शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचासिद्ध हे आज, शनिवारी (३१ जानेवारी) ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. कोणतेही आदर्श शिक्षक-मुख्याध्यापक हे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासह त्यांचे जीवन घडविण्याकडे लक्ष देत असतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे, त्यांच्या क्षमता ओळखणारे, त्यांना नैतिक मूल्यांची शिकवण देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारे मार्गदर्शक व शिल्पकार शिक्षक आदर्श मानले जातात. विषयज्ञान, अवांतर वाचनाची आवड, संवाद कौशल्य, सहानुभूती, संयम आणि सतत शिकण्याची-शिकवण्याची वृत्ती असलेल्या वाचासिद्ध सरांच्या ज्ञानाचा आवाका आणि कामाचा झपाटा अफाट आहे. नियोजन, आयोजन, नेतृत्व, देखरेख यांसारख्या व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्यांचा खुबीने उपयोग करणारे वाचासिद्ध सर उत्कृष्टतेसाठी सातत्याने वचनबद्ध राहिलेले मागील दहाएक वर्षात आम्ही अनुभवले आहेत.

वाचासिद्ध सरांचा जन्म ५ जानेवारी १९६८चा. पन्नास वर्षांपूर्वीच्या कोकणातील कमीतकमी सुविधा असलेल्या दापोली तालुक्यातील आंजर्ले हे त्यांचे मूळगाव. सरांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. पोहणे, झाडावर चढणे, व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने, ढोलवादन आदी कलागुणांसह सरांची शास्त्रीय संगीताची आवड तेव्हापासूनची. आंजर्ले गावच्या मुख्य रस्त्यावरील त्यांच्या एकत्रित छोट्याश्या कुटुंबाची घराशेजारी नारळी-पोफळीची छोटीशी बाग होती. गाई-म्हशी होत्या. गावात येणाऱ्या जाणाऱ्या पांथस्थांना या घराचे दरवाजे सदैव खुले राहिलेले. अशा वातावरणात सरांचे बालपण गेले. पुढे असेच वातावरण केळीच्या छोट्याश्या बागेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चिपळूणच्या घराभोवती तयार केले. या जागेत पावसाळी दिवसात पोटापुरतं भात तर उन्हाळी दिवसात पावट्याचं पिकं घेतलं जातं. विशेष म्हणजे वाचासिद्ध सरांचं चिपळूणचं हे घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचं हक्काचं ठिकाण आहे. संघदृष्ट्या सरांकडे गेली अनेक वर्ष हिंदू विद्यार्थी वसतीगृहाच्या न्यासाची जबाबदारी आहे. २०२१च्या चिपळूण महापुरात आपल्या घरात पाणी शिरलेले असताना शाळेतील, महापूरग्रस्तांसाठीच्या सामाजिक सेवायज्ञात योगदान देत राहिलेले वाचासिद्ध सर अनेकांनी अनुभवलेत. घरची बागायती, गायी-गुरे-गोठा, दुग्धोत्पादन संस्कृतीमुळे कायम मातीच्या सान्निध्यात राहिलेल्या सरांनी आपल्या मुख्याध्यापकीय नेतृत्वाच्या कालखंडात शालेय वातावरणात सुरु केलेल्या ‘वसुबारस’ उत्सव आणि रानभाज्या प्रदर्शनातील उत्साहाच्या मुळाशी बालपणातील संस्कार असावेत. आंजर्लेच्या पूर्ण प्राथमिक शाळेसह माधवराव खांबेटे इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पदवी शिक्षणाच्या निमित्ताने त्यांचा चिपळूणशी संबंध आला. ते डी.बी.जे. महाविद्यालयातून बी.एस्स.सी. झाले. बी.एड.चे शिक्षण त्यांनी देवगडच्या श्री एस. के. पंतवालावलकर कॉलेज ऑफ एजुकेशनमधून पूर्ण केले. कॉलेजयीन जीवनात आमदार अप्पासाहेब गोगटे आदी व्यक्तींचा सहवास आणि संपर्क लाभल्याचा सरांच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा सकारात्मक परिणाम झाला. विद्यार्थीदशेत कॉलेजमधील गैरसोयींविरोधात विद्यापीठस्तरावर आवाज उठवून त्यांनी आपले म्हणणे प्रशासनाला मान्य करायला लावल्याचा इतिहास आहे. ऑक्टोबर २०२३मध्ये महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (NEP TASK राज्य समन्वय कक्ष) राज्य अभ्यासक्रम आराखडा - शालेय शिक्षण (SCF-SE) अंतर्गत समिती सदस्य म्हणून सरांची निवड झाली. ही निवड त्यांनी आम्हाला कळूही दिली नाही. खरंतर अशा घटना घडल्यावर बातमीसाठी आग्रह न धरणारी अपवादात्मक माणसं आम्ही आमच्या तीसेक वर्षांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत पहिलीत, वाचासिद्ध सर यांपैकी एक होतं.

वाचासिद्ध सर २ जुलै १९९२ रोजी शिक्षक म्हणून युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले. १९९२ ते २०१७ या काळात युनायटेडच्या ‘गुरुदक्षिणा सभागृह’ उभारणी, नापासांची शाळा, रविवारच्या गणिताच्या विशेष वर्गांसह दहावीच्या परीक्षेसाठी १७नंबरचे फॉर्म भरून अनेक विद्यार्थी यशस्वी करण्यात सरांचा सहभाग राहिला आहे. २०१६साली, निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत आणि माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या सहकार्याने सरांनी इतिहासात पहिल्यांदा ‘युनायटेड’ची सहल राज्याबाहेर, राजधानी नवी दिल्ली येथे नेली. विद्यार्थ्यांनी दिल्लीत तब्बल आठ दिवस मुक्काम केला. पुढे यावरील ‘वेध दिल्लीचा’ या पुस्तिकेचे प्रकाशनही केले. ताजमहाल सारख्या वास्तूला आपल्या शिक्षकांच्या समवेत अभ्यासण्याचा एक दुर्मिळ योग विद्यार्थ्यानी अनुभवला. भारताचे संसद भवन आणि संसदीय कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना प्रमुख सल्लागार रघुनंदन शर्मा आणि कल्पना शर्मा यांनी दिलेली माहिती अविस्मरणीय ठरली.

पर्यवेक्षक म्हणून ते १ नोव्हेंबर २०१७ रोजी संस्थेच्या अलोरे शाळेत रुजू झाले. पुढे १ जून २०२० रोजी तिथेच मुख्याध्यापक पदाची धुरा त्यांनी स्वीकारली. १ जून २०२५ रोजी वाचासिद्ध सर युनायटेड शाळेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. मात्र सरांची अलोरेतील कारकीर्द ‘स्पृहणीय’ घटनांनी भरलेली ठरली. अलोरेतील सरांचे आगमन जणू ‘पूर्वनियोजित’ आणि ‘शुभस्य शीघ्रम्’ या संस्कृत सुभाषितासारखे असल्याचे सिद्ध झाले. अलोरेत आल्यानंतर सरांनी अगदी सुरुवातीलाच दूरदृष्टीने शाळेतील बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या ‘विद्यार्थीप्रिय’ अरुण केशव माने सरांच्या अनुभव आणि संपर्काचा लाभ शाळेला होईल अशी संस्थात्मक रचना केली. खरंतर तिथेच त्यांनी आपल्या अलोरे शाळा कारकिर्दीतील अर्धीअधिक लढाई जिंकलेली! जागतिक पातळीवर पोहोचलेल्या अलोरेतील माजी विद्यार्थ्यांच्या शाळेप्रति असलेल्या भावना त्यांनी अचूक ओळखल्या. माजी विद्यार्थी भेटीगाठी हा विषय पूर्ण क्षमतेने हाताळला. अलोरेत आपल्या मोजक्या सहकाऱ्यांच्या मनात विश्वासाची पेरणी केली. त्यातून शाळेसाठीची अनेक चांगली, पवित्र आणि कल्याणकारी कार्ये कमालीच्या वेगाने जेमतेम आठेक वर्षांत अंमलात आणली. अलोरे शाळेतील २०१७-२०२५ या कालखंडाकडे आज तटस्थपणे पाहिले की, वाचासिद्ध सरांच्या अलोरेतील ‘पूर्वनियोजित’ आगमनाचा अर्थ लक्षात येतो. अलोरे शासकीय शाळेचा भाडेपट्टी करार मागील काही वर्षांपासून वादात होता. कोयना जलविद्युत प्रकल्प सुरू झाल्यापासून अलोरे, पोफळी आणि कोयना येथे मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या वसाहती निर्माण झाल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारात घेऊन परशुराम एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेला १९७२साली अलोरेत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. सुरुवातीला शिक्षक वेतनेतर अनुदानातून प्रशालेचे भाडे आदी विविध खर्च पूर्णत्वास जात होते. मात्र शिक्षक वेतनेतर अनुदान बंद झाल्यावर शाळेला शासनाचे वीज, पाणी आणि भाडे भरणे अशक्य होऊन बसले. यामुळे निर्माण झालेल्या संघर्षातून जलसंपदा खात्याने अलोरे शाळेला कुलूप ठोकण्याचा पवित्रा घेतला होता. अखेर फेब्रुवारी २०२५मध्ये संस्था आणि शासनाच्या कोयना सिंचन विभाग कोयनानगर (सातारा) यांच्यात तीस वर्षांचा सामंजस्य करार पूर्ण झाला. जलसंपदा विभागाने प्रशालेची आजवरची वाटचाल आणि गुणवत्ता बघून हा तीस वर्षांचा करार केला. याच्या पाठीमागे केवळ वाचासिद्ध सर आणि अलोरे शाळा-संस्था समन्वयक अरुण माने सरांनी केलेली अविश्रांत धडपड कारणीभूत आहे, हे आवर्जून नोंदवायला हवे.

माजी विद्यार्थी आग्रहास्तव अलोरे शाळा स्थापनेपासून सलग २८ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा केलेल्या आगवेकर सरांचं नाव प्रशालेला देण्यात आलं. त्यानंतर आगवेकर सरांचा, ११ मार्चचा स्मृतिदिन ‘नंदादीप’ म्हणून साजरा होऊ लागला. वाचासिद्ध सरांनी, अरुण माने आणि शशिकांत वहाळकर सरांच्या सहकार्याने, अलोरे शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठी ३-४ वर्षांच्या प्रयत्नातून जनरल रजिस्टरवरील क्रमांक एकच्या विद्यार्थिनी प्रभावती कोनसिरसगी-बन्नी (बेळगाव) यांना शोधून काढून निमंत्रित केले. सुवर्ण महोत्सव निमित्ताने झपाटलेली ही त्रयी, आगवेकर सरांनी गुरु मानलेल्या मा. ना. कुलकर्णी सरांच्या पाउलखुणा शोधायला संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील दुंडगे गावी पोहोचली होती. सुसज्ज ‘कै. सुभाष लाड ग्रंथालय’ विभाग, महाराष्ट्राच्या आजवरच्या ग्रामीण शालेय इतिहासातील ‘न भुतो न भविष्यती’ अशा अभिनव उपक्रमांनी संपन्न झालेला शाळेचा सुवर्णमहोत्सवी उत्सव, तितक्याच गौरवशाली उंचीची नोंद असलेल्या संग्राह्य स्मरणिकेची निर्मिती, अटल टिंकरिंग लॅब, ज्युनिअर कॉलेजची शास्त्र शाखा, नवा अभ्यासक्रम (NEP), पालक-शिक्षक भेटी, अलोरे शाळेच्या अनुषंगाने घेतलेली आंतरराष्ट्रीय किर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांची भेट, एक राखी देशासाठी..., पालवी-कला छंद वर्ग आदी घटना अलोरेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेल्यात. सरांनी अलोरे शाळेच्या सुवर्णमहोत्सवी दिवसात जुन्या शाळेला ‘स्मृतिस्थळ’ म्हणून उजाळा दिलेला होता.

जून २०२५ नंतर ‘युनायटेड’मध्ये मिळालेल्या वर्षभरापेक्षा कमी अवधीत सरांमधील उपरोल्लेखित कौशल्यांची चुणूक पाहायला मिळाली. याच काळात नगर पालिकेचा ‘वाचू आनंदाने’, मिलिंद नाईक यांची कार्यशाळा उपक्रम शाळेत संपन्न झाला. युनायटेडसह गद्रे इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्ती जागवणारा उपक्रम राबवला. ‘एक राखी, एक देश’ या संकल्पनेवर आधारित सहाशे विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. ‘युनायटेड’मध्ये शिक्षण घेणाऱ्या १८ विद्यार्थ्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. या विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वडिलांसाठी खास राख्या तयार करून त्या त्यांच्या युनिटच्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. ही राखी केवळ बंधुभाव दर्शवणारी नसून सैन्यातील शूरवीरांना मनोबल देणारी ठरली. सेवानिवृत्ती रजा न घेत ‘युनायटेड’चे मुख्याध्यापक म्हणून मिळालेल्या उण्यापुऱ्या आठेक महिन्यांच्या कालावधीतही सरांनी दखलपात्र काम केले. पालकांनी विशेष कौतुक केलेले ‘युनायटेड’चे यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलनही संस्मरणीय झाले. ‘अथ् रामायण’उपक्रमात, ग.दि.मा. यांचे चिरंजीव आनंद माडगूळकर यांचे सोबतचा संस्थेच्या गुरुकुल विभागाचा विद्यार्थी सहभाग, दिवाळीपूर्व दिवसात ‘वसुबारस’दिनी युनायटेड शाळेतून निवृत्त झालेल्या सर्व शिक्षकांचे कार्यक्रम निमित्ताने शाळेत एकत्रीकरण करण्यात आले होते. महात्मा गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्रीजी यांची जयंती, महापरिनिर्वाणदिनी सरांनी शाळेतील शिक्षकांसाठी दोन गटात चक्क मोबाईल तंत्रज्ञानातील ‘चॅटजीपीटी’ अॅपचा उपयोग करून प्रश्नोत्तरांचे स्वरूप असलेले चर्चासत्र घेतले. चिपळूण नगर परिषद निवडणुकीमुळे यंदा शाळा संकुलाला ‘स्ट्रॉन्गरूम’चे स्वरूप आलेले. तेव्हा ‘शाळेची गैरसोय होतेय’, अशी खंत अधिकाऱ्यांकडून व्यक्त झाल्यावर, ‘शाळेचा उपयोग स्ट्रॉन्गरूम म्हणून होत असताना, लाल दिव्यांच्या गाड्या पाहाणाऱ्या इथल्या चार हजार विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडणारे आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत सजगतेने पोहोचवणारे वाचसिद्ध सर होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेले २८ पैकी १४ नगरसेवक सरांचे माजी विद्यार्थी राहिलेत.

वाचासिद्ध सरांची भाषणे तपासली तर त्यात सर नेहमी, ‘समाजातील सज्जनशक्ती आणि मातृशक्ती’वर विश्वास प्रकटताना दिसतात. ते बोलताना विविध पुस्तकांचे दाखले देतात. शिक्षण क्षेत्राचा मनुष्याच्या मस्तिष्काशी संबंध असल्याचे सांगणाऱ्या सरांनी, मानवी जीवनावर ठसा उमटवणारे तत्वज्ञान अनेकदा विद्यार्थ्यांसमोर मांडले आहे. ‘स्वातंत्र्यदिन’ हा ज्ञात-अज्ञात सैनिकांचा स्मरणदिन आहे. पुन्हा ही वेळ येऊ नये, या दिनी अशी जागरुकता व्हायला हवी आहे. कोणताही स्मरणदिन हा अनुकरण संकल्प करण्याचा दिवस आहे. प्रत्येकाच्या श्रद्धास्थानांचा आदर करणे आणि तो सहानभूतीने प्रकट करणे भारतीय लोकशाहीचा महत्त्वाचा गाभा आहे. याचं अवमूल्यन होता कामा नये. समाजातून जाणाऱ्या मंडळींची जागा कोणीतरी घेण्याची आवश्यकता असते. भारत ही परमेश्वराची भूमी आहे. इथल्या कणाकणामध्ये प्राण भरलेला आहे. इंग्रजांनी आणि इतरांनी ही भूमी लुटली पण इथला प्राण ते लुटू शकले नाहीत. सरांच्या या भावना विचार करायला लावणाऱ्या आहेत. कोणतेही ध्येय साध्य करण्यासाठी दूरदृष्टी (व्हिजनिंग), नियोजन (प्लानिंग) आणि वचनबद्धता (कमिटमेंट) याला पर्याय नाही. ‘कमिटमेंटचा माणूस’ आपल्या ध्येयांशी, कामाशी आणि नातेसंबंधांशी वचनबद्ध असतो. पूर्णपणे समर्पित असतो आणि दिलेले वचन पाळतो. असा माणूस आपल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेतो आणि त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करतो. आम्हाला जाणवलेले वाचासिद्ध सरांचे व्यक्तिमत्त्व असे आहे. आपल्या आंजर्ले गावाची ‘कालाष्टमी’ न चुकवले सर, ‘आई वडिलांची उतारवयात सेवा करण्याचे लाभलेले भाग्य सर्वोत्तम’ असल्याचे नमूद करतात यातच सारं आलं. सरांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत विपश्यना, मनशक्ती आदींचे प्रशिक्षण वर्गही जाणीवपूर्वक पूर्ण केलेले. विविध पुस्तकांचे नियमित वाचन करणारे सर अनेकांना भेट म्हणून पुस्तके देत आलेत. श्रीमारुती या देवतेच्या विशेष अभ्यासासह वंदेमातरम्, भारतीय संविधान, भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांची ते उत्तम मांडणी करतात. इव्हेंट मॅनेजमेंट हा अभ्यासाचा विषय आहे. पण काही माणसं हा जणू अभ्यास सोबत घेऊन जन्माला आल्यासारखी वावरतात. अशी काही माणसं आम्ही सामाजिक क्षेत्रात वावरायला लागल्यापासून गेली तीसेक वर्षे जवळून अनुभवतो आहोत, त्यात सरांचा नंबर वरचा आहे.

सेवानिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर नववर्षारंभी, भेटण्यासाठी आम्ही वाचासिद्ध सरांकडे वेळ मागितली. सरांनी एका रविवारी शाळेतच बोलावले. वेळ दिली होती सायंकाळी सातची! मुख्याध्यापक कार्यालयात दीडेक तास आमच्या गप्पा झाल्या असतील. सरांचे अलोरे शाळेतील ज्येष्ठ सहकारी अरुण केशव माने (सर)आणि शशिकांत शंकर वहाळकर (सर) सोबत होते. या भेटीत सुरुवातीलाच सरांनी, ‘तुझ्यासाठी एक गोष्ट काढून ठेवलेय...’ म्हणत आपल्या कपाटातून एक फाईल काढली आणि आमच्यासमोर ठेवली. हातात घेतल्यावर लक्षात आलं, ‘ती फाईल म्हणजे परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेच्या म्हणजे १९१८ सालच्या शाळेतील शिक्षकांचं ते वार्षिक पगारपत्रक होतं. त्यावर शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापकांपासून सर्व शिक्षकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.’ कदाचित, रद्दीत जाऊ शकणाऱ्या कागदपत्रांतून सरांनी ही फाईल बाजूला केली होती. शाळा-शिक्षक-विद्यार्थी-पालक-संस्थाचालक या पंचसुत्रीत जीवनभर कार्यरत राहून सामाजिक स्तरावर परिणामकारक विचार रुजविणारे शिक्षक दिवसेंदिवस कमी होत चालेलत. वाचासिद्ध सर अशांपैकी आहेत. वाचासिद्ध सरांच्या आरोग्यसंपन्न दीर्घायुष्यासाठी श्रीदेव भैरीबुवा चरणी प्रार्थना!

 

धीरज वाटेकर

चिपळूण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचास...