'अरे त्या ...ची डेडबॉडी नाही मिळायला अजून ? खाली गेली असलं वाहून ? लोकं शोधतायतं !' काल रात्री धरण फुटून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे (ता. चिपळूण) गावातील दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या एका बाजूच्या खोलीत दुर्घटनाग्रस्त नातेवाईकांना, सकाळी भेटायला जाताना हा संवाद कानावर पडला नि मनाला असह्य वेदना झाल्या. कालपर्यंत जी नावानंं ओळखली जात होती त्यांची आजची ओळख त्रासदायक होती. पुढे गेल्यावर त्या खोलीतील प्रत्यक्ष दृश्य जे दिसलं ते तर त्याहून विदारक होतं. त्या खोलीतले आर्त स्वर मन विस्कटून टाकत होते. प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळणारं सत्य घटनेची भयानकता सांगत होता. कुणा लहानग्या शाळकरी मुलानं डोळ्यांदेखत घरचे सारे गमावले होतं ! तर कोणी आपली दुचाकी वाचवायला म्हणून गेलेला परतलाच नव्हता. कोणी पुलावरून दुचाकी घेऊन जाताना अचानकच गायब झाला होता. कोणी जेवायला बसलेला
पुन्हा उठूच शकला नाही. गेलेल्यांच्या या साऱ्या आठवणीने जमाव अश्रू ढाळत होता. चिपळूणहून तिवरेकडे जाताना वाटेत भेटलेल्या नदीच्या दोन्ही पात्राशेजारील विस्कळीत निसर्ग, शेती, घरे, झाडे कालच्या रात्रीची तिवरेतील शोकांतिका बयाण करत होते.
photo : www.thehindu.com |
तिवरे गाव चिपळूण तालुक्याच्या पूर्व टोकाला आहे. हा भाग दुर्गम आहे. २.४५२ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे हे लघु पाटबंधारे विभागाचे धरण सन २००० साली पूर्णत्वास गेले होते. तिवरे धरण फुटीत भेंदवाडी
पाण्याखाली गेली. स्थानिकांनी या घटनेला प्रशासनालाच जबाबदार धरलेय. त्यांचा पत्रव्यवहारही तेच
बोलतोय. सरकारी कारभार लोकांच्या जीवाशी खेळल्याचे पुन्हा एकदा दिसले आहे. यातल्या
दोषींवर कारवाई होईलही ! मात्र ही घटना गेलेल्यांचे आणि मागे राहिलेल्या विस्थापितांचे
प्रश्न, नव्याने निर्माण करून राहिली आहे. ते सुटेपर्यंत तरी क्षणार्धात होत्याचं
नव्हतं करणारी कालची अमावस्या विसरणे केवळ अशक्य आहे !
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण
श्रद्धांजली !
धीरज वाटेकर
वरील लेख आपण खालील ३ माध्यमांच्या लिंकवरही पाहू शकता !
http://www.mymahanagar.com/maharashtra/ground-report-of-tiware-dam-in-ratnagiri-breached-incident/104852/
https://www.deshdoot.com/blog-tivaretil-shokantika-by-dhiraj-vatekar/
http://janmadhyam.com/archives/6008
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5157176579600668582&title=Eka%20Ratrit%20Udhvasth%20Zale%20Tivare!&SectionId=5734518039051973207&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95

साप्ताहिक चपराक पुणे दि. ८ ते १४ जुलै २०१९ |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा