शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

कोकण पर्यटन आणि डिजिटल विश्व







शंभरेक वर्षांपूर्वी कोकणची गती ही समुद्रकिनाऱ्यालगतच्या बंदरांना बिलगून होती. बंदरांतून बोटीने प्रवास चालायचा. पुढे ती गती मुंबई-गोवा हमरस्त्यावर आली. कालांतराने ती कोकण रेल्वेकडे आणि आता मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासह चिपी विमानतळाच्या माध्यमातून झेपावते आहे. जगात कालानुरूप व्यवहार्य बदल होत असतात. तसे ते कोकणातही होताहेत. ‘डिजिटल लाईफस्टाईल’ हाही असाच एक बदल आहे, तो कोकणने स्वीकारलेला दिसतो. ‘डिजिटल लाईफ’चं मूळ अधिकाधिक व्यवसायाशी निगडित आहे. त्यामुळे कोकणने ‘आमची शाखा कुठेही नाही किंवा जेवणाची काय ती एकदाच ऑर्डर द्या किंवा कोकम सरबताच्या कितीही बाटल्या घ्या, चव बदलणार नाही आणि पैसेही कमी होणार नाहीत’ या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. तरच ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेल्या ‘डिजिटल मार्केटिंग’मध्ये कोकण पर्यटनाला टिकाव धरता येईल.

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन इंटरनेट, संगणक आणि मोबाईलद्वारे आपली उत्पादने आणि सेवांचे विपणन अर्थात मार्केटिंग करणे तुलनेने गतिमान झालेले असले तरी त्याचे चांगले-वाईट परिणामही त्याच वेगाने पसरत असल्याने हे तंत्रज्ञान दुधारी शस्त्रासारखे आहे. त्यामुळे याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर व्हायला हवा आहे. कोकण पर्यटनात काम करणाऱ्या प्रत्येकाने ‘डिजिटल लाईफस्टाईल’ची आवश्यकता असलेलं ‘डिजिटल मार्केटिंग’ शिकलं पाहिजे. आपण डिजिटल युगात जगत आहोत. मे २०१९ च्या आकडेवारीनुसार जगाची लोकसंख्या ७७० कोटी असताना ४४० कोटी लोकांकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध होती. सरासरी दोन तास या प्रमाणे ३५० कोटी लोक सोशल मीडिया वापरत होते. गुगल सर्चइंजिनवर प्रत्येक सेकंदाला ४० हजाराहून अधिक सर्च यायचे. यातले ६० टक्क्याहून अधिक सर्च मोबाईलवरून व्हायचे. फेसबुकवर प्रत्येक सेकंदाला ६ नवे प्रोफाईल निर्माण होत होते. त्याच ठिकाणी ६ करोड हून अधिक अॅक्टिव्ह पेजेस होती. साधारणपणे ३०० तासांचे व्हिडिओ युट्युबवर प्रत्येक सेकंदला अपलोड होत होते. इंस्टाग्रामवर दर महिन्याला ८० करोड लोक अॅक्टिव्ह होते. ही आकडेवारी वाढत जाणारी आहे. आजचा ग्राहक डिजिटल आहे. त्यामुळे कोकणातील पर्यटन व्यावसायिकांनाही अधिकाधिक ‘डिजिटल’ व्हावे लागणार आहे. पर्यटन व्यवसायाशी थेट संबंध असलेल्या Shopping, Ticket and Room Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Job searching आदि बऱ्याच बाबी डिजिटल होत आहेत. इंटरनेटच्या या सर्वव्यापी ट्रेंडमुळे पर्यटन व्यवसायात डिजिटल मार्केटिंगचा वाटा खूप मोठा राहाणार आहे. एका अभ्यासानुसार तंत्रज्ञान वापर करणाऱ्यांपैकी ७० हून अधिक टक्के लोकं कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्याआधी ऑनलाईन, फिरायला बाहेर पडण्याआधी माहिती घेत असतात. त्यामुळे जगाच्या डिजिटल बाजारात आपली ‘कोकण’ म्हणून दमदार आणि देखणी उपस्थिती असायला हवी. डिजिटल दुनिया ही आपल्याला कोकण म्हणून ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचवते. ग्राहकांना आपल्या ब्रँडकडे आकर्षित करते. ती आपल्या पदरात अधिकाधिक लाभ पाडून घेण्यासाठी उपयुक्त आहे. कोकणातील पर्यटन निगडीत उत्पादने आणि व्यावसायिकांनी आपल्या सेवांची ऑनलाईन जाहिरात करायला हवी आहे. Video Marketing, ईमेल मार्केटिंग हीही काळाची गरज आहे. डिजिटल जमान्यात Content Marketingला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर आपल्या कोकणातील पर्यटन निगडीत व्यवसायाविषयी व्यक्त होताना पुरेशी काळजी घ्यायला हवी आहे.

आपल्या देशात इंटरनेट प्रभावी झालं तेव्हा डिजिटल मार्केटिंग काही लोकांपुरते मर्यादित होते. सोशल मिडिया प्रभावशाली झाल्यावर ते सामान्यांना खुले झालेले आहे. त्याचा नीट उपयोग करून घेणे ही कला असून ती आपण आपल्या आवश्यकतेनुसार शिकायला हवी आहे. आजही कोकणात महामार्गावर बहुतांशी हॉटेलात टिपीकल ग्रेव्हीतील चव चाखायला मिळते. अर्थात कोकणी घरगुती चव मिळत नाही असं नाही. पण ती सर्वदूर पोहोचलेली नाही, हे वास्तव आहे. कोकणात तर प्रत्येक गावची चव वेगळी आहे. पेण, रत्नागिरी, मालवण येथे टप्प्याटप्प्याने जेवणाच्या चवी बदलतात. हे पर्यटकांना कळणार कधी ? आणि कसे ? यासाठी प्रयत्न व्हायला हवे आहेत. सावंतवाडीतील लाकडी वास्तूंचे मार्केट जवळ-जवळ शंभर वर्षांपूर्वीचं आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणामुळे यातली काही दुकाने मुख्य मार्गावर दिसताहेत. ही लाकडी खेळणी जगप्रसिद्ध असली तरी अजूनही यांचं म्हणावं तितकं मार्केटिंग डिजिटल स्तरावर झालेलं नाही. चिपी एअरपोर्टच्या उद्घाटनानंतर कोकण पर्यटन आणि उद्योग क्षेत्रात भविष्यात खूप मोठे बदल होण्याची संभावना आहे. हे बदल कोकण भूमीला विकासाच्या दिशेने नेऊ शकतात. इथल्या भूमीपुत्रांची पाऊले परत कोकणात वळविण्यातही आपले योगदान देऊ शकतात. येत्या काही वर्षात साकारणारे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, जलवाहतूक, कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि राजकीय इच्छाशक्ती असल्यास रत्नागिरी विमानतळ अशा प्रयत्नातून कोकण पर्यटन बदलाच्या दिशेने जाऊ पाहाते आहे. कोणत्याही विकासाची प्रक्रिया ही स्थानिक लोकांच्या सहभागावर अवलंबून असते. त्यामुळे कोकणातील लोकांचा या प्रक्रियेतील सहभाग महत्त्वाचा आहे. तो डिजिटल असल्यास विकास प्रक्रियेला अधिक वेग घेता येईल. नियमित पर्यटन, साहसी पर्यटन, ट्रेकिंग, जंगलसफर, सह्याद्री, जैवविविधता, वाईल्डलाइफ, पक्षीनिरीक्षण, निसर्ग, बॅकवॉटर, क्रोकोडाईल सफारी, मासेमारी, कांदळवन, सागरसफर, गड, किल्ले, कोकणी हेरिटेज यांसह भविष्यात योगा, मेडिटेशन, मेडिकल टुरिझम, वॉटरपार्क, थीमपार्क आणि सर्वात महत्वाचे एरोस्पोर्ट्स आणि हेलिकॉप्टर राईड सारखे पर्यटनातील वैविध्य जपणारे प्रकल्प कोकणात सक्रीय करत त्याचे डिजिटल मार्केटिंग करून कितीतरी समृद्धी आणणे शक्य आहे. अर्थात पायाभूत सुविधा हा कळीचा मुद्दा काळजीपूर्वक सांभाळला जायलाच हवा ! आपल्या देशात आजही पाच दिवसांचा आठवडा असं वर्क कल्चर नाही. सुट्ट्या अधिक असल्या तरी त्या आम्हाला पुरात नाहीत. कामचुकार वृत्तीमुळे आमच्याकडे त्याचे नीटसे नियोजन नाही. आपल्याकडे कार्यालयीन वेळेनंतर खाजगी आयुष्य जगायची पद्धत कमी आहे. यामुळेच कोकणात किती टक्के लोकं ‘सेकंड होम’ एन्जॉय करतात हे अभ्यासायला हवं आहे. याचा प्रभाव वाढविण्यासाठी आम्हाला डिजिटल सक्षम व्हावे लागेल. आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने डिजिटल जाहिरातीतून आपल्याकडे येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये कोकण दिसायला हवे. काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसते. पण तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? इथे अजून डिजिटल मार्केटिंग हवे आहे.

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होण्यासाठी आम्हाला कोकण पर्यटन महाराष्ट्राबाहेर न्यावे लागेल. डिजिटल प्लॅटफॉर्म इथे उपयोगी पडेल, पडतो आहे. त्याचे प्रमाण वाढायला हवे आहे. त्यासाठी आम्हा कोकणी व्यावसायिकांची डिजिटल दृष्टी विकसित व्हायला हवी. एकत्रित कोकण पर्यटनाच्या मार्केटिंगवर शासकीय किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निधी खर्ची पडायला हवा आहे. चिपळूणच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारीसाठी आम्ही ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेडच्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या. डेस्टिनेशन चिपळूणसर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. डिजिटल माध्यमांचाही उपयोग करून घेतला. पण सतत याला येणारा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहिला. डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी निधी लागणार आहे. कोकणातील ज्या गावाचे ब्रँडिंग होईल त्या गावाने डिजिटल खर्चाचा भार उचलायला हवा. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करायला हवी किंवा असलेली यंत्रणा हाताशी घ्यायला हवी. 

कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्य ताकद आहे. यामुळे कोकणातील समुद्रकिनारे स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे. देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारने पाहायला हवे आहे. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं डिजिटल मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

    कोरोना पश्चात अख्खं जग रिव्हेंज (रिस्क) टुरिझमसाठी तयार झाले आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकणही यासाठी तयार आहे. शासनाने कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ या इथल्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोकणातलं कौलारु घर, निसर्गानं बहरलेला परिसर, आंब्या-फणसाची, माड-पोफळीच्या बागा, शेणानं सारवलेलं अंगण, माड-पोफळींच्या झावळ्यांचा अंगणातला मंडप, घराच्या मागे किंवा पुढे झुळूझुळू वाहणारा पाण्याचा पाट हा कोकणी थाट इकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाच्या हृदयात उतरायला हवा आहे. शेणानं सारवलेलं अंगण वाळल्यावर त्या ठिकाणी घराच्या गृहिणीने फक्त पांढऱ्या रंगाने काढलेली रांगोळी किती सुबक आणि सुंदर दिसते ? हे अजून कितीकाळ शब्दातच सांगायचं ? कोकण पर्यटनातील सर्व उद्योग, पर्यटन सुविधा आदिंची माहिती एका क्लिकवर आणण्यासाठी सोशल मिडीयावर शेकाडोनी ग्रुप्स कार्यरत आहेत. यांद्वारे जमा होणारा ‘डेटा’ ही आजच्या ‘डिजिटल लाईफ’मध्ये सर्वात मोठ्या संपत्ती प्रमाणे आहे. तिचा उपयोग ‘कोकण पर्यटन’ म्हणून काळजीपूर्वक व्हायला हवा आहे. कोकणी पर्यटनात काम करणारा प्रत्येक व्यावसायिक आपल्या एकूण मिळकतीतील किती टक्के वाटा डिजिटल मार्केटिंगवर खर्च करतो ? हे फार महत्त्वाचे आहे. व्यवसायासाठी हा खर्च व्हायला हवा आहे. डिजिटल जीवन शैलीतील माध्यमांचा सर्वोत्तम उपयोग करून कोकण पर्यटन वृद्धी शक्य आहे.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८,

dheerajwatekar@gmail.com

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

गोसंस्कृती संवर्धनाने एका शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ

 



कोकणातील एका शाळेने वसुबारस पूर्वदिनी (३१ ऑक्टोबर २०२१) ‘आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग’ करत आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ शाळेच्या विद्यार्थ्यांचे वास्तव्य असलेल्या पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांवरील पन्नास गोपालकांच्या घरी जाऊन गोवत्सपूजनाने केला. ‘गौ विश्वस्य मातरम्’ म्हणणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीचे सादरीकरण या निमित्ताने घडले. एखाद्या शाळेने आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभासाठी गो संस्कृती संवर्धनासारख्या संकल्पनेचा आधार घेणे आणि त्यातून विद्यार्थ्यांसह लोकशिक्षण घडविणे ही गोष्ट अनेक अर्थाने महत्वाची आहे.









रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या कोयना जलविद्युत प्रकल्प परिसरातील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर विद्यालय (पूर्वीचे अलोरे हायस्कूल अलोरे) आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालयात संस्थाध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आणि कोळकेवाडी धरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक गायकवाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जलपूजन, दीपप्रज्ज्वलन, भगवान श्रीपरशुराम पूजन, गो-पूजन आणि शाळेचा सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ म्हणून घंटेचे ५० टोल देऊन मानवी मनाला भारावून टाकणाऱ्या वातावरणात मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर पन्नास ठिकाणी गोवत्स पूजनाचे कार्यक्रम पार पडले. या शाळेची स्थापना १९७२ साली झाली. मोरेश्वर आत्माराम आगवेकर हे या शाळेला प्रदीर्घकाळ लाभलेले पहिले मुख्याध्यापक. त्यांच्याच काळात शाळेने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. त्यावर यशाचा कळस चढविण्याचे काम वर्तमान पिढी करते आहे.  











शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षारंभवेळी कोरोना काळातील गर्दी टाळण्याची नियमावली लक्षात घेऊन काहीतरी वेगळा कार्यक्रम करायला हवा याची पक्की जाणीव असलेल्या शाळेच्या ‘थिंक टंक’ने हा आगळावेगळा उपक्रम घडवून आणला. यासाठी पंचक्रोशीत सर्वेक्षण करण्यात आले. कोरोनाकालीन नियम पाळत शाळेतील मुलांच्या घरात जाऊन सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ करता येईल का ? या विचारातून आणि पुढील पन्नास वर्षांच्या चिंतनातून शाळेने सुवर्णमहोत्सवी वर्षारंभासाठी हा कार्यक्रम निश्चित केला. वसुबारसला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला आणि बहुला या पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातील नंदा धेनूस उद्देशून वसुबारस साजरी होते. शाळेच्या प्रतिनिधींनी केलेल्या सर्वेक्षणात गायीच्या दुधावर अवलंबून असलेल्या वासरांची संख्याही ५० मिळाली. पंचक्रोशीत १३० ठिकाणी पाळलेली गाय आहे. मोठं कुटुंब असलेल्या घरातच गायींचे पालनपोषण होत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून पुढे आली. या कार्यक्रमामुळे सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या शाळेच्या वर्तमान पिढीतील कर्मचाऱ्यांचं गावाशी नातं निर्माण झालं. या उपक्रमाद्वारे भविष्यात दरवर्षी किमान काही ठिकाणी गाईच्या पूजनाची व्यवस्था निर्माण होऊ शकते, असा विश्वास मिळाला.










प्रत्यक्ष कार्यक्रम पंचक्रोशीतील अलोरे, कुंभार्ली, खडपोली, शिरगाव, नागावे, पेढांबे, कोळकेवाडी आदी गावांतील वाड्या-वस्त्यांवर संपन्न झाला. प्रत्येक गोपालकाला साखर, तांदुळ, हरभरा, मुगडाळ, गजराज पेंड, जलसंजिवनी पाकीट आदी शिधा साहित्य तसेच सन्मानार्थ चादर, टॉवेल / पंचा, टोपी, खण, सुपारी, ग्रीन टीशर्ट, शाळेची नामकरण सोहोळा स्मरणिका, सुवर्णमहोत्सवी ‘नंदादीप’ आवाहनपत्रक आदी साहित्य शाळेचा सुवर्णमहोत्सवी लोगो असलेल्या कापडी पिशवीतून भेट देण्यात आले. शाळेचे शिक्षक विविध पन्नास स्थानांवर पोहोचले तेव्हाचा स्थानिकांचा प्रतिसाद आणि त्यांच्या भावना विलक्षण समाधानकारक होत्या. आयुष्याची नव्वदी पार केलेल्यांचा उत्साह दखलपात्र होता. प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी आणि आजूबाजूला गोवत्सपूजनाची आतुरता आणि उत्साह दिसून येत होता. आपली शाळा आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुरुवात आपल्या दारातून करतेय याचा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावर झळकत होता. गोपालकांनी आपले गाय आणि वासरु स्वच्छ धुऊन घराच्या पडवीत बांधले होते. गाईसाठी नैवेद्य तयार केलेला होता. वाडी-वस्त्यांवर गेलेल्या शिक्षकांनी त्या-त्या ठिकाणी गोवत्सपूजन केले. शाळेच्या प्रतिनिधींनी वाडी-वस्तीवार आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदी समुदायाला एकत्रित करून आपल्या जीवनातील गाईचे महत्व, वैज्ञानिक दृष्टिकोन, तिच्या पंचतत्वांचा आरोग्याला आणि शेतीला होणारा फायदा याची माहिती दिली.











          दोन वर्षांपूर्वी शाळेने आपल्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बीज संकलनाची मोहिम हाती घेतली होती. तेव्हा शाळेला ‘हरिक’ नावाच्या भाताच्या एका जातीचं बीज गवसलं होतं. शाळेने ते बीयाणे जाणीवपूर्वक भातांच्या विविध जातींचे संकलन करणाऱ्या पालघर येथील संस्थेत पाठविले होते. या कार्यक्रमानंतर शाळेच्या कोणत्याही उपक्रमाला लागेल ती मदत करण्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्रामस्थांनी दिलेली ग्वाही या उपक्रमाची यशस्विता सांगून गेली. शाळेचे ‘कल्पक’ मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या कार्यक्रमाच्या काटेकोर नियोजनातील परिश्रम कौतुकास्पद होते.

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८. 










गोपालाकांना देण्यात आलेला शिधा सन्मान

गोपालक श्री. व सौ. वीर यांना शिधा देताना 
संस्थाध्यक्ष आणि निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत 

शाळेचा सुवर्ण महोत्सवी शुभारंभ प्रसंगी शाळेच्या 
प्रवेशद्वारावर गोपूजन करताना मान्यवर.

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

‘मालदोली हेरीटेज’ आता वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ !


दैनिक सकाळ रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१

दैनिक सकाळ रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१

दैनिक नवराष्ट्र रत्नागिरी २३ ऑक्टोबर २०२१


कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (दिनांक २४) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. आनंदाश्रम वास्तू प्रकल्पाचे सायंकाळी ४ वाजता उद्घाटन होणार आहे. मानवी जीवनातला शेवटचा टप्पा वृद्धांना आनंदी जगता यावा यासाठी विश्व हिंदू परिषदेने हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेला १९८५ साली ही वास्तू मराठे कुटुंबियांकडून देणगी स्वरुपात प्राप्त झाली होती. या वास्तूत विश्व हिंदू परिषदेने यापूर्वी 20 वर्षे आरोग्य प्रकल्प चालवला होता. त्याला जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला होता. त्यानंतर येथे संगणक प्रशिक्षण, फिरते वाचनालय राबविण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर एका हेरीटेज वास्तूत सुरु होत असलेल्या ज्येष्ठांच्या या प्रकल्पाला विशेष महत्त्व आहे.


येथील साडेसात एकर जागेत अंदाजे २ हजार चौ. फूट आकाराची ही भव्य वास्तू उभी आहे. वास्तूचा मुख्य दरवाजापासून अगदी पाठीमागील दरवाजापर्यंत सरळ रेषेत मोकळी जागा ठेवण्यात आली असून (कॉरिडॉर) त्याच्या दोनही बाजूला वास्तूतील खोल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर मोठा हॉल आहे. वास्तूच्या आतून आणि बाहेरून पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी लाकडाचे स्वतंत्र दोन जीने आहेत. उंचीवरील जीने चढताना कोणाही ज्येष्ठ नागरिकाला आधाराची गरज पडणार नाही वा तो चढताना दमणार नाही यानुसार या जीन्याची तंत्रशुद्ध रचना साकारण्यात आली आहे. जीना पाहिल्यानंतर या वास्तूच्या शास्त्रीय व अभ्यासपूर्ण उभारणीची सहज कल्पना येते. वास्तूतील काही खोल्या गरजेप्रमाणे एकमेकांना जोडल्या आहेत. जेवणासाठी लागणारे मसाल्याचे मिश्रण बनविण्यासाठी, मिक्सर नसलेल्या काळातील घडीव पाटायेथे आहे. पाण्यासाठी विहीर तसेच पाठीमागील बाजूकडील डोंगरात असलेल्या झऱ्यांचे पाणी विशिष्ठ उंचीवर १० बाय २० फूट आकाराचे मोठाले टाके बांधून साठविण्यात आले आहे. वास्तूतील वीस खोल्यांना प्रत्येकी  दोन दरवाजे, दोन खिडक्या, भिंतीतील दोन कपाटे आहेत. खिडक्यांना चार झडपा आहेत. यामुळे शास्त्रीयदृष्ट्या दिवसा आवश्यक असणारा चौफेर सूर्यप्रकाश वास्तूतील प्रत्येक खोलीत उपलब्ध होतो. सायंकाळी किमान सात वाजेपर्यंत वास्तूला वीजेची आवश्यकता भासत नाही. प्रत्येक दरवाज्याला व्हेंटीलेटर्सची रचना आहे. कौलारू बांधणीच्या या वास्तूतील आतील छताच्या रीपांचा भाग वास्तुसौन्दर्याचा विचार करून फळ्या मारून बंद करण्यात आला आहे. ज्यामुळे पावसाळ्यातील छोट्याश्या किरकोळ लिकेजपासून सुटका होते आहे. कौले बदलावयाची असल्यास छतावर चढून बदलावी लागतात, आजच्या काळात हे काम आपणास जिकीरीचे वाटत असले तरीही त्या काळात हे अवघड वाटणारे काम सहज करण्याचे कौशल्य आणि क्षमता असणारी माणसे असतं, हे यातून आपणास प्रतीत होते. छताच्या लगीआजही मजबूत आहेत. वास्तूत पहिल्या मजल्याच्यावर पोटमाळा आहे. या वास्तूतील खोल्यांच्या सर्व दरवाजे-खिडक्या उघडल्या तर त्या बंद करायला किमान ३० मिनिटांचा अवधी लागतो.  

वास्तूच्या परिसरात १७५ आंब्याच्या झाडांच्या साधारणत: तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी (खूप सुंदर वास असलेले रानटी फुल) झाड लावलेले आहे. या फुलझाडांना फारसे व्यापारी मूल्य नाही. मात्र शेतकऱ्याला आपल्या फळबागेतून भरघोस उत्पन्न हवे असते. त्यासाठी भरपूर पीक यायला हवे, याकरिता वनस्पती शास्त्रानुसार भरपूर परागीकरण व्हायला हवे. परागीकरण होण्याकरिता कीटक भरपूर यायला हवेत. कीटकांना सुगंध हवा आहे. स्त्रीकेसर आणि पुंकेसर एकत्र येवून भरपूर परागीकरण व्हावे, म्हणून या सुगंधी झाडांची रचना येथे आहे. हे सारे नियोजन करणारा मनुष्य हा शेतीतील प्रचंड जाणकार असावा. आज यातील सर्व झाडे पाहण्यास मिळत नाहीत. पण अंदाज येऊ शकेल इतकी ४० फूट उंच सोनचाफा आदि झाडे येथे आहेत. कोकम, फणस, काजू, औषधी गुणधर्म असणारी चवई केळी, साग आदि झाडे परिसरात आहेत. झाडांकरिता चिरेबंदी पाटाच्या माध्यमातून, घराच्या वापरातून बाहेर पडणाऱ्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या हेरिटेज वास्तूच्या नकाशाचे आरेखन आणि संपूर्ण कामाचे नियोजन हे विश्वविख्यात अभियंता भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी पुण्यातील मित्र आणि पोलिस खात्यातील वरीष्ठ अधिकारी रामचंद्र वासुदेव मराठे यांच्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रिखातर केले होते, मागील 2-3 पिढ्यांपासून अशी मौखिक माहिती या वास्तू संबंधात आहे. याबाबतचा कोणताही लेखी पुरावा उपलब्ध नाही. मात्र शंभर वर्षांपूर्वी कोकणातल्या खाडीकिनारी वसलेल्या गावात अशा प्रकारची देखणी, भव्यदिव्य वास्तू उभारली जाणे आणि आज वयाच्या शंभरीतही ती वास्तू जशीच्या तशी उभी असलेली पाहायला मिळणे, यात अभियांत्रिकी कसब आहे आणि डॉ. विश्वेश्वरय्या हे मराठे यांचे पुण्यात असताना मित्र असल्याची माहिती विचारात घेता यात तथ्य असावे. प्रत्यक्ष वास्तू पाहिल्यानंतर हे सामान्य बुद्धिमततेचे काम नाही, हे आपल्याला स्पष्ट जाणवते. हे वास्तूवैभव शंभर वर्षांपूर्वी मालदोली भागात कसे उभारले ? हे एक आश्‍चर्य आहे.  

नव्या ‘आनंदाश्रम’ प्रकल्पानुसार ही वास्तू वृद्धांसाठीचे हक्काचे व आपुलकीचे घर असणार आहे. सध्या सुरुवातीच्या टप्प्यात येथे दहा वृद्ध स्त्री-पुरुषांची कायम वास्तव्याची सोय सशुल्क पद्धतीने करण्यात येणार आहे. आठवड्यातून दोन वेळा डॉक्टर तपासणी होणार असून अचानक उद्भवलेल्या अणीबाणीच्या प्रसंगी अगर मेडिकल इमर्जन्सी च्या वेळी लागणारी वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येत आहे. तसेच कोणा घरचे लोक पर्यटन सहल वा अन्य कामासाठी बाहेर जाणार असतील व त्यांचे सोबत वृद्धांना नेणे शक्य नसेल तर अशा वृद्धांना मालदोली आनंदाश्रमात ठेवण्याची सशुल्क व्यवस्था करण्यात येणार आहे. हा वृद्धाश्रम असला तरी तो आनंदाश्रम वाटावा या करीता पर्यटन माध्यमातून पर्यटकांची सोयही आगाऊ नोंदणी पद्धतीने येथे होणार आहे. संपूर्ण शाकाहारी पद्धतीचे भोजन, चहा, नाश्ता, दुपारचे वेळी अल्प आहार, सणासुदीला गोडधोड खाणे अशा प्रकारची व्यवस्था करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. लोकांना आपले आनंदाचे क्षण, वाढदिवस या ठिकाणी करता येतील. ‘आनंदाश्रम’ मालदोली येथे चिपळूण ते मालदोली एसटी बसचा थांबा मंजूर होणार आहे. चिपळूणहून गणेशखिंड-वैजी-भोम-कापरेमार्गे, करंबवणेफाटा-धामेलीमार्गे आणि करंबवणे मार्गे मालदोलीला तासाभरात पोहोचता येते. सध्या वास्तूत सुसज्ज स्वयंपाकघर उभारण्यात आलेले आहे. सध्या तळमजल्यावरील खोल्यांत एका खोलीत दोन याप्रमाणे १० जणांची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येकासाठी मच्छरदाणीसह कॉट, बेडशीट, उशी, फॅन आदी व्यवस्था आहे. वृद्धांना दोन्ही वेळचे गरमगरम भोजन, एक हेवी वॉशिंगमशीन, एक वॉटर प्युरिफायर, आंघोळीच्या गरम पाण्यासह सुसज्ज बाथरूम, कमोड पद्धतीचे संडास आदी सुविधा पुरविण्यात येत आहेत. वृद्धांना चालण्या-फिरण्यासाठी योग्य परिसराची निर्मिती करण्यात आली आहे.

उद्घाटनाच्या निमित्ताने वास्तूत सकाळी सत्यनारायणाची महापूजा संपन्न होणार आहे. यानिमित्त संपूर्ण गावाला तीर्थप्रसादाचे आमंत्रण आहे. सत्यनारायणाची पूजा स्थानिक ग्रामस्थाच्या हस्ते होईल. सायंकाळी ४ ते ७या वेळेत विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांतमंत्री रामचंद्र रामुका यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन होईल. उद्घाटन कार्यक्रम किचनची फीत कापून संपन्न होईल. त्यानंतर दीपप्रज्ज्वलन आणि श्रीअन्नपूर्णा देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जाईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम आणि कोकण प्रांताचे व्यवस्थाप्रमुख जयंत दांडेकर उपस्थित असणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी असंख्य कार्यकर्ते गेली दोन वर्षे मेहनत घेत आहेत. या प्रकल्पासंदर्भातील अधिक माहितीसाठी आपण प्रकल्प व्यवस्थापन समितीतील प्रकाश साठे (०९६५७३४५०५६), श्रीकांत बापट (०९४२१२३२५०१), दीपक भाटीया (०९८२२१६०८९१), बाळकृष्ण चव्हाण (०९४०५७५५८९८), वसुधा नामजोशी (०९७३०२४६६१८) यांच्याशी संवाद साधू शकता. स्वतंत्र खोल्यांची रचना, भरपूर पाणी, निसर्गरम्य परिसर, डांबरी रस्त्यापासून अगदीजवळ, दूरचित्रवाणी, मनोरंजन आणि खेळ या करिता वास्तूच्या चौफेर जागा आहे. गावात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे या वास्तूत उत्तम वृद्धाश्रम साकारू शकतो, असा विश्वस्थांना असलेला विश्वास आज सत्यात उतरतो आहे.


कोकणात अशा ‘हेरीटेज वास्तू’ गावागावात पाहायला मिळतील. या वास्तूंना सध्याच्या २४ तासांच्या टेलीव्हिजनच्या दुनियेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे कोकणातल्या गावागावातील अशा वास्तूंचे गाव पातळीवर संवर्धन व्हायला हवे आहे. त्यासाठी सर्व संबंधितानी पुढाकार घ्ययला हवा आहे.असाच पुढाकार मालदोलीतील वास्तूसंदर्भात १९८५ साली घेतला गेल्याने आज आपणाला ही वास्तू वेगळ्या स्वरुपात पाहायला मिळते आहे. अशा कोकणातील सर्वच वास्तू पाहायला मिळाल्या तर ते कोकणचे सांस्कृतिक वैभव ठरेल. या वास्तूंना टेलीव्हिजनच्या दुनियेत असलेली मागणी पाहाता कोकणातल्या अशा शंभर वर्षांपूर्वीच्या वास्तूंच्या एकत्रित नोंदी व्हायला हव्यात. यासाठी ‘मालदोली हेरीटेज’ने केलेला उपक्रम पथदीप ठरावा, यासाठी शुभेच्छा !   

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

dheerajwatekar@gmail.com



या हेरीटेज वास्तू संदर्भातील आमचे अन्य ब्लॉगलेख वाचण्यासाठी कृपया लिंक क्लिक करा.

https://dheerajwatekar.blogspot.com/2016/09/blog-post_14.html

https://dheerajwatekar.blogspot.com/2018/09/blog-post_16.html

मन:पूर्वक धन्यवाद.

रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन !


कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (२७ सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्यावर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अॅन्ड वॉचवर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन २०५० पर्यंत जगातील ६८ टक्के लोकसंख्या शहरीभागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात ग्रामीण डेस्टीनेशन्सना मोठ्या संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनचीयंदाच्या पर्यटन दिनाची मध्यवर्ती संकल्पना सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन (Tourism for Inclusive Growth) अशी आहे. कोरोनोत्तर काळात ग्रामीण डेस्टीनेशन्सना मोठ्या संधींचा कोकण संदर्भात विचार करताना आपल्याला विकासासाठी हव्या असलेल्या सर्वसमावेशक कोकण पर्यटनाचा विचार करावा लागेल.

लोकांपर्यंत पर्यटनाचे महत्त्व पोहोचवणे, विविध पर्यटन स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक मूल्यांच्या माहितीचे आदानप्रदान करणे यासाठी १९८० सालापासून आपल्याकडे पर्यटन दिन साजरा होतो आहे. अलिकडे आपल्या देशाने जबाबदार प्रवासी (Responsible Traveler) बनविण्याचे लक्ष ठेवले असून त्या पार्श्वभूमीवर इको टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया (ESOI) चे रिस्पॉन्सिबल टूरिझम सोसायटी ऑफ इंडिया असे नामकरण करण्यात आले आहे. ग्रामीण पर्यटनातील संभाव्य संधींचा विचार करता कोकणसह महाराष्ट्रासाठी कोरोनोत्तर काळ सुवर्णकाळठरू शकणार आहे. परदेशी पर्यटनात सर्वांत जास्त सहभाग हा ६०पेक्षा अधिक वय असलेल्यांचा असतो. कोरोनाने त्यांचा आत्मविश्वास कमी केला आहे. देशांतर्गतही अधिक दिवस फिरणारे लोकं ३/४ दिवसांच्या पर्यायांचा विचार करतील, असा अंदाज आहे. कोकणसाठी राज्य सरकारने नुकतीच ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या मुंबई-सिंधुदुर्ग ह्या ४०० किमीच्या ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) प्रकल्प घोषणा केली. याद्वारे वरळी (मुंबई) उन्नत मार्गावरून साडेतीन तासात मनुष्य सिंधुदुर्गला पोहोचेल अशी संकल्पना आहे. या प्रकल्पाचा आराखडा (डीपीआर) आणि सर्वेक्षण काम सुरु झाले असताना वकील ओवेस पेचकर यांनी हा प्रश्न मुमाबी उच्च न्यायालयात उपस्थित केल्यानंतर ‘मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्प पूर्ण करत नाही, तोवर आम्ही तुम्हाला दुसरा प्रकल्प सुरू करू देणार नाही,’ असं उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला सुनावले आहे. पर्यटकांची वर्तमान मानसिकता पुरेसी कॅश करण्यासाठी कोकणचं कोकणीपण टिकायला हवं आहे. असं असताना कोकणात ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या नावाखाली गेली अनेक वर्षे काय सुरु आहे ? याची जाणीव आम्हाला जुलै महिन्यातील अतिवृष्टीने करून दिली आहे. तरीही अशा महामार्गांसाठी आम्ही अजून किती वृक्षतोड करणार आहोत ? किती निसर्गहानी करणार आहोत ? आणि विकासाचे अनेक मुद्दे बाजूला ठेवून अशा महामार्गाची कोकणला खरंच गरज आहे का ? हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. निसर्गसमृद्ध कोकणवर आपण ‘ग्रीन’ नावाने रिफायनरी लादतोय. कोकणच्या समुद्रकिनाऱ्यासह इथल्या जंगलांमध्येही अतिक्रमण करून बंगले बांधले गेलेत. बेसुमार वृक्षतोडीमुळे इथल्या पर्यावरण प्रेमींना सातत्याने, ‘सह्याद्री वाचवा’ म्हणत आवाज उठवावा लागतोय. तरीही लोकप्रतिनिधी कोकणाचा पर्यटन विकास होत असल्याचे सांगत असतात. हा सारा विरोधाभास वाटावा अशी स्थिती आहे.

एकीकडे सरकारचे पर्यटन धोरण हे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असेच असायला हवे. तर दुसरीकडे आपली संस्कृती अतिथी देवो भवम्हणत असल्याने आम्ही स्थानिकांनी येणाऱ्या पर्यटकाला अवाच्या सव्वा किमती सांगून भांबावून सोडणे थांबवायला हवे. यासाठी यंत्रणा कार्यरत व्हायला हव्यात. आरोग्य पर्यटनसारख्या विषयात केरळ, तामिळनाडू ही राज्ये आघाडीवर आहेत. नैसर्गिक संधी असताना आपण कधी यात पुढाकार घेणार ? यासाठी शासन धोरण काय आहे ? भारतातील अनेक नामांकित पर्यटन कंपन्यांच्या टूरलिस्टमध्ये आजही कोकण दिसत नाही. अपवादात्मक काही कंपन्यांच्या लिस्टमध्ये तारकर्ली (स्नॉर्कलिंग) आणि गणपतीपुळे दिसू लागलंय. यातल्या तारकर्लीला २०११ साली आदरातिथ्यात देशात पहिला क्रमांक मिळाला होता. २०१५ साली तारकर्लीचा देशातील सर्वोत्कृष्ट सागरी किनारा म्हणून सन्मान झाला होता. असं असलं तरी तारकर्लीतील पर्यटन व्यवसाय हंगाम ६ ते ८ महिन्यांचा आहे. याकडे आम्ही कसे पाहातो ? हे फार महत्वाचे आहे. कोकणात ठिकठिकाणी पर्यटन संस्था आणि संघ कार्यरत आहे. शासनाने यांना विश्वासात घ्यायला हवे आहे. त्यांच्याकडे ‘कोकण पर्यटन’ म्हणून काही जबाबदाऱ्या सोपवायला हव्या आहेत. जगभरातील पर्यटकाचा कोकण विषयक दृष्टीकोन नकारार्थी होणार नाही याची काळजी घेणारं वृत्तलेखन आणि वार्तांकन होण्यादृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. ‘कोकणात फिरताना पर्यटकांनी कचरा हा कचरा पेटीत टाकावा. पर्यटनस्थळाच्या पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, असे वर्तन असावे. ऐतिहासिक पर्यटनस्थळी आपली नावे लिहिण्याचा मोह टाळावा. तीर्थक्षेत्री अस्वच्छता टाळावी. स्थानिक संस्कृतीची चेष्टा करू नये’, यांसारख्या विषयांवर वेळ देऊन काम व्हायला हवं आहे. यासाठी शासनाच्या सहकार्याची आवश्यकता आहे. कोकणी माणसे पर्यटन साक्षर व्हायला हवी आहेत. गुहागर, आरेवारे, कुणकेश्वर, तारकर्ली, वर्सोली, दिवेआगर, केळवा आणि बोर्डी येथे बीचशॅक्स सारख्या नव्याने जन्माला येणाऱ्या संकल्पनांना आम्ही थेट गोव्याशी जोडण्यापूर्वी त्यांची कोकणातील मांडणी स्पष्ट करायला हवी आहे. अन्यथा कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर झावळीच्या झोपड्यांमधील बीचशॅकम्हणजे मुली-बाळी निवांत फिरू न शकणारे, कोकणच्या मूळ संस्कृतीला बाधा आणणारे पर्यटन अशी त्यांची ओळख बनेल. कदाचित ती अधिक त्रासदायक ठरेल.

कोकणच्या सागर किनाऱ्यावरून मुंबई ते गोवा जाणाऱ्या देशातील पहिल्या लक्झरियस क्रुज सेवेला कोकणात थांबा नाही आहे. जलवाहतुकीद्वारे पर्यटन सेवेत असलेल्या कोर्डेलिया क्रूझया कंपनीशी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी)करार केला आहे. या पार्श्वभूमीवर कोकणात क्रूझ टर्मिनलची आवश्यकता असणार आहे. पर्यटनाच्या या नव्या आयामाला शुभेच्छा देताना याच कोकणातल्या दाभोळ बंदराची माहिती घ्यायला हवी आहे. दाभोळ ते गोवळकोट (चिपळूण) बंदरांचे अंतर ३० नॉटिकल मैल अर्थात ४४ कि.मी. आहे. चिपळूणची ही वाशिष्ठी नदी ज्या दाभोळ खाडीला जाऊन मिळते ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वाधिक प्राचीन, शक्तिशाली बंदर आहे. दिनांक २६ जानेवारी १९३७ ला जगातील सर्वात नामांकित नौकायानतज्ञ डच लोकांनी या बंदराची पाहाणी केली होती. भारतातील सर्वात सुरक्षित बंदर म्हणून असलेला उल्लेख त्यांनीही मान्य केला होता. १०८ फूट खोल, २५ मैल लांब या खाडीत एकावेळी २/३ टनाच्या किमान १०० कार्गोज उभ्या राहू शकतात. सन १९५० पर्यंत गत ३०० वर्षांत ही निरीक्षणे अनेकांनी नोंदवलीत. त्यावेळी मुंबई-न्हावाशेवा जन्मली नव्हती. सन १८०८ साली अमेरिकेतील बोस्टन येथे प्रसिद्ध झालेल्या विश्व गॅझेटिअरमध्येही दाभोळ संदर्भात अनेक वैशिष्ट्यपूर्ण ओळी आहेत. इतक्या नैसर्गिक नोंदी उपलब्ध असताना आम्ही निसर्ग ह्रासाचे प्रकल्प कोकणात का आणतो ? वर्षा ऋतूतील कोकणी निसर्ग आणि धबधब्यांविषयी चर्चा करताना ही स्थळे पर्यटक कुटुंबियांना पर्यटनासाठी सुरक्षित वाटायला हवीत. मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तिथे असे भव्य प्रकल्प असणे काही गैर नव्हे ! मात्र एकट्या मुंबईवर आपण प्रकल्पांचा अजून किती ताण देणार आहोत ? आणि मुंबईच्या शेजारी असलेल्या कोकणाकडे ममत्वाने कधी पाहाणार आहोत ?

कोकण पर्यटनासाठी मुंबई, पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून येणारे पर्यटक आपणहून आपली टूर प्लॅन करतात. स्वतःच्या गाड्या काढतात किंवा एखादी  टेम्पो ट्रॅव्हलर ठरवतात. समुद्रकिनाऱ्याचे हॉटेल बघतात. दिवसा भ्रमंती करतात. रात्रीच्या निवांतपणासाठी मद्यपानाला जवळ करतात. आजही अशी कोकण सहल होते. तिकडे कोकणच्या दक्षिणेकडे अनेक नामवंत आणि नवोदित टूर कंपन्या, टूर मॅनेजर्स हे हॉटेल बुकिंगसह पाहाण्याच्या प्रेक्षणीय स्थळांचे प्लॅनिंग पर्यटकांना देतात. त्या त्या ठिकाणचे गाडी चालक पर्यटकांना पिकअप करून प्लॅनिंगप्रमाणे टूर घडवतात. हे कोकणात होत का नाही ? आम्ही कोकण पर्यटनाचं मार्केटिंग कधी करणार आहोत ? याचा खर्च कोणी करायचा ? मध्यंतरी चिपळूणच्या ‘बॅकवॉटर फेस्टिव्हल आणि क्रोकोडाईल सफारी’साठी आम्ही ‘ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टीपर्पज को. ऑप. सोसायटी लिमिटेड’च्या सहकाऱ्यांनी अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात प्रेस कॉन्फरन्स केल्या होत्या. ‘डेस्टिनेशन चिपळूण’ सर्वदूर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. पण सतत याचा खर्च कोण करणार ? हा मुद्दा प्रलंबित राहातो. एका अंदाजानुसार पर्यटन व्यवसायातील ८० टक्के व्यवसाय हा जाहिरातीवर अवलंबून असतो. तर एकूण पर्यटन व्यवसायातील २०टक्के भाग जाहिरातीवर खर्च केला जातो. कोकणात आमच्या व्यावसायिकांकडून हेही होत असेल का ? प्रश्न आहे. कोकणात राहण्याच्या चांगल्या व्यवस्था आहेत. कोणत्याही आर्थिक पातळीतला पर्यटक येथे आला तर त्याला सेवा मिळू शकेल असे वातावरण आहे. समुद्र ही कोकण पर्यटनाची मुख्यताकद आहे. यामुळे कोकणातीलसमुद्रकिनारे स्वच्छ आहेत का ? पाहावे लागेल. नसल्यास ते स्वच्छ ठेवावे लागतील. कोकणात पर्यटनस्थळी स्थानिकांनी घरांना होम स्टे केलं आहे. कोकणातील महिला येणाऱ्या पर्यटकांना रुचकर जेऊ घालत असतात. कोकणात काही ठिकाणी अॅडव्हेंचर स्पोर्ट्स, काही ठिकाणी डॉल्फिन दर्शन, उंटगाडी, घोडागाडी सुरु असते. पण हे पुरेसे नाही. कोकणचे केरळ, राजस्थानसारखे मार्केटिंग व्हायला हवे आहे. कारण पर्यटक येऊन पाहतात त्यापेक्षा प्रचंड कोकण हे पर्यटनासाठी वाट पाहते आहे. कोकणला आम्हाला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणावे लागणार आहे.

देशात आणि जगात जिथे सर्वाधिक पर्यटक जातो तिथे तिथे आपल्याला प्लॅन्ड टुरिझम चालताना दिसते. दुबईसारखे ओसाड वाळवंट आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनते. कारण तिथे आपल्याला थीम्सभेटतात. कोकणात असे निसर्ग आणि समुद्राशी निगडित थीमबेस्ड काम व्हायला हवे आहे. कोकणात अशा पायाभूत आणि नैसर्गिक विकासाकडे सरकारचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. रत्नागिरीसह सिंधुदूर्गात स्कुबा डायव्हिंग सुरु झाले आहे. तिथेही, ‘फार कमी वेळ मिळतो. समुद्र अस्वच्छ आहे’ अशा पर्यटकांच्या तक्रारी ऐकू येतात. यावर आम्हाला उपाय शोधावा लागेल. कोकणाचे सौंदर्य कॅश करण्यासाठी अनेक चित्रपट निर्माते इथे येऊ लागलेत. या साऱ्यांचे डॉक्युमेंटेशन व्हायला हवंय. मुळात कमी बजेट असणार्‍या फिल्म्स करणे ही मोठी कसरत आहे. कोकणात मॅनपॉवर, व्यवस्थापन, जेवणखाणं, निवास या गोष्टी परवडणार्‍या बजेटमध्ये एकाच ठिकाणी मिळण्याची स्थिती आजही अपवादात्मक भेटते, असं यातल्या लोकांचं मत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत मोठ्या प्रमाणात लो बजेट चित्रपटांची निर्मिती होत असते. कोकणी सौंदर्याला चित्रपटात आणताना याचा विचारही करावा लागेल. जागतिक हेरिटेजचा विचार करता सह्याद्रीतील किल्ल्यांसह जलदुर्ग ही कोकणची खूप मोठी श्रीमंती आहे. या जलदूर्गांभोवती थीम्स तयार होऊ शकतात. विजयदूर्गाची प्रसिद्ध पाण्याखालची भिंत, हेलियम पॉईंट पर्यटकांना पाहायला आवडतील. कोकणात मसाल्याचे बेट का होत नाही ? आमच्या कर्नाळा आणि फणसाड या अभयारण्यांची उत्कृष्ट अशी ओळख का नाही ? अॅडव्हेंचर सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग इव्हेंटन्स, प्रायव्हेट जंगले वापरून जंगल ट्रेक, बर्ड वॉचिंग असं काही जोरदार सुरु झालं, पायाभूत सुविधा दर्जेदार मिळाल्या आणि यांचं मार्केटिंग नीटसं झालं तर कोकणात परदेशी पर्यटक येईल.

अख्खं जग सध्या रिव्हेंज टुरिझमसाठी तयार होते आहे. लोकं प्रवासाची रिस्क घेऊ लागलेत. कोकण यासाठी तयार आहे का ? कोकणला यासाठी नवीन नीती आणि योजना तयार करावी लागेल. पर्यटकांच्या आरोग्याची नियमित चौकशी,आर्थिक व्यवहार डिजिटल करणे, पर्यटकांचे स्वागत करताना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायझर वापरणे, जेवताना, वावरताना सुरक्षित अंतर ठेवणे, पर्यटन कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या साधनांचा वापर करणे, पर्यटकांची खोली, हॉल, जेवणाची जागा सॅनिटायझरने स्वच्छ करणे, ऑक्सिमीटर, तापमापन यंत्राने पर्यटकांची तपासणी करणे, उत्पादने विकतानाची काळजी आदी नियम स्वतःवर घालून घ्यावे लागतील. कोकणी माणूस हे करेल यात शंका नाही. पण शासनाने ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ग्रीन फील्ड कोकण द्रुतगती मार्ग देण्याऐवजी प्रलंबित कोकण विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास महामंडळ द्यावे. थीमबेस्ड कोकणला एक प्रेझेंटेबल प्रॉडक्ट म्हणून जगासमोर आणण्यासाठी व्यापक विचार करावा. कोकणात राज्याचा आर्थिक विकास सांभाळण्याची शक्ती आहे. संकटे कितीही आली तरी कोकण रडणारा नाही लढणारा आहे. हे कोकणी स्पिरिट इथली संस्कृती आहे. जुलैच्या महापुरात ती दिसली आहे. ती पर्यटनातही दिसण्यासाठी कोकणाचा सर्वसमावेशक विचार झाल्यास इथल्या पर्यटन दिनाचे भविष्य उज्ज्वल आहे.

धीरज वाटेकर

dheerajwatekar@gmail.com





आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...