मंगळवार, २३ जून, २०२६

रियासतकार सरदेसाई यांच्या कोकणातील मूळ घराचा शोध!

दैनिक नागपूर तरुण भारत (पुणे आवृत्ती)

रियासतकार म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक महान आणि व्यासंगी इतिहासकार ‘पद्मभूषण’ गोविंद सखाराम सरदेसाई यांचे कोकणातील मूळगाव असलेल्या लांजा तालुक्यातील गोविळ येथील मूळघराचा शोध घेण्यात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या संस्थेला नुकतेच यश आले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी ही माहिती दिली. मराठा साम्राज्याचा सर्वसमावेशक इतिहास 'रियासत' या ग्रंथांच्या माध्यमातून लिहून काढल्याने 'रियासतकार' ही उपाधी सरदेसाई यांना मिळाली होती.

 

रियासतकार सरदेसाई यांचे गोविळ (ता. लांजा) येथील घर (वाडा)

कोकणातील राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था कोकणरत्नांचा शोध घेऊन आपल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांची चरित्रे समाजासमोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते. लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीचे सुपुत्र ज्येष्ठ समीक्षक वि. शं. चौगुले, कोटगावची स्नुषा झांशीची राणी लक्ष्मीबाई, रिंगणे गावचे सुपुत्र नाटककार ला.कृ.आयरे, तळवडे गावचे सुवर्णकार जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, शिपोशी गावचे क्रांतिकारक गोपाळ गणेश आठल्ये, रत्नागिरीत पहिला छापखाना सुरू करणारे जनुभाऊ आठल्ये, १८८६ मध्ये कोचीनहून 'केरळ कोकीळ' मासिक काढणारे कृष्णाजी नारायण आठल्ये, न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये, राजापूर तालुक्यातील तळवडेचे ‘पितांबरी’कार रवींद्र प्रभूदेसाई, वाटूळचे सुप्रसिद्ध प्रवचनकार सु. ग. शवडे (गुरुजी) अशी कितीतरी नावं सांगता येतील. संघाच्या शिपोशी गावात पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची माहिती देण्यात आली होती. मात्र ज्या गोविळ गावात त्यांचा जन्म झाला तेथील घराचा शोध लागलेला नव्हता. पुढे ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला लाड हे ठिकठिकाणी सरदेसाई यांच्याबद्दल बोलत होते. दरम्यान ‘हर्दखळे’ गावाचं गीत तयार करताना लाड यांचा त्या गावातील अनेक लोकांशी संपर्क आला. गावाचे शिक्षक महेश गुरव यांनी त्यांना आणि त्यांच्या टीमला आपल्या घरी जेवावयास बोलावले. त्या वेळेला त्यांनी 'आपण गोविळ गावात शिक्षक आहोत' असे सांगितले. लाड यांनी तातडीने त्यांना गो. स. सरदेसाई यांच्या घराबद्दलची माहिती विचारली. गुरव यांनीही, ‘शोध घेऊन सांगतो’ असे उत्तर दिले.

 

घराचे मालक - विलास नारायण सुर्वे

सध्या देशभर सुरु असलेले जनगणनेचे काम स्थानिक शिक्षक करीत आहेत. या दरम्यान गुरव यांना गोविळ गावात मूळवाडीमध्ये वस्तीपासून थोडेदूर, डोंगरात एका बाजूला झाडांनी वेढलेले पण गावातल्या घरांपेक्षा वेगळ्या ठेवणीचे चौसोपी आणि माडीचे घर दिसले. त्यांनी उत्सुकतेने घरमालक विलास सुर्वे यांना घराबद्दलची विचारणा केली तेव्हा सुर्वे यांनी, ‘हे घर आपल्या वडिलांनी १९४५मध्ये सरदेसाई यांच्याकडून विकत घेतले’ असे सांगितले. गुरव गुरुजींना तेव्हा लाड यांची आठवण झाली. त्यांनी तात्काळ भांबेड हायस्कूलचे जयराज मांडवकर यांना आणि मांडवकर यांनी लाड यांना हे कळविले. लाड यांनी नुकतीच महेश गुरव (गुरुजी), जयराज मांडवकर (सर) आणि संघाचे पदाधिकारी महेंद्र साळवी यांचेसह गोविळ गावातल्या गो. स. सरदेसाई वाड्याला भेट दिली. तो ऐतिहासिक वाडा पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्याचे लाड म्हणाले. १९४५मध्ये विकत घेतलेला तो वाडा जसा होता तसाच आजही उभा आहे. याबद्दल त्यांनी वाड्याचे मालक विलास सुर्वे यांचे आभार मानले. त्याकाळात इतिहासकार म्हणून सुशिक्षित लोकांमध्ये गो. स. सरदेसाई यांचा मोठा बोलबाला होता. एका मोठ्या व्यक्तीचं आणि वैशिष्ट्यपूर्ण ठेवणीचं घर आपण घेतलेलं आहे याचे भान सुर्वे यांच्या वडिलांना पूर्णपणे होते. त्यांनी या घरामध्ये कोणताही बदल करायचा नाही अशी सक्त ताकीद आपल्या मुलांना दिली होती, अशी माहिती सुर्वे यांनी दिली. सुर्वे यांचे वडील गिरणीत चांगल्या हुद्द्यावर काम करीत होते. त्यामुळे ते हे घर आणि सोबतची पंधरा एकर जागा विकत घेऊ शकले. त्यांनी मुंबईहून बोटीने आणलेला शिसव लाकडातला कोरीव काम केलेला पलंग आणि अशा काही वस्तू कुटुंबीयांनी जपल्या आहेत.

 

शोधकर्ते सुभाष लाड (मध्यभागी) आणि सहकारी  

रियासतकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म सखाराम व गंगाबाई (लक्ष्मीबाई) या दाम्पत्याच्या पोटी याच वाड्यात १७ मे १८६५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्या शिपोशी गावातल्या प्राथमिक शाळेत झाले. ती शाळा इमारत शिपोशी गावाने आजही जपून ठेवलेली आहे. पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले. १८८४ मध्ये ते मॅट्रिकला रत्नागिरीत असतांना गंगूताई किर्तने या मुलीशी त्यांचा विवाह झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयांतून १८८८ला ते बी.ए. झाले. नंतर ते बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांच्याकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. पुढे त्यांना तिथेच हिशेब तपासणीस म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. सयाजीरावांच्या बरोबर त्यांना परदेश दौरे करण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांना इतिहासाची आवड निर्माण होऊन बडोद्यात त्यांनी मुघल रियासत लिहून पूर्ण केली. त्यांनी आपले छोटे भाऊ दिनकर यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. सयाजीरावांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे दिनकर हे परदेशी जावून नेत्रतज्ञ होऊ शकले. त्यांनी पुण्यातील तळेगाव येथे इस्पितळ उभारून जनसेवेला सुरुवात केली. रियासतकार बडोद्याहून ३६ वर्षांनंतर १९२५ला सेवानिवृत्त झाले. तत्पूर्वी डॉ. दिनकर यांनी आपल्या भावाला सेवानिवृत्तीनंतर एकाग्रपणे इतिहास लेखन करता यावे म्हणून कामशेत येथे बंगला बांधला. रियासतकार सेवानिवृत्त झाल्यानंतर ते या बंगल्यात आले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत (९ नोव्हेबर १९५९) वास्तव्यास होते. कामशेत येथे राहून आपले उर्वरित आयुष्य रियासतकारांनी केवळ इतिहास लेखनाला समर्पित केले. प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या प्रेरणेने त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून मराठी रियासत : ८ खंड, मुसलमानी रियासत : ३ खंड, ब्रिटिश रियासत : २ खंड, 'पेशवे दप्तर' ४५ खंड तयार झाले. मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अतुलनीय लेखन कामगिरीबद्दल भारत सरकारने १९५७ मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. लाड यांनी रियासतकारांचे पणतू जयदीप यांच्याशी संपर्क साधून कामशेतमधील बंगल्यालाही भेट दिली होती.

 

रियासतकार सरदेसाई

हा वाडा काहीसा अपूर्णावस्थेत आहे. तो चौसोपी असला तरी तीनच बाजू पूर्ण असून पश्चिमेला असलेली बाजू राहून गेली असावी. मधले रांजणही सुंदर आहे. पूर्वेकडे दर्शनी बाजू असून घराची माडी अधिक आकर्षक दिसते. चार फूट उंचीचा जोता घडीव दगडात चुनखडीचा वापर करून बांधला आहे. समोरील भागात सहा लाकडी खांब असून ते दगडी ताशीव उठाळ्यावर उभे आहेत. माडीचा भाग ही मोकळा व प्रशस्त असून लाकडी रेजे बसविल्याने बंगलीला श्रीमंती थाट आला आहे. माडीच्या मजबूत फळ्या आजही सुस्थितीत आहेत. घरातील त्या काळातील वापरात असलेल्या अनेक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. घराच्या भिंती दगडा मातीच्या दीड फूट रुंदीच्या असून त्यावर एक इंच जाडीचा चिकण मातीचा मुलामा दिलेला आहे. कालपरत्वे बऱ्याच ठिकाणी तो मुलामा निघाल्यामुळे आतील दगड दिसू लागले आहेत. घराला वेळोवेळी रंग देणे तसेच पॉलिश करणे हे फारच महागडे असल्याने त्याचे जीर्णपण दिसून येते आहे. गोविळमधील वास्तूला तशाच स्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने, ‘आपणही काही मदत करू’ असे त्यांचे आश्वासन लाड यांना जयदीप यांनी दिले आहे.







रविवार, २१ जून, २०२६

'राखणदार पदयात्रा' निमित्ताने...

कोकणच्या जल, जंगल आणि संस्कृती रक्षणाचा नवा एल्गार


        स्वर्गीय निसर्गसौंदर्य लाभलेला कोकण प्रांत सध्या अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत आहे. अनिर्बंध रिअल इस्टेट विकास, खाणकाम (मायनिंग) आणि विनाशकारी प्रकल्पांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील तरुण आणि पर्यावरणप्रेमींना जागे करण्यासाठी 'कोकणी रानमाणूस' म्हणून ओळखले जाणारे प्रसाद गावडे आणि त्यांच्या 'राखणदार टीम'ने नुकतीच मृग नक्षत्रात (जून २०२६) एका ऐतिहासिक 'राखणदार पदयात्रेची' सुरुवात केली. या यात्रेचा पहिला टप्पा कणकुंबी ते बांदा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्याचे नियोजन सुरु आहे. ही पदयात्रा केवळ एक आंदोलन नसून कोकणची संस्कृती आणि निसर्ग वाचवण्याची जनचळवळ बनण्याची आवश्यकता आहे.


             कोकणी संस्कृतीत 'राखणदार' म्हणजे गावाचा, वनाचा किंवा स्थानाचा अदृश्य रक्षक देव जो संकटसमयी धावून येतो. आजच्या काळात जेव्हा कोकणची जमीन परप्रांतीय आणि मोठ्या कंपन्यांच्या विळख्यात सापडत आहे, तेव्हा "कोकणचे खरे राखणदार हे येथील स्थानिक लोकच आहेत" हा विचार घेऊन ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या संवेदनशील पश्चिम घाट (Western Ghats) क्षेत्रात या यात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा पहिला टप्पा अतिशय दुर्गम आणि महत्त्वपूर्ण जलस्रोतांच्या भागातून आखण्यात आला. यात्रेची सुरुवात गोवा-कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील कणकुंबी येथून झाली. हा भाग महादयी नदी आणि इतर अनेक जलस्रोतांचे उगमस्थान आहे. या राखणदार पदयात्रेची सुरुवात केरी गावातील आजोबांच्या तळीतील पवित्र जल, तीर्थ म्हणून सोबत घेत, कणकुंबी मंदिरात नारळ ठेऊन करून केली गेली. या प्रवासासाठी गावातील तरुण मंडळी, शालेय विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांच्या सहभागामुळे उद्याच्या पिढीकडून निसर्गसंवर्धनाची आशा अधिक दृढ झाली. ही केवळ एक पदयात्रा नाही, तर आपल्या जल, जंगल आणि जमिनीबद्दल संवेदनशील असलेल्या प्रत्येक मनाचा एक हुंकार आहे. आपल्या मातीचे, देवराईंचे आणि आपल्या अस्तित्वाचे प्रतीक असलेल्या राखणदाराचे रक्षण करण्याचा हा एक सामूहिक संकल्प आहे. जे आपले आहे, जे आपल्या पूर्वजांनी जपले आहे, ते जतन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्यासाठी जे काही करावे लागेल, ते करण्यास आम्ही तयार आहोत.


               ही यात्रा केरी, कारापूर, आणि दोडामार्ग सीमावर्ती भागातून पुढे सरकली. तिथून भेडशी, सातली आणि कुडसे गावांना भेटी देत थेट तेरेखोल नदी खोऱ्यात प्रवेश केला. शेवटच्या टप्प्यात सावंतवाडी तालुक्यातील बांदा आणि विळवडे मार्गे जात सोनुर्ली येथील ऐतिहासिक श्री देवी माऊली मंदिरामध्ये या चार दिवसीय यात्रेची सांगता झाली. कोकणातील वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांचे पाणी विषारी होत चालले आहे (उदा. लोटे एमआयडीसीमुळे वाशिष्टी नदीची झालेली दुरवस्था). यामुळे मासेमारी आणि स्थानिक लोकांचे रोजगार धोक्यात आले असून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. ही पदयात्रा नद्या, पाण्याचे झरे आणि जंगले वाचवण्यासाठी स्थानिकांना संघटित करत आहे. कोकणात हजारो वर्षांपासून 'देवराई' (देवांसाठी सोडलेले पवित्र जंगल) जपण्याची परंपरा आहे. या देवराया म्हणजेच नैसर्गिक जैवविविधतेचे केंद्र आहेत. या यात्रेदरम्यान तरुण पिढीला या निसर्गपूजक परंपरांची आणि सातेरी संस्कृतीची जाणीव करून दिली जात आहे. कोकणच्या पर्यावरणाला आणि पारंपरिक उपजीविकेला नख लावणाऱ्या खनिज प्रकल्पांना (मायनिंग) आणि अनिर्बंध रिअल इस्टेटच्या नावाखाली होणाऱ्या जमिनींच्या बळकावणीला विरोध करणे हा या यात्रेचा मुख्य अजेंडा आहे. या पदयात्रेत गोव्यातील 'Enough is Enough' आणि 'Goyant Kollso Naka' पर्यावरण संस्थेचे कार्यकर्ते फ्रान्सिस कोएल्हो, पर्यावरण अभ्यासक सत्यजीत चव्हाण, वन्यजीव अभ्यासक मल्हार इंदुलकर, लेखक अविनाश उषा वसंत, वन्यजीव छायाचित्रकार सोमेश काणेकर, दिग्दर्शक विनायक कोळवणकर आदींसह तिन्ही राज्यांतील स्थानिक शेतकरी, मच्छीमार आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 'रानमाणूस' प्रसाद गावडे यांच्या साध्या आणि प्रभावी संवादशैलीमुळे गावोगावी लोकांमध्ये जागृती निर्माण होत आहे. "आम्ही निसर्गाचा केवळ वापर करत नाही, तर आम्ही निसर्गाचे अपत्य आहोत," हा या चळवळीचा मूळ मंत्र आहे.


            पूर्वी कोकणात, गावातला कुणीही अतिरेक करू लागला की त्याला भीती कुठल्या गोष्टीची घातली जायची? तर गावच्या मुंजोबाची, ग्रामदेवाची किंवा देवीची किंवा वनदेवाची. कितीही भाबडेपणा असला तरी तो एक श्रद्धेचा आणि सामाजीक सुरक्षितता राखण्याचा एक भाग होता. आता तीच वेळ आलेली आहे. राज्य वा केंद्र सरकार पर्यावरण आणि निसर्गाबाबत भयंकर विचार करताना दिसत आहेत. गावच्या लोकांची, निसर्गाची इथल्या प्रकृतीची त्यांना अडचण होऊ लागलीय असे वाटावे अशी स्थिती आहे. विकासाच्या नावाखाली सर्वत्र मिळणाऱ्या टक्केवारीने देश, देशाची जमीन विकून ढेकरा द्यायची हाव ओसंडून वाहू लागलीय. कोकणात जे लोक जीव तोडून इथल्या जमिनीला, लोकांना, पर्यावरणाला वाचवू पाहतायत. विकास शाश्वत आणि निसर्गाला हानी न पोहचवता होऊ शकतो हे दाखवतायत दुर्दैवाने त्यांना मात्र इथला मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडियाही जवळपास ठेंगा दाखवत आहे. ‘राखणदार’ नावाने सामान्य लोकांच्या भावनेला हाताशी धरून एका उदात्त कामासाठी ही यात्रा सुरु आहे. पर्यावरण वाचवणे, पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प हाणून पाडणे, निर्णयप्रक्रियेत इथल्या स्थानिकांचा निर्णय अंतिम असावा, शाश्वत विकासाबद्दल जनजागृती करणे ह्या आणि अश्या अनेक गोष्टी प्रसाद गावडे आणि मंडळी कित्येक वर्षे करताहेत. आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगातही कोकणातील राखणदारांची संकल्पना टिकून आहे. शहरात राहणारे कोकणातील लोकही आपल्या मूळ गावाशी आणि वाडीच्या राखणदाराशी भावनिकरित्या जोडलेले असतात. सणावाराला किंवा महत्त्वाच्या कामाला ते आवर्जून आपल्या वाडीतील राखणदाराचं स्मरण करतात. तरीही, काही ठिकाणी या श्रद्धा अंधश्रद्धेच्या नावाखाली टीकेचे धनी होतात. पण कोकणातील लोकांसाठी हा केवळ अंधविश्वास नसून, तो त्यांच्या सांस्कृतिक वारशाचा, निसर्गाशी असलेल्या त्यांच्या आत्मिक नात्याचा आणि पूर्वजांबद्दलच्या आदराचा एक भाग आहे. कोकणातील राखणदार ही केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती कोकणच्या मातीतील लोकांच्या श्रद्धेचं आणि निसर्गाशी असलेल्या त्यांच्या अतूट नात्याचं प्रतीक आहे. ही अदृश्य शक्ती त्यांना आधार देते, भयमुक्त ठेवते आणि एकत्र बांधून ठेवते.


            कोकणाच्या मातीत 'राखणदार' नावाची एक अदृश्य पण तितकीच शक्तिशाली संकल्पना खोलवर रुजलेली आहे. 'राखणदार' म्हणजे केवळ एक शब्द नाही, तर ती कोकणातील लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, राखणदार म्हणजे आपल्या घराची, वाडीची, शेतीची, अगदी संपूर्ण गावाचं रक्षण करणारी एक अदृश्य शक्ती किंवा ग्रामदेवता. ते अनेकदा आपल्या पूर्वजांचे आत्मे किंवा विशिष्ट नैसर्गिक शक्तींशी जोडलेले असतात. कोकणातील प्रत्येक वाडी किंवा घरामागे एक संरक्षक शक्ती उभी असते, असे मानले जाते आणि हीच शक्ती 'राखणदार' म्हणून ओळखली जाते. या राखणदारांचं कोणतंही विशिष्ट रूप नसतं. ते कधी झाडाच्या रूपात (उदा. पवित्र वड, पिंपळ, आंबा), कधी दगडाच्या रूपात, तर कधी केवळ एका अदृश्य अस्तित्वाच्या रूपात असतात. काही ठिकाणी त्यांना 'वनदेवता', 'क्षेत्रपाल' किंवा 'गावदेवी' च्या रूपातही पूजले जाते. त्यांचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या क्षेत्राचं दुष्ट शक्तींपासून, वाईट नजरेपासून आणि संकटांपासून रक्षण करणं. घरात शांतता, समृद्धी आणि आरोग्य राखण्यासाठी ते मदत करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा असते. कोकणातील लोक या राखणदारांवर निस्सीम श्रद्धा ठेवतात आणि त्यांच्याशी संबंधित अनेक परंपरा आजही जपल्या जातात. जेव्हा एखाद्या घरात नवीन कार्य सुरू होतं, नवजात बाळ जन्माला येतं, किंवा एखादं संकट दूर होतं, तेव्हा राखणदारांना नारळ किंवा कोंबड्याचा नैवेद्य दाखवला जातो. नवस फेडताना अनेकदा कोंबड्याचा बळी देण्याची प्रथा आजही काही ठिकाणी पाळली जाते. घरातून बाहेर पडताना किंवा लांबच्या प्रवासाला जाताना राखणदारांना मनोमन प्रार्थना करून आशीर्वाद मागितले जातात. "राखणदार पाठीशी राहा!" असे शब्द अनेकदा ऐकायला मिळतात. राखणदारांच्या काही अदृश्य नियमांचं पालन न केल्यास वाईट गोष्टी घडतात अशीही एक भीती काही लोकांच्या मनात असते. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त दरारा असतो. कोकणातील अनेक वाड्यांमध्ये राखणदारांसाठी विशिष्ट जागा किंवा लहानशी देवडी असते. इथे नियमितपणे दिवे लावले जातात, धूप जाळला जातो आणि स्वच्छता राखली जाते.


            राखणदार पदयात्रा ही कोकणातील जंगल, पाणी, जैवविविधता, पारंपरिक देवऱ्या आणि स्थानिक संस्कृती यांच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेली जनजागृती यात्रा आहे. या यात्रेचा उद्देश गावागावांतील लोकांना त्यांच्या परिसरातील नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व पटवून देणे आणि स्थानिक समुदायांना निसर्गसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभागी करणे हा आहे. या पदयात्रेदरम्यान विविध गावांमध्ये भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला गेला. गावातील पारंपरिक सण, देवऱ्या, जलस्रोत, जंगलांशी निगडित श्रद्धा, जैवविविधता आणि पर्यावरणीय आव्हाने यांची माहिती संकलित केली. तसेच स्थानिक लोकांच्या अनुभवांमधून निसर्गरक्षणाच्या पारंपरिक पद्धती समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. राखणदार पदयात्रा ही केवळ चालण्याची यात्रा नसून निसर्ग आणि माणूस यांच्यातील नाते दृढ करण्याचा एक प्रयत्न आहे. जंगल, पाणी, माती आणि जैवविविधता यांचे संरक्षण हे आपल्या अस्तित्वाशी जोडलेले आहे, हा संदेश या यात्रेच्या माध्यमातून दिला जातो. “आपल्या भूमी, पाणी, जंगल आणि संस्कृतीचे खरे राखणदार आपणच आहोत” ही भावना जागृत करून स्थानिक समाजाच्या सहभागातून शाश्वत भविष्यासाठी एक व्यापक चळवळ उभारणे हे राखणदार पदयात्रेचे प्रमुख ध्येय आहे.


            कोकणचा विकास पर्यावरणाचा नाश करून आणि स्थानिकांना विस्थापित करून होत असेल, तर तो विकास नसून विनाश आहे. जर आजचा कोकणी माणूस एकत्र आला नाही, तर येणारा काळ या भूमीसाठी कठीण असेल. कोकणी जनतेला याबाबत पुरेसे अवगत करण्याची आवश्यकता आहे. म्हणून, ही राखणदार पदयात्रा प्रत्येक कोकणवासीयाला स्वतःच्या मातीचा 'राखणदार' बनण्याचे आवाहन करते आहे.

dheerajwatekar@gmail.com

व्हावी ‘जबाबदार आणि सुरक्षित पावसाळी पर्यटना’ची पहाट

अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शासनाने यावर्षी (२०२६) कोकणातील रत्नागिरी , सिंधुदुर्ग , रायगड , ठाणे , पालघ...