गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०२५

पर्यावरण चळवळीशी लोकांना जोडण्याचे काम करत राहू


माहूर (नांदेड) :: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रेरणा आणि स्व. ‘वृक्षमित्र’ आबासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शानुसार आपण पर्यावरणाच्या जनजागरण चळवळीचे काम करत आहोत. पर्यावरणाच्या चळवळीत काम करणाऱ्या आपणा कार्यकर्त्यांचे मुख्य काम या चळवळीशी लोकांना जोडणे हे आहे. पर्यावरण अभ्यासक-संशोधकांची संशोधने आणि कार्य जास्तीत जास्त समाजमानसापर्यंत पोहोचवून त्यांचा पर्यावरण चळवळीला पाठिंबा उभा करण्याचे काम आपले आहे. अशा संमेलनांच्या आणि मंडळाच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून ते साध्य होत आहे. मंडळाच्या कामाला अधिकाधिक पर्यावरण मित्रांशी जोडत पर्यावरण चळवळीला अधिकाधिक जनसमुदायाचा पाठिंबा मिळण्यासाठी आपण सदैव कार्यरत राहूया असे आवाहन लेखक आणि पर्यावरण-पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

 


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र माहूर येथील श्रीजगदंबा धर्मशाळा परिसरात २६-२७ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित नवव्या पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्ष पद्मश्री मा. शब्बीर (मामू) सय्यद (बीड) यांच्याहस्ते झाले. संमेलनाच्या सुरुवातीला वाटेकर यांनी पर्यावरण मंडळाचे काम, माहूर मधील पर्यावरण आदी विषयाची विस्तृत आणि अभ्यासपूर्ण केली. वाटेकर पुढे म्हणाले, आबासाहेबांच्या पर्यावरण जनजागरण विचारांचा जयघोष आज नवव्या पर्यावरण संमेलन निमित्ताने महाराष्ट्राचे शक्तिपीठ श्रीक्षेत्र माहूर येथे आई रेणुकेच्या दारात होतोय, ही आनंदाची बाब आहे. माता सती पार्वती ही अग्निकुंडातून उत्पन्न झाली. या इहलोकी श्री रेणुका देवी या नावाने ओळखली गेली. शिवस्वरूप पुरूष तत्वाचे ऋषि जमदग्नि यांचा पती म्हणून स्वीकार करून भगवान विष्णूंचा ६ वा अवतार असेल्या श्री परशुराम यांची माता म्हणून प्रसिद्ध झाली. कोकण ही भगवान परशुराम यांची भूमी आहे. आम्ही त्या भूमीचे प्रतिनिधित्त्व करतो. आमच्या मनात या मातृस्थानाविषयी विशेष आदरभाव आहे.

 


राज्यभरातील पर्यावरणप्रेमी शिक्षक हे पर्यावरण मंडळाचे मुख्य घटक आहेत. आज काम करणारे हात कमी आहेत, म्हणून पर्यावरण विषयात काहीतरी करू पाहणाऱ्या हातांना प्रोत्साहन द्यायला हवं. ही मंडळाची भूमिका आहे. आपलं काम हे जाणीव जागृतीचं काम आहे.

 


माहूरचा परिसर सह्याद्रीचा आहे. सह्याद्री जगातील सर्वात वयोवृध्द डोंगररांगांमधील एक आहे. सह्याद्री महाराष्ट्राचा जीवनदाता आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सैन्याने परकीय आक्रमकांना पराभूत करण्यासाठी आणि स्वतःचे राज्य स्थापित करण्यासाठी सह्याद्रीचा कुशलतेने उपयोग केला होता. समृद्ध जैवविविधता असलेला आपला प्रिय सह्याद्री गेली काही दशके विकासाचे घाव सोसत आहे. वृक्षतोडीमुळे भूस्खलन आणि मातीची धूप सुरू आहे. अवैध जंगलतोड, शेतीची क्षेत्रवाढ, विविध पिकांची एकसुरी लागवड, खाणकाम आणि खडी क्रशर, जंगलांच्या पोटात शिरलेले रस्ते, प्रदूषणकारी प्रकल्प अश्या अनेक कारणांनी सह्याद्रीची सलगता संपुष्टात येत आहे. वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले वाघांचे आणि इतर वान्य प्राण्यांचे भ्रमणमार्ग अडथळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात खंडित झाले आहेत. हत्तींचे कोकणात दोडामार्गात आगमन, गव्यांचे समुद्र किनाऱ्यावर येणे, माहूरसह देशभर बिबटे मानवी वस्तीमध्ये स्थिरावणे हे सगळे धोकादायक अवस्थेत पोहोचले आहे. सह्याद्रीला संवर्धनासाठी आपल्या कुबड्यांची गरज नाही. सह्याद्री अवाढव्य, दयाळु, दाता आहे. त्याच्या अंगाखांद्यावर आपण आणि आपले पूर्वज हजारो वर्षांपासून खेळले, बागडले, नांदले, विस्तारले. सह्याद्रीने आपल्या शेकडो पिढ्यांना सांभाळले आहे. त्याला ओरबाडणे आपण थांबवायला हवे आहे.


माहूरमध्ये चालुक्य, यादवकाळात जलाशय निर्माण करण्यात आले. महाराष्ट्रात जाणीवपूर्वक जलाशय निर्माण करणे व त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. माहूरमधील जलाशयांच्या प्राचीन जागांचे संरक्षण व्हायला हवे. त्यांचे महत्त्व टिकायला हवे आहे. या स्थानांचे सुशोभीकरण आणि सौन्दयीकरण करताना मूळ बदलू नये. जंगलांमध्ये आजही दुर्लक्षित कुंडे आहेत. कुंडांची निगा राखली जायला हवी. या भूमीत श्रीक्षेत्र माहूर परिक्रमा सुरू आहे. तिला भविष्यात पर्यावरणीय पर्यटन अंगाने नियमित स्वरुपात आणता येईल का? पाहायला हवं आहे. आई रेणुकेने आपल्या सर्वांच्या हाताला पर्यावरण प्रबोधनाची ही चळवळ पुढे नेण्यासाठी बळ द्यावे अशी विनंती वाटेकर यांनी याप्रसंगी बोलताना केली.

संमेलनात पाणी समस्या (‘जलपुरूष’ बाबुरावजी केंद्रे - लोहा नांदेड), विषमुक्त शेती व देशी गोसंवर्धन (अॅड. उदय संगारेड्डीकर - नांदेड), वन्यजीव संरक्षण, संवर्धन वास्तव व भ्रम (प्रा. डॉ. रमजान विराणी पांढरकवडा), पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मिती नवीन देशी व विदेशी तंत्रज्ञान (अविनाश पोळ), जागतिक तापमान वाढ बदलते वातावरण व मानवी आरोग्य (दीपक श्रोते - नागपूर), निवृत्त शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे आदींची अभ्यासपूर्ण व्याख्याने संपन्न झाली. 








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नीलिमा पक्ष्याची दुसऱ्यावर्षी एकाच जागी वीण!

             नीलिमा ( Tickell’s Blue Flycatcher) पक्ष्याने आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या हंगामासाठी सलग दुसऱ्यावर्षी आमच्या परसदारातील हॉलच...