![]() |
| दैनिक नागपूर तरुण भारत (पुणे आवृत्ती) |
रियासतकार म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील एक महान आणि व्यासंगी इतिहासकार ‘पद्मभूषण’ गोविंद सखाराम सरदेसाई यांचे कोकणातील मूळगाव असलेल्या लांजा तालुक्यातील गोविळ येथील मूळघराचा शोध घेण्यात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ या संस्थेला नुकतेच यश आले. संस्थेचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी ही माहिती दिली. मराठा साम्राज्याचा सर्वसमावेशक इतिहास 'रियासत' या ग्रंथांच्या माध्यमातून लिहून काढल्याने 'रियासतकार' ही उपाधी सरदेसाई यांना मिळाली होती.

रियासतकार सरदेसाई यांचे गोविळ (ता. लांजा) येथील घर (वाडा)
कोकणातील
राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था कोकणरत्नांचा शोध घेऊन आपल्या ग्रामीण
मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांची चरित्रे समाजासमोर आणण्याचा
सातत्याने प्रयत्न करीत असते. लांजा तालुक्यातील प्रभानवल्लीचे सुपुत्र ज्येष्ठ
समीक्षक वि. शं. चौगुले, कोटगावची स्नुषा झांशीची राणी
लक्ष्मीबाई, रिंगणे गावचे सुपुत्र नाटककार ला.कृ.आयरे, तळवडे गावचे सुवर्णकार जगन्नाथ गंगाराम पेडणेकर, शिपोशी गावचे क्रांतिकारक
गोपाळ गणेश आठल्ये, रत्नागिरीत पहिला छापखाना सुरू करणारे जनुभाऊ
आठल्ये, १८८६ मध्ये कोचीनहून 'केरळ
कोकीळ' मासिक काढणारे कृष्णाजी नारायण आठल्ये, न्यायमूर्ती वैजनाथ विष्णू आठल्ये, राजापूर तालुक्यातील
तळवडेचे ‘पितांबरी’कार रवींद्र प्रभूदेसाई, वाटूळचे
सुप्रसिद्ध प्रवचनकार सु. ग. शवडे (गुरुजी) अशी कितीतरी नावं सांगता येतील. संघाच्या
शिपोशी गावात पार पडलेल्या ग्रामीण साहित्य संमेलनात रियासतकार गोविंद सखाराम
सरदेसाई यांची माहिती देण्यात आली होती. मात्र ज्या गोविळ गावात त्यांचा जन्म झाला
तेथील घराचा शोध लागलेला नव्हता. पुढे ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या
वेळेला लाड हे ठिकठिकाणी सरदेसाई यांच्याबद्दल बोलत होते. दरम्यान ‘हर्दखळे’ गावाचं
गीत तयार करताना लाड यांचा त्या गावातील अनेक लोकांशी संपर्क आला. गावाचे शिक्षक महेश
गुरव यांनी त्यांना आणि त्यांच्या टीमला आपल्या घरी जेवावयास बोलावले. त्या वेळेला
त्यांनी 'आपण गोविळ गावात शिक्षक आहोत' असे सांगितले. लाड यांनी तातडीने त्यांना गो. स. सरदेसाई यांच्या
घराबद्दलची माहिती विचारली. गुरव यांनीही, ‘शोध घेऊन सांगतो’ असे उत्तर दिले.

घराचे मालक - विलास नारायण सुर्वे
सध्या
देशभर सुरु असलेले जनगणनेचे काम स्थानिक शिक्षक करीत आहेत. या दरम्यान गुरव यांना गोविळ
गावात मूळवाडीमध्ये वस्तीपासून थोडेदूर, डोंगरात
एका बाजूला झाडांनी वेढलेले पण गावातल्या घरांपेक्षा वेगळ्या ठेवणीचे चौसोपी आणि
माडीचे घर दिसले. त्यांनी उत्सुकतेने घरमालक विलास सुर्वे यांना घराबद्दलची विचारणा
केली तेव्हा सुर्वे यांनी, ‘हे घर आपल्या वडिलांनी १९४५मध्ये सरदेसाई यांच्याकडून
विकत घेतले’ असे सांगितले. गुरव गुरुजींना तेव्हा लाड यांची आठवण झाली. त्यांनी
तात्काळ भांबेड हायस्कूलचे जयराज मांडवकर यांना आणि मांडवकर यांनी लाड यांना हे कळविले.
लाड यांनी नुकतीच महेश गुरव (गुरुजी), जयराज मांडवकर (सर)
आणि संघाचे पदाधिकारी महेंद्र साळवी यांचेसह गोविळ गावातल्या गो. स. सरदेसाई वाड्याला
भेट दिली. तो ऐतिहासिक वाडा पाहून डोळ्यांचे पारणे फिटल्याचे लाड म्हणाले. १९४५मध्ये
विकत घेतलेला तो वाडा जसा होता तसाच आजही उभा आहे. याबद्दल त्यांनी वाड्याचे मालक विलास
सुर्वे यांचे आभार मानले. त्याकाळात इतिहासकार म्हणून सुशिक्षित लोकांमध्ये गो. स.
सरदेसाई यांचा मोठा बोलबाला होता. एका मोठ्या व्यक्तीचं आणि वैशिष्ट्यपूर्ण
ठेवणीचं घर आपण घेतलेलं आहे याचे भान सुर्वे यांच्या वडिलांना पूर्णपणे होते. त्यांनी
या घरामध्ये कोणताही बदल करायचा नाही अशी सक्त ताकीद आपल्या मुलांना दिली होती,
अशी माहिती सुर्वे यांनी दिली. सुर्वे यांचे वडील गिरणीत चांगल्या हुद्द्यावर काम
करीत होते. त्यामुळे ते हे घर आणि सोबतची पंधरा एकर जागा विकत घेऊ शकले. त्यांनी
मुंबईहून बोटीने आणलेला शिसव लाकडातला कोरीव काम केलेला पलंग आणि अशा काही वस्तू कुटुंबीयांनी
जपल्या आहेत.

शोधकर्ते सुभाष लाड (मध्यभागी) आणि सहकारी
रियासतकार
गोविंद सरदेसाई यांचा जन्म सखाराम व गंगाबाई (लक्ष्मीबाई) या दाम्पत्याच्या पोटी
याच वाड्यात १७ मे १८६५ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जवळच्या शिपोशी
गावातल्या प्राथमिक शाळेत झाले. ती शाळा इमारत शिपोशी गावाने आजही जपून ठेवलेली
आहे. पुढील शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले. १८८४ मध्ये ते मॅट्रिकला रत्नागिरीत
असतांना गंगूताई किर्तने या मुलीशी त्यांचा विवाह झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन
महाविद्यालयांतून १८८८ला ते बी.ए. झाले. नंतर ते बडोद्यास सयाजीराव गायकवाड
यांच्याकडे दरबारी वाचक-अध्यापक म्हणून नोकरीस लागले. पुढे त्यांना तिथेच हिशेब
तपासणीस म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. सयाजीरावांच्या बरोबर त्यांना परदेश
दौरे करण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांना इतिहासाची आवड निर्माण होऊन
बडोद्यात त्यांनी मुघल रियासत लिहून पूर्ण केली. त्यांनी आपले छोटे भाऊ दिनकर यांना
शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. सयाजीरावांनी दिलेल्या आर्थिक सहकार्यामुळे दिनकर हे
परदेशी जावून नेत्रतज्ञ होऊ शकले. त्यांनी पुण्यातील तळेगाव येथे इस्पितळ उभारून
जनसेवेला सुरुवात केली. रियासतकार बडोद्याहून ३६ वर्षांनंतर १९२५ला सेवानिवृत्त
झाले. तत्पूर्वी डॉ. दिनकर यांनी आपल्या भावाला सेवानिवृत्तीनंतर एकाग्रपणे इतिहास
लेखन करता यावे म्हणून कामशेत येथे बंगला बांधला. रियासतकार सेवानिवृत्त
झाल्यानंतर ते या बंगल्यात आले ते त्यांच्या मृत्यूपर्यंत (९ नोव्हेबर १९५९)
वास्तव्यास होते. कामशेत येथे राहून आपले उर्वरित आयुष्य रियासतकारांनी केवळ
इतिहास लेखनाला समर्पित केले. प्रसिद्ध इतिहासकार सर जदुनाथ सरकार यांच्या
प्रेरणेने त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासातून मराठी
रियासत : ८ खंड, मुसलमानी रियासत : ३ खंड, ब्रिटिश रियासत : २ खंड, 'पेशवे दप्तर' ४५ खंड तयार झाले. मराठा
साम्राज्याच्या इतिहासातील अतुलनीय लेखन कामगिरीबद्दल भारत सरकारने १९५७ मध्ये
त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित
केले. लाड यांनी रियासतकारांचे पणतू जयदीप यांच्याशी संपर्क साधून कामशेतमधील बंगल्यालाही
भेट दिली होती.
हा
वाडा काहीसा अपूर्णावस्थेत आहे. तो चौसोपी असला तरी तीनच बाजू पूर्ण असून
पश्चिमेला असलेली बाजू राहून गेली असावी. मधले रांजणही सुंदर आहे. पूर्वेकडे दर्शनी
बाजू असून घराची माडी अधिक आकर्षक दिसते. चार फूट उंचीचा जोता घडीव दगडात चुनखडीचा
वापर करून बांधला आहे. समोरील भागात सहा लाकडी खांब असून ते दगडी ताशीव उठाळ्यावर
उभे आहेत. माडीचा भाग ही मोकळा व प्रशस्त असून लाकडी रेजे बसविल्याने बंगलीला
श्रीमंती थाट आला आहे. माडीच्या मजबूत फळ्या आजही सुस्थितीत आहेत. घरातील त्या
काळातील वापरात असलेल्या अनेक वस्तू जपून ठेवलेल्या आहेत. घराच्या भिंती दगडा
मातीच्या दीड फूट रुंदीच्या असून त्यावर एक इंच जाडीचा चिकण मातीचा मुलामा दिलेला
आहे. कालपरत्वे बऱ्याच ठिकाणी तो मुलामा निघाल्यामुळे आतील दगड दिसू लागले आहेत. घराला
वेळोवेळी रंग देणे तसेच पॉलिश करणे हे फारच महागडे असल्याने त्याचे जीर्णपण दिसून येते
आहे. गोविळमधील वास्तूला तशाच स्थितीत ठेवण्याच्या दृष्टीने, ‘आपणही काही मदत करू’
असे त्यांचे आश्वासन लाड यांना जयदीप यांनी दिले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा