आठवे पर्यावरण संमेलन आळंदी (देवाची) वृत्तांत
पृथ्वीतलावर पर्यावरणीय ‘आणीबाणी’ची स्थिती
- संमेलनाध्यक्ष प्रा. श्री. द. महाजन
https://youtu.be/dld-WQcDo28 (प्रा. श्री. द. महाजन यांच्या भाषणाची लिंक)
महाजन पुढे म्हणाले, पर्यावरण बदल आणि
जागतिक तापमानवाढ यांचे गांभीर्य कोणाच्याच लक्षात येत नाही आहे. माझ्या एका लेखक
मित्राने आपल्या पुस्तकात ‘मनुष्य जातीची सामुहिक आत्महत्येकडे वाटचाल सुरु आहे’
असे म्हटले आहे. यावर युद्धपातळीवर काम होण्याची आवश्यकता आहे. १९९१ साली एका आंतरराष्ट्रीय
परिषदेसाठी जर्मनीतील काही संशोधक पुण्याला आले होते. ‘जर्मनीमध्ये आज जंगल किती
आहे?’ हा प्रश्न मी त्यांना विचारला होता. कारण
स्वातंत्र्यपूर्व काळात आम्हाला युरोपचा भूगोल अभ्यासाला होता. तेव्हा विषय
शिक्षकांनी ‘ज’ लक्षात ठेवायला सांगितला होता. आम्हीही ‘ज’ म्हणजे
जर्मनी-जंगल-जोगळेकर सर असं मनात पक्कं झालेलं समीकरण आजही विसरू शकलेलो नाही.
आम्ही शालेय शिक्षण घेत होतो तेव्हा जर्मनीत चाळीस टक्केहून अधिक जंगल असल्यास
क्रमिक पुस्तकात नमूद होतं. बऱ्याच वेळानंतर एका शास्त्रज्ञाने मला सांगितलं,
‘sorry to say you sir, there is no forest in Germany today’ आज
जर्मनीत जंगल नाही. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट पूर्वी खूप प्रसिद्ध होतं. तेही सगळं
प्लांटेशन आहे. निसर्ग आणि पर्यावरण हे परवलीचे शब्द झालेले आहेत. नुसतं पर्यावरण
प्रेम पुरेसं नाही. त्याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. निसर्ग आणि पर्यावरणाचा
अभ्यास केल्यास आपण संवर्धन आणि संरक्षण करू शकू. निसर्ग आणि पर्यावरणाचा शाळेत
अभ्यास सुरु झालेला आहे. न्यायालयांच्या सूचनेनुसार शासनाने देशभर पर्यावरणाचा
अभ्यास सुरु केला. मात्र हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना या विषयाचे तितकेचे ज्ञान
नाही. भारतीय संस्कृती मानवाला प्राणी म्हणून संबोधते. पाश्चात्य राष्ट्रांत
मानवाला परमेश्वराचे लाडके अपत्य संबोधतात. त्याच्यासाठी परमेश्वराने इतर वनस्पती
आणि प्राण्यांची निर्मिती केल्याचे सांगतात. यामुळे पाश्चात्य राष्ट्रांची
विकासनीती आणि निसर्गनिती याच विचारावर आधारित आहे. पाश्चात्य राष्ट्रांत
पर्यावरणाचे नुकसान होण्याला हा विचार कारणीभूत आहे.
पृथ्वीवर सूक्ष्म जीव, वनस्पती, प्राणी हे तीन प्रकारचे सजीव आहेत. वनस्पती आपले अन्न आपण निर्माण करतात.
ही कला फक्त वनस्पतींनाच अवगत आहे. वनस्पती या कार्बनडाय ऑक्साइड आणि पाण्यापासून
गुल्कोजची साखर तयार करते. आपण आपले अन्न तयार करत नाही. आपण तयार केलेलं अन्न
फक्त शिजवते. प्राणी हे वनस्पतींनी निर्माण केलेलं अन्न वापरतात. सूक्ष्म जीव हे
मृत वनस्पती आणि प्राणी यांचं रुपांतर खतांमध्ये करतात. म्हणून जमिनीत सूक्ष्म जीव
आवश्यक आहेत. पाश्चात्य राष्ट्रात वनस्पतींना सजीव मानत नसत. आपले शास्त्रज्ञ
जगदीशचंद्र बोस यांनी जगाला हे पटवून दिलं. वनस्पती निर्माण होतात, त्यांची वाढ होते, त्या मरतातहि. अर्थात त्या सजीव
आहेत. भारतातील सहन करू शकणाऱ्या किमान निम्या लोकांनी किमान उन्हाळ्यात दोन
दिवसातून एकदा अंघोळ केली तर कितीतरी वीज वाचेल आणि कितीतरी कार्बनडाय ऑक्साइड
वायू थांबेल. पर्यावरण संसाधने कमीतकमी वापरायला हवीत. शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणशास्त्र आणि नागरिकशास्त्र हे दोन
विषय महत्त्वाचे आहेत. कित्येक सपुष्प वनस्पतींना आकर्षक, सुंदर
आणि सुवासिक फुले येतात. ही फुले देवाला वाहाण्यासाठी किंवा मानवी नेत्रसुखासाठी
आहेत असं आपल्याला वाटतं. ही फुले म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे अवयव आहेत.
फुलांपासून फळे, फळांमध्ये बिया आणि त्यातून पुन्हा वृक्ष
तयार होणार आहेत. कीटकांना आकर्षक करून घेण्यासाठी फुलांना रूप, रंग आणि वास आहे. म्हणून आपण झाडावरील फुले तोडताना काळजी घ्यायला हवी
आहे. असे महाजन म्हणाले.
माणूस रोज ४० ग्रॅम केमिकल पाण्यात टाकतो आहे – शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद मोघे
पर्यावरण कामात तरुणांचा सहभाग वाढायला हवा – प्रमोद मोरे
पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार
बनावा - धीरज वाटेकर
वाटेकर पुढे म्हणाले, माऊलींच्या पर्यावरणीय चिंतनाला पारमार्थिक तत्त्वज्ञानाची बैठक आहे. पर्यावरणीय समस्या तेव्हा नव्हत्या, आज प्रचंड आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धन वर्तन हा मानवी स्वभाव-संस्कार बनण्याची गरज आहे. हाच विचार करून अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृक्षमित्र’ स्व. आबासाहेब मोरे यांनी १९८२ साली पर्यावरण जनजागरणाचं काम सुरु केलं होतं. आजचं पर्यावरण संमेलन हे त्याचंच रूप आहे. खरंतर निसर्गाचं स्वयंव्यवस्थापन हे व्यवस्थापनशास्त्राचं सर्वोत्तम उदाहरण आहे. मनुष्याच्या लुडबुडीमुळे पर्यावरणाचं व्यवस्थापन बिघडलं आहे. माणसांनी पर्यावरणाच्या शिस्तबद्ध चाकोरीमध्ये लुडबुड करून निर्माण केलेल्या अडथळ्यांची दुरुस्ती करायला हवी आहे. ही दुरुस्ती करण्याचे काम अनेक मंडळी आपल्यापरीने करत आहेत. अशा तज्ज्ञांचे विचार उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यात एक व्यवस्था उभी करायला हवी याची जाणीव सुमारे ३० वर्षांपूर्वी आबासाहेबांना झाली होती. त्यातून मंडळाचे काम उभे राहिल्याचे वाटेकर यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी वृक्षाला स्थितप्रज्ञ म्हणून गौरविले आहे. सर्वांभूती समदृष्टी ठेवणारी व्यक्ती आणि वृक्ष एक समान आहेत असे त्यांनी म्हटले आहे. 'जो या खांडवया घावो घाली का लावणी जायचे केले दोघन एकीच साऊली वृक्षू दे जैसा. वृक्ष जो त्याला तोडण्याच्या हेतूने त्याच्यावर घाव घालतो आणि जो पाणी घालून त्याला वाढवतो त्या दोघाना समान सावली देतो. मित्र आणि शत्रू असा भेदभाव न करता सर्वाविषयी समभाव ठेवणे हे वृक्षाचे लक्षण आहे. तसेच ते स्थितप्रज्ञ व्यक्तीचे अर्थात संताचे लक्षण आहे. ज्ञानेश्वरीत विविध वृक्षांची नावे, पशुपक्ष्यांची नावे, धातूंची नावे प्रसंगपरत्वे ज्ञानेश्वरांनी दृष्टांत, रूपक, उपमा यांच्याद्वारे समर्पकपणे उल्लेखले आहेत. अरण्यांना 'निकुंज' म्हटले आहे. ज्ञानेश्वरीत निसर्ग, पर्यावरण हे शब्द आढळत नाही. त्यांनी 'जीवसृष्टी' आणि 'भूतसृष्टी' ह्या संकल्पनांचा उपयोग पर्यावरण अर्थी घेतलेला आहे. निसर्गातील विविध घटकांचे दाखले दिले आहेत, असे वाटेकर म्हणाले.
भारतीय वनस्पतींचा चालताबोलता माहितीकोश अशी ओळख असलेले ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (एन.जी.ओ.) आयोजित आठवे पर्यावरण संमेलन रविवार दि. २९ डिसेंबर रोजी आळंदी (देवाची) येथील देविदास आश्रमशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिरात संपन्न झाले. आयोजक संस्था ही प्रमुख ‘पद्मभूषण’ अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रमोद मोघे, पुणे मनपाचे माजी सहाय्यक आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, देविदास आश्रम शाळेचे प्रमुख ह. भ. प. निरंजनशास्त्री कोठेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, इंद्रायणी बचाव समितीचे विठ्ठल शिंदे, ॲड. लक्ष्मण येळे, छायाताई राजपूत, विलास महाडिक, प्रभाकर म्हस्के, उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक व स्वागत धीरज वाटेकर यांनी केले. यावेळी पर्यावरण पुस्तकभेट, शाल व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचे उत्कृष्ट कार्य करणारा सातारा जिल्हा गट, अबितखिंड व आंबीखालसा ग्रामस्थ, व्ही. व्ही. पोपरे, पर्यवेक्षक माळी, पर्यावरणावर पीएच.डी करणारे आवटी दांपत्य आणि स्थानिक संयोजन समितीचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दुपारनंतरच्या सत्रात आळंदी येथील सिद्धबेट येथे पर्यावरणप्रेमींची क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली होती. इंद्रायणी सेवा फौंडेशनचे विठ्ठल शिंदे आणि प्रभाकर तावरे यांनी इंद्रायणी नदीची भीषण अवस्था सर्वांच्या लक्षात आणून दिली.
![]() |
भयंकर प्रदूषणाची शिकार झालेली इंद्रायणी नदी |
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी आरोग्य अधिकारी अॅड. प्रभाकर तावरे यांनी, आळंदीत पर्यावरण ज्ञानयज्ञ नियमित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे सहसचिव संजय गायकवाड यांनी आभार मानले.