पत्रकारितेच्या
क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी विश्व संवाद केंद्र मुंबई यांचा ‘देवर्षी नारद’
यांच्या नावाने दिला जाणारा पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना (१७ ऑगस्ट,
दादर मुंबई) आम्हाला झालेला आनंद भविष्यातील नव्या संकल्पनांसाठी दिशादर्शक आणि अधिकची
ऊर्जा देणारा आहे.
२५
वर्षे मागे वळून पाहाताना आज, मनातल्या भावना कागदावर उतरवताना झालेली द्विधावस्था
आणि व्यासपीठावरून व्यक्त होताना आलेलं अवघडलेपण आठवतंय. हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या
सूचना आणि माहिती महानिदेशालयाचे महानिदेशक आदरणीय ब्रजेश सिंह (आय.पी.एस.)
यांच्या हस्ते मिळाला याचाही आनंद मोठा आहे. या पुरस्कारासाठी आमची निवड केल्याबद्दल
विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुधीर जोगळेकर सर, परीक्षक
श्रीमती अश्विनी मयेकर (संपादक-साप्ताहिक विवेक), श्री.
प्रसाद काथे (संपादक - जय महाराष्ट्र न्यूज चॅनल), श्री.
प्रणव भोंदे (माजी संपादक - विश्व संवाद केंद्र, मुंबई)
यांना धन्यवाद देतो. तसेच आम्हास नियमित लेखन’बळ’ देणाऱ्या जिज्ञासू वाचकांप्रति मनापासून
कृतज्ञता व्यक्त करतो.
देवर्षि नारद हे ब्रह्मज्ञानी संत, उत्तम प्रभावी वक्ते आणि संवादक
होते. मोठ्या सार्वजनिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांनी आपल्या बोलण्याच्या
आणि संवादशक्तीचा वापर केला होता. आपण त्यांना पहिले वार्ताहर मानतो. त्यामुळे
त्यांच्या नावाचा हा पुरस्कार स्वीकारणे सन्मान आहे. भक्तश्रेष्ठ नारदमुनींना
आम्ही मनोभावे वंदन करतो. पुरस्कार म्हणून मिळालेली देवर्षी नारदमुनींच्या अप्रतिम
शिल्पाची भेट आता आमच्या वैयक्तिक संग्रहालयाची शान वाढवेल.
पत्रकारिता ही फक्त पत्रकारांनीच करावी असं वाटणारा काळ मागे पडल्यालाही
बराच काळ लोटलाय. विश्व संवाद केंद्र हे याची ठोस दखल घेणारे व्यासपीठ आहे. आजकाल प्रामाणिकपणा दुर्मीळ
होत चालला आहे. अस्सल गोष्टी दिसेनाशा झाल्यात. सगळ्यात भेसळ असते. माणसांच्या
विचारातही भेसळ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘दीर्घकालीन यशासाठी ‘विश्वास’ हा
सर्वात कळीचा मुद्दा असतो’ हे नव्या पिढीला समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आपल्याला
आपल्या वर्तनातून ‘आदर्श पत्रकारिता कशी करावी?’ हे सांगता आलं नाही तरी चालेल पण ‘कोणत्या
दिशेने जाऊ नये’ हे तरी ठळकपणे सांगता आलं पाहिजे. हा विचार जपण्याचा प्रयत्न
आम्ही गेली २५ वर्षे केला आहे.
सध्याच्या काळात, आपल्या मताचं (भूमिकेचं) झाड उन्मळून पडू नये एवढी
काळजी आपण घेत राहूया. ती घेण्याचे सामर्थ्य देवर्षी नारदमुनींनी आपल्याला द्यावे,
अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद.
धीरज वाटेकर
पुरस्कार
सोहळा वृत्त लिंक (२१.२७ ते २२.४३ मिनिटे) ::
https://kokanmedia.in/2024/08/17/vishwasamwadkendra-2/
पुरस्कार
सोहळ्याची व्हिडिओ लिंक (२१.२७ ते २२.४३ मिनिटे) ::
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा