बुधवार, २४ जुलै, २०१९

राज्य संरक्षित गोपाळगडला आजही टाळे !

खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५/१७ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा  गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाल्याचे घोषित झाले. या पार्श्वभूमीवर नुकतीच किल्याला भेट दिली असता किल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे निदर्शनास आल्याने घोर निराशा झाली. पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेला आढळला. यामुळे शासनाने हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करताना नेमके कोणते तांत्रिकनिकष लावले ? याबाबत पुन्हा एकदा इतिहासप्रेमींच्या मनात प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचा संरक्षित स्मारकअसा बोर्ड लागलेला असताना तिथे टाळेपाहायला मिळणे अत्यंत वेदनादायी आहे.

धीरज वाटेकर यांनी नुकतीच स्थानिक दीपक वैद्य, चिपळूणचे सर्पमित्र अनिकेत चोपडे यांच्यासमवेत बहुचर्चित किल्ले गोपाळगडला (दि. २३ जुलै २०१९) भेट दिली. साधारणतः १५/१६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात आवाज उठवला होता. अलिकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. शिवतेज फौंडेशनच्या मनोज बारटक्के यांनीही याबाबत नापसंती व्यक्त केली. याबाबत फौंडेशन पुन्हा आवाज उठवेल अशी प्रतिक्रिया दिली. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी शिवतेज फाऊंडेशन, अॅड. संकेत साळवी, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे, आदि अनेकांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वास्तू, स्मारके, किल्ले संरक्षित केले जातात. या ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारके म्हणतात. या ठिकाणांची देखभाल आणि संरक्षणाचे काम राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत केले जाते. संरक्षित स्मारकांना हानी होऊ नये, यासाठी ऐतिहासिक वास्तू व स्मारके जतन कायदा येथेही लागू करण्यात आला आहे. तरीही गोपाळगडावर ‘टाळे’ लावलेले का आहे ? हे अनुत्तरित आहे.

महाराष्ट्रातील विविध राजवटींनी सह्याद्रीत गडपरंपरा निर्मिली. एका पेक्षा एक ताकदीचे, देखणेबुलंद सागरीदुर्ग निर्मिले गेले. शिवकाळात तर या दुर्ग परंपरेला तेज प्राप्त झाले. कोकण किनारपट्टीवर ताठ मानेने स्वतःची ओळख जपून असणारा याच परंपरेतील अंजनवेलचा गोपाळगड अलिकडेच राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित झाला. दुर्ग आणि इतिहासप्रेमी, स्थानिकांच्या आग्रही मागणीनंतर शासनाने गोपाळगडला न्याय दिला. प्राचीन काळात वाशिष्ठी नदीतून चिपळूण ते दाभोळ बंदर पर्यंत व्यापारी गलबतांची ये-जा चालत असे. या मार्गावर नजर ठेवण्यासाठी वशिष्ठी खाडीच्या उगमाच्या आणि संगमाच्या मुखाजवळ दोन किल्ले उभारण्यात आले. यात अंजनवेलचा गोपाळगड आणि गोवळकोटचा गोविंदगड यांचा समावेश होतो. हे दोन्ही किल्ले वाशिष्ठीचे पहारेकरी म्हणून ओळखले जातात. यातल्या गोपाळगडावर अनेक राजवटी नांदल्या. विविध कालखंडात गडाची पुनर्बांधणी होत राहिली. गडाचे आजचे स्वरूप हे शिवकालिन आहे. सन १६६० दरम्यान गोपाळगड स्वराज्यात आला. त्याचा गोपाळगड झाला. स्वातंत्र्यात गोपाळगडाला खासगी मालकीचे ग्रहण लागले. गडात कलमी आंब्याची बाग फुलविण्यात आली. किल्याची तटबंदी कोसळून, खंदक बुजवून दरवाजा करण्यात आला. दरवाजाला ग्रील बसविण्यात आले. या ग्रीलावरून उद्या मारून आत जाऊन शिवप्रेमी हा किल्ला पाहात असतं. मात्र आता किल्ला राज्य संरक्षित झाल्यानंतर तिथे ‘टाळेबंदी’ का आहे ? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पूर्वी या गडावर 'खाजगी मालमत्ता' असे लिहिलेला बोर्ड असायचा. तो बोर्ड शिवप्रेमींना अवस्थ करायचा. गडकोट ही राज्याची मिळकत असताना तिथे खासगी मालकी आलीच कशी ? हा पूर्वीचा मूळ मुद्दा आजही अनुत्तरीत आहे.

गोपाळगडावर अनधिकृत बांधकाम, गडातली वडाची झाडे तोडली गेली आहेत. किल्ल्यावरील धान्य कोठारे, बुजवलेल्या विहिरी पुन्हा सुस्थितीत यायला हव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या सागरी आरमाराचा गोपाळगड हा महत्वाचा घटक आहे. गोपाळगडाची अभेद्य तटबंदी तोडून त्या ठिकाणी लोखंडी प्रवेशद्वार बनवले आहे. किल्ल्यात बांधकाम करण्यात आलेले असून हा सारा प्रकार वेदनादायी आहे. शासनाने ऑगस्ट २०१६ मध्ये ऐतिहासिक संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला. स्वातंत्रप्राप्तीनंतरच्या दस्ताऐवजामध्ये सरकारी कातळ अशी नोंद होऊन हा गोपाळगडाचे अस्तित्व नाहीसे झाले होते. सन २०१५ मध्ये स्थानिकांच्या १८ हजार सह्यांचे निवेदन पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले होते. तीन बाजूंनी खंदक, २० मीटर लांबीची तटबंदी असलेला गोपाळगड किल्ला १ हेक्‍टर ५.८३ आरमध्ये विस्तारलेला आहे. किल्ल्याजवळील पठारापर्यंत आजही गाडीने जाता येते. किल्ला एका छोट्या टेकाडावर बांधलेला आहे. टेकडीवरुन दोन बाजूंनी भक्कम तटबंदी समुद्राच्या दिशेने खाली नेलेली दिसते. सर्वात खालच्या भागाला पडकोट आहे. तीन बाजूंनी समुद्र असलेल्या ह्या किल्ल्यावर जमिनीकडून आक्रमण झाल्यास संरक्षणार्थ खोल खंदक आहेत. जमिनीकडील बाजूला किल्ल्याच्या तटाला १५ बुरुज आहेत. बुरुजांवर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत. गडाला पूर्वेकडे व पश्चिमेकडे दोन प्रवेशद्वारे आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर दोनही बाजूस देवड्या आहेत. किल्ल्यावर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष, धान्य व दारु कोठारे त्याजवळील बांधीव तलाव, घरांची जोती, तीन विहीरी असे अवशेष दिसतात. ७ एकर क्षेत्रफळ असलेल्या ह्या किल्ल्याची बरीचशी तटबंदी अजून शाबूत आहे. तटावर इ.स १७०७ मध्ये फारसी भाषेत कोरलेला एक शिलालेख होता जो आता अस्तित्वात नाही. विजापूरच्या आदिलशाही राजवटीमधे सोळाव्या शतकात गोपाळगड बांधण्यात आला. शिवाजी महाराजांनी इ.स. १६६० च्या दाभोळ स्वारीवेळी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला, याचे पुनरुज्जीवन केले. या ठिकाणी मराठ्यांच्या नौदलासाठी एक सुसज्ज गोदी बांधण्यात आली. किल्ल्याचे गोपाळगड असे नामकरण करण्यात आले. इ.स १६९९ मध्ये जंजिऱ्याचा सिद्दी खैरातखान याने किल्ला जिंकला. याच काळात त्याने किल्ल्याचा पडकोट बांधला. १७४५ साली हा किल्ला तुळाजी आंग्रे यांनी जिंकून घेतला. सन १७५५ च्या पेशवे आंग्रे करारानुसार आंग्रेनी हा गड पेशव्यांच्या स्वाधीन केला. पुढे १८१८ पर्यंत तो स्वराज्यात राहिला. १७ मे १८१८ मधे इंग्रज कर्नल केनेडीने हा किल्ला जिंकून घेतला.

हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक व्हावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले आहेत, हे सर्वश्रुत आहे. गोपाळगड खाडीपातळीपासून सुमारे ३०० फूट उंचीच्या डोंगरावर उभा आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राच्या लाटांनी वेढलेल्या गडाच्या दक्षिण दिशेला मोठी दरी आहे. हा गड किती भक्कम होता ? हे तटबंदी पाहाताच लक्षात येते. या किल्याची दुरवस्था थांबविण्यासाठी, त्याबाबतचा निश्चित निर्णय होण्यासाठी अजूनही प्रयत्न आवश्यक आहेत.

धीरज वाटेकर  







रविवार, ७ जुलै, २०१९

धीरज वाटेकर यांना ‘लोटिस्मा’चा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार


चिपळूण : येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार लेखक, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना जाहीर झाला आहे. धीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना ग्रंथालयाचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली. 

सन १९९७ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमाध्यमातून लिखाणाची, सामाजिक कार्याची गोडी लागलेल्या वाटेकर यांनी दैनिक कोकण गर्जना, पुढारी, लोकसत्ता करिता पत्रकारिता केली आहे. अध्ययनासाठी केलेल्या हिमाचल ते कन्याकुमारी आणि भूतान या प्रवासातून जमविलेला किमान २५ हजार वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. गेल्या किमान तीसहून अधिक संग्राह्य विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक, दिवाळी अंकांचे संपादन, संदर्भ कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, "परमचिंतन" अभ्यासिकेसह संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन त्यांनी केले आहे. राज्यभरातील नियतकालिकतून विविध विषयांवरील, दीड हजारहून हून अधिक लेख प्रसिद्ध झालेत. कोकणच्या इतिहासाचे अभ्यासक अण्णा शिरगावकर यांनी लिहिलेल्या वाशिष्ठीच्या तीरावरून, गेट वे ऑफ दाभोळ, शेवचिवडा, व्रतस्थ, वाटचाल या ग्रंथांची निर्मिती आणि संपादन त्यांनी केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे यांचा सहवास लाभलेल्या सौ. कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थीनी’ हे चरित्र त्यांनी लिहून प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अण्णांच्या कार्याचाही गौरव केला आहे. त्यांची चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन, ही ५ पर्यटन पुस्तके आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी ह्या जीवनकथा प्रसिद्ध आहेत. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. २०१५ साली त्यांच्या ठोसेघर पर्यटन पुस्तकास कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा नलगे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. सप्टेंबर २०१६ ला माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषणपुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात गौरव, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून गेल्यावर्षी जून महिन्यात 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘वाशिष्ठी नदी : उगम ते संगम’ हा संशोधित निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.

धीरज वाटेकर हे ग्रंथनिर्मितीसह पर्यावरण रक्षण, पर्यटन, कोकण विकास आदि सामाजिक चळवळीत अग्रभागी असतात. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सर्व कामात अत्यंत तळमळीने सहकार्य करतात. त्यांचे लेखनही अत्यंत प्रवाही व वाचनीय असते. या निवडीबद्दल लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रकाशित बातमीच्या लिंक्स !





दैनिक प्रहार ०६०७२०१९


दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस ०६०७२०१९ 


दैनिक रत्नागिरी टाईम्स ०७०७२०१९

बुधवार, ३ जुलै, २०१९

तिवरेतील शोकांतिका !

'अरे त्या ...ची डेडबॉडी नाही मिळायला अजून ? खाली गेली असलं वाहून ? लोकं शोधतायतं !' काल रात्री धरण फुटून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे (ता. चिपळूण) गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या एका बाजूच्या खोलीत दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना, सकाळी भेटायला जाताना हा संवाद कानावर पडला नि मनाला असह्य वेदना झाल्या. कालपर्यंत जी नावानंं ओळखली जात होती त्यांची आजची ओळख त्रासदायक होती. पुढे गेल्यावर त्या खोलीतील प्रत्यक्ष दृश्य जे दिसलं ते तर त्याहून विदारक होतं. त्या खोलीतले आर्त स्वर मन विस्कटून टाकत होते. प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळणारं सत्य घटनेची भयानकता सांगत होता. कुणा लहानग्या शाळकरी मुलानं डोळ्यांदेखत घरचे सारे गमावले होतं ! तर कोणी आपली दुचाकी वाचवायला म्हणून गेलेला परतलाच नव्हता. कोणी पुलावरून दुचाकी घेऊन जाताना अचानकच गायब झाला होता. कोणी जेवायला बसलेला पुन्हा उठूच शकला नाही. गेलेल्यांच्या या साऱ्या आठवणीने जमाव अश्रू ढाळत होता. चिपळूणहून तिवरेकडे जाताना वाटेत भेटलेल्या नदीच्या दोन्ही पात्राशेजारील विस्कळीत निसर्ग, शेती, घरे, झाडे कालच्या रात्रीची तिवरेतील शोकांतिका बयाण करत होते.

photo : www.thehindu.com
घटना घडल्याचे चिपळूणात अनेकांना आदल्या रात्रीच (मंगळवार) समजले. प्रशासन सतर्कही झाले. आज (बुधवारी) सकाळी-सकाळी अनेकजण तिवरेकडे धावले. तिवरे धरण फुटल्याची बातमी आम्ही सकाळी व्हसअपवर पाहिली, नुसती बातमीच नाही तर पाठोपाठ मृतांचा आकडाही वाचायला मिळाला. खरंतर सह्याद्रीतील प्राचीन बैलमारव घाटमार्गाच्या पायथ्याशी असलेलं तिवरे हे निसर्गरम्य गावं. आज मात्र गावात जाताना त्या वातावरणाकडे बघवत नव्हतं. प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासह असंख्य बघ्यांचीही गर्दी उसळल्याने सकाळीच रिक्टोली फाट्याच्या अलिकडे रस्ता जॅम झाला. चिपळूणच्या पर्यटनात ‘तिवरे’ गावाचे स्थान महत्वाचे आहे. अर्थातच 'ग्लोबल चिपळूण टुरिझम'ची टीमही घटनास्थळी पोहोचली. भेटणारे अनेकजण घटनेची माहिती देत होते. काल (मंगळवारी) धरण ओव्हर फ्लो झाले. धरण जिथून फुटले तिथून खालून गढूळ पाणी येत होते. धरण लिक होते. प्रत्यक्ष घटनेत तिवरेच्या भेंवाडीतील सारी घरे, गणपतीचे मंदिर वाहून गेले. या धरणाच्या गळतीचा विषय किमान ४ वर्ष जुना आहे. ३ वर्ष तो गावात चर्चेत आहे. गेली २ वर्षे वृत्तपत्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या स्तरावर मांडला गेलेला आहे. अर्थात ‘असं होऊ शकतं ?’ हे माहित असून सुद्धा ते कोणाला थांबवता आलेलं नाही, ही शोकांतिका आहे. यामुळे ८ घरं गेली, ११ कुटुंब उद्धवस्थ झाली. जवळपास २३ जण बेपत्ता झाले. एकजण सुदैवाने जीवंत सापडला. १८ जणांचे मृतदेह सापडले. ४ जणांचा शोध सुरु आहे. किमान ३५ जण विस्थापित झालेत. सारं वेदनादायी आहे. मृतदेह शोध मोहिमेत एन.डी.आर.एफ.चे पथक आणि त्यांच्या मदतीला स्थानिकांसह साताऱ्याचा सह्याद्री अॅडव्हेंचर ग्रुप, रत्नागिरीचा जिद्दी मौन्टेनिअरिंगचा ग्रुप कार्यरत आहे. सगळ्या प्रेतांची धरणाच्या अजस्त्र लोंढ्यात आदळआपट झाल्याने ओळख पटविणेही कठीण बनले आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज आल्यानंतर विस्थापितांना अनेकांनी आपापल्या परीने मदतीचा हात देऊ केलाय. तशी सुरुवात तर तिवरे ग्रामस्थांनीच केली. सरकारची यंत्रणा, वैद्यकीय सेवा, ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ सह विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीही तिवरेत पोहोचले. आमच्या ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम’ म्हणून दिवसभरात गावात दोन फेऱ्या झाल्या. पहिल्या भेटीत तातडीची गरज समजावून घेवून चेअरमन श्रीराम रेडिज यांनी पुढच्या आठवड्याभराच्या जेवणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. जसा त्यांनी विचार केला तसा विचार करणाऱ्या अनेक संस्था असल्याचं दुसऱ्या भेटीत लक्षात आलं. कारण तातडीच्या गरजांमध्ये लागणारे अन्नधान्य, कपडे, भांडी, पाणी असं शाळेत जमा झालेलं पाहिलं. संपूर्ण दिवसभर लोकं मदत घेऊन आपणहून तिवरेकडे धावत होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास रत्नागिरीहून कोणीतरी पाचशे वडापाव घेऊन आलं होतं. समाज एकवटलेला दिसला. 
   
तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. हा भाग दुर्गम आहे. २.४५२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण सन २००० साली पूर्णत्वास गेले होते. तिवरे धरण फुटीत भेंदवाडी पाण्याखाली गेली. स्थानिकांनी या घटनेला प्रशासनाला जबाबदार धरले. त्यांचा पत्रव्यवहारही तेच बोलतोय. सरकारी कारभार लोकांच्या जीवाशी खेळल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. यातल्या दोषींवर कारवाई होईलही ! मात्र ही घटना गेलेल्यांचे आणि मागे राहिलेल्या विस्थापितांचे प्रश्न, नव्याने निर्माण करून राहिली आहे. ते सुटेपर्यंत तरी क्षणार्धात होत्याचं नव्हतं करणारी कालची अमावस्या विसरणे केवळ अशक्य आहे !

या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...