शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे ‘कलादालन’


देशातील ४५ भारतरत्नांपैकी ६ कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची किर्ती जगभरात पोहोचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदि विविध क्षेत्रात जगात नावलौकिक मिळविणाऱ्या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या व्यक्तींच्या तैलचित्रांचे, चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने उभारलेले ‘सुरेश भार्गव बेहेरे व्यक्तिचित्र कलादालन’ नुकतेच (१७ नोव्हेंबर) रसिक-जिज्ञासूंना पाहाण्यास खुले झाले. मुंबई ते गोवा दरम्यान अश्मयुगकालीन ठेवा असलेल्या एकमेव वस्तूसंग्रहालयाची (२४ नोव्हेंबर २०१८) उभारणी केल्यानंतर वर्षभरातच वाचनालयाने कलादालन खुले केले. कोकणाला स्वतःच्या आत्मविश्वासाची जाणीव करून देणारे, समाजसाहाय्यातून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून उभारले गेलेले ‘वस्तूसंग्रहालय आणि कलादालन’ हे दोनही भव्यदिव्य प्रकल्प आवर्जून भेट देऊन पाहावेत, पुढील पिढीला समजून सांगावेत इतके महत्वाचे आहेत.      

कोकणातील बुद्धिमत्ता हा अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय असलेले भारत सरकारच्या नवी दिल्ली भटके विमुक्त जनजाती विकास व कल्याण बोर्डाचे अध्यक्ष दादा इदाते यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत पुणे डेक्कन अभिमत विद्यापीठाचे भूतपूर्व कुलगुरू आणि पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते सुरेश भार्गव बेहेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘व्यक्तिचित्र कलादालन’ प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कोकणात बुद्धिमंतांची मांदियाळी आहे. इथली बौद्धिक शक्ती प्रचंड आहे. कोकणने अनेक महनीय व्यक्तिमत्त्व जगाला, देशाला दिलीत. त्याबाबतची माहिती येथे मिळते. प्रकल्पाची उभारणी होत असताना, सर्वांच्या सक्रीय सहकार्यातून स्वप्नपूर्तीचा आनंद’ अनुभवता आल्याची वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले यांची प्रतिक्रिया प्रकल्प उभारणीमागची कहाणी सांगते. याच उद्घाटन कार्यक्रमात डॉ. शिंदे यांना लो.टि.स्मा.च्या अरविंद तथा अप्पा जाधव उपरान्त संशोधन केंद्राचा पहिला अपरान्त भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हडप्पाकालीन स्थळ असलेल्या राखीगढी येथे मानवी सांगाडय़ातील डीएनएच्या शास्त्रीय अभ्यासावरून हडप्पा हीच वैदिक संस्कृतीअसल्याचा निष्कर्ष मांडणारे डॉ. वसंत शिंदे यांच्या हस्ते या कलादालनाचे उद्घाटन झाले. हडप्पा संस्कृतीला कोणा परकीय आर्यानी नष्ट करून स्वत:ची संस्कृती वसवली. या गेल्या दोन शतकातील विचारला छेद देणारे संशोधन डॉ. शिंदे यांनी पुढे आणले. मूळचे मोरवणे-चिपळूणचे असलेले डॉ. वसंत शिंदे गेली अनेक वर्षे हडप्पा संस्कृतीवर संशोधन करत होते. हरयाणा येथील राखीगढी या हडप्पा संस्कृतीच्या स्थळावरील उत्खननादरम्यान त्यांना ४५ वर्षीय हडप्पाकालीन महिलेच्या कानातील हाडात अखंड डीएनएचे काही नमुने मिळाले. प्रयोगशाळेतील चाचण्यांनंतर त्या स्त्रीची गुणसूत्रे आणि आज भारतीयांमध्ये आढळणाऱ्या गुणसूत्रांमध्ये कमालीचे साम्य असल्याचे पुढे आले. हे साम्य पडताळून पाहण्यासाठी डॉ. शिंदे आणि त्यांच्या सहसंशोधकांनी १४०० भारतीयांच्या डीएनएचे नमुने गोळा केले. आपण भारतीय त्या हडप्पाकालीन संस्कृतीचेच वंशज आहोत व आर्य कोणी बाहेरून आलेले नसून तेही याच संस्कृतीचा एक भाग असल्याचा दावा डॉ. शिंदे यांच्या टीमने केला. त्यांचा हा शोधप्रबंध सेल व सायन्स या दोन जागतिक दर्जाच्या प्रतिष्ठित संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाला. याचा आधार घेत संग्रहालय आणि कलादालन प्रकल्पाचे ‘योजक’ वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी वाचनालयावर अनेकांचा विश्वास असल्याचे नमूद करून केलेले ‘वसंतराव शिंदे सरांनी वाचनालयाला मोठं व्हायला संधी दिली’ हे विधान डॉ. शिंदे यांच्या कार्याबद्दल खूप काही सांगून जाते. डॉ. वसंतराव शिंदे यांनी ‘आर्य भारतीयच होते’ हा मांडलेला सिद्धांत सन १९४६ ला आपल्या एका ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्याचे इदाते यांनी नमूद केले. इदाते यांनी आपल्या भाषणातून कोकणाची बौद्धिक संपत्ती उलगडली. त्या संपत्तीला कायमस्वरूपी तैलचित्रांच्या माध्यमातून कलादालनाच्या रूपाने उभारण्याचा वाचनालयाचा विचार अत्यंत अभिनंदनीय तितकाच अनुकरणीय आहे.
   
खरतरं कलादालन ही सुरुवात आहे. हे प्रवाही काम आहे. यात अजून बरीच नावे जोडता येण्यासारखी आहेत. आगामी काळात वाचनालयाच्या माध्यमातून ते होतही राहाणार आहे. मूळचे धामणीचे डॉ. हरिभाऊ वाकणकर हे रेल्वेतून प्रवास करत असताना त्यांना डोंगरात चित्र दिसली. त्यांनी ट्रेन मधून उतरून पुढचे आठ दिवस अंगावरच्या वस्त्रानिशी तिथे काढले. ज्यातून जगातील सर्वात पुरातन ठेवा २ लाख वर्षांपूर्वीची शैलचित्रे जगापुढे आली. त्यांचे तैलचित्र येथे भेटते. आरे-गुहागरचे सीताराम केशव बोधे यांनी सन १९२३ साली ‘अस्पृश्यांना सार्वजनिक जागी जाता आलं पाहिजे’ असा डॉ. आंबेडकरांच्या चवदारतळ्याच्या सत्याग्रहाला पूरक ठरणारा ठराव विधिमंडळात मांडला होता. त्यांच्याबाबतची माहिती येथे मिळते. यासह कलादालनात आपल्याला लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी, झांशीची राणी लक्ष्मीबाई, भागोजीशेठ कीर, बाळासाहेब ठाकरे, स्वामी स्वरूपानंद, टेंबे स्वामी, दादासाहेब मावळकर, भास्करराव जाधव, डॉ. हरिभाऊ वाकणकर, वासुदेव विष्णू मिराशी, हमीद दलवाई, श्री भी वेलणकर, गोळवलकर गुरुजी, अनंत कान्हेरे, त्र्यंबक शंकर शेजवलकर, नानासाहेब जोशी, रियासतकार सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, सेनापती बापट, बाळाजी विश्वनाथ, डॉ. आनंदीबाई जोशी, दुर्गाबाई भागवत, सचिन तेंडूलकर, गोविंद वल्लभ पंत, धोंडो केशव कर्वे, पां. वा. काणे, विंदा करंदीकर, बॅ. नाथ पै, नानासाहेब गोरे मधु मंगेश कर्णिक, राम मराठे, शंकर घाणेकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, भार्गवराम विठ्ठल वरेरकर, एअर मार्शल हेमंत नारायण भागवत, डॉ. तात्यासाहेब नातू, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, विष्णुपंत छत्रे, वसंत देसाई, सुरेश भार्गव बेहेरे, नाना शंकरशेठ आदि ८० तैलचित्रे येथे आपल्याला पाहाता येतात. प्रत्येक चित्रामागे, आयुष्यामागे मोठं काम उभं आहे. त्याची आवश्यक जाणीव, अभ्यास वाचनालयाकडे आहे. म्हणूनच वाचनालयातर्फे आगामी काळात कलादालनातील व्यक्तिमत्त्वांची माहिती देणारे पुस्तिक प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक घराघरात पोहोचविण्याचा वाचनालयाचा मानस आहे. 


कोकणातील असामान्य व्यक्तिमत्वांच्या कर्तृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, विविध क्षेत्रातील त्यांच्या अभिमानास्पद कार्याचा परिचय करून देण्यासाठी लोटिस्माने व्यक्तिचित्र कलादालन साकारले. अनेक दानशूर व्यक्तींच्या आर्थिक सहाय्यातून कोकणच्या सुपुत्रांची तैलचित्रे या कलादालनात साकार झाली आहेत. तीन वर्षांच्या मेहनतीतून साकारलेल्या या तैलचित्र कलादालनात आपल्याला रविंद्र धुरी, तुकाराम पाटील, सीताराम घारे, रामचंद्र कुंभार, एस. टी. शेट्ये, के. जी. खातू, विक्रम परांजपे या ख्यातनाम चित्रकारांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून साकारलेली चित्रे भेटतात. चित्राखालची माहिती वाचत, हॉलमधील भारून टाकणारे ऐतिहासिक वातावरण ‘याचि देहि याचि डोळा’ अनुभवत प्रत्येकाला विलक्षण क्षणाचे साक्षीदार होता येतं. पाहणाऱ्याला आपण आपल्या जीवनातील एक सर्वोत्तम क्षण जगत असल्याची निश्चित अनुभूती घेता येईल इतकी क्षमता या प्रकल्पांत आहे. हे संग्रहालय-कलादालन बुधवार, सार्वजनिक सुट्टी वगळता इतर दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुले (माफक शुल्कासह) असते. संपर्कासाठी पत्ता : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर संग्रहालय, जुन्या बहिरी मंदिराजवळ, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, दूरध्वनी : ०२३५५ २५७५७३, मो. ९४२३८३१६६८.

धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
दैनिक तरुण भारत नागपूर दिनांक २६.११.२०१९
INCLUDES NAGPUR AKOLA WASHIM YAVATMAL
VARDHA  BHANDARA GONDIYA  CHANDRAPUR
GADACHIROLI BULDHANA AND KHAMGAON

दैनिक प्रहार दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 

दैनिक तरुण भारत (संवाद पुरवणी) दिनांक २५ नोव्हेंबर २०१९ 
दैनिक रामप्रहर रायगड (दिनांक २९ नोव्हेंबर २०१९)
वरील लेखाची लिंक : https://ramprahar.com/33256/

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले संवर्धन


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या दुर्गांचे संवर्धन हा महाराष्ट्रीयनांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे यावर सर्वांचंच एकमत आहे. शासनही अधूनमधून या विषयात काहीतरी करत असते. या साऱ्यांतून प्रत्यक्षात किल्यांवर काय घडते ? याची जाणीव सह्याद्रीत डोळस भटकंती करणाऱ्या जवळपास सर्वांनाच आहे. निसर्गाला आणि निसर्गातल्या कोणत्याही पुरातत्त्वीय अवशेषाला धक्का न लावता, तिथली साफसफाई राखून तात्पुरत्या स्वरुपात, भेट देणाऱ्या समूहाला आकर्षित करणारे काही करता येत असेल तर ते व्हायला हवे, या मताचे आम्ही आहोत. या निमित्तानं गडकिल्यांचं महत्व, इतिहास, पावित्र्य राखता येऊ शकतं. त्या त्या भागात गड किल्यांकडे स्थानिक संस्था, तरुण उत्साही मंडळी कायम आत्मियतेने पाहात असतात. या वास्तूंच्या स्वच्छता, संवर्धनात आपापल्या क्षमतांनुसार भूमिका बजावित असतात. सतत काहीनाकाही कृतिशील उपक्रम राबवित असतात. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन विषयात सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा आढावा !

सन २०१७ साली जागतिक पर्यटन दिनी किल्ले मंडणगड येथे ब्ल्यू ग्रीन एक्झॉटिकाने तालुक्यातील तायक्वांदो आणि महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविली होती. मंडणगड तालुक्यातील बाणकोटच्या ऐतिहासिक किल्ले हिंमतगडच्या प्रवेशद्वारासमोरील बुरुजाला लागून सन २०१४ पूर्वी एका टाकीचे बांधकाम करण्यात आले. ती टाकी त्वरेने पाडण्याची मागणी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने हे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालकडून मिळाल्याचे सांगितले होते. श्रीवर्धनच्या शिवछत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानने चालूवर्षी मे महिन्यात बाणकोट खाडीकिनारी असलेल्या किल्ले हिम्मतगड येथे स्वच्छता मोहिम राबविली. दापोली तालुक्यातल्या हर्णै गावात सुवर्णदुर्ग, गोवागड, कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग अशी प्रसिद्ध दुर्गचौकट आहे. या किल्यांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी बा रायगड परिवार, क्षेत्र सुमारगड संवर्धन समिती वाडीमालदे, शिवसह्याद्री समूह या संस्थांच्या २५ सदस्यांनी ‘सुमारगड संवर्धन मोहीम' राबविली. या अंतर्गत गडावरील वास्तू / अवशेष मोजमाप नोंदी, नकाशा स्थाननिर्देश निश्चिती, गडावरील तीन टाकीच्या वर असलेल्या टाकाची स्वच्छता, न्हानचं टाकच्या बाजूला असलेल्या भुयाराची स्वच्छता, वाडीमालदे ते किल्ले सुमारगड मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. याचवर्षी पुन्हा जून महिन्यात ‘स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान’ संस्थेने सुमारगड संवर्धन मोहिमेंतर्गत वृक्षारोपण केले. किल्यावरील महादेव मंदिराच्या वरील बाजूस जास्वंद, बाभूळ, एरंड जांभूळ जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यंदाच्या जुलै महिन्यात किल्ले रसाळगडाच्या कोठाराची भिंत ढासळली. गेल्या १० वर्षांत या किल्यावर ‘संवर्धन’ अंतर्गत शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा रसाळगड राज्य शासनाने २००२ साली पर्यटन विकास व संवर्धन करण्यासाठी राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. संवर्धनात पुरातन सात थरांची दीपमाळ पाच थरांची झाली आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यात आला. दोन दशकांपूर्वी दुर्गम असलेला किल्ला पर्यटक व इतिहासप्रेमींच्या जवळ आला. किल्ल्यावर दरवाजा, पायऱ्या, कोठार, तोफा, इमारती, बुरुज, मंदिर परिसर यांवर शासनातर्फे खर्च करण्यात आला. सन १९९० पासून या किल्याची डागडुजी चर्चेत आहे. या किल्यावर वीज आली आहे. किल्याच्या डागडुजीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रत्नागिरी गडकोट वाचवा समितीने केला होता. सन २०१४ साली किल्याच्या तटबंदीलगत ७०० झाडांचे रोपण करण्यात आले होते.  

गेली सतत ५ वर्षे कार्यरत, विविध पुरस्कारांनी सन्मानित ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ हे किल्ले गोविंदगड (गोवळकोट) संवर्धनातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. तीन वर्षांपूर्वी गोवळकोट धक्क्यावरील पुरलेल्या अवस्थेत असलेल्या सहा तोफा गोविंदगडावर संरक्षित करण्याचे महत्वाचे काम या संस्थेने केले आहे. या कामी ग्लोबल चिपळूण टुरिझम, करंजेश्वरी देवस्थान आदि संस्थांनीही महत्वाची भूमिका बजावली होती. प्लास्टिकमुक्त गडकिल्ले मोहिमेंतर्गत या किल्याची स्वच्छता, शिवजयंती, त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव, पर्यटकांना मार्गदर्शन, वृक्षारोपण, संवर्धन या विषयात संस्था कार्यरत आहे. संस्थेला ‘सह्याद्री सन्मान पुरस्कार’ आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा ‘समाजसेवा’ पुरस्कार मिळालेला आहे. दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी या संस्थेला स्वच्छता मोहीम, गडाला उर्जितावस्था आणण्याकरिताचे प्रयत्न यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व वस्तूसंग्रहालये संचालनालय मुंबई यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव पर्यटन, गड संवर्धन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

सन १९६० साली तीनशे रुपयांना विकला जाऊन खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ / १६ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाला. तरीही किल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे, पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेले मध्यंतरी आढळले होते. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी आवाज उठविल्यावर हे कुलूप काढण्यात आले. साधारणतः १५ / १६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवला होता. तेव्हापासून अनेकांनी हा विषय लावून धरण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अलिकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी दीपक वैद्य, शिवतेज फाऊंडेशन, अॅड. संकेत साळवी, मनोज बारटक्के, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे आदिंनी प्रयत्न केले होते. तळ कोकणातल्या एखाद्या किल्याच्या मुक्ततेसाठी वर्तमान शतकात दिला गेलेला हा सर्वात मोठा लढा आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळचा विजयगड राज्य संरक्षित व्हावा याकरिता ग्रामस्थांनी यावर्षीपासून सह्यांच्या मोहिमेद्वारे प्रयत्न सुरु केले. गावातला शिवजयंतीचा उत्सव गडावर साजरा होतो. विजयगडावर मार्च २०१६ मध्ये १० फुट खोल संशयास्पद खोदकाम, शेजारी, नारळ, उदबत्ती, दही आढळून आलेले होते.  

चालू वर्षाच्या सुरुवातीस रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत शिवकालीन किल्ले महिमतगड स्वच्छता आणि संवर्धन मोहीम हाती घेतली. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमानी मंडळीनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. ऑक्टोबर २०१८ पासून या कामाला सुरुवात झाली. तालुक्यात प्रचितगड आणि महिमतगड असे दोन किल्ले आहेत. या गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा म्हणून ग्रामस्थ गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी, गावाजवळ असलेले ऐतिहासिक वैभव आपणच संवर्धित करायचे या निर्णयाने ग्रामस्थ प्रेरित झाले. या शिवकालीन गडाचे संवर्धन करण्याचा एकमुखी ठरावही केला आहे. मोहिमेअंतर्गत गडाकडे जाणारी वाट, प्रवेशद्वार स्वच्छ करण्यात आले. मार्गावर दिशादर्शक फलक उभारण्यात आला. झाडा-झुडपांनी, वेलींनी वेढलेल्या भिंतीनी मोकळ्या केल्या. यासाठी १०० पेक्षा अधिक जण कार्यरत होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये याच महिपतगडावर ‘ट्रेकशिरीष’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले होते. तेव्हा पावसामुळे गडावर गवत वाढून गडाचा दरवाजा झाकला गेला होता. काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली होती. पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या पडल्या होत्या. या साऱ्याची स्वच्छता करण्यात आली. ‘सह्यकडा अॅडव्हेंचर्स’ संस्थेच्या शिलेदारांनी डिसेंबर २०१६ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील किल्ले भवानीगड ट्रेक दरम्यान स्वच्छता मोहिम राबविली होती. ट्रेकिंग करून दमलेले असताना या टीमला तिथल्या अस्वच्छतेने अस्वस्थ केले. मंदिराच्या एका कोपऱ्यात ठेवलेले खराटे, झाडू त्यांना दिसले. त्यांनी इथल्या मंदिरातील कचरा, जाळ्या, जळमटे, पालापाचोळा, इतस्त पडलेल्या लग्नपत्रिका आदिंची स्वच्छता केली. मंदिरातील मूर्ती, घंटा स्वच्छ केल्या. वस्तू नीटनेटक्या ठेवल्या. गडावर असलेली एकमेव तोफ स्वच्छ केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या कुंडी-निगुडवाडी गावच्या सीमेवर असलेला महिपतगड (मेहमानगड) सुस्थितीत रहावा, तिथली साफसफाई व्हावी, ऐतिहासिक वस्तू, वास्तू व्यवस्थित राखली जावी यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या उपस्थितीत गडावर दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्ट्रदिनाला ध्वजवंदन केले जाते. यावेळी स्वच्छताही केली जाते. गड चढाईसाठी सोपा, पोहचण्यास लागणारा कमी कालावधी यांमुळे पावसाळा वगळता इथे शिवप्रेमी, पर्यटक, ग्रामस्थांची वर्दळ असते.

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे राज्यभर किल्ले स्वच्छता आणि संवर्धन, पर्यावरण संरक्षण मोहिमा सुरु असतात. किल्ले जयगड या ठिकाणीही गेली दोन वर्षे ही संस्था आपली मोहिम राबवते आहे. राज्यभरातून जवळपास पाचशे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होत असतात. संस्थेने यावर्षी राबविलेल्या मोहिमेत राज्याच्या २१ जिल्ह्यातून सहाशे कार्यकर्ते एकत्र आले होते. किल्ले जयगड स्वच्छतेत संपूर्ण किल्याचा परिसर, बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदीवरील झुडपे काढणे, परकोट सफाई, बुरुज स्वच्छता करण्यात आली. सन २०१५ साली पावसाळ्यात मावळा प्रतिष्ठान परिवाराने भगवती देवी ट्रस्टच्या मदतीने रत्नदुर्ग किल्यावर दोन दिवशीय स्वच्छता आणि संवर्धन मोहिम राबविली होती. या अंतर्गत वृक्षारोपण, विहिरांची साफसफाई, परिसर सफाई करण्यात आली. रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंग ही संस्था रत्नदुर्गसह विविध किल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा सातत्याने राबवित असते. संस्थेची रत्नदुर्ग किल्ला परिसर स्वछता व संवर्धन मोहिम गेली ५ वर्षे सातत्याने सुरु आहे. संस्थेच्या ट्रेकिंग उपक्रमातही सहभागींना किल्ले स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले जाते. परिसरातल्या समुद्र स्वच्छतेच्या कामातही ही संस्था पुढाकार घेत असते. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, रत्नागिरी-पावस-आडिवरे-कशेळी-राजापूर या सागरी महामार्गावर असलेल्या महत्वाच्या पूर्णगड किल्याची ढासळलेली तटबंदी जांभा दगड वापरून, पुरातत्व विभागातर्फे दुरुस्त करण्याचे काम, दोन चबुतरे बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी पर्यटकांना अर्धा तास लागतो.

लांजा तालुक्यात साटवली गढी / भुईकोट किल्ला हा पाच बुरुजांचा आहे. याच्या संवर्धन आणि स्वच्छतेसाठीही दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी, शिवगंध ढोल पथक, लांजा आणि स्थानिक ग्रामस्थ, तरुणांनी यावर्षी पुढाकार घेतला. चालू वर्षी मे महिन्यात श्रमदान करून गढीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोहिम राबविण्यापूर्वी या संस्थांनी तरुणाईला सोशल मिडीयाद्वारे एकत्र येण्याचे आवाहनही केले होते. स्वच्छतेपूर्वी गढीला झाडा-झुडुपांनी पूर्णतः घेरलेले होते. या टीमने वाढलेली ही झुडुपे बाजूला करण्याबरोबरच कचरा आणि गवतही साफ केले. राजापूर जवळच्या नाटे गावातील किल्ले यशवंतगडाची हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान (राजापूर), शिव संघर्ष संघटना (नाटे), राजा शिवछत्रपती परिवार आणि शिवप्रेमींकडून किल्ल्याची साफसफाई केली जाते. गतवर्षी जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी २४, २५ नोव्हेंबरला येथे संवर्धन मोहिम राबविली होती. मोहिमेंतर्गत गडाचा दरवाजा, तटबंदी, चौथरे स्वच्छ करण्यात आले. यासाठी स्थानिकांसह एकूण ३५ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. किल्ले यशवंतगडाची विक्री झाली आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे आहे. त्यांनी हा किल्ला ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना विकला आहे. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना या गडाची विक्री झाल्याचे, माहिती अधिकाराचा उपयोग करून समीर शिरवडकर यांनी जाहीर केले होते. राजापूर शहरातील किल्ला अर्थात ब्रिटीश वखारीची पुनर्बांधणी करून तिथे पुरातन वस्तूसंग्रहालय आणि कलादालन उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये पत्र दिले आहे. या वखारीचे जतन व्हावे यासाठी स्थानिकांनी नवा आराखडा तयार केला आहे. अर्जुना नदीकिनारी असलेली ही वखार ब्रिटिशांनी सन १७०८ मध्ये बंद केली. त्यानंतर बराच काळ इथे सरकारी कचेऱ्या कार्यरत होत्या. इमारत मोडकळीस आल्यानंतर काही सकारात्मक घडेल या हेतूने अनेक वर्षे शासन दरबारी प्रयत्न करून अपयश आल्यावर सन २००४ मध्ये राजापूर नगरपरिषदेने / सार्वजनिक बांधकाम विभागाने ही वखार पाडली. सध्या ही वखार राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित आहे. या वखारीतून ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी शिवरायांच्या हालचाली लंडनला कळवित असतं.

भौगोलिक रचनेमुळे आपल्या सह्याद्रीत दुर्गांची विविधता अधिक आहे. महाराष्ट्र हे मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले देशातील एकमेव राज्य आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचा स्वतंत्र इतिहास, भौगोलिक महत्व आहे. हिंदवी स्वराज्यासाठी किल्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. गेल्या काही वर्षांपासून गडकिल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन कामाला चांगले दिवस येताहेत. ठिकठिकाणच्या शिवप्रेमी संघटना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ही कामे आपणहून करत आहेत, हे अभिनंदनीय आहे. हे करत असताना संवर्धनाच्या नियमांना धरून करणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास आणि गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे स्वतंत्र अभ्यासण्याचे विषय आहेत. संवर्धन करताना वास्तू सर्वेक्षण, पुरातत्त्वीय, जीआयएस, रेखाटने आदिंचा उपयोग करून किल्ल्याची विविधांगी ऐतिहासिक माहिती गोळा करता येते. या माहितीच्या आधारे किल्ल्यावरील पुरातन वास्तू, स्थळांचा शोध घेतला जाऊ शकतो. साऱ्या लेखी नोंदी ठेवता येतात. शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने किल्ले किंवा पुरातन वास्तू जतन करण्यासाठी तयार केलेल्या दत्तक योजनेचाही विचार केला जाऊ शकतो. या योजनेच्या आधारे किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेता येऊ शकतो. स्वच्छता आणि संवर्धन या विषयात काम करणाऱ्या संस्थांनी दत्तक योजनेत पुढाकार घेतला तर गड-किल्यांचे पावित्र्य अधिक जपले जाईल !

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.            मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(पूर्वप्रसिद्धी : दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक २०१९)

शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

कोकणचे भवितव्य


कोकणातला शेतकरी, सर्वसामान्य माणूस आत्महत्या करीत नाही. वीजचोरी करत नाही. कर्जमाफी, व्याजमाफी मागत नाही, कधीही हात पसरत नाही. म्हणून त्याला काहीही मिळत नाही. यंदाच्या पूरातही हेच चित्र पाहायला मिळाले. हा कोकणी माणूस अतिसहनशील आहे. या सहनशीलतेमुळे मुत्सद्दी राजकारणी कोकणावर सातत्याने अन्याय करत आलेत. आमच्याकडे राज्यस्तरावर कोकणाची अमर्याद छाप पाडणारा नेता नाही. चुकून एखादा सापडला तर त्याला आम्हां कोकण्यांचे अजिबात पाठबळ मिळत नाही. का नाही ? तर ‘आमचे-तुमचे’ गल्लीतले राजकारण ? चुकून एखाद्याला मिळालेच तर तो नेता पुन्हा गल्लीतल्या राजकारणात उतरून स्वतःची बोळवण करून घेतो. समूळ कोकणासाठी म्हणून आम्ही कोकणी कधीही एकत्र येत नाही. सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात सिंचनाची स्थिती भयावह आहे. पूर / महापूर आम्ही उशाला घेऊन झोपतो. आमची असंख्य घरे फक्त गणपती आणि शिमग्यालाच उघडतात. आणि आम्ही तरीही आमच्या या साऱ्या मुद्द्यांचे ‘गावठी’ राजकारण करण्यात धन्यता मानतो. सुदैवाने चालू शतकात कोकणी माणूस जागा होतो आहे, असे म्हणावे ! अशा काही घटना घडताहेत. काही संघटना प्रयत्न करताहेत, हे स्वागतार्ह्य आहे. भूतकाळातही यापूर्वी असे प्रयत्न घडलेले आहेत. त्यामुळे वर्तमान प्रयत्नांचे भवितव्य काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आजही जुने मुद्दे समोर येतात. त्या मुद्यांच्या आधारे ‘कोकणचे भवितव्य’ समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न !  

हा लेख लिहायला घेतला तेव्हाएक आनंदाची बातमी वाचली. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पडवे येथे २हजार ६०० कोटींच्या मेगा लेदर अँड फूटवेअर क्लस्टरला तत्वत: मान्यता मिळाली. यासाठी गेली अनेक वर्ष माजी आमदार डॉ. विनय नातू प्रयत्न करत होते. या प्रकल्पाची माहिती त्यांनीच पहिल्यांदा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू यांच्यापर्यंत पोहचवून उद्योग निर्मितीसाठी आपले सततचे प्रयत्न कायम ठेविले होते. यामुळे कोकणात रोजगार वाढेल, विकासाला गती प्राप्त होईल. असे प्रकल्पकोकणचे भवितव्यनिश्चित करणार आहेत. कोकणची वनसंपदा, लालमाती, जांभा दगड, खळाळूनवाहणाऱ्या नद्या, खाडय़ा, स्वच्छ सागरकिनारे, नारळी-पोफळीच्या बागा, फणस, काजू, कोकम, आंबा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, इथले गड, किल्ले, लेणी, देवळे, तीर्थस्थळे, मशीदी, दर्गे, गावे, बंदरे आणि हजारो वर्षांची परंपरा असूनही त्याचं जीवंत स्मारक आम्ही उभारू शकलो नाही. सध्याच्या चौपदरीकरण होत असलेल्या महामार्गावर, कुठेतरी ते जुनं मातीचा धुरळा उडविणारं, मोबाईलची रेंज नसलेलं, निसर्गरम्य प्राचीन कोकण आम्ही जपायला हवं, असं आजही वाटतं. ‘फादर ऑफ नेशन’ महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु गोपालकृष्ण गोखले कोकणचे आहेत. अंदमानमध्ये हुतात्मा झालेल्या नोंद ३१० पैकी ३५ जण कोकणातील आहेत. स्वतःच्या हिंमतीवर ९ ताम्रपट शोधणारा भारतातील एकमेव व्यक्ती अण्णा शिरगावकर कोकणातले आहेत. पां. वा. काणे आणि महर्षी धोंडो कर्वे दोघे भारतरत्न शिक्षक-विद्यार्थी यांच्या नावे ओळखली जाणारी शाळा सन  १८६३ ची रत्नागिरीतील ! सन १९३९ ला ती बंद झाली. सध्या तिथे ट्रेनिंग कॉलेज चालते. महाराष्ट्रातले पहिले सार्वजनिक वाचनालय कोकणात रत्नागिरीला सन १८२८ बुक सोसायटी नावाने सुरु झाले. आज ते नगर वाचनालय म्हणून ओळखले जाते. भारतातील पहिले वर्तमानपत्र दर्पण सन १८५४ बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरु केले. भारतातल्या पाहिल्या बॅरिस्टर महिला सीताबाई नारायण आजगावकर याही कोकणातल्याच ! भारतातील व्यक्तिगत मालकीची एकमेव बँक ‘युनियन बँक ऑफ चिपळूण’ चालविणारे प्रोपरायटर बापूसाहेब खरे कोकणातले. राईट टू रिजेक्ट हा कॉलम मतपत्रिकेवर असावा असं लोकसभेत पहिल्यांदा सांगणारे बापूसाहेब परुळेकर कोकणचे. झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर सी. डी. देशमुख महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, मध्यप्रदेश-भीमबेटका गुहा येथील आदिम चित्रलिपी शोध घेणारे हरिभाऊ वाकणकर हे संगमेश्वर धामणीचे ! कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांचा पुतळा निर्माण करणारे नारायण लक्ष्मण सोनवडेकर सोनवडे-सावंतवाडीचे ! शोधलं तर खूप काही मिळेल. या साऱ्याचा सारासार विचार कोकणच्या भवितव्यासाठी व्हायला हवा. कोकणात सन २०१० पासून इतिहास परिषद कार्यरत आहे. तिच्या दरवर्षीच्या अधिवेशनात नवे संदर्भ समोर येत असतात. ऐतिहासिक आणि प्राचीन खूणांची शास्त्रशुद्ध पद्धतीने जपणूक होत नसल्याने ही मंडळी कायम हळहळत असतात. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून कोकणात या विषयात काय करता येईल ? अशी विचारणा शासनाने केली असेल असे वाटत नाही. कोकणचा प्राचीन, अर्वाचीन काळाचा इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिला जायला हवा. कोकणात मनुष्यवस्तीस प्रारंभ कधी झाला ? सातवाहनपूर्व काळातील समाजव्यवस्था, गावातील मंदिरे, स्थानिक दैवते, परंपरा, विविध राजवाटीतील स्थित्यंतरे, राजवटींचे योगदान, नौकानयन, बंदरसंस्कृती आणि त्यासंबंधित अर्थव्यवस्था यांचा इत्यंभूत अभ्यास, संशोधन, सलग लेखन व्हायला हवंय. परदेशी तज्ज्ञांच्या मते इ.स. किमान ३० हजार वर्षे पूर्व कातळशिल्पे, कोकणाला जागतिक वारसा बनविण्यास सक्षम आहेत. हा विषय लावून धरणारे कातळशिल्प संशोधक सुधीर (भाई) रिसबूड, धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे. या शिल्पांत गेंडा प्राणी दिसतो आहे. शिल्पांत बैलांचे चित्र नाही, अर्थात मानवाने शेती सुरु करण्यापूर्वीची ही चित्रे असावीत असा निष्कर्ष तज्ज्ञ काढताहेत. रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात ही शिल्पे अधिक आढळली आहेत. भविष्यात हा परिसर जागतिक हेरीटेज टुरिझम बनून एक नवा इतिहास लिहिला जाणार आहे. 

पंतप्रधान पंडित नेहरूंकडे उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर, अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांनी स्वातंत्र्य मिळाल्यावर जेव्हा कोयना धरणाचा प्रस्ताव मांडला होता तेव्हा वीजनिर्मितीनंतर कोकणात सोडणाऱ्या पाण्याचा काय उपयोग करणार ? असा प्रश्न नेहरूंनी विचारला होता. आम्ही त्याचे उत्तर आजही शोधतो आहोत. कोयनेतील वीजनिर्मितीनंतर समुद्रात सोडले जाणारे ‘वाशिष्ठीतील जलवैभव’ कोकणासाठी वापरण्याची योजना प्रत्यक्षात आल्यास कोकणाचा पाणी प्रश्न सुटेल. कोकणातल्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांमधील पाण्याची ६१२ टी.एम.सी. क्षमता १०५ टी.एम.सी. क्षमतेच्या कोयना धरणापेक्षा जवळपास सहापट अधिक आहे. हेही सारे पाणी समुद्रात वाहून जाते. कोकणात छोट्या धरणांची साखळी उभी करून हे सारे पाणी प्रथम वीजनिर्मितीसाठी आणि नंतर सिंचनासाठी वापरण्याची सूचना ज्येष्ठ वैज्ञानिक एम. एस. स्वामिनाथन यांच्या समितीने केलेली आहे. कोकणातील गावागावातून महिला हंडाभर पाण्यासाठी आजही दोन-दोन किलोमीटर पायपीट करते. आमचे कुणाचेच पाय दुखत नसल्याने कोकणात, राज्यातील ४६ टक्के पाणी उपलब्ध असूनही सिंचन अत्यल्प का ? हा प्रश्न आम्हाला पडत नाही. राज्याच्या जलसिंचन विभागात सन २०१४ पूर्वी घोटाळा झाला. सरकारनेच काही पाटबंधारे प्रकल्पांना स्थगिती दिली. माहितीनुसार त्यात रायगड जिल्ह्यातील कोंडाणे, बाळगंगा, काळू प्रकल्प, शाई, सुसरी, काळ जलविद्युत प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील गडगडी मध्यम, जामदा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरसिंगे, गडगडी मध्यम, शिळ लघु प्रकल्प आदि १२ प्रकल्पांचा समावेश आहे. चौकशी नावाखाली या प्रकल्पांची कामे बंद आहेत. कोकणचा विकास होतो आहे.

संपूर्ण विकासाची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती असणारे नेतृत्व कोकणाला लाभलेले नाही. स्वातंत्र्यानंतर कोकणचे राजकीय नेतृत्व प्रथम स्व. बाळासाहेब सावंत यांनी केले. त्यांना हंगामी मुख्यमंत्रीपदही मिळाले होते. त्यानंतर बॅ. ए. आर. अंतुले, भाईसाहेब सावंत, शामराव पेजे, बॅ. नाथ पै, प्रा. मधु दंडवते ही काही नावे डोळ्यांसमोर येतात. अलिकडच्या काळात, माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे हा एक अपवाद ! शिक्षक भरतीच्या निमित्ताने कोकणातील स्थानिकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सन २०१० च्या शिक्षक भरतीत रत्नागिरी जिल्ह्यातील ११५७ पैकी ३७ शिक्षक कोकणातील असल्याचे आकडेवारी सांगते. तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक यांत तर अधिक भयंकर स्थिती असावी. कोकण आणि बुद्धिमत्ता हे समानार्थी शब्द असूनही आम्ही स्पर्धा परीक्षांची वाट का धरत नाही ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी आणि पशु-पक्षी प्रदर्शन भरते. प्रदर्शनाला तरुणांची उपस्थिती असते. प्रदर्शनात आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान, अवजारे आणि मार्गदर्शन मिळते. दुसरीकडे मात्र शासन कृषी विभागाच्या योजना बंद करत असल्याची ओरड ऐकू येते. कृषी विभागाला सरकारकडून अनुदान प्राप्त होत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सन २०१९ च्या निवडणूकपूर्व ‘महाजनादेशयात्रा’ दरम्यान राजापूरात तीन लाख कोटींहून अधिक गुंतवणूक असणाऱ्या, प्रकल्प उभारणीच्या काळात दीड लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करणारा, उभारणीनंतर वीस हजार थेट व इतरत्र लाखो रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या बहुचर्चित नाणार ‘ग्रीन’ रिफायनरी (तेल शुद्धीकरण) प्रकल्पाच्या फेरविचाराचा मुद्दा मांडला. हा प्रकल्प कोकणाला ‘रोजगार’ देऊ शकतो, हे मान्य केलं तरीही त्यातून घडू पाहाणारा भयानक नैसर्गिक विनाश कसा सावरायचा ? याचे नीट उत्तर अद्याप मिळालेले नाही. अभ्यासपूर्ण मांडणी न करता, ‘स्थानिकांना एखादा प्रकल्प नको असेल तर आमचाही विरोध आहे’ अशी भूमिका घेणारे राजकारणी आम्हांला लाभले आहेत. प्रचंड आर्थिक गुंतवणूक असणारा हा पहिलाच प्रकल्प असल्याने बुद्धीभेद टाळून विचार व्हायला हवा. प्रकल्पाबाबतच्या शंका निराकरण करण्यावर भर द्यायला हवा. मोठे वृक्ष पावसाळ्यात पाण्याचा विपुल साठा करत असतात. जमिनीतील आर्द्रता दीर्घकाळ टिकवितात. कोकणातील बेसुमार जंगलतोड थांबवून नवीन वृक्षलागवड, फळबागा विकसित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम राबविला गेला पाहिजे. कोकणातील जमिनीचा तीव्र उतार लक्षात घेऊन सिंचन व्यवस्थापनासाठी तंत्र विकसित केले पाहिजे.

कोकणातल्या शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठावरील ताण वाढला आहे. आम्ही गेली अनेक वर्षे ‘स्वतंत्र विद्यापीठ’ मागतो आहोत. राज्यात अनेकांना (सोलापूर) ते मिळाले आहे, पण आम्हांला नाही. का ? माहित नाही. आजही आमच्या नशीबी ‘मुंबई विद्यापीठ उपकेंद्र सक्षमीकरण’ ह्याच घोषणा आहेत. स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ सरकारला नागपूरला न्यायचे आहे. हे म्हणजे मनात आले तर ते कोकणातला समुद्रही तिकडे नेतील, अशातलं ! बरं हे असं करू नका, सांगण्यासाठी आम्हांला आमची क्रयशक्ती खर्च करावी लागते. त्यावर ‘आम्ही कोकणाचा विकास करू !’ हे पालुपद कितीही सरकारे बदलली तरी सर्वांच्याच तोंडी असतचं ! कोकणात सन १९७२ ला विद्यापीठ सुरु झाले. १०० वर्षापूर्वी सहकारी तत्वावर भारतातील पहिला काजू बी साखर कारखाना तोरणे बंधू यांनी सावंतवाडीत उभारला होता. इथे केळी लागवडीचा प्रयोग, हळद, चिक्कू लागवड (डहाणू-घोलवड), नारळ लागवड, हापूस इकॉनॉमी (अल्फान्सो सिटी), काजू यांना वाव आहे. ३० वर्षांपूर्वी कोकणात फळप्रक्रिया उद्योग चळवळ सुरु होती. कोकणात ५२७ फळप्रक्रिया उद्योग आहेत. मात्र एकूण फळांच्या २% फळे ही प्रक्रिया उद्योग वापरात नाहीत. कोकणात सध्या कृषी कोर्सना चांगले दिवस आहेत. त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे. आमच्याकडचा पेढांबे (चिपळूण) साखर कारखाना, ‘बंद कसा पडला?’ हे सांगण्यात आम्हांला मोठेपणा वाटतो हे थांबवायला हवे. आजही इथल्या सरबताची चव बाटली बदलली की बदलते, हे चित्र बदलायला हवे. जवळपास ३ हजार कोटींची अर्थव्यवस्था असलेल्या इथल्या हापूसला जी. आय. मानांकन मिळाले आहे. अजूनही कोकणच्या हापूसचा ब्रँड विकसित होणे बाकी आहे. शासनाने आंबा-काजू करिता ‘आंबा काजू बोर्ड’ स्थापन केले आहे. त्याला निधी मिळायला हवा.

उर्वरित महाराष्ट्रातील योजनांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडत असताना गेल्या पाच-पंचवीस वर्षांत कोकणच्या पर्यटनावर शे-पाचशे कोटी रुपये तरी प्रत्यक्षात खर्च झाले असतील का ? प्रश्न आहे. यास्तव स्वतंत्र कोकण पर्यटन विकास मंडळ / प्राधिकरण ही कोकणवासियांची जुनी मागणी आहे. इथल्या तरुणांनी प्रतिकूल परिस्थितीत, आपल्या जागा विकून, घरदार गहाण ठेवून पाच-पंचवीस वर्षांत ग्रामीण पर्यटनाचे किमान १० हजार प्रकल्प उभारलेत. त्यांना पर्यटक प्रतिसादही मिळतो आहे. समुद्रकिनारी पर्यटन प्रकल्प सुरु करण्यासाठी परवानगी घ्यायला जर आम्हांला दिल्लीला जावे लागणार असेल तर अवघड आहे. सरकार, प्रशासन नावाच्या यंत्रणेने यात ‘मदत आणि सहकार्य’ स्वरुपात लक्ष घालायला हवं. ‘कोकणात रोजगार नाही’ या मुद्द्यानुरूप ओरड करताना सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला सुलभ परवानग्या, दीर्घ मुदतीची कर्जे, सबसिडी, भरीव अर्थसाहाय्य का होत नाही ? हे समजण्यापलिकडे आहे. मुंबईत, कोकणातली दहा हजारांहून अधिक गाववार, वाडीवार ग्रामस्थ मंडळे कार्यरत आहेत. या मंडळाचे कार्यकर्ते एकमेकांना भेटतात, संपर्कात असतात. गावाच्या कार्यक्रमांचा, विकासकामांचा पाठपुरावाही करतात. मुंबईत राहून आपापल्या गावात खूप प्रभावी काम करतात ही मंडळं ! कोकणच्या प्रश्नांबाबत या लोकांनी एकदा मनावर घ्यायला हवं. लोकवर्गणीतून सार्वजनिक कामे पार पाडण्याचा कोकणी सामाजिक संस्कार याचं लोकांनी जपला आहे. एकीकडे कोकणच्या विकासाचा वारू चौफेर दौडविण्याचे प्रयत्न चालू असताना, ह्या विकासाचा आनंद, उपभोग घ्यायला कोकणात घरटी माणूसच शिल्लक राहिलेला नाही. कोकणात केरळपेक्षा अधिक क्षमता आहे. इथे वर्षभरात किमान एक कोटी लोक भेट देत असावेत. एकट्या गणपतीपुळेला वर्षाकाठी भेट देणाऱ्यांची संख्या १५ लाख आहे. कोकणात पर्यटनाचे नीट नियोजन केले गेले तर एकाही तरुणाला मुंबई-पुण्याला जावे लागणार नाही, इतकी ताकद इथल्या निसर्गात आहे. दुर्दैवाने एकही अद्ययावत पर्यटनस्थळ कोकणात नाही. पर्यटक ज्या समुद्रकिनाऱ्याच्या आशेने येतात तिथे महिलांसाठी टॉयलेट व्यवस्था नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा नि विकासाचे राजकारण मात्र मोठ्या प्रमाणात करत असतात. उर्वरित महाराष्ट्राला सरकार जसे विविध विषयात मदतीचे पॅकेज देते, तसे कोकणाला पर्यटनाच्या बाबतीत हवे आहे. तरुणांनी जागा विकून, घरदार गहाण ठेवून, पर्यटनाचे एकाहून एक देखणे प्रकल्प उभारले आहेत. या प्रकल्पांना बेकायदेशीर ठरवून नोटिसा देण्याचे काम शासकीय यंत्रणा नियमितपणे करत आहे. कोकणाचं दुर्दैव आहे की हा उद्योग उभारण्यासाठी शासन मदत करत नाही अडचणीत आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न होताना दिसतात. कोकणात रोजगार निर्माण करण्याची सर्वाधिक क्षमता असलेल्या पर्यटन उद्योगाला मदत करायची नाही हे समजण्यापलीकडे आहे. कोकणातील निवडणुकांमध्ये, विधानसभा, लोकसभेत कोकणाच्या पर्यटनाची विशेष चर्चा होत नाही, न्याय मिळणे दूरचे.

कोकणाचा इतिहास अभ्यासता सध्याचं कोकण किमान १०/१५ हजार वर्ष जुनं असावं ! गुहागर तालुक्यातील पालशेत (पलिपपट्टमय) ९० हजार वर्ष जुनं ठिकाण असल्याचं संशोधनातून सिद्ध झालं आहे. १७ व्या शतकात कोकणातील खेडी स्वयंपूर्ण होती. तीच आर्थिक विकासाची केंद्र होती. शिरभारे काम चालायचे. शतकभरापूर्वीपासून पोटापाण्यासाठी आम्ही मुंबईत जाऊ लागलो आणि गावातले आळशी बनत गेले, अशी शंका मला येते. कोकणच्या इतिहासात डोकावताना अलिकडचा सन १९५१ सालचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग (एकत्रित) जिल्हा गृहोद्योग विकास समितीचा अहवाल वाचनात आला. त्यातले तत्कालिन उल्लेख कोकणच्या आजच्या विकासाच्या विचारसरणीच्या पलिकडे जाऊन मुद्दे मांडत असल्याचे दिसले. अर्थात ते ते सारे तेव्हा कोकणात होते, असाच त्याचा अर्थ आहे. कोकणातली हवा दमट, आळस आणणारी, आरोग्याला पोषक. किनाऱ्यावर सरासरी ८० ते १०५ इंचापर्यंत पाउस, सह्याद्रीत हे प्रमाण १४ किमान इंचांनी अधिक. उपलब्धीच्या मानाने अतिशय कमी क्षेत्र लागवडीखाली आलेले. जमिनीत तांदूळ, नागली, हरिक, वारी, डाळ, तीळ, भुईमुग, वारव, गवत, बाभूळ, नारळ, कारळे तीळ, मिरची, मसाल्याचे सामान, ऊस, औषधे, मादक पदार्थ, फळे, भाज्या, किरकोळ खाद्य पिके यांचा वावर ! डोंगराळ भाग अधिक असल्याने पिकवलेले धान्य कुटुंबाला निम्याहून कमी मुदतीतही न पुरणारे. तेव्हा मत्सोद्योग (हर्णै, रत्नागिरी, जैतापूर, देवगड, मालवण, वेंगुर्ले, शिरोडे), हातमागावरील विणकाम (म्हाप्रळ, दाभोळ, खेड, कणकवली, कुडाळ, चिपळूण, निवळी, पानवल, पालगड, मठ, खरवते, जांभारी, कट्टा), पॉटरी (म्हाप्रळ, जालगाव, लांजा, झाराप, कलमठ), तांबे-पितळ (हर्णे, चिपळूण, माखजन, रत्नागिरी, राजापूर), रंगाची माती (कुडाळ, सावंतवाडी), सिलिका सँड (कुडाळ, सावंतवाडी, मालवण), जांभा दगड (सर्वत्र), काथ्या उद्योग (वेंगुर्ले, सावंतवाडी, आरोंदा), कात उद्योग (चिपळूण, सावंतवाडी, कुडाळ, मालवण), सुगंधी द्रव्ये, औषधी पदार्थ, ताग (देवगड, सातवली, राजापूर), कातडी कमावणे (दापोली, कणकवली, गोपुरी, लांजा, मालवण, देवरुख, देवगड), मिठागरे (रत्नागिरी, मिठबाव, शिरोडे, कोचरे), बटणे तयार करणे (विजयदुर्ग), लाकडी व लाखेच्या वस्तू (सावंतवाडी) हापूस आंबा (बाणकोट, हर्णे, रत्नागिरी, पावस, पूर्णगड, देवगड, जैतापूर, मालवण, वेंगुर्ला), हरडा (बाणकोट, दाभोळ, जयगड, सैतवडा, मार्गताम्हाने), काजू मालवण, वेंगुर्ला असे दोन-तीन कारखाने, मिठाई (राजापूर, खेड), साबण (मठ), मध काढणे (प्रभानवल्ली, कणकवली, फोंडा, आंबोली), हातकागद (राजापूर), बिबे (मालवण) तेल काढणे ( अडूर, राजापूर, पाट, नारगोळी, पालघर, लांजा), बांबू (कणकवली, वेंगुर्ला, मालवण, मिठबाव) आदि व्यवसाय चालायचे. रेल्वेमार्ग अभाव, आठ महिने बोटप्रवास, मुंबई-गोवा प्रांतिक रस्ता, असमाधानकारक रस्ते, पावसाळ्यात तुटणारे दळणवळण, भांडवलाची उणीव, कच्च्या मालाचा अपुरा व अनियमित पुरवठा, विक्रीतील अडचणी अशा परिस्थितीत कोकणं उभं राहात गेलं. इतकं उभं राहिलं की देशातली ४५ पैकी ६ भारतरत्न याच कोकणाने जगाला दिली. माणसाचं खरं आयुष्य मेल्यानंतर सुरु होतं ! याची कोकणाला पक्की जाणीव असावी. आजच्या कोकणच्या एकाही बांधवाला- भगिनीला नियती उपाशी ठेवणार नाही ! परंतु ! नुसतं पोट भरण्यासाठी कोकणी माणसाचा जन्म नाही ! हे आम्ही सर्वांनी समजून घ्यायला हवंय.

कोकणात ६४ नद्यांची खोरी आहेत ! त्यातल्या वैतरणा, तानसा, कुंडलिका, भोगावती, सावित्री, वाशिष्ठी, शास्त्री, मांडवी, अर्जुना, कर्ली, तेरेखोल या कमी लांबीच्या तर डहाणू (खोंडा), नवापुर (उचेली), पालघर (सातपाटी), ठाणे, धरमतर (अंबा) रेवदंडा (कुंडलिका), मुरुड, राजपुरी केळशी (भारजा), बाणकोट (सावित्री), आंजर्ले, दाभोळ (वाशिष्ठी) पालशेत, जयगड (शास्त्री), मिऱ्या (काळबादेवी), भाट्ये (काजळी) पूर्णगड (मुचकुंदी), राजापूर (जैतापूर), वाघोटन, देवगड (अर्जुना), आचरा, कालावली (गड), कोळंब, कर्ली (मालवण) याही मोठ्या नद्या आहेत. देशातील सर्वोत्तम समुद्री किल्ले कोकणात आहेत. घाटमाथा ते कोकण यात किमान २ हजार वर्ष जुने ६४/७० छोटेमोठे घाट आहेत ! इथल्या वाल, सुरण, टाकळा, फणसबी, भारंगी, कुडा फुले, अंबाडी या हंगामी भाज्या आरोग्यदायी आहेत. आयुर्वेदाचा विचार करता अनंतवेल, गुळवेल, मुरुडशेंग, वावडिंग, मध, शिकेकाई, हरडा-बेहडा, बिब्बा, कारवी, निर्गुडी, अडुळसा, शिकेकाई, रानचमेली, सर्पगन्धा, धायटी अशा ३२० प्रकारच्या औषधी वनस्पती कोकणात सापडतात. आजमितीस त्यावर २४ उद्योग उभे आहेत. इथल्या पडीक जमिनीवर इमारती लाकूड, बांबू, वनोत्पादनास वाव आहे. देशातील २७६ पैकी ७० महाराष्ट्रात, तर ३१ सेझ कोकणात प्रस्तावित आहेत. जांभूळ, करवंद, अळू, आटकं, बोकीट हा कोकणमेवा इथली शान आहे. इथल्या तमालपात्र, लवंग, काळीमिरी, तिरफळ, चंदन, वाळा, गवती चहा, वेखंड, पुदिना, दालचिनी, जायफळ यांत क्षमता आहे. इथल्या जैवविविधतेत मेंदी पासून हिना तसेच गुलाब, मोगरा, पारिजातक, केवडा, सुरंगी, बकुळ, गुलछाडी, अनंत यांपासून अत्तर बनतो. दुर्मीळ चौसिंगा, हरण प्रजाती (दापोली), साळिंदर (Porcupine), कोकणात बिबटे, भेकर, नीलगाय, डॉल्फीन, आॅलिव्ह रिडले जातीची सागरी कासवे, शॅमेलिऑन सरडा, सर्वात छोटे पिसूरी हरीण (mouse deer), खवले मांजर (Pangolin) आदि वन्यजीवनाने कोकण समृद्ध आहे. निलगिरी वूड पिजन, पाचू कवडा (हरियाल/ कबुतरासारखा), घुबड (brown wood owl Guhagar), ग्रेट पाईड, मलबार पाईड होर्नबिल, मोठा धनेश (horn bill), गिधाडे, सर्पगरुड, समुद्र गरूड (दापोली), ग्रे हेडेड बुलबुल, ब्राऊन हेडेड बुलबुल, ग्राऊंड ब्रश, टिकेल्स ब्लू फ्लायकेयर, व्हाईट ब्लू फ्लायकेयर, पराडाईज फ्लायकेयर, ओरियंट डॉर्फ किंगफिशर ऊर्फ तिबेटी खंडय़ा, इंडियन पिट्टा (नवरंग), मलबार ट्रॉगॉन’ (मलबारी कर्णा), उडता सोनसर्प दुर्मीळ साप ! भगव्या / रंगीत वटवाघूळ येथे पाहायला मिळतात. मायग्रेटेड स्थलांतरित पक्षी यांचा विचार करता शेकाटय़ा (ब्लँक विंग स्टील्ट) या पक्ष्याशी साधर्म्य साधणारा ऑस्ट्रेलियन शेकाटय़ा, सीगलपक्षी (सप्टेंबर) येथे दिसतात. आंबोलीचा जंगलपट्टा, तिलारीचा परिसर, मालवण तालुक्यातील काळसे-धामापूर, कुडाळचे पांग्रड मध्ये दुर्मीळ पक्षी वावरतो.

आमचे बीच आधुनिक व्हायला हवेत. मुरुड (दापोली)च्या बीचला महर्षी कर्वेंचे नाव द्यावे म्हणून सविता गोखले (अमेरिका) यांनी प्रयत्न केले. या नावाची ५ हजार पोस्टकार्ड बनवून त्यांनी वाटली. आम्ही आमचीही मानसिकता बदलायला हवी. मालवणचा त्सुनामी आयलंड, स्कूबा समुद्राच्या पावसातील ३ ते ५ मीटर लाटा, हरिहरेश्वर मधली डोंगर ते समुद्र ही वाट ९ मीटर, दक्षिण कोकणातील सावित्री ते तेरेखोल दरम्यानचा जांभा दगड, गुहा, लहान-मोठ्या पुळणी, वाळूच्या टेकड्या सारे वैभव विलक्षण आहे. कोकणाला रासायनिक उद्योग नको आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया ही घोषणा सुरुवातीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष उद्योगपती रावसाहेब गोगटे यांनी सन १९७८ दरम्यान दिली होती. महाराष्ट्रातली पाहिली एम.आय.डी.सी. ही रोहेला सन १९६२ ला उभी राहिली. त्यानंतर १९७२ ला चिपळूण मग १९८० लोटे ला आली.  आज ९५ % पर्यटन व्यवसाय कोकणातील तरुण करतात. बाकी शासकीय कर्मचारी कोकणाबाहेरचे ! इथला व्यापार गुजराती, मारवाडी यांच्या ताब्यात. बेकरी, रबर, केळी, शेती केरळीयन लोकांकडे, बांधकाम व्यवसाय कामातही तोच प्रकार. मासे व्यापारात उत्तर भारतीय ! आंबा विक्री दलाल बाहेरचे ! जमिनी विकणारे दलाल कोकणातील पण विकत घेणारे कोकणाबाहेरील ! हे सारं आम्ही कोकणी माणसाने आपणहून आपल्यावर लादून घेतले आहे.

प्राचीन मूर्तीशास्त्रात कोकण समृद्ध आहे. गणेश-शतक १६ (पन्हाळेकाझी), अनेक ठिकाणी १०/१२ व्या शतकातील विष्णूमूर्ती कोकणात आढळतात. अडूर (गुहागर), मावळंगे (संगमेश्वर) येथील १२ व्या शतकातील नरसिंह, काळ-काम-परशुराम मूर्ती, श्रीराम (कसबा-संगमेश्वर), बलराम (कोळथरे), कृष्ण (माठेवाडा-सावंतवाडी), केशव (गोळप, दिवेआगर), अनंत-विष्णू (गोळप), ब्रम्हदेव (कोर्ले-कुणकावळे), कार्तिकेय  (६ मुखी-विंध्यवासिनी चिपळूण), अग्नी (खेर्डी-दत्तमंदिर), विश्वकर्मा (वावे-खेड, हातात मोजपट्टी, हातोडा, कमंडलू), शिव (शतक ६ वे) – घारापुरी लेणी, पन्हाळे, कर्णेश्वर, सूर्य : कनकादित्य कशेळी, आदित्यनारायण, सूर्यनारायण, व्याडेश्वर, थिबा राजवाडा येथे आहे. या शिवाय आर्यादुर्गा, भगवती (कोटकामते), कारंजेश्वरी (चिपळूण ८ वे शतक) आहेत. कोकणातल्या काही लेण्यांत बुद्धमूर्ती आहेत. कोकणात दाभोळला सन १५५३ सालातली, महाराष्ट्रातील सर्वोत्तम मशीद दाभोळला आहे. तिच्या पाठोपाठ कल्याणाची काळी मशीद (१६४३), भिवंडी (१७११) याही कोकणातच आहेत. कोकणातील गाऱ्हाणे घालण्याची संस्कृती, कौल घेणे, ग्रामदेवता, नारळी पोर्णिमा, पोवत्याची पुनव, गणपती, शिमगा, रमझान ईद, नवरात्र रुजवण सारं काही विलक्षण आहे. जागतिक डेस्टिनेशन ठरू पाहाणारी अश्मयुगकालीन गुहा (पालशेत-काळोशी), केळशीतील वाळूची टेकडी, कातळशिल्पे हा महत्वाचा ठेवा आहे. प्रवास सुलभ झाल्यावर, रोजगाराचा विचार करता पर्यटन गाईड हा आगामी काळात मोठा विषय ठरणार आहे. अर्थात यासाठी स्थळांची माहिती, सतत अभ्यास, वाचन करण्याची तयारी, संभाषण कौशल्य, भटकंतीची आवड आणि अपार मेहनत करण्याची तयारी, शारीरिक सक्षमता, इतिहास, संस्कृती आणि पर्यटनाबाबतचा उत्साह आवश्यक आहे. नवनवीन माहिती देणारा गाईड पर्यटकांना आवडतो. आर्थिक विकासासाठी आम्हांला मार्केटिंग यंत्रणा अद्ययावत करावी लागणार आहे. आमच्या सावंतवाडीची खेळणी, पेणचे गणपती याबाबतच्या फारश्या पोस्ट आजही व्हायरल होत नाहीत. कोकणात खूप काही चांगलं कामही सुरु आहे. आजची तरुणीही त्यात स्वतःला झोकून देते आहे. वणव्याला पळवून लावणारा योद्धा महाड तालुक्यातला भिवघरचा किशोर पवार हे यातलेच एक उदाहरण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सन २००१ साली लोकसंख्या होती ८ लाख ६८ हजार ८२५.  सन २०११ साली लोकसंख्या होती ८ लाख ४९ हजार ६५१. अर्थात लोकसंख्या कमी झाली. कोकणात सर्वत्र हेच चित्र आहे. एकही मोठा रोजगार देणारा प्रकल्प नसणे, निसर्गसंपन्न कोकणच्या पर्यटनाकडे दुर्लक्ष, अपुऱ्या दळणवळण सुविधा, २/३ गावांना मिळून एक तलाठी, पर्यटन विषयात काम करताना येणारे कायदेशीर नियमातील अडथळे, मत्स्योद्योग विकास महामंडळाला निधीची गरज आदि अनेक मुद्धे सांगता येतील. यंदा आमच्या चिपळूणात किमान ९/१० वेळा पूर आला. पावसाचं पाणी भरलं. आम्हांला त्याचं काहीही वाटलं नाही. हाच विकासामधला सर्वात मोठा अडसर आहे. कोकणाला वृक्षतोडीपासून परावृत्त करता यावे यासाठी कॅशक्रॉप वाढविण्याच्या हेतूने गेली ५ वर्षे आम्ही कोकणात, रत्नागिरी जिल्ह्यात महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने चंदन लागवड अभियान राबविण्याचा प्रयत्न केला. आजही आपल्याकडे जितकी मागणी आहे त्या तुलनेत चंदनाची उपलब्धता कमी आहे. जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. आपल्याला मत्स्योद्योग धोरण ठरविण्याची गरज आहे. अनिर्बंध आणि राक्षसी मच्छीमारीमुळे मत्स्यसाठे नष्ट होण्याचा धोका संभवतो आहे. हे टाळण्यासाठी माशांच्या प्रजनन काळात मच्छीमारीस असलेल्या बंदीचे काटेकोर पालन व्हायला हवे. दोडामार्गच्या जंगलात कुडासे-वानोशी गावात निसर्गप्रेमी तरुण प्रवीण देसाई याने आपल्या राहत्या घरी वानोशी फॉरेस्ट होम स्टे संकल्पना साकारली आहे. १० ते १२ एकर जंगलाच्या मध्यभागी त्याचे घर आहे. आजूबाजूला बागायत, जंगली वृक्षही वनस्पतीही मोठय़ा प्रमाणावर आहेत. या साऱ्याचा खूप सुंदर उपयोग केला आहे. असाच उपयोग कोकणात आणखी अनेकांना शक्य आहे.

कवी विजय चिंदरकर यांनी सन १९५८ च्या मालवण साहित्य संमेलनात...
हा सारा अन थाट हवा, अन हवीत सारी अवतीभवती !
सोलकढीची हवी भैरवी, तृप्तीच्या त्या तानेवरती !
ही कविता सादर केली होती. कवितेने आचार्य अत्रे इतके भारावले की, त्यांनी मालवणच्या साहित्य संमेलनाची सांगता ‘सोलकढीच्या भैरवीने’ झाली असा आशय पकडून संमेलनावर आपल्या मराठा वर्तमानपत्रात अग्रलेख लिहिला होता. तात्पर्य हे की कोकणातल्या प्रत्येक गोष्टीत नजाकत आहे. आजच्या मार्केटिंगच्या दुनियेत त्याचे नीट गणित साधता आले तर सारे प्रश्न संपतील. रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करावे ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोकणसाठी स्वतंत्र बजेट, कोकण पर्यटनाचे स्वतंत्र नियोजन, मुंबई सहित कोकणातील पाच जिल्ह्याच्या पर्यटनाला दिशा आणि गती देण्याबाबत सर्वच सरकारे अनुकूल असतात. तरीही काहीही घडत नाही. नव्याने तयार झालेल्या पालघर जिल्ह्याची पर्यटन क्षमता खूप आहे. अर्नाळा-कळंब बीच, केळवा-माहीम बीच, डहाणू-बोर्डी आणि जव्हार यातून पालघरची आजची अर्थव्यवस्था साडेतीनशे कोटी इतकी आहे. जिल्ह्यात अशीच अजून ७ पॉकेट तयार होऊ शकतात, असे स्थानिकांचे मत आहे. यात आशापुरा-एडवण, शिरगाव बीच, तारापूर-चिंचणी बीच, नरपड-चिखला बीच, आशेरी-नानिवली, कोकणेरे-तांदुळवाडी, नाणे-सांगे, ग्रामीण पर्यटन ऐनशेत यांचा समावेश होऊ शकतो. असाच विचार कोकणातील इतर पर्यटन जिल्ह्यांचा सहज करता येईल. कोकणात कृषी पर्यटनाला आवश्यक पोषक वातावरण आहे. शहरातील प्रदुषणादि विषयांमुळे गावाकडे चलाम्हणण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व्यवसायाची जोड देता येऊ शकते. या दोन्हीची सांगड घालीत कृषी पर्यटनकोकणात अनेक गावात रुजले आहे. कृषि पर्यटनाचा उगम ऑस्ट्रेलिया मध्ये ६५ वर्षापूर्वी झाला. आपल्याकडे महाराष्ट्रात कर्जत-रायगड येथे सगुणा बाग नावाने शेखर भडसावळे यांनी पहिल्यांदा याची सुरुवात केली. सन २००१ ते २०१८ दरम्यान देशातील सोळा लाख हेक्टर्सवर असलेले ट्री-कव्हर साफ झाले आहे. अंदाजे पाच गोवा राज्ये झाड रहित झालीत. सन २००० साली आपल्याकडे जेमतेम १२% असलेले वृक्ष-कव्हर आज ८.९% उरले आहे. नवी घरे बांधताना, त्यात ५० अंश तापमानाला सहन करणारी वातानुकूलित यंत्रणा बसवून घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. हे सारे कोकणात पण झालंय ! हे दुर्दैवी आहे. लोटे एम.आय.डी.सी.त केमिकल कंपन्याआणण्यात आल्या, त्याचे परिणाम परिसरातील नागरिक भोगत आहेत. केमिकल जमिनीत झिरपून पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत. याव्यतिरिक्त असलेल्या कोकणातील किती एम.आय.डी.सी.त लोकांना कायम स्वरूपी नोकऱ्या मिळाल्यात हा अभ्यासाचा विषय आहे. बारामती, पुणे भागात प्रदूषणमुक्त अॅटोमोबाईल कारखाने, आय.टी. हब उभे राहिले. निसर्गरम्य कोकणात असे प्रकल्प आणणे दुर्दैवाने लोकप्रतिनिधींना तेव्हा जमले नाही, आज तर त्याहून जमत नाही आहे. दोष कोणाला द्यायचा ? विशेष कौतुक हे की परदेशात, ज्या कंपन्यांनी पर्यावरणाचे वाटोळे केले असे रसायनी-पाताळगंगा, महाड, खेड-लोटे भागात कारखाने मजेत सुरू आहेत. नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित करून घेतला आणि त्याला जीवघेण्या प्रदुषणापासून वाचवले. दुर्दैवाने तिथेही भरमसाठ वृक्षतोड सुरु आहे. कोकणात टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, महेंद्रा यांचे प्रदूषण न करणारे कारखाने, अॅटोमोबाईल, आय.टी., फुड प्रोसेसिंग उद्योग यायला हवेत. कोकणच्या भवितव्यासाठी तेच योग्य आहेत.

कोकणाला लाभलेला समुद्रकिनारा, जैवविविधता, निसर्ग, फळफळावळे, चौपदरीकरण होत असलेला महामार्ग, सागरी महामार्ग, बंदरे आणि जलवाहतुकीला चालना देण्याचा सरकारचा विचार, कोकण रेल्वे कोल्हापूरला जोडण्याचा प्रयत्न, पर्यटन, कृषी, ग्रामीण आणि नाविन्यपूर्ण पर्यटन, आधुनिक शेती, फलोद्यान, फळ व अन्न प्रक्रिया उदयोग, पूरक लघुउदयोग, विरार ते अलिबाग फ्री वे, दीघी फ्रेट कॉरिडोर, चिपी-सिंधुदुर्ग आणि पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ यांतून कोकणच्या भूमीचे भवितव्य उज्ज्वल आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, कोकणात होत असलेल्या हायवे चौपदरीकरण मार्गावर, काही रेल्वेस्टेशनवर, होऊ घातलेल्या एअरपोर्ट परिसरात कोकणातल्या मातीत पिकणारे, तयार होणारे, खाद्यपदार्थ, वस्तू, खेळणी, आयुर्वेदिक औषधे असे सारे काही एकत्रित मिळू शकेल अशा अस्सल कोकणी मॉलची (डी-मार्टच्या धर्तीवर) साखळी उभी होणे अत्यंत आवश्यक आहे. या एका कल्पनेतून भरमसाठ रोजगार निर्मिती शक्य आहे. अर्थात त्यातही कोकणी माणूस किती असणार ? हा प्रश्न आजही आम्हांस सतावतो आहे. त्याचा आपणहून विचार करून कार्यरत होणारी कोकणी पिढी या भूमीला ‘जगातील सर्वाधिक संपन्न भूमी’ बनवू शकते. कोकणचे भवितव्य कोकणच्याच हातात आहे. गरज आहे, ती ठाम विचाराने कार्यरत होण्याची !

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.          
मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुढारी अलिबाग आणि मासिक शब्ददीप सांगली)



              

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...