-
राळेगणसिद्धी पर्यावरण संमेलनात उपस्थित प्रतिनिधीशी संवाद साधताना अण्णा हजारे |
आपल्या गावाच्या
ग्रामसभेला खूप महत्त्व आहे. शासकीय अभियान, उपक्रमात
सर्वाधिक लोकसहभाग देणाऱ्या गावाचा
ग्रामविकासातून कायापालट होऊ शकतो. वृक्षतोड आणि ह्रासामुळे पर्यावरण विषयाला जागतिक
महत्त्व आले आहे. "पर्यावरण" विषयामुळे आज संपूर्ण जग चिंताग्रस्त आहे, आंपण प्रयत्न
करून प्रकृतीचे शोषण थांबवायला हवे. शोषण करून होत असलेला वर्तमान विकास शाश्वत
नाही, त्याला सूज आली आहे. मनुष्य जन्म हा सेवेसाठी असून त्याचसाठी त्याचा उपयोग व्हायला
हवा. पुढील ८०-९० वर्षांत समुद्रकाठच्या शहरांना धोके निर्माण होणार आहेत. राळेगणसिद्धीला आमच्या
ग्रामस्थांनी अड़ीच-तीन लाख झाड़े लावून जगवली आहेत. त्यामुळे गावात डॉक्टरांना
फारसे पेशंट मिळत नाहीत. म्हणून आपण ध्येयवादी बनून
‘पर्यावरण संवर्धन’ कार्य केल्यास निश्चित बदल होऊ शकतो. आपले गाव बदलण्याची असे
प्रेरणादायी मार्गदर्शन संमेलनाध्यक्ष अण्णा हजारे यांच्याकडूनच, राज्याच्या २७
जिल्ह्यांमधून आलेल्या ३०० शिक्षक, पर्यावरणप्रेमींना प्रेरणा मिळाल्याने
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात संपन्न झालेले दुसरे राळेगणसिद्धी
पर्यावरण संमेलन निसर्ग संवर्धनाचा विचार रुजविण्यात यशस्वी झाले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या
सहकार्याने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र या संस्थेने राळेगणसिद्धी
येथे हे दोन दिवशीय संमेलन आयोजित केले होते. मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब
मोरे यांनी त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे
मार्गदर्शन आणि प्रेरणेतून वृक्षारोपण
करून स्वत:ला सामाजिक कार्यात गुंतवून घेत ‘पर्यावरण संवर्धन’ कामास प्रारंभ केला
होता. त्यानंतर त्यांनी आजपर्यंत अनेक पर्यावरण जनजागृतीपर उपक्रम राबविले,
वर्तमान संमेलने हा त्यातीलच एक भाग ! संमेलनांसह मंडळाने यापूर्वी राज्यभर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षक
आणि शेतकरी मेळावा’, रोपवाटिका, ‘एक मूल एक झाड’, ‘यशाची वनशेती’, ‘वनश्री बंधारा योजना’,
पर्यावरण कार्यशाळा, राज्यस्तरीय रंगभरण आणि निबंध स्पर्धांचेही यशस्वी आयोजन केले
आहे. कोकणातही उपाध्यक्ष विलास महाडिक, सचिव धीरज वाटेकर यांनी ‘वनश्री’
पुरस्काराने सन्मानित चंदनतज्ज्ञ महेंद्र घागरे यांच्या सहकार्याने पक्षीदिन,
कोकणातील पहिले पश्चिमघाट बिगर मोसमी जंगलपेर अभियान, रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक शिक्षण घेणार्या चिमुकल्या मुला-मुलींच्या माध्यमातून ७५ लाख बीज पेरणी - वृक्ष लागवड अभियान राबविले आहेत.
पूर्वी राळेगणसिद्धी
हे दुष्काळ,
कर्जबाजारीपणा, बेकारीने ग्रासलेले महाराष्ट्रातील एक खेडेगाव
होते. आज राळेगणसिद्धी हे देशातील आदर्श आणि स्वयंपूर्ण खेडेगाव मानले जाते.
मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड, टेकड्यांवर विशिष्ट प्रकारे बांधबंदिस्ती करून वाहून
जाणार्या पाण्याची साठवण, जमिनीची धूप थांबवणे, पावसाचे पाणी थेंबनथेंब साठवून
वापरण्यासाठी इथे मोठे बांधीव कालवे तयार केले आहेत. ह्यामुळे ह्या भागातील
भूजल-पातळी लक्षणीयरीत्या उंचावली आहे. कोरडी पडलेली विहीर अथवा कूपनलिका
(बोअरवेल) गावात नाही. पूर्वी दरवर्षी जेमतेम एक पीक हाती येणाऱ्या इथे आज वर्षाला
दोन कधी तीन पिके घेतली जातात. अपारंपारिक ऊर्जेच्या क्षेत्रातही गावाने मोठी मजल
मारली आहे. अनेक घराघरांत स्वतंत्र बायोगॅस सयंत्रे आहेत. गावभेटीत
संमेलनाला आलेल्या प्रतिनिधींनी पाणलोट क्षेत्रात झालेली कामे, नळपाणी
योजना,
माहिती केंद्र, जलशुद्धीकरण प्रकल्प, मीडिया
सेंटर आदींची पाहणी केली. या प्रतिनिधींशी संवाद साधताना, स्वच्छ आचार, स्वच्छ
विचार, निष्कलंक चरित्र आणि सामाजिक नैतिकता जपल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही, गावच्या
नेतृत्वाने, आपण प्रत्येकाने नि:स्वार्थी भावनेतून काम केले पाहिजे, असा संदेशही
अण्णांनी दिला. मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेंतर्गत कुकडी
कालव्यावर अर्धा किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून
राळेगणसिद्धी व परिसराला वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविणाऱ्या सुमारे ८ कोटी
रुपये खर्चाच्या प्रकल्पाचेही नुकतेच भूमिपूजन झाले आहे. एखाद्या गावाला वीजेसाठी
स्वयंपूर्ण बनवून ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळवून देणारा हा महाराष्ट्रातील
पहिलाच प्रकल्प असणार असून सर्वांनी पुढील वर्षी हा प्रकल्प पाहायला, असेही
अण्णांनी यावेळी नमूद केले. एक मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यातून
रोज सुमारे ५ हजार युनिट वीजनिर्मिती अपेक्षित आहे. राळेगणसिद्धीत जलपुन:र्भरणाचा प्रकल्प
सुरु आहे. कुकडी कालव्यावर वाडेगव्हाण येथे ६५० अश्वशक्तीचे दोन पंप बसवून
उंचावरील राळेगणसिद्धीच्या पठारी भागावर पाणी उचलून ते डोंगरमाथ्यावरील
ओढेनाल्यांमध्ये सोडले जाते आहे. त्यामुळे राळेगणसह परिसरातील गावांतील भूजल
पातळीत वाढ झाली आहे. लोकांचे राहणीमान उंचावले आहे. या उपसा योजनेचे वार्षिक वीजबिल
ग्रामपंचायत, यादवबाबा उपसा जलसिंचन योजना आणि लोकवर्गणीतून अदा केले जाते, या साऱ्याबाबत
प्रतिनिधींनी माहिती घेतली.
संमेलनात, पर्यावरण संवर्धन :
जाणीव आणि कर्तव्य' या विषयाला वाहिलेल्या 'शोधांकन' या विशेषांकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. देशभरात स्वखर्चाने 'चंदन लागवड़
अभियान' राबविणा-या
महेंद्र घागरे यांना मंड़ळातर्फे कोकण विभागात उपाध्यक्ष विलास महाड़िक आणि
सचिव-पर्यटक अभ्यासक धीरज वाटेकर यांच्या सहकार्याने राबविलेल्या विनामूल्य
उपक्रमांसाठी पंचवीस हजार रूपयांचा धनादेश अण्णा हजारे यांच्या हस्ते अदा
करण्यात आला. घागरे यांनी हा धनादेश मंड़ळाच्या कार्यासाठी मोरे यांच्याकड़े दिला. संमेलनात
हवामानतज्ज्ञ प्रा. बी. एन. शिंदे यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
संमेलनात, (१) राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ५० शिक्षकांना,
राळेगणसिद्धी हे गाव ‘रोलमॉंडेल’ म्हणून पुढे ठेवून शासनाच्या योजना सर्वदूर
पोहोचविण्यासाठी, शिवार आणि ५० कोटी वृक्ष लागवडसंबंधी ‘पर्यावरणदूत’ म्हणून मार्गदर्शन करणे, या शिक्षकांनी पुढे आपापल्या
जिल्ह्यात ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून काम करून तळागाळापर्यंत हा विषय पोहोचवावा, असा
ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे, (२) आपल्या
महाराष्ट्रात पारंपरिक वनशेती व्यतिरिक्त स्थानीय पिकांसोबत सांगड घालून
वनशेतीच्या विविध पद्धतींची म्हणजेच कृषी वनशेती पद्धतीची शिफारस अनेक विद्यापीठांनी
केली आहे. वनेतर क्षेत्रावर (पडीक जमीन, शेतीक्षेत्र) वृक्ष लागवडीस प्रोत्साहन मिळावे
म्हणून शेतकरी करीत असलेल्या प्रयत्नाचे क्रेडिट त्याला मिळायला हवे, हे क्रेडिट
केवळ शाब्दिक स्वरूपाचे न राहता त्याला आर्थिक मोबदला मिळण्याची व्यवस्था निर्माण
करून तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ‘कार्बन क्रेडिट’ संकल्पना राबविण्यासाठी यशस्वी
प्रयत्न व्हायला हवेत. (३) ‘पर्यावरण शिक्षण’ ही संकल्पना शालेय स्तरावर विद्यार्थी वर्गाच्या मनावर
बिंबवताना, वर्तमान जीवनाशी निगडित समस्या केंद्रस्थानी ठेवून त्यात तंत्रज्ञान आणि नैसर्गिक पर्यावरणाचा एकत्रितपणे विचार व्हायला हवा. ‘पर्यावरण शिक्षण’ आयुष्यभर चालणारी शिक्षणप्रणाली बनण्यासाठी पूर्णवेळ शिक्षकाचे नियोजन आणि त्याला सुविधा
पुरविणे आवश्यक वाटते. अध्यापन आणि अध्ययनकर्त्यांला पर्यावरणाचा प्रत्यक्ष
अनुभव येण्यासाठीचे नियोजन व अंमलबजावणीची संधी मिळेल,
विद्यार्थी मनात संतुलित दृष्टिकोन निर्माण असे वातावरण शाळेत निर्माण व्हायला असून त्याकरिता पूर्णवेळ
शिक्षकाचे नियोजन करण्याची मागणी, (४) विद्यार्थ्यांना
त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाबद्दल शिक्षण देण्याचे
काम सध्या ‘राष्ट्रीय हरित सेना आणि एन.
एस. एस.’च्या माध्यमातून चालते. जैविक परिसंस्था,
त्यांचे परस्परांवरील अवलंबित्व व त्याच्या
अस्तित्वाची गरज यांचे शिक्षण, प्रत्यक्ष भेटी व
प्रात्यक्षिकांद्वारे देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयक समस्यांबाबत शास्त्रीय चौकस बुद्धी निर्माण करून
पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करण्यामध्ये त्यांचा सहभाग प्राप्त करून घेता यावा या
करिता भरीव आर्थिक तरतूदीची मागणी करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
हे संमेलन मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांच्या सक्रीय
मार्गदर्शनाखाली प्रमोद मोरे, विलास महाडीक, धीरज वाटेकर, प्रमोद काकडे, प्रा. लालासाहेब गावडे, रामदास ठाकर, बापूराव खामकर, बाळासाहेब जठार, डॉ. अमोल
बागूल, सीताराम कदम, तुकाराम
अडसूळ, वैभव मोरे, गोरख शिंदे, लतीफ राजे, विजयकुमार बेबडे, प्रा. नागेश शेळके,
लक्ष्मण साळुंखे, पीटर रणसिंग, व्यंकट लाडके, वनश्री मोरे, सौ.
कावेरी मोरे, सौ.
मनिषा लहारे, उल्का कुरणे, आदि सदस्यांच्या खंबीर
पाठबळावर यशस्वी झाले.