गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

‘सह्याद्री’सखा

 


‘कोकणच्या सांस्कृतिक राजधानी चिपळूणात, जंगलात काम करणारे अभ्यासक, जिज्ञासू, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नाही.’ ही खंत आयुष्यभर बोलून दाखविणारे जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक कै. निलेश विलास बापट यांना आपल्यातून जावून (१४ सप्टेंबर २०२४) एक वर्ष झालं. रत्नागिरी वन विभागाने जिल्हा नियोजन योजना २०२४-२५ अंतर्गत चिपळूणात केलेल्या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलचे उद्घाटन आज (३ ऑक्टोबर) सायंकाळी होत आहे. या फोटो गॅलरी कम कॉन्फरन्स हॉलची मूळ संकल्पना आणि मांडणी निलेश बापट यांची होती. बापट यांचे नाव या गॅलरीला देण्यात यावे अशी चिपळूणातील पर्यावरणप्रेमींची आग्रही मागणी आहे. बापट यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेणारा हा लेख.

 


कोकणातल्या चिपळूण सारख्या छोट्याश्या शहरात सामान्य कुटुंबात जन्मलेला डिझेल गाड्यांची दुरुस्ती करणारा एक सर्वसाधारण मेकॅनिक जेव्हा आपल्या असाधारण बुद्धिमत्तेच्या बळावर जणू एखादं वर्तमानपत्र वाचावं तसा अवघा निसर्ग वाचू लागतो. बघताबघता भारतभरातील जंगलांचा, संपूर्ण सह्याद्रीचा अभ्यासक बनतो तेव्हा त्याच्यातल्या वेगळेपणाची दखल घ्यावी लागते. अशा व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासामागे खूप मोठा संघर्ष असतो. मानद वन्यजीव रक्षक-अभ्यासक, ज्ञानी मित्र, ‘सह्याद्रीसखा’ निलेश विलास बापट यांचे गतवर्षी वयाच्या ४७व्या वर्षी (१४ सप्टेंबर) ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. निलेश म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलेला, कोणतंही काम करायला कसलाही कमीपणा न बाळगणारा निसर्गसखा. कोकणी मातीत घडलेलं आणि माणसाळलेलं हे व्यक्तिमत्त्व. निसर्गवेडापायी त्यानं देशभरच्या जंगलातील किती माणसं जोडली असतील त्याची गणती नाही. ‘सह्याद्री टायगर रिझर्व्ह’च्या उभारणीतील योगदान हा त्याच्या जीवनाचा सर्वोच्च कार्यटप्पा ठरला. निलेश मागील तीन दशकांहून अधिक काळ जैवविविधता, वन्यजीवन, निसर्ग आणि पर्यावरण आदी संवर्धन क्षेत्रात कार्यरत राहिला. त्याने भारतातील ताडोबा, पेंच, बांधवगड, रणथंबोर, STR, नागझिरा, दांडेली, कान्हा आदी जंगलांमध्ये निसर्ग प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी केल्या होत्या. किमान हजारभर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नेचर एज्युकेशन, नेचर वॉक संस्थेमार्फत वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल आदींच्या माध्यमातून ‘गेस्ट लेक्चरर’ म्हणून निसर्ग विषयक ध्वनीचित्रफीती, चित्रप्रदर्शनांच्या माध्यमातून तरुणाईच्या निसर्गविषयक जाणीवा समृद्ध करण्यात त्याने योगदान दिले होते. पुण्याच्या नेचरवॉक संस्थेमार्फत राज्यातील विविध गावात ‘पक्षी महोत्सव’ सादरीकरण केले होते. चिपळूणातील आरोही, ग्लोबल चिपळूण टुरिझम, ‘वणवा मुक्त कोकण’सह वृक्ष लागवड मोहिमेतही त्याचा सहभाग राहिला. त्याने विविध ठिकाणी तीन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड यशस्वी केली होती. वनविभागासोबत अनेक ‘वाईल्डलाईफ रेस्क्यू ऑपरेशन्स’ यशस्वी करणे, वाट चुकलेले असंख्य अजगर, बिबटे, मगरी यांना त्यांच्या अधिवासात नेऊन सोडणे, महापुराच्या संकटात अनेकांना मदत, नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठीचे कार्यक्रम, वन विभागाच्या वन्यजीव सप्ताहांतर्गत ऑनलाईन वेबिनार, क्षेत्रभ्रमंती, निसर्ग अभ्यास सहली, ग्रामस्थ समुपदेशन, औषधी वनस्पती लागवड, मानव-वन्यजीव संघर्ष, अन्न साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अशा कितीतरी विषयांवर निलेशने दिशादर्शक काम केले. कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा, त्याने आणि त्याच्यासारख्या निसर्गरक्षकांनी मागील तीन दशकाहून अधिक काळ सह्याद्रीत निसर्ग संवर्धन विषयात केलेल्या कामाचा गौरव ठरला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प भागातील घनदाट जंगलात पाणवठे निर्मिती, पुरातन विहिरी आणि जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, गाईड ट्रेनिंग प्रोग्रॅम त्याने परिणामकारकरीत्या यशस्वी केले. रत्नागिरी जिल्ह्यात पहिले वनवासी संमेलन आयोजित करण्यात त्याचा विशेष सहभाग राहिला होता. चिपळूणच्या जवळ असलेल्या धामणवणे डोंगरावर वृक्ष, पक्षी आणि प्राण्यांनी समृध्द वनीकरण प्रकल्प उभारण्यात त्याचे सक्रीय योगदान होते. अलिकडे त्याने रत्नागिरी जिल्हातील पक्ष्यांची सूची बनवण्याचे काम मनावर घेतले होते. ८ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील ‘निसर्गसेवक’ संस्थेने वर्धापन दिनी पर्यावरण संरक्षण व त्याविषयी जनजागृती करणाऱ्या व्यक्तीला गेली १६ वर्षे दिला जाणारा ‘निसर्गसेवक’ पुरस्कार निलेशला प्रदान केला होता.

 


आपल्याकडे पर्यावरण कार्यक्रमांना ४०/५०वर्षे वयाच्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होत नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा आहे. अशी व्यथा निलेश बोलून दाखवायचा. मनुष्याला अरण्यवाचन आल्यास जंगले टिकतील. लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ घ्यायला हवी आहे. अशी मांडणी प्रत्येक ठिकाणी निलेश करायचा. ‘सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत.’ निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळातर्फे चिपळूणला २०१९ साली आम्ही आयोजित केलेल्या पर्यावरण संमेलनात ‘सह्याद्रीतील वैविध्यता’ या सत्रात हे त्याने आवर्जून सांगितलं होतं. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर यायला हवे. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्यात. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात ‘नपिता’ म्हणतात. आपण पक्ष्यांच्या नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा आहे. पक्षी जीवनाबाबतचे हे त्याचे अनुभवाचे बोलं विचारप्रवण करायचे. इतके की कधीकधी गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारख्या अस्सल निसर्गसख्याने लिहिलेली जंगलची वर्णने वाचताना मिळणारा आनंद निलेशसोबत खुल्या जंगलात वावरताना मिळून जायचा. इतकी निलेशची जंगलविषयक मांडणी अस्सल असायची. निलेशचा स्वभाव झुंजार, कृतीशील होता. आपल्याला जे पटत नाही त्याच्याशी त्याने कधीही तडजोड केली नाही. चुकून पाय खड्डयात पडला तरी नियतीच्या नाकावर टिच्चून, कष्ट करून पुन्हा उभं राहायची त्याची धमक प्रेरणादायी होती. जंगलात-निसर्गात चुकीला माफी नाही. तिथे खूप काळजीपूर्वक प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जैववैविध्याचं निरीक्षण करावं लागतं. हे अत्यंत नाजूक काम असतं. आपण निसर्गाजवळ जाऊन थोड्याफार प्रमाणात का होईना, त्यांच्या दिनचर्येचा भंग करत असतो. त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करत असतो. आपलं जंगलावर प्रेम असलं तरीही ते व्यक्त करताना निष्काळजीपणा उपयोगाचा नाही. याची जाणीव निलेश नेहमी करून द्यायचा.

 


पावसाळ्याच्या दिवसात एकदा आम्ही भैरवगडला गेलेलो. पावसाळ्यातील भैरवगडाचे दृश्य पाहून आम्ही लिहिलं... ‘भर पावसात भैरवगड’! पहिला पॅरेग्राफ लिहून नेहमीप्रमाणे निलेशला वाचायला पाठवला. वाचल्यावर लगेच त्याचा फोन आला. म्हणाला, ‘हे वाचून लोकं पावसाळ्यातच भैरवगडला जातील. अपघातांना निमंत्रण मिळेल. त्यामुळे तू या नावाने लेख प्रसिद्ध करू नको.’ अर्थात लेखाला द्यायला दुसरं नाव आम्हाला सुचलं नाही, म्हणून तो लेख आम्ही प्रसिद्ध केला नाही. निसर्गाबाबतचा जो विचार निलेशने अंगिकारला त्याचा विशेष गवगवा न करता तो त्या विचाराशी प्रामाणिक राहिला. त्याने आपला वेगळा दृष्टीकोन जाणीवपूर्वक जपला होता. निलेश आम्हाला भेटल्यापासून लेखनकारणे त्याची दखल घेण्याचा प्रयत्न आम्ही जाणीवपूर्वक केला. अर्थात तो अपुरा पडला, ही खंत सदैव राहिल.

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

 

 

 

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

अगम्य-अतर्क्य कोकण

कोकण हा अगम्य आणि अतर्कनीय वाटणाऱ्या गुढरम्य घटनांनी भरलेला प्रदेश आहे. कोकण भूमीचा हा नैसर्गिक अनुभव मानवी जीवन समृद्ध बनवतो असा आमचा अनुभव...