भारतात जवळपास १३०० प्रकारचे पक्षी आढळतात. त्यातले ६५०
महाराष्ट्रात तर चिपळूणच्या आसपास २३० प्रकारचे पक्षी बघायला मिळतात. अभ्यासानुसार
रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्रातील निम्मे पक्षीवैभव म्हणजे किमान ३०० प्रकारचे
पक्षी असायला हवेत. हे पक्षी म्हणजे द्विपाद आणि पिसं असलेला जीव होय. पक्ष्यांविषयी
समजून घेताना सुरुवातीला आपण पेक्षालहान आणि पेक्षामोठा असा आधार घेऊन बोलायला
लागतो. पुढे पक्षी निरीक्षण शिकताना, एखाद्या ठिकाणी पहिलं फुलपाखरू शोधतो. तिथल्या
वनस्पतींवर ऋतूबदलानुसार येणारा फुलोरा, फळ-फळावळे समजून घेतो. त्यावरून त्या परिसरात कोणत्या पक्ष्यांचा अधिवास
असू शकतो ? याचा अंदाज येतो. चिपळूणात पाणथळ किंवा पाण्याच्या बाजूला असलेल्या
गवताळ जागेत, छोट्या वेलींत, छोट्या-मोठ्या झाडांमध्ये पक्ष्यांचा अधिवास आहे. उंच
झाडावर असणारा गरुड आपल्याला फारसा जमिनीवर दिसू शकत नाही. जमिनीवर असलेला बुलबुल
खूप उंचीवर पाहायला मिळणार नाही. कोणता पक्षी ? कोणत्या हंगामात ? कोठे बघायचा ? याचे
काही नियम आहेत. आपल्याकडे असलेली जुनी-जाणती झाडं जगायला हवीत. अशा झाडांवर
पक्ष्यांचे अधिवास असतात. मलबार पाईड हॉर्नबीलचं घरटं असलेली काही ५०/१०० वर्षे
जुनी झाडं चिपळूणात आहेत. एका जागा मालकाला जुने झाड न तोडण्याची विंनती वन्यजीव अभ्यासकांनी केली होती. आजच्या मार्केटिंगच्या भाषेत
सांगायचं तर विस्तारलेलं वडाचं झाड हे त्या जंगलातला जणू मॉल असते. तिथे ३०/३५
प्रकारचे ग्राहक (पक्षी) खरेदीसाठी (अन्न) आलेले असतात. म्हणून ही फायकस झाडं जंगलात
टिकून राहायला हवीत.
चिपळूणात गेली अनेक दशके ईगल (गरुड), हॉर्नबीलसारखे (ककणेर)
पक्षी जोडीने एकत्र राहत आलेत. आज त्यांच्यात वीण करावी की नाही ? अशी मानसिकता
निर्माण झाली आहे. जैवविविधतेतील साऱ्या घटकांच्या आपापल्या हद्दी ठरलेल्या आहेत. मानवाने
आपली हद्द केव्हाच पार केली आहे. शहरात वर्षानुवर्षे एकाच जागेवर घरटे बनविणारा मलबार
पाईड हॉर्नबील अलिकडे त्या जागेवर घरटे बनवित नाही आहे. मानवनिर्मित
अडथळ्यांनी त्याच्या अडचणी वाढवल्यात. सिमेंट काँक्रीटच्या बिल्डींग संस्कृतीतील खिडक्यांवर
लावल्या जाणाऱ्या काचांवर विशेषत्वाने विणीच्या हंगामात (टेन्टेड ग्लास) पक्षी
येऊन आपटणे किंवा तिथेच बराच काळ आपल्या चोचीने ‘टकटक’ करत राहण्याचे प्रमाण वाढले
आहे. शहरातील डी.बी.जे. कॉलेज हॉस्टेलच्या खिडकीच्या काचेवर आपटून दोन पक्षी मृतवत
(जून २०२१) झाले. खिडकीच्या काचेवर चोचीने ‘टकटक’ करत राहण्याने पक्ष्याच्या घरटे
बनविण्याच्या एकाग्रतेवर परिणाम होत आहे. खिडकीच्या काचेत दिसणारे आपले प्रतिबिंब
पाहून आपल्या भागात दुसरा नर आल्याची त्याची भावना प्रबळ होते आहे. आपल्या हद्दीत
आलेल्या दुसऱ्या नराला बाजूला करण्याच्या प्रयत्नात हे घडते आहे. पहिल्याला आपलं
घर सुरक्षित करायचं आहे. म्हणून हॉर्नबील जोडीने काचेवर सातत्याने आपली चोच मारत असतो.
असे करण्याने त्याच्या चोचीला इजा होते आहे. बिल्डींगच्या खिडकीबाहेर अन्न
ठेवल्याने तिथे येणारा पक्षी काचेत आपलं प्रतिबिंब पाहून चोच काचेवर आपटत राहातो. मानवाला
असं वाटतं की, ‘पक्षी खिडकीवर टकटक करतोय. माझ्याकडे काही अन्न मागतोय.’ हा गैरसमज
आहे. या घटनांनी पक्ष्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. म्हणून पक्ष्यांचे
खिडकीतले फोटो काढणे आणि ते समाजमाध्यमांत पोस्ट करणे थांबवायला हवे. अशावेळी
घराबाहेर पक्ष्यांना पाणी जरूर ठेवावे पण अन्न ठेवू नये. खिडकीत येणारा पक्षी
काचेवर टकटक करत असेल तर खिडकीच्या काचेवर परिस्थितीनुसार आतून-बाहेरून कागद
लावायला हवा.
शहरातील गाड्यांच्या आरशांवरही पक्षी आपल्या चोची मारत
असतात. विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करण्याकरिता आपल्या रंगात थोडासा बदल
करणाऱ्या लीफबर्ड पक्ष्याला पाहाण्यासाठी देशभरातून अभ्यासक आणि
छायाचित्रकार चिपळूणला येत असतात. हाही पक्षी गाड्यांच्या आरश्याच्या काचेवर
चोचीने मारत बसलेला असतो. संबंधित गाडी तिथून जात नाही, तोवर त्याचे काचेवर चोचीने
मारणे चालू राहाते. अशात खाद्य, घरटे बनवायला लागणारे साहित्य आदींवर परिणाम होतो.
त्याचा विणीचा हंगाम संपून गेला तर वाढ खुंटते. आपल्या पुढच्या पिढीला आपण काही
देऊ शकणार नाही, ही व्यथा यामागे असावी. ‘आपल्या पुढच्या पिढीला आपण काही देऊ
शकणार नाही’ याचा दुसरा अर्थ हा पक्षी मानवाच्या दुसऱ्या पिढीलाही काही देऊ शकणार
नाही असा होतो आहे. पक्षी जगतातील हे वास्तव भयंकर मानव जमात कधी समजून घेणार ? हा
प्रश्न आहे.
चिपळूणात असलेल्या ५०/१०० वर्षे जुन्या झाडाच्या ढोलीत मलबार
पाईड हॉर्नबीलची मादी किमान दोन महिने वास्तव्याला असते. यातले पावणे दोन महिने नर
हा मादीला आणि पिल्लांना बाहेरून अन्न भरवित असतो. नंतर काही दिवस मादी बाहेर येते.
मात्र पिल्लं घरट्यातच असतात. तेव्हा पिल्लांचं घरट्यामधलं प्रशिक्षण सुरु झालेलं
असतं. नर आणि मादी पिल्लांना बाहेरून अन्न पुरवतात. आपलं अन्न आपण कसं खायचं ? विष्ठा
बाहेर कशी टाकायची ? मादी बाहेर येताना लिंपण केलेलं घरटे कसे फोडायचे ? ते पुन्हा
कसे लिंपण करायचे ? हे पिल्लांना शिकवलं जातं. पुढे योग्य वेळेस पिल्लं बाहेर
येतात. या नैसर्गिक साखळीत ऐन विणीच्या हंगामात बाहेर अन्न जमा करीत असताना
नराच्या जीवनात काही दुर्घटना घडली तर ढोलीत बसलेल्या मादीने आणि नव्याने जन्माला
आलेल्या पिल्लांनी काय करायचं ? मादी ढोलीत असल्याच्या काळात नर किमान चाळीसेक प्रकारचं
शाकाहारी आणि मांसाहारी अन्न आणत असतो. यातलं शाकाहारी अन्न कधी आणायचं ? मांसाहारी
अन्न कधी आणायचं ? हे ठरलेलं असतं. पिल्लं अंड्याच्या बाहेर आल्यावर अन्नात बदल
होऊन प्रोटीन्स असलेलं अन्न आणलं जातं. यात दुसऱ्या पक्षाची पिल्लं, मांसल भाग, अंडी
असू शकतात. चिपळूणातला हॉर्नबील हा काजूबीया, काजऱ्याची बी, बिब्याच्या झाडाचीफळं
आणि फुलं आणताना हमखास दिसतो.
चारही बाजूला डोंगर असल्याने दरवर्षी पावसाळ्यात अनेकदा
चिपळूणला पाणी भरतं, पूर येतो. पाण्याच्या या प्रवाहासोबत डोंगरावरील काही जीव
पाण्याच्या समुद्राकडे सरकतात. डोंगर माथ्यावरती आढळणारा माउंटन कॅट स्नेक (मांजऱ्या),
इंडिअन रॉक पायथॉन (अजगर)मोठ्या पाण्याच्या प्रवाहासोबत चिपळूणला येतात. इथल्या
खाडीत पाहायला मिळतात. देश-विदेशातून स्थलांतर करून सीगल, करकोचा, स्टॉर्क, शेकाट्या,
ओपन बिल्ड स्टॉर्क आदी पाणपक्षी चिपळूणात येतात. थंड प्रदेशात बर्फाच
प्रमाण जास्त झालं की यांना खाद्य मिळेनासं होतं किंवा प्रमाण कमी होतं. मग ते कमी
थंडीच्या प्रदेशात सरकतात. आपल्याकडे भारतात गुजरातपासून महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकच्या
किनारवर्ती भागात हे येतात. विशेषत समुद्रकिनारी सीगल नर-मादी पक्षी जोडीने कायम
आपल्याकडे येतात आणि परत जातात. भौगोलिकतेमुळे गुहागर मधील कमी प्रमाण वगळता
रत्नागिरीसह सीगल हे अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, दापोली, हर्णै-आडे-आंजर्ले
पट्ट्यात पाहण्यात येतात. काही स्थलांतरित पक्षी कोकणात पोहोचत नाहीत. ते थेट
घाटमाथ्यावरून कर्नाटककडे रवाना होतात. काही गुजरातेतून श्रीवर्धन तर काही
मालवणपर्यंत पोहोचतात. विविध पाणपक्षी शेवाळ (अल्गी), मासे, खेकडे आदींसह झाडांना
त्रास देणारी शेवाळं (अल्गी) खाण्याचे काम हे पक्षी करत असतात. पण मानवाने आजकाल समुद्रात,
खाडीत काहीही फेकायला सुरुवात केली आहे. इथल्या वाशिष्ठी नदीत अशीच घाण टाकली जाते.
घाणीच्या पाण्यात हे पक्षी वावरत असतात. चिपळूणात होणाऱ्या मटण आणि चिकन
विक्रीनंतर शिल्लक राहाणारी घाण, कोंबड्यांची पिसं मोठ्या प्रमाणात वाशिष्ठीच्या
खाडीत फेकली जातात. कचरा पाण्यात टाकला की तो विरघळून जातो किंवा संपून जातो असा
मानवी समुदायाचा भयंकर समज झालेला आहे. पण निसर्गात तसं काही होत नाही. पाणपक्षी
ही पिसं खाऊन साफसफाई किती करणार ? ह्या पिसांना फार थोड्या प्रमाणात मांस
चिकटलेलं असतं. ते मांस खाण्याच्या प्रयत्नात पक्षी अनेकदा अख्खी पिसं खातात. निसर्गनियमानुसार
पक्षी पिसं खातात, ती त्यांच्या विष्ठेतून बाहेरही पडतात. पण याचे प्रमाण ठरलेलं
आहे. एखादं पिसं ठीक आहे. पण इथे पिसांचा अख्खा जुडगा खाण्याचा प्रयत्न पक्ष्यांकडून
होतो. जो पुढे त्यांच्यासाठी धोकादायक ठरतो. वर्षातून एकदा सायबेरियातून येणाऱ्या
व्हाईट स्टॉर्कचं रेकॉर्ड चिपळूणला खूप कमी झालेलं आहे. आता तोही ही पिसं खाऊ
लागला आहे. मानवाने फेकलेले आपल्या खाण्याजोगे आहे असे पक्ष्याला वाटते. कधीकधी
त्याला प्लास्टिक आदींचा डीस्टर्बन्स जाणवतो. प्लास्टिक खाल्यामुळे पक्ष्याचा
मृत्यू होतो. यातून त्याचं स्थलांतर जीवन अपूर्ण राहतं. तो त्याच्या मूळ अधिवासात
पोहोचू शकत नाही. त्याच्या विणीत अडचणी निर्माण होतात.
विणीच्या काळात लागणाऱ्या वणव्यांमुळे शिकारी पक्षी आणि
मोरासारख्या गवताळ प्रदेशात राहणाऱ्या पक्ष्यांची घरटी संपुष्टात येतात. अनेक साप
मारले जातात. जैवविविधता संपते. निसर्ग रचनेत गवताळ पट्टा महत्वाचा आहे. जंगलात शाकाहारी
प्राणी असतील तरच मांसाहारी प्राणी जगू शकतात. वणव्यामुळे हे निसर्गचक्र बिघडतं. ओढ्या-नाल्यांमध्ये
वेगवेगळ्या वस्तू, औषधांच्या
बाटल्या फेकल्या गेल्याने प्रदूषणाद्वारे पक्ष्यांच्या पायांना आणि चोचींना
वेगवेगळे रोग, फोड होताहेत. पक्षी चालू शकत नाहीत. आपलं पूर्वांपार प्रदूषित पाणी आणि
सध्याच्या प्रदूषणाने युक्त पाणी वेगळं आहे. पूर्वी शेवाळ आलंय म्हणजे पाणी खराब
झालंय म्हटलं जायचं. सध्या चिपळूण जवळच्या लोट्यातील कारखान्यांच्या रासायनिक
प्रदूषणाने म्हशी मरताहेत तिथं पक्ष्यांची काय व्यथा वर्णावी ?
चिपळूणात एका ब्लॅकबर्डने तीन पिल्लं दिली. नेमकी तिन्ही
कावळ्याने खाल्ली. त्याचं हंगामात क्षमता शिल्लक असल्याने पुढच्या दोन-चार दिवसात ब्लॅकबर्डने
पुन्हा दोन अंडी दिली. कालांतराने दोन पिल्लांचा जन्म झाला. त्यातलं एक पिल्लू
मेलेलं किंवा अधू झाल्याने मरत आलेलं ब्लॅकबर्डने स्वतः चोचीने उचलून घरट्याबाहेर
नेऊन ठेवलं. गेली दोन वर्षे (२०१९-२०२१) हा ब्लॅकबर्ड नेमकेपणाने आठ जूनला विशिष्ट
ठिकाणी अंडी घालायला सुरुवात करत असल्याची नोंद आहे. या ब्लॅकबर्डची आजवर या एकाच
ठिकाणी चार घरटी झालीत. कदाचित त्याला दुसरीकडे जागाच मिळत नसल्याने तयार होणारी पुढची
वीणही इथलीच जागा निवडत असावी. या जागेच्या जवळपास सुरक्षित जागाही शिल्लक
राहिलेली नाही. भारद्वाज, कावळा, मलकोवा (कावळ्याच्या कुळातील) हे पक्षी या छोट्या
पक्ष्यांची अंडी, पिल्लं पळवत असतात. अलिकडे हे प्रमाणही वाढलेले आहे. शिकारी
पक्ष्यांना दुसरं काही खायला मिळत नाही म्हणून हे अंडी आणि पिल्लं खात आहेत का ? हे
तपासायला हवं आहे. हीच कथा इंडियन पिट्टा या पक्ष्याची आहे. या स्थानिक
स्थलांतरित पक्ष्याने चिपळूणला लाईटच्या पोलवर घरटी केलीत. कदाचित ब्रीडिंगमध्ये
त्रास होऊ शकतो. पाऊस जास्त पडणार आहे. वादळ येऊ शकते. असाही विचार यामागे असावा. यंदा
(२०२१) चिपळूण भागात दीड महिना अगोदर पाऊस पडला. इंडियन पिट्टाला डोमशेप
घरट्याकरिता चिखलाची माती, मातीत असलेल्या काठ्या, काड्या आदी बेंड करून वापरायला हव्या असतात. विविध पक्ष्यांनी
यावेळी पाऊस लवकर सुरु झाल्याने त्यांच्या विणीच्या हंगामाला नियमिततेपेक्षा लवकर सुरुवात
करून पिल्लांना जन्म दिला आहे. चिपळूणात इंडियन पिट्टा आला की पुढील ३०/४० दिवसात
पाऊस येत असतो. लाईटच्या पोलांवर केलेल्या या घरट्यांपैकी तीन घरटी संपुष्टात आलीत.
दाबली गेलीत, नीट बसली गेली नसावीत. वीण पूर्ण झालेली नाही. टॉमी बॅबलर (गुजरात)
नावाचा छोटासा स्थलांतरित पक्षी १ जुलैला चिपळूणात दिसायला लागतो. ८ जुलैला तो घरटे
करायला सुरुवात करतो. ही गोष्ट मागील ३ वर्षांच्या (२०१८-२०२०) नोंदींवरून निश्चित
झालेली आहे. स्लॅटिंग लेग क्रेक (पाण कोंबडी) नावाचा पाणपक्षी आहे. चिपळूणात
सध्या तो ना पाण्यात राहातो ना जंगलात राहातो. अर्धवट डबकी साठलेल्या पाण्यात त्याचे
वास्तव्य आहे. जंगल हा त्याचा अधिवास नाही. त्याने पाणथळ जागी राहायला हवं आहे. त्याचा
मूळ अधिवास डिस्टर्ब होऊन तो दुसरीकडे सरकला असावा. जंगल आणि पाणथळ जागा येथील
डिस्टर्बमुळे तो मधल्यामध्ये अर्धवट डबक्यांच्या परिसरात भटकतो आहे. सध्या याही
पक्ष्याचा विणीचा हंगाम (ब्रीडिंग) आहे. पण आता या पक्ष्याला, नेमकं कुठल्या
डबक्यात घरटे करू हे समजेनासं झालं असावं. कारण आज तो घरटे करायचा आणि उद्या
खणलेला एखादा खड्डा ढासळायचा. त्यात एखादा बांधकामाचा पिलर उभा व्हायचा किंवा
एखादी पाण्याची सिंटेक्सची टाकी बसायची आणि त्याची घरटे करायची मेहनत फुकट जायची.
चिपळूणात पाण्याची तळी किंवा पाणी साठण्याच्या जागा कमी होत
चालल्यात. शहरातील भोगाळे, माधव सभागृह आदी नजीकची तळी किंवा पाणी साठण्याच्या
जागा, पूर्वीच्या दलदलीच्या जागा (वेडर बर्ड्स) कमी झाल्यात. नारायण तलाव अजून हवा
तसा बहरला नाही. विंध्यवासिनी, रामतीर्थ तलाव, गांधारेश्वर परिसर, गुहागर बायपास
रोड, धामणवणे, टेरव भागात अजूनही पक्षीवैभव टिकून आहे. पण तिकडेही डोंगरांचे लचके तोडून
बिल्डींग बांधण्याचा विकास कार्यक्रम सुरु आहे. हे कदाचित असंच सुरु राहिलं तर
भविष्यात चिपळूणच्या आजूबाजूचे सारे डोंगरी वैभव संपेल. शहरातील वळचणीच्या जागा
संपल्याने चिमण्या गायब झाल्यात. आजही जिथे त्यांना योग्य जागा भेटतात, तिथे
त्यांचा अधिवास आहे. बहाद्दूरशेख नाक्यावर गणेशोत्सव होत असलेल्या ठिकाणी एका
मोठ्या उंबराच्या झाडावर किमान सहाशे चिमण्या पूर्वी मोजल्या गेल्या होत्या. आज
यातल्या चिमण्या जवळच्या ओअॅसिस हॉटेलच्या पाठीमागील भागात दिसतात. शहरतील
मध्यवर्ती बस स्थानकानजीकच्या दत्तमंदिर भागातील झाडांवर चिमण्या येतात.
चिपळूणच्या रामतीर्थावर हल्ली फारसे कावळे फारसे दिसत नाहीत. ते रेडी टू युज
मटेरियल (अन्न) घ्यायला कोकण रेल्वे ट्रॅकवर बसलेले असतात. रेल्वे ट्रॅकवर
लोकांकडून फेकले जाणारे अन्नपदार्थ खाण्यासाठी चिमण्या, साळुंख्या, कावळे येतात. रेल्वे
स्टेशनवरील प्लॅटफॉर्म शेडच्या कोनातल्या आडोश्यात हे पक्षी घरटी करतात. विशेष
म्हणजे साळुंख्या रात्रीच्याही जाग्या असतात. रात्री दोन वाजता एखादी रेल्वे गाडी
येणार असेल तर ह्या ओरडायला लागतात. गाडी येऊन गेल्यावर ट्रॅकवर एखादं दुसरा राऊंड
त्या मारतात. हे चित्र भारतभर पाहायला मिळतं. या ट्रॅकवर ड्रॉन्गोही (कोतवाल) असतात.
पण ते हे अन्नपदार्थ खात नाहीत. ते अन्नावरचे किडे खातात. जेव्हा स्टेशनवर रेल्वे
येते. तेव्हा आजूबाजूचे गवत उडते. सोबत गवत, झाडी-झुडूपालेकिडे वाऱ्याने उडतात. ते
खायला ड्रॉन्गो उपस्थित असतात.
चिपळूणच्या प्रसिद्ध सवतसडा धबधबा परिसरात विशेषतः विणीच्या
हंगामात दिसणारा फाल्कन (पेरिग्रीन किंवा शाईन) हा जगातील सर्वाधिक वेगाने
उडणारा पक्षी आहे. तो ताशी ३४० किमी वेगाने उडतो. इथल्या वन्यजीव अभ्यासकांचा त्यावर
गेली ५ वर्षे अभ्यास सुरु आहे. सवतसड्याच्या ९० टक्के उंचीवर दगडाच्या कपारीत हा आपले
घरटे करतो. नर-मादी उघड्या कातळाच्या कपारीत पिल्लांना वाढवतात. अजूनतरी या
पक्ष्याला फारसा डिस्टर्ब झालेला नाही. या फाल्कनची पिल्लं अंड्याबाहेर येईपर्यंतचा
यांचा विणीचा हंगाम एक महिन्याचा असतो. त्या नंतर महिनाभर पिल्लं घरट्यातच वावरत
असतात. तेव्हा ती नर-मादीपेक्षा मोठी दिसतात. यंदा (२०२१) फाल्कन जोड्याला आपल्या दोन
पिल्लांना अन्न आणायला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याची नोंद आहे. कारण
परिसरातील अन्नाची उपलब्धी कमी झालेली आहे. पाचेक वर्षांपूर्वी हे अन्न लवकर आणलं
जायचं. अन्नात विशेषता असायची. तीही कमी झाली आहे. पाऊणएक तास फाल्कन अन्न घेऊन
येत नाही तेव्हा पिल्लं बराच वेळ घरट्यात ओरडत असतात. उन्हाळ्यात पिल्लांना अॅक्टीव्ह
होईपर्यंत पाणी मिळत नसतं. ते त्यांना अन्नातून घ्यावं लागतं. पिल्लांना दिवसातून
किमान ४/५ वेळा पाण्याचा अंश असलेलं मांसल अन्न आणावं लागतं. ते प्रमाणही कमी
झालंय. अलिकडच्या लॉकडाऊन काळातील ताज्या नोंदीनुसार (मे २०२१) अडीच तासात पक्षी २/३
वेळा तेही तुलनेने कमी अन्न घेऊन आला होता. एकदा तर सकाळच्या अडीच तासात ४ वेळा
आणि संध्याकाळी ३ वेळा पक्ष्याने पिल्लांकरिता अन्न आणलं होतं. याचे मुख्य कारण या
भागातला वणवा असावे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या अखेरीस विणीच्या हंगामात फाल्कनचे
चिपळूणात अधिकचे दर्शन घडू लागते. त्या नंतरचे पुढचे तीन महिने कोकणात वणवे
लावायचा विकृत उद्योग सुरु असतो. सवतसडा धबधबा परिसरातली वालोपे आणि परशुराम
हद्दीत दरवर्षी न चुकता वणवा लागतो. मग याला तर अन्न तरी मिळणारं कसं ? किमान २०
चौरस किमी परिसरात फाल्कन अन्नाकरिता फिरतो. यास्तव तो चिपळूणच्या बाहेरही जाऊ
शकतो. पण विणीच्या हंगामात पिल्लांची ओढ त्याला फार दूरवर जाऊ देत नाही. पूर्वी
फाल्कन सकाळच्या वेळी वीसेक मिनिटात पिल्लांसाठी अन्न घेऊन यायचा. तेव्हा एकाला
वाट पहावी लागायची. अशा नोंदी करणाऱ्या पक्षी अभ्यासकांना, ‘सध्या नर-मादी पैकी एकाला
अन्न मिळालेलं असतं आणि एकाला नाही. मादीला अन्न मिळालं तर नर तिच्या मागावर येतो.
पण त्याच्याजवळ अन्न नसतं. तो फक्त पिल्लांना बघून परत जातो.’ असं लक्षात आलं आहे.
काही झाडाच्या फुलांमध्ये मकरंद (नेक्टर) मोठ्या प्रमाणात
असतो. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे हा मकरंद
पक्ष्यांसाठी अमृतासारखा असतो. यात पाणी, गुल्कोज (साखर), तणाव कमी करणारे घटक
असतात. सावरीच्या फुलांमधून हे कंटेंट सर्वाधिक प्रमाणात मिळतात. म्हणूनच या
झाडावर एका वेळेला ८/९ जातीचे किमान २८ ते ३२ पक्षी नोंदविण्यात आलेले आहेत. अनेकदा
आपल्याला पक्षी फुलातून मध घेतात असं वाटतं, पण तसं नसतं. तसेच प्रत्येक फुलातील
मकरंदाची चव वेगळी असते. मोबाईल टॉवरचा पक्ष्यांना फारसा फरक पडत नसावा, अशी इथली
नोंद आहे. विमानांप्रमाणे पक्ष्यांचे भ्रमणमार्ग बऱ्यापैकी निश्चित असतात. स्थानिक
स्थलांतरित पक्षांचेही स्वतःचे भ्रमण मार्ग ठरलेले आहेत. या भ्रमण मार्गात जर कुठे
मोबाईलचा टॉवर आला तर पक्ष्यांना डिस्टर्ब होऊ शकतो. पण मोबाईल रेंजच्या प्रभावाने
पक्षी मरू शकतो असं वाटतं नाही. रोडकिलवर मरणारी जनावरे हे निसर्ग साखळीचा भाग
आहेत. रोडकिलमध्ये इंडियन पाम सिव्हेट, पाम सिव्हेट या दोन जातीच्या मांजरांच्या
मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. रात्री प्राण्यांची आणि गाडीवाल्यांची एकच वेळ असते. याची
काळजी वाहनचालकांनी घ्यायला हवी आहे. समोर एखादं जनावर, छोटासा प्राणी दिसत असेल
तर त्याच्यावरून गाडी नेऊ नका याचं शिक्षण गाडी चालकांना द्यायला हवं आहे. साधारणपणे
दर आठमागे एका पक्ष्यांची जात आपल्याकडे नष्ट होते आहे. ८/१० किड्यांमध्ये एखादा
नष्ट होतो आहे. प्राण्यांमध्येही हे सुरु आहे. पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण आणि
मानवी हस्तक्षेप ही या मागील कारणे आहेत. प्रदूषणाचा परिणाम पक्ष्यांवर आणि
त्यांच्या विणीच्या हंगामावर होतो. पक्ष्यांना पाण्यातलं प्रदूषण मारक ठरत. कारण
इथलं पाण्यातलं प्रदूषण स्थलांतरित पक्ष्यांद्वारे हिमालयातल्या पेंग्विनपर्यंत
जाऊन पोहोचतं.
पक्ष्यांबद्दलच्या गमतीजमती, पक्ष्यांची हालचाली, त्यांचे
वागणे, विशिष्ठ कालावधीत आणि वातावरणात बदल समजून घेणे औत्युक्याचे असते. पक्षी हे
पिल्लांना वाढवण्यासाठी, प्रजननासाठी घरटे करतात. खंड्या पक्षी मातीच्या जागेत बीळ
करतात. कबुतर छोट्या मोठ्या काट्या-कुट्यानी घरटे बांधतात. सुगरणीचे घरटे सर्वाना
मोहित करते. अवघी एक चोच आणि दोन पाय असलेले पक्षी खूप सुंदर घरटी बांधतात. उन्हाळ्यात
नदीच्या काठाने पक्षी निरीक्षणासाठी फिरताना पाणी कमी झाल्याने तयार झालेल्या
छोट्या छोट्या पाण्याच्या जागापक्षी निरीक्षणासाठी सर्वोत्तम असतात. अशा
जागांपासून आपण नीटसे कॅमॅफ्लाज होऊन आपण दूरवर थांबलो तर चांगले पक्षी बघायला मिळू
शकतात. एकदा चिपळूण पट्ट्यात एक लिटील हेरॉन आपल्या चोचीनं एकेक फुल उचलून
पाण्यात टाकत असल्याचं निदर्शनास आलं. कुतूहल चाळवलं म्हणून निरखून पाहिल्यावर फुल
टाकल्यावर तो थोडावेळ स्तब्ध राहात असल्याचं जाणवलं. हा पक्षी असा का करतोय ? असा
प्रश्न निर्माण झाला. नंतर लक्षात आलं की त्या फुलांच्या निमित्ताने तो
पाण्यातल्या छोट्याछोट्या माश्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे. फुलांनी पाण्यावर
उठणारे तरंग बघून मासे आकर्षित होतील आणि त्याला सहज भक्ष्य मिळेल अशी त्याची
योजना होती. दलदल, गटार, डबक्यामध्ये वाढणारा पाँड हेरॉन, अत्यंत स्तब्ध आणि
शांतपणे एकाजागी बसून आपल्या भक्ष्यावर नजर स्थिरावून असलेला पर्पल हेरॉन (जांभळा
बगळा) असे सात प्रकारचे हेरॉन चिपळूण परिसरात दिसतात. लिटील इग्रेट पाण्यामध्ये
फार सुंदर नाचतो. पायाच्या व्हायब्रेशन द्वारा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंग निर्माण
करून पाण्यातील, डबक्यातील गांडूळ, बेडूक, लहान मासे आदी भक्ष्य अधिक जवळ आणण्याचा
त्याचा प्रयत्न असतो. चिपळूणात कॉपर स्मिथ, व्हाईट चिक आणि ब्राऊन हेडेड बार्बेट हे
तीन प्रकारचे तांबट (बार्बेट) दिसतात. प्रजननाच्या कालखंडात बार्बेट वाळक्या
झाडाच्या फांदीवरत ठोके मारताना दिसतात. पदार्थाची घनता तपासण्यासाठी असे ठोके
मारले जातात. डॉक्टरही रुग्णाच्या शरीरावर हाताच्या बोटाने असे ठोके मारून तपासणी
करतात. कॉपरस्मिथ बार्बेट पक्षी झाडाच्या खोडाच्या कोणत्या भागात घरटे बनवायचे आहे
? याचा अंदाज घेताना चोचीने असे ठोके मारतो. यावेळी लाकूड आतमध्ये कुजलेले, वाळवी
लागलेले नाही ना ? आपल्याला घरटे करायला ते कितपत कठीण जाईल ? असे विचार तो करत
असावा. चिपळूणात रोजरिंग पॅराकीट (पोपट), प्लम हेडेडपॅराकीट, अलेक्झांडर पॅराकीट
हे तीन दिसतात. यांच्यातला नर हा मादीला रिझवण्यासाठी स्वतः खाऊन आलेलं अन्न उलटी
करून तिला भरवत असतो. विणीच्या हंगामात स्वतःचे रंग बदलून अधिक आकर्षक होणाऱ्या या
नर पोपटाचे काम अन्न आणून देणे हेच असते. युरेशियन रायनॅक हा पक्षी चिपळूण
विभागात गेली चार वर्षे दिसतो आहे. वाळवी, किडे, कीटक खातो. हा पक्षी आपल्याकडे
युरोपमधून येतो. तिकडून येणारा हा एकमेव सुतार पक्षी आहे. हा स्वतःची मान १८०
अंशात वळवतो म्हणून याला मानमोड्या असेही म्हणतात.
गेली पाच सहा वर्षे प्रथमतः नोंद केलेला पॅलीड स्कोप्स आऊल
(घुबड) पक्षी इराण-इराकमधून इथे येतो. पांढरा करकोचा (व्हाईट स्टॉर्क) युरोप
आणि कझाकिस्थान येथील मूळचा पक्षी आहे. तिथे त्याचे प्रजनन होते. थंडीचा काळ तो
आपल्याकडे खाडीत घालवतो. किमान १५ ते २० हजार फुट उंचावरून अनेक पक्षी स्थलांतर
करून येतात. पाणथळ जागी स्थलांतर करतात. अन्न मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. चिपळूणच्या
वाशिष्ठी खाडीत मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेला पाणकावळा (लिटील कॉर्मोनंट)
पाण्यात पोहोतो आणि हवेतही उडतो. मोठा श्वास घेऊन पाण्यात उडी मारून खाद्य
पकडण्यात तो कमालीचा तरबेज आहे. ओले पंख सुकविण्यासाठी पाणकावळाही सनबाथ घेत असतो.
या पाणकावळ्यांच्या पंखांमध्ये एक स्त्राव किंवा तेल सदृश्य घटक असतो. कोलगेटची
पेस्ट जशी किंचित दाबल्यावर बाहेर येते, तसा हा स्त्राव पिसांतून बाहेर येत असतो. बाहेर
ऊन यायच्या आधी आणि पाण्यात जायच्या आधि तो आपल्या पिसांना चोचीच्या साहाय्याने हास्त्राव
लावतो. पाण्यात त्याला काही अडथळा जाणवला तर त्याला सहज पाण्यातून बाहेर झेप घेता
आली पाहिजे. म्हणून ही सोय असते. पाण्यामधून बाहेर पडून उडण्यासाठी लागणारी
स्त्रावाची वेगळी क्षमता आणि कौशल्य याच्या पिसांत असते. पंख सुकविणारा किंग फिशर,
ओरिएन्टल डार्टरही असाच आहे. सगळ्या पाणपक्ष्यांमध्ये हे चालू असतं. पण पाण्याशी
अधिकचा संबंध असणाऱ्या पाणकावळ्यात हे प्रमाण अधिक आहे.
या पक्ष्यांची
किंवा वन्यजीवांची फोटोग्राफी हे एक आव्हान आहे. इथे मानवी संयमाचा कसं लागतो. संयम
नसलेल्या मानवाच्या चुकीच्या वागण्यामुळे पक्षी अंडी सोडून जाण्याच्या किंवा नवतर
पक्ष्याला जन्माला आलेली पिल्लं अर्धवट सोडून जातो, काहीवेळा पक्षी घरटे सोडून
जातो अशा घटना घडतात. त्यामागे अन्न मिळण्याचे प्रमाण कमी झालेले आहे का ? उंदीर, पाली,
झुरळांवर सर्वत्र जंतुनाशके मारली जातात. याचा त्रास ह्यांच्यावर गुजराण असलेल्या
पक्ष्यांना होत असावा. भाजी-फळांवर जंतुनाशके मारली जातात, याचाही त्रास होत असावा.
ही कारणे आहेत का ? यावरही संशोधन व्हायला हवे आहे. तिबोटी खंड्या (ओरिएंटल डॉर्फ
किंगफिशर) हा सगळे रंग असलेला हा पक्षी आहे. भारतातले सगळे लोकं याला पाहायला
चिपळूणला येतात. तिबोटी खंड्यानेपाली किंवा मासे आणून मादीला भरविण्याची दृश्ये
उत्साहवर्धक असतात. छायाचित्रकार तिबोटी खंड्याचा चांगला फोटो मिळवण्याकरिता त्याच्या
घरट्याजवळ असलेली अडचणीची ठरणारी झाडेझुडपे, गवत काढतात. घरट्याजवळ एखादी काठी लावतात. जेणेकरून पक्षी त्या काठीवर
बसला तर सुंदर फोटो टिपता येईल. पण यातून पक्ष्याचा अधिवास डिस्टर्ब होतो, दिनक्रम
बिघडतो. कधीकधी पक्षी पिल्लं सोडण्याच्या घटना घडतात. पुढे पिल्लांना मुंग्या
लागल्याच्या घटना घडल्यात. म्हणून न जमल्यास पक्ष्यांचा फोटो काढू नये पण
पक्ष्याला त्रास होईल असं वर्तन अजिबात नसावं. पक्ष्यांची फोटोग्राफी सुरक्षित
अंतरावरून संयमपूर्वक व्हायला हवी. ब्लॅक ईगल थंडीच्या दिवसात स्थलांतरित होऊन
चिपळूणात येतात. भारतात फार कमी लोकांना या पक्ष्याचे बसलेल्या अवस्थेतील फोटो
मिळाले आहेत. फ्लॉवर पेकर (फुलटोचा) भारतात दिसणारा सर्वात छोटा पक्षी चिपळूणात
दिसतो. पावसाळ्यात सक्रीय असणारे बुशस्क्वेल, बार्ट बुशस्क्वेल, फ्रॉग माऊथ आदींची
फोटोग्राफी करताना निसर्गाची काळजी घ्यायला हवी. छोटासा टेलर बर्ड हा घरटे
बनविताना कोळ्याच्या जाळ्याचे मटेरियल वापरत असतो. चिपळूणात स्थलांतरित चातक पक्षी
(जेकोबीन कक्कू; पावश्या नव्हे) हा गेली काही वर्षे ठरलेल्या विशिष्ठ काळात एक
दिवसाच्या फरकाने दिसतो आहे. स्थलांतरित आहे. आपण अनेकदा निसर्गाचे, त्यातल्या या जीवांचे
छान फोटो काढतो, पण नंतर आपल्याला या संदर्भातील काहीही लक्षात राहात नाही. म्हणून
या निसर्गाचे व्यवस्थापन करायला, नोंदवही लिहायला आपण शिकायला हवं. आपल्या नोंदीत
पक्षी दिसलेल्या भागाचे नाव, तारीख, वेळ हवामान, तापमान, अधिवास, खानपान, वर्तन, घरट्याचा
आकार, वापरलेले साहित्य आदी लिहायला हवं.
पक्ष्यांचे जीवन प्रयोगशाळेतील लिटमस पेपरसारखे आहे. पक्षी
हे निसर्गातील बदल आपल्या कृतीतून सांगण्याचा प्रयत्न करतात. मानवाने स्वतःच जगणं
सुखकर होण्यासाठी निसर्गात अनेकविध बदल घडवलेत. त्याच्या फटका जैवविविधतेतील
घटकांना बसला आहे. त्यांच्या जगण्या-वागण्याच्या पद्धती, हालचाली, खानपान
यांमध्ये बदल झालेला आहे. आज मनुष्य पैशासाठी, कुटुंबासाठी जीवन जगतोय. पूर्वी असं
नव्हतं. हे आजही आपल्याला निसर्गाच्या सानिद्ध्यात राहणाऱ्या माणसांमध्ये गेल्यावर
जाणवतं. पक्ष्यांचा अधिवास झपाट्याने संपुष्टात येत असल्याने बालपण जगणाऱ्या सध्याच्या
पिढीला जैवविविधतेतील हा ठेवा भविष्यात अनुभवता येईल का ? हा
प्रश्न आहे. पूर्वी आपल्याकडे घरांच्या वेगवेगळ्या रचना होत्या. अंगणं शेणाने
सारवलेलं असायचं. वाडे-गोठे, गाई-गुरं असायची. यामुळे
पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित होता. आज हा अधिवास संपुष्टात आलेला आहे. आजूबाजूच्या
डोंगरावर जाऊन चिपळूणात डोकावलं तर फक्त आणि फक्त सिमेंटचं ‘विकासाभिमुख’ जंगल
दिसतं. हे जे चिपळूणला झालंय ते हळूहळू आजूबाजूच्या खेडेगावात होतंय. थोड्याफार
फरकाने कोकणातील अनेक शहरांतील हे चित्र आहे. म्हणून निसर्ग टिकवून काळानुसार
निसर्ग बदललं पाहिजे. मानवाने पक्षी बघायचा आनंद जगायला सुरुवात केली तर त्याला
निसर्ग कळत जाईल.
पक्ष्यांच्या अशा नोंदी असलेल्या चिपळूणात पुढीलवर्षी (२०२२)
नेक्टर फेस नियोजित आहे. यासाठी पळस, पांगारा आणि काटेसावर आदी फळे-फुलांनी
बहरणाऱ्या झाडांना गृहित धरले जाते. मार्च ते मे महिन्यात आपल्याकडे यांसह विविध
झाडांवर पक्षी असतात. त्या झाडांसमोर पक्षीप्रेमींना बसविले जाणार आहे. पक्षीप्रेमीं
दुर्बीणीच्या साहाय्याने पक्ष्यांच्या नोंदी करतील. वन विभाग रत्नागिरीचे (चिपळूण)विभागीय
वनाधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वन संरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि
मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट सहकार्याने जागतिक पर्यावरण दिनी वेबीनारच्या
माध्यमातून या नोंदी समाजासमोर आल्या. निलेश बापट यांच्यासह पक्ष्यांचे वैज्ञानिक
वर्गीकरण डॉ. श्रीधर जोशी, पक्ष्यांची
फोटोग्राफी नयनीश गुढेकर आणि निसर्ग डायरी लेखन याबाबत प्रा. डॉ. हरिदास बाबर
यांनी केलेल्या मांडणीमुळे मागील किमान पाचेक वर्षातील चिपळूणच्या पक्षी जगतातील
महत्वाच्या नोंदी नव्याने अपडेट झाल्या हे नक्की !
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
सर्व छायाचित्रे : डॉ. श्रीधर जोशी आणि नयनीश गुढेकर (चिपळूण)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा