शुक्रवार, १ मार्च, २०२४

‘खाजगी पसंत’ शाळेचा सुवर्णमहोत्सव!

दैनिक सागर २ मार्च २०२४ 

                                                                

देशाच्या ग्रामीण भागातील कोणत्याही शाळेच्या उभारणीमागे ‘स्थानिक आवश्यकता, भौगोलिक समस्या, विद्यार्थ्यांची गैरसोय’ ही कारणं तर असतातच! पण या सर्वच कारणांच्या बरोबरीने, अधिक दूरचे पाहात एखाद्या गावातील चारेक वाड्या एकवटून गावातील, दुर्दैवी अपघाती निधन पावलेल्या व्यक्तीच्या मागे त्याच्या कुटुंबाच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर बनू नये यासाठी चक्क खाजगी प्राथमिक शाळेचे प्रयोजन करतात. हा विचारच विचार करायला लावणारा आहे. ‘त्या’ चारेक वाड्यांनी केलेले हे प्रयोजन पुढे एक-दोन नव्हे तर आपल्या वयाची तब्बल पन्नास वर्षे पूर्ण करते. हे अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहे. शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया भक्कम करणारे एक माध्यम आहे. हे खरे असले तरी नवीन शाळा सुरू करणे म्हणजे एखाद्या मुलाला जन्म देण्यासारखे असते. इथून सुरुवात करून अनेक गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेत ‘A’ ग्रेड आणि आय.एस.ओ. मानांकनासह एक यशस्वी शाळा घडवण्यापर्यंतचा पन्नास वर्षांचा प्रवास करणारी कोकणातील चिपळूण तालुक्यातील शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडी संचलित खाजगी पंसत शाळा असुर्डे कासारवाडी ही आजपासून दोन दिवस (२-३ मार्च) आपला सुवर्ण महोत्सव साजरा करते आहे.



असुर्डे! मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अकरा वाड्यांनी युक्त सुमारे अडीच हजार लोकसंख्येचे गाव. पन्नास वर्षांपूर्वी गावात सात इयत्तांची एक आणि चार इयत्तांच्या दोन शाळा अस्तित्वात होत्या. मात्र गावातील कासारवाडी, खापरेवाडी, चोगलेवाडी आणि गुरववाडी येथील विद्यार्थ्यांना बसस्टॉप जवळील शाळेत पोहोचण्यासाठी रस्त्यातील नदी पार करावी लागत असे. इतर मोसमात ठीक असायचे पण पावसाळ्यात हा प्रवास अत्यंत खडतर व्हायचा. स्थानिक लोक, नदी पार करायची पारंपारिक व्यवस्था म्हणून नदीच्या पात्रावर लाकडाचा साकव उभारीत. मात्र त्यालाही मर्यादा येत. अनेकदा हा साकव पुराच्या पाण्यात वाहून जाई. मग पालकांना आपल्या लेकरांना स्वतःच्या खांद्यावर बसवून शाळेत पोहोचवावे लागत असे. अनेकदा तर चौथीपर्यंतच्या छोट्या विद्यार्थ्यांना पर्यायाअभावी शाळा बुडवावी लागत असे. शाळेला जाणाऱ्या रस्त्यावरील पक्क्या पुलाच्या अनुपलब्धीमुळे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला पालक पर्याय शोधण्याच्या मनस्थितीत होते. अशातच गावातील वसंत शंकर जाधव यांचे १९७१साली रेल्वे अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमन वसंत जाधव आणि उभयतांच्या छोट्या कन्येच्या भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. जाधव यांच्या कुटुंबीयांनी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत देसाई आणि विठठल साळवी यांच्यामार्फत हा विषय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वर्गीय गोविंदराव निकम (माजी खासदार) यांच्यासमोर मांडला आणि काहीतरी मार्ग सुचविण्याची विनंती केली. निकम साहेबांनी ग्रामस्थांची समस्या समजून घेऊन कासारवाडीतील प्रमुख ग्रामस्थांना खाजगी पसंत शाळा सुरु करण्याची सूचना केली. त्यांची सूचना आणि वाडीतील पावसाळी शैक्षणिक स्थितीचा विचार करून गावातील कासारवाडी, खापरेवाडी, चोगलेवाडी आणि गुरववाडीतील ग्रामस्थ एकवटले. गावात शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे संस्थेची स्थापना झाली. संस्था स्थापन होताच शाळेसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा आपल्या राहात्या घराच्या पडवीत जागा उपलब्ध करून देत स्वर्गीय गणपत बाळकृष्ण नरोटे यांनी जागेचा प्रश्न सोडवला. १ जून १९७४ रोजी कासारवाडीत पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘खाजगी पसंत’ शाळा सुरु झाली.

 


ज्या घटनेच्या गांभीर्यातून शाळेची उभारणी झाली होती त्या स्वर्गीय वसंत शंकर जाधव यांच्या पत्नी श्रीमती सुमन वसंत जाधव यांना शाळेत ‘शिक्षिका’ म्हणून नेमण्यात आले. असुर्डे ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गावातील एका कुटुंबावर ओढवलेल्या संकटावर मात केली होती. पुढे गणपत नरोटे यांच्या घरात वर्षभर शाळा चालली. वर्षभरात शाळा नियमित झाल्यावर इमारतीचा प्रश्न पुढे आला. तेव्हा स्वर्गीय शांताराम कृष्णा नरोटे आणि स्वर्गीय राजाराम कृष्णा नरोटे यांनी शाळेच्या इमारतीसाठी जागा दिली. या जागेवर ग्रामस्थांनी अर्ध्या मातीच्या भितींवर गवताचे पेंढारु छप्पर घालून शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. शाळेची गरज लक्षात घेऊन पुढच्या वर्षी श्रीमती घाणेकर यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती करण्यात आली. अनेक वर्षे शाळा याच पेंढारु अवस्थेत होती. कालांतराने ग्रामस्थांनी शाळेला कौलारू स्वरूप दिले. २०११साली स्वतंत्र दोन रूमची चिरेबंदी कौलारू इमारत बांधण्यात आली. या खोल्यांच्या मध्यभागी स्लॅब टाकून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील असा मोठा पॅसेज तयार झाला. आज याठिकाणी शाळेचे सर्व कार्यक्रम संपन्न होत असतात.

 


गावातील लोकांनी शासकीय मदतीशिवाय हे सारे उभे केले आहे. सुरुवातीपासून शाळेचा दर्जा उत्तम आहे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडी या संस्थेचे पहिले अध्यक कै. गणपत बजाबा नरोटे (१ जून १९७४ ते डिसेंबर १९८०) होते. त्यानंतर कै. विठोबा केशव नरोटे (१९८१ ते १९८३), कै. नारायण गोपाळ खापरे (२ मे १९८३ ते २००९), कै. राजाराम गजानन नरोटे (२००९ ते २०२१), राकेश राजाराम नरोटे (ऑगस्ट २०२१ ते मार्च २०२२) यांनी काम पाहिले. एप्रिल २०२२ पासून वसंत शांताराम साळवी हे अध्यक्ष आहेत. आजपर्यंतच्या सर्वच संस्थाचालकांनी आपलं तन-मन-धन अर्पून शून्यातून ही शाळा नावारुपाला आणलेली आहे. यासाठी मागील पन्नास वर्षांत सर्व ग्रामस्थांचेही सातत्याने सहकार्य राहिलेले आहे. २०१४ मध्ये ही शाळा डिजीटल होऊन इयत्ता पहिली ते चौथीचे इंग्रजी वर्ग सुरु करणेत आले आहेत. २०१५मध्ये  शाळेने ISO नामांकन प्राप्त केले. शाळेने ‘A’ ग्रेडही प्राप्त केली आहे.



आमदार निकम यांच्याहस्ते उद्घाटन होणार

शनिवारी (दिनांक २ मार्च) सकाळी ९ वाजता गोपूजन व ग्रंथदिंडी सोहळा संपन्न झाल्यावर आमदार शेखर निकम यांच्याहस्ते सकाळी ११ वाजता सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष थेराडे, माजी सभापती संतोष चव्हाण, पं. स. चिपळूणच्या गटविकास अधिकारी उमा घारगे (पाटील), गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक, साहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, प्रभाग सावर्डेच्या शिक्षण विस्तार अधिकारी सशाली मोहिते, मांडकी केंद्राचे केंद्रप्रमुख विजय कवितके, असुर्डेचे सरपंच पंकज साळवी, उपसरपंच दिलीप जाधव, सदस्य सारिका नरोटे, माजी सदस्य (शाळा समिती) गणपत खापरे, लायन्स क्लब सावर्डेचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते अवधूत साळवी, गजानन साळवी, असुर्डेचे तंटामुक्ती अध्यक्ष अनंत निर्मळ, उत्तम जाधव, माजी मुख्याध्यापिका सुमन जाधव, माजी साहाय्यक शिक्षिका अपर्णा भाताडे आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत. दुपारी १.३० वाजता महाप्रसाद, ०३.३० - महिला व बालविकास अधिकारी माधवी जाधव यांचे महिला कायदे विषयक मार्गदर्शन, सायंकाळी ५ - हळदीकुंकू समारंभ, रात्रौ ७.३० - आजी-माजी विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष संतोष थेराडे यांची विशेष उपस्थिती असेल. तर रविवारी (दिनांक ३ मार्च) सकाळी १० वाजता श्रीसत्यनारायण पूजा संपन्न होईल. सकाळी १०.३० – सामाजिक कार्यकर्ते अवधूत साळवी यांच्या उपस्थितीत माजी विद्यार्थी सन्मान सोहोळा संपन्न होईल. सकाळी ११.३० – फनीगेम्स,  दुपारी १.३० – महाप्रसाद, दुपारी ३ – लायन्स क्लब सावर्डे यांच्या सौजन्याने डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबीर होईल.

 

या शाळेचा सुवर्णमहोत्सवी समारंभ संपर्कात आलेल्या सर्वासाठी पर्वणी असणार आहे. कोकणच्या मातीत उपक्रमात्मक वैशिष्टपूर्ण कार्य करणाऱ्या मान्यवरांचे विद्यमान विद्यार्थ्यांना सान्निध्य देताना शाळेचे गेल्या पन्नास वर्षातील माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक आवर्जून उपस्थित राहातील, असे नियोजन शाळेने केले आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्ष समारंभास अवश्य उपस्थित राहावे. शिक्षणोत्तेजक मंडळ असुर्डे कासारवाडीचे अध्यक्ष वसंत शांताराम साळवी, सचिव महेंद्र नरोटे आणि त्यांचे सर्व सहकारी शाळेचा सुवर्ण महोत्सव यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. विद्यार्थी संख्येअभावी राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळा बंद होत चालल्या असताना, अभिनव विचारातून उभ्या राहिलेल्या आणि वयाची पन्नाशी पूर्ण केलेल्या या खाजगी पसंत शाळेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०४९८


1 टिप्पणी:

विकास मेहेंदळे म्हणाले...

अतिशय बिकट परिस्थिती मध्ये ग्रामस्थ काय करू शकतात हे गावाने दाखवून दिले आहे. कोकणच्या दुर्गम भागात शिक्षणाची आवड असणाऱ्या मुलाना मदतीचा हात देण्याची भूमिका महत्त्वाची आहे. कोकणच्या शैक्षणिक इतिहासाला अनुकूल लेखन केले आहे धन्यवाद
प्रा विकास माधवराव मेहेंदळे

आस ग्रामदेवतेच्या भेटीची

‘आपण वास्तव्याला असलेली ग्रामदेवता दर्शन द्यायला   दारी येणं’, श्रद्धेय माणसासाठी यासारखं सुख ते काय? यंदाच्या शिमगोत्सवात काल (...