शुक्रवार, २४ जून, २०१६

कोकणातील वास्तूविकास

कोकण...! स्वर्गीय निसर्ग सौंदर्याची खाण असलेले कोकण...! अपरान्तभूमी म्हणून गौरविलेले कोकण...! प्राचीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा समृद्ध वारसा सांगणारे कोकण...! बाजारूपणाचा स्पर्श न झालेले देवभूमी कोकण...! आणि आता कोकण रेल्वे पाठोपाठ येथील एकमेव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाने होत असलेल्या विकास   कामामुळे, येऊ घातलेल्या नवनवीन प्रकल्पामुळे "कायमस्वरूपी निवासी वास्तव्य ठिकाण" म्हणून, निवांतपणासाठी आणि व्यापारासाठीही कोकण जगभरातील अनेकांच्या मुखी घट्ट बसलय ! याची प्रचिती कोकणात सुरू असलेले विविध कल्पक वास्तूप्रकल्प आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता सहज येऊ शकते. त्या विषयीचे हे विवेचन...!

आधुनिक काळात कोकणही बदलतय. विविध नवनव्या सुधारणांचा स्वीकार करताना आपले जुने आणि सर्वाना भावणारे कोकणीपण विविध वास्तू प्रकल्पांमध्ये जपताना दिसतय. मोठाले वास्तू प्रकल्प, रोहाऊस, फार्महाऊस, सदनिका प्रकल्प यांना मिळणारा प्रतिसाद,  त्यातील कोकणीपणा अनेक "विकासक" जाणीवपूर्वक जपताना आढळत आहेत. आणि यामागे येथे येऊ इच्छिणार्यांची कोकणच्या प्रेमाने भारलेली मानसिकता आहे. या मानसिकतेचा उपयोग करून कोकणात अधिकची आर्थिक, व्यावसायिक समृद्धी आणणे सहज शक्य आहे. पण आता आधुनिक पद्धतीच्या पर्यटन व्यवसायात या कल्पनेला काही लोकांनी वेगळे स्वरूप दिले आहे. आज कोकणात पर्यटनाला येणार्‍यांचे हॉटेलात उतरण्यासह इतर ठिकाणी उतरण्याचे प्रमाण वाढते आहे, यासाठी सेकेंड होम म्हणून खरेदी केल्या जाणार्‍या वास्तूप्रकल्पांचा उपयोग करून घेणे सहज शक्य आहे. याचा विचार करून कोकणात काही प्रकल्पांनी आपली आखणी केली आहे. भविष्यात या संपूर्ण व्यवसायात ही वाढती संधी ठरणार आहे. कोकणातील तीर्थक्षेत्रदर्शन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणी संस्कृतीची ओळख यांचीही संधी येथे मिळते. आणि याच आकर्षणापोटी मानवीसमुह आज कोकणाकडे वळतो आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण शांत, निवांतपणे, आनंदात काहीकाळ जगता येईल? अशी जागा शोधत असतात, अशा शोधकर्त्यांच्यासाठी कोकण सर्वोत्तम पर्याय म्हणून उभे राहीले आहे. आज कोकणातील अनेक वास्तू प्रकल्प यास्तव केवळ विविध पर्यटनस्थळांच्या नजिक उभे राहत आहेत. त्यांना चांगले ग्राहक उपलब्ध होत आहेत. कामाचा आठवडाभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा, पाण्याचा आवाज असे मनमोहक रूप कोकणचे विशेष असले तरी आज ही अनुभूती येथील अनेक छोट्या-मोठ्या वास्तू प्रकल्पांतही  घेता येते आहे. ज्यामुळे दिवसभराचा मानवी थकवा गायब होऊन मिळणार्‍या समाधानामुळे अनेक पाऊले कोकणात गुंतवणुकीसाठी आकृष्ट होताना दिसत आहेत. त्यांना कोकणीपणा जपणारे पर्याय उपलब्ध करून देणारे "विकासक" हमखास यात यशस्वी होत आहेत, होणार आहेत यात शंका नाही.

गाव हा खरे तर सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा-आवडीचा विषय. नेहमीच्या व्यापातून वेळ काढून काही काळ गावाच्या वातावरणात रमावे, असे आपल्याला सर्वांना वाटते. आपलं वास्तव्यस्थान इतरांपेक्षा वेगळं दिसावं आणि त्याचे कौतुकही व्हावे असे आपल्याला वाटत असतेच. या मानवी स्वभावाचा विचार करून अनेक विकासक कोकणात आपले प्रकल्प विकसित करत आहेत, यात आपण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं असंच ठरवून काम होत आहे. आणि हे वेगळेपण कोकणी सौंदर्याईतकच मानवी मनाला भुरळ पाडणारे आहे. अनेकदा वास्तूप्रकल्पांच्यामध्ये पुरेपूर गावातील घराचा स्पर्श घडवणे शक्य नसले तरी तो फील देण्याचा प्रयत्न प्रकल्पांत होतो. काही ठिकाणी घरातील रचना मिळतीजुळती करून तो फील आणण्याचा प्रयत्न होतो.

कोकणातील वास्तू म्हटलं की अंगण आलंच. अंगण ही नुसती कल्पना नाही. ते मानवी डोळ्यासमोरील वास्तव आहे. अंगण वास्तूची शोभा वाढवते. वास्तूचे परिपूर्ण रूप हे अंगणामुळेच खुलते. घरासमोरील अंगण मनाला विसावा देते. या अंगणातील तुळस, विविध फुलझाडं परिसर सुगंधितकरून सोडतात. या मानवी अपेक्षा ओळखून आज कोकणात अनेक विकासक आपल्या प्रकल्पांची मांडणी करीत आहेत. कोकणच्या निसर्गरम्य ठिकाणचे अंगण तर खूप मजा देते. लहान मुलांसाठी हे अंगण  खेळण्या-बागडण्यासाठीही उपयुक्त ठरते. या सार्‍याचा विचार आज निवासी सदनिका प्रकल्पांतही केला जात असून "मोकळी जागा" याला खूप गांभीर्याने घेतले जाते आहे, ही बाब आपणास कोकणातील मोक्याचे विविध प्रकल्प फिरून पाहिल्यानंतर  सहज जाणवेल. आज या संकल्पनेचा उपयोग करून अनेक "विकासक" आपल्या प्रकल्पांना अधिकाधिक "कोकणी अथवा कोकण फ्रेंड्ली" करताहेत.

आज भारतात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणार्‍या व्यवसायात "रिअल इस्टेट" क्षेत्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. या उद्योगात खूपच सकारात्मकता आहे. यास्तव शासकीय स्तरावर या व्यवसायाच्या विकासासाठी पूरक वातावरण तयार व्हावे म्हणून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. कोकणात तर पर्यटन विकास, निसर्ग संवर्धनासाठीचे प्रयत्न, पायाभूत सुविधा विकास ह्या सार्‍या या व्यवसायाला अधिक बळ देतच असतात. आणि म्हणूनच या क्षेत्रात कोकणही आघाडीवर आहे.  या व्यवसायात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणही गेल्या काही काळापासून वाढू लागले असून, याचा कोकणालाही उपयोग करून घेता येईल. आज जगातील अनेक देशांची गुंतवणूक या व्यवसायात भारतात होते आहे. व्यवसाय म्हणून कोकण नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे कोकणात ही गुंतवणूक वाढल्यास कोकणचे अर्थकारणही काही प्रमाणात बदलू शकते. अधिकाधिक आर्थिक उपलब्धि झाल्यास होणार्‍या विकासाचा आनंद गुंतवणूकदारांना सुद्धा मिळणार आहे, ज्यातुन गुंतवणूक वाढून संपूर्ण प्रगतीस वाव मिळू शकतो.

आजची बदलती मानवी जीवनशैली, कामाच्या व्यापातील वाढता ताणतणाव यामुळे अनेकजण निवांतपणाचे पर्याय शोधताना दिसतात. देशातील अनेक कॉर्पोरेट तसेच खाजगी कंपन्यांनी ५ दिवसांचा आठवडा ही संकल्पना रुजवायला सुरूवात केली आहे. पर्यायाने शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली आहे, मिळणार आहे. आठवडाभर कामाच्या दगदगीला कंटाळलेले अनेकजण "सेकंड होम" किंवा "वीकेंड होम" या पर्यायाचा विचार करतात. वीकेंड होम घालविण्यासाठीचे दुसरे घर आज अनेकांची गरज बनली आहे. आज ही सेकंड होमची संकल्पना मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गत १०-१५ वर्षांत या सेकंड होमच्या पसार्यात खूप वाढ झाली असून ज्यासाठी संपूर्ण कोकण एकदम परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

भारताच्या वर्तमान औद्योगिक धोरणांमुळे या "रिअल इस्टेट" प्रकल्पांत थेट १०० टक्के परकीय गुंतवणूक शक्य झाली आहे. थेट परकीय गुंतवणुकीच्या वर्तमान धोरणांमुळे पूर्वीचे निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापाराची आणि विकासाची दारे खुली झाली आहेत. प्रकल्पाच्या उभारणीतीत गुंतवणुकीसाठीचे अनेक अनुकूल मार्ग आणि सोयीसुविधा त्यामुळे सहजसुलभ झाल्या आहेत. एकूणात कोकणातील ही गुंतवणूक भविष्यात सोन्यासारखी उजळून निघणार आहे. जिचा लाभ आपण योग्य वेळी उठवायला हवा. आपण सुरक्षित, आनंददायी, समाधान मिळवून देणार्‍या अशा गुंतवणूक पर्यायाकडे पाहत असाल, तर नक्कीच कोकणचा आणि येथील विविध वास्तू प्रकल्पांचा सकारात्मक विचार करू शकता.

धीरज वाटेकरचिपळूण
dheerajwatekar@gmail.com
पूर्वप्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता वास्तुरंग पुरवणी
19.03.2016
पुह्नार्प्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता रत्नागिरी-सिंधुदुर्ग

२६.0१.201७ (प्रजासत्ताक दिन विशेष पुरवणी) 







बुधवार, २२ जून, २०१६

कपिलाषष्टी योग:राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर

15.12.2015

देवांचा सेनापती कार्तिकेय आणि वाग्देवी सरस्वती यांचे वाहन असलेला सर्वांगसुंदर मोर हा भारताचा साऱ्या जगाने मान्यता दिलेला राष्ट्रीय पक्षी. मोर नाचत असतांना त्याची पिसे सप्तरंगासारखी दिसतात. साधारणत: आकाशात ढग गोळा झाले की मोर नाचतो. तेव्हा त्याची पिसे गळतात. निसर्गनियमाप्रमाणे तशीही ती औगस्टनंतर गळतात. उन्हाळ्यात ती पुन्हा येतात. मादीला आकर्षीत करणे हा या पिसार्याचा मुख्य उद्देश. मोराच्या लांबच लांब पिसार्याची लांबी, त्याच्या एकूण शरीराच्या ६०% इतकी असते. मोराच्या ह्या लांबलचक पिसार्याखाली राखाडी रंगाची पिसं असतात. यांच काम म्हणजे ह्या पिसार्याला आधार देणं. ही मोरपिसं जितक्या वेळेस ही गळून पडतात, तितक्या वेळेस ती पुन्हा येत रहातात. त्यामुळे गळलेली राखाडी रंगाची पिसे असलेला मोर सहसा पिसारा फुलवताना, नाचताना, बागडताना दिसत नाही, कारण त्यात काही गंमत नाही आणि मुख्यत्वे त्या पिसार्याने तो मादीला आकर्षित करू शकत नाही. हे जरी निसर्गनियमित तत्व असले तरी तत्वाला अपवाद असतातच. असाच अपवादात्मक "राखाडी रंगाचा पिसारा फुलवलेला मोर" आम्हाला नुकताच आमच्या चिपळूणातील ओरायन इन्स्टिट्यूट ओफ सायन्सच्या "विद्यान अभ्यास दौरा" दरम्यान चिन्चोलिमोराची येथे दत्तात्रय थोपटे यांच्या कृषि पर्यटन केन्द्र मुक्कामी पाहायला आणि सुदैवाने क्‍लिक करायला मिळाला. अक्षरश: कपिलाषष्टीचा योग जुळून आल्यासारखे वाटले. 
 

लेखन आणि छायाचित्रे : धीरज वाटेकर

सामर्थ्य : जगावेगळ्या नात्यांचे




कोकणातील अष्टविनायक

गेल्या काही वर्षापासून कोकणात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. कोकणातील धार्मिक वातावरण जवळून अभ्यासले असता आपणास आजही तुलनेने फारशी व्यापारी मानसिकता जाणवत नाही. कोकणातील एकूणच सर्व धार्मिक परंपरा आपले अस्तित्व आजही संभाळून आहेत. जगभरातील धर्मप्रेमि म्हणूनच आजही कोकणात दर्शनाला येतातच... कोकणातील गणेश मंदिरे अतिशय स्वच्छ, सुंदर निटनेटकी आहेत. आजूबाजूचा परिसर न्याहळताना कधी एकदा आपण गणपती मंदिराकडे पोहोचतो हे कळतच नाही. या सार्‍या पार्श्वभूमीवर कोकणातील महत्वपूर्ण आठ श्री गणेश स्थानाना अष्टविनायक स्वरुपात भाविक्ांसमोर ठेवीत आहोत. प्रस्तुत लेखनातील स्थान निवडित काही वेगळे विचार असु शकतात, परंतु अशा स्वरुपातील मांडणी कोकण पर्यटन विकासास पूरक ठरू शकते. म्हणूनचा हा प्राथमिक   प्रामाणिक लेखन प्रपंच !

श्री क्षेत्र गणपतीपुळे ( रत्नागिरी )

मुंबईपासुन साधारण ३७० किमी अंतरावर समुद्रकिनारी वसलेले अत्यंत सुंदर असे श्रीगणेशाचे स्वयंभू स्थान श्री क्षेत्र गणपतीपुळे होय. हे गणेश मंदिर एका डोंगराच्या पश्चिम बाजूस पायथ्याशी असुन संपूर्ण डोंगरालाच श्रीगणेशाचे स्वरूप मानण्यात येते. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी श्री क्षेत्र गणपतीपुळे ही पश्र्चिमद्वार देवता होय. समुद्रकिनारी असल्याने भरती-ओहोटीच्या रुपात पुळणीने तयार झाल्यामुळेच याला "पुळ्याचा गणपती" असेही म्हणतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती , त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र  ह्यामुळे हे देऊळ आगळे आहे.  समोर पसरलेला निळाशार समुद्र आणि त्याच्या पार्श्वभूमीवर असलेले हे सुंदर गुलाबी मंदिर पर्यटनाबरोबर तीर्थाटनाचाही आनंद देते. रत्नागिरीहून साधारण २५ किमी अंतरावर असणारेगणेशगुळेहे स्थान फारच कमी लोकांना माहित आहे. अगदी साधे गाव, साधे मंदिर आणि बहुतालचा सुंदर, परिसर बघण्यासारखा आहे. ज्यांना वेगळ्या ठिकाणांना भेट द्यायला आवडते, अशा लोकांना गणेशगुळे येथे जायलाच हवे.

कड्यावरचा गणपती मंदिर, आंजर्ले  ( रत्नागिरी )
एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गाभा-यातील गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. ती उजव्या सोंडेची असून ५ फूट सिंहासनाधिष्ठीत आहे. मूर्ती बेसॉल्ट रॉकपासून बनविलेली आहे. ही मूर्ती तैलरंगाने रंगविलेली आहे. मूर्तीच्या बाजूला रिद्धिसिद्धिच्या सुमारे एक फूट उंचीच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या आवारातच काळ्या पाषाणाचे शिवमंदिर आणि अष्टकोनी तळे आहे. मंदिराच्या चारही कोप-यावर पुरातन बकुळ वृक्ष असून वनस्पती शास्त्रांच्या म्हणण्यानुसार ते सहाशे वर्षांपूर्वीचे आहेत. येथे माघी उत्सव जोरात होतो.
दशभुजा गणेश हेदवी ( रत्नागिरी )

निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन मंदिर टेकडीवर वसले आहे. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर हेदवी गाव वसले आहे ह. दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे. मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढऱ्या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते, असे म्हटले जाते.

जय गणेश मंदिर, मालवण  (सिंधुदुर्ग)
मूळचे मालवणचे कालनिर्णयकर्ते ज्योतिभास्कर जयंतराव साळंगावकर त्यांनी आपल्या राहत्या घराच्या जागी लाखो रुपये खर्चून सर्वांगसुंदर असे गणेश मंदिर उभारले आहे. शास्त्रोक्त पद्घतीने बांधलेले हे मंदिर पाहताचक्षणीच मन प्रसन्न होते. उत्तम शिल्पकला आणि भडक ऑइलपेंट टाळून केलेली सुखद रंगसंगती आणि कमालीची स्वच्छता आहे. गाभार्‍यामधली सुवर्णगणेश मूर्ती अतिशय चित्ताकर्षक आहे. मंद तेवणार्‍या नंददीपांच्या प्रकाशात सुवर्ण चौरंगावर विराजमान झालेले श्री गजानन, दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दी आणि चवर्‍या ढाळणारे मूषक डोळे भरुन पाहताना दर्शनमात्रे मनः कामनापूर्तीअसा अनुभव येतो. आदिदेवता श्री गणेशाच्या भक्तांना त्याच्या कृपेने सर्व क्षेत्रात जय मिळावा म्हणून या मंदिराचे नाव जय गणेशमंदिर ठेवण्यात आले आहे. मंदिर सभामंडपात मध्यभागी एक वैशिष्ट्यपूर्ण अष्टकोनी नक्षी आहे. त्यामध्ये प्रत्येक नक्षीचा मोजून आठवेळा वापर करण्यात आला आहे. या जागी उभे राहून श्रध्देने केलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

रेडीचा  श्रीगणेश  मंदिर (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील रेडी बंदर किनार्याजवळच लोह खनिजाच्या खाणीच्या परिसरात १८ एप्रिल १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मुर्ती दृष्टांत प्रकट झाली. या ठिकाणी श्रीगणेशाचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. दर संकष्ठीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी जमते. ही मूर्ती जांभ्या दगडाच्या गुंफेमध्ये कोरलेली होती मूर्ती जांभ्या दगडाचीच होती. सुमारे सव्वा महिन्यांनी बंदराजवळ गणपतीचे वाहन असलेला दगडात कोरलेला मोठा उंदीर सापडला. श्रीगणपतीच्या त्या मुर्तीला प्लास्टरिंग रंगरंगोटी करुन सजविण्यात आले. श्रीगणेशाची ती द्विभुजा भव्य मूर्ती अतिशय देखणी सुबक दिसते. नवसाला पावणारा हा रेडीचा श्रीगणेश भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या ठिकाणी गणेशाचे सुबक मंदिर बांधण्यात आले. प्रत्येक संकष्टीस श्रीगणेशाच्या प्रगटदिनी अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असल्याने या परिसरास जत्रेचेच स्वरुप असते. जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वज्ञात आहे. या गावाची महती द्विभुज गणेशामुळे सातासमुद्रपार पोहोचली. रेडीत दोन ठिकाणी द्विभुज गणेश आहेत. एक समुद्रकिनारी आणि दुसरा यशवंत गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ! रेडी हे ठिकाण वेंगुल्र्यापासून ३० कि.मी. अंतरावर आहे.

दिवेआगर गणेश (रायगड)

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक छोटसे गाव आहे. निळाशार अथांग समुद्र , गर्द माडाची बने आणि नारळ सुपारीच्या झावळ्यात लपलेली ती सुंदर कौलारू घरे, निसर्गाने दिलखुलासपणे दान दिलेल्या दिवेआगराला परमेश्वराचाही वरदहस्त लाभला आहे. येथील द्रौपदी पाटिल या महिलेच्या बागेत जमीन खोदण्याचे काम सुरु असताना एक लोखंडी पेटीत गणपतीची सुमारे १००० वर्षापूर्वीची सोन्याची .३२ कि वजनाची सोन्याची मूर्ती सापडली होती. आजमितीस सोन्याच्या गणपतीचे दिवेआगर ही ओळख मुर्तीच्या चोरीमूळे मागे पडली असली तरी मूळ मंदिरास भेट देणार्या पर्यटकांत दिवेआगरचे महत्व कायम आहे. या निसर्गरम्य गावाला अरबी सागाराचा किमि. चा अतिशय सुंदर, स्वच्छ आंणि सुरक्षित किनारा लाभला आहे. या किनार्यावर केवड्याची बने आहेत. या गावात एकुण पाच ताम्रपट एक शिलालेख सापडला आहे. गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा .. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे. येथील सुपारी सर्वोत्तम सुपारी मानली जाते . येथे विविध प्रकाराची फुलझाडे आहेत. अनेक रंगांच्या जास्वंदीची फूले पपनसाची फळे पहावयास मिळतात. श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे, म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे.

नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर   (रायगड)

अलिबागहून मुरुडकडं जाताना अवघ्या सात किलोमीटरवर नांदगाव सिध्दिविनायकाचे मंदिर आहे. मुरुड-जंजिरा तसंच श्रीवर्धन, हरिहरेश्वरला अलिबागहून जाणारा पर्यटक किंवा स्थानिकही या गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं जात नाही. नारळी पोफळीच्या बागा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमूना असलेल्या या मंदिरातील गणपतीचं दर्शन घेतलेल्या भाविक या मार्गावरून पुन्हा जाताना आपोआपच मंदिराकडं वळतो, असा अनुभव आहे. माघ शुद्ध चतुथीर्ला इथं सिद्धीविनायकाची मोठी यात्रा भरते. साळाव-मुरुड मार्गावर मुरुड गावाच्या आधी नांदगाव आहे. अलिबाग-मुरुड रस्त्यावर रेवदंडा गावापुढील असणार्या खाडीवरील पूल ओलांडल्यावर डावीकडे साळाव गाव आहे. या ठिकाणी संपूर्ण संगमरवरावर वापरून बांधलेले अतिशय सुंदरबिर्ला गणेशमंदिर आहे. येथील गणपतीची मूर्ती देखील संगमरवरी असून त्याला विविध प्रकारचे दागदाि गने घातले आहेत. या मंदिराच्या परिसरात मोठा बगीचा देखील आहे.

सिद्धिविनायक महागणपती मंदिर, टिटवाळा ( ठाणे )

महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातलं टिटवाळा हे श्रीगणपती क्षेत्रही प्रसिद्ध आहे. कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. याच परिसरात पूर्वी कण्व ऋषींचा आश्रम होता. शकुंतला इथेच वाढली. त्यामुळे या ठिकाणाला  प्राचीन महत्त्व आहे. टिटवाळा मुंबईपासून ६५ किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीचे मंदिर तसे साधेच आहे. शेंदरी रंगाची रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेते. रेखीव चेहरा, पुढे आलेली सोंड यामुळे मूर्तीला एक ठसठसीतपणा आला आहे. सिंहासनावर बसलेल्या अवस्थेतील ह्या मूर्तीच्या चार हातात आयुधे आहेत. मूर्तीला रोज नेटकेपणाने पितांबर नेसवला जातो. डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. मुर्तीवर चांदीचेच छत्र आहे. इथे फुलांची सुरेख आरस केलेली असते. जेथे गणपतीची मूर्ती आहे तो संपूर्ण देवारा चांदीचा बारीक कलाकुसर केलेला आहे. चांदीच्या देवार्‍यात असलेली केशरी मूर्ती आणि हिरव्या दुर्वा, पांढरी मोगर्‍याची व जास्वंदाची फुले यामुळे सुरेख रंगसंगती साधली जाते आणि बघणार्‍याची नजर फिरवून ठेवते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गाभार्‍यात प्रवेश केल्यापासून ते सभा मंडपातून बाहेर पडेपर्यंत मूर्तीचे सतत दर्शन आपल्याला होत राहते. मंदिराच्या आवारात एक छोटी दिपमाळ आहे. या मंदिरापासून काही अंतरावर एक तलाव आहे. हा एकंदर परिसरच खूप रमणीय आहे.

वास्तविकत: भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा उत्सव होतात. माघ शुक्ल चतुर्थी भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही गणेश ही देवता ओळखली जाते. भाद्रपद माघ महिन्याची शुक्ल चतुर्थीस गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्म दिन होय. या देवतेस हिंदू धर्म शास्त्रात अग्रपूजेचा मान आहे. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे. अशा या गणेशाची कोकणातील काही स्थानांची भटकंती आपणाला नक्कीच आनंद देईल.

धीरज वाटेकर

पर्यटन अभ्यासक, मो. 9860360948

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...