मंगळवार, १९ मार्च, २०२४

पर्यावरणीय ‘सावधानतेचे तत्त्व’ सांगणारे आत्मचरित्र

पाच तपांहून अधिक काळ भारतातील वनांचे सखोल संशोधन केलेल्या ‘पद्मभूषण’ डॉ. माधव गाडगीळ सरांचे निसर्गप्रेम सर्वश्रुत आहे. भारतातील निसर्गाची, जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणाऱ्या, सामान्य माणसाप्रति उत्तरदायित्व मानणाऱ्या गाडगीळ सरांचे साहित्यिक अंगाने, ललित शैलीने नटलेले ‘सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. देशाचा पर्यावरणीय इतिहास, आधुनिक भारताला आकार देणाऱ्या पर्यावरणीय हालचाली आणि धोरणात्मक निर्णयांची नोंद असलेला, देशातील निसर्गप्रेमी, निसर्ग अभ्यासक आणि भवतालबद्दल कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा दस्तऐवज आहे.

१ सप्टेंबर २०२३ला पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत गाडगीळ सरांच्या ‘सह्याचला : एक प्रेम कहाणी’ या वैज्ञानिक आत्मचरित्राचे ‘ए वॉक अप द लिव्हिंग विथ पिपल अनड नेचर’ या इंग्रजीसह कोंकणी, कानडी, मल्याळम, तामिळ, तेलगू. हिंदी आणि बंगाली आदी भारतातील नऊ भाषांत प्रकाशन झाले. सरांनी महिनाभर अगोदर या कार्यक्रमाची कल्पना दिलेली असल्याने प्रकाशन समारंभाला उपस्थित राहाता आलं. यावेळी आधुनिक भारताच्या राजकीय तसेच सामाजिक इतिहासाचे अभ्यासक, संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी गाडगीळ सरांची आत्मचरित्र अनुषंगाने घेतलेली मुलाखत आम्हा श्रोत्यांसाठी पर्वणी ठरली होती.

गाडगीळ सर हे सहा राज्ये, ४४ जिल्हे आणि १४२ तालुक्यांमध्ये पसरलेल्या, भारतातील सर्वात श्रीमंत वाळवंट, १३ राष्ट्रीय उद्याने आणि अनेक अभयारण्ये असलेल्या पश्चिम घाट संवर्धन समितीसह जैविक विविधता कायदा आणि पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. सध्याच्या नवीन युगात हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या घातक स्थितीला आपण तोंड देत आहोत. त्या पार्श्वभूमीवर माणूस म्हणून आपण कुठे होतो? इथे कसे आणि का आलो? हे समजून घेण्यासाठी हे चरित्र अनिवार्य आहे. गाडगीळ सरांनी आपले हे आत्मचरित्र गोव्यातील शाकाची जुवे गावाच्या बिस्मार्क डियास यांना समर्पित केले आहे. भारतातील सामान्य लोकांचा शहाणपणा आणि सामर्थ्य यावर विश्वास ठेवणाऱ्या बिस्मार्क डियास यांच्या संशयास्पदरित्या मृतावस्थेत सापडण्याच्या अस्वस्थ कहाणीने आत्मचरित्र उलगडू लागते. सरांना गेली पन्नास वर्षे ओळखणाऱ्या, भारताच्या हरित क्रांतीचे जनक एम. एस. स्वामीनाथन यांची प्रस्तावना आपल्याला २५ प्रकरणात विभागलेल्या पुस्तकाची उंची सांगते. पुस्तकात आपल्याला पिढ्यानपिढ्यांचे आघात, संकटे, जमिनीच्या सर्वात जवळ राहणाऱ्यांचे सामूहिक नुकसान, त्यांच्या परंपरांनी नैसर्गिक संसाधनांच्या वापराबद्दल आदर कसा निर्माण केला? गाडगीळ सरांच्या मनात निसर्गाबद्दलची उत्कट आस्था आणि देशातील आदिवासी आणि ग्रामीण लोकांबद्दलचा आदर बालपणापासून कसा निर्माण झाला? याची माहिती मिळते.

या आत्मचरित्रातून माणसांसह जगभरातून समोर येणारे मासे, पक्षी, भटके हत्ती, प्राणी, कीटक, किनारपट्टीवरील मच्छिमार लोक यांची सरांनी केलेली निरीक्षणे, निसर्गवेडाचे धडे, पायपीट, स्थानिकांसोबत मिळून-मिसळून राहाण्याची त्यांची पद्धत थक्क करते. पुस्तकात प्रादेशिक पर्यावरणीय इतिहासाची नोंद आणि सरांच्या कामाच्या सूक्ष्म नोंदी आहेत. पुण्याबाहेरील उपवने, पानशेत धरण पाणलोट क्षेत्र, देशात डोंगर उतारावर स्थलांतरित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलची समाजशास्त्रीय निरीक्षणे आणि वरच्या स्तरात वर्चस्व गाजवणाऱ्या लोकांबाबतचे सरांचे निरीक्षण विचार करायला लावणारे आहे. हे पुस्तक निसर्गाशी आणि देशासह जगातील विविध भूप्रदेशातील समुदायांशी असलेले सरांचे गहन संबंध स्पष्ट करते.

सरांच्या कार्यवृत्तीचे मूळ घरातील बालपणीच्या संस्कारात असल्याचे पुस्तक वाचताना लक्षात येते. सरांचे वडिल देशाच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष राहिलेले अर्थतज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्यासह डॉ. सलीम अली, सुप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचे सान्निध्य तसेच महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, जे.बी.एस. हाल्डेन यांचा प्रभाव, हार्वर्डसारख्या विद्यापीठात ई. ओ. विल्सन या प्रसिद्ध वैज्ञानिकांचे मार्गदर्शन, अमेरिकेत संधी असूनही भारतात परत येऊन संशोधन करण्याचा त्यांचा निश्चय, महाराष्ट्रातील देवरायांवरचे काम, IISC नियुक्ती, कर्नाटकातील काम, सायलेंट व्हॅली जनआंदोलन, biodiversity register, मेंढा-लेखा, पश्चिम घाट समिती, बंदीपूरमधील पांढऱ्या ठिपक्यांसह जमिनीवर राहणाऱ्या कोळ्याच्या नवीन प्रजातीला भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभागाचे बीके टिकाडर यांनी दिलेले ‘ओरनिथोक्टोनस गाडगीली’ नाव अशा अनेक गोष्टी पुस्तकात भेटतात. मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्रात सागरी जीवशास्त्र विषय हा परिसरशास्त्राच्या जवळचा म्हणून इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करत असताना ‘मांदेली’ माशाच्या संशोधनाच्या निमित्ताने अनेकदा सरांचा मुंबईच्या मच्छीमारांशी संवाद झालेला आहे. त्याकाळी हे मच्छीमार ट्रॉलरच्या उपयोगाबद्दल साशंक होते. म्हणायचे, ‘सुरुवातीला खूप मासे सापडतील, पण या ट्रॉलरने समुद्राचा तळ खरडून काढला जातो आणि याच्यातून माशांच्या विणीवर वाईट परिणाम होऊन दूरच्या पल्ल्याने मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.’ आज मच्छिमारांचे भाकीत खरे ठरल्याची नोंद सरांनी केली आहे. मच्छीमार जी मांडणी करत होते त्याला ‘सावधानतेचे तत्त्व’ (Precautionary principle) म्हणतात असे पुस्तकात नमूद आहे.

१९९०मध्ये, गाडगीळ सरांना मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पीपल ऑफ इंडिया (POI) प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली होती. पीओआय डेटाबेसमधून गाडगीळ सर आणि त्यांचे सहकारी, ‘आधुनिकता, वेगवान विकास आणि शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर संसाधनांची अधिक चांगली वाटणी करण्यासाठी गरिबी निर्मूलन आणि लोकसंख्या नियंत्रण धोरण परस्परपूरक राबवून भारतीय कुटुंबाचा आकार लहान व्हायला हवा’ या निष्कर्षापर्यंत पोहोचले. हे आत्मचरित्र निसर्गप्रेमींसाठी एक खजिना आहे. पर्यावरणीय आव्हानांना तोंड देत असलेल्या जगासाठी ही जीवनकथा प्रेरणादायी आहे. राजकीय अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यासह वस्तुनिष्ठ तथ्ये सांगून आपल्याला ज्या विषयांची माहिती आहे त्यावर आजवर निर्भयपणे लिहिणारे गाडगीळ सर चरित्रात पानोपानी भेटतात. हे पुस्तक म्हणजे एका तल्लख विद्वान, शिक्षक, वैज्ञानिक, कार्यकर्ता, प्रभावशाली धोरणकर्ता आणि बरेच काही यांचे संस्मरण आहे. या आत्मचरित्राची भाषा सरांच्या बोलण्यातल्या शब्दांसारखी सहजसोपी आहे. सरांनी संपूर्ण पुस्तकात निसर्ग-पर्यावरणाच्या रक्षणासोबत शाश्वत विकास कसा होईल? यासह भारतीय समाज, अर्थव्यवस्था आणि शासन याविषयी आपले स्पष्टवक्तेपण कायम ठेवले आहे. मोजकी छायाचित्रे असलेले हे पुस्तक प्रकाशकांनी सुरेख सजवले आहे. मराठी पुस्तकाचे संपादन हे गाडगीळ सरांसोबत पश्चिम घाट अभ्यासवर्गात काम केलेल्या डॉ. मंदार दातार यांनी केले आहे. भारतासह जगात आमच्यासारखे अगणित पर्यावरणप्रेमी आहेत, ज्यांच्यावर गाडगीळ सरांच्या कामाचा खोलवर प्रभाव आहे. सरांचे हे आत्मचरित्र निसर्ग, जंगल आणि पर्यावरणाकडे कललेल्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

गाडगीळ सरांचे कोणतेही म्हणणे हे शास्त्रीय पुराव्याशिवाय नसते आणि समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी कटूसत्य सांगायला सर कचरत नाहीत याची अनेक उदाहरणे पुस्तकात आहेत. आत्मचरित्रातील शेवटचे प्रकरण ‘पुढची दिशा’ सांगणारे आहे. त्यात सर म्हणतात, ‘आपल्या प्रचंड लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी आसमंतातील नैसर्गिक संसाधनांवरचे अधिकार स्थानिक लोकांच्या हाती दिले पाहिजेत.’ सध्याच्या हवामान बदलाच्या युगात सरांच्या या सल्ल्याकडे तातडीने लक्ष द्यायला हवे आहे. भारतातील पर्यावरणीय इतिहास आणि संवर्धन यांची वास्तविकता शिकवण्यासाठी हे पुस्तक अमूल्य आहे. भारतातील जैवविविधता, संवर्धन आणि पर्यावरणीय भविष्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी हे प्रकाशमय पुस्तक आहे. भारतात शेतीवरती रासायनिक खतांची आणि कीटकनाशकांची जी पकड आहे ती नवी पिढी ढिली करेल या आशावादासह सरांनी आपल्या आत्मचरित्राचा शेवट दलाई लामा यांच्या ‘वैश्विक जबाबदारी’ विषयक मानवतेच्या कल्याणासाठी आपल्याला झटावे लागेल अशा आशयाच्या वचनाने केला आहे. हे आत्मचरित्र म्हणजे भारताच्या समृद्ध जैविक वारशाच्या एका माणसाच्या खोल वेडाची दुर्मिळ प्रेमकथा आहे. यातील बारकावे अस्वस्थ करणारे आहेत. हे पुस्तक निसर्ग व पर्यावरणप्रेमी, विकासाच्या अर्थशास्त्राचे अभ्यासक यांसह सर्वांनी वाचायला हवे आहे. आज विकासाच्या नावाखाली देशभरात झपाट्याने हिरवाई मोडीत निघत असताना गाडगीळ सरांचे जीवन एक धडा म्हणून समोर आले आहे. दुर्दैवाने आम्ही भारतीय हा धडा शिकायला तयार नाही पण न शिकण्याची मोठी किंमत मोजायला तयार आहोत अशी आजची स्थिती आहे.

‘परिसरशास्त्राचे शिक्षण घेतल्याचा एक तोटा म्हणजे तुम्हाला एका रक्तबंबाळ जगात एकाकीपणे जगायला लागते. सामान्य माणसाला जगावर होत असलेले हे घाव बिलकुल दिसत नाहीत. परिसर शास्त्रज्ञाला एक तर निर्ढावायला लागते, नाही तर मृत्यूची चिन्हे दिसत असली, तरी ती पाहायची नाहीत, असा डॉक्टर बनायला लागते.' अमेरिकेतील निसर्गप्रेमी आल्डो लिओपोल्ड यांनी १९४९ साली त्यांच्या A Sand County Almanac या पुस्तकात लिहिलेल्या मजकुराचा संदर्भ देऊन गाडगीळ सर, ‘मीसुद्धा हे घाव बघतो आणि त्याचे मला दुःख होते’ असं लिहितात ते वाचताना अस्वस्थ व्हायला होतं. त्याही स्थितीत कविवर्य विंदा करंदीकर यांच्या शब्दात, 'विज्ञान ज्ञान देई, घडवी कितीक किमया, देई न प्रेम शांती, त्याला इलाज नाही' हे सांगूनही मी दुर्दम्य आशावादी आहे आणि आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी जी ज्ञानक्रांती घडवून आणली आहे, त्यातून खूप काही चांगली निष्पत्ती होईल, ह्याची मला खात्री आहे. असं गाडगीळ सर नमूद करतात. भारत देश महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर असताना वैज्ञानिक प्रगती, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि नवीन पिढीची मने शाश्वत जगाकडे वळतील असा सरांना विश्वास आहे. तो सार्थ ठरावा, ही वनदेवतेच्या चरणी प्रार्थना.


धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

 

आत्मचरित्र : सह्याचला आणि मी - एक प्रेमकहाणी

लेखक : माधव गाडगीळ

पृष्ठे : ४६४ + १६ रंगीत पृष्ठे

किंमत : ८००

राजहंस प्रकाशन पुणे



महाराष्ट्र टाईम्स २४ मार्च २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

आस्थेवाईक गुरुजींची सेवानिवृत्ती

        एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीची घटना. चिपळूण जवळच्या एका तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सकाळी साडेदहा वाजता भरणाऱ्या शाळेत जाण्यासाठी ...