सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात कोकणची उपेक्षा

केळशीतील वाळूच्या टेकडीचा समावेश हवा !

निश्चित कालमापन असलेली त्सुनामी निर्मित जगातील एकमेव वाळूची टेकडी ठरलेल्या, पुरातत्त्व संशोधक डॉ. अशोक मराठे संशोधित कोकण किनारपट्टीवरील दापोली तालुक्यातील केळशी येथील टेकडीचा समावेश, सध्या तिला पोहोचू लागलेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरातत्त्वीय वारश्यात होण्याची गरज आहे. जागतिक पुरातत्त्वीय वारसा स्थळांमध्ये नॅरो गेजनेरळ-माथेरानची टॉय ट्रेनवगळता, हजारों वर्षांचा    इतिहास असलेल्या कोकणातील एकाही स्थळाचा समावेश नाही. कोकणचे पर्यटन जागतिक नकाशावर नेण्याचा हा खूप सामर्थ्यशाली मार्ग आहे. कोकणात अलीकडच्या काही वर्षांत झालेल्या संशोधनातून असंख्य पुरातत्त्वीय उलगडे होऊ लागले आहेत. त्यासाठी कोकण पर्यटनम्हणून प्रयत्न व्हायला हवेत 

कोकणचा इतिहास अजूनही पूर्णत: उजेडात आलेला नाही. गेल्या काही वर्षांत झालेले संशोधन मात्र बारकाईने अभ्यासले की कोकणचे जागतिक महत्त्व लक्षात येते. परंतु त्यास्थळांना आंतरराष्ट्रीय मानकेमिळविण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. पुण्याच्या जगप्रसिद्ध डेक्कन पुरातत्त्वीय कॉलेजचे निवृत्त ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक असलेल्या डॉ. मराठे यांनी गेल्या काही वर्षांत कोकणात केलेली संशोधने जगाला थक्क करायला लावणारी आहेत. गुहागरजवळ पालशेत गावी ९० हजार वर्षांपूर्वीची मानवनिर्मित हत्यारे त्यांना सापडली. केळशी-आंजर्लेपासून विजयदुर्ग-सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंत डॉ. मराठे यांना साधारणत: आठ हजार वर्षांपूर्वीचे मानवनिर्मित बांधकाम खोल समुद्रात सापडले. पणजीच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफीने त्यास दुजोरा दिला आहे. गुहागर-दापोली खाडी किनाऱ्यावर देर्दे गावी नवव्या शतकातील बुडालेली पुरातन बोट मिळाली. जोग नदी मुखाजवळ बिरवाडी गावात १० व्या शतकातील घर मिळाले. गुहागरात प्राचीन असंख्य कालवे आहेत. आंतरराष्ट्रीय समुद्रतज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी यांनी जगभरातील समुद्रतळाचे सौंदर्य न्याहाळून कोकणात समुद्रतळाशी जगापेक्षा वेगळी समृद्धी असल्याचे सिद्ध केले आहे. या सर्वांचा नीट अभ्यास केला तर कोकणची संस्कृती, मनुष्यजन्म सारे काही जगात सर्वात प्राचीन असल्याचे जाणवते. याला आंतरराष्ट्रीय मानकाचे कोंदण मिळाल्यास खऱ्या अर्थाने कोकण ग्लोबलहोणार आहे.

वाळूच्या टेकडीचे केळशी गाव भारजा नदीच्या दक्षिणेला वसले आहे. नदीच्या मुखाजवळील प्रदेशात आणि किनार्‍यालगत जुन्या वस्तीचे अवशेष सापडतात. हे अवशेष सुमारे 18 मीटर वाळूच्या थराखाली आढळले आहेत. प्रा. श्रीकांत कार्लेकर यांनी 1990 मध्ये या टेकडीचा शोध लावला. गत दशकात डॉ. अशोक मराठे यांनी याबाबतचे सर्व समावेशक संशोधन पुढे आणले. वाळूच्या टेकडीच्या तळापासून चार मीटर उंचीवर मिळालेल्या कोळशाचे कर्ब-14 पद्धतीने कालमापन केले असता 1170 ते 1190 वर्षांपूर्वी काळ मिळाला आहे. केळशी येथे केलेल्या शोधन कार्यात काही भांडी, घडे आणि खापरं मोठ्या प्रमाणावर मिळाली. पातळ आणि जाड अशा दोन प्रकारातील मृद भांडी आढळली. गोलाकार भांडी, वाडगे, ताटं आणि घडे यांची खापरे मिळाली. मातीच्या भांड्यांच्या कडांचे वेगवेगळे प्रकार आढळले. त्यात छोट्या मानेची, उघड्या काठाची, बारीक मानेची भांडी गोलाकार भांडी, वाडगे, ताटे आणि घडे यांची देखील खापरे आढळली. त्याचप्रमाणे गोलाकार काचेच्या भांड्यांचे आणि काचेच्या पेल्यांचे तुकडे व बांगड्यांचे तुकडे सापडले. तीस वर्षे वयाच्या दोन माणसांच्या कवट्या आणि एका लहान बालकाचा सांगाडाही मिळाला. अशाच उत्खननात टेकडीच्या पायथ्याशी जेथे आज भरतीचे पाणी दीड मीटर उंचीपर्यंत येते, तेथे 1.2 मी. व्यासाची जांभ्या दगडात बांधलेली विहीर आढळून आली आहे. या विहिरीच्या आत आणि आसपास मिळणार्‍या खापरांवरून ही विहीर शिलाहार काळातील (.. 1000) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पृष्ठवंशिय आणि पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांची हाडे इथल्या शोधनकार्यात सापडली. त्यात पाळीव गुरे, म्हैस, हरिण, समुद्री कासव व मासे यांचा समावेश आहे. माशांची हाडे आणि प्राण्यांचे अवशेष यांची संख्याही मोठी होती. मोठ्या हाडांचा पृष्ठभाग सूक्ष्मदर्शकाखाली काळजीपूर्वक अभ्यासला असता ती हाडे दूरवरून वाहून न येता ती जागच्या जागी गाडली गेली असावीत असे अनुमान काढण्यात आले. वाळूच्या टेकडीच्या माथ्यावर गाडल्या गेलेल्या दोन कवट्यांच्या जवळच तांब्याची सहा नाणी सापडली. विशेष म्हणजे ही नाणी चांगल्या स्थितीत असून त्या वरील मजकूरही सुस्पष्ट आहे. अल् सुलतान अहमदशाह बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी 837’ असा मजकूर त्यावर आहे. त्यामुळे ही नाणी बहामनी सुलतान अहमदशाह पहिला यांनी हिजरी सन 837 म्हणजेच इ. . 1433 मध्ये वापरात आणलेली आहेत हे नक्की झाले. 

केळशी गावाचा उल्लेख इतिहासात अनेक ठिकाणी आढळतो. सारे उल्लेख 1601 नंतरचे आहेत. पंधराच्या शतकाच्या अखेरीस नैसर्गिक घटनेतून या समुद्रकिनार्‍यावरील खारफुटीचे जंगल उद्ध्वस्त झाले असावे, अशाच प्रकारची घटना गुहागर-बाग येथे घडल्याचे पुरावे सापडतात. अलिबागच्या उत्तरेस रेवस बंदरात खारफुटीचे जंगल नष्ट झाल्याचेही संशोधनातून पुढे आले होते. अलिबाग-चौल उत्खनन पुराव्यावरून इ. . पहिल्या शतकात समुद्र पातळी तीन ते चार मीटरने कमी होती हे नक्की झाले आहे. केळशी येथील विहिरीच्या पुराव्यावरून आणि आजूबाजूच्या पुरातत्त्वीय अवशेषावरून इ. . 15 व्या शतकापर्यंत समुद्राची पातळी ही तीन ते चार मीटरने कमीच होती हे नक्की होते. वास्को द गामाच्या तिसर्‍या सफरीविषयी यूल, बर्नल, लोगन, गॅस्पर, कोरिआ, सॅन रोमन, कॅस्टेन्हेडा आणि बॅरोज आदि लेखकांनी लिहिले आहे. या प्रवासात गामाच्या गलबतांच्या तांड्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. 14 ते 17 गलबते या प्रवासात होती. त्यापैकी 4 ते 5 गलबते भारताच्या किनार्‍याला लागण्यापूर्वीच नष्ट झाली. 9 एप्रिल 1524 रोजी वास्को--गामा याने लिस्बन सोडले, तेव्हा त्याच्यासोबत 3000 माणसे होती. गलबतांचा तांडा भारतात शिरताच दिवच्या आसपास त्सुनामी आली तेव्हाचे वर्णन या लोकांनी जे सांगितले ते असे होते समुद्र इतक्या प्रचंड प्रमाणात खवळला की भयंकर आवाज, किंकाळ्यांनी आकाश दुमदुमले. जहाजांनी विचित्र हेलकावे घेतले, लाटांचे तांडव सुरू झाले, एका जागी नीटपणे उभे राहता येत नव्हते, माणसे एका बाजूवरून दुसर्‍या बाजूला जाऊन आपटत होती. माणसांनी अखेर देवाचा धावा करायला सुरूवात केली कारण लाटांच्या थैमानामुळे जहाजांवरील ताबा सुटला होता. दरवेळी भीषण लाट येत होती, जिरत होती, तोपर्यंत नव्या लाटेचा अविष्कार होत होता. हे सारे सुमारे 1 तास चालले होते. अशा परिस्थितीतही वास्को--गामाने प्रसंगावधान राखून लोकांना धीर देत सांगितले की पोर्तुगीजांच्या उपस्थितीमुळे समुद्रसुद्धा कंपित झाला आहेअशी माहिती केर्र या लेखकाने दिली आहे. त्यात त्याने वास्कोने भूकंपनिर्मित त्सुनामी ओळखली, असे म्हटले आहे. खोल समुद्रात जहाजाला त्यामानाने त्सुनामीचा तडाखा कमी बसतो याची दोन कारणे आहेत. त्सुनामीच्या उंचीच्या स्वरूपातील परिणाम खोल समुद्रात काही सेंमी. असतो. समुद्राचा पृष्ठभाग वरखाली होण्याचा काळ हा 5 ते 20 मिनीटं असतो. एवढ्या कालमर्यादेत उंचीत होणारा हा छोटा बदल जाणवत नाही.

 समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ह्रास 

समुद्र किनाऱ्यावरून रस्ता नेण्याचे हट्टामुळे टेकडीचा ह्रास झाल्याची स्पष्ट भूमिका केळशीतील ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते मनोहर वर्तक यांनी मांडली आहे. उटम्बरहून केळशीकडे निघालेला रस्ता, अगदी सुरुवातीच्या ४० वर्षे पूर्वआखणीनुसार बेलेश्वर मंदिरानजीक पूर्वेकडे वळतोकेळशी खाडी, साखरी, आतगाव, आंबोलीमार्गे वेसवीकडे जातो. या जुन्या मार्गावरील गावांना मुख्य प्रवाहात या रस्त्यामुळे आणणे शक्य होणार होतेआत्तापेक्षा खर्च कमी झाला असता. पुलाची जागा बदलली जाऊन उंची कमी झाली असती, पर्यायाने खर्च कपात झाली असतीपरंतु वर्तमान वाळू टेकडीचा ह्रास करणारा, “रेवस-रेड्डीरस्ता हा बेलेश्वर मंदिरापासून पश्चिमेकडे वळविला गेला. रस्ता चिंचवळ वस्तीत आलारस्ता अगदी घरांना लागून आला, घरांना धोका निर्माण झाला. रस्ता पुढे केळशीतील पर्यटन प्रसिद्ध पेशवेकालीन बांधणीच्या प्राचीन श्री महालक्ष्मी मंदिराजवळून आखण्यात आला. त्याला विरोध झाल्याने तो पुन्हा वळवून देऊळ आणि शाळा यांच्या मधून आखण्यात आलाहा रस्ता सागरी महामार्ग असून तो शाळेपासून, प्रमुख ग्रामदेवतेच्या मंदिरापासून अंतरावर असावा, याचे काही नियम आहेत त्यात हा वर्तमान रस्ता बसत नाही. पुढे रस्ता दक्षिणेकडे वळून छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु हजरत याकूबबाबा सरवरी यांच्या ४०० वर्षे प्राचीन दर्ग्याजवळ आला. काम सुरु असताना दर्ग्यानजिकच्या काही कबरीकोसळल्या. स्थानिकांनी हरकत नोंदविल्यानंतर कोसळलेला भाग पुन्हा बांधून देण्यात आला. येथून हा रस्ता समुद्रमार्गे उत्तरेकडे वळून वाळूच्या टेकडीकडे गेला. हे सारे काम मूळ जमीन मालकांची परवानगी न घेता झाले. यात अनेक गडबडी झाल्या आहेत. परवानगी मिळविल्याची कागदपत्रे तयार करताना हयात नसलेल्या व्यक्तीची सही घेणे, कधीही इंग्रजी न शिकलेल्या व्यक्तीची इंग्रजीतील सही असे अनेक दोष वर्तक आजही स्पष्ट करतात, त्याचे पुरावे सांगणारे दस्तावेज आजहि न्यायालयात जमा आहेत.  रस्ता नेताना रस्त्याकरिता केवडा, मारवेल, सुरु या झाडांचे असलेले जंगल जे. सी.बी. च्या सहाय्याने संपूर्णत: मूळापासून नष्ट केले गेले.

दरम्यानसन २००६ साली केळशी खाडीवरील पुलाच्या कामाला सुरवात झाली. तत्कालीन  ११ कोटींच्या या पुलाचे  पिलर उभारून पूर्ण झाले होते व  पिलर उभारण्याचे काम सुरू होते. त्यातच या पुलाला जोडणारा साडेतीन कोटींचा रस्ता या वाळूच्या टेकडीवरून नेण्यात आला. वाळूच्या टेकडीवरून महामार्ग नेण्याची कुशाग्र बुद्धिमत्तालाभलेले लाभलेले अभियंता, त्यावर ब्रन काढणारे लोकप्रतिनिधी या काळात जनतेने पहिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ताकामी रायगड व रत्नागिरी हे दोन जिल्हे जोडण्यासाठी मोठ्या यंत्राच्या साहाय्याने टेकडीच्या माथ्यापासून १२ मी. पर्यंत आणि १२० मी. लांबपर्यंतचा टेकडीचा भाग कापून टाकला. निसर्ग निर्मित टेकडीला ग्रहण लागले. टेकडी कापली गेल्याने  या संपूर्ण विषयाचे गांभीर्य समजून घेवून पुण्याच्या प्रणवतीर्थया संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली. आणि  ११ एप्रिल २००७ ला केळशी खाडीवर सुरू असलेल्या पुलाचे काम बंद पडले. आज बांधकाम खात्याने आपण टेकडी वाचवूअसा खुलासा केला आहे.  टेकडी वगळून रस्ता करण्याची भूमिका घेतली आहे, वास्तवात विकास व्हायलाच हवा आहे. मात्र तो सर्वसमावेशक आणि निसर्गासपूरक असावयास हवा. समुद्राच्या भरती रेषेपेक्षा केळशी गाव सुमारे ४ फूट खाली आहे, आजही समुद्राला भरती आली की काही भागात पाणी शिरते. ही टेकडी या गावचे संरक्षण आहे. आजपासून ७५ वर्षांपूर्वी हि टेकडी आज अस्तित्त्वात असलेल्यापेक्षा दुपटीहून अधिक होती. या टेकडीच्या पुढे ठराविक अंतरावर तुलनेने छोट्या टेकड्याही दृष्टीपथास पडत. कालौघात त्या नष्ट झाल्या. दरम्यान यावर्षी समुद्राच्या उधाणामुळे वाळूची टेकडी नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला. या वर्षी पावसाळी हंगामात सुमारे ३० मीटर लांब व २५ फूट रूंद असा भाग समुद्राच्या उधाणामुळे व सततच्या पाण्याच्या मार्‍यामुळे नष्ट झाला, टेकडी बचाव मोहिमेत जी भूमिका अनेक वर्षांपूर्वी अभ्यासक आणि संशोधकांनी मांडली ती स्थानिकांनी उचलून धरली आहे. रस्ता करण्याच्या नादात ओरबाडलेली टेकडी आता निसर्गापुढे हतबल झाल्याचे चित्र आहे.  “टेकडी नष्ट झाल्यास संपूर्ण गावाला धोका आहेहे संशोधकांचे मत यावर्षी गावातील गुजरवाडा आणि कांदेवाडीला झालेल्या त्रासामुळे सर्वांना पटले आहेकेळशीतील ही संपूर्ण टेकडी एकजीव असून त्यात स्तरविन्यास नाही. हा सर्व वाळूचा ढीग एकाचवेळी निर्माण झाला आहे. गोव्यातील दोनापावला येथील देशातील एकमेव समुद्र विज्ञान संस्थेने पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्या प्रचलित यादीमध्ये या टेकडीचे नाव नमूद नसल्याचे म्हटले आहे.

जगात सर्वत्र पुरात्त्वीय वारसास्थाने जतन होत आहेतपर्यटन विकासात त्यांचा वापर होतो आहे. आपण भारतीय याबाबतीत  कमालीचे उदासीन आहोत. यूनेस्कोच्या  जागतिक  वारसा  स्थळांच्या यादीत जुलै २०१२ रोजी  भारतातील पश्चिम घाटाचा समावेश करण्यात आला आहे. यात केरळ २०, कर्नाटक १०, तामिळनाडू ५ आणि महाराष्ट्रातील कास पठार, कोयना आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य, चांदोली राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश आहे. तत्पूर्वीच्या यादीत राज्यातील  छत्रपती शिवाजी टर्मिनस, एलिफंटा-घारापुरी लेणी, अजिंठा-वेरूळ लेणी यांचा समावेश आहे. जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक सारे पर्यटनाचे आविष्कार एकत्र सामावलेल्या, विविध किल्ल्यांच्या माध्यमातून श्री शिवछत्रपतींचा गौरवशाली वारसा सांगणाऱ्या, हजारो वर्षांची पुरातत्त्वीय परंपरा जपणाऱ्या कोकणातील एकही ठिकाण यात नाही. ही बाब गेली अनेक वर्षे कोकण पर्यटनाचा डांगोरा पिटणाऱ्या येथील समाजकारणी-राजकारणी यांचे काम दाखविण्यास पुरेशी आहे.   केळशीतील वाळूची टेकडीसारखी जागतिक दर्जाची मानके पुढे आणल्यास कोकण पर्यटन दिमाखात जगाच्या नकाशावर झळकेल आणि आजचा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्याची खरीखुरी उर्मी आपल्याला प्रदान करेल.

धीरज वाटेकर                         
पर्यटन अभ्यासक      






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...