पंढरीच्या
श्रीपांडुरंग-रखुमाईच्या आषाढीसारखी, रायगड जिल्ह्यातील पोलादपूरचे (प्रथम)
ज्येष्ठ पत्रकार अरुण दाजी जाधव,
आमचे सासरे आणि सासूबाई (मातोश्री) श्रीमती संगीता यांच्या
संसाराची गेली ५१ वर्षे वारी सुरू होती. उभयतांनी आपल्यातील वयाच्या अंतरावर
प्रेमाचा,
समजुतीचा आणि निष्ठेचा सुवर्णसेतू बांधलेला. सुख-दुःखाचा प्रपंच
परमार्थ मानून केलेला. नियतीने या अखंड वारीत विघ्न आणले. सासरे, अरुण जाधव यांचे १७
सप्टेंबरच्या सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी पोलादपूर बाजारपेठेतील
राहत्या घरी निधन झाले. लेखणीच्या माध्यमातून सामाजिक विषयांना वाचा फोडणारे,
शब्दांवर विलक्षण प्रभुत्व असलेले किमयागार आणि एकटाकी अग्रलेखनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पत्रकारितेत
आपले स्थान निर्माण करणारे अशी त्यांची ओळख राहिली. त्यांच्या रूपाने रायगडच्या
पत्रकारितेतील एक पर्व संपलं.
 |
शिवतेज दैनिकाच्या कार्यालयात बसून लेखन करताना सोबत पत्रकार शैलेश पालकर |
काही
माणसांचे जाणे केवळ एका व्यक्तीचे जाणे नसते, तर तो
एका कालखंडाचा, विचारधारेचा आणि समृद्ध परंपरेचा अस्त असतो. काळाच्या
अथांग प्रवासात माणसे येतात आणि जातात. काही संपत्तीचे इमले उभे करतात. काही
सत्तेच्या शिखरावर पोहोचतात. काही प्रसिद्धीच्या झगमगाटात स्वतःचे आयुष्य व्यतित
करतात. या गर्दीत काही व्यक्तिमत्त्वे अशीही असतात, जी मानवी
मूल्यांचा आणि स्वाभिमानाचा आदर्श घालून देतात. प्रपंचात राहूनही एखाद्या
संन्याशासारखे, विरक्त आयुष्य कसे जगावे? हे सांगतात. अरुण
जाधव या पठडीतील होते. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९४२चा. ते केवळ पत्रकार नव्हते, तर समाजाच्या नाडीवर हात ठेवणाऱ्या विलक्षण प्रतिभेचे धनी होते. आजच्या
युगात जिथे माणूस एका चांगल्या नोकरीसाठी, पैशांसाठी आणि
शहरात स्थायिक होण्यासाठी स्वतःच्या जन्मदात्या आई-वडिलांना, गावाकडच्या मातीला सहजासहजी विसरून जातो, तिथे
आजपासून तब्बल साठेक वर्षांपूर्वी यांनी घेतलेला निर्णय डोळ्यात अंजन घालणारा
होता. त्या काळात मुंबईसारख्या शहरात किंवा मंत्रालयात सरकारी नोकरी मिळणे हे
भाग्याचे आणि अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाई. जाधव यांना मंत्रालयात नोकरी मिळालेली.
भविष्य उज्ज्वल होते. परंतु, त्याचवेळी गावाकडे त्यांची उतरत्या
वयातील आई एकटी होती. तिला त्यांच्या सेवेची, सोबतीची गरज
होती. एका बाजूला मुंबईतील मंत्रालयातील नोकरी, पैसा,
प्रतिष्ठा आणि भविष्य होते. दुसऱ्या बाजूला गावाकडच्या घरात आईच्या
सेवेचे कर्तव्य होते. जाधव यांनी मंत्रालयातील नोकरीवर पाणी सोडले. हा निर्णय घेणे
जेवढे कठीण होते, तेवढेच तो आयुष्यभर पाळणे अधिक खडतर होते.
परंतु, जाधव यांनी केवळ हा निर्णय घेतला नाही, तर संपूर्ण आयुष्यभर कोणत्याही पश्चात्तापाशिवाय तो पाळला. या संपूर्ण
प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नीने, आमच्या सासूबाईंनी दिलेली खंबीर साथ स्वतंत्र
लेखनाचा विषय ठरावा.
%20dheeraj%20watekar.jpg) |
| उभयतांना विवाहाच्या ५१ व्या वाढदिवसाला आम्ही दिलेली डिजिटल भेट |
जाधव
चौथी-पाचवीत शिकत असतानाचा काळ गरिबीचा होता. त्या काळी क्वचित मुलांना खाऊसाठी
मिळणारा 'एक आणा' खूप मोठा असायचा. मुले त्या पैशातून गोळ्या,
बिस्किटे किंवा खेळणी विकत घेत. पण जाधव वेगळ्या मातीचे बनले होते. वडिलांनी
खाऊसाठी दिलेला तो 'एक आणा' ते दैनिक 'लोकसत्ता' विकत घेण्यासाठी वापरत. तो काळ ह. रा.
महाजनी आणि र. ना. लाटे यांच्यासारख्या महान संपादकांचा होता. त्या दिग्गज
संपादकांच्या लेखणीतून उतरणारे शब्द एका आण्याच्या लोकसत्ताच्या माध्यमातून लहान
वयाच्या जाधव यांच्या मनात घर करून गेलेले. खाऊच्या पैशातून सुरू झालेला हा
अक्षरांचा प्रवास पुढे जाऊन एवढा मोठा होईल, की ते पोलादपूर
तालुक्यातील 'पहिले पत्रकार' म्हणून
इतिहास घडवतील, असे तेव्हा कोणालाही वाटले नव्हते. पण त्यांनी
बालपणी घेतलेला निर्णय एका मोठ्या वादळाची नांदी ठरला. आजची पिढी जिथे वाचनापासून
मैलोनमैल दूर चालली आहे, तिथे जाधव यांनी वयाची ऐंशी ओलांडल्यावरही
लोकसत्ता वाचण्याचा नियम बदललेला नव्हता. बालपणी त्यांचा स्वभाव चुळबुळा होता.
समाजासाठी काहीतरी ठोस, चांगलं आणि नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास त्यांना होता. १९५९ची
एक आठवण आहे. त्यांनी चिपळूणमधील 'युनायटेड इंग्लिश स्कूल'मध्ये इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांना वर्गशिक्षक म्हणून
लाभले लोकप्रिय आणि पुढे 'दैनिक सागर'चे
संपादक म्हणून नावारूपाला आलेले निशिकांत उर्फ नाना जोशी (सर). नाना म्हणजे कोकणचे
बुद्धिवैभव, एक चालता-बोलता ज्ञानकोश. नानांनी त्या वर्षी आठवी 'ब' च्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली सुप्त कला ओळखून 'उषःकाल' नावाचा एक हस्तलिखित विशेषांक तयार करून
घेतला होता. नानांच्या पारखी नजरेने जाधव यांना अचूक हेरले, अंकाच्या संपादक
मंडळात घेतले. जाधव यांच्या पत्रकारितेची ही मुहूर्तमेढ ठरली. पुढील शिक्षणासाठी काही
कारणास्तव जाधव आठवी पास होऊन आपल्या पोलादपूरला आले. चिपळूणशी असलेला प्रत्यक्ष
संपर्क तुटला, पण शालेय हस्तलिखिताच्या निमित्ताने नानांशी जुळलेले
ऋणानुबंध पुढील आयुष्यात कायम राहिले.
 |
| अरुण दाजी जाधव यांचे हस्ताक्षर |
पोलादपूरमध्ये
शिक्षण घेत असतानाची घटना. पावसाळ्याचे दिवस होते. सुसाट वाऱ्यासह पाऊस कोसळत
होता. तालुक्यातील 'वाव-धारवली' गावात वीज पुरवठा खंडित झाला होता. गावाचे प्रचंड नुकसान झाले होते. लोक
अंधारात आणि संकटात होते. प्रशासनाचे अजिबात लक्ष नव्हते. ही परिस्थिती पाहून जाधव
यांना शांत बसवेना. त्यांनी या भीषण प्रसंगाची सविस्तर बातमी एका साध्या कागदावर
लिहून काढली आणि थेट 'दैनिक नवशक्ती'कडे
पाठवून दिली. त्या वेळी नवशक्तीचे संपादक होते पु. रा. बेहेरे आणि राज्याचे
वीजमंत्री होते शंकरराव चव्हाण. दुसऱ्या दिवशी संपादक बेहेरे यांनी ती बातमी 'नवशक्ती'मध्ये ठळकपणे प्रसिद्ध केली. बातमीचा प्रभाव
इतका जबरदस्त होता की, वीजमंत्री शंकरराव चव्हाण यांनी
तातडीने अधिकाऱ्यांना 'वीज पीडित गावाकडे ताबडतोब रवाना व्हा
आणि तिथली व्यवस्था पूर्ववत करा' असा कडक हुकूम सोडला. या
घटनेनंतर 'दैनिक नवशक्ती'ने जाधव यांच्यामधील
‘पत्रकार’ ओळखला आणि त्यांना अधिकृत पत्रकार ओळखपत्र, तारेने (टेलीग्रामने)
बातम्या पाठवण्याचा विशेष परवाना पाठवला. त्या काळात अशा प्रकारचा परवाना मिळणे ही
खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट होती. या घटनेने त्यांच्या आत्मविश्वासाला पंख
दिले. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. हिंदी आणि इतिहास
हे त्यांचे आवडते विषय राहिले. त्यातही हिंदीची ‘साहित्यप्राज्ञ’ ही पदवीही त्यांनी
मिळवली. ते मराठी इतक्याच लीलया पद्धतीने हिंदीत लिहायचे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात ‘शिक्षक’ म्हणून रायगड शिक्षण प्रसारक
मंडळाच्या देवळे हायस्कूलमधून झाली. नंतर त्यांनी समाजकारणाचे 'महाद्वार' गाठले. सहकार क्षेत्रातील दूध उत्पादक संघ,
शेतकरी बाजार, जिजामाता को-ऑपरेटीव्ह क्रेडिट
सोसायटी आणि पोलादपूर तालुका सहकारी पतसंस्था अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून तळागाळातील
माणसाला आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले. नवयुग विद्यापीठ आणि महाड पोलादपूर तालुका
पत्रकार संघाच्या माध्यमातून नव्या पिढीला दिशा देण्यात योगदान दिले. आजच्या काळात
पत्रकारिता करणे खूप सोपे झाले आहे. हातात स्मार्टफोन, फिरण्यासाठी
दुचाकी किंवा चारचाकी गाड्या, इंटरनेटची गती आणि वातानुकूलित
कार्यालये अशी व्यवस्था आहे. पण जाधव यांनी ज्या काळात पत्रकारिता सुरू केली, तो काळ अत्यंत भीषण आणि सुविधाशून्य होता. वाहतुकीची विशेष साधनसामग्री
नव्हती. रस्ते धड नव्हते. पुरेशी एस.टी.ची सोय नव्हती. अशा कठीण काळात त्यांनी पत्रकारिता
केली. गावात काय चालले आहे? लोकांचे प्रश्न काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी ते
मैलोन मैल पायी चालत. यामुळे बघताबघता हा माणूस पोलादपूरच्या कानाकोपऱ्यात परिचित
झालेला. एका जागी शांत बसणे त्यांच्या स्वभावात नव्हते. समाजात काहीतरी चांगले
घडले पाहिजे ही तळमळ त्यांच्या मनात असायची. त्यांनी सलग ४० वर्षे 'एकटाकी' लेखन केले. त्यांच्या लेखणीतून उतरणारा शब्द
हा समाजाचा आरसा ठरला. त्यांच्या बातमीने प्रशासकीय यंत्रणा हलत राहिल्या.
उपेक्षितांना हक्क मिळत गेला. त्यांच्या लेखणीने 'काळ’
गाजवला. पोलादपूरच्या मातीत पत्रकारितेचे रोपटे लावून त्याचा
वटवृक्ष करण्याचे अजोड कार्य त्यांनी आपल्या रक्ताचे पाणी करून केले.
 |
| आपल्या मुला-मुलींसह पत्नी संगीतासोबत अरुण दाजी जाधव |
कालांतराने
त्यांना महाड मधून प्रकाशित होणाऱ्या 'दैनिक
कुलाबा शिवतेज'मध्ये वृत्त संपादक म्हणून संधी मिळाली. तो
काळही संगणकाचा नव्हता. तंत्रज्ञान प्राथमिक अवस्थेत होते. खिळे जुळवून, काळी शाई हाताला फासून, छपाईच्या मशीनचा खडखडाट सहन
करत, कागद आणि लेखणीच्या जोरावर वृत्तपत्र साकारले जायचे.
संपादक, बातमीदार, कर्मचारी कुटुंबासारखे
एकोप्याने काम करायचे. प्रयत्नांती 'शिवतेज'ने रायगड जिल्ह्यात दमदार झेप घेतली. तेव्हा चिपळूणमधून नानांचा 'सागर' आणि अलिबाग-पेझारी मधून प्रसिद्ध होणारे 'कृषीवल' ही दैनिके कोकणचे मैदान गाजवत होती. या
स्पर्धेत 'शिवतेज'ने आपले स्थान
निर्माण केले ज्यात जाधव यांचे योगदान राहिले. त्यांच्या कामाची निष्ठा, अचूक बातमीदारी आणि संपादकीय कौशल्य पाहून शिवतेज व्यवस्थापनाने त्यांना 'कार्यकारी संपादक' म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर जाधव
यांनी मागे वळून पाहिले नाही. ते 'शिवतेज'चा कणा म्हणून वावरले. ते स्वतः अग्रलेखासह 'रपेट',
'महाद्वार', ‘नारद’ यांसारखी लोकप्रिय स्तंभलेखन,
चारोळ्या आदींसह प्रासंगिक आणि खुमासदार लेखन करत. त्यांचे लेखन प्रवाही
आणि वाचकांना खिळवून ठेवणारे असायचे. या संपूर्ण प्रवासात त्यांना 'दैनिक शिवतेज'चे मालक-संपादक कै. विजयसिंह जाधवराव
यांनी दिलेली कामाची मोकळीक खूप महत्त्वाची ठरली. जाधवराव यांच्या पाठबळामुळे ते मुक्तपणे
आपली लेखणी चालवू शकले. संगणक आणि लॅपटॉपच्या एकविसाव्या युगातही त्यांनी टाईपरायटर,
लॅपटॉप वापरला नाही. 'एकटाकी लेखन' हीच
त्यांची ताकद होती. एकदा हातात लेखणी घेतली की ते त्यांचे विचार अखंडपणे, विना खाडाखोड कागदावर उतरवायचे. जनता पक्ष, प्रजा
समाजवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय राजकारणातही आपले
स्थान निर्माण केले. त्यांच्या ‘रपेट’साठी ‘शिवतेज’ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात
हमखास वाचला जायचा अशी आठवण श्रद्धांजली वाहाताना ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर
यांनी सांगितली, ती याचमुळे! जनसंपर्कामुळे आणि निष्कलंक
चारित्र्यामुळे पोलादपूर शहरासह तालुक्यात 'विशेष कार्यकारी
दंडाधिकारी' म्हणून त्यांचा आदरयुक्त दरारा राहिला.
 |
| दिवेआगर मधील आनंददायी 'रपेट' (३ जून २०२४) |
त्यांच्या
पत्रकारितेतील एक आठवणीतील प्रसंग सांगतो. एकदा एका दैनिकाने आपल्या विशेष अंकात
यशस्वी वाटचालीबद्दल विस्तृत लेख प्रसिद्ध केला होता. तो अंक जेव्हा 'शिवतेज'च्या कार्यालयात आला, तेव्हा
जाधव यांनी वाचला. अग्रलेख खूपच सुंदर आणि प्रभावी होता. परंतु यांच्या तीक्ष्ण नजरेतून
एक गोष्ट सुटली नाही. दैनिकाच्या त्या सर्वांगसुंदर लेखात अलिकडे निधन झालेल्या
एका महत्त्वाच्या व्यक्तिच्या योगदानाचा उल्लेख नव्हता. यांनी तात्काळ दुसऱ्या
दिवशीच्या 'दैनिक शिवतेज'च्या
अग्रलेखात याच मुद्द्यावर आपली लेखणी चालवली. अग्रलेखात त्या मुद्द्याचा विस्तृत व
गौरवपूर्ण उल्लेख केला. अंकाचे प्रूफ वाचल्यावर त्यांचे सहकारीही अवाक झाले. संबंधितांनी
दुसऱ्या दिवशी जेव्हा तो अग्रलेख वाचला तेव्हा त्यांचेही डोळे पाणावले. संबंधितांनी
आपला अग्रलेख लिहिणाऱ्या संपादकांना बोलावून घेत, "अग्रलेख
कसा लिहितात ते आधी शिवतेज वाचा आणि शिका!" असे सांगितले. एका पत्रकाराला
स्वतःच्या लेखणीची ताकद आणि पावती मिळण्यासाठी यापेक्षा मोठे कोणते बक्षीस असू
शकते? वर्तमानपत्रात स्पर्धा असूनही आदराचे स्थान अधोरेखित
करणारी अशी सुसंस्कृत पत्रकारिता जाधव यांचे बलस्थान होती. आता ती दुर्मिळ झाली
आहे. आज पत्रकारितेवर आणि एकूणच समाजकारणावर आक्षेप घेतले जातात. पत्रकारिताही
काही अंशी व्यावसायिक आणि तडजोडीची झाली आहे, अशी टीका होते.
अशा गढूळ वातावरणात जाधव यांनी आपल्या तत्त्वांशी, आपल्या
लेखणीशी आणि स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. "मी कुणाच्या पाच पैशाच्या चहाचाही
मिंधा नाही!" हे त्यांचे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचे सार ठरावे. त्यांचे
वय झाले होते. कालौघात स्मृतिभ्रंश (अल्झायमर) सारख्या आजाराने ग्रासलेले. अनेक
गोष्टी, जुन्या आठवणी धूसर होत होत्या. पण विस्मरणाच्या आजारपणाच्या अंधारात,
जेव्हा त्यांच्या अंतर्मनाला कोणी स्पर्श करे, तेव्हा त्यांच्या तोंडून हेच वाक्य अत्यंत ठामपणे आणि ताठ कण्याने बाहेर पडलेले
कित्येकदा आम्हीही ऐकलेय. यावरून हा माणूस आयुष्यात किती पारदर्शक आणि प्रामाणिक जगला
असेल समजावे. जाधव जगण्याचं जगावेगळं व्रत घेऊन वावरले. लेखणीचा सौदा करून गडगंज
संपत्ती कमावण्याचा विचार त्यांनी केला नाही. कमळाचे पान जसे पाण्यात राहूनही
पाण्यापासून अलिप्त असते, तसे जाधव राजकारण आणि पत्रकारितेच्या
गदारोळात राहूनही पूर्णपणे विरक्त आणि शांत होते.
 |
| मसुरीच्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या गारव्यातील आनंदाचे क्षण (२०१६) |
डॉ.
अनिल अवचट यांनी त्यांच्या मृत्यूच्या पंधरा दिवसांपूर्वी पुण्यातील त्यांच्या
मित्रांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एक पोस्ट टाकली होती. ती अलिकडेच आमच्या वाचनात
आली. अवचट यांनी लिहिलेल्या पोस्टमधून समाधानी आयुष्य जगल्यावर कुठं थांबायला हवं?
यावर भाष्य केलंय. जाधवही असेच आपल्या पत्रकारितेच्या आणि सार्वजनिक जीवनातून
२००५नंतर स्वतःला थांबवत अगदी अलगद बाजूला झाले. त्यांनी लेखनही जवळपास थांबवले. त्यांचे
शरीर थकलेले पण 'मनमती' शाबूत होती. विविध नियतकालिकांनी त्यांच्याकडे मुद्रित पत्रकारितेच्या
सुवर्णकाळाविषयी मनोगत मागितलं. मुलाखती घेतल्या. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही लोक
त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी येत. 'सत्यशोधक' साप्ताहिकाच्या दीडशतकोत्तरी (१५० वर्षे) वाटचालीच्या निमित्ताने आम्ही
त्यांना लिहायची विनंती केली. तेव्हा त्यांच्या जीवनातील काही घटनांचा आम्हाला उलगडा
झाला. लेखनात त्यांनी, ‘बिनु पद चलइ सुनइ बिनु काना। कर बिनु करम करइ बिधि नाना॥
आनन रहित सकल रस भोगी। बिनु बानी बकता बड़ जोगी॥‘ ही गोस्वामी तुलसीदास यांच्या 'श्रीरामचरितमानस' ग्रंथातील बालकांड अध्यायातील प्रसिद्ध ओवी
(चौपाई) लिहिलेली. ही ओवी परमेश्वराच्या
निराकार आणि निर्गुण स्वरूपाची महानता अधोरेखित करते,
जे सर्वव्यापी आहे. परमेश्वर देव सर्वत्र आहे आणि त्याच्या क्षमता
कोणत्याही भौतिक मर्यादांनी बांधलेल्या नाहीत. जगत असलेला विचार त्यांनी लिहून जणू
आमच्यापर्यंत पोहोचवला होता. खरंतर अरुण दाजी जाधव यांच्या पत्रकारितेच्या कालखंडातील
मंतरलेल्या दिवसांची बखर लिहिली जायला हवी. आम्ही मागील १७ वर्षांत त्यांना जवळून
पाहिले. त्यांच्याशी गप्पा मारणे म्हणजे ज्ञानाच्या महासागरात बुडी मारण्यासारखे
असायचे. राजकारण, समाजकारण, साहित्य,
इतिहास अशा प्रत्येक विषयाचे त्यांच्याकडे विपुल संदर्भ होते. भ्रष्टाचाराची
प्रकरणे म्हणजे विकास कार्यक्रम का? असं ते आपल्या लेखनातून विचारायचे. त्यांची
भाषा बोचरी तितकीच सौम्य आणि प्रासादिक होती. वृत्तपत्रातून अनेकदा त्यांनी रायगड
कॉंग्रेसला थेट अनावृत्त पत्र लिहिली. १९९९च्या मराठी पत्रकार दिनी अलिबागला ज्येष्ठ
पत्रकार मधुकर भावे यांनी केलेल्या भाषणावर त्यांनी 'विशेष
अग्रलेख' लिहिलेला. तेव्हा ‘संपादकाचे भाषण हा अग्रलेखाचा
विषय होणे, ही फारच मोठी गोष्ट आहे.’ असे नमूद करून भावे
यांनी त्यांचे आभार मानले होते. अनेकदा मोठ्या वर्तमानपत्रातील खटकलेले विचार आणि
बातम्या त्यांच्या निशाण्यावर असायच्या. ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि कामगार युनियनचे नेते किशोर पवार (पुणे) यांच्यासोबत जाधव
बराच काळ वावरले. विशेष म्हणजे, पवार यांनी १९७८च्या
विधानसभा निवडणुकीत महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून जनता पक्षाच्या (JP)
तिकिटावर निवडणूक लढवली होती.
.jpeg) |
| 'नारद' उवाच... |
२००९च्या
लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काही वर्षांत आमचं सासरच्या कुटुंबियांसोबत देशभर भटकणं
झालं. २०१४मध्ये आम्ही या उभयतांना घेऊन १२-१४ दिवसांचा मातोश्रींच्या माहेरचा ‘अमरावती’
प्रवास केला. साऱ्या प्रवासात नातू म्हणून आमच्या चिरंजीव नंदनने आजी-आजोबांना विलक्षण
आनंद दिला. २०१७साली कुटुंबियांनी जाधव यांचा अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा साजरा
केला. तेव्हा ते अत्यंत आनंदी होते. ‘मी माझी शंभरी गाठीन’ असं म्हणालेले. त्या
सायंकाळी कुठल्याश्या छपाई कामाची गडबड आटपून आम्ही चिपळूण-कोल्हापूर-चिपळूण-पोलादपूर
प्रवास करून पोहोचलेलो. पंचाहत्तरी निमित्ताने त्यांचे पुतणे आणि ज्येष्ठ
साहित्यिक व नाटककार प्रल्हाद (दादा) जाधव आणि आम्ही केलेले लेखन वाचल्यावर आपल्या
कुटुंबाला उद्देशून ते म्हणालेले, ‘माणूस मर्त्य आहे. सगळ्यांची वाट तीच आहे. पण
आपल्या कुळाच्या भावी वाटचालीसाठी संदर्भ म्हणून हे लेखन मौलिक आहे.’ छत्रपती
श्रीशिवाजी महाराजांचे आद्य चरित्रकार कवींद्र परमानंद स्वामींच्या सोबत सेवेकरी
म्हणून नेवाश्याहून जी काही ‘नाथपंथी’ मंडळी आलेली त्यातील एक वेल आपल्या रूपाने
पोलादपूरला आहे.’ असं ते अभिमानाने सांगायचे. गाडी बदलल्याचे निमित्त करून आम्ही ३
जून २०२४ला उभयतांना घेऊन दिवेआगर-हरिहरेश्वर प्रवास केला. तेव्हा सासऱ्यांचे किंचितसे
विस्मरण जाणवू लागलेले. गेल्यावर्षी, १३ मे २०२५ला कुटुंबियांनी उभयतांच्या
लग्नाचा ५१वा अभीष्टचिंतन सोहळा साजरा केला. सासरे-सासूबाई या उत्सवमूर्तींसह मुलगे
राहुल (एनडीटीव्ही मराठी), प्रणाम (विप्रो), मुली निवेदिता (प्राथमिक शाळा मुख्याधापिका-पोलादपूर),
शिल्पा (व्यावसायिक-कणकवली), रुपाली (गृहिणी-चिपळूण), जावई, सुना, नातवंडे, पुतणे आणि
कुटुंबिय व आप्तेष्ट असा मोठा परिवार उपस्थित राहिला होता. आम्ही त्यांना
त्यांच्या पन्नास वर्षांच्या दाम्पत्य जीवन प्रवासाची सुंदर डिजिटल फ्रेम बनवून दिलेली.
पुढचे कित्येक आठवडे ते त्या फ्रेमकडे कौतुकाने पाहात होते. जानेवारी २०२६ला आम्ही
नवी गाडी घेतली तेव्हा तिच्या पूजनाला सासरे चार पावलं चालून घराबाहेर आलेले. तेव्हा
त्यांचं विस्मरण वाढलेलं. ते एकच प्रश्न पुन्हापुन्हा विचारू लागले होते. उपचारही
सुरु होते. नियती कशी असते पाहा? नेमकी यावर्षी मार्चला चिरंजीवाची दहावीची
परीक्षा झाली. मार्चच्या पंधरवड्यानंतर तो मोकळा झाला नि सासऱ्यांच्या खुब्याचं
ऑपरेशन समोर झालं. चिरंजीव आणि बायकोचा मागील उन्हाळी सुट्टीचा मोठा कालखंड या प्रवासात
पोलादपूरला गेला. अगदी आठवड्यापूर्वी आम्ही कुटुंबिय त्यांना भेटलेलो, दुर्दैवाने ते
शेवटचं ठरलं. गणेशोत्सवात दीड दिवसीय विसर्जनदिनी १५रोजी मूळगावी केळशीतील
(दापोली) उत्तरपूजा आटोपल्यावर बाप्पाला मखरातून खाली आणताना काहीसं गडबडायला झालेलं.
‘नक्की काय अडचण झाली असेल?’ म्हणून बाप्पाला विनवलं. विसर्जनानंतर, १६ रोजी गावाहून
चिपळूणला जाण्यापेक्षा पोलादपूरला जाऊया, असा विचार मनात येऊन गेला. पण १७ रोजी जायचं
पूर्वनियोजित असल्याने आणि बाप्पांच्या दर्शनाला येण्यासाठीचे अन्य फोन येऊ लागल्याने
तातडीने पोलादपूर जाण्याचा निर्णय मागे पडला आणि १७ला सकाळी ही दु:खद बातमी कानी आली.
तेव्हाही आम्ही पोलादपूरला निघण्याच्या तयारीत किरकोळ खरेदीसाठी बायकोसोबत बाजारात
होतो. दरम्यान ज्येष्ठ कवी-साहित्यिक अरुणदादा इंगवले यांचीही भेट झाली. त्याहीवेळी
मनाने अस्वस्थ आणि ऐकलेली बातमी बायकोला न सांगितलेल्या अवस्थेत वावरत राहिलो. आम्हाला
रत्नागिरीचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांची नोंद आठवली, ‘लिहित्या हातांचे
वडील आणि सासरे लाभणं हा जीवनातील भाग्ययोग म्हणायचा.’
 |
|
अरुण
जाधव हे शिक्षण, सहकार, पत्रकारिता
आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत लीलया 'रपेट' मारत, सामन्यांच्या जीवनात शब्दांतून 'शिवतेज'
पसरवत होते. आपल्या पत्नीसोबतचा ५१ वर्षांचा प्रपंच ते निष्ठेने जगले.
अशा सासू-सासऱ्यांची ताटातूट अनुभवताना आमचेही काळीज विदीर्ण झाले. १७ रोजी सायंकाळी
अंत्यविधीपूर्वी प्रथेनुसार जाधव यांना शेवटचे स्नान घालण्यात आले. मातोश्री
जीवनसाथीला शेवटचा निरोप देत होत्या. त्यांच्या मनातील ती अथांग हतबलता, डोळ्यांतील कोरडलेले अश्रू, भावनांचा संमिश्र कोलाहल आणि काळजाचा चाललेला
थरकाप शब्दांच्या पलीकडला होता. एका क्षणी मातोश्रींनी आपला तो कातर, थरथरता हात सासऱ्यांच्या शांत निद्रेत गेलेल्या चेहऱ्यावरून फिरवला. त्या स्पर्शात
अतोनात वेदना होत्या. काळाच्या पडद्याआड गेलेला जाधव यांचा देहरुपी वावर संपला असला
तरी त्यांनी विणलेली प्रीती, संसार आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता
संपणार नाही. त्यांची ती करारी मुद्रा, नवीन काहीतरी जाणून घेतल्यावर
आनंदाने पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, शब्दांवरची हुकूमत आणि
एकटाकी लेखनशैली आठवणींच्या रूपात आमच्या सोबत राहील. मातोश्रींच्या हाताला झालेला
तो शेवटचा थरथरता स्पर्शही एका अलौकिक आशीर्वादाच्या रूपात कुटुंबाच्या सोबत राहील.
कै. सासरे अरुण दाजी जाधव यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच
श्रीपांडुरंग-रखुमाई आणि आई श्रीकाळकाई चरणी प्रार्थना.
धीरज
वाटेकर
dheerajwatekar@gmail.com
अरुण दाजी जाधव निधन वृत्त
अरुण दाजी जाधव निधन मृत्युलेख
 |
| दैनिक रत्नभूमी - २५ सप्टेंबर २०२६ |