|
वडवळ (सोलापूर) येथील वटवृक्ष |
अलिकडे, वटपौर्णिमेचे औचित्य साधून पूजनकारणे वडाच्या झाडाच्या फांद्या बाजारात
येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. विक्रेते छोट्या-मोठ्या शहरात सार्वजनिक
रस्त्यांच्या आजूबाजूची, जंगलातील किंवा खासगी आवारातील वडाची झाडे / फांद्या तोडत
असतात. यावर उपाय म्हणून अनेक शहरातील वृक्षप्रेमींनी वडाच्या रोपांचे वितरण उपक्रम
सुरु केले आहेत. महिलांचा त्यांना मिळणारा प्रतिसाद अभिनंदनीय आहे. या पार्श्वभूमीवर
वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावातील पुरातन
वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे. दस्तऐवजीकरणातून समोर येणाऱ्या माहितीच्या
आधारे जनजागरण चळवळ राबवून महिला वर्गाची पाऊले हळूहळू पुन्हा ‘पुरातन’ वटवृक्षांकडे
वळायला हवीत!
|
इमामपूर (बीड) येथील वटवृक्ष |
महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणे पुरातन ‘वटवृक्ष’ पाहायला मिळतात.
मागच्या दिवाळीत आम्ही सहकुटुंब बीड जिल्ह्यात पर्यटन-भ्रमण करत असताना ईमामपूर
(बीड) येथील वटवृक्ष आवर्जून पाहिला होता. तिथल्या श्रीकाळभैरवाच्या डोंगरावर
मूळवृक्ष बहुधा अस्तित्वात नसलेला आणि पारंब्यांचाच पसारा वाढलेला हा प्रचंड मोठा वटवृक्ष
आहे. चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात आम्ही नागेश संप्रदायाचे ठिकाण असलेल्या आणि
हेगरस, अज्ञानसिद्द
आदी संतश्रेष्ठांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील
वडवळ गावाला भेट दिली होती. गावातील श्रीनागनाथ मंदिर इतिहासप्रसिद्ध आहे. त्यावेळी
प्रसिद्ध कवी-समीक्षक अरुण इंगवले आणि कोकणी लोककलांचे अभ्यासक प्रा. संतोष गोनबरे
यांच्यासमवेत आम्ही वडवळ गावातील वडाचे भव्य झाड पाहिले होते. कोकणात गावागावात आजही
महिला वटवृक्ष पूजन करताना आढळतात. आमचे बालपण गेलेल्या कोकणातील चिपळूण
तालुक्यातील अलोरे गावी विश्वकर्मा चौकात असलेले वडाचे झाड कोयना प्रकल्प कार्यालय
सेवाकारणे गावात वास्तव्य केलेल्या मागील किमान तीनेक पिढ्यांच्या आठवणी जपून आहे.
अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील पेमगिरी (शहागड किल्ल्याजवळ) या ठिकाणी भले मोठे वडाचे
झाड आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील थीमम्मा मरीमानु हे वडाचे झाड, कोलकात्यातील
ग्रेट बनियान ट्री, गुजरातमधील भरूच शहरातील कबीरवड, तेलंगणाच्या मेहबूबनगर
जिल्ह्यातील पिल्लालमर्री, रामोहल्ली-बेंगलोरमधील द बिग वटवृक्ष आदी ठिकाणची वडाची
झाडे प्रसिद्ध आहेत.
|
वडवळ (सोलापूर) येथील वटवृक्ष |
वटपौर्णिमेशी निगडीत वटसावित्रीची कथा वडाच्या वृक्षाबरोबर जोडली गेल्याने हा
वृक्ष महिलांमध्ये पूजनीय आणि लोकप्रिय ठरला आहे. खरंतर मानवी मनाचा ठाव घेणाऱ्या कथानकांशी
जोडलेले वृक्ष आणि पर्यावरण महत्त्वाचे आहे. निसर्गचक्रातील वर्तमान प्रदूषित जगात,
वृक्षांचे मानवी जीवनातील स्थान, वृक्षांची उपयुक्तता लक्षात घेऊन वडासारख्या पुरातन
वृक्षांचे अधिकाधिक सान्निध्य मिळवण्यासाठी आपण सर्वांनीच दक्ष असायला हवे आहे.
यासाठी कोकणात गावागावातील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण ही चळवळ बनायला हवी आहे.
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/10330