कोकण...! स्वर्गीय निसर्ग सौंदर्याची खाण
असलेले कोकण...! अपरान्तभूमी म्हणून गौरविलेले कोकण...! प्राचीन इतिहासाचा, गड-किल्ल्यांचा समृद्ध
वारसा सांगणारे कोकण...! बाजारूपणाचा स्पर्श न झालेले देवभूमी कोकण...! आणि आता
कोकण रेल्वे पाठोपाठ येथील एकमेव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वेगाने होत असलेल्या विकास कामामुळे, येऊ घातलेल्या नवनवीन प्रकल्पामुळे "कायमस्वरूपी निवासी वास्तव्य
ठिकाण" म्हणून, निवांतपणासाठी आणि
व्यापारासाठीही “कोकण” जगभरातील अनेकांच्या मुखी घट्ट बसलय ! याची प्रचिती कोकणात
सुरू असलेले विविध कल्पक वास्तूप्रकल्प आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता सहज
येऊ शकते. त्या विषयीचे हे विवेचन...!
आधुनिक काळात कोकणही बदलतय. विविध नवनव्या
सुधारणांचा स्वीकार करताना आपले जुने आणि सर्वाना भावणारे कोकणीपण विविध वास्तू
प्रकल्पांमध्ये जपताना दिसतय. मोठाले वास्तू प्रकल्प, रोहाऊस, फार्महाऊस, सदनिका प्रकल्प यांना मिळणारा प्रतिसाद, त्यातील कोकणीपणा अनेक "विकासक" जाणीवपूर्वक जपताना
आढळत आहेत. आणि यामागे येथे येऊ इच्छिणार्यांची कोकणच्या प्रेमाने भारलेली
मानसिकता आहे. या मानसिकतेचा उपयोग करून
कोकणात अधिकची आर्थिक, व्यावसायिक समृद्धी आणणे सहज शक्य आहे. पण आता आधुनिक पद्धतीच्या पर्यटन व्यवसायात या कल्पनेला
काही लोकांनी वेगळे स्वरूप दिले आहे. आज कोकणात पर्यटनाला
येणार्यांचे हॉटेलात उतरण्यासह इतर ठिकाणी उतरण्याचे प्रमाण वाढते आहे, यासाठी सेकेंड होम म्हणून
खरेदी केल्या जाणार्या वास्तूप्रकल्पांचा उपयोग करून घेणे सहज शक्य आहे. याचा
विचार करून कोकणात काही प्रकल्पांनी आपली आखणी केली आहे. भविष्यात या संपूर्ण
व्यवसायात ही वाढती संधी ठरणार आहे. कोकणातील
तीर्थक्षेत्रदर्शन, सांस्कृतिक पर्यटन, कोकणी संस्कृतीची ओळख
यांचीही संधी येथे मिळते. आणि याच
आकर्षणापोटी मानवीसमुह आज कोकणाकडे वळतो आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण शांत, निवांतपणे, आनंदात काहीकाळ जगता येईल? अशी जागा शोधत असतात, अशा शोधकर्त्यांच्यासाठी
कोकण सर्वोत्तम पर्याय म्हणून उभे राहीले आहे. आज कोकणातील अनेक
वास्तू प्रकल्प यास्तव केवळ विविध पर्यटनस्थळांच्या नजिक उभे राहत आहेत. त्यांना
चांगले ग्राहक उपलब्ध होत आहेत. कामाचा आठवडाभराचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य
ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगीबेरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि
खळाळणारा धबधबा, पाण्याचा आवाज असे मनमोहक रूप कोकणचे विशेष असले तरी आज ही अनुभूती येथील अनेक
छोट्या-मोठ्या वास्तू प्रकल्पांतही घेता येते आहे. ज्यामुळे दिवसभराचा मानवी थकवा गायब होऊन मिळणार्या समाधानामुळे अनेक पाऊले कोकणात गुंतवणुकीसाठी
आकृष्ट होताना दिसत आहेत. त्यांना कोकणीपणा जपणारे पर्याय उपलब्ध करून देणारे
"विकासक" हमखास यात यशस्वी होत आहेत, होणार आहेत यात शंका
नाही.
गाव हा खरे तर सगळ्यांच्याच
जिव्हाळ्याचा-आवडीचा विषय. नेहमीच्या व्यापातून वेळ काढून काही काळ गावाच्या
वातावरणात रमावे, असे आपल्याला सर्वांना वाटते. आपलं वास्तव्यस्थान
इतरांपेक्षा वेगळं दिसावं आणि त्याचे कौतुकही व्हावे असे आपल्याला वाटत असतेच. या
मानवी स्वभावाचा विचार करून अनेक विकासक कोकणात आपले प्रकल्प विकसित करत आहेत, यात आपण नेहमीपेक्षा
काहीतरी वेगळं करावं असंच ठरवून काम होत आहे. आणि हे वेगळेपण कोकणी सौंदर्याईतकच
मानवी मनाला भुरळ पाडणारे आहे. अनेकदा वास्तूप्रकल्पांच्यामध्ये
पुरेपूर गावातील घराचा स्पर्श घडवणे शक्य नसले तरी तो फील देण्याचा प्रयत्न
प्रकल्पांत होतो. काही ठिकाणी घरातील रचना मिळतीजुळती करून तो फील आणण्याचा
प्रयत्न होतो.
कोकणातील वास्तू म्हटलं की अंगण आलंच. अंगण ही
नुसती कल्पना नाही. ते मानवी डोळ्यासमोरील वास्तव आहे. अंगण वास्तूची शोभा वाढवते.
वास्तूचे परिपूर्ण रूप हे अंगणामुळेच खुलते. घरासमोरील अंगण मनाला विसावा देते. या
अंगणातील तुळस, विविध फुलझाडं परिसर सुगंधितकरून सोडतात. या मानवी अपेक्षा ओळखून आज कोकणात
अनेक विकासक आपल्या प्रकल्पांची मांडणी करीत आहेत. कोकणच्या निसर्गरम्य ठिकाणचे
अंगण तर खूप मजा देते. लहान मुलांसाठी हे अंगण
खेळण्या-बागडण्यासाठीही उपयुक्त ठरते. या सार्याचा विचार आज निवासी सदनिका
प्रकल्पांतही केला जात असून "मोकळी जागा" याला खूप गांभीर्याने घेतले
जाते आहे, ही बाब आपणास कोकणातील मोक्याचे विविध प्रकल्प फिरून पाहिल्यानंतर सहज जाणवेल. आज या संकल्पनेचा उपयोग करून अनेक
"विकासक" आपल्या प्रकल्पांना अधिकाधिक "कोकणी अथवा कोकण
फ्रेंड्ली" करताहेत.
आज भारतात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून
देणार्या व्यवसायात "रिअल इस्टेट" क्षेत्र दुसर्या क्रमांकावर आहे. या उद्योगात खूपच सकारात्मकता आहे. यास्तव
शासकीय स्तरावर या व्यवसायाच्या विकासासाठी पूरक वातावरण तयार व्हावे म्हणून काही
महत्त्वाचे निर्णय घेतले जात असतात. कोकणात तर पर्यटन विकास, निसर्ग संवर्धनासाठीचे
प्रयत्न, पायाभूत सुविधा विकास ह्या सार्या या व्यवसायाला अधिक बळ देतच असतात. आणि
म्हणूनच या क्षेत्रात कोकणही आघाडीवर आहे. या व्यवसायात थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाणही गेल्या काही
काळापासून वाढू लागले असून, याचा कोकणालाही उपयोग
करून घेता येईल. आज जगातील अनेक देशांची गुंतवणूक या व्यवसायात भारतात होते आहे.
व्यवसाय म्हणून कोकण नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे कोकणात ही गुंतवणूक वाढल्यास कोकणचे अर्थकारणही काही
प्रमाणात बदलू शकते. अधिकाधिक आर्थिक उपलब्धि झाल्यास होणार्या विकासाचा आनंद
गुंतवणूकदारांना सुद्धा मिळणार आहे, ज्यातुन गुंतवणूक वाढून
संपूर्ण प्रगतीस वाव मिळू शकतो.
आजची
बदलती मानवी जीवनशैली, कामाच्या व्यापातील वाढता ताणतणाव
यामुळे अनेकजण निवांतपणाचे पर्याय शोधताना दिसतात.
देशातील अनेक कॉर्पोरेट तसेच खाजगी कंपन्यांनी ५ दिवसांचा आठवडा ही संकल्पना
रुजवायला सुरूवात केली आहे. पर्यायाने शनिवार-रविवार सुट्टी मिळू लागली आहे, मिळणार
आहे. आठवडाभर कामाच्या दगदगीला कंटाळलेले अनेकजण "सेकंड होम" किंवा
"वीकेंड होम" या पर्यायाचा विचार करतात. वीकेंड होम घालविण्यासाठीचे
दुसरे घर आज अनेकांची गरज बनली आहे. आज ही सेकंड होमची
संकल्पना मध्यमवर्गीयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. गत १०-१५ वर्षांत या सेकंड
होमच्या पसार्यात खूप वाढ झाली असून ज्यासाठी संपूर्ण कोकण एकदम परफेक्ट
डेस्टिनेशन आहे.
भारताच्या वर्तमान औद्योगिक धोरणांमुळे या "रिअल इस्टेट" प्रकल्पांत थेट १०० टक्के परकीय गुंतवणूक
शक्य झाली आहे. थेट परकीय गुंतवणुकीच्या वर्तमान
धोरणांमुळे पूर्वीचे निर्बंध कमी झाले आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील व्यापाराची
आणि विकासाची दारे खुली झाली आहेत. प्रकल्पाच्या उभारणीतीत गुंतवणुकीसाठीचे अनेक
अनुकूल मार्ग आणि सोयीसुविधा त्यामुळे सहजसुलभ झाल्या आहेत. एकूणात
कोकणातील ही गुंतवणूक भविष्यात सोन्यासारखी उजळून निघणार आहे. जिचा लाभ आपण योग्य
वेळी उठवायला हवा. आपण सुरक्षित,
आनंददायी, समाधान मिळवून देणार्या
अशा गुंतवणूक पर्यायाकडे पाहत असाल,
तर नक्कीच कोकणचा आणि येथील विविध
वास्तू प्रकल्पांचा सकारात्मक विचार करू शकता.
धीरज वाटेकर, चिपळूण
dheerajwatekar@gmail.com
पूर्वप्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता वास्तुरंग पुरवणी
19.03.2016
पुह्नार्प्रसिद्धी : दैनिक लोकसत्ता रत्नागिरी-सिंधुदुर्ग
२६.0१.201७ (प्रजासत्ताक दिन विशेष पुरवणी)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा