रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

रत्नागिरी जिल्ह्यातील किल्ले संवर्धन


छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या दुर्गांचे संवर्धन हा महाराष्ट्रीयनांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे यावर सर्वांचंच एकमत आहे. शासनही अधूनमधून या विषयात काहीतरी करत असते. या साऱ्यांतून प्रत्यक्षात किल्यांवर काय घडते ? याची जाणीव सह्याद्रीत डोळस भटकंती करणाऱ्या जवळपास सर्वांनाच आहे. निसर्गाला आणि निसर्गातल्या कोणत्याही पुरातत्त्वीय अवशेषाला धक्का न लावता, तिथली साफसफाई राखून तात्पुरत्या स्वरुपात, भेट देणाऱ्या समूहाला आकर्षित करणारे काही करता येत असेल तर ते व्हायला हवे, या मताचे आम्ही आहोत. या निमित्तानं गडकिल्यांचं महत्व, इतिहास, पावित्र्य राखता येऊ शकतं. त्या त्या भागात गड किल्यांकडे स्थानिक संस्था, तरुण उत्साही मंडळी कायम आत्मियतेने पाहात असतात. या वास्तूंच्या स्वच्छता, संवर्धनात आपापल्या क्षमतांनुसार भूमिका बजावित असतात. सतत काहीनाकाही कृतिशील उपक्रम राबवित असतात. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यांतील किल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन विषयात सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा आढावा !

सन २०१७ साली जागतिक पर्यटन दिनी किल्ले मंडणगड येथे ब्ल्यू ग्रीन एक्झॉटिकाने तालुक्यातील तायक्वांदो आणि महाविद्यालयीन तरुणांच्या मदतीने स्वच्छता मोहिम राबविली होती. मंडणगड तालुक्यातील बाणकोटच्या ऐतिहासिक किल्ले हिंमतगडच्या प्रवेशद्वारासमोरील बुरुजाला लागून सन २०१४ पूर्वी एका टाकीचे बांधकाम करण्यात आले. ती टाकी त्वरेने पाडण्याची मागणी करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने हे काम करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालकडून मिळाल्याचे सांगितले होते. श्रीवर्धनच्या शिवछत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानने चालूवर्षी मे महिन्यात बाणकोट खाडीकिनारी असलेल्या किल्ले हिम्मतगड येथे स्वच्छता मोहिम राबविली. दापोली तालुक्यातल्या हर्णै गावात सुवर्णदुर्ग, गोवागड, कनकदुर्ग आणि फत्तेदुर्ग अशी प्रसिद्ध दुर्गचौकट आहे. या किल्यांकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी बा रायगड परिवार, क्षेत्र सुमारगड संवर्धन समिती वाडीमालदे, शिवसह्याद्री समूह या संस्थांच्या २५ सदस्यांनी ‘सुमारगड संवर्धन मोहीम' राबविली. या अंतर्गत गडावरील वास्तू / अवशेष मोजमाप नोंदी, नकाशा स्थाननिर्देश निश्चिती, गडावरील तीन टाकीच्या वर असलेल्या टाकाची स्वच्छता, न्हानचं टाकच्या बाजूला असलेल्या भुयाराची स्वच्छता, वाडीमालदे ते किल्ले सुमारगड मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आला. याचवर्षी पुन्हा जून महिन्यात ‘स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान’ संस्थेने सुमारगड संवर्धन मोहिमेंतर्गत वृक्षारोपण केले. किल्यावरील महादेव मंदिराच्या वरील बाजूस जास्वंद, बाभूळ, एरंड जांभूळ जातीच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. यंदाच्या जुलै महिन्यात किल्ले रसाळगडाच्या कोठाराची भिंत ढासळली. गेल्या १० वर्षांत या किल्यावर ‘संवर्धन’ अंतर्गत शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असणारा रसाळगड राज्य शासनाने २००२ साली पर्यटन विकास व संवर्धन करण्यासाठी राज्य संरक्षित स्मारक म्हणून जाहीर केला. संवर्धनात पुरातन सात थरांची दीपमाळ पाच थरांची झाली आहे. गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता पोहोचवण्यात आला. दोन दशकांपूर्वी दुर्गम असलेला किल्ला पर्यटक व इतिहासप्रेमींच्या जवळ आला. किल्ल्यावर दरवाजा, पायऱ्या, कोठार, तोफा, इमारती, बुरुज, मंदिर परिसर यांवर शासनातर्फे खर्च करण्यात आला. सन १९९० पासून या किल्याची डागडुजी चर्चेत आहे. या किल्यावर वीज आली आहे. किल्याच्या डागडुजीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रत्नागिरी गडकोट वाचवा समितीने केला होता. सन २०१४ साली किल्याच्या तटबंदीलगत ७०० झाडांचे रोपण करण्यात आले होते.  

गेली सतत ५ वर्षे कार्यरत, विविध पुरस्कारांनी सन्मानित ‘राजे सामाजिक प्रतिष्ठान’ हे किल्ले गोविंदगड (गोवळकोट) संवर्धनातील एक महत्त्वपूर्ण नाव आहे. तीन वर्षांपूर्वी गोवळकोट धक्क्यावरील पुरलेल्या अवस्थेत असलेल्या सहा तोफा गोविंदगडावर संरक्षित करण्याचे महत्वाचे काम या संस्थेने केले आहे. या कामी ग्लोबल चिपळूण टुरिझम, करंजेश्वरी देवस्थान आदि संस्थांनीही महत्वाची भूमिका बजावली होती. प्लास्टिकमुक्त गडकिल्ले मोहिमेंतर्गत या किल्याची स्वच्छता, शिवजयंती, त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव, पर्यटकांना मार्गदर्शन, वृक्षारोपण, संवर्धन या विषयात संस्था कार्यरत आहे. संस्थेला ‘सह्याद्री सन्मान पुरस्कार’ आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा ‘समाजसेवा’ पुरस्कार मिळालेला आहे. दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी या संस्थेला स्वच्छता मोहीम, गडाला उर्जितावस्था आणण्याकरिताचे प्रयत्न यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व वस्तूसंग्रहालये संचालनालय मुंबई यांच्यातर्फे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, प्रधान सचिव पर्यटन, गड संवर्धन समितीचे प्रमुख मार्गदर्शक पांडुरंग बलकवडे, पुरातत्व व वस्तूसंग्रहालयाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.

सन १९६० साली तीनशे रुपयांना विकला जाऊन खाजगी मालकीत अडकल्याचे उजेडात आल्यानंतर गेली १५ / १६ वर्षे सतत चर्चेत असलेला अंजनवेलचा गोपाळगड किल्ला राज्य संरक्षित स्मारक झाला. तरीही किल्याच्या आधुनिक लोखंडी ग्रीलच्या दरवाजावर दोन ठिकाणी कुलूप लावले असल्याचे, पश्चिमेकडील आणखी एक दरवाजाही ग्रील आणि काट्या-कुट्या टाकून बंद केलेले मध्यंतरी आढळले होते. या पार्श्वभूमीवर शिवप्रेमींनी आवाज उठविल्यावर हे कुलूप काढण्यात आले. साधारणतः १५ / १६ वर्षांपूर्वी सतीश झंजाड आणि बबन कुरतडकर या गिरीमित्र प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी गोपाळगडची शासन दरबारी विक्री झाल्याच्या विरोधात पहिल्यांदा आवाज उठवला होता. तेव्हापासून अनेकांनी हा विषय लावून धरण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अलिकडच्या काळात स्थानिक शिवतेज फौंडेशननेही या किल्याच्या संरक्षणार्थ दखलपात्र काम केले आहे. या किल्याच्या संवर्धनासाठी यापूर्वी दीपक वैद्य, शिवतेज फाऊंडेशन, अॅड. संकेत साळवी, मनोज बारटक्के, सत्यवान घाडे, सुहास जोशी, गिरीमित्र डोंबिवलीचे मंगेश कोयंडे, खेडचे वैभव खेडेकर, दुर्गवीर संस्थेचे संतोष हासुरकर, अजित राणे आदिंनी प्रयत्न केले होते. तळ कोकणातल्या एखाद्या किल्याच्या मुक्ततेसाठी वर्तमान शतकात दिला गेलेला हा सर्वात मोठा लढा आहे. गुहागर तालुक्यातील तवसाळचा विजयगड राज्य संरक्षित व्हावा याकरिता ग्रामस्थांनी यावर्षीपासून सह्यांच्या मोहिमेद्वारे प्रयत्न सुरु केले. गावातला शिवजयंतीचा उत्सव गडावर साजरा होतो. विजयगडावर मार्च २०१६ मध्ये १० फुट खोल संशयास्पद खोदकाम, शेजारी, नारळ, उदबत्ती, दही आढळून आलेले होते.  

चालू वर्षाच्या सुरुवातीस रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील निगुडवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत शिवकालीन किल्ले महिमतगड स्वच्छता आणि संवर्धन मोहीम हाती घेतली. नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेल्या चाकरमानी मंडळीनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी प्रयत्न सुरु केला. ऑक्टोबर २०१८ पासून या कामाला सुरुवात झाली. तालुक्यात प्रचितगड आणि महिमतगड असे दोन किल्ले आहेत. या गडाचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा म्हणून ग्रामस्थ गेली अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी, गावाजवळ असलेले ऐतिहासिक वैभव आपणच संवर्धित करायचे या निर्णयाने ग्रामस्थ प्रेरित झाले. या शिवकालीन गडाचे संवर्धन करण्याचा एकमुखी ठरावही केला आहे. मोहिमेअंतर्गत गडाकडे जाणारी वाट, प्रवेशद्वार स्वच्छ करण्यात आले. मार्गावर दिशादर्शक फलक उभारण्यात आला. झाडा-झुडपांनी, वेलींनी वेढलेल्या भिंतीनी मोकळ्या केल्या. यासाठी १०० पेक्षा अधिक जण कार्यरत होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये याच महिपतगडावर ‘ट्रेकशिरीष’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले होते. तेव्हा पावसामुळे गडावर गवत वाढून गडाचा दरवाजा झाकला गेला होता. काही प्रमाणात तटबंदीची पडझड झाली होती. पाण्याच्या टाक्यांमध्ये प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या पडल्या होत्या. या साऱ्याची स्वच्छता करण्यात आली. ‘सह्यकडा अॅडव्हेंचर्स’ संस्थेच्या शिलेदारांनी डिसेंबर २०१६ मध्ये संगमेश्वर तालुक्यातील किल्ले भवानीगड ट्रेक दरम्यान स्वच्छता मोहिम राबविली होती. ट्रेकिंग करून दमलेले असताना या टीमला तिथल्या अस्वच्छतेने अस्वस्थ केले. मंदिराच्या एका कोपऱ्यात ठेवलेले खराटे, झाडू त्यांना दिसले. त्यांनी इथल्या मंदिरातील कचरा, जाळ्या, जळमटे, पालापाचोळा, इतस्त पडलेल्या लग्नपत्रिका आदिंची स्वच्छता केली. मंदिरातील मूर्ती, घंटा स्वच्छ केल्या. वस्तू नीटनेटक्या ठेवल्या. गडावर असलेली एकमेव तोफ स्वच्छ केली. रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या कुंडी-निगुडवाडी गावच्या सीमेवर असलेला महिपतगड (मेहमानगड) सुस्थितीत रहावा, तिथली साफसफाई व्हावी, ऐतिहासिक वस्तू, वास्तू व्यवस्थित राखली जावी यासाठी ग्रामस्थांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या उपस्थितीत गडावर दरवर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्ट्रदिनाला ध्वजवंदन केले जाते. यावेळी स्वच्छताही केली जाते. गड चढाईसाठी सोपा, पोहचण्यास लागणारा कमी कालावधी यांमुळे पावसाळा वगळता इथे शिवप्रेमी, पर्यटक, ग्रामस्थांची वर्दळ असते.

राजा शिवछत्रपती परिवारातर्फे राज्यभर किल्ले स्वच्छता आणि संवर्धन, पर्यावरण संरक्षण मोहिमा सुरु असतात. किल्ले जयगड या ठिकाणीही गेली दोन वर्षे ही संस्था आपली मोहिम राबवते आहे. राज्यभरातून जवळपास पाचशे कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होत असतात. संस्थेने यावर्षी राबविलेल्या मोहिमेत राज्याच्या २१ जिल्ह्यातून सहाशे कार्यकर्ते एकत्र आले होते. किल्ले जयगड स्वच्छतेत संपूर्ण किल्याचा परिसर, बालेकिल्ला, खंदकाची सफाई, तटबंदीवरील झुडपे काढणे, परकोट सफाई, बुरुज स्वच्छता करण्यात आली. सन २०१५ साली पावसाळ्यात मावळा प्रतिष्ठान परिवाराने भगवती देवी ट्रस्टच्या मदतीने रत्नदुर्ग किल्यावर दोन दिवशीय स्वच्छता आणि संवर्धन मोहिम राबविली होती. या अंतर्गत वृक्षारोपण, विहिरांची साफसफाई, परिसर सफाई करण्यात आली. रत्नागिरीतील जिद्दी माउंटेनिअरिंग ही संस्था रत्नदुर्गसह विविध किल्यांवर स्वच्छता आणि संवर्धन मोहिमा सातत्याने राबवित असते. संस्थेची रत्नदुर्ग किल्ला परिसर स्वछता व संवर्धन मोहिम गेली ५ वर्षे सातत्याने सुरु आहे. संस्थेच्या ट्रेकिंग उपक्रमातही सहभागींना किल्ले स्वच्छता याबाबत मार्गदर्शन केले जाते. परिसरातल्या समुद्र स्वच्छतेच्या कामातही ही संस्था पुढाकार घेत असते. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या, रत्नागिरी-पावस-आडिवरे-कशेळी-राजापूर या सागरी महामार्गावर असलेल्या महत्वाच्या पूर्णगड किल्याची ढासळलेली तटबंदी जांभा दगड वापरून, पुरातत्व विभागातर्फे दुरुस्त करण्याचे काम, दोन चबुतरे बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. हा संपूर्ण किल्ला फिरण्यासाठी पर्यटकांना अर्धा तास लागतो.

लांजा तालुक्यात साटवली गढी / भुईकोट किल्ला हा पाच बुरुजांचा आहे. याच्या संवर्धन आणि स्वच्छतेसाठीही दुर्गवीर प्रतिष्ठान रत्नागिरी, शिवगंध ढोल पथक, लांजा आणि स्थानिक ग्रामस्थ, तरुणांनी यावर्षी पुढाकार घेतला. चालू वर्षी मे महिन्यात श्रमदान करून गढीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. मोहिम राबविण्यापूर्वी या संस्थांनी तरुणाईला सोशल मिडीयाद्वारे एकत्र येण्याचे आवाहनही केले होते. स्वच्छतेपूर्वी गढीला झाडा-झुडुपांनी पूर्णतः घेरलेले होते. या टीमने वाढलेली ही झुडुपे बाजूला करण्याबरोबरच कचरा आणि गवतही साफ केले. राजापूर जवळच्या नाटे गावातील किल्ले यशवंतगडाची हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान (राजापूर), शिव संघर्ष संघटना (नाटे), राजा शिवछत्रपती परिवार आणि शिवप्रेमींकडून किल्ल्याची साफसफाई केली जाते. गतवर्षी जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सदस्यांनी २४, २५ नोव्हेंबरला येथे संवर्धन मोहिम राबविली होती. मोहिमेंतर्गत गडाचा दरवाजा, तटबंदी, चौथरे स्वच्छ करण्यात आले. यासाठी स्थानिकांसह एकूण ३५ जणांनी मोहिमेत सहभाग घेतला होता. किल्ले यशवंतगडाची विक्री झाली आहे. सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार गडाची मालकी विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्याकडे आहे. त्यांनी हा किल्ला ९९ वर्षांच्या कराराने आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना विकला आहे. १८ ऑक्टोबर २०१२ रोजी ३५ लाख रुपयांना या गडाची विक्री झाल्याचे, माहिती अधिकाराचा उपयोग करून समीर शिरवडकर यांनी जाहीर केले होते. राजापूर शहरातील किल्ला अर्थात ब्रिटीश वखारीची पुनर्बांधणी करून तिथे पुरातन वस्तूसंग्रहालय आणि कलादालन उभारण्याच्या दृष्टीने पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेब्रुवारी २०१९ मध्ये पत्र दिले आहे. या वखारीचे जतन व्हावे यासाठी स्थानिकांनी नवा आराखडा तयार केला आहे. अर्जुना नदीकिनारी असलेली ही वखार ब्रिटिशांनी सन १७०८ मध्ये बंद केली. त्यानंतर बराच काळ इथे सरकारी कचेऱ्या कार्यरत होत्या. इमारत मोडकळीस आल्यानंतर काही सकारात्मक घडेल या हेतूने अनेक वर्षे शासन दरबारी प्रयत्न करून अपयश आल्यावर सन २००४ मध्ये राजापूर नगरपरिषदेने / सार्वजनिक बांधकाम विभागाने ही वखार पाडली. सध्या ही वखार राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित आहे. या वखारीतून ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी शिवरायांच्या हालचाली लंडनला कळवित असतं.

भौगोलिक रचनेमुळे आपल्या सह्याद्रीत दुर्गांची विविधता अधिक आहे. महाराष्ट्र हे मोठ्या संख्येने गड-किल्ले असलेले देशातील एकमेव राज्य आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचा स्वतंत्र इतिहास, भौगोलिक महत्व आहे. हिंदवी स्वराज्यासाठी किल्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. गेल्या काही वर्षांपासून गडकिल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धन कामाला चांगले दिवस येताहेत. ठिकठिकाणच्या शिवप्रेमी संघटना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ही कामे आपणहून करत आहेत, हे अभिनंदनीय आहे. हे करत असताना संवर्धनाच्या नियमांना धरून करणे आवश्यक आहे. इतिहासाचा अभ्यास आणि गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन हे स्वतंत्र अभ्यासण्याचे विषय आहेत. संवर्धन करताना वास्तू सर्वेक्षण, पुरातत्त्वीय, जीआयएस, रेखाटने आदिंचा उपयोग करून किल्ल्याची विविधांगी ऐतिहासिक माहिती गोळा करता येते. या माहितीच्या आधारे किल्ल्यावरील पुरातन वास्तू, स्थळांचा शोध घेतला जाऊ शकतो. साऱ्या लेखी नोंदी ठेवता येतात. शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने किल्ले किंवा पुरातन वास्तू जतन करण्यासाठी तयार केलेल्या दत्तक योजनेचाही विचार केला जाऊ शकतो. या योजनेच्या आधारे किल्ला संवर्धनासाठी दत्तक घेता येऊ शकतो. स्वच्छता आणि संवर्धन या विषयात काम करणाऱ्या संस्थांनी दत्तक योजनेत पुढाकार घेतला तर गड-किल्यांचे पावित्र्य अधिक जपले जाईल !

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी.            मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(पूर्वप्रसिद्धी : दुर्गांच्या देशातून दिवाळी अंक २०१९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...