निर्णय घेणा-या खूर्चीतील अधिकारी व्यक्ती ‘काहीतरी
वेगळं’ करून दाखविण्याच्या स्वप्नाने झपाटलेली असेल तर ती व्यक्ती आपल्या
कार्यकाळात किती उत्तम काम उभे करू शकते ? याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या चिपळूणच्या
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या अलोरे हायस्कूल अलोरे या एकाच शाळेचे रत्नागिरी
जिल्हास्तरावर सर्वाधिक काळ म्हणजे २७ वर्षे ७ महिने १९ दिवस ‘मुख्याध्यापक’
म्हणून (सन १९७२-२०००) कार्यरत राहिलेल्या, ‘मोरेश्वर
आत्माराम आगवेकर’ या शिस्तप्रिय
मुख्याध्यापकांचे नाव त्याच शाळेला देण्याचा नामकरण समारोह नुकताच गेल्या शुक्रवारी,
१३ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता शाळेच्या प्रांगणात, ज्येष्ठ लेखक आणि प्रसिद्ध
‘जडणघडण’ मासिकाचे संपादक डॉ. सागर देशपांडे, सन १९७२ च्या पहिल्या बॅचचे माजी
विद्यार्थी, निवृत्त नौसेना अधिकारी गुरुदत्त साळोखे, शाळेला बोर्डाच्या यादीत
पहिले यश मिळवून देणारी जयश्री कुलकर्णी-वाळिंबे, सीए वसंतराव लाड यांचे ज्येष्ठ
सुपुत्र परीक्षित लाड, देऊळ, वळू या ‘राष्ट्रपती’ पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे निर्माते
उमेश कुलकर्णी, जि. प. सदस्य विनोद झगडे, सरांच्या
पत्नी श्रीमती शुभदा आगवेकर, मुलगा अमित आणि नचिकेत आगवेकर, संस्थाध्यक्ष डॉ. विनय
नातू, कार्याध्यक्ष प्रकाश गगनग्रास, मुख्याध्यापक उमेश पाठक यांच्या प्रमुख
उपस्थितीत संपन्न झाला. त्या निमित्ताने आगवेकर सरांच्या कारकीर्दीचा हा थोडक्यात
आढावा...!
मुंबईहून गोव्याला जाताना सावर्डेच्या पुढे निवळीफाटा
ओलांडल्यावर लागणाऱ्या ‘आगवे’ गावचे सर मूळ रहिवाशी ! ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’चे ‘संस्थापक-संवर्धक’ राहिलेले शिक्षक कै.
नागेश प. पोटे हे सरांचे आजोबा. त्यांच्या कन्या सत्यभामा या सरांच्या आई होत. सरांचे
वडील आत्माराम‘नाना’ हे व्यवसायाने गावातील प्रगतशील शेतकरी होते. उभयतांना, २
मुलगे आणि ५ मुली अशी ७ अपत्ये झाली, पैकी मोरेश्वर हे ६ वे अपत्य होय. त्यांचा
जन्म दिनांक ८ मार्च १९४२ रोजी झाला. मोठाल्या, कौलारू, मातीच्या विटांनी
बनविलेल्या, सारवलेल्या भिंती, जमीन, चारही बाजूंनी पडव्या असलेल्या सुगंधी घरात
या भावंडांचे बालपण गेले. घरात गाई-म्हशी, भरपूर दुध-दुभते असायचे, सारे कोणालाही
न विकता घरीच वापरले जायचे. त्यामुळे हातात रोख रकमेचा अनेकदा अभाव असायचा. परंतू
प्रगत शेती हेच श्रीमंतीचे लक्षण मानले जाणारा तो काळ होता. लहानपणापासून अध्यात्मिक
आवड, आणि डावखुरे असूनही दोन्ही हातांनी लिहिण्याची सवय, शालेय विषयात गणिताची
विशेष गोडी असलेले मोरेश्वर पुढे गणिताचे शिक्षक म्हणून नावाजले गेले. चतुर्मासात गावातल्या श्रीलक्ष्मी-नारायणाच्या देवळातले कार्यक्रम
त्यांना विशेष प्रिय ! अकरावीपर्यंत शिक्षण
झाल्यानंतर मोरेश्वरना पुढे शिकवणे घरच्यांना शक्य होत नसताना बहिणींनी त्यांच्या
शिक्षणासाठी पुढाकार घेतला होता. आपले बी.एस्सी. बी.एड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण
केल्यानंतर सुरुवातीला संगमेश्वर, दाभोळ येथे काही काळ नोकरी केल्यानंतर सन १९६८
साली सर चिपळूणच्या ‘परशुराम एज्युकेशन सोसायटी’च्या युनायटेड हायस्कूलमध्ये
नोकरीला लागले. यानंतर
मूळचे कोल्हापूरचे, परंतु नोकरी निमित्ताने बरेचसे आयुष्य सांगलीत घालविलेले,
तिथल्या एका माध्यमिक शाळेचे शिक्षक गणेश नरसिंह कुलकर्णी आणि मूळ मिरजच्या रहिवाशी,
इंदूमती या दाम्पत्याच्या पोटी दिनांक २१ मे १९४९ रोजी जन्मलेल्या २१ वर्षे वयाच्या बी.ए.बी.एड. झालेल्या ‘शुभदा’ यांच्याशी २८ वर्षांचे मोरेश्वर दिनांक १३ डिसेंबर १९७० साली विवाहबद्ध
झाले. परशुराम एज्युकेशन सोसायटीची अलोरेत शाळा सुरू करण्याचा निर्णय झाल्यावर, ‘त्या
शाळेची मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी कोण घेणार?’ या प्रश्नांच्या उत्तराच्या
शोधात मोरेश्वर आगवेकर यांचे नाव पुढे आले. सोमवार, दिनांक १२ जून १९७२, अलोरे
हायस्कूल अलोरेचे मुख्याध्यापक म्हणून आलेली नवीन जबाबदारी घेऊन ‘मोरेश्वर
आत्माराम आगवेकर’ हे युनायटेड इंग्लिश स्कूलचे बी.एस.स्सी.,बी.एड. पर्यंत शिक्षण
झालेले गणिताचे शिक्षक, साधारण दुपारच्या १२ वाजताच्या सुमारास अलोरे बसस्टॉपवर उतरले.
सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम केव्हाच उत्साहात
संपन्न झाला होता. अलोरेत शाळा सुरु व्हावी म्हणून अलोरेचे सरपंच राहिलेले गणपत दाजी
देवरे, नागवेचे शंकरराव पालांडे, राजाराम पालांडे, पेढांबेचे दौलतराव शिंदे, खडपोलीचे
दत्तोपंत बापट यांच्यासह स्थानिक पालक आणि ग्रामस्थांचे सहकार्य होते. दरम्यान
कोणीही शिक्षक नाही म्हटल्यावर जमलेले आठव्या इयत्तेतील जवळपास ६४ विद्यार्थी आणि
२१ विद्यार्थींनी घरी जायला निघाले होते. घरी जाणा-या विद्यार्थ्यांची आणि मोरेश्वर
आगवेकर सरांची शाळेच्या वर्गाबाहेरच गाठभेट झाली आणि, ‘चला रे सगळ्यांनी !’ म्हणत
त्यांनी विद्यार्थ्यांना शिंदे कॅन्टीन जवळच्या, भूकंपपिडीतांच्या पुनर्वसनासाठी
बांधण्यात आलेल्या, उपलब्ध पत्र्याच्या शेडमधील इमारतीतील ३ पैकी २ वर्गात नेऊन
बसविले. ‘या कुन्देदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता...’ या सरस्वती वंदनेचे
स्वर, सह्याद्रीच्या त्या विशाल डोंगराच्या कपारीतील ‘बोलादवाडी’ या कोयना
जलविद्युत प्रकल्पाच्या कोळकेवाडी धरण प्रकल्प क्षेत्रातील ‘अलोरे’च्या निसर्गरम्य
वातावरणात ऐकू आले आणि गेल्या ४६ वर्षांत देश-विदेशात आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक
दाखविणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी घडविणाऱ्या, अनेकांच्या आयुष्यातील ‘सोनेरी पान’
ठरलेल्या अलोरेची शाळा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-याच्या परवानगीने सुरु
झाली.
सुरुवातीला या तीन शिक्षकी शाळेत २९ वर्षे वयाचे मुख्याध्यापक आगवेकर
सर, २३ वर्षे वयाच्या आगवेकर मॅडम आणि गावकर आडनावाच्या २१ वर्षे वयाच्या
बी.एस.स्सी. शिकलेल्या शिक्षिका कार्यरत होत्या. कोयना प्रकल्पातील अधिकारी आणि
कर्मचा-याच्या मुलांच्या सोयीकरिता अलोरेच्या पूर्वी सन १९६९ साली संस्थेची पोफळीतही
शाळा सुरु झाली होती. इयत्ता ८ वीचा एक वर्ग, ३ शिक्षक, १ लिपिक, १ शिपाई आणि
तुटपुंजे शैक्षणिक साहित्य घेऊन, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या तिस-या टप्प्याचे,
कोळकेवाडी धरण आणि बोलादवाडी पॉवर हाऊसचे काम सुरु झाल्यावर शासनाने वसविलेल्या
‘अलोरे वसाहत’ करिता मुख्यत्वे शाळा सुरु झाली. शाळेत विद्यार्थ्यांसोबत स्वत:
विद्यार्थी होऊन आगवेकर सर कार्यमग्न असत. शाळा भरायच्या वेळेस स्वतः घंटेच्या
खालीच ते उभे असायचे, त्यांचा हा शिरस्ता नंतर शाळा नव्या इमारतीत आल्यावरही निवृत्तीपर्यंत
कायम राहिला. विद्यार्थी आणि शिक्षकांपैकी कोण-कोण उशिरा येतंय, यांसह सर्वजण
वर्गात जाऊन प्रार्थना सुरु होत नाही तोपर्यंत सरांचे बारीक लक्ष असायचे. शाळेच्या प्रगतीच्या दृष्टीने पहिल्याच
वर्षी ‘पालक शिक्षक संघ’ स्थापन झाला, ‘शाळेची सर्वांगीण प्रगती’ हेच एकमेव ध्येय
होते. आगवेकर सर स्वतः अगदी जिद्दीने ही शाळा उभी करायचीच अशाच प्रयत्नात होते, पण
काही वेळा त्यांनाही निराश व्हावे लागायचे, शाळा चालविणे हे तितके सोपे काम नक्कीच
नव्हते. या साऱ्यांतून एके दिवशी ‘आपल्याला
हे नक्की झेपेल का ?’ अशी शंका त्यांच्या
मनात डोकावली. मनातल्या विचारांना मनातच दाबून काम करणे शक्य होणार नाही याची
जाणीव असल्याने त्यांनी आपल्या मनातील ही भावना संस्थाचालकांनाही बोलून दाखविली. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.
रत्नागिरी जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात सर्वाधिक काळ एकच ‘मुख्याध्यापक’
लाभलेली आणि प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केलेली शाळा हा नावलौकिक मिळविण्यासाठी
अलोरे शाळा सज्ज झाली होती.
नव्याने शाळेची गणिते जुळवू पहाणाऱ्या आगवेकर सर,
शिक्षण क्षेत्रातील एखाद्या जाणकार व्यक्तिमत्वाच्या शोधात असताना त्यांना ५६
वर्षे वयाचे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व लाभलेले, गांधीवादी विचारसरणीचे बी.एस.स्सी.,बी.एड.,
एम.एड. पर्यंत शिक्षण झालेले, पुढे किंचितसा
सोगा सोडलेले पांढरे स्वच्छ धोतर, अंगात सैलसर सदरा नि डोक्यावर पांढरी टोपी परिधान
करणारे माधव नारायण कुलकर्णी नावाचे शिक्षक गवसले. आगवेकर सरांना त्यांच्याविषयी कमालीचा
आदर राहिला. त्यामागे वयाबरोबरच स्वत: विज्ञान शिक्षक असूनही इंग्रजी, मराठी,
संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. यांसह शाळेतला कोणताही विषय शिकवायची तयारी आणि
संपूर्ण शालेय व्यवस्थापन याबाबतीतील त्यांचे असलेले ज्ञान ही कारणे होती. या मा.
ना. कुलकर्णी सरांचे योगदान पाहून आगवेकर सर शाळेतील शिक्षकांच्या ‘तासिके’ची
पाहणी करायला त्यांना सांगत असत. याच दरम्यान, पूर्वी संगमेश्वर-माखजनच्या शाळेत
मुख्याध्यापक राहिलेले पु. वि. जोशी हेही कार्यरत झालेले होते. गो. रा. कुलकर्णी
नावाचेही एक शिक्षक होते, तेही अलोरेत येण्यापूर्वी कुठेतरी मुख्याध्यापक होते.
फार थोडा काळ बर्वे नावाचे पूर्वी मुख्याध्यापक राहिलेले शिक्षक अलोरेत येत होते. कितीतरी
वेळा शाळेत प्रतिकूलता निर्माण झाली पण म्हणून त्याचा परिणाम इतरत्र कुठेही वा
घरात जाणवला नाही. ‘शाळेचा व्याप आहे माझ्या डोक्यात तो असू देत, पुन्हा घरी
आल्यावर तो नको’ असं ते म्हणायचे. शाळेत शाळा आणि घरात घर हे गणित सरांनी १९७३
साली वर्षी जमवले आणि अगदी सन २००० पर्यंत सांभाळले. मा. ना. कुलकर्णी सरांनी अगदी
सुरुवातीला आगवेकर सरांना सुचविले होते, ‘शाळा सुरु होण्याच्या आधि किमान १०
मिनिटे मुख्याध्यापक शाळेत हजर असलेच पाहिजेत’ आगवेकर सरांनी ते तत्व आयुष्यभर
जपले. तीन मुख्याध्यापक आणि गुरूंचे गुरु मा. ना. कुलकर्णी या वयाची पन्नाशी
केव्हाच ओलांडलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात ३१ वर्षीय आगवेकर सरांच्या ‘मुख्याध्यापक’
पदाची कसोटी सुरु होती. पुढच्या काळात या कसोटीवर सर किती खरे उतरले याची साक्ष
देणारे दिनांक २ जानेवारी १९९७ चे एक पत्र आजही उपलब्ध आहे. या पत्राचा विषय अलोरे
शाळेत संगीत वर्ग सुरु करणे हा असून, त्यासाठी आलेल्या अर्जावर, संस्थाचालकांकरिता
आपला हस्तलिखित शेरा लिहिताना शेवटच्या ओळीत आगवेकर सरांनी, ‘कृपया आपण मान्यता
देणेत कोणतीच अडचण नाही’ असे म्हटले आहे. हे वाक्य लिहिण्यासाठी लागणारा आत्मविश्व्वास
सरांनी आपल्या मेहनतीने कमावला होता.
पुढच्या काळात उत्तम अध्यापनाशिवाय इतर कार्यात आघाडीवर
राहणाऱ्या असंख्य हुशार, नवतरुण, उत्साही, कर्तृत्ववान आणि झपाटलेल्या शिक्षकांची
टीम सरांनी जमविली. अलोरे शाळेने महाराष्ट्राच्या शालेय इतिहासात जे दखलपात्र यश
प्राप्त केले त्यात या शिक्षकांचा आणि त्यांना सतत प्रोत्साहन देणाऱ्या
मुख्याध्यापक आगवेकर सरांचा रोल महत्वाचा राहिला. स्वत: शेतकरी कुटुंबातले असल्याने त्यांनी
शाळेतही शेतीचे अनेक प्रयोग केले, विद्यार्थ्यांना कमवा शिका योजनेचे महत्त्व
पटवून दिले. शेतक-याच्या मुलांबाबत विशेष कणव होती. सन १९७३-७४ साली त्यांनी
नव्याने शाळेत आलेल्या बचॅमधील काही मुले निवडली आणि त्यांच्या मदतीने आजूबाजूच्या
गावातील शेतक-याच्या मुलांचा शोध घेतला होता. या लांबच्या मुलांना त्याकाळी रोजचा
एवढा चालून करावा लागणारा प्रवास लक्षात घेत त्यांनी मुलांची, क्वचित मुलींचीही रात्रीची
शाळेतच राहण्याची व्यवस्था केली होती. २४ तास शाळा जगणारे सर स्वतःही रात्री-अपरात्री
शाळेत येत असत. सरांचे कर्मचारीही सोबत असत. बाहेरच्या या सा-या मुलांमधील
तब्बेतीने चांगला असलेल्या मुलाला सर रोज घरी पाठवित, हा विद्यार्थी दुस-या दिवशी
शाळेत येताना उर्वरित विद्यार्थ्यांचे डबे सोबत आणीत असे. हे वाचायला जितकं सोपं
वाटतंय, प्रत्यक्षात ते तितकं सोपं मुळीच नव्हत, पण ‘आगवेकर’ नावाच्या सरांचं हेच
तर वैशिष्ट्य होत. जे हळूहळू लोकांना समजू लागलं होतं, सरांच्या याच स्वभावामुळे
पंचक्रोशीतील अनेकांनी सरांना आपलं मानलं होत. त्याकाळी कोयना प्रकल्पातल्या अनेक कर्मचाऱ्यांना
११ वी पास झाल्याशिवाय पुढील प्रमोशन मिळत नव्हते, कर्मचा-यांचे नुकसान व्हायचे.
संघाच्या संस्कारातून तयार झालेल्या सरांनी सामाजिक जाणीवेतून या अशा लोकांसाठी
त्यावेळी शाळेत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत ११ वीचे जुन्या अभ्यासक्रमानुसार
विशेष वर्ग, प्रकल्पात शेजारच्या कर्नाटक राज्यातून आलेल्या कर्मचाऱ्यांकरिता १०
वीच्या ‘मराठी’ भाषेचे वर्ग शाळेने चालविले. सन १९७५ साली शाळेच्या पहिल्या
एस.एस.सी. बॅचचा निकाल ८० टक्के इतका सर्वोच्च लागला. शाळेची राणीदेवी सुमेरचंद अगरवाल
ही ७०० पैकी ५७७ (८२.४२ टक्के) गुण मिळवून चिपळूण केंद्रात पहिली आली. शालेय
विद्यार्थ्याचा अगदी आई-बापाप्रमाणे, किंबहुना किंचितसा त्याहूनही अधिक विचार
करणारे, मुलांचा सांभाळ करणारे व्यक्तिमत्व म्हणून, सतत काळी पँट आणि किंचित
पांढरा ढगळा शर्ट परिधान करणारे आगवेकर सर एव्हाना पंचक्रोशीत लोकप्रिय झालेले
होते. याच दरम्यान त्यांना ‘बाबा’ आगवेकर हे मिळालेले नामाभिधान त्याचेच सार्थस्वरूप
होय.
माजी विद्यार्थ्यांच्या सक्रीय सहभागासह सन १९७८ पासून
शाळेने आपले स्नेहसंमेलन घ्यायला सुरुवात केली. शाळेच्या पटावरील एकूण
विद्यार्थ्यांपैकी किमान २५ टक्के विद्यार्थी स्टेजवर यायलाच हवेत, यासाठी सर
आग्रही असायचे. अलोरे सारख्या लहान गावात राहणा-या विद्यार्थ्यांना लांब पल्याच्या
शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून अधिकाधिक प्रेक्षणीय स्थळे पाहाता यावीत यासाठी
आगवेकर सर एस.टी.ची बस मध्यरात्री १२ वाजता सोडायचे. वाढत्या विद्यार्थी संख्येचा
विचार करता साहित्याची जमवाजमव करण्यापासून त्याच्या नियोजनासाठी कायमस्वरूपी प्रयोगशाळा
सन १९८० साली शाळेत उभारण्यात आली. शाळेचे पहिले स्वतंत्र स्नेहसंमेलन दिनांक १२
ते १४ ऑक्टोबर १९८१ ला के. पु. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. संस्थेचे
अध्यक्ष डॉ. तात्यासाहेब नातू हे स्वतः शैक्षणिक चळवळीशी खूप वर्षे संबंधित आणि
कष्टाची पारख असलेले, मान्यताप्राप्त व्यक्तिमत्व असल्याने, त्याचा आगवेकर सरांना
खूपच चांगला उपयोग झाला. रामचंद्र गणेश खोत हे शाळेत सन १९७५-७६ च्या दरम्यान दाखल
झालेले व्यक्तिमत्व पुढे शिष्यवृत्ती परीक्षांच्या विषयात जिल्ह्यात अग्रक्रमाने
नावाजले गेले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेने जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थी
शिष्यवृत्ती परीक्षेत येण्याचा रत्नागिरीच्या पाठक हायस्कूलचा विक्रम मोडीत काढला.
अलोरेची शाळा दर्जेदार म्हणून गणली जाऊ लागली तेव्हा प्रकल्पाच्या चौथ्या
टप्प्याचे काम जोरात सुरु झालेले होते. अलोरे पंचक्रोशीत शासनाच्या विविध
प्रकारांची जवळपास ५२ कार्यालये तेव्हा येथे कार्यरत होती, प्रत्येक कार्यालयात
कनिष्ठ अभियंता पदापर्यंत किमान १२ आणि त्यानंतर लिपिक, भांडारपाल आणि शिपाई वगैरे
कार्यरत असायचे. अलोरे ‘हाउसफुल्ल’ झालेले होते. सुदैवाने कर्मचा-याना निवासासाठी
खोल्या अपु-या पडत असताना, शाळा चालविण्याच्या निमित्ताने विविध किमान चार ठिकाणी अनेक
खोल्या अडकून असणे ही एक जमेची बाजू होती. ‘शाळेला कुठेतरी द्या एक इमारत बांधून !’
ही भावना त्यातूनच जोर धरू लागली होती. कधीतरी अचानक शाळेत संस्थाचालक आले की मग
त्यांची आणि प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घडावी, शाळेच्या नव्या इमारतीच्या विषयात
काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी म्हणून ध्यास घेतलेले आगवेकर सर सतत प्रयत्नात
असायचे. त्याकाळात मोबाईल नव्हते, त्यामुळे अधिकारी प्रकल्पाच्या कोयेनेच्या
कार्यालयात असेपर्यंतच संपर्क राहायचा, नंतर ते अलोरेत पोहोचेपर्यंत विश्रामगृहात निव्वळ
वाट पाहात बसावे लागायचे, यात किती कालावधी नि संयमाची कसोटी नियतीने पाहिली असेल,
याची मोजदाद न केलेलीच बरी ! सर अशावेळी तासनतास उभे असलेले अनेकांनी पाहिलेत. प्रकल्पातील
अधिकारी अभियंता आणि संस्थाचालक यातील दुवा बनून समन्वय साधण्याचे महत्वाचे काम
आगवेकर सरांनी केले, प्रकल्पात कार्यकारी अभियंता राहिलेले इनामदार आजही हे मान्य
करतात. ‘नवीन शाळा हवीच !’ हा आगवेकर सरांचाच अट्टाहास होता. दिनांक २४ जानेवारी
१९८७ साली शाळेच्या नवीन भव्य वास्तूचा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याहस्ते
भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री महोदय येणे ही घटना संस्था चेअरमन आमदार
तात्यासाहेब नातू यांच्यामुळेच शक्य झाली होती. शाळेला जून १९८७ ला, पालक शिक्षक
संघाचे अध्यक्ष पां. म. कुलकर्णी यांची मुलगी कुमारी जयश्री कुलकर्णी हिच्या
रूपाने मुंबई विभागीय मंडळाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळाले, ९१.२८ टक्के गुण
मिळवून यादीत ती १७ वी आली. त्यावेळचा तो आनंद केवळ शब्दातीत !
सरांचा तास विद्यार्थ्यांना जीवंतपणाची जाणीव करून
द्यायचा. खणकन् कानाखाली वाजवून स्पष्टीकरण द्यायची सरांची पद्धतच वेगळी होती,
त्यामुळे आगवेकर सर शाळेच्या आवारातच काय संपूर्ण गावात कुठेही दिसले की त्यांना
पाहून जो लपेल, तो अलोरे शाळेचाच विद्यार्थी समजला जायचा. अशी कधीतरी एखादी
कानाखाली वाजविलेली, अख्या वर्गालाच काय अख्ख्या शाळेला पुढचे अनेक महिने पुरायची.
‘शाळेतल्या विद्यार्थ्यांना मारणे, बदडणे यात काहीही गैर नाही’, या तत्वावर सरांचा
गाढा विश्वास होता आणि तसे ते वागलेही ! यामुळेच त्याकाळी मुलाला अलोरे हायस्कूलमध्ये
घालून आगवेकर सरांच्या देखरेखीखाली दिलं की, ‘मुलगा सुरक्षित’ असल्याची प्रबळ
भावना पालकांची असायची ! सरांच्या घेरदार पोटावर अडकविलेला तो किंचितसा ढगळा
बऱ्याचदा पांढरा किंवा फिक्कट शर्ट, काळी पँट, पायात चप्पल असा अत्यंत साधासा
सरांचा पेहेराव राहिला. पावसाळ्याच्या दिवसात सर कधीकधी शर्टच्या कॉलरला मागून
छत्री अडकवून चालायचे, हे फक्त आगवेकर सरांनाच शोभावे. ज्यांनी हे पाहिलेय त्यांना
ते आजही आठवेलं. सरांचा सतत मार खाणा-या विद्यार्थ्याने एखाद्या दिवशी डबा नाही
आणला तर ते त्याला आपल्या घरी घेऊन जात. कोणाही शिक्षक-कर्मचा-याच्या सुख-दुखा:सह
व्यक्तिगत अडचणीच्यावेळी शाळेचे वातावरण ‘त्या’ व्यक्तीला अक्षरशः एखाद्या कुटुंबासारखेच
वाटायचे, मायेचा ओलावा आणि आपलेपणाचं हे वातावरण काही अचानक तयार झालेलं नव्हतं,
त्यामागे अनेक वर्ष एक अविश्रांत मन, मेंदू आणि शरीर एकाचवेळी कार्यरत राहून विचार
करत होत. ज्याने आपल्या धीरोदात्त व्यक्तिमत्वाने अलोरे शाळेच्या सा-या वातावरणाला
‘बाबा’ बनून आधार दिला होता. जून १९९१ साली अलोरे शाळेत कोल्हापूर विभागाच्या
शिक्षण उपसंचालकांच्या परवानगीने उच्च माध्यमिक ‘कला आणि वाणिज्य’ शाखेचे वर्ग
सुरु झाले. दिनांक १४ नोव्हेंबर १९९२ साली शाळेच्या नवीन वास्तूचे शिक्षणमंत्री
पतंगराव कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
एकदा वर्गात शिरले की विद्यार्थ्यांना शिकविण्यात
सारेच तरबेज आणि एकापेक्षा एक सरस अशा हरहुन्नरी शिक्षकांचा शब्दशः ‘ताफा’च आगवेकर
सरांनी जमविला होता, शाळेच्या सततच्या चढत्या आलेखामागे हे एक प्रमुख कारण होते. सन
१९८२ ते ९७ दरम्यानचा कालावधीत सरांना शाळेच्या माध्यमातून यशाचे बरेच पाळले गाठता
आले. सर्व सुखसोयींनी युक्त अशी दर्जेदार शाळा म्हणून या शाळेने अनेकदा शासनाची
विशेष ‘ग्रँट’ मिळविल्याचा इतिहास आहे. दिनांक २६ नोव्हेंबर १९९५ च्या सकाळी
सरांना पहिला दुर्दैवी ‘माईल्ड हार्टअॅटक’ येऊन गेला. यामुळे सरांच्या कणखर
मानसिकतेला धक्का बसला. शाळेच्या चौकटीबाहेरील ‘बोर्डाचा चीफकंडक्टर’ सारख्या
जबाबदा-याआता आपण कमी करू या असेही त्यांना वाटू लागले होते. सरांच्या
कार्यक्षमतेवरही याचा निश्चित परिणाम झाला, पण सरांनी निवृत्तीपर्यंत तो कधी कोणालाही
जाणवू दिला नाही.
दिनांक १२ जून १९९६ साली शाळेने आपला रौप्य
महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. त्याचा भव्य कार्यक्रम दिनांक २६ डिसेंबर
१९९६ ला संपन्न झाला. तोपर्यंत शाळेने ‘महाराष्ट्रातली १९ व्या आणि रत्नागिरी
जिल्ह्यातील २ ऱ्या क्रमांकाची आदर्श शाळा’ असा लौकिक प्राप्त केलेला होता. रौप्य
महोत्सवी वर्षात शाळेत ‘बालवाडी ते बारावी’ पर्यंतच्या शिक्षणाची सोय झालेली होती.
फेब्रुवारी १९९७ मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत ६५ पैकी २५ विद्यार्थ्यांनी
शिष्यवृत्ती मिळविली. सन १९९५ ते १९९७ दम्यान, संस्थेच्या सहकार्याने खडपोलीला
हायस्कूल व्हावे, म्हणून सरांनी यशस्वी प्रयत्न केला. सन १९९९ च्या दरम्यान शाळेला
नवी इमारत कमी पडू लागली, इमारत वाढविणे शक्य होत नव्हते अखेर शासनाच्या परवानगीने
शाळा ‘दुबार’ पद्धतीने भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिनांक ३१ मार्च २००० रोजी
आगवेकर सरांच्या निवृत्तीप्रसंगी ‘प्राचार्य आगवेकर गौरव समारंभ’ पार पडला. आजच्या
स्पर्धेच्या युगात संगणक आणि इंटरनेट सारख्या माध्यमांच्या वापरातून स्वतःला
अधिकाधिक अद्ययावत करण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला होता. आपले गुरुवर्य मा.
ना. कुलकर्णी सरांचा मुख्याध्यापक होण्याचे भाग्य लाभले, हा आपल्या जीवनातील सर्वात
मोठा गौरव असल्याचे सरांनी नमूद केले होते. ‘प्रचार आणि प्रसिद्धी यांच्या फार
मागे धावणारे असे सरांचे व्यक्तिमत्व नव्हते, त्यांचा स्वतःचा एक स्पेस होता. ते
अत्यंत मोजक्याच माणसांजवळ मनापासून मोकळे व्हायचे. एखाद्याजवळ त्यांचे जमेपर्यंत
थोडे अवघड असायचे, पण एकदा का जमले की मग सरांसारखा माणूस नाही असेच शब्द सरांना
अनुभवणा-या प्रत्येकाच्या तोंडून यायचे.
पुढे २००० साली निवृत्त झाल्यावर पूर्णतः मोकळे
झाल्यावर सर ख-या अर्थाने खचत गेले. आपण रिकामे आहोत ही भावना त्यांना कायम सतवायची.
‘अलोरे हायस्कूल हे आगवेकर सरांचे तिसरे अपत्यचं !’ सरांच्या मुलांच्या अमित आणि
नचिकेत यांच्या या भावना आपल्याला खूप काही सांगून जातात. निवृत्तीनंतर,
‘आता यांचे कसे होणार ?’ याची काहीशी
चिंता कुटुंबियांच्याही मनात होती. ‘आयुष्यातील सर्वाधिक काळ २४*७ एका विशिष्ट
ध्येयाने झपाटून कार्यरत राहिलेला हा माणूस त्याच्याशिवाय कसा जगू शकतो ?’ हा
प्रश्न होताच !
दुर्दैवाने तसचं घडलं ! शारीरिक कारणं काहीही
असतील ! पण निवृत्तीनंतर अवघ्या ३ वर्षांत ११ एप्रिल २००३ साली सरांचे निधन
होण्यामागे, ‘आपण निवृत्त झालोय’ ही गोष्ट मानसिक पातळीवर स्वीकारण्यात त्यांना निर्माण
झालेली अडचण हे ‘आपण सिद्ध करू शकत नसलो तरीही’ एक प्रमुख कारण असल्याची भावना त्यांचा
मुलगा नचिकेतची आहे. सर भूतकाळात रमणारे नव्हते, त्यांना त्याबाबत फारसे बोलणेही
आवडायचे नाही, ते सतत भविष्याचे इमले बांधण्यात, विचारात मग्न असायचे.
मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असतानाचे सर आणि निवृत्तीनंतरचे आगवेकर सर यांत ‘जमीन-अस्मान’
एवढे अंतर होते. ‘खरंतरं माणसाने आपली नोकरी
एवढी मनावर घेऊच नये’ असं कोणीही आज म्हणेल, पण सरांनी ती घेतली होती, आजचे शाळेचे
समृद्ध रूप त्याचेच प्रतिक असून त्यांचेच नाव शाळेला दिले जाण्याचा हा नामकरण
सोहोळा अत्यंत स्तुत्य, अनुकरणीय आणि अभिनंदनीय आहे.
धीरज वाटेकर
(माजी विद्यार्थी, इयत्ता
दहावी बॅच १९९५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा