अन्यवेळी वेलीच्या खुललेल्या पांढऱ्या फुलांपेक्षाही तिच्या फिक्कट पांढऱ्या कळ्या अधिक मनमोहक वाटतात. जणू त्या भारतीय मण्यांप्रमाणे भासाव्यात. टोकाला हलकासा लाल रंगाचा स्पर्श असलेल्या या फुलांचा देठ तांबूस रंगाचा असतो. ४ फुटाची पूर्ण वाढ झालेलं फुलझाड सहज बहरत असलं तरी ते ६ फुटापर्यंत सुलभतेने वाढतं. कधीकधी याची वाढ १० फुटही असू शकते. आपल्या जैवविविधतेतील घटक असलेल्या फुलपाखरांसह छोट्या पक्ष्यांनाही (Humming birds) झुंबरवेल आपल्याकडे आकर्षित करते. मात्र इतक्या आकर्षक फुलाला अजिबात सुगंध नाही हे आश्चर्यकारक आहे. हे सदाहरित वेलवर्गीय फुलझाड मूळचे थायलंडचे असल्याचे आमच्या वाचनात आले. आशिया आणि आफ्रिकेमध्ये क्लेरोन्डेन्ड्रमच्या सुमारे ४००हून अधिक प्रजाती असाव्यात. जगभरात मोजक्या भागात उपलब्ध असलेले हे फुलझाड ‘अमेझॉन’वर विक्रीला असल्याचे पाहून तर आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला.
आमच्यासोबत निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळात कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी मित्र विलास महाडिक यांच्या नजरेला काही दिवसांपूर्वी आम्ही हे पूर्ण फुललेलं फुलझाडं आणलं. यापूर्वी कुठेही पाहिलेलं नसल्यानं त्यांनाही आश्चर्य वाटलं. त्यांनी या फुलझाडाचा व्हिडीओ, सोशल मिडीयावरील दुर्मीळ फुलझाडांशी संबंधित एका ग्रुपवर पोस्ट केला. तेव्हा याच्या नावाचा आम्हाला उलगडा झाला. वन्यजीव अभ्यासक नीलेश बापट, हेमंत ओगले, रोहन कोरगावकर, दत्तात्रय मोरसे, प्रा. आदित्य तांबे, राहूल सोनवणे, संजय परांजपे, आकाश बाखडे आदिंमुळे या वेलीचं नाव समजणंं सोपं झालं. १३ जानेवारी २०२२ रोजी मिलिंद गडकरी यांनी आपल्या फेसबुक वालवर फुलाचा एक फोटो पोस्ट केला होता, तो झुंबर वेलीचा होता. हे रोप त्यांना गणपतीपुळे मंदिराच्या समोर मिळालेलं होतं. नावानुसार आम्ही याची अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता फारसं काही हाती लागलं नाही. तेव्हा पुरेशा प्रकाशात फुलणाऱ्या आणि फारसे दस्तऐवजीकरण न झालेल्या झुंबर वेलीची दुर्मीळता आमच्या ध्यानात आली. हिवाळ्याच्या दिवसात आपल्या परसदारी बहरलेली जबरदस्त आकर्षक अशी ही ‘झुंबर वेल’ पाहाणं हे खरोखरच सुंदरतेचं प्रतिक आहे, असं वाटल्याने तिच्याविषयी लिहिलं.
धीरज वाटेकर
'झुंबर वेल' फुलाची ही आणखी काही छायाचित्रे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा