रविवार, २१ जून, २०२६

'राखणदार पदयात्रा' निमित्ताने...

कोकणच्या जल, जंगल आणि संस्कृती रक्षणाचा नवा एल्गार


        स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेला कोकण प्रांत सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. अनिर्बंध रिअल इस्टेट विकास, खाणकाम (मायनिंग) आणि विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील तरुण आणि पर्यावरणप्रेमींना जागे करण्यासाठी 'कोकणी रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे आणि त्यांच्या 'राखणदार टीम'ने नुकतीच मृग नक्षत्रात (जून २०२६) एका ऐतिहासिक 'राखणदार पदयात्रेची' सुरुवात केली. या यात्रेचा पहिला टप्पा कणकुंबी ते बांदा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु आहे. ही पदयात्रा केवळ एक आंदोलन नसून कोकणची संस्कृती आणि निसर्ग वाचवण्याची जनचळवळ बनण्याची आवश्यकता आहे.


             कोकणी संस्कृतीत 'राखणदार' म्हणजे गावाचा, वनाचा किंवा स्थानाचा अदृश्य रक्षक देव जो संकटसमयी धावून येतो. आजच्या काळात जेव्हा कोकणची जमीन परप्रांतीय आणि मोठ्या कंपन्यांच्या विळख्यात सापडत आहे, तेव्हा "कोकणचे खरे राखणदार हे येथील स्थानिक लोकच आहेत" हा विचार घेऊन ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या संवेदनशील पश्चिम घाट (Western Ghats) क्षेत्रात या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा पहिला टप्पा अतिशय दुर्गम आणि महत्त्वपूर्ण जलस्रोतांच्या भागातून आखण्यात आला. यात्रेची सुरुवात गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून झाली. हा भाग महादयी नदी आणि इतर अनेक जलस्रोतांचे उगमस्थान आहे. या राखणदार पदयात्रेची सुरुवात केरी गावातील आजोबांच्या तळीतील पवित्र जल, तीर्थ म्हणून सोबत घेत, कणकुंबी मंदिरात नारळ ठेऊन करून केली गेली. या प्रवासासाठी गावातील तरुण मंडळी, शालेय विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्या सहभागामुळे उद्याच्या पिढीकडून निसर्गसंवर्धनाची आशा अधिक दृढ झाली. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर आपल्या जल, जंगल आणि जमिनीबद्दल संवेदनशील असलेल्या प्रत्येक मनाचा एक हुंकार आहे. आपल्या मातीचे, देवराईंचे आणि आपल्या अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या राखणदाराचे रक्षण करण्याचा हा एक सामूहिक संकल्प आहे. जे आपले आहे, जे आपल्या पूर्वजांनी जपले आहे, ते जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास आम्ही तयार आहोत.


               ही यात्रा केरी, कारापूर, आणि दोडामार्ग सीमावर्ती भागातून पुढे सरकली. तिथून भेडशी, सातली आणि कुडसे गावांना भेटी देत थेट तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश केला. शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि विळवडे मार्गे जात सोनुर्ली येथील ऐतिहासिक श्री देवी माऊली मंदिरामध्ये या चार दिवसीय यात्रेची सांगता झाली. कोकणातील वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांचे पाणी विषारी होत चालले आहे (उदा. लोटे एमआयडीसीमुळे वाशिष्टी नदीची झालेली दुरवस्था). यामुळे मासेमारी आणि स्थानिक लोकांचे रोजगार धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ही पदयात्रा नद्या, पाण्याचे झरे आणि जंगले वाचवण्यासाठी स्थानिकांना संघटित करत आहे. कोकणात हजारो वर्षांपासून 'देवराई' (देवांसाठी सोडलेले पवित्र जंगल) जपण्याची परंपरा आहे. या देवराया म्हणजेच नैसर्गिक जैवविविधतेचे केंद्र आहेत. या यात्रेदरम्यान तरुण पिढीला या निसर्गपूजक परंपरांची आणि सातेरी संस्कृतीची जाणीव करून दिली जात आहे. कोकणच्या पर्यावरणाला आणि पारंपरिक उपजीविकेला नख लावणाऱ्या खनिज प्रकल्पांना (मायनिंग) आणि अनिर्बंध रिअल इस्टेटच्या नावाखाली होणाऱ्या जमिनींच्या बळकावणीला विरोध करणे हा या यात्रेचा मुख्य अजेंडा आहे. या पदयात्रेत गोव्यातील 'Enough is Enough' आणि 'Goyant Kollso Naka' पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते फ्रान्सिस कोएल्हो, पर्यावरण अभ्यासक सत्यजीत चव्हाण, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव छायाचित्रकार सोमेश काणेकर, दिग्दर्शक विनायक कोळवणकर आदींसह तिन्ही राज्यांतील स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'रानमाणूस' प्रसाद गावडे यांच्या साध्या आणि प्रभावी संवादशैलीमुळे गावोगावी लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. "आम्ही निसर्गाचा केवळ वापर करत नाही, तर आम्ही निसर्गाचे अपत्य आहोत," हा या चळवळीचा मूळ मंत्र आहे.


            पूर्वी कोकणात, गावातला कुणीही अतिरेक करू लागला की त्याला भीती कुठल्या गोष्टीची घातली जायची? तर गावच्या मुंजोबाची, ग्रामदेवाची किंवा देवीची किंवा वनदेवाची. कितीही भाबडेपणा असला तरी तो एक श्रद्धेचा आणि सामाजीक सुरक्षितता राखण्याचा एक भाग होता. आता तीच वेळ आलेली आहे. राज्य वा केंद्र सरकार पर्यावरण आणि निसर्गाबाबत भयंकर विचार करताना दिसत आहेत. गावच्या लोकांची, निसर्गाची इथल्या प्रकृतीची त्यांना अडचण होऊ लागलीय असे वाटावे अशी स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली सर्वत्र मिळणाऱ्या टक्केवारीने देश, देशाची जमीन विकून ढेकरा द्यायची हाव ओसंडून वाहू लागलीय. कोकणात जे लोक जीव तोडून इथल्या जमिनीला, लोकांना, पर्यावरणाला वाचवू पाहतायत. विकास शाश्वत आणि निसर्गाला हानी न पोहचवता होऊ शकतो हे दाखवतायत दुर्दैवाने त्यांना मात्र इथला मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियाही जवळपास ठेंगा दाखवत आहे. ‘राखणदार’ नावाने सामान्य लोकांच्या भावनेला हाताशी धरून एका उदात्त कामासाठी ही यात्रा सुरु आहे. पर्यावरण वाचवणे, पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प हाणून पाडणे, निर्णयप्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा निर्णय अंतिम असावा, शाश्वत विकासाबद्दल जनजागृती करणे ह्या आणि अश्या अनेक गोष्टी प्रसाद गावडे आणि मंडळी कित्येक वर्षे करताहेत. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगातही कोकणातील राखणदारांची संकल्पना टिकून आहे. शहरात राहणारे कोकणातील लोकही आपल्या मूळ गावाशी आणि वाडीच्या राखणदाराशी भावनिकरित्या जोडलेले असतात. सणावाराला किंवा महत्त्वाच्या कामाला ते आवर्जून आपल्या वाडीतील राखणदाराचं स्मरण करतात. तरीही, काही ठिकाणी या श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली टीकेचे धनी होतात. पण कोकणातील लोकांसाठी हा केवळ अंधविश्वास नसून, तो त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा, निसर्गाशी असलेल्या त्यांच्या आत्मिक नात्याचा आणि पूर्वजांबद्दलच्या आदराचा एक भाग आहे. कोकणातील राखणदार ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती कोकणच्या मातीतील लोकांच्या श्रद्धेचं आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना आधार देते, भयमुक्त ठेवते आणि एकत्र बांधून ठेवते.


            कोकणाच्या मातीत 'राखणदार' नावाची एक अदृश्य पण तितकीच शक्तिशाली संकल्पना खोलवर रुजलेली आहे. 'राखणदार' म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, राखणदार म्हणजे आपल्या घराची, वाडीची, शेतीची, अगदी संपूर्ण गावाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती किंवा ग्रामदेवता. ते अनेकदा आपल्या पूर्वजांचे आत्मे किंवा विशिष्ट नैसर्गिक शक्तींशी जोडलेले असतात. कोकणातील प्रत्येक वाडी किंवा घरामागे एक संरक्षक शक्ती उभी असते, असे मानले जाते आणि हीच शक्ती 'राखणदार' म्हणून ओळखली जाते. या राखणदारांचं कोणतंही विशिष्ट रूप नसतं. ते कधी झाडाच्या रूपात (उदा. पवित्र वड, पिंपळ, आंबा), कधी दगडाच्या रूपात, तर कधी केवळ एका अदृश्य अस्तित्वाच्या रूपात असतात. काही ठिकाणी त्यांना 'वनदेवता', 'क्षेत्रपाल' किंवा 'गावदेवी' च्या रूपातही पूजले जाते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या क्षेत्राचं दुष्ट शक्तींपासून, वाईट नजरेपासून आणि संकटांपासून रक्षण करणं. घरात शांतता, समृद्धी आणि आरोग्य राखण्यासाठी ते मदत करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. कोकणातील लोक या राखणदारांवर निस्सीम श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्याशी संबंधित अनेक परंपरा आजही जपल्या जातात. जेव्हा एखाद्या घरात नवीन कार्य सुरू होतं, नवजात बाळ जन्माला येतं, किंवा एखादं संकट दूर होतं, तेव्हा राखणदारांना नारळ किंवा कोंबड्याचा नैवेद्य दाखवला जातो. नवस फेडताना अनेकदा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आजही काही ठिकाणी पाळली जाते. घरातून बाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना राखणदारांना मनोमन प्रार्थना करून आशीर्वाद मागितले जातात. "राखणदार पाठीशी राहा!" असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. राखणदारांच्या काही अदृश्य नियमांचं पालन न केल्यास वाईट गोष्टी घडतात अशीही एक भीती काही लोकांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा असतो. कोकणातील अनेक वाड्यांमध्ये राखणदारांसाठी विशिष्ट जागा किंवा लहानशी देवडी असते. इथे नियमितपणे दिवे लावले जातात, धूप जाळला जातो आणि स्वच्छता राखली जाते.


            राखणदार पदयात्रा ही कोकणातील जंगल, पाणी, जैवविविधता, पारंपरिक देवऱ्या आणि स्थानिक संस्कृती यांच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली जनजागृती यात्रा आहे. या यात्रेचा उद्देश गावागावांतील लोकांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटवून देणे आणि स्थानिक समुदायांना निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी करणे हा आहे. या पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला गेला. गावातील पारंपरिक सण, देवऱ्या, जलस्रोत, जंगलांशी निगडित श्रद्धा, जैवविविधता आणि पर्यावरणीय आव्हाने यांची माहिती संकलित केली. तसेच स्थानिक लोकांच्या अनुभवांमधून निसर्गरक्षणाच्या पारंपरिक पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. राखणदार पदयात्रा ही केवळ चालण्याची यात्रा नसून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे. जंगल, पाणी, माती आणि जैवविविधता यांचे संरक्षण हे आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून दिला जातो. “आपल्या भूमी, पाणी, जंगल आणि संस्कृतीचे खरे राखणदार आपणच आहोत” ही भावना जागृत करून स्थानिक समाजाच्या सहभागातून शाश्वत भविष्यासाठी एक व्यापक चळवळ उभारणे हे राखणदार पदयात्रेचे प्रमुख ध्येय आहे.


            कोकणचा विकास पर्यावरणाचा नाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून होत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. जर आजचा कोकणी माणूस एकत्र आला नाही, तर येणारा काळ या भूमीसाठी कठीण असेल. कोकणी जनतेला याबाबत पुरेसे अवगत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून, ही राखणदार पदयात्रा प्रत्येक कोकणवासीयाला स्वतःच्या मातीचा 'राखणदार' बनण्याचे आवाहन करते आहे.

dheerajwatekar@gmail.com

मंगळवार, ३१ मार्च, २०२६

एका निरलस सेवेची गाथा

 श्रीमती विठाबाई श्रीपत भोसले (आक्का) यांचे नुकतेच (२७ मार्च २०२६) घोणसरे येथील ‘विजयश्री’ हॉस्पिटल मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी दु:खद निधन झाले. जीवन कधी कधी इतकी कठोर परीक्षा घेते की, त्याच्या वर्णनासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांचे आयुष्य अतिशय साधे होते. पण त्यातील निग्रह असामान्य होता. विवाहानंतर अवघ्या सहा महिन्यात वैधव्याचे दु:ख ओढवूनही त्यांनी हार मानली नाही. आपल्या दु:खाला त्यांनी सामर्थ्यात बदलले. कृतज्ञ तपस्येच्या प्रवासी ठरलेल्या आक्का यांचे अंतिम संस्कार मार्गताम्हाने येथे सख्खे भाऊ, बहिण, भाचा-भाची आदींच्या उपस्थितीत पार पडले. नातू कुटुंबात त्यांनी आपल्या आयुष्याची तब्बल ६७ वर्षे, केवळ सेवा म्हणून नव्हे तर निष्ठेने आणि ममत्वाने वेचली. कोणा सर्वसामान्यांप्रमाणेच साधेसे जीवन जगणाऱ्या, सर्वार्थाने वेगळे जीवन जगलेल्या आणि निरलस सेवेची गाथा बनून राहिलेल्या आक्का यांच्या रूपाने एका स्त्रीच्या कर्तृत्वाला वाहिलेली ही शब्द श्रद्धांजली!

मूळचे संगमेश्वर तालुक्यातील माखजनच्या नातू घराण्यातील, मार्गताम्हाने येथे कार्यरत असलेल्या डॉक्टर तात्यांचा गुहागरचे प्रसिद्ध उद्योजक बापूजी खरे यांच्या कन्या शालिनी (विजया नातू) यांच्याशी मे १९५६ रोजी विवाह झाला. विवाहानंतर महिन्याभरात विजया वहिनी शिक्षणासाठी पुण्याला रवाना झाल्या. लग्नानंतरची एक-दोन नव्हे सलग सात वर्षे या जोडप्याने, तात्या ताम्हान्यात आणि विजया वहिनी पुण्यात अशी काढली. याच कालखंडात, १९५९ मध्ये स्व. आक्का यांचे नातू कुटुंबियांत आगमन झालेले. गुहागर तालुक्यातील जामसूतच्या सीताराम (बाबा) साळवी यांच्या वर्षभरापूर्वी लग्न झालेल्या २०-२२ वर्षाच्या थोरल्या लेकीला, विठाबाईं यांना सहा महिन्यात वैधव्य आलेलं. दैवाचा असा घाला पडेल असं स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. विठाबाई माहेरी परतण्यापूर्वी ‘मला माझ्या पायावर उभी करा’ म्हणत सासरघरी राहिल्या. मात्र वर्ष व्हायला आलं तरी काही जमून आलेलं नव्हतं. विठाबाई माहेरी वडिलांकडे परतल्या होत्या. माहेरी त्यांना ‘आक्का’ म्हणत. आक्काचं शिक्षण नसल्यात जमा होतं. नाही म्हणायला बालपणी त्यांना पालशेतच्या दत्ताची (श्रीदत्तमंदिर) ओढ लागलेली होती. वेळ मिळेल तेव्हा त्या दत्ताकडे माथा टेकायला जायच्या. त्यांच्या माहेरच्या घरातही पाचेक भावंडात आक्का सर्वात मोठ्या होत्या. आई लहानपणी देवाघरी गेलेली. कोणाचा आधार नव्हता. उत्पन्नाचे किरकोळ साधन असलेली घरची शेती वडील करायचे. आक्का घरी परतल्यापासून ‘आपण आहोत तोवर काळजी नाय ! पण नंतर काय व्हयाचं ?’ याची चिंता साळवींना होतीच. साळवी नकळत रोज पांडूरंगाला हात जोडीत. मनोमन विनवित. कधीकधी आक्का वडिलांना म्हणायच्या, ‘मला माझ्या पायावर उभी करा ! माझ्या हुशारीचा उपयोग व्हायला हवा. असं मला वाटतं.’ बाबा साळवींना हे पटायचं. एके दिवशी पांडुरंगाने म्हणा किंवा दत्तगुरूंनी म्हणा या बाप-लेकीचं ऐकलं.

तात्या नातू तेव्हा बुधवारी वेळंबला पेशंट तपासणीच्या वाराला जायचे. एकदा तिथल्या शंकरराव ओकांजवळ ते बोलले होते, ‘सौ. विजयाबाईंची सुट्टी संपून शिक्षणाची वेळ जवळ येत आहे. पुण्याला घरात हिच्या सोबत राहील अशी बाई पाहिजे आहे. बघा कोणी भेटली तर ?’ ओकांनी ते लक्षात ठेवले. कधीकधी खरेदीसाठी बाबा साळवी ओकांच्या दुकानात यायचे. जुना परीचय होता. ओकांनी तात्यांचं म्हणणं लक्षात ठेवून साळवींच्या कानावर घातलं होतं. ‘... पण असं जमंल का ?’ या विचारात असलेले बाबा साळवी ना निर्णयाप्रत आलेले ना लेकीला काही बोलू शकलेले.

एके सायंकाळी मार्गताम्हान्याला दिलेल्या माहेरवाशीण नीराबाई ‘आक्का, आक्का गं !’ अशी हाक मारीत आल्या. आल्या त्या थेट स्वयंपाकघरात शिरल्या. ‘का आलीस ?’ असं आक्काने विचारल्यावर नीरा बोलू लागल्या, ‘अग ते मार्गताम्हान्याचे डॉक्टर नाहीत का तात्या नातू ? त्यांची बायको गरोदर हाय. त्यांना कायम राहू शकेल अशी घरकामासाठी बाई पाहिजे. राहाशील त्यांच्याकडे ?’

‘आगंऽऽऽ, पण ते बामण नि आपण मराठा. त्यांच्या घरात राहून कसलं काम करणार ग मी !’ नाही म्हटलं तरी सामाजिक स्तरावर अनेक विषयांना सोबत घेऊन चालणारा तो काळ होता. नशीबाने अगोदर ठोकरलेलं असल्यानं आक्कांच्या मनात प्रश्न आला.

‘आगं, हे बघ ! त्यांना घरात राहून काम करण्यासाठी बाई माणूस पाहिजे. काम काय ? पगार काय ? हे सारं समक्ष विचारू. पटलं तर राहा. नाय तर नको. बाकी तुझ्या बाबांना सांग हो कसं काय ते तूच !’ आक्कांच्या मनात भविष्याची पेरणी करून नीरा निघून गेल्या. निराच्या सांगण्याने असंख्य प्रश्नांच्या भोवती फिरण्यात आक्कांची रात्र निघून गेली. दुसरा दिवस उजाडला.

आक्का बाबांना म्हणाल्या, ‘बाबा ! ताम्हान्याचे डॉक्टर हायत ना तात्या, त्यांच्याकडे एक नोकरबाई पाहिजे. तुम्हाला पटत असेल तर विचाराल माझ्यासाठी ? ते डॉक्टर चांगले आहेत. अनेकांसाठी रात्री-बेरात्री धावतात. गोरगरीबांची जाण आहे त्यांना. एकट्या माझाच विचार करायचा झाला तर मीही गरजू आहे ना?’

बाबा म्हणाले, ‘होय बाय! वेळंबचे ओक पण असंच म्हणताहेत! पण तू म्हणतेस म्हणून, अन्यथा माझा अजून तसा काही विचार नाही. तू असं कर. तात्यासाहेबांकडे सांगावा दे नीराकरवीच! तुझी-माझी वळख द्यायला सांग नीट. होकार आला तर जाऊ आपण भेटायला.’ आक्कांना चटकन मिळालेला बाबांचा सकारात्मक प्रतिसाद अनपेक्षित होता.

बाबा पुन्हा म्हणाले, ‘आक्का! एरवी कुणाच्या तरी घरी तू रोजगाराला जावंस हे नसतं पटलं मनाला! पण तात्या नातू म्हणजे देवमाणूस ग! त्यांच्या घरी कामाची संधी मिळणं हे भाग्याचं आहे तुझ्या! या माणसाचे जोडे जरी उचलायला लागले तरी लोकं तुला भाग्यवानच म्हणतील. एक भाकरीची आशा नाही करायची. चवथ भाकरी टिकवून ठेवायची. चोरी-मारी, लबाडी करायची नाही. सच्च्यासारखं वागायचं. पगार-बिगार काही नाही मिळाला तरी त्यांच्या घरचं काम घे. ते समजून देतील! तुझं भलं करतील. त्यांच्या रूपाने देवच तुझ्या मदतीला आलाय बघ.’ आपल्या वडिलांचे हे शब्द काळजात खोलवर जपून ठेवत आक्कांनी ६७ वर्षे निरलस सेवेत घालवली.

 लहान वयात नियतीचा क्रूर आघात सोसलेल्या आक्का यांनी अंगभूत गुणांच्या बळावर आपले आणि संपर्कात आलेल्या साऱ्यांचे जीवन अधिक प्रकाशमान होण्यास हातभार लावला. नातू घराण्याचा आधारवड बनून त्यांनी आपली सेवा सार्थकी लावली. स्व. आक्कांचा जन्म स्वातंत्र्यापूर्वीचा, १ जानेवारी १९३८चा! वयात आल्यावर विवाहाची स्वप्ने रंगवताना काळाने त्यांच्या वैवाहिक जीवनावर घाला घातलेला. सुखाचे दिवस पाहण्यापूर्वी आणि मनातील सारे संसारात उतरवण्यापूर्वीच पदरात वैधव्य आलेले. अशा स्थितीत समाजाच्या दृष्टीने कदाचित त्या 'दुर्दैवी' ठरल्या असत्या. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. नियतीने त्यांच्या वाट्याला मार्गताम्हानेतील सुसंस्कृत डॉ. तात्यासाहेब नातू कुटुंबियांचा सहवास आणला. आपली प्रापंचिक आवश्यकता म्हणून का असेना, परंतु त्या काळात अशा मुलीला स्वीकारणे, तिला सन्मानाने वागवणे, हे तितके सोपे नव्हते. मात्र नातूंच्या सुसंस्कृत कुटुंबियांनी आक्क्कांना केवळ आपल्या घरात आश्रयच दिला नाही तर त्यांना आपले मानले. आपल्या ६७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी केवळ घरातील कामे केली असे नाही तर त्या घराचा 'कणा' बनून राहिल्या. ते घर त्यांच्यासाठी जणू 'तीर्थक्षेत्र' बनून राहिले होते. विंचूदंशावरील लसीचे प्रवर्तक आमदार तात्यासाहेब नातू यांचे ‘जनी जनार्दन’ हे चरित्र लेखन करताना आम्ही भेटलो, तेव्हा निवृत्तीचे जीवन जगणाऱ्या आक्कांच्या संवादाची अनुभूतीही अशीच राहिली. आक्कांची सेवा ही केवळ ड्युटी नव्हती, ती 'भक्ती' होती. संपर्कात आलेल्या अनेकानेक लहानांचे मोठेपण आणि थोरांचे वृद्धापकाळ त्यांनी जवळून जवळून पाहिले, अनुभवले आणि सावरलेहि! अगदी १९९२ साली स्व. तात्यांचे निधन झाले तेव्हाही पहिला आक्रोश करणाऱ्या त्याच होत्या. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील उणीवा त्यांनी इतरांच्या सुखात शोधल्या. स्वतःचे दुःख फारकाळ कुरवाळत न बसता, नातू यांच्या घरच्या सेवेला त्यांनी आपले ध्येय मानले.  श्रीमती विजया वहिनींना मोठ्या बहिणीसमान असलेल्या आक्कांनी आपली लेकरं समजून तात्या आणि वहिनींच्या मुला-नातवंडांवर माया केली. त्यांचा सांभाळ केला. पैसे घेऊन सांभाळणं यात खरंतर काही विशेष नाही. पण आपलं समजून करत राहाणं आक्कांनी जमवलं. अणीबाणीचा कालखंड असेल किंवा तात्यांच्या मृत्यूचा क्षण अशा असंख्य कठीण प्रसंगी आक्का कुटुंबियांसोबत उभ्या होत्या. नातू कुटुंबियांतील मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने आक्का काहीकाळ पुण्यातही वास्तव्याला होत्या. पुण्यासह मार्गताम्हन्यातील वास्तव्यातील, आक्कांच्या हातच्या भाज्या, नाश्त्यातील धिरड्या, मऊ भात आणि गरमागरम तांदळाच्या भाकरीची चव आता अनेकांना आठवत राहील.

आपण काही कुणाचे वाईट केले नाही त्यामुळे आपले वाईट होणार नाही’ या वाक्यावर विलक्षण श्रद्धा राहिलेल्या आक्कांचं नशिबानं आकाश हिरावून घेतलं, तेव्हा डॉ. तात्यासाहेब नातू आणि श्रीमती डॉ. विजया नातू यांच्यासारख्या सुसंस्कृत कुटुंबाने त्यांना आपलं मानलं. याच पाठबळावर रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असे 'माणुसकीचे नाते' आक्कांनी गेली ६७ वर्षे जपले. या प्रदीर्घ प्रवासात आक्कांनी स्वतःला विसरून याच कुटुंबाला आपले मानले. नातूंच्या तीन पिढ्यांतील साऱ्याच कुटुंबीयांनीही त्यांना कधीही 'परके' मानले नाही. नातू कुटुंबात त्यांना जीवनभर निखळ प्रेम आणि आदर मिळाला. म्हणूनच अंगभूत गुणांच्या बळावर आक्का केवळ स्त्रीचे आयुष्य न जगता निरलस सेवेच्या बळावर त्यागाची आणि त्याला मिळालेल्या सन्मानाची यशोगाथा बनून राहिल्या. स्व. आक्का यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

धीरज वाटेकर, चिपळूण

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

समस्यापूर्ती ‘गणपत वाणी’ काव्यलेखन स्पर्धा

चिपळूण :: महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूण आणि कोकण भराठी साहित्य परिषद, शाखा चिपळूण आयोजित आणि ‘आपलं चिपळूण’ सहआयोजक असलेल्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय समस्यापूर्ती 'गणपत वाणी' काव्यलेखन स्पर्धेचे नुकतेच दिमाखदार पारितोषिक वितरण संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एअरमार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कंसाई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव, ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत मोदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. अप्पा जाधव यांच्या प्रतिमीचे पूजन-पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत भागवत यांनी बोलताना, शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयालाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  शुभेच्छा दिल्या. ‘गणपत वाणी’ स्पर्धेच्या आयोजकांना त्यांनी कल्पनेसाठी धन्यवाद दिले. यानिमित्ताने चिपळूणचे नाव जगभर पोहोचल्याचे ते म्हणाले. त्यांनी ‘गणपत वाणी’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेसंदर्भात बोलताना वाचनात आलेल्या ‘फ्यूचर टॉक : कॉन्वर्सेशन्स अबाउट टुमारो विद टुडेज़ मोस्ट प्रोवोकेटिव पर्सनैलिटीज़’ या पुस्तकाचा संदर्भ दिला.

पारितोषिक वितरण हस्ते - एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत 



स्व. अप्पा जाधव यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करताना मान्यवर

‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव यांनी बोलताना, मराठी भाषेबद्दल असणारे प्रेम आणि इतर देशांतील मराठी भाषिकांनी दिलेला चांगला प्रतिसाद याबद्दल आनंद व्यक्त केला. या अभिवन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ‘लोटिस्मा’च्या प्रांगणात झाला याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य आणि ‘मसाप’चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागील भूमिका स्पष्ट केली. जगभरातील साडेपाचशेहून अधिक स्पर्धकांचा मिळालेला प्रतिसाद संस्मरणीय असल्याचे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षण करताना पारदर्शकपणे उपयोजिलेली कविता कोडिंगची पद्धत, सात दर्दी काव्य परिक्षकांचे सहकार्य, स्पर्धेला विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांविषयीची कृतज्ञता आदींचे विवेचन त्यांनी केले.


ज्यांच्या नावे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ते स्व. अप्पा जाधव हे रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रिय नाटककार, कवी व लेखक होते. ते एकेकाळच्या सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघाचे प्रमुख सल्लागार आणि रत्नागिरी जिल्हा शासकीय सेवानिवृत्त संघाचे माजी अध्यक्ष राहिले होते.

यावेळी विजेता १ - अतुल देशपांडे (नाशिक-ऑस्टिन), विजेता २ - किरण वेताळ (पुणे), विजेता ३ - डॉ. मनोज वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ १ - विजय सातपुते (पुणे), उत्तेजनार्थ २- विजया गुळवणी (पुणे), उत्तेजनार्थ ३ - वृंदा कुलकर्णी (पालघर), उत्तेजनार्थ ४ - सुधीर नागले (रायगड), उत्तेजनार्थ ५ - हर्षदा सुंठणकर (बेळगाव), प्रोत्साहनपर १ - सुजाता संजय (लंडन), प्रोत्साहनपर २ - डेविड पेनकर (ईस्त्रायल), प्रोत्साहनपर ३ - शर्मिला पटवर्धन (बंगलोर), प्रोत्साहनपर ४ – सुषमा वडाळकर (बडोदे), प्रोत्साहनपर ५ - श्रीती राशिनकर (इंदौर), प्रोत्साहनपर ६ - सारिका बिवलकर (रत्नागिरी), प्रोत्साहनपर ७ - मेधा लोवलेकर (चिपळूण) यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतिक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले.

 


‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी कांही कविता’ मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता राहिल्या. ४७ वर्षांचं (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचलनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वान्द्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.



यावेळी ‘लोटिस्मा’चे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, ‘आपलं चिपळूण’संस्थेचे अध्यक्ष उदय ओतारी, पदाधिकारी आवले, मनोज जाधव, विनायक ओक, प्रकाश घायाळकर, विलास महाडिक, समीर कोवळे, कैसर देसाई, मंदार ओक, प्रा. सोनाली खर्चे, विजय कदम, केदार पाटणकर, रविंद्र गुरव, शिवाजी शिंदे, ईश्वर हलगरे, प्रा. संगीता जोशी आदींसह शहरातील साहित्यप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते.


धीरज वाटेकर 

बांधावरचे साहित्य संमेलन २०२६


आजकाल साहित्य संमेलनामध्ये मंडपाचाच खर्च लाखो कोटींच्या घरात जातो. अशा स्थितीत मंडपाशिवाय नैसर्गिक स्थितीत काजूच्या गर्द वनराईत बांधावर आयोजित केलेले मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग असलेले हे संमेलन अनोखे, अनुकरणीय ठरले. जागोजागी अशी संमेलने व्हायला हवीत.' या संमेलनातून धोक्यात आलेल्या वनस्पती सृष्टी, प्राणी सृष्टीला वाचवण्यासाठी काय करता येईल हे समाजाला सांगायला हवे. साहित्यिकांनी शाश्वत निसर्ग जपण्याचा संदेश आपल्या साहित्यातून द्यायला हवा,' अशी भूमिका यावेळी मान्यवर साहित्यिकांनी व्यक्त केली.

कोकणात बांध म्हणजे भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणारी, माती किंवा दगडांची अगदी छोटीशी जेमतेम वितभर उंचीची भिंत!. कोकणात हे बांध शेतीचे संरक्षण करतात, मृदसंधारण करतात आणि पावसाचे पाणी अडवून शेतीसाठी उपयुक्त ठरतात. वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे पिकांच्या वाढीसोबतच जमिनीत ओलावा टिकवून ठेवणे आणि मातीची धूप होण्यापासून रोखणे अशी महत्वाची कामे हे बांध करत असतात. कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱ्या या  'बांध'वर साहित्य प्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आणि त्यांच्या या प्रयोगाचे राज्यभर कौतुक झाले. माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास, असे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरातील रसिकांचे लक्ष वेधून घेणारे ‘बांधावरचे संमेलन रविवारी (ता. ८ फेब्रुवारी) रोजी चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न झाले. संमेलनाचे उद्घाटन शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, पारंपरिक वाद्य संबळच्या निनादात श्रीसातेरी मातेच्या वारूळाचे पूजन आणि पवित्र वाशिष्ठी-नर्मदा गंगाजलाने भरलेल्या मातीच्या घटाचे पूजन करून झाले. यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के, स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी, उद्घाटक डॉ. प्रशांत पटवर्धन, चिपळूणचे आमदार शेखर निकम, कोकणात सलग ११ ग्रामीण साहित्य संमेलने यशस्वी करणारे सुभाष लाड, वाशिष्ठी उद्योग समूहाच्या प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव, नामवंत कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाश गांधी यांनी खास मालवणी भाषेत गाऱ्हाणे घातले. संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे यांनी प्रास्ताविकातून बांधावरच्या संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. सोनाली खर्चे यांनी लिहिलेल्या आणि अमेय वराडे यांनी संगीतबद्ध केलेल्या बांधावरच्या गीताचे सादरीकरण वीणा परांजपे, सुखदा परांजपे, संगीता जोशी, संध्या आठल्ये, अपर्णा नातू, छाया पोटे, स्नेहल दीक्षित, संजय शिंदे, विजय कदम यांनी केले. साथसंगत यदुवीर चौगुले यांनी दिली. धीरज वाटेकर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

संमेलनाध्यक्ष  बारटक्के यांनी निसर्ग आणि साहित्याच्या बदललेल्या स्वरूपाचा आढावा घेतला. आपण सर्व निसर्गाचाच एक भाग आहोत. त्यामुळे कवी, लेखकांना निसर्गापासून वेगळे, दूर करता येत नाही. त्यांना कृत्रिम जीवन नसते. माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचे सामाजिक, सांस्कृतिक अस्तित्व जास्त महत्त्वाचे असून जीवनाचा आणि जगण्याचा शोध साहित्यातून घेता येतो. साहित्य समस्यांचे निराकरण करते. साहित्य रिझवतं, साहित्य शिकवतं, साहित्य माहिती देते, साहित्य कैफियत मांडतं, साहित्य मानवी जीवनातील कंगोरे दाखविते म्हणूनच ते आपल्याला जवळचं वाटतं. असे बारटक्के म्हणाले. डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी उद्घाटनीय भाषणात, आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये सर्वच कार्यक्रमाचे सिंहावलोकन केले. आजच्या तरुणाईची भाषा बदलती आहे. ती संमिश्र असून इंग्रजीच्या जवळ जाणारी आहे. मात्र ती जीवंत असून तिचे स्वागत करायला हवे, असे मत मांडले. सांस्कृतिक प्रेमाचा डीएनए चिपळूणच्या लोकांमध्ये वाशिष्टीच्या प्रवाही पाण्यातून, इथल्या लाल मातीतल्या श्वासातून, ग्रामदैवत भैरीच्या जागृत श्रद्धेतून आणि महेंद्र पर्वतावर ध्यानस्थ बसलेल्या परशुरामाच्या आशीर्वादातून आल्याचे त्यांनी सांगितले. स्वागताध्यक्ष मोदी म्हणाले, ‘आजचे संमेलन ही केवळ जागेची बदललेली रचना नाही, तर विचारांची दिशा बदलणारा प्रयोग आहे. आज इथे कविता केवळ ऐकली जाणार नाही ती अनुभवली जाणार आहे. कथा फक्त सांगितली जाणार नाही ती जमिनीतून उगवलेली वाटेल. गाणी रंगमंचावर नाही तर वाऱ्यासोबत झुलताना ऐकू येतील. आजचा दिवस मराठी साहित्याच्या वाटचालीत एक स्मरणीय टप्पा ठरेल, याची मला खात्री आहे.’ संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ काव्य अभ्यासक विजय जोशी यांचे कविता : तंत्र आणि मंत्र या काव्यविवेचनाला रसिकांनी छान प्रतिसाद दिला. ज्या कवितेमधे काव्यगुण, आशयगुण, नादलय गुण आहे अशी कविता आदर्श समजली जाते. आजचे कवी कविता लिहिल्याबरोबर फेसबुक, व्हॉटस्अप वर शेअर करण्याची घाई करतात. हे चुकीचे आहे. जसे लोणचे मुरल्यानंतर चविष्ठ होते तसे संस्कारण, परिपूर्ण, तटस्थतेने झालेली कविता छान होते असे ते म्हणाले. दुपारी भोजनानंतर ज्येष्ठ कथाकार सुरेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन या सत्रात अमोल पालये (तिलोरी), ज्ञानेश्वर झगडे (खारवी) यांनी बोलीभाषांतील कथांचे उत्तम सादरीकरण केले. नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कवींचे 'माती, नाती अन् माणूस ' या विषयावर काव्य संमेलन रंगले. कवी अरुण म्हात्रे, सूत्रसंचालक कैलास गांधी यांचेसह सर्व मान्यवरांनी दर्जेदार कवितांचे सादरीकरण केले. म्हात्रे आणि गांधी यांची काव्य’नोकझोक’ यामुळे काव्यसंमेलनाची रंगत अधिक वाढली. मुझ्झफर सय्यद, मंदार ओक, विनय माळी, विजय हटकर, राजेंद्र आरेकर, ईश्वर हलगरे, मेधा लोवलेकर, विशाखा चितळे, अपर्णा नातू, श्रद्धा कळंबटे, विराज चव्हाण, राष्ट्रपाल सावंत आदी सर्वांच्याच ग्रामीण, शहरी व प्रेम कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली.

संमेलनाच्या समारोप सत्राला डॉ. तानाजीराव चोरगे, प्रकाश देशपांडे, सुहास बारटक्के, सुभाष लाड, शशिकांत मोदी, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी मंडप, स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या सावलीत यशस्वी केलेल्या साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाचे अर्थात बांधावरच्या साहित्य संमेलनाचे मनापासुन कौतुक केले.  यावेळी डॉ. चोरगे म्हणाले, ‘बांधावरचे साहित्य संमेलन ही संकल्पनाच अत्यंत उत्कृष्ठ आहे. शेतकऱ्याच्या शेतावर जायचे, तिथल्या वातावरणात साहित्यिकांनी रमायचं, तिथली पीकं पहायची, तिथल्या मातीचा सुगंध अनुभवून ती कपाळाला लावून भूमातेचा आशीर्वाद घ्यायचा, स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी, आणि स्वच्छ वाणी यांचा आस्वाद घेत शेतकऱ्यांच्या संबंधित साहित्यांवर भाष्य करायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचे, त्यावर चर्चा करायची. शेतकरी कसा राहातो? काम कसे करतो? बोलतो कसा? ते अनुभवायचे. शेतकऱ्याच्या बांधावरुन शेती पहाताना पीकं डोलताना, पाहाताना, बांधावरुन एखादी नदी अगर नाला जवळून पाहाताना स्वर्ग सुख अनुभवल्याचा भास होतो. हे शेतावर गेल्यावरच कळते.’ असे चोरगे यांनी सांगितले. सुभाष लाड म्हणाले, ‘धामणवणे गावातील 'साद मयुराची' या शिवारात आयोजित केलेले बांधावरचे साहित्य संमेलन हे अभिनव आहेच पण ते आवश्यकही आहे. या बांधावरच्या साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे मी मनापासून कौतुक करतो. माझं अर्ध आयुष्य बांधावरच गेलं आहे त्या आठवणींचा पुन्हा उजाळा देण्याची संधी मला इथे मिळाली.’


संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाला रसिकांनी अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या ‘शाकाहारी मोंगा-पोपटीचा’ आस्वाद घेतला. महाराष्ट्र साहित्य परिषद (चिपळूण शाखा) तर्फे आयोजित या संमेलनासाठी कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांनी सहकार्य केले. या संमेलनाच्या यशस्वितेसाठी संमेलनाचे संकल्पक कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, सहकार्याध्यक्ष अरुण इंगवले, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर यांसह संयोजन समितीच्या सर्वच सदस्यांनी मेहनत घेतली. विशेषतः प्राची जोशी, धीरज वाटेकर, सोनाली खर्चे, प्रकाश घायाळकर, मनीषा दामले, मुझफ्फर सय्यद, संगीता जोशी, मंगेश बापट, विलास महाडिक, वीणा परांजपे, विशाखा चितळे, ऋचा भागवत, उमेश घाडगे, संध्या आठल्ये, विनायक ओक, स्नेहल जोशी, स्नेहल कुलकर्णी, संध्या साठे, अभिजीत देशमाने, आदी समिती सदस्यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यांना बारटक्के कुटुंबीयांनी दिलेली साथ यामुळे हे संमेलन सुंदर सुनियोजित सुफल संपन्न झाले.


पारंपारिक संमेलनांना फाटा देऊन निसर्गाच्या सानिध्यात माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्य सहवास जवळपास ३५० साहित्यिक आणि रसिकांनी अनुभवला. निसर्गातील वस्तूंचा वापर करून दगड, पाने फुले यांनी सुंदर स्वागत रांगोळी काढलेली होती. काजूच्या झाडांच्या वनामध्ये बांधलेला दगड मातीचा बांध हेच व्यासपीठ होता. संमेलन परिसर शेणामातीने सारवलेला होता. विविध ठिकाणी पाने, निसर्गातील वस्तूंवर रेखाटलेल्या कविता जागोजागी झाडांवर टांगल्या होत्या. झाडाच्या फांदीला लाकडी पट्टी लाऊन आणि माईक बांधून छान पोडिअम बनविला होता. जेवणामध्ये झुणका भाकर (ज्वारी/बाजरी/तांदूळ/नाचणी), खारातील मिरची, तांदुळाची खीर, वांग्या-पावट्याची गावरान भाजी, वरण-भात तर नाश्त्याला केळीच्या पानात आंबोळी-घावणे आणि चटणी, सायंकाळी चहापानाला स्थानिक अल्पोहार मोंगा-पोपटी (शाकाहारी) असा अस्सल कोकणी ग्रामीण बेत होता. शेतामध्ये वारूळ पूजन, संत तुकारामांच्या स्पर्शाने पावन झालेला दगडी दिवाद्वारे दीपप्रज्वलन, ग्रामदेवतेला केलेलं स्थानिक बोलीतील गाऱ्हाणे (प्रार्थना), बोलीभाषेत लिहिलेलं संमेलन गीत, स्थानिक वाद्य ‘संबळ’ याचे वादन, मान्यवरांचा घोंगडी, मोरपीस, सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देऊन केलेला सन्मान, प्लास्टिकचा वापर जाणीवपूर्वक टाळणं, पत्रावळीखाली योग्य आकाराचं ताट देण्याची कल्पना, टेबल खूर्ची यांना फाटा देऊन व्यासपीठावर म्हणजेच बांधावर गाद्या टाकून केलेली बैठक व्यवस्था, संमेलनाचा लोगो छापलेल्या उपस्थितांना ‘वानोळा’भेट देण्यात आलेल्या तागाच्या मजबूत पिशव्या, पारंपरिक सांस्कृतिक धरोहरांना दिलेला मान, रसिकांसाठी काजूच्या झाडांच्या सावलीतील व्यवस्था यांमुळे घरगुती ग्रामीण, कोकणी पद्धतीच्या व्यवस्थेने दिवसभर संपन्न झालेला हा साहित्य सोहळा उपस्थितांच्या मनात भरून राहिला.






बांधावरचे संमेलन लिंक - https://www.youtube.com/live/-JORZNEcfGw?si=bKvR02Ib4hN8FO38

बांधावरचे संमेलन आकाशवाणी वृतांत - https://youtu.be/je-L1qwqlQc?si=5fKTQ3CHA-I_9jsl


संमेलन प्रतिक्रिया

बांधावरचे संमेलन व्यासपीठ


बांधावरचे संमेलन परिसर

नैसर्गिक साहित्यातून लोगोची रांगोळी  

भूमाता सातेरी पूजानाच्या दिशेने जाताना...  

भूमाता सातेरी (वारूळ) पूजन 

कवी संमेलन

काजूच्या सुकलेल्या फांदीचा डायस








गावरान भोजन 

मोंगा (पोपटी)चा आस्वाद



धीरज वाटेकर      

मो. ९८६०३६०९४८

'राखणदार पदयात्रा' निमित्ताने...

कोकणच्या जल , जंगल आणि संस्कृती रक्षणाचा नवा एल्गार           स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेला कोकण प्रांत सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाच...