रविवार, ७ जुलै, २०१९

धीरज वाटेकर यांना ‘लोटिस्मा’चा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार


चिपळूण : येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने ग्रंथालय चळवळीत सक्रीय असलेल्या आणि समाजात ग्रंथप्रेम वाढावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'द. पा. साने वकील ग्रंथमित्र' पुरस्कार लेखक, पर्यटन अभ्यासक धीरज वाटेकर यांना जाहीर झाला आहे. धीरज वाटेकर यांच्यासारख्या ग्रंथमित्राचा पुरस्काराने सन्मान होतोय ही वाचनालयासाठी गौरवाची संधी असल्याची भावना ग्रंथालयाचे अध्यक्ष, नामवंत कवी अरुण इंगवले यांनी व्यक्त केली. 

सन १९९७ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदमाध्यमातून लिखाणाची, सामाजिक कार्याची गोडी लागलेल्या वाटेकर यांनी दैनिक कोकण गर्जना, पुढारी, लोकसत्ता करिता पत्रकारिता केली आहे. अध्ययनासाठी केलेल्या हिमाचल ते कन्याकुमारी आणि भूतान या प्रवासातून जमविलेला किमान २५ हजार वैशिष्ट्यपूर्ण डिजिटल फोटोंचा संग्रह त्यांच्याकडे आहे. गेल्या किमान तीसहून अधिक संग्राह्य विशेषांक, स्मरणिका, गौरव अंक, दिवाळी अंकांचे संपादन, संदर्भ कात्रणसंग्रह, संशोधन ग्रंथालय, "परमचिंतन" अभ्यासिकेसह संपूर्ण कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन त्यांनी केले आहे. राज्यभरातील नियतकालिकतून विविध विषयांवरील, दीड हजारहून हून अधिक लेख प्रसिद्ध झालेत. कोकणच्या इतिहासाचे अभ्यासक अण्णा शिरगावकर यांनी लिहिलेल्या वाशिष्ठीच्या तीरावरून, गेट वे ऑफ दाभोळ, शेवचिवडा, व्रतस्थ, वाटचाल या ग्रंथांची निर्मिती आणि संपादन त्यांनी केले आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पद्मभूषण शकुंतलाबाई परांजपे यांचा सहवास लाभलेल्या सौ. कमल श्रीकांत भावे यांचे ‘कृतार्थीनी’ हे चरित्र त्यांनी लिहून प्रकाशित केले आहे. यात त्यांनी अण्णांच्या कार्याचाही गौरव केला आहे. त्यांची चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन, ही ५ पर्यटन पुस्तके आणि ग्रामसेवक ते समाजसेवक, प्राथमिक शिक्षणातील कर्मयोगी ह्या जीवनकथा प्रसिद्ध आहेत. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राने २००४ साली उत्कृष्ठ जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविले होते. २०१५ साली त्यांच्या ठोसेघर पर्यटन पुस्तकास कोल्हापुरच्या चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने दिला जाणारा नलगे ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. सप्टेंबर २०१६ ला माय अर्थ फौंडेशनतर्फे पर्यावरण भूषणपुरस्कार, नोव्हेंबर २०१६ ला ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनात गौरव, संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाचे प्रमुख राजेंद्र शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सतत तीन वर्षे पर्यावरण आणि शिक्षण विभागात काम केल्यानंतर सन २००९ साली डॉ. विनीता आपटे यांनी स्थापन केलेल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या पुण्याच्या 'तेर पॉलिसी सेंटर' या स्वयंसेवी संस्थेकडून गेल्यावर्षी जून महिन्यात 'प्रकाशाचे बेट' हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. ‘वाशिष्ठी नदी : उगम ते संगम’ हा संशोधित निसर्ग पर्यटन उपक्रम राबविण्यात त्यांचा महत्वपूर्ण सहभाग आहे.

धीरज वाटेकर हे ग्रंथनिर्मितीसह पर्यावरण रक्षण, पर्यटन, कोकण विकास आदि सामाजिक चळवळीत अग्रभागी असतात. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या सर्व कामात अत्यंत तळमळीने सहकार्य करतात. त्यांचे लेखनही अत्यंत प्रवाही व वाचनीय असते. या निवडीबद्दल लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे आणि सर्व संचालकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रकाशित बातमीच्या लिंक्स !





दैनिक प्रहार ०६०७२०१९


दैनिक रत्नागिरी एक्सप्रेस ०६०७२०१९ 


दैनिक रत्नागिरी टाईम्स ०७०७२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...