशिळा होय. या अनुपम शिळेला बोलीभाषेत अनुपानशिळा असेही म्हटले जाते. मनःशांतीच्या शोधात असलेल्या भगवान परशुरामांनाही गुरू गोरक्षनाथांनी याच अनुपम शिळेवर पात्र हातात दिले होते. त्या पात्रात ज्या ठिकाणी ज्योत पेटेल, तेथे तपश्चर्या करण्यास सांगितले होते. सध्याच्या कर्दळीवन येथे ज्योत पेटल्यानंतर तेथे ज्योतिस्वरूप गोरक्षनाथ प्रकट झाले, त्या वेळी तेथे मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. कन्नड भाषेत धुक्याला मंजू म्हणत असल्याने गुरू गोरक्षनाथांना मंजूनाथ असेही म्हणतात. या परंपरेचा भाग म्हणून आजही नाथसंप्रदायातील १२ पंथांतील एका योग्याची आळीपाळीने लोकशाही पद्धतीने राजेपदी नियुक्ती करून त्या राजाच्या हातात पात्र देऊन नाथांची झुंडी त्र्यंबकेश्वर येथून कर्दळीवनाच्या दिशेने निघते.

त्याकाळात नाथयोगी अनेक तीर्थक्षेत्रांची यात्रा करीत. प्रयाग, अयोध्या . हिंदू क्षेत्रांना भेटी देत असतं. भारतात सर्वत्र नाथसंप्रदायाचे मठ मंदिरे आहेत. यात सर्वांधिक प्रसिद्ध गोरखपूर येथील गोरक्षनाथाचे मंदिर, पाकिस्तानातील पूर्णनाथकूप, बलुचिस्तानातील देवी हिंगलाज, पंजाबमधील गोरखटिल्ला, नेपाळातील काठमांडू, सौराष्ट्रातील गिरनार पर्वत, कच्छमधील धिनोधर मठ, बंगालमधील आदिनाथ, तमिळनाडूमधील काद्रिमठ, मुंबईजवळील पांडुधुनी, ग्वाल्हेरजवळील भर्तृगुंफा, कर्नाटकातील हाडी भरंगनाथाचे मंदिर, महाराष्ट्राचा  विचार करता पुणे जिल्ह्यातील गंभीरमठ, सांगली जिल्ह्यातील बत्तीसशिराळा, नाशि जिल्ह्यातील त्र्यंबकमठ, सातारा जिल्ह्यातील मत्स्येंद्रगड, अहमदनगर जिल्ह्यातील वृद्धेश्वराचा डोंगर आदि स्थाने नाथांची पवित्र तीर्थक्षेत्रे होत. गोव्यातील चंद्रनाथ, मंगेशनाथ ही शिवमंदिरेसुद्धा  नाथसंप्रदायाशी संबंधित असावीत, सा एक मतप्रवाह आहे. नेपाळी लोक गोरक्षनाथांना पशुपतीनाथाचा अवतार मानतात. नेपाळमध्ये काही ठिकाणी त्यांचे आश्रम आहेत. नाण्याच्या एका बाजूवर त्यांचे नावही आढळते. महाराष्ट्रातील औंढ्या नागनाथ ही त्यांची तपोभूमी असल्याचे म्हटले जाते.
गोरक्षनाथ हे नाथ संप्रदायातील एक अलौकिक दैवी व्यक्तिमत्व होत. आपल्या अचाट तपसामर्थ्यामुळे ईश्वरसम असलेले गोरक्षनाथ शाबरी विद्येचे रचनाकार होत. ही लोककल्याणकारी विद्या एक कोटी मंत्रांपासून बनली होती. कालपरत्वे तिची शुद्धता लोप पावल्याने ती फारशी प्रभावी नाही. भक्तिमार्ग प्रचलित होण्याच्या अगोदर सर्वांत शक्तिशाली धार्मिक मार्ग म्हणजे गोरक्षनाथांचा योगमार्ग होय. नाथपंथामध्ये ज्यांनी या पंथाचा प्रसार केला व त्याचे वजन वाढवले असे गोरक्षनाथांसारखे प्रभावी व व्यक्तिमान पुरुष दुसरे कोणी झाले नाहीत. कलियुगातील नऊ नारायणानी नवनाथांच्या रूपाने पृथ्वीतलावर अवतार घेतले आणि समाजाला ज्ञानी बनविले असे म्हणतात. नाथांनी ज्या क्रमाने अवतार घेतले  तो  क्रम साधलेला श्लोक...

मच्छिंद्र  गोरक्ष जालीन्दराच्छ | कानिफ श्री चर्पट नागनाथ:||
श्री भर्तरी रेवण गैनिनामान |  नमामि सर्वात नवनाथ सिद्धान ||

अभ्यासाअंती असे लक्षात येते कि इसवी सनाच्या दहाव्या शतकाच्या शेवटी शेवटी नवनाथ पंथाचा उगम झाला असावा. जसे प्रभू राम, भगवान कृष्ण यांचे अवतार कार्य पूर्ण झाल्याने त्यांची अवतार समाप्ती झाली आहे, तसे श्री नवनाथ अवतार अदयापि  अखंडपणे सुरु असल्याने त्यांची अवतार समाप्ती झालेली नाही. सुमारे दहाव्या - अकराव्या शतकात उदयास आलेल्या नाथांनी सातशे वर्ष प्रकट रुपात वावरून भक्तांची सेवा केली आहे. शके १७१० पर्यंत अर्थात इसवि सन १७८८ - ८९ पर्यंत नवनाथ मानव रुपात प्रकट भ्रमण करीत होते. त्यानंतर त्यांनी समाध्या घेतल्या. तथापि श्रीगोरक्षनाथ हे समाधिस्थ झालेले नाहीत, ते गुप्तपणे गिरनार पर्वतावरील श्रीदत्त आश्रमात राहत आहेत अशी एक लोकभावना आहे.

भारतासारख्या प्राचीन संस्कृती असलेल्या आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात वर्णव्यवस्था आज देखील आपले पाय रोऊन उभी आहे. माध्यामांच्या युगात जग आता एक जागतिक खेङे होत असताना भारतातील भटका समाज आज देखील उपेक्षित आहे. भटकाविमुक्त समाज हा देशातला आजही सर्वात तळागाळातला समाज आहे. अपवादात्मक स्थितीत काही भाग वगळता "आज इथे, तर उद्या तिथे" प्रमाणे आजही समाजातील अनेक कुटुंबांची पोटार्थ भटकंती सुरुच आहे. कोकणात हे प्रमाण कमी आहे, पण तरीही समाज म्हणून प्रश्न काही संपलेले नाहीत. विदर्भात हा समाज "गारपगारी" नावाने ओळखला जातो. तेथील समाजाची स्थिती आजही फारशी सुधारलेली नाही, हे वास्तव आहे. वंचित, साधनविहीन आणि दुबळ्या भटक्या-विमुक्तांना ७० वर्षांनंतरही भारतीय  स्वातंत्र्याचे फारसे कोणतेही लाभ मिळालेले नाहीत. एका आकडेवारीनुसार देशात भटक्याविमुक्तांची १५ कोटींच्यावर लोकसंख्या आहे. त्यातले ९८% भूमिहीन आणि बेघर आहेत. ९५% लोक दारिद्र्यरेषेखालचे जीवन जगत आहेत. अन्न वस्त्र - निवारा  यासाठी आवश्यक त्या शैक्षणिक क्षमता कौशल्यापासून बहुसंख्य समाज अजूनही शेकडो कोस  दूर आहेत. जातीचे दाखले, रेशनकार्ड, घरकुल-शिक्षण या सगळयांपासून वंचित त्यामुळे प्रवाहापासून वेगळा पडलेला हा समाज आहे. या दरिद्री, निराधार आणि परिस्थितीशरण लोकांना मानवी हक्कांसाठी लढायला प्रव्रुत करणे ही वर्तमान काळातली सर्वात अवघड गोष्ट आहे. कारण या समुदायाची पराभू मानसिकता हताश करणारी असते. अनेक शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजास रहिवासी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असते. ते मिळविणे हे या समाजास नोबेल पारितोषिक  मिळविण्याइतके अवघड काम बनले आहे, वर्तमान रत्नागिरीसह कोकणातील समाज याचा अनुभव घेत आहे. यावर या मेळाव्यातून काही ठोस निर्णय अपेक्षित आहे. कारण अलीकडच्या काळात समाज जागा होऊ लागला आहे, संघटीत होऊ लागला आहे. त्याला त्याचे हक्क समजू लागले आहेत, ही खूप मोठी समाधानाची गोष्ट आहे. काही प्रमाणात समाज शैक्षणिकदृष्टया साक्षर होऊन शहरात अलिकडील काळात स्थिरावला आहे, कोकणात आपण हे पाहू शकतो.

आजच्या तरुणाईत शिकलेलानिर्बुद्धसमाज तयार होऊ पाहातो आहे. तो ज्ञानी न्यायी समता - बंधुतावादी का बनत नाही ? तो कुशल बनत नाहीतो पोशाखीबनतो. त्याला श्रमाची लाज वाटते यावर समाज म्हणून उपाय शोधायला हवेत. आगामी काळात आपण किमान नाथपंथी म्हणून संघटीत होऊन शासनाकडून आपले हक्क पदरात पाडून घेत असताना गुरु गोरक्षनाथांनी दाखविलेल्या मार्गानुसार अखिल मानव जातीच्या कल्याणार्थ पुढाकार घेवून कार्य करण्याची गरज आहे. तसे घडल्यास आजही अदृश्यावस्थेत नाथयोगी कार्यरत असल्याची लोकभावना आपल्या या पिढीच्या मागे उभी राहील, ज्यातून एकत्रित अखंड समाज निर्मिती होईल, ती होत असतानाच्या क्रियेतील आपला सहभाग नाथपंथीम्हणून निश्चित गौरवपूर्ण असेल


धीरज वाटेकर


पूर्वप्रसिद्धी :

आनंदी ज्योतिष दिवाळी अंक २०२० (संपादक प्रवीण जवळे पुणे)

१.     आदेश दिवाळी अंक २०२० (संपादक गणेश मोरे टिटवाळा कल्याण)

रत्नागिरी जिल्हा गोरक्षनाथ विशेषांक २०१६                                                                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...