देशातल्या ग्रामीण भागात आजही अनेकविध प्रथा परंपरा जोपासल्या जातात. गावागणिक त्यात बदलही पाहायला मिळतात. कोकणभूमीही गावोगावी उत्तमोत्तम परंपरा जोपासून आहे. प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या परीट समाजानेही आपल्या परंपरा जपल्या असून त्यात गावागणिक बदल असू शकतात. पूर्वी बांबूच्या वैशिष्ट्यपूर्ण खोबणीत लामणदिवा लावून परीट स्त्री घरोघरी जाऊन घरातील कर्त्या पुरुषाला ओवाळायची. तेव्हा दिवाळीपूर्वी परीट आळीत किंवा त्यांच्या घरी जाऊन स्त्रीयांना आमंत्रण केलं जायचं. ओवाळणी झाल्यावर परीट स्त्रीला फराळ आणि ओवाळणी दिली जायची. आपला परंपरागत गावगाडा अभ्यासता शंभर वर्षापूर्वीपर्यंत ही परंपरा अस्तित्वात असावी. प्रस्तुत लेखात नमूद चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील ज्ञात परंपरा ही पुरुषांकडे वर्ग झालेल्या काळापासूनची पाहायला मिळते. सध्याच्या काळात तर ही ओवाळणीची परंपरा श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेच्या मंदिरात दिवाळीच्या उत्सवी वातावरणात संपन्न होत असते. ओवाळणीच्या ताम्हणात साधा दिवा, अक्षता आणि हळदी-कुंकू असतं. चिपळूण तालुक्यातील निवळी गावचे रहिवासी आणि संत गाडगेबाबा परीट समाज सेवा संस्थेचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांची जीवनकथा ‘ग्रामसेवक ते समाजसेवक’ लिहिताना आम्हाला या परंपरांची माहिती झाली होती.
परीट हा बारा बलुतेदारांपैकी एक मेहनती समाज आहे. घरोघरीचे कपडे गोळा करून ते धुऊन, इस्त्री करून घरोघर पोचवणे हे त्यांचे मुख्य काम होते. त्यांना गावकऱ्यांचे धुणे धुण्याचे काम लग्नकार्य आणि सोयर-सुतकप्रसंगी विशेषत्वाने करावे लागे. गावातील लग्नात नवरा-नवरीच्या डोक्यावर चादर धरणे, विहिणींसमोर पायघड्या टाकणे ही कामेसुद्धा या समाजाकडे होती. देशभरात दहाएक कोटी लोकसंख्येचा, हा विखुरलेला समाज ग्रामीण भागात आपल्या प्रथा परंपरा, काही ठिकाणी इस्त्रीचा परंपरागत व्यवसायही सांभाळून आहे. संत गाडगेबाबा याच समाजात जन्मले. त्यामुळे या समाजाचं त्यांच्याशी जिव्हाळ्याचं नातं आहे. पूर्वी नदीच्या काठाला बांधलेल्या घाटांवर परीट लोकं धुणं धुवायची. त्या बदल्यात सुरुवातीला त्यांना पोटाला खाणं मिळायचं. नंतरनंतर धान्य मिळू लागलं आणि कालौघात पैसा मिळायला सुरुवात झाली. आजही महाराष्ट्रातील ग्रामीण भागात डोकावलं तर कोणा थोराड परटाच्या तोंडून, ‘आरं अलीकडंची पोरं तुम्ही कशी वळखशीला ! तुझी आज्जी आमच्याकडं द्यायची धडूती धुवायला !’ असे शब्द सहज कानी पडतील.
परटांकडून पूर्वांपार दिव्याची ही ओवाळणी गावच्या खोतांना आणि मानकऱ्यांना केली जायची. परीट समाजातले मानकरी पूर्वज प्रतिनिधी तेव्हा गावाच्या खोतांना घरोघरी ओवाळायला जायचे. तत्पूर्वी नरकचतुर्दशी-अभ्यंगस्नानाच्या पूर्वरात्री देवळात पहाटेच्या वेळी ग्रामदेवतेला रूपे लावली जायची. सकाळी ग्रामदेवतेच्या देवळात देवाला आणि उपस्थित मानकऱ्यांना हा दिवा दाखवला (ओवाळला) जायचा. दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याला गावाच्या खोतांना, मानकऱ्यांना घरोघरी हळदी-कुंकू लावून ओवाळलं जायचं. ओवाळणीवेळी ही मंडळी पाटावर किंवा घोंगडीवर बसायची. मानकरी परिटांकडून ओवाळल्यावर स्वेच्छेने ताटात ओवाळणी टाकली जायची. शिधा मिळायचा. ही परंपरा आबा महाडिक यांनी पुढे चालवायला सुरुवात केली तेव्हा परीट पुरुष घरपट जायचे. दिवसभरात असं ४०/५० घरात जाणं व्हायचं. ४०/५० वर्षापूर्वीपर्यंत ही घरपट जाऊन ओवाळण्याची परंपरा कायम होती. नंतर पिढी जसजशी शिकत गेली तसतशी ती कामधंद्यासाठी गावाबाहेर पडली. गावातलं शेतीकाम कमी झालं. परिणामस्वरूप वेळ देण्यावर बंधनं येऊन परंपरांमध्ये बदल होत गेला. अनेक गावांतून जुनी माणसं आणि नवीन माणसं यांच्यातील संवाद भेदांमुळेही परंपरांमध्ये बदल होत राहिला. सध्याच्या काळात परटाचा दिवा घेऊन घरपट जाणे होत नाही. ही ओवाळणी ग्रामदेवतेच्या मंदिरात होते. मंदिरातील दिवा ओवाळणीच्या परंपरेचा मूळ मान हा परीट समाजाचा आहे. कालांतराने त्यांच्या जोडीला मंदिराचे गुरव आणि ४/५ गावकर मंडळी जोडली गेली आहेत.
सध्याच्या काळात पहिल्या अंघोळीला, नरकचतुर्दशीला सकाळी श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवतेला रूपे (मुकुट) लावून झाल्यावर गुरवाकडून पूजा होते. पूजा आटपल्यावर गुरव हे गावाकडून आणि खोतांकडून, ‘परटांनी दिवा करायचा का ?’ असा हुकूम (परवानगी) घेतात. मंदिराच्या बाहेर असलेल्या तुळशीजवळ एक पिठाचा दिवा प्रज्ज्वलित केला जातो. मंदिराला ५ फेऱ्या मारून देवाला नैवेद्य दाखविला जातो. नंतर गावातील खोतांना परटांचा दिवा दाखवून ओवाळले जाते. आता ओवाळण्याचे हे काम परीट कुटुंबातील पुरुष मंडळी करतात. ह्याही दिव्याने पहिल्यांदा ग्रामदेवतेला ओवाळले जाते. नंतर मंदिरात जमलेल्या खोत आणि मानकऱ्यांना ओवाळतात. ओवाळल्यानंतर त्यांच्याकडून ताटात स्वेच्छेने ओवाळणी टाकली जाते. यावेळी गुरवही एक दिवा घेवून सोबत असतात. त्यांच्या सोबत गावकर मानकऱ्यांपैकी ४/५ जण असतात. दिवा ओवाळण्याची ही परंपरा पहिल्या दिवाळीला आणि देव दिवाळीला अशी दोनवेळा संपन्न होते. याला पारंपरिक भाषेत दिवा चढवणे आणि दिवा उतरवणे असे म्हणतात. देवदिवाळीचा दिवा उतरवण्याचा कार्यक्रम मोठा असतो.
शिमगोत्सवादरम्यान
होळीला दोन दिवस शिल्लक असताना श्रीबाजी वाघंबर मंदिरातील ग्रामदेवतेची पालखी
पालवण गावच्या सहाणेवर आणून ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी पालखीत देव बसवविले जात
असताना ग्रामस्थ शिमग्याचा ‘माड’ आणायला जातात. सकाळी परीट समाजाचे मानकरी आपल्या
घरून सहाणेवर पालखीजवळ पांढरे निशाण आणून ठेवतात. हे निशाण म्हणजे त्रिकोणी ‘पताका’
आकाराचा पांढरा ध्वज असतो. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या गावात आजही अस्तित्वात
आहे. महत्वाच्या प्रसंगी पांढरे निशाण फडकवण्याचा हा परटांचा मान आजही अनेक गावात
सुरु आहे. सायंकाळी होळीसाठीचा माड आणल्यावर त्याच्या शेंड्याला हे पांढरे निशाण
बांधले जाते. माड उभा केला जातो. शिंपणे कार्यक्रमाच्यावेळी माडाचा शेंडा
गावकराकडून तोडला जातो. माडाचा शेंडा आणि शेंड्यावरचा निशाणाचा पांढरा झेंडा गावकर
हे खोतांच्या दारात आणून ठेवतात.
‘हाणून’ घेण्याची
परंपरा
चिपळूण तालुक्यातील याच पालवण-ढोक्रवली गावात शिमगोत्सवात श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी सहाणेवर बसल्यावर नाभिक समाजातील मानाच्या २ व्यक्ती पालखीतील प्रत्येक देवाला दुरून आरसा दाखवतात. देवावर सूर्यकिरणोत्सव घडविला जातो. भद्रेच्या दिवशी (धुलीवंदन) सकाळी १०/११ वाजता गावाचा होम लागतो. होमाला प्रदक्षिणा केल्यावर होमाला प्रज्ज्वलित केले जाते. ग्रामदेवतेची सहाणेवर असलेली पालखी दुपारी ढोक्रवलीला रवाना होते. तत्पूर्वी पालखीसमोर खोतांकडून पुकार देऊन हाणून घेणाऱ्या मानकऱ्यांना बोलावलं जातं. बोलावणं झाल्यावर, देवाच्या पालखीसमोर खोतांनी आणून ठेवलेली तलवार (शस्त्र) आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून अन्य दोघे मानकरी आपल्या उघड्या अंगावर, पोटच्या बाजूला हाणून (स्वतःच्या अंगावर मारून) घेतात. परंपरेनुसार त्यांनी ३ वेळा आपल्या पोटावर तलवार हाणून घेतल्यावर गुरवांकडून, ‘पुरे...पुरे...पुरे !’ म्हटले जाते. मग हाणून घेणं थांबवलं जातं. हाणून घेण्याचं हे काम पूर्वी कोणी अन्य ग्रामस्थ करायचे. त्यांचा वंश संपुष्टात आल्याने त्यांनी हाणून घेण्याचे काम दुसऱ्या मानकऱ्यांकडे सोपवले आहे. तेच सध्या या परंपरेचे मानकरी आहेत.
शिमगोत्सवानंतर श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवेतेची पालखी देवळात पोहोचल्यावर मंदिरातला देव भंडारला जातो. तेव्हा देवतांना परिधान केलेली वस्त्रे ही धुण्यासाठी पासोड्यात (ग्रामदेवतेच्या पालखीवरील शाल किंवा वस्त्र) गुंडाळून याच परीट समाजाच्या महाडिक कुटुंबीयांकडे दिली जातात. त्यांच्याकडून ही वस्त्र धुवून इस्त्री करून (परिटघडी) करून गुरवाच्या स्वाधीन होतात. याकामी परिटांना एक नारळ आणि पासोडा भेटवला जातो. कधीकधी धुण्यासाठी म्हणून आलेल्या देवाच्या कपड्यांना अडकून, भाविकांनी नवसात अर्पण केलेला एखादा सोन्याचा दागिना, चांदीची फुलं सोबत येण्याची संभावना असते. अशावेळी ते दागिने गुरव किंवा गावकरांकडे आणून दिले जात असल्याची आठवण परटांची ही परंपरा सांभाळणाऱ्या विलास महाडिक यांनी सांगितली. हा मान निवळी-पालवण-ढोक्रवली या तिन्ही गावात अस्तित्वात आहे. धुतलेली ही वस्त्रे देवांना पवतं अर्पण (नागपंचमी ते नारळीपोर्णिमा दरम्यान) करण्यावेळी पहिल्यांदा आणि त्यानंतर अनुक्रमे दसरा, दीपावली, देवदिवाळी आणि शिमग्याला परिधान केली जातात. प्रत्येकवेळी कार्यक्रम संपल्यानंतर वस्त्रे पूर्ववत पेटीत ठेवली जातात. ही वस्त्र धुण्याचे काम वर्षातून एकदाच केले जाते. ग्रामदेवतेचे कपडे धुणे, दिवाळीची ओवाळणी, शिमगा पालखीला निशाण लावणं आदी धार्मिक कामं करायची कोणी ? असा प्रश्न निर्माण झाल्यावर चिपळूण तालुक्यातील निवळी-पालवण-ढोक्रवली पंचक्रोशीतील खोतांनी आणि मानकऱ्यांनी दापोली तालुक्यातील दाभोळमधून परीट समाजातील हे ‘महाडिक’ कुटुंब गावाची धार्मिक गरज म्हणून इथे आणून वसविलं आहे. पालवणच्या मंदिरामागील बाजूस, कोष्टेवाडीत या परटांचं जुनं घर होतं. तिथल्या विहिरीजवळ आजही या कुटुंबाचं जोतं पाहायला मिळतं. त्याकाळी सुरु झालेल्या परंपरा अनुषंगिक बदलांसह आजही पंचक्रोशीत कार्यरत आहेत.
प्रस्तुत गावच्या परंपरेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही पालवण मराठवाडी येथे सहाणेजवळ राहणारे १०२ वर्षे वयाचे गावचे ग्रामस्थ धोंडबाराव रामराव सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नयन रघुनाथ सुर्वे, रामचंद्र धोंडबाराव सुर्वे, राजेश महादेव सुर्वे, शंकर विचारे आणि मंदिराचे पुजारी दीपक गोविंद गुरव, ८३ वर्षीय दत्ताराम गोविंद उर्फ आबा महाडिक यांनी जोपासलेली परिटांची परंपरा सांभाळणारे त्यांचे पुत्र विलास आणि विकास महाडिक यांनी आम्हाला याबाबतची माहिती दिली. गावगाड्यात जगणाऱ्या पूर्वीच्या माणसांकडे फार काही नसेलही ! पण त्यांच्याकडे एकमेकांसाठी भरपूर वेळ उपलब्ध होता. आजची आमची पिढी घड्याळाच्या काट्याची गुलाम झाली आहे. याच गुलामीनं गावागावातील प्रथा-परंपरांना हद्दपार केलं आहे. तरीही काही ठिकाणी जुन्या-जाणत्या मोजक्या लोकांनी आपल्या या प्रथा-परंपरा शक्य तेवढ्या जपल्यात. त्यांचे हे काम अत्यंत प्रशंसनीय आहे.
धीरज वाटेकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा