ग्रामीण कोकणात आजही पावसाळ्यात असे नद्या-ओहोळ-नाले ओलांडावे लागतात |
खरंतर आपल्याला ‘जीवेत् शरदः शतम्’
म्हणत कोणालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ ही ओळ आठवायला
हवी. मनुष्याला जीवनात शंभर शरद ऋतू जगायला मिळावेत हा या वाक्याचा अर्थ आहे. पण यातल्या
शरद ऋतूच्या मुळाशी वर्षा ऋतू आणि ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ हेच कारण असावं असं वाटतं.
आपल्या भारतीय संस्कृतीतील संवत्सरं आणि पंचांगे पावसावर जवळपास जाणारे भाकित करत असतात.
आपल्या दाते पंचांगाचा वापर तर जगभर सन्मानाने होत असतो. अर्थात तरीही प्रत्येक
पावसाळ्याचा अनुभव निराळा असतो. कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी पावसाची सुरुवात अपेक्षेपेक्षा
लवकर तर कधी पाऊस खूप वाट बघायला लावतो. अशा साऱ्या पावसाळ्यांची संख्या,
वैविध्य आणि तीव्रता यातूनच आपण ‘मी इतके पावसाळे बघितलेत’ या
वाक्यापर्यंत पोहोचलेलो असावेत. तर ‘जीवेत् शरदः शतम्’ मधल्या शरद ऋतूचा संबंध
हा सुगीच्या दिवसांशी जोडलेला आहे. पावसाळ्याच्या दिवसातून निभाव लागल्यावर साऱ्या
कष्टाचं,
संघर्षाचं, प्रतिक्षेचं फलित-पिक हाती यायचा हा काळ आहे. पेरलेलं उगवून
पदरात पाडून घेण्याचा काळ आहे. गुलाबी थंडी, निरभ्र आकाश, रात्रीचं लख्ख चांदणं
असा सुखावणारा आसमंत शंभर वर्षं उपभोगायला मिळणं म्हणजे समृद्ध दीर्घायुष्यचं!
नव्याने
सुरु झालेल्या बांधकामासाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपडीत वास्तव्यास असलेल्या
निवासी मजुरांना पावसाचा तिटकारा वाटतो. पावसाळ्यात अशा ठिकाणी राहाणे सोपे नाही.
जास्त पाऊस पडला की जमीनीतली ओल संपूर्ण खोलीत पसरते. घरातील अंथरुणापासून
कपड्यांपर्यंत सर्व काही ओले होत असते. कपडे कुठे सुकवायचे? हाही प्रश्न असतो.
शहरातील मजुरांची ही व्यथा तर दुर्गम सह्याद्रीत निवासाला असलेल्यांचे काय होत असेल?
नदी किनाऱ्यावरील गावाच्या लोकांना पूर्वांपार शेती करताना किती समस्यांना तोंड द्यावे
लागत असेल? शेतीला जायच्या मार्गावरचं नदीचं, ओढ्याचं पात्र नियमित ओलांडताना अनेकदा
वाहून जायला व्हायचं. अनेकदा बैलं-गुरं डोळ्यांदेखत वाहून जायची. कधीकधी त्यांना वाचवायला
गेलेला स्वतः मात्र दुर्दैवी ठरायचा. असं हे दरवर्षी कुठल्याना कुठल्या गावात
हमखास घडायचं. पावसाच्या या फेऱ्यातून वाचलेले ‘जीवेत् शरदः शतम्’चे भाग्यवान
ठरतं.
बाष्पीभवन
होऊन पाणी ढगाद्वारे जमिनीवर कोसळते. पऱ्या, ओहोळ, नदी-नाल्यांतून वाहात सागराला
मिळते. पाऊस आपल्याला नखशिखांत चिंब भिजवतो. रिपरिप, रिमझिम, झरझर, टपटप, भुर्रभुर्र,
धपधप, अशा कितीतरी आवाजात तो कान देऊन ऐकता येतो.
त्याचं रौद्र रूप विविध अडचणी निर्माण करतं. त्या अडचणींवर मात करत जीवन जगण्याची उर्मी
‘मी इतके पावसाळे बघितलेत’ हे सांगण्याची शक्ती प्रदान करतं.
पावसाने तुफान बॅटिंग केल्यानंतर खुललेला निसर्ग |
असा
खरा पाऊस आपल्याला जंगलात अनुभवायला मिळतो. तिथे तो वेगळे रुप धारण करतो. जंगलातील
झाडे,
गवत, प्राणी व कीटक या पावसाचे स्वागत करतात
कारण ते त्यांचे जीवन असते. पण तिथल्या माणसांना पाऊस नकोसा वाटतो, हे सत्य आहे. पावसाळा
हा पाहाण्याचा नव्हे तर अनुभवण्याचा ऋतू आहे. अनुभव घेणे हे जागृत अवस्थेचे लक्षण
आहे. बालपणी कधीतरी घराच्या दाराजवळ, अंगणात पाणी आल्यावर किंवा ओहोळाच्या पाटाचे
पाणी वाहू लागल्यावर त्यात कागदी होड्या सोडण्याचे उद्योग आपण सर्वानीच केलेले असतील.
पण त्याक्षणी आपल्या घरातल्या मोठ्यांच्या समोर कोणत्या अडचणी उभ्या असतात हे आपल्या
गावीही नसतं. त्या समजाव्यात असं आपलं वयही नसतं म्हणा! अगदीच नाही म्हणायला, अंगावर
शहारे आणत रस्त्यावरून एकटेच फिरणारे एखादे भेदरलेले कुत्र्याचे पिल्लू आपल्या बालमनाचा
ठाव घेतं.
पूर्वी
काय नि आजही काय, पाऊस बेभान होऊन बरसायला लागला की अवतीभोवतीचा परिसर हा नववधूने
शृंगार केल्यासारखा हिरवागार दिसू लागतो. बालपणी पायात चपला नसायच्या तेव्हा मोकळ्या
पायाने घराच्या बाजूच्या माळरानावर मित्रांसोबत पायानेच एकमेकांवर वाहणारं पाणी उडवताना
कधीकधी पाय घसरून पडायला व्हायचं. वारा सुरू झाला की छत्र्यांचे कमळ व्हायचे.
अनेकदा धुक्याच्या पांघरूणात आपलं घरही अस्पष्ट दिसायचं. ग्रामीण कोकणातली मुलं
ओलेचिंब होऊनच शाळेत पोहोचायची. मुसळधार पावसापुढे रेनकोट,
छत्रीचा टिकावही लागायचा नाही. शाळेत दिवसभर कुडकुडत बसावं लागायचं.
शाळा सुटल्यावर भर पावसात रानवाटा तुडवत, धावत, शर्यती लावत मुलं घराकडे निघायची. घरात
आल्यावर पहिल्यांदा कुठं जायचं तर पिरश्याजवळ! ‘पिरसा’ पावसाळ्यात उबेसाठी सतत जळणाऱ्या
एखाद्या लाकडाची चुल किंवा धग होय. कधीकधी हे पेटते लाकूड आढ्याला दोरीने बांधून खाली
लाकडे पेटवून जाळ करत. पिरसा ही पावसाळ्यात शेतीचे कपडे आणि विशेषता घोंगडी
सुकवण्यासाठी तयार केलेली बांबूच्या लाकडाची चौकट ज्याला दांडी म्हणत. ज्याखाली भिंतीलगत
आग पेटवलेली असायची. याच्या आधारे आजूबाजूला घोंगडी, शेतीचे कपडे वाळत घातले जातं.
पिरसा |
पिरश्याची
धगधगणारी आग पावसात बाहेरून शेतीचं काम करून आलेल्यांना उब द्यायची. पिरश्यावर पाठ,
कंबर शेकवली की दिवसभराचा त्रास जरा कमी वाटायचा. ही आग दिवसभर
पावसात गारठलेलं शरीर उबदार करायची. दमलेल्या शरीराचा थकवा घालवायची. या पिरश्यात काजू
किंवा फणसाच्या वाळवलेल्या आठला भाजून खाण्यातला आनंद शब्दातीत. कारण पिरश्यावर
भाजून खाल्लेल्या काजू आणि आटलांची चव अवर्णनीय होती. बाहेर धोधो पाऊस, कोकणी घराच्या
कौलावर सुरु असलेलं पावसाचं संगीत, कौटुंबिक गप्पा, गरमगरम पिठलं-भाकरी, तर कधी रानभाजी
पचवलेल्या ताटातलं बालपण संघर्षाची अफाट क्षमता बाळगून होतं. आज पिरसा आणि हे सारं
अतिदुर्मीळ झालंय. आमची संघर्षाची क्षमता कमीकमी होत चाललीय. मग आम्हाला , ‘...मी इतके
पावसाळे बघितलेत!’ याचा अर्थ कुठून समजणार आहे?
'माचाळ'वासी ग्रामस्थ मांडवकर यांच्या समवेत एक क्षण |
अलीकडे
विरंगुळा म्हणून मोबाईलवर स्क्रोलिंग करताना, ‘...मी इतके पावसाळे बघितलेत!’ या वाक्याचा
गंमतीदार उपयोग केलेला दिसून आला. जुन्याचा आदर करणं जितकं महत्त्वाचं तितकंच नव्याविषयी
विचार करणंही महत्त्वाचं आहे, हे मान्यच आहे. पण सध्याच्या कुटुंबव्यवस्थेत अशा वाक्याचं
गांभीर्य जाणणाऱ्या पिढीसोबत आपण किती जगतोय? तो काळ, ती माणसं, त्यांचा दैनंदिन संघर्ष
किती समजून घेतोय? हा संशोधनाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर सक्रीय वावर
असलेल्या आणि ‘किती पावसाळे बघितले?’ सारख्या वाक्यांचं गांभीर्य प्रसंगी समजू न शकणाऱ्या
पिढीला हे सारं सांगावसं वाटलं. बाकी, आमचा आवडता ऋतू ‘पावसाळा’च आहे.
जळवांचे साम्राज्य असलेल्या मुचकुंदी नदीच्या उगमस्थानी... |
धीरज वाटेकर
२ टिप्पण्या:
भाऊ आपला लेख वाचला आपल्या लेखनातून कोंकणातील ग्रामीण भागातील पाऊसाचा वास्तविक अनुभवायला मिळालं असं वाटलं आभारी आहोत केदार भा.ठाकुर कर्णावती अमदावाद गुजरात
Excellent.My wish is to stay always like this, living quietly in a corner of nature."
टिप्पणी पोस्ट करा