शुक्रवार, २९ मे, २०२०

निवृत्ती ! ‘भाग्याचं जगणं’ लाभलेल्या मुख्याध्यापकाची !!


    रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातल्या मोरेश्वर आत्माराम आगवेकर माध्यमिक विद्यालय व सीए वसंतराव लाड कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय अलोरेचे (अलोरे हायस्कूल अलोरे) मुख्याध्यापक अरुण केशव माने (सर) आज (३१ मे २०२०) सेवानिवृत्त होत आहेत. दीड वर्षापूर्वी ते मुख्याध्यापक झाल्यावर त्यांच्यावर, ‘You deserved it much earlier, A promotion well deserved, An occasion worth celebrating आदि शुभेच्छांचा सोशल मिडीयावर पाऊस पडलेला. वर्तमानपत्रात पुरवणी प्रसिद्ध झाली. ‘आपण केलेल्या शिक्षेमुळे आज माझे जीवन घडले’ असं म्हणू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणीं छानश्या पुष्पगुच्छासारख्या फुललेल्या होत्या ! ३४ वर्षांच्या सेवेत ही विलक्षण किमया साधलेल्या मानेसरांच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...!

त्याकाळात कोकणातील शिक्षणसंस्थाचे संचालक कोल्हापूरला जाऊन शिक्षकांच्या मुलाखती घेत असत. वर्तमानपत्रात जाहिराती प्रसिद्ध व्हायच्या. कुठल्यातरी हॉटेलातल्या पत्त्यावर मुलाखतींना तारीख, वेळ दिली जायची. अशीच एक जाहिरात मे १९८५ ला कोल्हापूरच्या हॉटेल रायगड येथे येऊन भेटण्यासंदर्भात प्रसिद्ध झाली. जाहिरात वाचून विषयज्ञान आणि शैक्षणिक अर्हता असलेले तरुण मुलाखतीला पोहोचले. मुलाखतीतून शिक्षक निवड झाली. इंग्रजी विषयासाठी निवडले गेले, अरुण केशव माने सर ! आणि शाळा होती चिपळूण जवळच्या खेड तालुक्यातली एल. पी. इंग्लिश मिडीयम स्कूल ! जून १९८५ पासून शिकवणं सुरु झालं. पण नियतीच्या आणि सरांच्या मनात काही वेगळं असलेलं ! मानेसर पुढच्याचवर्षी चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीची जाहिरात वाचून श्रीरामभाऊ भिडे, खेरसर आदिंनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे जून १९८६ ला अलोरे शाळेत रुजू झाले. मागील वर्षभरात, कोकणातल्या विद्यार्थ्यांच्या मनात असलेली इंग्रजीची भीती सरांच्या लक्षात आलेली. ही भीती, न्यूनगंड सरांना विद्यार्थ्यांच्या मनातून काढायचा होता. त्यांनी ठरवलं. वर्गात एकही शब्द मराठीत न बोलता केवळ इंग्रजीतून शिकवायचं. प्रयत्नातून हे शक्य होतं, हे त्यांना विद्यार्थ्यांना समजवायचं होतं. तसं सुरु झालं. अलोरे शाळेत कार्यरत असलेले दिलीप शिंदे, उमेश पाठक, दिलीप सपाटे हे त्यांचे समकालीन शिक्षक सहकारी ! अलोरेतील सुरुवातीचे दिवस सरांनी, याच सहकाऱ्यांच्या समवेत घालविले ! कालांतराने सरांना स्वतंत्र रूम मिळाली. कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याकडे जाणाऱ्या मार्गावरच्या आंब्यानजीक राहणाऱ्या ‘वाशिटकर’ आजी स्वयंपाक करायला यायच्या ! सरांना त्या आजही आठवतात. वसतिगृहातले शिक्षण म्हणतात ते हेच !

जुलै १९८७ ! मानेसर एकाएकी आजारी पडले. सर्दी, ताप आणि पित्ताचा त्रास त्यांना जाणवू लागला. अविवाहित, गावात नवखे असलेल्या सरांची काळजी कोण घेणार ? जवळच्या डॉक्टरांकडून आणलेली नेहमीची औषधे घेऊन सर आपल्या अंथरुणात पडून होते. शाळेतली त्यांची आजची अनुपस्थिती बाकी कुणाला नसली तरी एका व्यक्तीला जाणवलेली होती. सायंकाळी शाळा सुटली. सारे शिक्षक आपापल्या घरी निघून गेले. मानेसर अजूनही अंथरुणात असलेले. इतक्यात, ‘माने सर ! दार उघडा !’ असा भारदस्त आवाज सरांच्या कानावर पडला. अंथरुणातून उठून कसाबसा त्यांनी दरवाजा उघडला तर समोर मुख्याध्यापक आगवेकर सर उभे ! त्यांच्या हातात ‘त्रिभुवनकीर्ती आणि सुतशेखर’च्या गोळ्या होत्या. आगवेकर सरांनी मायेनं सरांच्या कपाळाला हात लावून ताप तपासला. काही सक्तीच्या विश्रांतीच्या सूचना दिल्या. कौटुंबिक चौकशी केली. आणलेल्या गोळ्या दिल्या. मानेसरांच्या हृदयात वडिलांच्या आठवणी जाग्या करून आगवेकरसर निघून गेले. आगवेकर सरांचं येणं मानेसरांना अंथरुणातून उठण्याची ऊर्जा देणारं ठरलं !

वरील प्रसंगानंतर आगवेकर सरांच्या सानिद्ध्यात विद्यार्थी घडविणे या एका मंत्राने सरही भारावून गेले. मानेसर अक्कोळचे ! सीमावर्ती भागातले. कोकणाशी अजिबात संबंध नसलेला. त्यामुळे सुरुवातीला ओळखीचं नसल्यानं अलोरेत त्यांना अवघडल्यासारख वाटलं. पण इथल्या स्थानिकांनी आपलस केल्यानं अल्पावधीत छान जमून आलं. सरांना जाणवले की मुलांच्या हृदयाला स्पर्शिणारे दर्जेदार शिकवलं पाहिजे. मग प्रयत्न सुरु झाला. विद्यार्थी आणि पालक मायेनं, आत्मीयतेनं वागू लागले. ‘इयत्ता आठवी क’चे वर्गशिक्षक ते इयता ‘दहावी अ’चे वर्गशिक्षक आणि पुढे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मुख्याध्यापक हा खडतर प्रवास नुसता सेवाज्येष्ठतेनुरूप नसलेला !

सरांच्या हाताखाली शिकून बाहेर पडून २५ वर्ष उलटल्यावरही जगभर पसरलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मागच्या १० मेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, ‘wish you a best one’ म्हटलं. यातून जणू कामाची पोचपावती मिळाली. मानेसरांचा आजी-माजी विद्यार्थ्यांवरला प्रभाव आजही कायम आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या वेगवेगळ्या पोस्टवर शेकड्यांनी शुभेच्छा येतात. सरही फेसबूकवरून रोजच्यारोज न थकता आपल्या विद्यार्थ्यांना ‘शुभसकाळ’ संदेश पाठवित असतात. विशेष म्हणजे सोशल मिडीयावर अनेकांना याचा कंटाळा असला तरी सरांच्या रोजच्या शुभेच्छांना ४०/५० विद्यार्थी न चुकता लाईक करतात, हे कशाचे द्योतक आहे ? विद्यार्थ्यांच्या भावना शंभर टक्के अस्सलं, भावविश्वातून प्रकटणाऱ्या ! मानेसरांचं सर्वात मोठं सामर्थ्य यात दडलेलं आहे.

वेगाने वाढणाऱ्या विज्ञाननिष्ठ जीवन पद्धतीमुळे दोन पिढ्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली आहे. ‘कोरोना’ने त्या दरीला घरोघरी एका छताखाली बंदिस्त करून टाकलंय. त्याला अडीच महिने होताहेत ! खरंतर मानेसरांची सेवानिवृत्ती जल्लोषात साजरी व्हायची. पण नेमकं कोरोनाचं संकट उभं राहिलं. वयोमानपरत्त्वे सरांची सेवानिवृत्ती जाहीर झाली असली तरी, ‘काम अजून संपलेलं नाही !’ हे सूचित करायला तर ही परिस्थिती निर्माण झाली नसेल ना ? सन २०२२ साली संपूर्ण देश आपला अमृतमहोत्सव साजरा करीत असेल तेव्हा आपल्या अलोरे हायस्कूल अलोरे शाळेत सुवर्णमहोत्सवी वातावरण असेल. मानेसर एकषष्टीत पदार्पण करतील ! सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी संकल्पपूर्तीसाठी मानेसरांची आवश्यकता आहे. सरही हे जाणून आहेत. सरांच्या उपस्थितीत, शाळेचा सुवर्णमहोत्सव ‘न भूतो...’ व्हावा यासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्यानी स्वतःला कटिबद्ध करायला हवंय ! मानेसरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत असताना, आगवेकर सरांच्या मनातले मुख्याध्यापक या नात्याने आगवेकर सरांच्या नावाची सार्थ ‘पाटी’ मिरवणाऱ्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी ध्येयाच्या दिशेने वाटचाल आरंभायला हवी ! विशेष म्हणजे, सरांनीही महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याचे ठरविले आहे.

खरंतर मानेसरांचं वैशिष्ट्य काय ? असा प्रश्न मला नेहमी पडतो. मग वाटतं, शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्यावर गुरूचा सार्वकालीन प्रभावशाली ठसा उमटावा लागतो. एकाचवेळी तो अनेकानेक विद्यार्थ्यांवर उमटविण्यात मानेसर कमालीचे यशस्वी ठरलेत. सरांकडे ‘विद्यार्थी’ भेदभाव कधीच नव्हता. त्यांना हुशार, कमी हुशार, काठावर पास होणारे, शब्दशः ‘ढ’ असे सगळे विद्यार्थी एकसारखेच ! त्यांचं सगळ्यांशी सहज जमायचं ! बोर्डात आलेल्या एखाद्या विद्यार्थ्याशी सरांचं जितक्या सहजतेनं जमायचं तितक्या सहजतेनं त्यांचं शाळा सोडून देऊन रिक्षा चालवायला लागलेल्याशीही जमायचं ! हे जमणं विलक्षण नैसर्गिक ! कुठलंही काम हलकं नसतं हा संस्कार सरांवर बालपणात बिंबवला गेला असावा.

‘ए कोण रे तो आलाय खाली, व्हरांड्यातून जाते अशी हाळी !

मानेसर आहेत खाली, म्हणत विद्यार्थी करती पळापळी !!

रागीट चेहऱ्यामागे सहृदयतेचा झरा, ममत्वात सामावला जीवनाचा अर्थ खरा !

आदर्श शिक्षक, उत्तम मार्गदर्शक, येता कोणती अडचण हेच चांगले समुपदेशक !!

सौ. राधा रायकर मॅडम यांनी शब्दबद्ध केलेल्या या ओळी ! मूळात, ‘हा माणूस जे काही करतोय ते आपल्या फायद्याचं आहे’, असं सरांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मनात झिरपत राहायचं ! कारण ती कृती करताना मानेसर हातचं न राखता अक्षरशः हृदयातून साद घालायचे. म्हणून त्यांच्या मांडवाखालून गेलेले विद्यार्थी आज २०/३० वर्षानंतरसुद्धा आपल्या शालेय जीवनातील त्यांच्या सोबतच्या क्षणांना विसरू शकलेले नाहीत. त्या क्षणांमध्ये देखावा अजिबात नव्हता. जे होतं ते केवळ अन् केवळ विद्यार्थ्याचं कल्याण ! तसे अलोरे शाळेतील सगळे शिक्षक या गुणांनी युक्त ! तरीही आगवेकर सरांनंतर अनेकांना मानेसर अधिक जवळचे वाटतात. याचं मूळ सरांच्या जडणघडणीत, त्यांच्या वसतिगृहातील दिनचर्येत गवसावं ! वसतिगृहातील शालेय शिक्षण तेव्हाही काही विशेष नव्हतं. गावात शाळा नाही म्हणून किंवा घरची परिस्थिती नाही म्हणून अनेकांच्या ते नशीबी आलं. मानेसरांनीही मैलोनमैल पैदल करीत, खडतर परिस्थितीतून स्वतःला सर्वोत्तम बनवलं. आपल्या पदरात पडलेल्या हजारो कोऱ्या पाट्यांवर शंभर टक्के तेच शिस्तबद्ध संस्कार करण्याचं कसब, स्वतःच्या अध्यापन विषयावरील त्यांची ‘कमांड’, जगण्यातलं सामाजिक भान, परिस्थिती कशीही असली तरी त्यातून शंभर नंबरी सोनं तावून सुलाखून बाहेर काढण्याची क्षमता, त्यासाठी अखंड मेहनतीची तयारी हे सारं शालेय वयात सरांनी बिंबवलंय, त्याला आजही धक्का लागलेला नाही.

आगवेकर सरांच्या सान्निध्यातल्या वातावरणाचं शतप्रतिशत सोनं केलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे मानेसर ! याच क्षमतेची अजून दोन व्यक्तिमत्त्व मला आठवतात ती म्हणजे श्री. खोतसर आणि कै. जाधव सर ! यातल्या खोतसरांचा विद्यार्थ्यांशी असलेला थेट संबंध सातवीच्या स्कॉलरशिपनंतर काहीसा कमी व्हायचा. जाधवसरांच्या बाबतीत कदाचित त्यांचा ‘भूगोल’ विषय विद्यार्थ्यांवर कमी प्रभाव टाकणारा ! परंतु कोणाच्याही अध्यापन पद्धतीला तोड नव्हती. स्कॉलरशिपच्या अभ्यासाला विद्यार्थ्यांना तासनतास बसविण्याची खोत सरांची क्षमता किंवा खडू हातात धरून, फळ्याला चिकटून उभं राहून आपला हात सहजतेने फिरवून पृथ्वीचा गोल काढणारे जाधव सर आठवले की काय विलक्षण क्षमतेची माणसं ‘शिक्षक’ म्हणून लाभली आम्हांला, असं वाटतं ! आगवेकर सरांची सगळी टीम याच पठडीतली, प्रत्येकाच्या शैलीवर एक स्वतंत्र लेख व्हावा अशी ! मानेसरांचं म्हणाल तर त्यांचा विषय इंग्रजी ! त्यात त्यांची अध्यापन पद्धत !

‘मानेसरांच्या तासाला तेव्हा, इंग्लडला गेल्यासारखे व्हायचे !

एवढं कुणीचं फ्लुएन्ट नव्हते, आम्हाला प्राऊड फील व्हायचे !!’

सरांची विद्यार्थींनी निशा खरातच्या या भावना पुरेशा बोलक्या आहेत. मराठी माध्यमाच्या शाळेत, आमच्यासारख्या बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी सर्वात अवघड असलेल्या इंग्रजीच्या तासाला, ३५ वर्षांपूर्वी एकही शब्द मराठीत न बोलणारे माने सर म्हणूनच वेगळे ठरले. आपल्याला जे सहज जमत नसतं ना ? त्याचं समूहाला आकर्षण अधिक असतं. माने सरांचं ‘विषयज्ञान’ आकर्षणाचा विषय ठरलं. ते वर्गात आल्यावर जो ‘पिनड्रॉप सायलेन्स’ व्हायचा त्याला आजही तोड नाही.

दिनांक १० मे १९६२ चा सरांचा जन्म ! सरांचं मूळगाव अक्कोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातले. गावात घरची ज्वारी आणि तंबाखूची शेती. संपूर्ण कुटुंबावर कडक शिस्तीच्या आजोबांचे संस्कार अधिक ! त्यांना ३ भाऊ आणि १ बहीण आहे. दोन भाऊ आजही गावातील शेती सांभाळतात. सरांना शेतीची सर्व कामे उत्तम अवगत आहेत. अक्कोळमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. घरची गरीबी असल्याने, इयत्ता आठवीपासूनचे शिक्षण त्यांनी निपाणीच्या वसतिगृहात राहून विद्यामंदिर शाळेत घेतलं. त्यांना निपाणी ते अक्कोळ पैदल करावी लागायची. सर बारावीला असतानाची घटना. परीक्षा जवळ आली होती. दुर्दैवाने, अजूनही पुस्तकांचा अभाव होता. अनेक समकालीन मित्रांची मदत आणि कॉलेजमधील लेक्चर्सच्या बळावर परीक्षेला बसले. परीक्षेच्या कालावधीत अभ्यासाचं गणित जुळविताना खूप त्रास झाला. खरंतर तेव्हाच सरांनी मनाशी खूणगाठ बांधली की काही करायचं पण आपण इंग्रजी विषयात पदवीधर व्हायचं. पुढे सरांनी बी.ए.साठी स्पेशल इंग्रजी विषय निवडला. तोवर शिक्षक वगैरे होण्याबाबत अजिबात न ठरलेले. बी.ए. इंग्रजी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी निपाणीच्याच देवचंद कॉलेजात एम.ए.साठी प्रवेश घेतला. पहिलं वर्षही पूर्ण झालं. तेव्हा आजोबांनी विशेष आग्रह करून बी.एड.चा फॉर्म भरायला लावला. शिक्षक व्हायचं पहिल्यांदा तेव्हा ठरलं. सन १९८५ ला शासकीय अध्यापक विद्यालय बेळगाव येथून सर शिक्षणशास्त्र विषयात बी.एड. झाले. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेवर सरांचं प्रभुत्त्व ! त्यांनी एन.सी.सी.चे ‘सी’ प्रमाणपत्रही मिळविले ! त्याचा उपयोग अलोरेत झाला. सन १९९७-९८ दरम्यान शाळेत एम.सी.सी. सुरु झालं. यासाठी दोन शिक्षकांची निवड झाली. श्री. खोतसर आणि मानेसर ! दोघांच्या मार्गदर्शनखाली कवायत म्हणजे साक्षात लष्करी प्रशिक्षणाचा अनुभव ! सन २००८ साली सरांनी, मुंबई विद्यापीठाचा ‘डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट’ (डी.एस.एम.) हा अभ्यासक्रम पूर्ण केला.

सरांच्या जीवनातील अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे, त्यांच्या पत्नी सौ. कविता (एम.ए.बी.एड.-इंग्रजी) यांचे दिनांक १ जून २०११ साली दु:खद निधन झाले. त्या शिक्षिका म्हणून अलोरे जवळच्या मंदार एज्युकेशन सोसायटीत, चिपळूणच्या बांदल इंग्लिश मिडीयम स्कूल आणि शेवटी डेरवणच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात आपल्या दोनही जुळ्या मुलाचं संपूर्ण पालन, पोषण आणि संगोपन सरांनी केलं. एकाचवेळी आई आणि वडिलांची भूमिका बजावली. अशा दु:खद प्रसंगी अलोरकरांनी धीर दिला. वेळोवेळी प्रसंगाला धावून आले. आपल्या साऱ्या समस्या, विवंचना बाजूला ठेवून सरांचा विद्यार्थ्यांना सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न राहिला. सध्या सरांची मुलगी कुमारी अक्षता ही बी.एल.डी.ए. ए.व्ही.एस. आयुर्वेद महाविद्यालय बिजापूर येथे तर मुलगा कुमार अक्षय हा श्रीनिवास विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिरिंग अॅन् टेक्नॉलॉजी, मेंगलोर येथे शिक्षण घेत आहे.

अलोरेत, स्वतंत्र खोली मिळाल्यावर ७/८ मुलं तिथं अभ्यासाला, मुक्कामाला असायची. सरांनी अनेक वर्ष इंग्रजीचा क्लास घेतला. बॅचनं मुलं यायची. त्यांचा इंग्रजी शिकवण्यांचा ज्ञानयज्ञ सकाळी पावणेसहा वाजता सुरु व्हायचा. नाममात्र शुल्कात तो चालायचा. एकदा शिकवणं स्वीकारलं की मग त्याच्या बदल्यात मला काय मिळतंय याचा विचार न करता बेभान होऊन शिकवणं विद्यार्थ्यांनी अनुभवलंय ! अनेकांच्या मेंदूत ते कायमचं कोरलं गेलं आहे ! जाता जात नाही आहे ते ! कालांतराने शाळेने दहावीच्या सर्व विषयांच्या विशेष तयारीसाठी प्रश्नपत्रिका काढायला घेतल्या. संपूर्ण जिल्हाभर त्या वितरीत व्हायच्या. त्याचंही काम कै. देशमाने सरांच्या नेतृत्वाखाली सरांनी पाहिलं.

अलोरे शाळेला आगवेकर सरांचे नाव दिले जावे यासाठी मानेसरांनी केलेली धडपड हा स्वतंत्र लेखनाचा विषय ठरावा. नामकरण सोहोळ्याच्या स्मरणिकेचेही सरांनी संपादन केले. सरांसह, पर्यवेक्षक मा. विभावर वाचासिद्ध आणि शशिकांत वहाळकर सर या तिघांनी केलेली धावपळही कृतज्ञतापूर्ण उल्लेख करण्यासारखी आहे ! या सोहोळ्याच्या अनेक आठवणी आमच्याजवळ आहेत, परंतु प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सरांना प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची नावं पाठ आहेत, माजी विद्यार्थ्यांची आहेतच आहेत ! मागच्या फेब्रुवारी अखेरीस मानेसर नेपाळला जाऊन आले. आपला प्रवासातला आनंद फेसबुकवरून आपल्या विद्यार्थ्यांशी शेअर करत राहिले. सरांनी अलोरे जवळच्या खडपोलीत छानसं घरकुल उभारलंय ! अर्थात निवृत्तीनंतरही ते इथंच असणार हे नक्की आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शैक्षणिक पटलावर आगवेकर सरांची शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलोरे शाळेतून सेवानिवृत्त होताना स्वतः आगवेकर सरांनी, आपल्या पश्चात शाळेच्या मुख्याध्यापक पदाकरिता खात्रीपूर्वक विश्वास दाखवलेले, ज्ञानमंदिर पावित्र्यासाठी, केवढा जीवाचा आटापिटा ! ही काव्यभावना जगणारे मानेसर हे आगवेकर सरांनंतरचे शाळा आणि सरया सूत्रात सामावणारे, दीर्घकालीन कारकीर्द लाभलेले अफलातून व्यक्तिमत्त्व ! शालेय जीवन समृद्ध मानवी जीवनाचा पाया मानला जातो. आमच्यासारख्या अगणित विद्यार्थ्यांचा हा पाया सर्वार्थाने बळकट करण्यासाठी मुलांना शिस्त लावणारे, आयुष्यावर जीवनमूल्यांचे संस्कारासह वक्तशीरपणा, वेळापत्रकानुसार वर्तणूक, वेळच्यावेळी अभ्यास या गोष्टींची सवय लावणारे प्रसंगी अगदी व्यक्तिगत पातळीवर परिश्रम घेणारे माने सर अनेकांच्या पक्के स्मरणात आहेत. शाळा भरतानाचा पहिला तास चुकविणाऱ्यांच्या, उशीरा येणाऱ्यांच्या स्वागतासाठी मानेसर गेटवर हातात शिमटी (बारीक काठी) घेऊन उभे असायचे. मजबूत झाडाच्या फांद्या कायम नम्र असतात. निसर्गाच्या या नियमाचे सदैव भान असलेल्या सरांचा शिक्षित विद्यार्थी देश घडवू शकतोया तत्त्वावर गाढा विश्वास राहिला.

शिस्तीच्या माध्यमातून स्व-नियमनाला, मनाला लगाम घालायला जमलं नाही तर आयुष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे व्यक्तीला शालेय जीवनात स्व-नियमन सवयीची आणि त्याकरिता शिस्तीची गरज असते. सर्वसाधारणपणे कडक शिस्त ही गोष्ट मुलांच्या जगात फार चांगली मानली जात नाही. थोडीशी बदनामचं असते. परंतु खरी शिस्त ही वागण्याबाबत नसून मनाला, विचारांना असावी लागते. आश्वासक जीवनासाठीचा ती महत्त्वाचा पाया असते. तशी शिस्त आपल्या विद्यार्थ्यांच्यात पेरण्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून माने सर यशस्वी झाले आहेत. स्वत: मानेसर हे स्व-नियमित जीवनपद्धतीचे आदर्श उदाहरण आहेत. ‘आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत’, ही जीवनातील केवढी तरी मोठ्ठी आनंदाची बाब आहे. सन २०२२ च्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापूर्वी, काळगतीचे अचूक भान असलेल्या विभावर वाचासिद्ध सरांचे अलोरे शाळेत येणं, शाळेचा मोरेश्वर आत्माराम आगवेकर हायस्कूलनामकरण सोहोळा, मानेसरांचं मुख्याध्यापक होणं आणि पुढच्या काळात त्यांचं शाळेच्या सोबत असणं या साऱ्या सकारात्मक घटनांकरीता शाळेचे संस्थाचालक आदरणीय डॉ. विनय नातू साहेब आणि सर्व संचालक मंडळाप्रतिही कृतज्ञता व्यक्त करायला हवी !

निवृत्ती ! सेवेत कार्यरत असलेल्या मनुष्य जीवनात एक सर्वोत्तम संधी घेऊन येणारी घटना ! काही वेळेला सेवेत उद्देशपूर्ण कार्य न घडल्यामुळे निवृत्त व्यक्‍तीच्या मनात उदासी पसरलेली असते. तर काही माणसं निवृत्तीकडे जीवनातील नवीन टप्पा, कार्य साधण्याजोगे द्वार म्हणून पाहतात. स्वतःला व्यस्त ठेवत समाजासाठी अधिकाधिक फलदायी बनण्याचा मार्ग अनुसरतात. ‘शेवटी आपल्या हृदयात काय आहे ?’ हे फार महत्त्वाचं असतं. हृदय जर काठोकाठ भरून वाहात असेलं तर या जीवनात आपण सर्वकाही मिळवलेलं आहे. ह्या अनुभूतीसह जगणं सरांच्या उत्तर आयुष्यातील सुंगंधी ठेवा ठरावा. भूतकाळाशी न भांडता, त्याचं केवळ तटस्थ निरीक्षण करत शक्य तेवढं स्वच्छ आणि मोकळेपणाने जगण्याचं महत्तम कसब मानेसरांनी फारपूर्वी आत्मसात केलंय ! हे कसब त्यांची जगण्यातली श्रीमंती आणि सौंदर्य अधिकाधिक वाढवत जाणार आहे. आगवेकरसरांच्या कारकिर्दीच्या अखेरीस ऑक्टोबर १९९८ ते २००३ पर्यंत मानेसर उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. आपली शिक्षणव्यवस्था, त्यातले कायदे, ‘सेवाज्येष्ठता’ नावाचे उद्योग गुणवत्तेच्या आडवे आले. दोष तरी कोणाला द्यावा ?

सन २०११-१२ मध्ये ते संस्थेच्या खडपोली शाळेत, सन २०१७-१८ मध्ये युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये उपमुख्याध्यापक पदावर रुजू होऊन २०१९ च्या वर्षारंभी मानेसर पुन्हा आपल्या कर्मभूमीत अलोरेत ‘मुख्याध्यापक’ म्हणून परतले. ‘सगळंच काही वाईट नसतं’ हे प्रतिपादन करणारा हा दीडवर्षांचा कालावधी लाभला ! रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी माजी विद्यार्थ्यांच्या सन २००० च्या बॅचने वर्तमानपत्रात सरांवर ‘जाहिरात पुरस्कृत पुरवणी’ प्रकाशित केली. पुरवणीतील जाहिराती त्या बॅचच्या अख्ख्या विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने जमा केलेल्या ! जणू वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात असलेला सरांचा राज्याभिषेकच त्या दिवशी घडला ! इतका भावनाप्रधान की ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीत बसताना सरांना आनंदाश्रू अनावर झाले. सोशल मिडीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अलोरे शाळेच्या ‘मुख्याध्यापक’ पदाच्या खूर्चीला, मोरेश्वर आत्माराम आगवेकर सरांनी आपल्या विलक्षण कर्तृत्वाने, नेतृत्वाने समाजात वेगळा मानदंड प्रस्थापित करून दिला. ‘मुख्याध्यापक हा कर्तव्यनिष्ठ, वेळेचे भान असणारा, त्यानुसार नियोजन करणारा, कर्तव्यकठोर तितकाच वेळप्रसंगी मेणाहून मऊही असावा. आपल्या विषयात पारंगत, अभ्यासू, व्यासंगी, पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यात दुवा म्हणून काम करणारा मुख्याध्यापक असावा.’ असं आगवेकर सर कायम म्हणत. स्वतः तेही कायम असेच वागले. संधी मिळालेल्या प्रत्येक काळात त्यांच्या तत्वानुसार मानेसरांनी प्रभावी काम करण्याचा प्रयत्न केला. आगवेकर सरांनी प्रस्थापित केलेला ‘तो’ मानदंड तितक्याच समर्थपणे सांभाळणारे ‘केवळ’ मानेसर म्हणून या अभिषेकाला, सन्मानाला पात्र ठरले !

कधीकधी आपण ज्या समाजात वावरतो तो समाज आपल्याला अधिक ओळखत असतो. ‘आपलं म्हणालं तर काम बोललं पाहिजे, तोंड नव्हे !’ प्रत्येकाच्या स्वतः विषयीच्या कल्पना आणि समाजभावना यातलं वाढतं अंतर ‘कीर्तनाचा वर्तनाशी नसलेल्या संबंधासारखं ठरावं !’ मानेसरांना सामान्य मानवी जीवनातील ह्या असामान्यत्वाच्या कसोट्या साधता आल्या ! म्हणून मानेसरांचं संघर्षाला पुरून उरत जगणं आम्हाला भाग्याचं’ वाटलं. आज काळ बदललाय ! आव्हानं बदललीत. शिक्षण पद्धती बदलल्येय ! तरीही शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं कायम आहे. कायम राहणार आहे. त्या नात्यातला उमाळा साधत शाळेच्या ‘मुख्याध्यापक’पदाच्या खूर्चीचा सन्मान राखण्याची नैतिक जबाबदारी तिच्यात स्थानापन्न होणाऱ्या पुढच्या प्रत्येकावर असणार आहे. तो सन्मान ‘कालातीत’ राखला जावा, खुर्चीत बसणाऱ्या प्रत्येकाने खूर्चीचा हा इतिहास जाणून ‘बेभान होऊन कार्यरत व्हावं !’ या देशाचं भवितव्य असलेली सुजाण निखळ पिढी घडवावी, यासाठीचं हे प्रामाणिक निवेदन !

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८, dheerajwatekar@gmail.com

(माजी विद्यार्थी, इयत्ता दहावी बॅच १९९५)


एका कार्यक्रमात देवी सरस्वतीच्या प्रतिमेस
          पुष्पहार अर्पण करताना, संस्थाचालक डॉ. विनय नातू
           आणि मुख्याध्यापक अरुण केशव मानेसर !

सन २०१९ ला शाळेच्या विद्यार्थ्यानींनी जवानांना
             पाठविण्यासाठी बनविलेल्या राख्या स्वीकारताना मानेसर !

विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण करताना मानेसर !


शाळेच्या एका कार्यक्रमात बोलताना मानेसर !


दैनिक सागर ३१ मे २०२० 

दैनिक सकाळ ३० मे २०२० 

दैनिक पवना समाचार पुणे १ जून २०२० 

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...