शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

‘मालदोली हेरीटेज’ आता वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ !


दैनिक सकाळ रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१

दैनिक सकाळ रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१

दैनिक नवराष्ट्र रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१


कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (दिनांक २४) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. आनंदाश्रम वास्तू प्रकल्पाचे सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. मानवी जीवनातला शेवटचा टप्पा वृद्धांना आनंदी जगता यावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेला १९८५ साली ही वास्तू मराठे कुटुंबियांकडून देणगी स्वरुपात प्राप्त झाली होती. या वास्तूत विश्व हिंदू परिषदेने यापूर्वी 20 वर्षे आरोग्य प्रकल्प चालवला होता. त्याला जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला होता. त्यानंतर येथे संगणक प्रशिक्षण, फिरते वाचनालय राबविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एका हेरीटेज वास्तूत सुरु होत असलेल्या ज्येष्ठांच्या या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.


येथील साडेसात एकर जागेत अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराची ही भव्य वास्तू उभी आहे. वास्तूचा मुख्य दरवाजापासून अगदी पाठीमागील दरवाजापर्यंत सरळ रेषेत मोकळी जागा ठेवण्यात आली असून (कॉरिडॉर) त्याच्या दोनही बाजूला वास्तूतील खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. वास्तूच्या आतून आणि बाहेरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचे स्वतंत्र दोन जीने आहेत. उंचीवरील जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. जीना पाहिल्यानंतर या वास्तूच्या शास्त्रीय व अभ्यासपूर्ण उभारणीची सहज कल्पना येते. वास्तूतील काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत. जेवणासाठी लागणारे मसाल्याचे मिश्रण बनविण्यासाठी, मिक्सर नसलेल्या काळातील घडीव पाटायेथे आहे. पाण्यासाठी विहीर तसेच पाठीमागील बाजूकडील डोंगरात असलेल्या झऱ्यांचे पाणी विशिष्ठ उंचीवर १० बाय २० फूट आकाराचे मोठाले टाके बांधून साठविण्यात आले आहे. वास्तूतील वीस खोल्यांना प्रत्येकी  दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. सायंकाळी किमान सात वाजेपर्यंत वास्तूला वीजेची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक दरवाज्याला व्हेंटीलेटर्सची रचना आहे. कौलारू बांधणीच्या या वास्तूतील आतील छताच्या रीपांचा भाग वास्तुसौन्दर्याचा विचार करून फळ्या मारून बंद करण्यात आला आहे. ज्यामुळे पावसाळ्यातील छोट्याश्या किरकोळ लिकेजपासून सुटका होते आहे. कौले बदलावयाची असल्यास छतावर चढून बदलावी लागतात, आजच्या काळात हे काम आपणास जिकीरीचे वाटत असले तरीही त्या काळात हे अवघड वाटणारे काम सहज करण्याचे कौशल्य आणि क्षमता असणारी माणसे असतं, हे यातून आपणास प्रतीत होते. छताच्या लगीआजही मजबूत आहेत. वास्तूत पहिल्या मजल्याच्यावर पोटमाळा आहे. या वास्तूतील खोल्यांच्या सर्व दरवाजे-खिडक्या उघडल्या तर त्या बंद करायला किमान ३० मिनिटांचा अवधी लागतो.  

वास्तूच्या परिसरात १७५ आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुल) झाड लावलेले आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही. मात्र शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. आज यातील सर्व झाडे पाहण्यास मिळत नाहीत. पण अंदाज येऊ शकेल इतकी ४० फूट उंच सोनचाफा आदि झाडे येथे आहेत. कोकम, फणस, काजू, औषधी गुणधर्म असणारी चवई केळी, साग आदि झाडे परिसरात आहेत. झाडांकरिता चिरेबंदी पाटाच्या माध्यमातून, घराच्या वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हेरिटेज वास्तूच्या नकाशाचे आरेखन आणि संपूर्ण कामाचे नियोजन हे विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी पुण्यातील मित्र आणि पोलिस खात्यातील वरीष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रिखातर केले होते, मागील 2-3 पिढ्यांपासून अशी मौखिक माहिती या वास्तू संबंधात आहे. याबाबतचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. मात्र शंभर वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे आणि डॉ. विश्वेश्वरय्या हे मराठे यांचे पुण्यात असताना मित्र असल्याची माहिती विचारात घेता यात तथ्य असावे. प्रत्यक्ष वास्तू पाहिल्यानंतर हे सामान्य बुद्धिमततेचे काम नाही, हे आपल्याला स्पष्ट जाणवते. हे वास्तूवैभव शंभर वर्षांपूर्वी मालदोली भागात कसे उभारले ? हे एक आश्‍चर्य आहे.  

नव्या ‘आनंदाश्रम’ प्रकल्पानुसार ही वास्तू वृद्धांसाठीचे हक्काचे व आपुलकीचे घर असणार आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात येथे दहा वृद्ध स्त्री-पुरुषांची कायम वास्तव्याची सोय सशुल्क पद्धतीने करण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा डॉक्टर तपासणी होणार असून अचानक उद्भवलेल्या अणीबाणीच्या प्रसंगी अगर मेडिकल इमर्जन्सी च्या वेळी लागणारी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच कोणा घरचे लोक पर्यटन सहल वा अन्य कामासाठी बाहेर जाणार असतील व त्यांचे सोबत वृद्धांना नेणे शक्य नसेल तर अशा वृद्धांना मालदोली आनंदाश्रमात ठेवण्याची सशुल्क व्यवस्था करण्यात येणार आहे. हा वृद्धाश्रम असला तरी तो आनंदाश्रम वाटावा या करीता पर्यटन माध्यमातून पर्यटकांची सोयही आगाऊ नोंदणी पद्धतीने येथे होणार आहे. संपूर्ण शाकाहारी पद्धतीचे भोजन, चहा, नाश्ता, दुपारचे वेळी अल्प आहार, सणासुदीला गोडधोड खाणे अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. लोकांना आपले आनंदाचे क्षण, वाढदिवस या ठिकाणी करता येतील. ‘आनंदाश्रम’ मालदोली येथे चिपळूण ते मालदोली एसटी बसचा थांबा मंजूर होणार आहे. चिपळूणहून गणेशखिंड-वैजी-भोम-कापरेमार्गे, करंबवणेफाटा-धामेलीमार्गे आणि करंबवणे मार्गे मालदोलीला तासाभरात पोहोचता येते. सध्या वास्तूत सुसज्ज स्वयंपाकघर उभारण्यात आलेले आहे. सध्या तळमजल्यावरील खोल्यांत एका खोलीत दोन याप्रमाणे १० जणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येकासाठी मच्छरदाणीसह कॉट, बेडशीट, उशी, फॅन आदी व्यवस्था आहे. वृद्धांना दोन्ही वेळचे गरमगरम भोजन, एक हेवी वॉशिंगमशीन, एक वॉटर प्युरिफायर, आंघोळीच्या गरम पाण्यासह सुसज्ज बाथरूम, कमोड पद्धतीचे संडास आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. वृद्धांना चालण्या-फिरण्यासाठी योग्य परिसराची निर्मिती करण्यात आली आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने वास्तूत सकाळी सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार आहे. यानिमित्त संपूर्ण गावाला तीर्थप्रसादाचे आमंत्रण आहे. सत्यनारायणाची पूजा स्थानिक ग्रामस्थाच्या हस्ते होईल. सायंकाळी ४ ते ७या वेळेत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांतमंत्री रामचंद्र रामुका यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होईल. उद्घाटन कार्यक्रम किचनची फीत कापून संपन्न होईल. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन आणि श्रीअन्नपूर्णा देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम आणि कोकण प्रांताचे व्यवस्थाप्रमुख जयंत दांडेकर उपस्थित असणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी असंख्य कार्यकर्ते गेली दोन वर्षे मेहनत घेत आहेत. या प्रकल्पासंदर्भातील अधिक माहितीसाठी आपण प्रकल्प व्यवस्थापन समितीतील प्रकाश साठे (०९६५७३४५०५६), श्रीकांत बापट (०९४२१२३२५०१), दीपक भाटीया (०९८२२१६०८९१), बाळकृष्ण चव्हाण (०९४०५७५५८९८), वसुधा नामजोशी (०९७३०२४६६१८) यांच्याशी संवाद साधू शकता. स्वतंत्र खोल्यांची रचना, भरपूर पाणी, निसर्गरम्य परिसर, डांबरी रस्त्यापासून अगदीजवळ, दूरचित्रवाणी, मनोरंजन आणि खेळ या करिता वास्तूच्या चौफेर जागा आहे. गावात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे या वास्तूत उत्तम वृद्धाश्रम साकारू शकतो, असा विश्वस्थांना असलेला विश्वास आज सत्यात उतरतो आहे.


कोकणात अशा ‘हेरीटेज वास्तू’ गावागावात पाहायला मिळतील. या वास्तूंना सध्याच्या २४ तासांच्या टेलीव्हिजनच्या दुनियेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे कोकणातल्या गावागावातील अशा वास्तूंचे गाव पातळीवर संवर्धन व्हायला हवे आहे. त्यासाठी सर्व संबंधितानी पुढाकार घ्ययला हवा आहे.असाच पुढाकार मालदोलीतील वास्तूसंदर्भात १९८५ साली घेतला गेल्याने आज आपणाला ही वास्तू वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळते आहे. अशा कोकणातील सर्वच वास्तू पाहायला मिळाल्या तर ते कोकणचे सांस्कृतिक वैभव ठरेल. या वास्तूंना टेलीव्हिजनच्या दुनियेत असलेली मागणी पाहाता कोकणातल्या अशा शंभर वर्षांपूर्वीच्या वास्तूंच्या एकत्रित नोंदी व्हायला हव्यात. यासाठी ‘मालदोली हेरीटेज’ने केलेला उपक्रम पथदीप ठरावा, यासाठी शुभेच्छा !   

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com



या हेरीटेज वास्तू संदर्भातील आमचे अन्य ब्लॉगलेख वाचण्यासाठी कृपया लिंक क्लिक करा.

https://dheerajwatekar.blogspot.com/2016/09/blog-post_14.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2018/09/blog-post_16.html

मन:पूर्वक धन्यवाद.

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...