शनिवार, ९ नोव्हेंबर, २०१९

प्रभाव बालोपासनेचा !


जन्मलेला प्रत्येक जीव आपापल्या कर्मबंधनाने बद्ध असतो. कर्तव्यपरायणतेला कर्तव्यबुद्धीची जोड मिळाली की मानवी जीवनाचं सार्थक होतं. नेमकं इथंच ‘गुरु’तत्त्व कार्यरत असतं. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मानवी जगण्याचे, सण, उत्सव आणि परंपरांचे सारे संदर्भ बदलले आहेत. तरीही परंपरांचे महत्त्व कमी होत नसून काळाच्या रेषेवर ते अधिक अधोरेखित होत आहेत. आजच्या (२०२०) ‘गुरुपौर्णिमा’दिनी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करताना जीवनातील गुरू प्रभावामुळे मानवी विचारात परिवर्तन प्रक्रिया घडण्याच्या वाटेवरील आठविलेली, 
‘प्रभाव बालोपासनेचा’ ही गोष्ट !

मानवी जीवनावर वयोमानपरत्वे निसर्गशक्तीनुरूप घडणाऱ्या घटनांचा, परिस्थितीचा, वातावरणाचा, संपर्कात येणाऱ्या माणसांचा प्रभाव पडत असतो. साऱ्या प्रभावाच्या मूळाशी एखाद्या घटित घटनेचा अन्वयार्थ दडलेला असतो. तो समजून घेण्यासाठी मनुष्याला स्वत:बाबतचे नीटसे आकलन, स्वतःची ओळख असावी लागते. एकदा का ती ओळख सापडली की मग पुढची दिशा निश्चित करणे सोपे होते. निश्चित झालेल्या दिशांवरून मार्गक्रमण करीत आपल्या जीवनातील निसर्ग नियोजित ध्येयाला गवसणी घालणे अनेकांनी शक्य करून दाखविले आहे. आपणही ते करू शकतो. निसर्गशक्तीच्या साहाय्याने नीट योगक्षेमवहायला स्वतःचा शोध घेता यायला हवा. कठोर परिश्रमांची तयारी हवी. साधना हवी. सतत मनन, चिंतन करून अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मूळाशी जाण्याची तयारी हवी. स्वतःत डोकावत, माझ्यातल्या मला जागं करणारा प्रभावशोधण्यासाठी बालपणात पोहोचलो तेव्हा मला झालेला हा उलगडा !  

माझ्या जन्माच्या दरम्यान वडील, कोयना जलविद्युत प्रकल्पाची कार्यालयीन वसाहत असलेल्या कोकणातील चिपळूण तालुक्यातील अलोरे गावच्या शाळेत रुजू झाले होते. जवळच्या दापोली तालुक्यातील केळशी या मूळगावाहून, सहा महिने वयाच्या माझा मुक्काम अलोरेत हलला. महाराष्ट्रातील सुशिक्षितांचे नगर अशी ओळख मिळविलेल्या अलोरेत बालपण जगलेल्या प्रत्येकाच्या मनात तिथल्या आठवणींचा शब्दशः सुखद ठेवा आहे. तसा तो माझ्याही मनात आहे. प्रभावाच्या मूळाशी जाताना एक आठवण ठळकपणे समोर आली. तेव्हा मी दहा-अकरा वर्षांचा होतो. सन १९९०/९१ साल असावे. बेळगाव निवासी परमपूज्य आई श्रीकलावती देवी कृत बालोपासनाउपक्रम अलोरेत नुकताच सुरु झाला होता. राम कदम (काका) यांनी गावात सुरुवातीला हा उपक्रम आपल्या घरी सुरु केलेला. मात्र जसजशी सहभागी होणाऱ्या मुलांची संख्या वाढत गेली तसतशा जागा बदलत गेल्या. मला बालोपासना समजली तेव्हा ती दर रविवारी सकाळी ८ ते ९ या वेळेत अलोरे बस स्थानकानजिक मराठी शाळेच्या खोल्यांत व्हायची. बालोपासनेनंतर शिरा, उपमा, पोहे, भडंग, केळी, चिक्की, लाडू (विशेषत रव्याचे) आदि कोणतातरी प्रसाद मिळायचा. बालगोपाळांत उपासनेपेक्षा प्रसादाचीच चर्चा अधिक व्हायची. प्रसादाची चव न चाखताच निव्वळ चर्चांद्वारे ती चव तोंडावर रेंगाळू लागल्याने पुढे कधीतरी एका रविवारी मी बालोपासनेस पोहोचलो. घरातील वातावरण अध्यात्मिक असल्याने जाण्यास विरोध व्हायचा प्रश्नच नव्हता. बालोपासनेतलं भारलेलं सकारात्मक वातावरण, सहकार्यभावना, बालोपासना पुस्तिका, त्यातला उपस्थितीचा रकाना, त्यात उपक्रम आयोजकांच्या होणाऱ्या सह्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्ष प्रसादाचा जीभेवर रेंगाळलेला गोडवा या साऱ्याने मी भारावून गेलो होतो.

सहभागाच्या पहिल्याच रविवारी तासाभराच्या त्या वेळेत ‘...ज्ञानभास्करा शांतीसागरा, भक्तमनोहर मुकुण्दा, परमौदारा भवभय्हारा, रखुमाईवरा सुखकंदा ! पाप ताप दुरीतादी हराया, तुची समर्थ यदुराया, म्हणोनी तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया !म्हणून झाल्यावर ओवाळू आरती माता कलावती । पाहता तुझी मूर्ति मनकामनापुर्ती ।धृ.।अशी आरती झाली. इकडे माझ्या मनात मात्र, ‘आज खाऊ काय असेल ?’ याचा विचार सुरु होता. बालोपासना प्रार्थना संपली. त्या वयात घरातही सर्वाधिक आवडणारा शिऱ्याचा प्रसाद मिळाला. घरातलं बारमाही अध्यात्मिक वातावरण, पावित्र्यं आई सांभाळायची. श्रावणात, वडील ग्रंथवाचन करायचे. आम्ही भावंडे ऐकायला बसत असू ! नाही बसलो तरीही कोयना प्रकल्पातल्या त्या जीवनटाईप छोट्याश्या चाळीतील कोपऱ्यावरच्या घरात कुठल्याही खोलीतून ग्रंथ वाचनाचा आवाज कानावर यायचाच ! मनातल्या मनात असलेला तो अध्यात्मिक संदर्भ बालोपासेनेशी लिंक झाला. बालोपासनेची मला गोडी लागली. इतकी की एकही रविवार चुकवायची इच्छा नसायची. का ! कुणास ठाऊक ? मनापासून तिथे जावेसे वाटायचे. प्रसादाची गोडी हेही एक कारण होतेच ! आई-वडीलांनी सांगितलंय म्हणून अंगळ-टंगळ करीत, पुढे मागे हालत, मधले मधले शब्द सहज गाळत, जेव्हढ्या लवकर संपेल तेवढी बरी असं म्हणतही काहींची बालोपासना तेव्हा सुरु असायची. बाळगोपाळांस सूचनापासून सुरूवात होऊन शेवटी गोपाळकृष्ण महाराज की जयम्हटलं की आजूबाजूचे काहीजण पूर्ण श्वास घ्यायचे ! संपली एकदाची ! ते वयही तसचं होतं म्हणा ! या बालोपासनेला स्थानिक दीड / दोनशे मुलं जमायची. नवीन वर्ष सुरु झालं की गावच्या करमणूक केंद्रात कधीतरी वार्षिक सप्ताह भरायचा. सप्ताहात गुळाच्या पाकात एकत्र केलेल्या पोह्याचा प्रसाद दिला जायचा. तो तर मला जाम आवडायचा. एकूणात काय तर मज्जाचमज्जा असायची. पुढे ही बालोपासना गावात २००४ पर्यंत चालू राहिली. असो ! माझे बालोपासनेसोबतचे सुखद जगणे सुरु होते. कधीकधी ती सारी पुस्तिका वाचायचा मलाही कंटाळा यायचा. मग पुन्हा प्रसादाची आठवण व्हायची. दरम्यान, मनातल्या मनात गडबडलेला सूर जुळवून मी बालोपासना म्हणण्यात दंग व्हायचो.

सन १९९२ / ९३ साल असेल. पावसाळा सरत आला होता. लहानपणी वडिलांनी, मूळगावी केव्हातरी असलेल्या कटलरीदुकानाच्या धर्तीवर अलोरेत दुकान सुरु केलं होतं. आई ते सांभाळायची. कालांतराने ते बंद करावं लागलं. पंचक्रोशीतल्या वार्षिक यात्रोत्सवात आम्ही दुकान सुरु केलं. स्वतःच्या आर्थिक क्षमतेपेक्षा अधिकची गुंतवणूक करून वडील मुंबईतून यात्रांकरिता आकर्षक खेळणी साहित्य आणायचे. साऱ्या यात्रांतून खेळण्याच्या दुकानातून होणाऱ्या विक्रीतून त्यावर्षी केलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्क्याहून अधिक किमान व्यवसाय झाल्याचे मला आठवत नाही. नफा तर दूरच राहिला. दुकानातल्या वस्तू मात्र यात्रेत भाव खाऊन जायच्या. त्या वस्तू बघायला म्हणून अनेकजण हमखास यायचे. तर या यात्रांतून शिल्लक राहणारा बराचसा माल वर्षभर घरी पडून असायचा. तो घेऊन गावच्या स्थानिक आठवडा बाजारात दुकान थाटण्याची कल्पना आमच्याकडे अधून-मधून येणाऱ्या सर्वात मोठ्या मावशीने मनावर घेतली. नुसती घेतली नाही तर तिने काही काळ स्वतः ते दुकान चालवलेही ! वडिलांना संसारात मदत या कारणांन्वये मग आईनेही, मावशीने सुरु केलेले आठवडा बाजारातील दुकान पुढे चालविण्याचा निर्णय घेतला. आईची तब्बेत तशी अधूनमधून यथातथा असायची. त्यामुळे ती आठवडा बाजारात, भर उन्हात दुकान घालून बसणार तर तिला डोक्यावर छप्पर घालून देणे आवश्यक बनले. बाबांनी वेल्डिंग वाल्याकडून कल्पकतेने लोखंडी सळ्यांचा मांडव तयार करून आणला. त्यासाठी जमिनीत पुराव्या लागणाऱ्या जाड लोखंडी सळ्या, त्या जाड सळ्यांना पकडून उभे करायच्या काहीश्या बारीक जाडीच्या सळ्या, त्या सळ्यांच्या टोकाला त्याचं आकाराचा कापलेला नट जोडला. चार दिशेला उभ्या राहणाऱ्या चार सळ्यांवर त्याच जाडीच्या आडव्या चार सळ्या टाकल्या आणि त्या आधाराने चादरी / बेडशीट बांधल्या की मांडव तयार व्हायचा. या आडव्या सळ्यांनाही वडिलांनी योग्य आकाराचा बोल्ट जोडून घेतला होता. तर असा हा मांडव बांधण्याचे प्रात्यक्षिक पाहाणे, लहान असलो तरीही घरात मोठा असल्याने माझ्या नशीबी आले. इतके सारे सुरु असताना निरागस अवस्थेत असलेल्या मला पुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव झालेली नव्हती. गावातल्या या आठवडा बाजाराचा दिवस असायचा नेमका रविवारचा ! झालं, मांडव घालायचा दिवस जवळ आला. आई साधारणत साडेआठच्या सुमारास बाजारात येणार असायची. अर्थात मला किमान पावणेआठ वाजता बाजारात येऊन प्रात्यक्षिकात दाखविलेला मांडव जमिनीवर घालणे क्रमप्राप्त असल्याचे लक्षात येताच माझ्या पायाखालची जमीनच हलली. पहिला विचार मनात आला तो अर्थात बालोपासनेचा होता. म्हणून सुरुवातीला मी घरी विरोध करून पहिला. पण घरात, वडीलांसमोर विरोध करायची कुणाचीच हिंमत नव्हती. मग मी लवकर मांडव घालून बालोपासनेला पळता येईल का ? असा विचार करून पहिला. मात्र जागा अडवून दुकानाचा मांडव घातल्यावर तिथे आई पोहोचल्यावरच माझी सुटका होणार आहे हे लक्षात आले. साऱ्या बाजूने माझी पुरती कोंडी झाली. फारसं कळत नव्हतं. नाहीतर कदाचित साक्षात कलावती आईलाच साकडं घातलं असतं. रविवारचा दिवस उजडला. घरातून सकाळी नेहमीप्रमाणे आवरून बाहेर पडलो. पण आज माझ्या हातात बालोपासनेचं पुस्तक नव्हतं. मी मांडव घालायला निघालो होतो. हातात मांडवाचं साहित्य होतं. बाजारातल्या ठरलेल्या जागेवर पोहोचलो. मन खट्टू झालेलं होतं. हे सारं कमी की काय ? मांडव घालायच्या जागेवरून मला बालोपासनेचं ठिकाण अस्पष्ट दिसू लागलं. जागेचा अंदाज घेऊन लोखंडी सळी हाताने उभी धरली आणि त्यावर घण घालायला सुरुवात केली. लोखंडी सळी जसजशी जमिनीत जात होती तसतशी मनातली हुरहूर दबली जाऊ लागली. घणाच्या साहाय्याने मातीत चार दिशेला रोवलेल्या चार लोखंडी सळ्यांना स्वतंत्र पकडून उभी करायची सळी सुतळीने एकीला बांधायला सुरुवात करणार इतक्यात, ‘बाळगोपाळांना सूचनाहे शब्द कानावर पडले. आवाजाच्या दिशेने कान टवकारले. इकडे तिकडे पहिले. त्या दीड-दोनशे मुलांचा, बालोपासनेचा अगदी हलका आवाज कानावर येऊ लागला. डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या. मी भर बाजारात मांडव घालत होतो. या मांडवाखाली बसून आई दिवसभर दुकान चालविणार होती. त्यातून कुटुंबाला मदत होणार होती. उमजलेल्या या शहाणपणानं सारं दु:ख गिळलं ! मला झालेलं दु:ख कदाचित आईने जाणलं असावं. तिच्या जाणण्यात प्रसादअधिक राहिला. अर्थात बालोपासनेतून घरी आल्यावर मीही प्रसादाचीच आरती ओवाळायचो ! दिवसभराचा बाजार आटोपून सायंकाळी घरी आल्यावर आईने मांडव घातल्याच्या बदल्यात माझ्या हातावर पाच रुपयांचे नाणे ठेवले. मला माझा पहिला पॉकेटमनी मिळाला. त्या पॉकेटमनीतून, ती प्रसादाची चव चाखता आली नसली तरी मनासारखं खाण्याची हौस भागू लागली. पण माझी बालोपासना सुटली ती कायमचीच !

सुजन, हो ! खरंतर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्यावरील प्रभावाचे रहस्य हे परिणामकारक सहकारात आहे. मनुष्य कितीही स्वार्थी असला तरी दिखाव्यापुरते का होईना दुसऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे. आपली पण काही ना काही सामाजिक जबाबदारी आहे ही भावना त्याच्या मनात बळ धरून असते. त्यामागेही कार्यरत असतो तो प्रभाव ! जीवनात मिळणारे व्यवहारज्ञान, मानवाला एखाद्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे हे शिकवत असते. एकीकडे हे घडत असताना जीवनाचे आद्यकर्तव्य समजून घेण्यासाठी कार्यकारणभाव समजून घेता यायला हवा. आज मी ज्या स्वरूपात समाजात वावरतो, त्यामागचा नक्की अर्थ काय ? कोणत्या कारणासाठी मी आहे ? हा प्रश्न मानवाला पडला की त्यातून आपल्यावरील प्रभावाची निश्चिती होऊ शकते. तो योग्य की अयोग्य ? हेही ठरविता येते. स्वतःच्या जीवनाचे सूक्ष्म अवलोकन करायला लागलो ही पुस्तकी शिक्षण / ज्ञान यांची सत्यता कळते. कदाचित यासाठीच लहानपणी आपल्या संस्कृतीत संस्कार देण्याची उपाययोजना केली गेली असावी. मात्र दुर्दैवाने आज जे संस्कार ४ ते १२ वर्षे वयोगटात व्हायला हवेत ते वयाच्या ६०-६५ वर्षानंतर सुरु होतील की काय ? अशी वर्तमान पिढीची स्थिती आहे. हे बदलण्याचे काम प्रभावकरू शकतो. जो आमच्या पिढीने अनुभवला. प्रभावातून विचार जन्माला येत असतात. हेच विचार आपल्याला सुखाच्या शोधार्थ आयुष्य वाया न घालविता सुखासाठी सद्गुणांची कास धरायला सुचवू शकतात. सध्या तंत्रज्ञानांच्या / सोशल मिडीयाच्या वर्तमान आविष्कारांमध्ये उपलब्ध होणाऱ्या माहितीचा प्रभाव सर्वांना संमोहित करतो आहे. अनेकदा हा प्रभाव झटकून वास्तवाकडे पाहाण्याची गरज असते. पण ते समजणार कसं ? हाही प्रश्न आहे. यासाठी अध्यात्मासारख्या गोष्टींचा आधार घेता येईल. अध्यात्म ही एक प्रचंड आंतरिक क्रिया आहे. सृजनशील माणसं सर्जनशीलतेच्या जोरावर प्रभावी बनतात. त्यात अध्यात्म असतं. सकारात्मकता असते. विषयाशी तादात्म्य पावण्याची अद्भुत क्षमता असते. सकारात्मक प्रभाव आपल्याला आपल्या आसपासच्या सार्वजनिक जागरुकतेचे मुख्य अंग बनविण्यात सहकार्य करतो. त्याचा फायदा आपल्याला व्यक्तिमत्त्व विकासात नक्की होतो. हे सारं घडावं यासाठी दुसऱ्यांपेक्षा स्वतःकडे डोळस नजरेने पाहायला शिकायला हवं. याद्वारे आपल्या जीवनाला स्पर्शणाऱ्या सकारात्मक प्रभावांची उकल होण्यास मदत होते. जीवनाकडे मागे वळून पाहाताना मला तरी हेच जाणवते.

लग्नानंतर काही वर्षांनी सासू-सासऱ्यांच्या आग्रहाने, पत्नी-मुलासोबत स्वतंत्र वाहनाने दक्षिण भारत भ्रमंतीचा योग आला. मार्गावर पहिले शहर लागले, बेळगाव ! फिरायलाच बाहेर पडलेला असल्याने आवर्जून परमपूज्य आई श्रीकलावती देवी यांच्या मंदिरात गेलो. आईंच दर्शन घेतलं. वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षी मनावर कोरला गेलेला, पक्कं घर करून राहिलेला तो संस्कारक्षम प्रभावआठवला. डोळ्यांच्या पापण्या पुन्हा ओलावल्या. चेहऱ्यावर उदासी दाटून आली. त्या उदासीचा अर्थ कळणारं कोणीही सोबत नव्हतं. बालोपासना सुटल्यानंतर त्या वातावरणाशी नंतर कधीही, कुठूनही माझा संपर्क झाला नाही. समोर आलेल्या कामाला शक्यतो नाही म्हणायचं नाही’, हे बालोपासना सुटताना सोबत आलेले तत्वकायम जपत आलो. बालवयात जे घडलं त्या प्रभावाने माझ्या अंत:करणात कामातील सकारात्मकतेचा दिवा पेटविला गेला. हा पेटलेला दिवा त्यानंतरच्या अठ्ठावीस-तीस वर्षांच्या कालखंडात दिवसागणिक अधिकाधिक प्रज्ज्वलित होत राहिला. आतून जाणविलेल्या, अचानक भेटलेल्या, संपर्कात आलेल्या विविधांगी निसर्ग शक्तींसमोर मी कायम नतमस्तक होत राहिलो. जिथे जिथे पावित्र्य, सन्मार्ग, सत्कृत्य, समाजकार्य त्या त्या ठिकाणी माझी पाऊलं आपोआप वळत गेली, आजही वळतात. मला हे वळण लावत, आयुष्य मार्गी लावणाऱ्या प्रभावशाली संस्काराचं मूळ त्यासुटलेल्या बालोपासनेत असावं !     


धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८

ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

हा मूळ लेख पाक्षिक चिंतन आदेश पुणे यांच्या 
सन २०१९ च्या 'प्रभाव' विषयावरील दिवाळी अंकासाठी 
लिहिलेला होता. कोरोना काळात नव्याने प्रसिद्ध केला आहे.
धन्यवाद !!!

दैनिक जनमाध्यम अमरावती, ५ जुलै २०२०

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी, ४ जुलै २०२० (पूर्वार्ध)

दैनिक रत्नभूमी रत्नागिरी, ६ जुलै २०२० (उत्तरार्ध)


मराठी/ हिंदी साप्ताहिक पुरोगामी संदेश (चिमूर-चंद्रपूर), ३ जुलै २०२०
साप्ताहिक लोकनिर्माण  ४ जुलै २०२० 




                

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...