रविवार, २० ऑक्टोबर, २०१९

स्वर्गीय अनुभूती देणारा 'वाघवरंडा' !


पावसाला परतीचे वेध लागल्यावर सह्याद्रीतील बहरलेला निसर्ग डोळे भरून पाहण्यासारखा असतो. फोटोग्राफीसाठी तर दिसेल तो क्लिक ‘उत्कृष्ठ’ असण्याचा हा काळ. हिरव्यागार निसर्गाची मानवाने केलेली सारी वर्णने ‘याचिदेही याचिडोळा’ पाहायला मिळतात ती आत्ताचं ! सह्याद्रीतील कोणत्याही घाटात, पठारावर, सड्यांवर, खोलदऱ्यांत, पाउलवाटांच्या सभोवती हमखास हे दृश्य नजरेस पडतं. या स्वर्गीय सौंदर्याचा पृथ्वीवरील कालावधीही फारसा लांबलचक नसतो. ‘तो कधी बहरेल नि कधी लुप्त होईल ?’ हे सांगणंही तसं कठीण. सह्याद्रीत, निसर्गात सतत भटकंती करणाऱ्या भटक्यांना अशा लोकेशन्सचा चांगला अंदाज असतो. मागच्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस (२९ सप्टेंबर २०१९) सह्याद्रीतील अशाच एका शब्दात सहज पकडता न येणाऱ्या निसर्गात रममाण होण्याचा योग आला. नव्याने होऊ घातलेल्या शिवडाव-सोनवडे-घोटगे घाट रस्त्याच्या पठारावरील नाईकवाडीची स्वर्गीय अनुभूती असलेल्या अन् टच ‘वाघवरंडा’ विषयी !

    नाईकवाडीचा 'वाघवरंडा' परिसर दुर्लक्षित आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटीहून पाटगावला जाणाऱ्या रस्त्याने आपण प्रवास करायला लागलो की पाटगावच्या अलिकडे ४ कि.मी. अंतरावर शिवडाव लागते. तिथून उजवीकडे वळले की तो रस्ता आपल्याला नाईकवाडीला घेऊन जातो. आपण थेट नाईकवाडीचा शेवटचा स्टॉप असलेल्या धनगरवाड्यापर्यंत पोहोचायचे. हे अंतर साधारण १ कि.मी. असेल ! पुढचा प्रवास पायी किंवा काही अंतरापर्यंत मोटारसायकलनेही करता येतो. इथून चालायला सुरुवात केल्यानंतर मिनिटभराच्या अवधीतच आपल्याला भव्यदिव्य निसर्ग दर्शन होणार असल्याची जाणीव होते, ही सड्यावरच्या निसर्गाच्या वेगळेपणाची किमया ! कोकणातून वर पाहाताना सोनवडे-घोटगे (कुडाळ) गावातून सह्याद्रीचे जे विशाल दर्शन घडते, त्या सह्याद्री पर्वतरांगेच्या विस्तीर्ण पठारावर आपण असतो. सुरुवातीला आपल्याला बारकासडाभेटतो. इथे तसे सगळे सडेच भेटतात. सध्याच्या वातावणात हिरवाईने फुललेल्या या सड्यांमधून वाट काढत चालण्याचा, प्रसंगी वाट चुकल्यास ती हुडकण्यातला आनंद शब्दात काय वर्णावा ? तो प्रत्यक्ष अनुभवायलाच हवा. तर बारक्या सड्यावरून पुढे निघालो की किरवीसडाभेटतो. इथे किरवी (खेकडे) आढळतात. आम्हालाही काही दिसले. किरवीचा सडा सोडून काही वेळात आपण आपले मुख्य लक्ष असलेल्या वाघ वरंडायेथे पोहोचतो. हे ठिकाण त्या सह्याद्री रांगेच्या अगदी टोकाला आहे. तिथला डोंगराचा तुटलेला आकार, त्यातून दिसणारी खोल दरी, या दिवसात ज्यांच्याकडे नीटसे पाहायची पण हिम्मत होणार नाही असे जवळून कोसळणारे धबधबे दिसतात. या परिसराला वाघवरंडा का म्हणतात ? ते तिथे पोहोचल्यावर समजते. सारेच अतिभव्य, डोळ्यात न मावणारे धबधबे जिथून सुरु होतात, आपण तिथे असतो. सोसाट्याचा वारा असेल तर पाटणनजीकच्या (सातारा) उलट्या धबधब्याची आठवण व्हावी. इथल्या निसर्गाचा गंध, निसर्गाचा आवाज सारं रम्य ! खरंतर हाही एक कडाच ! याच्या खोल दरीत आपल्याला गडनदीचे दर्शन होते. या नदीचा उगम रांगणा किल्याच्या परिसरात असला तरी इथल्या धबधब्याचं पाणीही तिलाच भेटायला जातं. ही नदी कोकणात मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करताना कणकवलीच्या पुढे भेटते. कदाचित वाघाच्या येण्याजाण्याच्या मार्गाच्या संदर्भामुळे या ठिकाणाला हे नाव पडलेले असावे. वाघाच्या नावाने सह्याद्रीत नेमक्या ठिकाणांना अशी नावे दिलेली आढळतात. नाईकवाडीच्या धनगरवाडीतून वाघ वरंडा येथे पोहोचायला जेमतेम अर्धा तास लागतो. गारगोटीहून नाईकवाडी हे ठिकाण ३४ कि.मी. आहे. पावसाळा संपल्यानंतरच्या हिवाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात फुलांचे वेड संपत नाही. माहित असलेली-नसलेली सृष्टीतील असंख्य झाडे, वेली फुलतात. त्यामुळे या भागातील आमचाही जंगलप्रवास अनोखा, चैतन्यदायी, गूढरम्य, भौतिकसुखाची विसर पडणारा ठरला. इतका की त्या जंगलातील पायवाटांवरून चालताना, संवेदनशील मन मातीत, झाडाझुडुपात, पाखरांत, रानवाटात गुंतून पडलं नि वेळेचं भानही राहिलं नाही. हा सारा परिसर सध्या तरी एका अद्भूत निसर्गशक्तीचे माहेरघर बनून राहिला आहे. त्या उंच कड्यावरून खोल दरीत पाहाताना नजरेला दिसणारे दृश्य निव्वळ विहंगम होते. पायाखालची हिरवाई आकाशातल्या निळाईशी स्पर्धा करत होती. त्यावर लक्ष ठेवण्यासाठीच जणू जमिनीवर उतरू पाहणाऱ्या ढगांची पळापळ सुरु होती. हा घाटमार्ग सुरु झाल्यास कोकण पर्यटनासह या भागातील पाटगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज यांचा मठ, भद्रकाली मंदिर, मौनीसागर जलाशय, स्वयंभू मंदिर, भगवान शंकराची प्राचीन सिद्धगुहा, रांगणा किल्ला, शिवकाळात संदेशवहनासाठी वापरात असलेले ठिकाण जोगाधोंडा, नाईकवाडीचे धबधबे, सोनवडे गावाला लागून असलेला शिवकालीन सोनगड किल्ला ही ठिकाणे पर्यटकांसमीप येतील. वाघ वरंड्याच्या पुढे या परिसरातील उंच ठिकाण किल्ले भुदरगडाच्या उंचीशी स्पर्धा करणारा या भागातील टकमक कडा, वाघबीळ असून हाही भाग खोल दऱ्याखोऱ्यांनी नटलेला आहे.

   कोल्हापूरहून सिंधुदुर्गमार्गे गोव्याचे अंतर किमान ४० किलोमीटरने कमी करणारा गारगोटी मार्गावरील हा घाट अस्तित्वात यावा याकरिता गेली चार दशके स्थानिकांचे प्रयत्न सुरु आहेत. केंद्रीय पर्यावरण विभागाच्या पथकाकडून या घाटमार्गाचे सर्वेक्षण होऊन सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायु परिवर्तन मंत्रालयाकडून ना हरकत दाखले अलिकडेच प्राप्त झाले आहेत. कोकणाला जोडणारा हा मार्ग कोल्हापूरातील ३.८४ कि.मी. तर सिंधुदुर्गमधील ८.०३ कि.मी. असा एकूण ११.८७ कि.मी. अंतर वनविभागाच्या हद्दीतून जात आहे. यात काही ठिकाणी उड्डाणपुल, लहानमोठे ब्रीज प्रस्तावित आहेत. अत्यंत विपरीत भौगोलिक परिस्थितीमुळे शिवडाव-सोनवडे-घोटगे हा ११.८७ किलोमीटर लांबीचा घाटमार्ग तयार होण्यास प्रारंभापासून तीन वर्षाचा लागू शकतो,  असे तज्ज्ञांचे मत आहे. अंतर कमी असले तरी परिसर पाहाता हे काम आव्हानात्मक असेल. या रस्त्यामुळे राधानगरी राष्ट्रीय वन्यजीव अभयारण्याचे परिक्षेत्र बाधित होत आहे. त्यामुळे वन्यजीव भ्रमण, रस्ता ओलांडणे याकरिता आवश्यक छोटेपूल, रबलींग स्पीडब्रेकर, रस्त्यावर रंगीत पट्टे, माहितीफलक, इ. गोष्टी या मार्गावर असतील. वन्यजीवांना कोणत्याही प्रकारची दुखापत होऊ नये असा प्रयत्न असणार आहे. या रस्त्यावर टनेलऐवजी उड्डाणपुल, ओव्हरपासेस, जागोजागी मोरी बांधकामे करण्यामागचा हेतू हाच आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा घाटमार्ग रात्रीच्यावेळी वाहतुकीस बंद असणार आहे. या परिक्षेत्रात हॉटेल्स आदि व्यवसाय करण्यास बंदी असणार आहे. सी.सी. टीव्ही कॅमेऱ्याद्वारे वन्यप्राण्यांच्या वावराच्या नोंदी ठेवण्यात येणार आहेत. या घाटमार्गात टोलनाका प्रस्तावित आहे. रस्त्यासाठी सोनवडे (सिंधुदुर्ग) ते शिवडाव (कोल्हापूर) या हद्दीत वृक्षतोड होणार आहे. तेवढ्या झाडांची नव्याने लागवड करण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. विकासाच्या रूपाने रस्ता व्हावा म्हणून आपण जितके आग्रही असतो तितकेच आग्रही आपण वृक्षलागवडीसंदर्भात होणे आवश्यक आहे. सन १९८५ साली प्रथमतः या मार्गाची मागणी करण्यात आली होती. पुढे सन १९९९ ला या घाटास मान्यता मिळून प्रत्यक्ष काम सुरु झाले. मात्र या भागातील वन्यजीवांच्या संचारामुळे काम थांबले होते.

 वाघवरंडा सारख्या उन्हाळ्यात ओसाड पडणाऱ्या असंख्य कड्यांवर पावसाळ्यात नंदनवन फुलतं. हे वैभव पुढे हिवाळ्याचा काही काळ टिकून असतं. खरंतर पाऊस पडायला लागला की जमिनीवर पडलेल्या बिया, जमिनीतले कंद फुलतात. जमिन हिरवीगार होते. पठारावर, डोंगर उतारांवर रानफुले फुलतात. विविध जाती, रंग, आकार यांमुळे ती लक्षवेधक ठरतात. सप्टेंबर अखेर पर्यंत या फुलांची सड्यांवर चादर पसरते. सह्याद्रीतील असं पुष्पवैभवी पठार म्हटलं की आपल्याला कासची आठवण येते. अर्थात यायलाच हवी. कास पठाराइतकं पुष्पवैविध्य सह्याद्रीत इतर नाही. तरीही रानफुले पाहाण्यासाठी कास एकमेव नाही. सहज पाहाता येण्यासारखी या दिवसातील स्वतःची नैसर्गिक श्रीमंती सांभाळणारी खूप ठिकाणे-सडे पश्चिम महाराष्ट्रात-कोकणात आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून साधारण ८/१२शे मीटर उंचीवर पठारे आढळतात. कोकणातही समुद्रसपाटीपासून २०० मीटर उंचीपर्यंत मोठाले सडे आहेत. या खडकाळ पठारांवर मातीचा अगदी पातळ असल्याने त्यावर मोठे वृक्ष, झुडपे वाढू शकत नाहीत. हे सडे वर्षातील ८ महिने कोरडे असतात. उन्हाळ्याच्या दिवसांत तर हे सडे तव्यासारखे तापतात. पावसाळ्यात यांवर पाणी साचते. तळी, डबकी बनतात. शेवाळे आणि दगडफुलाचे (lichen) आवरण इथे हमखास भेटते. या पठारावरील वनस्पतींचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची फुले होतं. पिवळी, गुलाबी, निळी, पांढरी, जांभळी फुले पाहून परागीभवन करणारे कीटक, माशा, मधमाशा, भुंगे, फुलपाखरे तिथे पोहोचतात. याद्वारे बीजनिर्मितीला मदत होते. दुर्दैवाने सरकारी नकाशात आजही अशा अनेक पठारांची नोंद ‘wasteland’ म्हणजे पडीक, नापिक जमीन अशी आहे. त्यामुळे त्यावर अनेक प्रकल्प उभारले गेलेत, जाताहेत. कोकणात तर चिर्‍यांच्या खाणीत या सड्यांचे अस्तित्व संपले आहे. लाखमोलाच्या जैवविविधतेचे नुकसान झाले, आजही होत आहे. आपल्या महाराष्ट्रातील पठारे अमूल्य ठेवा आहे. यावरील विविधता महत्त्वाची आहे. त्यांच्या संरक्षणासाठी योग्य ते प्रयत्न आवश्यक आहेत. आपण पाचगणीचे टेबललँड (पठार/सडा), कोल्हापूरजवळचे मसाई पठार, पुरंदरचे पठार, कराडजवळील वाल्मिकी पठार, कोकणातील सडे पाहिलेले असतात. पावसाळा वगळून अन्य वेळी ते तपकिरी शुष्क, कोरडे, उघडे दिसतात. या सड्यांवर स्थळविशिष्ट विविधता असलेल्या वनस्पती, कीटक, प्राणी, अल्पकाळ पाणी असले तरीही मासे, सरिसृप, वटवाघळे, पक्षी, फुलपाखरे, गवारेडे, बिबटे यांचा वावर असतो. स्थानिकांची गुरेढोरे तेथे चरतात. धनगर समाज बांधवांची संस्कृती तिथे नांदते.

   सृजन हो ! वाघवरंडासारखी सौंदर्याची परिसीमा गाठणारी पुष्कळ ठिकाणं सह्याद्रीत आहेत. दीर्घकाळ रमलेला यंदाचा पाऊस परततोयं ! सह्याद्री हिरव्यागार रंगाची सर्वत्र बेमालूम उधळण करतो आहे. निसर्गातील हिरवाई आपल्याला जगण्याची नवी उर्जा प्रदान करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिथे पोहोचल्यावर मिळणारा आनंद केवळ स्वर्गीय असतो. हे दृश्य इथून पुढच्या काळात दिवसागणिक धूसर होत जाईल. त्याची नजाकत अनुभवण्यासाठी आपलीही पाऊलं घराबाहेर पडायला हवीत ! आपल्या सह्याद्रीचा पश्चिम घाटमाथा जितका जंगलसंपदेने समृद्ध तितकाच विस्तीर्ण पठारानेही समृध्द आहे. अशाच वाघवरंडाची ही सफर आपण अनुभवलीत. आपल्याही अवतीभवती असे पठार, सडे असतील. सध्याच्या मौसमात त्यांवर जात चला ! निसर्गाचा आनंद घ्या. सड्यांवर पाऊलं वळायला लागली की त्यांना महत्व येईल. त्यांच्या जोपासनेचे, संवर्धनाचे महत्व समाजाच्या लक्षात येईल. निसर्ग जपला जाईल.

धीरज वाटेकर

पत्ता : विधीलिखित’, १२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८ई-मेल - dheerajwatekar@gmail.com,  ब्लॉग  : dheerajwatekar.blogspot.com

(धीरज वाटेकर हे पर्यटन आणि चरित्र लेखनया विषयावरील प्रकाशित आठ पुस्तकांचे लेखक असून कोकण इतिहास, पर्यटन, ग्रंथ चळवळ, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली १ वर्षे कार्यरत पत्रकार आहेत.)
                            
नाईकवाडीचा वाघ वरंडा

वाघ वरंडा कडे जाताना वाटेत साठलेल्या पाण्यात उतरलेले ढग 

वाघ वरंडा कडे जाताना वाटेत भेटणारा बारका सडा 

वाघ वरंडा सड्यावर स्थानिकाशी संवाद साधताना ब्लॉगलेखक  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...