मूळचे संगमेश्वर तालुक्यातील माखजनच्या नातू घराण्यातील, मार्गताम्हाने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तात्यांचा गुहागरचे प्रसिद्ध उद्योजक बापूजी खरे यांच्या कन्या शालिनी (विजया नातू) यांच्याशी मे १९५६ रोजी विवाह झाला. विवाहानंतर महिन्याभरात विजया वहिनी शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाल्या. लग्नानंतरची एक-दोन नव्हे सलग सात वर्षे या जोडप्याने, तात्या ताम्हान्यात आणि विजया वहिनी पुण्यात अशी काढली. याच कालखंडात, १९५९ मध्ये स्व. आक्का यांचे नातू कुटुंबियांत आगमन झालेले. गुहागर तालुक्यातील जामसूतच्या सीताराम (बाबा) साळवी यांच्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या २०-२२ वर्षाच्या थोरल्या लेकीला, विठाबाईं यांना सहा महिन्यात वैधव्य आलेलं. दैवाचा असा घाला पडेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. विठाबाई माहेरी परतण्यापूर्वी ‘मला माझ्या पायावर उभी करा’ म्हणत सासरघरी राहिल्या. मात्र वर्ष व्हायला आलं तरी काही जमून आलेलं नव्हतं. विठाबाई माहेरी वडिलांकडे परतल्या होत्या. माहेरी त्यांना ‘आक्का’ म्हणत. आक्काचं शिक्षण नसल्यात जमा होतं. नाही म्हणायला बालपणी त्यांना पालशेतच्या दत्ताची (श्रीदत्तमंदिर) ओढ लागलेली होती. वेळ मिळेल तेव्हा त्या दत्ताकडे माथा टेकायला जायच्या. त्यांच्या माहेरच्या घरातही पाचेक भावंडात आक्का सर्वात मोठ्या होत्या. आई लहानपणी देवाघरी गेलेली. कोणाचा आधार नव्हता. उत्पन्नाचे किरकोळ साधन असलेली घरची शेती वडील करायचे. आक्का घरी परतल्यापासून ‘आपण आहोत तोवर काळजी नाय ! पण नंतर काय व्हयाचं ?’ याची चिंता साळवींना होतीच. साळवी नकळत रोज पांडूरंगाला हात जोडीत. मनोमन विनवित. कधीकधी आक्का वडिलांना म्हणायच्या, ‘मला माझ्या पायावर उभी करा ! माझ्या हुशारीचा उपयोग व्हायला हवा. असं मला वाटतं.’ बाबा साळवींना हे पटायचं. एके दिवशी पांडुरंगाने म्हणा किंवा दत्तगुरूंनी म्हणा या बाप-लेकीचं ऐकलं.
तात्या
नातू तेव्हा बुधवारी वेळंबला पेशंट तपासणीच्या वाराला जायचे. एकदा तिथल्या शंकरराव
ओकांजवळ ते बोलले होते, ‘सौ. विजयाबाईंची सुट्टी
संपून शिक्षणाची वेळ जवळ येत आहे. पुण्याला घरात हिच्या सोबत राहील अशी बाई पाहिजे
आहे. बघा कोणी भेटली तर ?’ ओकांनी ते लक्षात ठेवले. कधीकधी खरेदीसाठी
बाबा साळवी ओकांच्या दुकानात यायचे. जुना परीचय होता. ओकांनी तात्यांचं म्हणणं
लक्षात ठेवून साळवींच्या कानावर घातलं होतं. ‘... पण असं जमंल का ?’ या विचारात असलेले बाबा साळवी ना निर्णयाप्रत आलेले ना लेकीला काही बोलू
शकलेले.
एके
सायंकाळी मार्गताम्हान्याला दिलेल्या माहेरवाशीण नीराबाई ‘आक्का,
आक्का गं !’ अशी हाक मारीत आल्या. आल्या त्या थेट स्वयंपाकघरात
शिरल्या. ‘का आलीस ?’ असं आक्काने विचारल्यावर नीरा बोलू
लागल्या, ‘अग ते मार्गताम्हान्याचे डॉक्टर नाहीत का तात्या
नातू ? त्यांची बायको गरोदर हाय. त्यांना कायम राहू शकेल अशी
घरकामासाठी बाई पाहिजे. राहाशील त्यांच्याकडे ?’
‘आगंऽऽऽ,
पण ते बामण नि आपण मराठा. त्यांच्या घरात राहून कसलं काम करणार ग मी
!’ नाही म्हटलं तरी सामाजिक स्तरावर अनेक विषयांना सोबत घेऊन चालणारा तो काळ होता.
नशीबाने अगोदर ठोकरलेलं असल्यानं आक्कांच्या मनात प्रश्न आला.
‘आगं,
हे बघ ! त्यांना घरात राहून काम करण्यासाठी बाई माणूस पाहिजे. काम
काय ? पगार काय ? हे सारं समक्ष
विचारू. पटलं तर राहा. नाय तर नको. बाकी तुझ्या बाबांना सांग हो कसं काय ते तूच !’
आक्कांच्या मनात भविष्याची पेरणी करून नीरा निघून गेल्या. निराच्या सांगण्याने असंख्य
प्रश्नांच्या भोवती फिरण्यात आक्कांची रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला.
आक्का
बाबांना म्हणाल्या, ‘बाबा ! ताम्हान्याचे डॉक्टर हायत ना तात्या,
त्यांच्याकडे एक नोकरबाई पाहिजे. तुम्हाला पटत असेल तर विचाराल
माझ्यासाठी ? ते डॉक्टर चांगले आहेत. अनेकांसाठी
रात्री-बेरात्री धावतात. गोरगरीबांची जाण आहे त्यांना. एकट्या माझाच विचार करायचा
झाला तर मीही गरजू आहे ना?’
बाबा
म्हणाले,
‘होय बाय! वेळंबचे ओक पण असंच म्हणताहेत! पण तू म्हणतेस म्हणून,
अन्यथा माझा अजून तसा काही विचार नाही. तू असं कर. तात्यासाहेबांकडे
सांगावा दे नीराकरवीच! तुझी-माझी वळख द्यायला सांग नीट. होकार आला तर जाऊ आपण
भेटायला.’ आक्कांना चटकन मिळालेला बाबांचा सकारात्मक प्रतिसाद अनपेक्षित होता.
बाबा
पुन्हा म्हणाले, ‘आक्का! एरवी कुणाच्या तरी घरी तू रोजगाराला जावंस हे नसतं पटलं
मनाला! पण तात्या नातू म्हणजे देवमाणूस ग! त्यांच्या घरी कामाची संधी मिळणं हे
भाग्याचं आहे तुझ्या! या माणसाचे जोडे जरी उचलायला लागले तरी लोकं तुला भाग्यवानच
म्हणतील. एक भाकरीची आशा नाही करायची. चवथ भाकरी टिकवून ठेवायची. चोरी-मारी,
लबाडी करायची नाही. सच्च्यासारखं वागायचं. पगार-बिगार काही नाही
मिळाला तरी त्यांच्या घरचं काम घे. ते समजून देतील! तुझं भलं करतील. त्यांच्या
रूपाने देवच तुझ्या मदतीला आलाय बघ.’ आपल्या वडिलांचे हे शब्द काळजात खोलवर जपून ठेवत
आक्कांनी ६७ वर्षे निरलस सेवेत घालवली.
‘आपण काही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आपले वाईट होणार नाही’ या वाक्यावर विलक्षण श्रद्धा राहिलेल्या आक्कांचं नशिबानं आकाश हिरावून घेतलं, तेव्हा डॉ. तात्यासाहेब नातू आणि श्रीमती डॉ. विजया नातू यांच्यासारख्या सुसंस्कृत कुटुंबाने त्यांना आपलं मानलं. याच पाठबळावर रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असे 'माणुसकीचे नाते' आक्कांनी गेली ६७ वर्षे जपले. या प्रदीर्घ प्रवासात आक्कांनी स्वतःला विसरून याच कुटुंबाला आपले मानले. नातूंच्या तीन पिढ्यांतील साऱ्याच कुटुंबीयांनीही त्यांना कधीही 'परके' मानले नाही. नातू कुटुंबात त्यांना जीवनभर निखळ प्रेम आणि आदर मिळाला. म्हणूनच अंगभूत गुणांच्या बळावर आक्का केवळ स्त्रीचे आयुष्य न जगता निरलस सेवेच्या बळावर त्यागाची आणि त्याला मिळालेल्या सन्मानाची यशोगाथा बनून राहिल्या. स्व. आक्का यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
धीरज वाटेकर, चिपळूण
%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%A4%20%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87.jpeg)