सुखाचा उपभोग तर नियती सार् यांच्याच पदरात टाकते. कुणाला रांजणभर, कुणाला घड़ाभर, कुणाला पोटभर तर कुणाला जन्मभर हा उपभोग घेता येतो. परंतू या सार् यातून मिळणारा अनामिक-आत्मिक आनंद ज्याला नीटसा जगता येतो, त्यांच्याच जीवनाचे सार्थक घड़ते. आजच्या तरूणाईने हे लक्षात घेऊन "गंजण्यापेक्षा झिजणे श्रेयस्कर" मानून सदैव कार्यरत होण्याची गरज निर्माण झाली आहे.
शैक्षणिक स्तरावर विशेष प्राविण्यासह आपली गुणवत्ता सिद्ध करून वास्तविक यशस्वी जीवन जगणार् या, नुकतीच पस्तीशी ओलांडून चाळीशीकड़े झुकू पाहणार् या / झुकलेल्या आमच्या अनेक सहकारी मित्रांना सध्या "आपण तर काहीच करत नाही आहोत, काहीतरी करायलाच हवयं" असं वाटू लागलंय. विशेषतः मोठाल्या विविध कंपन्यात, आय. टी. क्षेत्रात, असमाधानी वातावरणात कार्यरत असणार् यांची यात खूप मोठी संख्या आहे. कालपरवापर्यंत आम्हीही याबाबत खूपसे ऐकून यथातथ्य होतो. परंतू मागिल शनिवार-रविवारच्या (12 जून) अनुभवातून आम्हाला आमच्या उपरोक्त यथातथ्य ज्ञानाबाबतचा एक धक्कादायक संदर्भ जवळून अभ्यासायला मिळाला, आणि मेंदूत काहूर माजलं. "गुणवत्ता" या शाळेत शिकवलेल्या, हवाहवासा वाटणार् या शब्दाचे समानार्थी शब्द चक्क विरुद्धार्थी भासू लागले. "स्पर्धात्मक जीवघेणी जीवनशैली" मानवी जीवन जगण्याच्याच मुळावर उठल्याची आमची पक्की खात्री बनली.
सह्याद्री वाहिनीने मागिल आठवड्यात रविवार-सोमवारी (12 जून) आपल्या सलग चार बातमीपत्रात दखल घेतलेल्या आमच्या, चंदन लागवड कार्यशाळा अभियानाला विविध ठिकाणाहून चांगला प्रतिसाद मिळाला, अनेकांनी फोन करून माहिती घेत चंदन रोपांची मागणीही नोंदवली. रविवारच्या या कार्यशाळेला शनिवारी रात्रीच पूर्वसूचना देऊन, दापोलीत काही एकर मालकी जमीन असलेला, एक पुण्यातील 38 वर्षीय तरूण पोहोचला. चौकशी करता अगदी सुरूवातीला, "उद्या पोहोचायला उशीर झाला तर ? म्हणून आजच आलो !" असा आपल्या येण्याबाबतचा खुलासाही त्याने केला. या कार्यशाळेसाठी आलेले चंदनतज्ज्ञ महेन्द्र घागरे, आमचे सहकारी विलास महाडीक आणि आम्ही एकत्र जेवण घेत असतानाच या तरूणाचे येणे झाल्याने त्यालाही आम्ही जेवायला सोबत बोलावले. त्याच्याशी गप्पा सुरू केल्या तेव्हा पुण्याच्या आय.टी. क्षेत्रात वर्षाला ड़ोळे दिपवून टाकणारा काही लाखांचा वार्षिक पगार नाकारून त्याने "गंजत चाललेली बुद्धी झिजवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले" असल्याबाबत कळले. गेली अनेक वर्षे आमच्या मनात घर करून राहिलेले हे वाक्य त्याच्या तोंडून ऐकल्यावर आम्हाला धक्काच बसला. पुढे जावून त्याने बड़्या कंपन्यात निव्वळ आणि निखळ गुणवत्ता कशी गंजते ? सततचा ताणतणाव, मनासारखे काम न करता आल्याने येणारा मानसिक थकवा आणि या सार् याचा संपूर्ण जीवनशैलीवर झालेला, होते असलेला विपरित परिणाम असह्य होऊन त्याने विचारपूर्वक धाड़साने हे पाऊल उचलल्याची माहिती दिली. "नोकरी सोबत पगारही बंद", म्हणून घरची कौटुंबिक गरज पूर्ण करण्यासाठी तूर्तास त्याने आपले शैक्षणिक ज्ञान पणास लावले. गलेलठ्ठ पगार नाकारून जीवन जगण्यापुरता पैसा उपलब्धीचे नियोजन करून हा तरूण कोकणातल्या आपल्या जमिनीत काही शाश्वत प्रयोग करण्यासाठी सज्ज झाला. या प्रयोग अन् प्रयत्नरूपी धड़पड़ीत तो आमच्यापर्यंत पोहोचला. त्याचे हे धाड़स, त्यामागील अभ्यास, नियोजन, प्रयत्नातील सातत्य, यशासाठी आवश्यक अधिकचा वेळ देण्याची तयारी, संयम या सार् या गुणांनी प्रभावित होवून आम्हीही मनोमनी, "देवा, परमेश्वरा ! याला यश दे रे बाबा" पुटपुटलो.
मित्रहो, कोणतीही वस्तू असो वा "बुद्धी" असो प्रत्येकाचा शेवट हा ठरलेलाच आहे. परंतू ती आयुष्यभर वापरलीच नाही तर ती गंजणार हे नक्की आहे आणि सतत वापरत राहिलो तर सरतेशेवटी ती झिजणार हेही नक्की आहे. ती समाजासाठी, स्वतःसाठी सातत्याने वापरून अखेरपर्यंत झिजविल्यास आपण आयुष्यभर सदैव आत्मिक समाधानाचा आनंद उपभोगू शकतो. यासाठी आपण आपल्या अंतरंगात, स्वतःत थोडेसे झाकून पहा, अर्थार्जन वगळता आपल्याला सर्वाधिक आनंद कोणत्या कामातून मिळतो ? आपला अर्थार्जन मार्ग आणि आपली आवड़ यांची सांगड़ घालता येईल का ? याद्वारे आपला जन्म नक्की कोणत्या कार्याकरिता झालेला आहे ? हे शोधून त्या मार्गावर कार्यरत होण्याचा प्रयत्न करा...आपले आयुष्य आपणास झिजण्यातून आत्मिक समाधानाचा आनंद प्रदान करेल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा