गुरुवार, ६ मार्च, २०२५

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली - परिसंवाद - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब


        चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा फोडण्याची गरज आहे. देशातील एकूण परिस्थितीवर साहित्यिकांनी आपली भूमिका मांडली पाहिजे. लेखक मांडू पाहाणारे वास्तव समाजाला पचणार आहे का? साहित्यात पडलेले प्रतिबिंब सहन करण्याची मानसिकता आजच्या समाजामध्ये राहिली आहे का?समाज तेवढा सहिष्णू आहे का? असे प्रश्न उपस्थित करत राजकीय स्थित्यंतराचे मराठी साहित्यात प्रतिबिंब उमटणारच असल्याची भूमिका पत्रकार-लेखक धीरज वाटेकर यांनी मांडली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आयोजित नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभामंडपात "राजकारणाचे मराठी साहित्यावर उमटणारे प्रतिबिंब" या विषयावरील परिसंवादात वाटेकर यांनी आपली भूमिका मांडली.

वाटेकर पुढे म्हणाले, राजसत्ता स्वकीय असेल वा परकीय, राजकारण स्वमताचे असेल वा भिन्न मताचे. काहीही असले तरी राजकीय व्यक्तिमत्त्वे ही समाजाचे अभिन्न अंग असतील तर समाजमनात राजकारणाचे प्रतिध्वनी उमटणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. मराठी साहित्याच्या उगमाकडे जाताना महानुभाव साहित्य, ‘गाथा सप्तशती’, संत तुकारामांचे पाईकीचे अभंग, समर्थ रामदासांची पत्रे दासबोध आदित तत्कालीन राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. गोडसे भटजी वरसईकरांच्या ‘माझा प्रवास’ या प्रवासवर्णनात संस्थानिकीय राजकारण आणि ब्रिटीश राजसत्ता याचे दर्शन घडते. मराठी मधील म्हणी, वाक्प्रचार, जात्यावरच्या ओव्या, अभंग, लोककलावंतांची गाणी, लोककलांतील संवाद यातूनही राजकीय प्रतिबिंब पडलेले दिसते. महाराष्ट्रात टोपणनावाने मार्मिक लिहिण्याची परंपरा आहे. बघ्याची भूमिका, कलंदर, ठणठणपाळ, सख्या हरी, ब्रिटिश नंदी, तंबी दुराई आणि १९४० मध्ये गाजलेले ‘आलमगीर’ ही टोपणनावे सदाबहार ठरलीत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कोणत्याही स्वरूपातील दंभाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारी ही सदरे आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या व घडणाऱ्या घडामोडींवर खुसखूशीतपणे टिप्पणी करणारी राहिली आहेत. ही लेखने वाचणाऱ्याला भावत आली आहेत, वाचकाला स्वतःची प्रतिक्रिया वाटत आली आहेत. राजकारणाचे साहित्यात उमटलेले प्रतिबिंब यात दिसते. १९३८साली अध्यक्षपदावरून बोलताना, सावरकरांनी ‘लेखण्या मोडा बंदुका घ्या’ असे आवाहन केले होते. ‘ज्या देशाचा इतिहास दुबळा त्याचं साहित्यही दुबळं होतं तेव्हा आधी देश बलशाली करा’ अशी त्यामागची भावना होती. तत्कालिन राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब आपणास आचार्य अत्र्यांच्या १९४२च्या नाशिकमधील भाषणात पाहावयास मिळते. १९४६ साली माडखोलकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या एकभाषी प्रांताला गांधीजींची परवानगी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. कवी यशवंत (१९५०) यांनी गांधीहत्त्येनंतरच्या राष्ट्रीय विध्वंसाची दखल घेतली होती. ‘गदिमा’च्या ‘बामणाचा पत्रा’लाही काहीशी याची पार्श्वभूमी आहे. लोकहितवादींची शतपत्रे, महात्मा जोतीराव फुले यांचे ‘शेतकऱ्याचा आसूड‘, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची 'निबंधमाला', ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे यांचे ‘काळ’ नियतकालिक यातही आपल्याला राजकीय प्रतिबिंब भेटते. नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ हे राजकीयदृष्ट्या सर्वात गाजलेले आणि सत्ताधाऱ्यांनी बंद पाडलेले नाटक होय. गो. पु. देशपांडे यांनी संपूर्णपणे राजकीय वैचारिक नाटके सातत्याने लिहिली आणि त्यांची एक वेगळी स्वतंत्र वाट मराठी रंगभूमीवर निर्माण केली होती. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेली 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जिवाची होतीया काहिली!' ही लावणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतिशय गाजली होती.

कोकणातील कवी अरुण इंगवले यांच्या ‘आबूट घेऱ्यातला सूर्य’मधील कविता याही राजकारण, जात, धर्मांधतेवर प्रखर टीका करणाऱ्या आहेत. ‘एकविसाव्या शतकावरील समर्थ भाष्य’ करणाऱ्या आहेत. प्रा. संतोष गोनबरे यांच्या ‘माकडहाड डॉट कॉम’मध्ये प्राणीसृष्टीचा वावर कालातीत संदर्भांसह उपहासगर्भ कथेच्या फॉर्ममध्ये आणलेला आहे. राजकीय प्रतिबिंब अंगाने मराठी कादंबरीकडे पाहात बरेच मागे गेलो तर द्वा. ना. रणदिवे यांच्या 'शिक्षक' (१८८३) या कादंबरीचा उल्लेख करावा लागतो. रत्नागिरी जिल्हा बँकेचे चेअरमन डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मॅडम सभापती, गँगरिन, सूड या कादंबऱ्यात राजकीय प्रतिबिंब आहे. ‘आज राजकारणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे अधिकाधिक विषय लेखकांना मिळू शकतात.’ असं डॉ. चोरगे यांनी नमूद केलं आहे, ते वास्तव आहे. अर्थात मोजके साहित्य सोडले तर मराठी साहित्यात निखळ राजकीय प्रतिबिंब असणारे साहित्य फारसे आढळत नाही. राजकीय व्यंगचित्रांना वाहिलेले एका अर्थाने प्रतिबिंब उमटवणारे ‘मार्मिक’ सारखे राजकीय क्षेत्राला वाहिलेले नियतकालिक मराठीत आढळत नाही. कन्नड आणि बंगाली साहित्याच्या पार्श्वभूमीवर सद्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य करण्यासाठी मराठी लेखक धजावत नाहीत हे वास्तव आहे. मराठीत राजकारणाचे प्रतिबिंब उमटलेल्या साहित्यकृतीतील लेखक व नायक हे अपवाद वगळता संपादक किंवा पत्रकार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची विधानपरिषदेवर वर्षभर नियुक्ती व्हायला हवी आहे. एकमेकांची निंदा नालस्ती करण्यासाठी राजकीय पुढारी जी असभ्य मराठी भाषा जाहीर व्यासपीठावरून वापरतात ती बंद व्हायला हवी. आजकाल साहित्य संमेलनात राजकारणाचे प्रतिबिंब विविध राजकीय नेतृत्वाच्या निमित्ताने दिसते. ते स्वागतार्ह आहे. पण साहित्यात तितकेसे प्रतिबिंब दिसत नाही.

ज्येष्ठ संपादक लेखक जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात डॉ. समीर जाधव, शैलेश पांडे, सुरेश भटेवरा आणि संजय आवटे या पत्रकारिता आणि संपादन क्षेत्रातील ज्येष्ठ सहभागी झाले होते. साहित्यातून मराठी राजकारणाचे प्रतिबिंब उमटत नाही. मराठी साहित्यिक वेगवेगळ्या विषयांवर लिहितात. राजकारण आज ज्या दिशेला चालले आहे त्याला एक नवे वळण देण्याचे काम मराठी साहित्यिक करतील का? असे प्रश्न या परिसंवादातून उपस्थित करण्यात आले. वाटेकर यांना या परिसंवादासाठी मराठी इतिहास व साहित्याचे व्यासंगी अभ्यासक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ कवी-समीक्षक अरुण इंगवले, ज्येष्ठ पत्रकार प्रा. राजेंद्रप्रसाद मसुरकर, कोकणातील लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे, वडिल साहित्यिक मच्छिन्द्रनाथ वाटेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
















 

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक

संमेलनाध्यक्ष दिनकर गांगल (सर) 

कोकणात ग्रामीण साहित्य संमेलनांचा प्रयोग यशस्वी करणाऱ्या राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी २०२५ला वाटूळ (राजापूर) येथे संपन्न होत आहे. प्रसिद्ध प्रयोगशील विचारवंत आणि रत्नपारखी संपादक-पत्रकार आदरणीय दिनकर गांगल (जन्म - २५ नोव्हेंबर १९३९, रोहा-रायगड) सर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. सरांच्या रूपाने या ग्रामीण साहित्य संमेलनाला, मराठी भाषा व साहित्याबाबत चतुरस्त्र विचार करणारे आणि अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारे अध्यक्ष लाभले आहेत. शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित मराठी शाळा सर्वत्र बंद पडत आहेत. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर सरांचे अध्यक्ष होणे ग्रामीण भागातील साहित्यप्रेमींना बौद्धिक दिशादर्शक ठरावे.

कमालीचे साधे, प्रेमळ विनम्र, ठाम आणि सुस्पष्ट विचार असलेले गांगल सर हे महाराष्ट्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा येथे २०११साली संपन्न झालेल्या १३व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे सरांचे आवडीचे विषय आहेत. त्यांची साहित्य व संस्कृती क्षेत्रातील कारकीर्द सहा दशकांची राहिलेली आहे. सरांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली आहे. त्‍यांनी साकारलेली ‘महाराष्ट्र टाइम्स‘ची रविवार पुरवणी विशेष गाजली होती. सरांना ‘फीचर रायटिंग‘ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली होती. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. 'फीचर रायटिंग' मधले बापमाणूस अशी त्यांची ओळख यातूनच निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वाटचालीत, घडामोडीत, जडणघडणीत सरांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचिताचे साक्षीदार असणारे गांगल सर वयाच्या ८५व्या वर्षी अमाप उत्साहाने काम करतात हे आमच्यासारख्यांना आदर्शवत आहे. सर अत्यंत धडपडणाऱ्या व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांच्या सहवासात अनेकांना नवी दृष्टी मिळाली आहे. साहित्य आणि सामाजिक व्यवहारातली अनेक माणसं ज्या वयात कालबाह्य झालेली पाहायला मिळतात, त्या वयात सरांचा डोळस सार्वजनिक वावर आश्वासक वाटतो. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ सरांच्या ठायी असल्याने आम्हालाही गांगल सर खूप जवळचे वाटतात. सरांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन), क्षितीज अपार आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड‘ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. सरांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती‘चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ‘ व ‘मराठा साहित्‍य परिषद‘ यांचे संपादनाचे पुरस्‍कार, जागतिक मराठी परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्‍कार आणि वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण‘ पुरस्‍कार प्राप्त झाला आहे.

कार्यरत होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर सरांनी १९५७ पासून प्रथम 'केसरी' नंतर 'सकाळ'मध्ये काम केले. १९६४ पासून ते 'महाराष्ट्र टाइम्स'शी अखंड जोडले गेले. सुधीर नांदगावकर यांच्याबरोबर जुलै १९६८ मध्ये ‘प्रभात चित्र मंडळा’ची (फिल्म सोसायटी) स्थापना केली होती. १९६० ते १९८० हा दोन दशकांतला काळ विविध चळवळींचा होता. बहुसंख्य मध्यमवर्ग कोणत्यातरी चळवळीत होता. त्यात वाचनाची आस असलेला मोठा समाजगट होता. त्याच्यापर्यंत पुस्तके पोहोचवीत यासाठी १९७४-७५च्या सुमारास जाणीवसंपन्न समाजासाठी वाचन आणि विचारांची एक चळवळ उभी राहिली, ती ग्रंथाली वाचक चळवळ! ही चळवळ निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान गांगल सरांचे आहे. सरांनी ज्येष्ठ पत्रकार अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली‘ची स्‍थापना केली होती. ग्रंथाली पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. तिने अनेक मोठे लेखक घडवले. तळागाळातील अनेक हौशी कवी व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे विचार समृध्द केले. ग्रंथालीने जी पुस्तके प्रसिद्ध केली त्यांपैकी ऐंशी टक्के पुस्तकांचे लेखक पहिल्यांदा लिहिते झाले होते. त्यामागे गांगल सरांचे विविध गोष्टींबद्दल असणारे कुतुहल आणि संबंधित व्यक्तींमध्ये, विषयांमध्ये त्यांना दिसलेला स्पार्क हा धागा होता. दया पवार यांचे 'बलुतं' किंवा नरेंद्र जाधव यांचे 'आमचा बाप अन् आम्ही' ही त्याची दोन ठळक उदाहरणे म्हणून सांगता येतील. सरांनी ‘ग्रंथाली‘च्‍या ‘रुची‘ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. ‘ग्रंथाली‘ची चारशे पुस्‍तके संपादित केली. सरांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार‘चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. ‘ग्रंथाली’ ही साहित्याची उत्तम जाण व चोखंदळपणा यासाठी कार्यरत मराठी भाषेतील एक अग्रेसर चळवळ आहे. समाजाच्या नाडीवर अचूक ठेवले गेलेले बोट हे ग्रंथाली’च्या यशाचे खरे कारण होते. जाणीवजागृत तरुणांच्या प्रखर व तीव्र संवेदना, समाजाच्या प्रत्येक क्षेत्रातील त्यांचा संघर्ष व त्यांना खुणावणाऱ्या विधायकतेमुळे ‘ग्रंथाली’कारांना लेखन-पुस्तकांचे नवनवे फॉर्म, नवनवे विषय सुचत गेले. गांगल सरांच्या शब्दात सांगायचं तर, ‘ग्रंथाली हे तत्त्वाग्रहांच्या कार्यपद्धतीतून उभी राहिलेली चळवळ आहे. ‘वाचनवेधकता’ हे मूल्य ‘ग्रंथाली’ आग्रहाने लेखकांसमोर मांडत आली. वाचकांना न कळणारे दुर्बोध साहित्य लिहिण्याची एक फॅशन मराठी साहित्यात होती. तेव्हा ग्रंथाली’ने वाचकांना आवडीने वाचता येईल असे सुगम साहित्य निर्माण करण्यावर भर दिला होता. विशेष म्हणजे या 'ग्रंथाली'ची वाटचाल ३५ वर्षांची झाल्यावर सरांनी 'ग्रंथाली'ची सूत्रे नव्या पिढीकडे दिलीत. गांगल हे ‘ग्रंथाली‘प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा‘चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. दीपक घारे यांच्या सहकार्याने २००१मध्ये त्यांनी ‘ग्रंथाली ज्ञानयज्ञ’ नावाने स्थानिक इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारी छोट्या पुस्तिकांची मालिका तयार केली. ग्रंथाली ज्ञानयज्ञ’मध्ये हजार पुस्तके निर्माण झाली असती तर ते खूप महत्त्वाचे काम ठरले असते. अर्थात यात ज्या दोन-अडीचशे पुस्तकांची निर्मिती झाली तीही खूप महत्त्वाचीच होती. २००५मध्ये ‘मराठी विद्यापीठ डॉट कॉम’ वेबसाईटची निर्मिती केली.

एकविसाव्या शतकातील ग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा संवर्धित व्हावा हा हेतू मनी बाळगून सरांनी २००९मध्ये ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ असलेले वेबपोर्टल चालवण्यात येते. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद घेण्याचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. ‘भारत देशात, महाराष्ट्रात विधायक असे काहीही होताना दिसत नाही. गुंता दिवसेंदिवस वाढतो आहे.’ असं जाणवू लागल्यास सरांनी संपादित केलेल्या थिंक महाराष्ट्र’ वेब पोर्टलवर आवर्जून फेरफटका मारावा. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे ग्रंथालीचे पुढील अद्ययावत रूप आहे. एकप्रकारे त्याला मराठी विद्यापीठाचे प्रगत रूप म्हणता येईल. पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी, ‘थिंक महाराष्ट्र’चे वेबपोर्टल म्हणजे पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोशाचे विस्तारित आधुनिक रूप असल्याचे म्हटले आहे ते खरे आहे. हे पोर्टल उद्याच्या महाराष्ट्राचे म्युझियम आणि कंटेंप्ररी जर्नल असणार आहे. सरांनी सुरु केलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’चा प्रवास कोणत्या दिशेने असणार आहे? हे समजून सांगताना, ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांनी सांगितलेली एक गोष्ट सांगतात. ‘पूर्वीच्या खेड्यातदेखील दारूचा गुत्ता, मटणाचे दुकान अशा, त्यावेळी दुष्ट मानल्या गेलेल्या गोष्टी होत्या. पण गावात दोन वारकरीदेखील असत आणि दारू प्यायलेला माणूस वारकर्‍यांच्या घरापाठीमागून लपतछपत स्वगृही जाई. ही दहशत नैतिक होती. समाजात सांस्कृतिक गोष्टी प्रभावी झाल्या तर असांस्कृतिकता, असभ्यता आपोआप निष्प्रभ होत जातात.’ हेच ध्येय बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ काम करते आहे. आजच्या बकालतेवर ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटवावे आणि सांस्‍कृतिकता अधिक प्रभावी करून लोकांमधील पुढाकार घेण्‍याची भावना जागृत करावी, यासाठी ‘थिंक महाराष्‍ट्र’ प्रयत्‍नशील आहे.

गांगल सरांनी मांडलेल्या थिंक महाराष्ट्र कम्युनिटी (समुदाय), जन्मशताब्दी वीरांचे दालन याही संकल्पना भन्नाट आहेत. १९०० ते १९३० या काळात जन्मलेल्या महनीय मंडळींनी महाराष्ट्रीय जीवन घडवले. अशा तीनशे मोठ्या व्यक्तींची नावेसरांच्या टीमने काढलीत. या मंडळींचा अभ्यास व त्यांचे कार्य संशोधन करून ‘जन्मशताब्दी वीरांचे दालन’अंतर्गत व्यवस्थितरित्या लोकांसमोर आणले तर अवघा महाराष्ट्र चकित होईल आणि सांस्कृतिकतेचे महत्त्व लोकजीवनात परत ठसेल. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ हे मराठी माणसाची कर्तबगारी आणि विधायकता यांचे नेटवर्क आहे. ते राज्याची तर्कशुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न करते आहे. भौतिक विकासाचे मॉडेल स्वीकारले गेल्याने महाराष्ट्राच्या ‘व्हिजन’ला नव्वद सालानंतर अर्थ उरलेला नाही. महाराष्ट्र हा अमेरिकेप्रमाणेच ‘स्थलांतरितांचा देश’ (बॉयलिंग पॉट) आहे. मराठी कोणास म्हणावे? हा कळीचा प्रश्न आहे. महाराष्ट्र हा ‘मिनी इंडिया’ आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण समाजाला एकात्म उद्दिष्टाने बांधण्याचे काम आहे. हे एकात्म उद्दिष्ट वैचारिक व भावनिक असू शकते. मराठी माणसात कार्यकर्ता दडलेला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय ख्यातीचे कलाकार (भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, गायतोंडे, हुसेन आहेत) व क्रीडापटूही (गावसकर, तेंडुलकर, नाटेकर) मोठे होऊन गेले. मात्र त्यांची छाप राष्ट्रीय पातळीवर मराठी म्हणून जाणवत नाही. महाराष्ट्रात मागील पन्नास-सत्तर वर्षांत काही मराठी विद्वान हे स्वतंत्र विचार मांडू शकतील अशा ताकदीचे होते. त्यांनी त्या त्यावेळी काही विचार नोंदूनही ठेवले. ग्रंथालीने प्रकाशित केलेले ‘स्वायत्त महाराष्ट्र’ पुस्तक या पठडीतले आहे. हे पुस्तक महाराष्ट्रकेंद्री आहे. दुर्दैवाने सुप्त सामर्थ्याचे असे अनेक विचारकण त्या काळात दडपले गेलेत. त्यामुळे महाराष्ट्राची बौद्धिक हानी होऊन राज्याला बुद्धिमांद्याचा रोग जडल्याचे ठासून सांगत राज्याच्या स्थित्यंतरावर अचूक बोट ठेवणाऱ्या गांगल सरांच्या प्रतिभाशक्तीला सलाम करायला हवा.

महाराष्ट्र हा प्रदेश कर्तृत्वाचा आहे, हे गत आठशे-हजार वर्षांचा इतिहास सांगतो. मानवी भाषांवर १९९०नंतर तंत्रज्ञानाचे मोठे आक्रमण सुरू झाले. त्यामुळे भाषेद्वारे आविष्काराची गरज कमी झाली. मानवी संभाषण पर्यायाने म्हणी-वाक्प्रचार यांचा वापर, नव्या पर्यायी शब्दांचा शोध घेणे कमी झाले आहे. म्हणून इंटरनेटवरील वाचनासाठी मराठीचे रूप नव्याने विकसित व्हायला हवे आहे. महाराष्ट्राच्या तालुक्या-तालुक्यात उपक्रमशील व्यक्तींचा संचार आहे. त्यांचा आणि प्रस्थापितांचा ‘कनेक्ट’ राहिलेला नाही. उद्याचे परिवर्तन हे निर्मितीच्या प्रेरणांनी भारल्या गेलेल्या माणसांकडून होणार आहे. माणसांच्या सदसद्विवेकाची संस्कृती मागे पडते आहे. देशातील विचारी व संवेदनाशील समाज काहीसा आत्ममग्न आहे. माणसाच्या सत्त्व गुणाचे रुपांतर अतिगर्वात झाले आहे. रज गुणाने धुमाकूळ घातला आहे. हपापलेपण आणि विषयी वृत्ती हे समाजाचे ब्रीद बनले आहे. बुद्धीच्या जोरावर विवेकीपण येण्याऐवजी भोगवृत्ती वाढते आहे. प्रशासनावर वचक व पर्यायी विचार सापडत नाही आहे. मूल्यव्यवस्था ढासळते आहे. गावागावात पुतळे, मंदिरे, हॉस्पिटले बांधली जातायत. मात्र ग्रंथालय असायला पाहिजे असा आग्रह दिसत नाही. विद्वेष, विखार, विषमता हे सद्यकाळाचे दुखणे आहे. त्यामुळे संवेदनाशील व विचारी मनांमध्ये अस्वस्थता येते. माणसाची संवेदनेची पातळी कमी होत चालली आहे. सामाजिक कामांवर पैसा खर्च करण्याविषयीच्या संकल्पना खूप ठोकळेबाज असतात. गरजूला मदत करणे म्हणजे सामाजिक कामांवर पैसा खर्च करणे नाही. मन घडविण्याच्या कामांसाठी कोण काय करणार? याचा विचार करायला हवा. अशा मुद्द्यांवर गांगल सरांमधील भाष्यकार-निरीक्षक अचूक बोट ठेवतो. पर्याय म्हणून राज्यात तालुकास्तरावरील जीवनाचा-परंपरेचा व प्रगतीचा वेध घेणाऱ्या तालुका संस्कृती महोत्सवाची कल्पना राबवतो. समाजप्रबोधन व साहित्य संशोधन यांमधून तयार झालेल्या पिढीचा प्रभाव मराठी समाजावर १९४५ ते १९८० या काळात निर्विवाद होता. त्यानंतर हे सारे बिघडत गेले. नव्वद सालानंतर जागतिकीकरणाच्या रेट्यात केवळ पैशाला असाधारण महत्त्व प्राप्त होऊन इतर सारे दिशाहीन झाले. पूर्वी बहुसंख्य समाज अशिक्षित असूनही तो संस्कृतीच्या उत्तम कल्पना जोपासून होता. आज परिस्थिती उलटी आहे म्हणून समाजात सुसंस्कृत समाजाचा प्रभाव वाढायला हवा अशी सरांची अपेक्षा आहे. जुन्या मराठी साहित्यिकांच्या व कलाकारांच्या वेबसाईटस्ची निर्मिती, कला आणि करमणूक यांचा बिघडलेला तोल पुनर्स्थापित करण्यासाठी गांगल सरांनी रसिकतेचा अभ्यासक्रम उपक्रम सुरु करण्याची सूचना केली आहे.

बदलत्या काळात पुस्तकाची देवघेव करणाऱ्या ग्रंथालयांना सांस्कृतिक केंद्राचे नवे, विस्तारित रूप घ्यावे लागणार आहे. विविध ज्ञान संकलन व ज्ञान प्रसारण हे ग्रंथालयांचे मुख्य कार्य असायला हवे आहे. याविचारानेही सरांनी चळवळ सुरु केली आहे. सद्यकाळात मानवी भावना व्यक्त करण्याचे माध्यम पैसा आहे. ज्ञानाचा विस्तार प्रचंड झाला आहे. माहिती-ज्ञान सर्वत्र खुलेपणाने उपलब्ध आहे. गुरू गुगलबद्ध झाला आहे. मराठी प्रकाशन व्यवसाय आजही काहीसा संकटात आहे. हा व्यवसाय सरकारावलंबी राहिला आहे. पुस्तकांची लोकांमधील विक्री ही फार मोठी कधी राहिलेली नाही. साहित्य-कला-संस्कृती हे प्रश्न या समाजात कधी अग्रस्थानी आले नाहीत. जिज्ञासा, ज्ञानोत्सुकता यांना समाजात दोन-तीन टक्क्यांचे स्थान राहिले आहे. मागील दोनेकशे वर्षांपासून समाजात वावरणारे पुस्तक हे ज्ञानोत्सुकतेचे प्रतिक आहे. ‘पुस्तक व्यक्तीला घडवते’ यावर जिद्यासूंचा विश्वास आहे. असे नमूद करणारे गांगल सर, ‘वाचकाची भूक नव्या कंटेण्टची असण्याकडे मराठी पुस्तकांना पाहायला लागेल’ असं सांगून जातात तेव्हा त्यांच्यातील विचारवंताचे दर्शन घडते. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आहेत. सर आजही वाचकांस काय हवे आहे? याचा प्रथम विचार करताना दिसतात. एखादा शब्द लिहिला नाही तर वाक्यात काही फरक पडेल का? संबंधित शब्द भविष्यात वापरात राहिल का? याबाबत त्यांचा कटाक्ष असतो. ते रोज नव-नव्या व्यक्तींशी संवाद साधतात. व्यक्तींविषयी आपल्या साप्ताहिक स्तंभात लिहितात. अनेकांच्या लेखनावर संस्करण करतात. अनेक वर्तमानपत्रांसाठी विविध लेखकांचे साहित्य स्वतः संस्कारित करतात. सध्याच्या साहित्य क्षेत्रातील अशा मंडळींची यादी खूप मोठी आहे की ज्यांचे पहिले लेखन गांगल सरांनी संस्कार करून महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध करून त्यांना नावारूपास आणले होते. असे गांगल सरांचे आम्हाला जाणवलेले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ, विचारी, व्यासंगी व मजकुराशी प्रामाणिक असलेल्या शैलीदार संपादकाचे आहे. सर रसिक, संवेदनशील आहेत. आमच्यासारख्या उभरत्या तरुणांना सरांसारख्या ज्येष्ठाने हात देणे, त्यांचे सान्निध्य मिळणे मौलिक वाटते. एका पत्रकाराची दृष्टी किती व्यापक आणि शोधक हवी हे सरांच्या कामाचा आढावा घेताना जाणवते. सरांची संपादकीय नजर, समाजभान, अपार औत्सुक्य आमच्यासारख्यांना समृध्द बनवते.

८५व्या वर्षी सरांचा उत्साह, उत्तम ते जतन करण्याबाबतचा आग्रह, आमच्यासारख्याचा एखादा लेख लिहून पूर्ण झाल्यावर त्यातील राहिलेले बारकावे समजावून सांगत नव्याने लेखन घडवण्याचा आग्रह अफलातून आहे. महाराष्ट्रात सेवाजेष्ठतेनुसार अनेक संपादक झाले असतील पण अनेक नवीन विषय व लेखक घडवणारे गांगल सर ही एक व्यक्ती नसून संस्था आहे. सरांसारखा बहुश्रुत व व्यासंगी संमेलनाध्यक्ष मिळणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. ‘मराठीत संपादक दोन प्रकारचे राहात आले आहेत. एक लिहिणारे, दुसरे संयोजक संपादक. वाचकांना लिहिणारे संपादक जास्त आवडतात.’ सरांचे हे विधान आजच्या काळात सोशल मिडीयावर ‘ब्रेकिंग न्यूज’चा धुमाकूळ घालणाऱ्या ‘ऑनलाईन’ पत्रकार-संपादकांनी समजून घ्यावे. वर्तमानकाळात वावरत असताना वर्तमानाच्या पलिकडे कुतुहलपूर्वक नजरेने पाहाण्याची दृष्टी लाभलेल्या ‘संमेलनाध्यक्ष’ दिनकर गांगल सरांना या ग्रामीण संमेलनात ऐकायची संधी सोडू नका!

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

 

  

गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

अचाट वनसंवर्धन प्रयोगांची तीन दशके

             जंगल-देवरायांमध्ये खूप धडपड, मेहनत आणि संयमाच्या माध्यमातून वनसंवर्धनाचे अचाट प्रयोग 'प्रत्यक्ष जमिनीवर' यशस्वीपणे राबविणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ पुणे (AERF) संस्थेने तीन दशकांचा कार्यकाळ (१९९४-२०२४) पूर्ण केला आहे. खाजगी जंगल संवर्धन, देवराई व जंगलांचे पुनरुज्जीवन, वनशेती, पारंपरिक बियाणे संरक्षण व संवर्धन, सेंद्रिय पद्धतीने फळबाग व्यवस्थापन, आर्थिकदृष्टया उपयुक्त बांबू आदी झाडांची लागवड, सुधारित चुल निर्मिती आणि वितरण, दुर्मीळ वनस्पतींचा अभ्यास व संवर्धन, कांदळवन संवर्धन, स्थानिक लोकांचे सक्षमीकरण, स्थानिक लोकांना निसर्ग व्यवस्थापनाशी जोडणे, वनस्पती संशोधन आणि निर्मिती, जैवविविधता समिती सक्षमीकरण, लोक जैवविविधता नोंदवही, निसर्गपूरक पर्यटन (भीमाशंकर व अलिबाग) आदी प्रयोग सहाशे गावातून यशस्वी केले आहेत. संस्थेने तीन दशकांच्या कार्यपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील देवरुख कार्यक्षेत्रात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' कामाचे फ्रेमवर्क तयार केलेल्या, मानवी जीवन बदलवण्याची क्षमता असलेल्या या संस्थेच्या विलक्षण कामाचा हा आढावा...

 

समुदाय आधारित संवर्धन कामाचे फ्रेमवर्क


१९९४मध्ये स्थापना झाल्यापासून, अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) सह्याद्रीत जिथे इतर कोणतीही संवर्धन यंत्रणा अस्तित्वात अशा ठिकाणी काम करत आहे. AERFने 'सहभागी संवर्धन' किंवा 'समुदाय आधारित संवर्धन' (Community Based Conservation) कामाचे फ्रेमवर्क तयार केले आहे. देवराया या परंपरेने देवतेच्या श्रद्धेने समुदायांनी संरक्षित केल्या आहेत. देवराया म्हणजे अनेक वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे समृद्ध भांडार आहेत. देवरायांमध्ये अनेक पाणी साठवण्याची पारंपारिक यंत्रणा आहे. येथील अनेक महाकाय वृक्ष कार्बन शोषून घेण्याचे काम करतात. AERFने आजवर ८० पवित्र उपवनांच्या पर्यावरणीय पुनर्संचयनाचे काम केले आहे.

संचालक - डॉ. अर्चना गोडबोले 

सहसंचालक - श्री. जयंत सरनाईक 

१९९४मध्ये स्थापन झाल्यापासून, AERF ‘प्रत्यक्ष जमिनीवर संरक्षण व संवर्धन कार्यक्रम उत्तर सह्याद्री परिसरात राबवत आहे. त्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाट क्षेत्रात जातात. संगमेश्वर तालुका हा पश्चिम घाटात वसलेला आहे. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य (BWLS) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ आहे. हे भारतीय जायंट स्क्विरल (शेखरू) आणि स्थानिक समुदाय - महादेव कोळी यांच्या निरोगी लोकसंख्येसाठी ओळखले जाते. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त महत्त्वाचे पक्षी क्षेत्र (IBA) आहे. AERFने २००६पासून येथे पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या दीर्घकाळ टिकणारे, शाश्वत उपाय विकसित करण्यासाठी काम सुरु ठेवले आहे. तेथे हिरडा संकलनही चालते. महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आणि कातकरी व ठाकूर या जंगलावर अवलंबून असलेल्या आदिवासी समुदायांचे घर आहे. AERFने अलिबागमधील महाजने गावात विकेंद्रित बायो-डिझेल संसाधन केंद्राची स्थापना केली आहे. ग्लोबल व्हिलेज एनर्जी प्रोग्राम (GVEP) अंतर्गत हा प्रकल्प २००८ मध्ये सुरु झाला आणि तो आजही सुरु आहे. हा प्रकल्प गावातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशी बायो-डिझेल उत्पादन देणाऱ्या झाडांच्या प्रजाती-करंजाच्या वापरावर लक्ष केंद्रित करतो आहे. राज्यात करंजाची झाडे अलिबाग (रायगड) आणि सोलापूर जिल्ह्यात अधिक आहेत. सोलापूर भागात त्यांना विशेष महत्त्व नाही. मात्र अलिबाग भागात या झाडाचा उपयोग करून घेण्याची पारंपरिक व्यवस्था आजही आहे.

 

सिंधुदुर्ग हा पश्चिम महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात वसलेला अरुंद किनारी जिल्हा आहे. हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध असलेल्या वनस्पती आणि जीवजंतूंसाठी प्रसिद्ध आहे. AERFने देवराई परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि संरक्षण करारांतर्गत येथे काम करत आहे. २०१०-११मध्ये जैवविविधता मूल्यांकन आणि गावकऱ्यांच्या पाठिंब्याने AERFने मुख्यतः असनिये आणि दाभिळ गावातील जमीन विनाशकारी खाण प्रकल्पापासून सुरक्षित केली. त्याबरोबर सावंतवाडी आणि दोडामार्ग जिल्ह्यातील सुमारे ५०० चौ किमी जंगल संरक्षण करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले आहे.  विशेष म्हणजे असनिये गावात पृष्ठभागावरील पाण्यापासून (surface water) विकसित झालेल्या प्रचंड उत्पन्न देणाऱ्या काजूच्या बागा आहेत.

 

देवरुख कार्यक्षेत्रातील काम

एईआरएफ संस्थेच्या ६० जणांच्या टीमपैकी देवरुख केंद्रावर सुमारे तीसेक विषयतज्ज्ञ लोकं काम करत आहेत. ‘अदिवासी भागातील लोकज्ञान आजच्या काळात संवर्धन विषयात उपयोगात आणता येईल का? पासून सुरुवात करून सह्याद्रीतील विशेषतः कोकणातील जंगलातून विशेष मेहनत न करता पैसे मिळायला लागले तरच ती वाचतील’ इथपर्यंतची भूमिका एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांनी अभ्यासकांना सुरुवातीलाच स्पष्ट करून सांगितली. उत्तर सह्याद्री भागात पर्यावरणाचे प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत. उत्तर सह्याद्री भागात महत्वाची जैवविविधता नाही, सर्वकाही दक्षिणेकडच्या सह्याद्री भागात आहे असंच मत काही तज्ज्ञांचं बनत असल्याचं ध्यानात आल्यावर ‘एईआरएफ’ संस्थेचा जन्म झाला होता. तज्ज्ञांचं मत असंच राहिलं तर अडचण वाढत जाणार होती. शहरी-निमशहरी भागातील आपण मंडळी दोन-चार झाडे लावून पर्यावरण संवर्धन केल्याचे समाधान मिळवतो. मात्र सह्याद्रीच्या ग्रामीण भागात याचा उपयोग नाही. सह्याद्रीतील खाजगी जंगले वाचवण्यासाठी गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF) या संस्थेने प्रकल्प सुरू केला. देवरुख भागातून या प्रकल्पाला सुरुवात केलेल्या संस्थेने आतापर्यंत उत्तर सह्याद्रीतील ७३ गावातील १३ हजार एकर जंगल सन २०३२ पर्यंत संरक्षित केलेलं आहे. समृद्ध जंगलांच्या वापराबाबतची समाजाची धारणा ही इंधनाच्या गरजांसाठी लाकूड किंवा लाकूडतोडीशी संबंधित आहे. AERFने जंगले त्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतात हे आपल्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे. जैवविविधता संवर्धनाचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. नवकल्पना, दीर्घकालीन प्रयत्न आणि अंमलबजावणीतील सातत्य याद्वारे यावर उपाय शोधले जाऊ शकतात. ’वृक्षलागवड’ हा शब्द अलीकडे फार प्रतिष्ठित झाला आहे. परंतु ’वृक्षलागवड’ हा शब्दच चुकीचा आहे, अशी संस्थेची धारणा आहे. आपण रोपं लावण्याचे काम करतो. लावलेल्या रोपाची वेळ, श्रम आणि पैसा खर्च करून जोपासना केली तर अनेक वर्षांनी रोपांचे वृक्ष होण्याची शक्यता असते. वृक्षलागवडीने वृक्षतोडीची भरपाई मुळीच होऊ शकत नाही. एखाद्या महावृक्षाने वर्षानुवर्षं साठवून ठेवलेला कार्बन वृक्ष तोडल्यावर वातावरणात उत्सर्जित होतो. तेवढा कार्बन शोषून घ्यायला नवीन लावलेली झाडे किमान २०-२५ वर्षं मोठी व्हावी लागतात. आज वृक्षतोडीचा वेग प्रचंड आहे. कुठली झाडे कुठे लावायची? कशी लावायची? याचे शास्त्र बाजूला ठेवून निव्वळ ’अमुक अमुक कोटी’ इतका आकडा पूर्ण करण्यासाठी रस्त्यांच्या कडेला दोन दोन फुटांवर झाडे लावण्याने निसर्गसंवर्धन होत नाही हे आपण समजून घ्यायला हवे आहे.

माध्यमातील अभ्यासकांना मार्गदर्शन करताना
‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेच्या
संचालक डॉ. अर्चना गोडबोले

देवराई पुनरुज्जीवन 

संस्थेने संगमेश्वर तालुक्यातील हातीव गावी श्रीजुगाईदेवी ग्रामदेवतेच्या देवराईत पुनरुज्जीवन कार्यक्रम सुरु केला. तेव्हा तिथे ३१८ आकेशिया, गिरिपुष्प आदी वनस्पती होत्या. प्रयत्नांति आज सुंदर देवराई बहरलेली दिसते. सह्याद्रीत वर्षानुवर्षे जंगलतोड हा कार्यक्रम सुरु असताना संस्थेने मात्र किरदाडी (संगमेश्वर) गावात एका गृहस्थांच्या १५ एकर खाजगी पडीक जमिनीवर वनशेती विकसित केली. या जमिनीवर पूर्वी करवंद, रानमोडी, पेठगुळी आदींचे रान वाढलेले होते. जंगलात पाय ठेवणेही मुश्कील बनल्याने दुर्लक्षित होते. आज त्या भागात निलगिरी वूड पिजन सारख्या विविध पक्ष्यांसह, खवलेमांजर, गवे, बिबट्या, रानमांजर यांचा अधिवास आहे. संगमेश्वर तालुक्यातील कुळे गावात ३३एकर क्षेत्राची श्रीनवलादेवीची देवराई आहे. संस्था यापैकी २०एकरवर काम करते आहे. या देवराईतील ५ एकर क्षेत्र गडगडी धरणाच्या कॅनॉलला सोडलं गेलं. परिणामस्वरूप देवराई दुभंगली. तोड वाढली. देवराईतील आपल्या कार्यक्षेत्रात संस्थेने साफसफाई केली. झाडांवर चढणाऱ्या वेली काढून झाडांना मोकळा श्वास घेऊ दिला. झाडे मोठी होऊ लागली. आमच्या भेटीत ही झाडे आकाशाशी स्पर्धा करायला सज्ज झालेली दिसून आली. संस्था या भागात वर्षाला किमान १० शेतकऱ्यांना १७५ दिवसांचे काम देते आहे. देवराईने ३०० प्रकारचे जैववैविध्य सांभाळले आहे. दीडशेहून अधिक वनस्पती आहेत. इथे सीता-अशोक, सांद्रुक, पन्नासेक दासवणसह वेगळ्या प्रकारची सावलीत वाढणारी अंजनीची झाडे आहेत. संस्थेने याच देवराईत एका वडाच्या झाडावर १७-१८ ग्रेट हॉर्नबील पाहिलेत. बाकी निलगिरी वूड पिजन, गरुड, ककणेर, माडगरुड, जंगली कुत्रे अशी संपदा आसपास आहेच! वाशी तर्फे संगमेश्वर गावात मोडकाडंग येथील श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची २२एकर देवराई आहे. संस्थेने ३० वर्षांपूर्वी याच देवराईतून आपले काम सुरु केले होते. संरक्षणाच्या दृष्टीने देवराईला गडगा व गेट बांधलेले आहे. विशेष म्हणजे, आता पिक घेतलं जात नसलं तरी या देवराईत पूर्वांपार ‘देवशेत’ आहे. पूर्वी देवशेत केलं जायचं. अख्खा गाव दिवस ठरवून शेत करायचा. उत्पन्नाचे धान्य गरीब-गरजूंना मिळायचे. त्या बदल्यात त्यांनी देवराईत किंवा मंदिर परिसरात काम करायचं असं पूर्वांपार नियोजन होतं.

 

संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन

संगमेश्वर तालुक्यातील
कुळे गावातील श्रीनवलादेवीची देवराई


संगमेश्वर तालुक्यातील हातीव येथील
श्रीजुगाईदेवी देवराईतील देवराई पुनरुज्जीवन




भारत हा पश्चिम घाट आणि पूर्व हिमालय या दोन जागतिक जैवविविधता हॉटस्पॉटनी युक्त आहे. सह्याद्रीचा उत्तर पश्चिम घाट भाग हा संयुक्त राष्ट्रांनी (UN) जाहीर केल्यानुसार जगातील २% जैवविविधतेचे घर आहे. यात सुमारे ५००० प्रजातींच्या फुलांच्या वनस्पती आणि पक्ष्यांच्या ६०० प्रजाती आहेत. मात्र यातील महत्त्वाच्या अनेक वन्यजीव कॉरिडॉर झोनमध्ये अनेक एकर खाजगी मालकीची जंगले आहेत. भारतात १३ हजारपेक्षा जास्त दस्तऐवजीकरण केलेल्या देवराया आहेत. भारताच्या पर्यावरणीय आणि सामाजिक जडणघडणीत त्यांचे महत्त्व लक्षणीय आहे. दुर्मीळ जैवविविधतेचे आश्रयस्थान असलेला पश्चिम घाट हा भाग वृक्षतोड, अज्ञान आणि उदासीनतेच्या गंभीर समस्येने ग्रासलेला आहे. पश्चिम घाटातील उत्तर पश्चिम घाटाचा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, कीटक यांचा अधिवास नष्ट होत आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी डॉ. गोडबोले यांनी आपली सरकारी नोकरी सोडून पूर्णवेळ देवरायांसाठी काम सुरु केले. काही समविचारी सहकाऱ्यांसोबत ‘अ‍ॅप्लाईड इन्व्हॉरमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली होती. कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील देवरायांपासून कामाला सुरूवात करताना गावकऱ्यांना संस्थेच्या कामाचे गांभीर्य लगेच लक्षात आले नव्हते. मात्र सततच्या प्रयत्नांनंतर देवराईत पुन्हा झाडे वाढू लागली. आसपासच्या विहिरीतून पाण्याची पातळी वाढली. गावकऱ्यांनी विश्वास दाखवण्यास सुरूवात केली. संस्थेच्या या कामाला दिल्लीच्या प्रतिष्ठित सिव्हिल सोसायटी मासिकातर्फे समाजात बदल घडविण्यासाठी, पायाभूत स्तरावर काम करणाऱ्यांना दिला जाणारा ‘हॉल ऑफ फेम’ पुरस्कार मिळाला आहे.

 


लोकसहभागातून जंगल संरक्षण

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडीत संस्थेने लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्पाचा करार केलेला आहे. याद्वारे २०२८ पर्यंत ५०४एकर खाजगी जंगल राखलं गेलंय. यात १०० सहभागी शेतकरी आहेत. पैकी जमिन मालक आणि गावाचे सरपंच रत्नाकर सनगरे यांची अभ्यासदौऱ्यात भेट झाली. ‘हे जंगल वाचवल्याने जमिनीची धूप थांबली. जमिन अधिक पाणी शोषून घेऊ लागली. वाडीतील पाण्याचे प्रमाण वाढले. जवळचे ओढे जास्त काळ पाण्याचे राहू लागले. विहिरींना पाणी इतकं वाढलं की त्यावर पाणी योजना केली गेली. वाडीत नळाने पाणी पोहोचलं. यासोबत लोकांना आर्थिक फायदाही मिळाला’ असं सनगरे यांनी सांगितलं. देवरुख अभ्यासदौऱ्यात एईआरएफ संचालक डॉ. अर्चना गोडबोले यांच्यासह गुणवंत महाजन, राजेश जाधव, संजय पाष्टे, सचिन पर्शराम अशा अनेक जमिनीवर काम करणाऱ्या  विषयतज्ज्ञांनी माहिती दिली.

 

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प

कळंबस्ते (संगमेश्वर) गावातील भेकरेवाडी येथील
लोकसहभागातून जंगल संरक्षण प्रकल्प फलक 

खासगी आणि सार्वजनिक जमिनी अशा दोन्ही ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे काम आव्हानात्मक आहे. दोन्ही ठिकाणची कार्यपद्धती वेगवेगळी असते. देवराया सार्वजनिक असतात. अशी सार्वजनिक क्षेत्र राखण्यासाठी संपूर्ण गावाबरोबर काम करावे लागते. ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या ही प्रक्रिया थोडीशी दीर्घकालीन असते. खासगी जमिनीच्या बाबतीत फक्त जमीन मालकाशी व्यवहार असतो. अर्थात एका सातबाऱ्यावर अनेक नावे असल्यामुळे सगळ्यांची संमती घेणे हे एक आव्हान असते. एखादा खासगी जमीनमालक त्याच्या जमिनीवरचे जंगल न तोडता राखणार असेल तर आम्ही त्याच्याशी दहा वर्षांचा लेखी सामंजस्य करार करून प्रतिएकर काही ठराविक रक्कम बक्षीस / मोबदला म्हणून देतो. हा करार करताना मालकाचा जमिनीवरचा मालकी हक्क कायम राहील, याची स्पष्ट लेखी हमी संस्था देते. जेणेकरून त्याच्या मनात काही शंका राहू नये. यामुळे लोक लेखी करार करायला तयार होतात.

 

सह्याद्रीच्या डोंगराळ भागात पूर्वी ‘कुमरी’ पद्धतीने शेती चालायची. ही कुमरी पद्धतीने होणारी शेती community फार्मिंगचे उत्तम उदाहरण होती. पुढे आंबा आणि काजूच्या बागांच्या उभारणीत आम्ही या पारंपारिक शेती पद्धतीसह कोकणातील जैवविविधता संपवली. World Bank forestry projectने सुचविल्याप्रमाणे सह्याद्रीसह संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी विदेशी झाडे लावली गेली. परिणामस्वरूप रिठा, बिब्बा आदी महत्त्वाची देशी झाडे कमी होत गेली. कोकणातील निम्मे जमीन / जंगल खाजगी आहे. त्याची बेसुमार तोड होते. हे जळावू लाकूड जवळच्या इचलकरंजीला अधिक लागतं. कोकणात ते उपलब्ध होतं. एकदा तोडलेलं हे जंगलं पुन्हा उत्पादनक्षम व्हायला वेळ लागतो. अशी जंगलं पुनरुज्जीवित करायला धनेश सारखे पक्षी आवश्यक आहेत. म्हणून संस्थेने यावरही काम केलं. लोकं जंगलांप्रमाणे देवरायाही तोडतात लक्षात आल्यावर संस्थेने ५०० देवरायांचा सखोल अभ्यास केला. प्रत्यक्ष संवर्धन कामात उपयुक्त होईल असे जैवविविधता संशोधन केले. संस्थेच्या संशोधनानुसार तळकोकणात नाचणीच्या २७जाती मिळायच्या, आज चार जातीही शिल्लक राहिलेल्या नाहीत. सह्याद्रीतील जंगले शासकीय पातळीवर ताब्यात घेतानाही स्थानिकांच्या मानसिकतेचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असं संस्थेला वाटतं. कारण जंगलातील बफर झोनमधून कोअरमध्ये जा-ये करणाऱ्या स्थानिकांना आम्ही चुकीची वागणूक देणार असू तर तो त्याच जंगलाला आग लावून आपला राग व्यक्त करू शकतो हेही आपण लक्षात घ्यायला हवं आहे.

 

वनोपजांचे मार्केटिंग

वनोपजांचे योग्य मार्केटिंग करून त्याद्वारे जंगलसंवर्धन कसे करता येईल? यासाठी संस्था काम करते आहे. देवरायांमध्ये बेहेडय़ाचे प्रचंड वृक्ष आहेत. बेहेडा गोळा करण्याचे काम अनेक गावकरी करत असत. पण त्यातून फारसा पैसा मिळत नसे. माळशेज घाटामध्ये संस्थेने देवराईतील ग्रामस्थांशी करार केला. तिथे हिरड्याची बरीच  झाडे आहेत. हिरडे विकून ग्रामस्थांना उत्पन्न मिळण्यासाठी संस्थेने मदत केली आहे. सोळा देवरायांमध्ये ’बेहडा संकलन कार्यक्रम’ सुरु झाला. यामध्ये निसर्गाला धक्का न लावता शाश्वत पद्धतीने बेहड्याचे संकलन करणे, त्यामधून मिळालेल्या मोबदल्याचे योग्य वाटप करणे आदी प्रशिक्षण संस्था ग्रामस्थांना दिले आहे. वनोपजांचे शाश्वत पद्धतीने संकलन केल्याबद्दल ’फेअरवाईल्ड फाऊंडेशन’ या जागतिक संघटनेकडून वनोपजांना प्रमाणपत्र दिले गेले. २०१५ साली संस्थेने हिरडा आणि बेहडा या वनोपजांसाठी हे प्रमाणपत्र मिळविले आहे. संस्थेने ‘नेचर कनेक्ट’ ब्रँड अंतर्गत आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद, हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदी शुद्धता प्रमाणित उत्पादने घेत असून त्याची संपूर्ण विपणन व्यवस्थाही तयार झाली आहे. जवळच्या चार-पाच तालुक्यातील हळद ही प्रक्रियेसाठी येत असते. बेहेडा चूर्ण पुरवण्यासाठी पक्का हर्ब्स या इंग्लंड मधील कंपनीशी संस्थेने करार केला आहे. यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे. मूल्यवर्धन आणि शाश्वत पुरवठा साखळी विकसित करून उच्च आर्थिक परतावा देऊ शकतात. एईआरएफचा ठाम विश्वास आहे की, खराब वातावरणात शाश्वत जीवन जगणे शक्य नाही. सह्याद्रीतील जंगलं उद्योगाशी जोडली जातायत हे सर्वसामान्यांसाठी अधिक महत्त्वाचे आहे. संस्थेने देवरुख कार्यक्षेत्रात रोपवाटिका केली आहे. या रोपवाटिकेत निंबेरा, बिवळा, दासवण-चांदफळ, सीताअशोक, करंज, रिठा, फणस, चामोळी, सुरंगी, बकुळ, बहावा, सिरस, आवळा, सिसम, फाशी, हिरडा, बेहडा, अर्जुनसादडा, यरंडी, किळचा, जांभूळ, पारजांभूळ, कडूकवठ, सांदरुख आदी २७ प्रकारची ७ हजार रोपं आहेत.

 

संस्थेतर्फे नेचर कनेक्ट ब्रँड अंतर्गत बनवण्यात येणाऱ्या
आयुर्वेदिक ‘डायबा चेक’ चहा पावडर, सेंद्रिय हळद,
हिरडा-बेहडा आयुर्वेदिक पावडर आदींची
माहिती देताना डॉ. गोडबोले आणि गुणवंत महाजन






‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ (AERF) संस्थेची रोपवाटिका

‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम

महावृक्ष म्हणजे अशी  झाडे, जी बघताक्षणी आपल्याला भव्यदिव्य वाटतात. ज्याची उंची २५-३० फुटांपेक्षा जास्त आहे. ज्याचा पर्णसंभार विस्तृत आहे. ज्याचा घेर दोन-तीन मीटरपेक्षा जास्त आहे ते वृक्ष. हे महावृक्ष किमान ८०-१०० वर्षं जुने आणि एका प्रदीर्घ काळाच्या पर्यावरणीय सुस्थितीचे निदर्शक असतात. असा महावृक्ष अनेक प्रकारचे पक्षी, कीटक, खारीसारखे प्राणी, साप अशा जीवजातींना आश्रय देत असतात. ते वृक्ष म्हणजे एक परिसंस्थां असते. महावृक्षाच्या सावलीमुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहून माणसाचे, तसेच पशुपक्ष्यांचे जीवन सुसह्य होते. अशा महावृक्षांनी भरपूर प्रमाणात, टनावारी कार्बन वातावरणातून शोषून स्वतःमध्ये साठवून ठेवलेला असतो. ज्या क्षणी असे मोठे झाड तोडले जाते तेव्हा हा कार्बन पुन्हा उत्सर्जित होतो आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला खतपाणी मिळत असते.

 

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न

सह्याद्रीतील महावृक्ष वाचवण्याचे प्रयत्न
जवळजवळ १००० झाडे मोजून मालकांना प्रशस्तीपत्रक प्रदान

‘नवीन झाडे लावली म्हणजे जुनी कितीही तोडली तरी चालतील’ या भ्रमापोटी, वाढत्या शहरीकरणामुळे आज बेसुमार वृक्षतोड आणि निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. जुन्या मोठ्या ‘महावृक्षा’चे महत्त्व ओळखून त्यांना वाचवण्याचे काम ही संस्था करते आहे. सह्याद्रीत, विशेषतः कोकणातल्या देवरायांत बेहडा वृक्षांची संख्या जास्त आहे. या वृक्षांवर धनेश (हॉर्नबिल) पक्ष्याची घरटी आहेत. धनेशाला वनशेतकरी (फॉरेस्ट फार्मर) म्हणतात. अनेक जंगली झाडांची फळे खाऊन बीजप्रसार करण्याचे आणि जंगल वाढवण्याचे काम धनेश करत असतो. संपूर्ण पश्चिम घाटामध्ये ’ग्रेट पाईड हॉर्नबिल’ आणि ’मलबार पाईड हॉर्नबिल’ या दोन पक्ष्यांनी बीजप्रसारावाटे जंगल राखण्याचे मोठे काम केले आहे. ’हॉर्नबिल’ वाचवायचा असेल तर त्याला घरटे बांधायला अनुकूल अशी मोठी झाडं वाचवली पाहिजेत, याचा विचार करून संस्थेने सह्याद्रीत असे वृक्ष कुठे कुठे आहेत? याची नोंद घेतली. ‘सेव्ह जायन्ट ट्रीज’ उपक्रम सुरू केला. आर्थिक गरजेसाठी, पडून नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी किंवा विकासकामासाठी लोकांकडून या झाडांची तोड होते. अशी धोक्यातील झाडे हेरून त्या झाडांवर सूचनाफलक लावणे, झाडाच्या मालकाला थोडाफार आर्थिक मोबदला देणे, झाड न तोडण्याविषयी लेखी करार करणे, झाड वाचवल्याबद्दलचे प्रमाणपत्र देणे अशा शक्य त्या सर्व मार्गांनी धोक्यात आलेले महावृक्ष वाचवायचा संस्थेचा उपक्रम सुरू आहे. आजवर साधारण एक हजार महावृक्ष वाचविण्यात आले आहेत. पाच हजारांहून अधिक वृक्षांची माहिती गोळा झाली आहे. या उपक्रमासाठी बंदीपूर अभयारण्याच्या आसपास काम करणाऱ्या ’जंगल स्केप’ संस्थेचे सहकार्यही आहे. विशेष म्हणजे संस्थेच्या संस्थापक संचालक डॉ. गोडबोले यांनी सहा वर्षे ईशान्येकडील स्थानिक समुदायांसोबत काम केले आहे. त्यांनी उत्तर पश्चिम घाट संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांचे नेटवर्क विकसित केले आहे. त्या क्लिंटन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या निमंत्रित एनजीओ सदस्य प्रतिनिधी आहेत.

 

निधी उभारणीचे आव्हान

AERF आपल्या सामाजिक उद्देशासाठी डायकिन इंडस्ट्रीज लि. जपान, क्रेडिट सुइस इंडिया, पुक्का हर्ब्स U.K., डायनॅमिक रेमेडीज प्रा. लि., प्राज इंडस्ट्रीज, वनाझ इंजिनियरिंग लि. यांसोबत काम करते आहे. महावृक्ष वाचवल्याबद्दल संस्थेकडून गावांना अथवा खासगी मालकांना दिला जाणारा आर्थिक मोबदला / भरपाईसाठी निधी उभारणी ही सुद्धा खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संस्था ’ग्लोबल गिव्हिंग’ सारख्या संस्थांकडून निधी गोळा करतात. ’ग्लोबल गिव्हिंग’ ही जागतिक संस्था आहे जी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था आणि सामाजिक कार्याला देणगी द्यायला इच्छुक असणारे लोक यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते. ’ग्लोबल गिव्हिंग’ हा crowd funding platform आहे. इथून मदत मिळवणे आव्हानात्मक आहे. ज्या सामाजिक संस्थांचे काम हे व्यापक स्तरावर आहे, ज्यांचे व्यवहार चोख आणि पारदर्शक आहेत अशा संस्थांना ’ग्लोबल गिव्हिंग’तर्फे देणग्या मिळतात. यासाठी संस्थात्मक कामाचा दर्जा आणि शिस्त राखण्याचे आव्हान असते. जे अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF)ने सक्षमपणे पेलेले आहे. आजकाल वाघ अथवा हत्ती अशा लोकप्रिय प्राण्याच्या संरक्षणासाठी पैसे द्यायला तयार असणारे हजारो लोक आणि संस्था जगभर आहेत. परंतु झाडे वाचवण्यासाठी निधी उभारणे अवघड आहे. तरीही गेली ३० वर्षे ही संस्था महावृक्ष आणि जंगलं वाचवण्याचे काम करते आहे. महावृक्ष वाचवण्याचे संस्थेचे काम व्यापक स्तरावर व्हायला हवे आहे. सरकारी योजनांपेक्षा खासगी संस्थांच्या माध्यमातूनच हे काम चांगल्या प्रकारे होऊ शकते असे संस्थेचे मत आहे. गावागावांमध्ये काम करणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा आहे. त्यासाठी खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. गावागावांमध्ये जाऊन अभ्यास करणे, लोकांशी चर्चा करणे, त्यांना विश्वासात घेणे, संस्थेच्या कामकाजात शिस्त आणि पारदर्शकता राखणे, निधी उभारणी हे सगळं करण्यासाठी खूप धडपड, मेहनत आणि संयम आवश्यक आहे. नुसते भावनिक आवाहन पुरेसे नाही.

 

वाशी तर्फे संगमेश्वर गावातील मोडकाडंग येथील
श्रीनवलादेवी व श्रीसोळजादेवीची देवराई

अपवाद वगळता जंगल संरक्षण-संवर्धनाचे आजचे बहुतांशी काम हे cosmetic स्वरूपाचे असल्याची खंत डॉ. गोडबोले बोलून दाखवतात. आपल्या देशात आरडाओरडा करून विषय पूर्णत्त्वास जात नाहीत, अन्यथा हा देश खूप पुढे गेला असता. या देशात काम  करताना विषय समजून घेऊन, वेळ देऊन वर्षानुवर्षे शांतपणे काम करावं लागतं. तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर संवर्धन पाहायला मिळतं. संस्थेचे काही पथदर्शी प्रयोग ‘सरकारी धोरण’ म्हणून स्वीकारले जावेत असं टीम एईआरएफला अजिबात वाटत नाही. अशी कामं होण्यासाठी लोकं एकमेकांशी जोडलेली राहाणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटते. सरकारी प्रक्रिया, ‘चला जंगलं वाचवूया’ असं म्हणेलही पण त्यातून गोंधळ अधिक होईल. ‘प्रसिद्धी’बेस काहीतरी तात्कालिक उपाययोजना करून आपण जंगलं वाचवू शकत नाही. जंगल संवर्धनाचे काम हे सबसिडीबेस्ड काम नाही. अशी स्पष्ट भूमिका घेऊन जगभर वावरणाऱ्या ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’चं हे काम पाहाणे, समजून घेणे, संवर्धित जंगलात मोकळा श्वास घेणे, या संस्थेसोबत काम करणे हा जंगल संवर्धनविषयक मानवी जाणीवा बदलवणारा अनुभव देणाऱ्या संस्थेला तीन दशकांच्या कार्यपूर्तीसाठी मनापासून शुभेच्छा!

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

ई-मेल :: dheerajwatekar@gmail.com



 

९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली - परिसंवाद - राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब

          चिपळूण :: राजकीय घडामोडींचा परिणाम समाजावर होऊन साहित्य निर्माण होत असते. सध्याचे राजकारण बिकट आणि मूल्यविहीन झाले आहे. त्यास वाचा...