बाळाची नाळ आईशी जोडलेली असते. पण मातीची नाळ पिढ्यांशी
जुळलेली असते. म्हणूनच मातीला / जमिनीला आई म्हणत असावेत. तिच्या दर्शनाचा सोहोळा
सर्वांगसुंदर ठरतो. ताठ कण्याचा आणि निधडय़ा छातीचा, बापाच्या
जागी असलेला सहय़ाद्रीसारखा पाठीराखा, तांबडय़ा मातीत खेळ मांडून एकमेकांच्या गळाभेटीसाठी आसुसलेली,
फळांफुलांनी युक्त वृक्षसंपदा,
तिच्या अंगाखांद्यावर खेळणारी रंगीबेरंगी पाखरं,
वन्यजीव, निसर्ग नवलांची दुनिया, देवालये त्यातील अध्यात्म यातून इथल्या माणसांची जडणघडण झालेली आहे. ही संस्कृती जपणारा
कोकणी माणूस शतकभरापूर्वी
पोटापाण्यासाठी मोठाल्या शहरात जाऊ लागला. मनिऑर्डरवर जगणारा प्रांत अशी कोकणची
ओळख खरंतर तेव्हापासूनची! पण
या चाकरमान्यांनी कोकणातील आपल्या मातीशी असलेली नाळ तुटू
दिली नाही. गावागावातल्या जत्रा, मे महिन्याची सुट्टी,
शिमगा-गणपतीच्या निमित्ताने चाकरमानी पिढ्यानपिढ्या कोकणात
येत राहिल्यात. नोकरीत वर्षभरातून एक-दोनदा मिळणारी हक्काची रजा कोकणात
जाण्यासाठी राखून ठेवणारी पिढी आजही आहे. हा या मातीचाच गुण म्हणावयास हवा!
कोकणातील माणसांची श्रद्धा डोळस तेवढीच
जाज्ज्वल्यही आहे. या मातीतील ग्रामीण जीवनाचा गावगाडा
हा न्याय, नीती, धर्म अनुष्ठान लाभलेल्या गावह्राटीला अधीन राहून चालतो
आहे. अनेक गावांनी आपली पारंपारिक वैशिष्ट्ये जपलीत. कोकणात दैवी
कुलाचार व कुलधर्म पाळण्यासोबत कोणत्याही कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी देवाचा
कौल (गावपळण, यात्रोत्सव, देवतांचे उत्सव, गावाच्या चतु:सीमेतील विशेष कार्य) घेण्याच्या प्रथेतील
‘बारा-पाचाची देवस्की’ हे इथल्या गावह्राटीचे एक खास वैशिष्टय आहे. बारा
इंद्रिये व पाच पंचमहाभूते म्हणजेच बारा-पाच अशी संज्ञा आहे. ‘कौलप्रसाद’ म्हणजे
देवाचे न्यायालय होय. गावाच्या चतु:सीमेत राहणारे ग्रामस्थ,
प्राणीमात्र, जीवजंतू यांचे परस्पर संबंधित व्यवहार-नाते सांगणारी
‘गावह्राटी’ अतिशय व्यापक, सर्वहितकर, विविध सूक्ष्मशक्तींना कार्यरत करणारी अतिशय प्राचीन
संकल्पना आहे. तळकोकणात हिचे आजही प्राबल्य आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनाचा जल्लोष देशभर
साजरा होत असताना कोकणसह राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊन पूर आलेला होता.
अशातच त्या दिवशी, ५ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी रत्नागिरी तालुक्यातल्या तोणदे
गावातील श्रीसांब मंदिरातल्या श्रावण नाम सप्ताहाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल
झाला. कौलारू मंदिरात छातीपर्यंत पाणी भरलेले असताना छताच्या आढ्यावर बसून भाविक
श्रीनामाच्या गजरात दंग झाले होते. कोकणातल्या उत्सवी उत्साहाची ही प्रातिनिधिक
अनुभूती होती. हिंदू जीवन पद्धतीत मानवाला विष्णू चरित्र आवडल्यास त्याला वैष्णव
होता येते. शिवाची उपासना केल्यास शैव होता येते. तसेच रामाची उपासना केल्यास
रामभक्त, गणरायावर प्रेम केल्यास गाणपत्य होता येते. यासाठी मूळ
‘हिंदू’ जीवन पद्धतीचा त्याग करावा लागत नाही. 'शिवो भूत्वा
शिवं यजेत्' असं वचन आहे. म्हणजे शिव बनून शिवची पूजा करावी अर्थात
देवस्वरूप होऊन राहावे. ही फार मोठी वैश्विक उपलब्धी हिंदू संस्कृतीत सामावलेली
आहे.
गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण. एकवेळ वर्षभर नाही जमलं
तरी चालेलं पण गणपतीत कोकण कमिंग मस्टच! कोकणात ‘गणपतीची शाळा’ असते. मुंबईत
‘कारखाना’ तर पुण्यात ‘चित्रशाळा’ असते. या गणपतीला शहरातून घरी
येणाऱ्या चाकरमान्याचे सामान म्हणजे जणू
ऐश्वर्यचं! काय-काय असतं त्याच्यात! सगळा संसारच
सोबतीला आणलेला असतो. कोकणातील माणसांची श्रद्धाही जाज्ज्वल्य आहे. इथल्या
ग्रामदेवतांचे लोकजीवनाशी असलेलं नातं भक्तीशी मर्यादित नाही. इथली दैवतं
लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग बनलेली आहेत. ही देवस्थाने आजही सांस्कृतिक,
सामाजिक आणि लोकसंग्रहाची केंद्रे आहेत. देवाला गाऱ्हाण
घालणं, वर्षातून एकदा किमान शिमग्याला देवतेची ओटी भरणं,
गावरहाटीचे नियम पाळणं सारं विलक्षण आहे. इथली दैवते
माणसांशी बोलतात, संवादही साधतात! संवादाची प्रक्रिया सुशिक्षित माणसांना
धर्मभोळेपणाची, अंधश्रद्धेची वाटत असेलही! पण गावात उभे आयुष्य घालविलेल्या माणसांना त्याच्या
खडतर दैनंदिन जीवनात संवादाची हीच प्रक्रिया अनेकदा आधार
देणारी वाटते. हे एकविसाव्या शतकातील जीवंत
वास्तव आहे. इथल्या मातीशी दूरदेशीच्या माणसाचं जे नातं
आजही टिकून आहे, त्यामागे ही कारणे आहेत. गूढरम्य गोष्टींचे भांडार असलेला कोकण
भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘भूत’ ही संकल्पना खरी की खोटी?
हा वेगळा विषय आहे. पण तरीही त्यातील रंजकतेचा इथल्या
मातीवर पगडा आहे, हे नक्की! जगातील पुढारलेल्या अनेक देशांच्या प्राचीन
दंतकथात डोकावल्यावरही आपल्याला हेच जाणवते.
कोकणात भातलावणी संपल्यावर घरोघरी गणपती येत असतात. तेव्हा
इथला सर्वसामान्य शेतकरी मनुष्य मोकळा असतो. निसर्गसुंदर कोकणाने गणपती आणि
त्यांची आई गौराई यांना जणू निसर्गदेवता मानले आहे. कोकणी आसमंतात तेरडा फुलायला
लागला की गौरी-गणपतीचे दिवस जवळ आल्याचे मानले जाते. गणेशोत्सवाशी कोकणवासियांचे
जीवाभावाचे नाते आहे. इथल्या माणसांना बाप्पा आपल्या घरातला वाटतो. ही माणसं
बाप्पाची नुसती पूजाअर्चा नि आरत्या करत नाहीत. तर तो असेल तितके दिवस त्याच्याशी
संवाद करत राहतात. त्याला आपली सुखदु:खे सांगतात. नवस-सायास करतात. वर्षभराची
उर्जा उरी साठवून आपलं जीवन जगायला सिद्ध होतात. येणाऱ्या संकटांवर मात करत
राहातात. कदाचित म्हणून कोकणी माणसं आत्महत्या करत नाहीत.
कोकणवासियांच्या मनातले बाप्पाचे रूप वेगळे आहे. आमच्यासाठी
तो सुखकर्ता दुखहर्ता आहे. ‘यावर्षी बाप्पाला आरास कोणती करायची ?’ याचे
काही महिने अगोदर सुरु होणारे नियोजन असो किंवा बाप्पाला मुक्यांनी पोहोचविण्यात
काय अर्थ ? म्हणून त्यांच्यासमोर एकतरी भजन झालंच पाहिजे असं मानणारी कोकणची
संस्कृती. कोकणवासिय बाप्पाच्या डोक्यावर पाने, फळे, फुले, वेली, कवंडाळं, आंब्याच्या
डहाळ्याची जी ‘माटवी’ बांधतात. त्यामागे पर्यावरण संवर्धन संकल्पना आहे. पूर्वी
रानावनात गुरांच्या मागनं फिरणारे गुराखी या कवंडाळाच्या वेली हेरून ठेवत असत. पडत्या
पावसात रात्रीच्यावेळी जेवणावळी आटपल्यावर चिडीचूप झोपी जाणाऱ्या कोकणात या दिवसात
वाड्या-वस्त्यांवर घराघरात आळीपाळीने कोणा बुवाची थाप अचानक ऐकू येते. भजनाचा साज
ठीकठाक असल्याची खात्री झाली बुवांच्या आवाजाने भरून गेलेल्या वातावरणात सारे
सखेसोबती बाप्पासमोर किंवा पडवीत जमा होतात. ‘पुंडलिका वर दे हरि विठ्ठल’चा आवाज
रात्रीचा अंधार कापत वाड्या वस्त्या घुमवून काढतो. गणपतीच्या दिवसातला भक्ताचा पायरव
अफलातून असतो. विसर्जनवेळी बाप्पासोबत दहीभाताचा नैवद्य दिला जातो. आपल्याकडे
प्रवासाला निघणाऱ्या माणसाच्या हातावर चमचाभर दही देण्याची परंपरा आहे. पाहुण्याला
विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये ही त्यामागील भावना असते. कोकणात बाप्पा पाठोपाठ घरी
येणाऱ्या आमच्या गौरीचं तेरडारुपी वास्तव्य पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांजवळ असतं. सुवासिनी
स्त्रिया व कुमारिका पारंपरिक पाणवठ्यावर तेरडा वनस्पतीची गौरी स्वरूप आवाहन पूजा करतात.
गौराईच्या आगमनाप्रित्यर्थ वाजत-गाजत मिरवणूक काढतात. कोकणातील अनेक गावात गौरी
आगमनासाठी डोक्यावरील रोवळीत किंवा सुपात
हळद, तेरडा, आघाडा यांचे रोपटे घेण्याची प्रथा आहे. तेरडा वनस्पतीची
गौराई कोकणात बघायला मिळते. परंपरेनुसार कोकणात गौराई पूजनासाठी बाजारातील विशेष
पूजा-साहित्य आणावे लागत नाही. कोकणात माळरानी, डोंगर
उतारावर, शेताच्या बांधावर जांभळी, फिक्कट
गुलाबी, तांबड्या, पांढऱ्या रंगांची ही तेरड्याची फुले सगळ्यांचे लक्ष वेधून
घेतात. तेरड्याच्या फुलांचं आयुष्य पाच ते सात दिवस असते.
पुढे याच भाताची कापणी आणि मळणी संपल्यावर कोकणाला शिमग्याचे
वेध लागतात. शिमगा म्हटला की कोकणी माणसाच्या अंगात जणू संचारतं. शिमग्याची पालखी
त्याच्या डोक्यात नाचायला लागते. कोकणी लोककला, सोंगं
दिसायला लागतात. कोकणात गावोगावी शिमगोत्सवात ग्रामदैवतं पालख्यात बसून माणसाच्या
भेटीला येतात. दारोदारी पालख्यांचे जल्लोषात स्वागत होतं. वर्षानुवर्षे ठरलेल्या
क्रमाने आणि दिवसाप्रमाणेच पालख्या फिरतात. पालखीचा मार्ग, वेळ, तपशीलवार
नियोजन पूर्व प्रसिद्ध होत असते. त्यामार्गावर, आपापल्या
घराजवळ रांगोळ्या घालून, सजावट, स्वच्छता, नीटनेटकेपणा बाळगून लोकं श्रद्धेने पालखीच्या दर्शनासाठी
उभे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा होत असला तरी
कोकणातली होळी आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने सजत असते. अलीकडे तिला पर्यटनाचे कोंदण
मिळू लागले आहे. शिमग्याच्या दिवसांत देवही देऊळ सोडून भक्तांची गाऱ्हाणी
ऐकण्यासाठी आलेले असतात. कोकणी माणसांना गावापासून मुंबई-पुण्यासह जगभर काबाडकष्ट
करण्यासाठी लागणारी वर्षभराची ताकद, कुटुंबियांना आधार देण्यासाठीचा आत्मविश्वास शिमग्यातून
मिळत असतो. देऊळ सोडून चव्हाट्यावर आलेल्या देवाला कोकणी मनुष्य आपल्या अडचणीची
थेट विचारणा करतो. त्याला आपल्या ग्रामदेवतेवर भरवसा असतो, त्याला
ग्रामदेवतेचा आधार वाटतो. आपल्या ग्रामदेवतेकडून मिळालेले संरक्षण त्याला महत्वाचे
वाटते. जगाच्या पाठीवर कोकणातील गावगाड्याचे हे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
गावगाड्यातील ग्रामदेवतेच्या आगमनाची वाट पाहात रात्र जागावी लागते तेव्हा
आपल्याला पालखी सोबतची मानकरी मंडळी शिमगोत्सवात दिवस-रात्र बजावत असलेल्या अखंड
सेवेची जाणीव होते. या काळातील कोकणी ‘लोककला’ इथल्या मातीला नवीन नाहीत. या
लोककला लोकांच्या दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग आहेत. जात्यावरची ओवीगीते, बाळाला
जोजवण्याची गीते, सण-उत्सवातील नृत्यनाट्ये, देवतोपासना
म्हणून काढली जाणारी चित्रे, शिल्पे, रांगोळी हेही सारे पारंपरिक लोकजीवनाचा घटक आहेत. दशावतारी
नाटके, अनेक सोंगे घेऊन येणारे ‘नमन’ लोकनृत्य, शक्तीतुरा, शिमगा
पालखीतील ग्रामदेवतेचे मुखवटे, प्रतिमा आणि त्याला जोडलेली विशिष्ठ तालावर पालखी नाचवणारी
लोकनृत्य, संकासूर-गोमू, मनाला नवी ऊर्जा देणारी, उजव्या
पायात चाळ बांधून भरजरी कपड्यांनी सजलेली पारंपरिक सामूहिक नृत्याचा अविष्कार
असलेली जाखडी आदी सारे इथल्या लोककलेचे अविष्कार आहेत. पालखी नाचवणे हा नृत्याचा
अभिनव प्रकार आपल्याला फक्त कोकणातच पहायला मिळतो. पालघर मधील आदिवासी पावसाला
विनवणी करणारा ‘कांबड’ नाच (कांबड्या) करतात. कोकणात मासेमारी करणाऱ्या गाबीत
समाजात घुमटाचा फाग हा लोककलेचा नाट्यप्रकार प्रसिद्ध आहे.
कोकणातील चित्रकथी-कळसूत्री बाहुल्यांनी ‘पद्म’ सन्मान
मिळवला आहे. याही पलिकडे कोकणात गोंधळी, गज्जानृत्य, सापाड, चित्रकथी, तारफा, घोरनृत्य, काटखेळ, नकटा, डेरा, घोरीप
आदी असंख्य ‘लोककला’ आपले अस्तित्व टिकवून आहेत. शिमगा-गणेशोत्सवात ‘जाकडी’नृत्य
म्हणजे शक्तीतुरा हे इथल्या संस्कृतीचे ठसकेबाज वैशिष्ट्य ठरावे. इथल्या श्रमजीवी
शेतकरी वर्गाचा हा हक्काचा नृत्यप्रकार आहे. शक्ती-तुरा हे दोन्ही फड आळीपाळीने
पौराणिक ग्रंथ पुराणांच्या आधारे खास गाण्यांच्या चालीवर एकमेकांना प्रश्न टाकून
त्याची उत्तरे पटवून देत असतात. नृत्य पथकातील तरुण पायात चाळ बांधून कमरेला ठुमका
देत हातापायांची वेगाने हालचाल करत आणि ढोलकीच्या तालावर नृत्य साथ देत असतात. नमन, दशावतार
लोककला कलात देवतांचे मुखवटे धारण करून त्यांची पूजा केली जाते. परमेश्वराची महती
गाऊन कृपा संपादन करणे हा सोंगांचा हेतू असतो. प्रत्येक गावात लोककलावंतांचे
देवाचे खेळे असतात. आपल्या चित्रपटसृष्टीने असंख्य अभिनेते पाहिलेत. पण कोकणात
विशेष कोणतेही शिक्षण न घेता अनुभव आणि अवलोकनातून प्रामाणिकपणे लोककला सादर केली
जाते. कोकणात शिमगोत्सवापाठोपाठ गावोगावी पारंपारिक पद्धतीने छबिना उत्सव साजरा होतो.
महाडच्या वीरेश्वर मंदिराचा छबिना उत्सव काळातील शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला देवभोजन
सोहळा वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे देवभोजन पाहाण्यासाठी भाविक गर्दी करतात.
छबिन्याच्या दिवशी पंचक्रोशीतील ग्रामदेवतांच्या पालखी एकवटतात. गोंधळ, पालख्यांची
मिरवणूक निघते. यात्रा भरलेली असते. कोकणातील शिमग्यात गावोगावी ज्या प्रथा-परंपरा, रितीभाती
आणि लोककललांचं दर्शन होतं ते 'बकेटलिस्ट'मध्ये ठेवून प्रत्येकानं एकदातरी 'याचि देही...' जरूर
अनुभवावं असंच असतं.
पावसाळ्यातल्या कोकणचं आमच्यासारख्या अनेकांच्या मनात वेगळ
स्थान आहे. कोकणातला पाऊस आजतागायत आम्ही तरी शांतपणे आलेला पाहिला नाही. ढगांच्या
प्रचंड आवाजात गर्जना करीत तो येतो. तेव्हाचा गंधवती पृथ्वीचा नाकात शिरणारा सुगंध
‘मातीशी आपलं नातं’ सांगतो. हा सुगंध कोकणी कर्तृत्वाला मातीचं ऋण फेडण्यासाठी
तेव्हाही उद्युक्त करायचा, आजही करतोय. वचन दिल्याप्रमाणे येणाऱ्या या पावसाच्या
तयारीसाठी अवघ्या कोकणची लगबग चालू असते. पावसात कुठं पाणी गळू नये म्हणून घरावरची
कौलं परतणं, पत्रे सरळ करणं, अंगणातला माटव (छत) काढून ठेवणं,
नित्य चुलीसाठी लागणारी सुकी लाकडं शाकारलेल्या पडवीत आणणं
अशी बरीचं कामं या काळात सुरु असतात. कोकणी माणसाच्या पायांना ह्या दिवसात
थारा नसतो. अर्थात तसा तो पूर्वीही नसायचा. नशीबानं,
जन्मानं आणि कर्मानं आम्ही कोकणातील रत्नागिरी
जिल्ह्यातील आहोत. शालेय सहलींचे क्वचित प्रसंग वगळले तर बारावी होईतोपर्यंत या
जिल्ह्याच्या बाहेर आमचं पाऊल पडल्याचंही आम्हांला स्मरत नाही. दापोली
तालुक्यातलं केळशी आमचं मूळ गाव! जन्म आमचा तळवडे-लांज्याचा! लहानपणापासूनचं
वास्तव्य चिपळूणात! अगदी काल-परवापर्यंतचं आमचं सुट्टीतलं बालपण मातीच्याचं घरात
गेलंय. कोकण आमच्याही जगण्याचा भाग आहे. बालपणी शाळेच्या सुट्टीच्या दिवसात
उन्हाळी सुट्टीत आजोळी तर दिवाळीत मूळगावी, आमचा मुक्काम ठरलेला. लहानपणी सुट्टीत
आमच्याही पायांना अजिबात थारा नसायचा. आमचा संबंध कामाशी कमी नि भटकण्याशी जास्त
असायचा. अशातच कधीतरी आभाळ आवाजू लागायचं. खेळून सुटी झालेली पायाखालची लाल माती
उडवत सोसाट्याचा वारा यायचा. झाडं हलायची. सारं आभाळ पाखरांचं व्हायचं. भर दिवसा
काळोख दाटून आल्यावर जाम मज्जा यायची. तेव्हा लाईट नव्हती. काळोख दाटून आला की
आजी/काकी रॉकेलच्या छोट्या छोट्या बाटल्यांचे दिवे घरभर लावायची. कळकट्ट लोखंडी
नळीने चूल फुंकायची. होणारा आवाज आम्हाला प्रचंड आवडायचा. चुलीवरचा गरम कोरा (बिना
दुधाचा) चहा, यथेच्छ बरसणारा पाऊस, रातकिड्यांचे आवाज,
जवळच्या पाणवठयावर,
नळाजवळ येणारे बेडकांचे आवाज,
रात्रीच्या जेवणानंतर रॉकेलच्या दिव्याजवळ बसून रंगणाऱ्या
गप्पा, मारताना कमालीचं सुरक्षित वाटायचं आयुष्य! किती वर्णावा या मातीतल्या आठवणींचा
तो महिमा?
मकर संक्रमण दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कोकणातील महिला
वर्ग एकमेकींना सौभाग्याचे हळदीकुंकू लावून भेटवस्तू देण्याची परंपरा
सांभाळून आहेत. ही परंपरा कोकणात शाळां-शाळांमध्येही मोठय़ा उत्साहात जपली जाते
आहे. चैत्राची पालवी आणि वसंत ऋतूचे आगमन होताच कोकणातील निसर्ग
रंगपंचमी खेळायला सुरुवात करतो. गावोगावी जत्रा-उत्सव सुरु होतात. कोकणातील जत्रा
आणि त्यातील प्रथा खूप प्रसिद्ध आहेत. कोकणातील माणूस आणि देव यांच्यातील ऋणानुबंध अभ्यासण्यासाठी
जत्रोत्सव पाहायला हवेत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भातशेतीची कामे पूर्ण होऊन, भात
विकून शेतकऱ्याच्या हातात पैसे आलेले असतात. याकाळात प्रबोधिनी एकादशीपासून कोकणात
वार्षिक जत्रोत्सवांना सुरुवात होते. कोकणातील प्रत्येक गावाचा वार्षिक जत्रोत्सव, सप्ताह, दिंडी, नित्योत्सव
आणि परंपरा यातूनच गावचे गावपण जपले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावची
श्री देव नारायणाची जत्रा ही प्रबोधिनी एकादशीला असते. ठाणे जिल्ह्य़ातील सुप्रसिद्ध म्हसाची जत्रा शाकंभरी
पौर्णिमेपासून पुढे सात दिवस चालते. ऐतिहासिक काळात खुष्कीच्या मार्गाने अपरांत
(कोकणप्रांत) ते घाटवाटेने देशावर जाण्यासाठी जे मार्ग होते,
त्यापैकी सातवाहन काळातील एक प्रमुख राजमार्ग नाणेघाट हा
येथून जवळ आहे. त्या काळी दळणवळणाच्या साधनात बैलांचा मोठय़ा प्रमाणात वापर होत
असे. त्यामुळे म्हसा गाव जत्रेत बैल खरेदी-विक्रीचे अथवा घाट चढून जाणाऱ्या नव्या
दमाच्या बैलांच्या अदलाबदलीचे व्यवहार होत,
आजही यात्रेनिमित्त जुन्नरपासून ते मुरबाडच्या पंचक्रोशीतील
शेतकऱ्यांनी हे जपले आहे. शाकंभरी पौर्णिमेच्या चांद्रप्रकाशात अन्न शिजवले की
त्यात औषधी गुण उतरतात, असे येथे म्हटले जाते. ठाणे हा आदिवासी जिल्हा. इथल्या आदिवासी संस्कृतीत माता किंवा शक्तीची पूजा अतिशय
महत्त्वाची मानलेली आहे. डहाणूची ‘महालक्ष्मी’ सारखी आदिमायेची
स्थाने आदिवासी समाजाची
आराध्यदैवते आहेत. ठाण्यातील ओवळा गावात येऊरच्या डोंगरालगत
असलेल्या आदिवासी पाडय़ातील ‘चांमुडादेवी’ला शक्तिदेवता महाकाली किंवा पार्वतीचे
रूप मानतात. वैशाखात तिची यात्रा भरते. आदिवासी आपले घर-अंगण सारवून त्रिकोण,
चौकोन, वर्तुळातील उभ्या-आडव्या रेषा काढून स्त्री-पुरुष,
पशु-पक्षी, डोंगर, नदी, झाडे, पाने, फुले, चंद्र-सूर्य यातून सृष्टीदेवतेचे चित्र रेखाटतात. या
चित्रातून आदिशक्ती चामुंडादेवी प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते,
ही कला पाहावी अशी आहे. कोदवली-राजापूरचे ग्रामदैवत श्रीदेव
शंकरेश्वरचा ‘कावडखेळ’ वैशिष्टयपूर्ण परंपरा आहे. हा खेळ अवघ्या महाराष्ट्रात
दुसरीकडे पहाण्यास मिळत नाही. पुराणातील श्रावणबाळाच्या कावडीचा आणि या परंपरेचा
संबंध नाही. पूर्वी कावडीचा उपयोग पाणी भरण्याचं साधन म्हणून केला जात असे. सुमारे
पाचशे वर्षापूर्वी सिध्देश्वर बाबा गोसावी नामक सिध्दपुरूष या कावडीचा उपयोग श्रीदेव
शंकरेश्वराच्या अभिषेकाला पाणी आणण्यासाठी करत असत. पुढे ही परंपरा ग्रामस्थांच्या
श्रध्देचा आणि परंपरेचा भाग बनली. शिमगोत्सवात सजवलेली कावड आणि ढोलताशाच्या
तालावर नाचवत सादर केले जाणारे नृत्य विशेष असते.
कोकणात कोणत्याही गावाच्या जत्रेच्या दिवशी अगदी सकाळपासूनच
देवळामध्ये धार्मिक कार्यांना सुरुवात होते. ज्या कोणाचे ते कुलदैवत असेल ते, श्रद्धाळू,
माहेरवाशिणी आवर्जून येतात. देवी असेल तर खणा-नारळाने ओटी आणि देवाची जत्रा असेल
तर श्रीफळ अर्पण करून गार्हाणे घातले जाते. गार्हाणी घालण्याची म्हणजेच देवाला सांगणे
करण्याची ही पद्धत गावागावाप्रमाणे वेगेळी असते. ज्या देवाचा हा वार्षिक जत्रोत्सव
असतो, त्या देवतेचे मंदिर सजवायला सुरुवात होते. रंगरंगोटी केली
जाते. जत्रेच्या दिवशी मंदिरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई केली जाते. वेगवेगळ्या
वस्तूंची, खेळण्यांची, खाऊची दुकाने मांडली जातात. चवदार पदार्थांचे वास दरवळत असतात.
सिंधुदूर्गात सोनुर्लीची माउली, आंगणेवाडीची भराडी देवी, कुणकेश्वरची
महाशिवरात्री यात्रा, नारुरगावची महालक्ष्मी, मातोंड-पेंडूरची
घोडेमुख आदी यात्रांना भाविकांची गर्दी होते. नवसाला पावणारे अशी या देवतांची
ख्याती असल्याने भाविकांची संख्या लाखोंच्या घरात असते. कोकणातील मालवण
तालुक्यातील आंगणेवाडी अर्थात देवी भराडीच्या यात्रेचा उत्सव हा भावभक्तीचा अलोट
मेळा, श्री देवीचा अगाध महिमा, जनसामान्यांपासून
राजकीय नेत्यांची गार्हाणी, सेलिब्रेटींची उपस्थिती यांमुळे अलिकडे खूप मोठ्या गर्दीत संपन्न
होत असतो.
भगवान श्रीपरशुरामानं समुद्र हटवून ही भूमी निर्माण केली.
यावर आमची श्रद्धा आहे. कोकणच्या किनाऱ्यांवर झालेल्या संशोधनाद्वारे या भागात
बऱ्याच ठिकाणी पूर्वी समुद्र खूप आतपर्यंत होता आणि पुढे तो मागे हटला याचे अनेक
भूपुरातत्त्वीय पुरावे आता उपलब्ध झाले आहेत. भडोच (भृगुकच्छ),
नालासोपारा (शूर्पारक) येथील समुद्रकिनाऱ्यांबाबतची संशोधने
हेच सांगत आहेत. गेली २० वर्षे आम्ही या मातीत व्यावसायिक कारणे पनवेल ते पणजी सतत प्रवास करतो
आहोत. आज एका दमात अख्ख कोकण फिरताना प्रत्येकवेळी ओळखीच्या
वाटणाऱ्या अनेक जुन्या खुणा हरवत जाताना दिसताहेत. मागच्या पाच-पंचवीस
वर्षांत कोकणातल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार होत चाललाय. जुन्या
कौलारू देवळांच्या जागी भव्य मंदिर उभी राहिलीत. बाकी सारं ठीक मानलं तरी आधुनिक
जीर्णोद्धार आमच्यासारख्या इतिहास, पर्यटन, प्राचीन संस्कृतीवर प्रेम करणाऱ्याला पटणारा
नाही. कोकणातल्या लालमातीतील वास्तुसंस्कृती वैशिष्टय़पूर्ण आहे. आम्ही ती मोडीत
काढू पाहतो आहोत. इथल्या आरोग्याला पूरक असणारे तांदूळ,
उडीद, नाचणी, कुळीथ, शेवग्याच्या शेंगा,
जांभूळ, भोपळा, काकडी, करांदे आज गायब होत आहेत. कोकणची भौतिक प्रगती,
भौगोलिक विविधता आणि इथली संस्कृती ह्याची सांगड घालण्याचे
मोठे आव्हान आम्हां कोकणवासियांसमोर आहे.
कोकण बदलतंय. माणसं बदललीत. मागच्या पिढीने अनुभवलेलं
‘कोकण’ पुढच्या पिढीला बघायला मिळेल का? प्रश्न आहे. कौलारू घर,
घराबाहेरची पडवी, झोपाळा, पानसुपारीची पिशवी,
तिरक्या रिपा मारलेल्या खिडक्या,
छानसं माजघर, जातं, सारवलेली चूल, स्वच्छ अंगण, तुळस, तुळशीतला दिवा, गुरांचा गोठा, साठवून ठेवलेलं गवत,
वासरू, कौलारू देऊळ, देवळातला गुरव, मानाचे दगड, देवळातले देव... महापुरुष,
वाघजाई, सोळजाई, महाकाली, व्याघ्रेश्वर, व्याडेश्वर, नागेश्वर, सोमेश्वर, नाटेश्वर, देवाची राई (देवराई),
वेशीवर दिला जाणारा नारळ,
शिमग्यातली सोंगं, ढोल-ताशा, निशाण, ग्रामदेवतेच्या पालख्या,
घराघरातला देवचार, वाडवडिलांच्या पुण्याईची जाणीव,
मोहरत जाणारा आंबा,
फणस, आंब्याची साठं, माडा-पोफळीची झाडं,
बकुळी, करवंदाची जाळी, कण्हेरी, इथला मांसाहार... सरंगा,
पापलेट, सुरमई, बांगडा, कुर्ल्या, कालवं, चिंबोरी, चुलीवर भाजलेला बांगडा,
भाकरी, मिरचीचा ठेचा, उकड्या तांदळाची पेज,
उकडलेल्या आठला, फणसा-केळफुलाची भाजी,
मऊ गुरगुरीत भात, कैरी घातलेली डाळ, घावणे, उसळी, मुसळधार पाऊस, नदीला येणारे पूर, पुलाखालून वाहणारा व्हाळ,
गणपती बाप्पा, त्याची मंडपी, गावरान सजावट, मोदक, रात्रीच्या डबलबाऱ्या,
दिवाळी, फोडलेलं कारीट, करंज्या, कंदिल, इथली होळी, होळीतल्या बोंबा, ग्रामदेवतांच्या जत्रा,
लोककला, समुद्रातून हाती लागलेली रापण,
तिला ओढणारे तांडेल,
बघ्यांचा गलका असं सारं बरचं काही उद्याच्या पिढीला पाहायला
मिळावं यासाठी कोकणातील काही माणसं आजही जीव तोडून धडपडतायतं. सातासमुद्रापार
कोठेही न आढळणारी संस्कृती, पारंपारिक वैशिष्ट्ये सांभाळणारे,
मनुष्य जीवनाप्रती ओतप्रोत भरलेल्या कृतज्ञतेचे तत्त्वज्ञान
जपणारे कोकण जसजसे जागतिक नकाशावर ‘अग्रेसर’ होऊ पाहते आहे तसतसे कोकणाकडे
पाहाण्याचा अनेकांचा दृष्टीकोन बदलतो आहे. कोकणात होऊ घातलेल्या मुंबई ते गोवा सहा
पदरी राष्ट्रीय महामार्ग, रो-रो ट्रेन सर्व्हिस,
कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेसेवा,
वेंगुर्ल्याच्याजवळचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय,
चिपीचे विमानतळ, सागरी महामार्ग यांमुळे परकीय आणि भारतीय पर्यटकांच्या नजरा
गोव्यावरून कोकणाकडे वळताहेत. हे सारं कोकणचा चेहरा-मोहरा बदलवून टाकणार आहे.
बड्या शहरांच्या बजबजपुरीत जगणारा माणूस आपल्या हिरव्यागार
कोकणात आला की परत जाईपर्यंत कोकण डोळ्यांत साठवून घेत असतो. परतताना त्याच्या
गाडीत, खांद्यावरल्या पिशवीत सारं कोकण भरलेलं असतं. बसस्टँडवर,
स्टेशनवर जेव्हा तो घरच्यांच्या हातात आपला निरोपाचा आणि
प्रेमाचा हात ठेवतो तेव्हाचं दृश्य तर खास ठेवणीतलं असतं. खिडकीतून बाहेर
काढलेल्या हातातून एकमेकांची बोट जेव्हा सुटतात तेव्हा ती इथल्या मातीशी असलेल्या
नात्यांची खरी जाणीव करून देतात. बदलत्या कोकणात याचं प्रमाण आज कमी झालं असलं तरी
जाणीवांचा ओलावा कायम आहे. स्वतःला कोकणी म्हणवणाऱ्या,
या मातीशी आपलं नातं सांगणाऱ्या,
या मातीवर प्रेम करणाऱ्या,
या मातीचं ऋण मानणाऱ्या प्रत्येकाने इथल्या मातीशी असलेल्या
आंतरिक उमाळ्यापोटी या जाणीवा जपायला हव्यात.
धीरज वाटेकर
पत्ता : ‘विधीलिखित’,
१२६३-ब, कांगणेवाडी रोड, खेंड, चिपळूण ४१५६०५, जि. रत्नागिरी. मो. ९८६०३६०९४८.
ई-मेल - dheerajwatekar@gmail.com, ब्लॉग : https://dheerajwatekar.blogspot.com
(लेखक धीरज वाटेकर हे कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील ‘पर्यटन-पर्यावरण’ विषयातील कार्यकर्ते आहेत. त्यांची पर्यटन व चरित्र लेखन’ या विषयावरील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते गेली २८ वर्षे ‘पत्रकार’ म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतीपर विषयात कार्यरत आहेत.)