नीलिमा
(Tickell’s
Blue Flycatcher) पक्ष्याने आपल्या विणीच्या यंदाच्या नव्या
हंगामासाठी सलग दुसऱ्यावर्षी आमच्या परसदारातील हॉलच्या खिडकीच्या डाव्या
कोपऱ्यावर विश्वास दाखवला. सर्वसाधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा विणीचा हंगाम
असलेल्या या पक्ष्याने परसदारी गतवर्षी (२०२४) २३ जूनला पहिले अंडे दिले होते.
त्याच ठिकाणी यावर्षी (२०२५) २६ मेला अंडे दिले गेले. नीलिमा पक्ष्याने गतवर्षी १७
जुलैला तर यंदा २० जूनला आपला विणीचा हंगाम पूर्ण केला आणि पिल्ले घरट्यातून आकाशी
उडाली. या पक्ष्याचा गतवर्षीचा विणीचा हंगाम २५ दिवसांचा होता. यंदाचा हंगाम २६
दिवसांचा राहिला. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या हंगामासाठी गतवर्षीच्या
जागेचीच निवड केल्याने महिनाभर आमच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता.

जवळपास
पक्षी घरटं बांधताना छद्मवेश (camouflage) धारण करत
असतात अर्थात स्वतःचे खरे स्वरूप लपवत असतात. यंदा घराच्या खिडकीत सलग दुसऱ्यांदा
निलीमाचं घरटं बांधून पूर्ण होईपर्यंत आम्हालाही या घरट्याबाबत लक्षात आलं नव्हतं.
टिकेल्स ब्लू फ्लायकॅचर हा फ्लायकॅचर कुटुंबातील चिमणीच्या आकाराचा एक छोटासा
पक्षी. जेमेतेम ६ इंच/ १५ सेंमी. लांब आकाराचा असावा. याचे मराठी नाव निलीमा असे
आहे. हा पक्षी कीटकभक्षक प्रजाती आहे. तो भारत, श्रीलंका,
म्यानमार, इंडोनेशिया या देशात घनदाट झाडी आणि
जंगलातही आढळतो. निलीमा पक्षी निळ्या रंगाचा असून त्याच्या मान-गळ्याला नारंगी रंग
आहे. पोटाखालचा भाग पांढरा असतो. याची मादी फिकट रंगाची असते. हा पक्षी उडणाऱ्या
माश्या आणि कीटकांसह जमिनीवरचे किडेही खातो. लालसर तपकिरी ठिपके असलेली याची अंडी
असतात. आमच्या परसदारी यावर्षी पक्ष्याने २६जूनला पहिले अंडे दिल्यावर सलग दोन
दिवसात आणखी दोन अंडी दिली. २९ तारखेला अंडं दिलेलं नव्हतं. या पक्ष्याने चौथं
अंडं ३० तारखेला दिलेलं दिसलं. ६ जूनच्या रात्रीपासून घरट्याजवळ टकटक आवाज येऊ
लागला होता. पिल्लं बाहेर येण्याचा कालावधी जवळ आल्याचा तो संकेत होता. दोन दिवस
असेच निघून गेले. ९ जूनला तीन अंड्यातून तीन पिल्लांनी जन्म घेतला. एक पिल्लू
अंड्यात आहे असे वाटलेले. पण दुर्दैवाने तसे घडले नाही. गेल्यावर्षी नीलिमाने चार
पिल्ले दिलेली, यंदा मात्र अंडी चार घातलेली असताना पिल्ले
मात्र तीनच जन्मली.

नीलिमाने
अंडी घालायला सुरुवात केल्यापासून कोकणात अवकाळी पाऊस बरसू लागलेला. आता पावसाने
जोर धरला होता. त्यातच पिल्ले जन्मलेली. कसं होणार? असं
उगाचच वाटत असताना १७ जूनला पिल्लांना भेटायला सूर्यदेव आलेले. सूर्याची किरणे
पिल्लांवर पडल्यावर इवलीशी पिल्ले खूपच लोभस दिसत होती. पिल्ले तशी मोठीही झालेली.
गतवर्षी चार पिल्ले एवढ्याशा घरट्यात आनंदाने राहिलेली होती. पिल्लांच्या
घरट्यातील हालचालींवरून यंदा तीन तरी राहतील का? असा प्रश्न
पडलेला. तसंच झालं. १८ जूनला सायंकाळी एक पिल्लू घरट्यातून खाली कुंडीत पडलं.
नर-मादी आजूबाजूला घिरट्या घालत होती. पिल्लाला उचलून घरट्यात ठेवणे आवश्यक होते.
पण नर-मादी अंगावर येण्याची शक्यता होतीच! त्यात घरटे पिल्लांना कमी पडत असेल
अशीही शक्यता वाटलेली. म्हणून याच हंगामात बुलबुलने उपयोग करून सोडलेल्या घरट्याला
खिडकीत ठेवले आणि त्यात हे पडलेले पिल्लू ठेवले. थोड्यावेळाने नीलिमा आली. तिने पिल्लाला
पाहिलं, अन्न दिलं. एवढं सगळं करूनही दुर्दैवाने दुसऱ्या
दिवशी, १९ जून रोजी सकाळी ते पिल्लू पुन्हा खाली पडलेलं
दिसलं. आता त्याच्या जगण्याची शक्यताही आम्हाला कमी वाटू लागलेली. पण आपण शक्य
तेवढे प्रयत्न करायला हवेत, असं मनाशी म्हणत खाली पडलेल्या
पिल्लाला उचलून पुन्हा घरट्यात ठेवलं. पिल्लू घरट्यातून खाली पडताना घरटंही
बाहेरच्या बाजूला कलंडलेलं दिसलं होतं. म्हणून खिडकीच्या लोखंडी ग्रीलजवळ दोन्ही
घरट्यांना एक आडोसा उभा केला. दुपारी पाहिलं तर ते दुखापत झालेलं पिल्लू आपल्या
मूळ घरट्यातून जाऊन परत नव्या घरट्यात येताना दिसलं. काहीसं तरतरीत झालं असावं.
सायंकाळी तिन्ही पिल्लांचे सतत आवाज करणे, घरट्याच्या वरती
येऊन बसणे सुरू झालेले. त्यांची चुळबूळ वाढलेली जाणवत होती. वाढलेली चुळबुळ खरी
ठरली. एकेक करून २० जूनला तीनही पिल्ले घरट्यातून उडाली. घरट्यातून दोनदा खाली
पडलेल्या पिल्लाने मात्र आकाशी झेप घ्यायला इतर दोन पिल्लांपेक्षा किमान चारेक तास
अधिक घेतले असतील. तीनही पिल्ले आनंदात-समाधानात असल्याची खात्री करून आम्ही
आमच्या कामात गुंतलो. नीलिमा पक्ष्याने आपल्या विणीच्या नव्या हंगामासाठी सलग
दुसऱ्या वर्षी आपल्या परसदारावर दाखवलेला विश्वास पुढील वर्षी कायम राहील का?
की पक्षी जागा बदलेल? हे समजण्यासाठी पुढील
वर्षापर्यंत वाट पाहायला हवी!
%2005-11-2025.png)
परसादारातले
पशु-पक्षी- झाडे आम्हाला माणसाळलेले जाणवतात. दारातील झाडे एकमेकांशी बोलतात.
आपल्या भावना आम्हालाही सांगू पाहातात, असे
वाटते. त्यांच्याकडे लक्ष नही दिले तर झाडे-निसर्ग पोरका होतो. माडांना तर
माणसांचा सहवास लागतच असावा. क्वचित प्रसंगीही नारळ कधी कुणाच्या डोक्यात पडल्याचे
ऐकिवात नाही. आपल्या असण्याचा आनंद झाडेही साजरा करत असावीत. म्हणूनच तर आम्ही
आमचा सवडीचा वेळ बऱ्याचदा झाडांसोबत घालवतो. उन्हाळी हंगामाच्या शेवटी आणि
पावसाळ्यापूर्वी शासकीय कर्मचारी ज्या निर्दयतेने झाडाच्या
कुंपणाबाहेरील-रस्त्यावरील फांद्या तोडतात ते पाहून खूप वाईट वाटतं. कारण कदाचित
याच फांद्यांचा नव्याने जन्मा येणाऱ्या पाखरांना आधार मिळणार असतो. परसदारी
निवडुंग कुळातील ब्रम्हकमळाच्या फुलण्याच्या वेळचा आनंद तो काय वर्णावा? आत्मिक सुखाची कल्पना याहून वेगळी ती काय असावी? त्याक्षणी
लाभलेला आनंद वेगळा असतो. आम्ही तर या फुलाचे बहरणे साजरे करतो. पहाटे हे फुल
कोमेजणार हे माहिती असते. तरीही आम्ही त्या फुलातील सौंदर्य भरभरून न्याहाळतो.
कारण निसर्ग आपल्याला भावनांचे असे उमाळे जगायला देत असतो. परसदारातील साऱ्या
पक्ष्यांच्या विणीचेही तसेच असते.

खरंतर
परसदारी यावर्षी विणीच्या हंगामात एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल चार पक्ष्यांनी आपला
संसार थाटण्याचा प्रयत्न केलेला. नीलिमा पक्ष्याने तर यंदा परसदारी त्याच ठिकाणी
सलग दुसऱ्यावर्षी घरटे केलेले. अर्थात सर्वच पक्ष्यांचा विणीचा हंगाम यशस्वी होऊ
शकला नाही. काहींनी आपणहून घरटे अर्धवट सोडले. काहींची वीण दुर्दैवाने अंड्यातून
पिल्ले बाहेर येण्यापूर्वीच संपुष्टात आली. मात्र असे असले तरीही अपवादालाही विशेष
झाडी नसलेल्या चिपळूण शहरातील खेंडीतील वास्तव्यात मागील १६ वर्षांत विविध छोट्या
पक्ष्यांना आपल्या हक्काचा अधिवास-आधार वाटावा असं नैसर्गिक वातावरण निर्माण
करण्यात आपण यशस्वी होत असल्याचे ही घटना सांगत होती. आपल्या परसदारावर,
इथल्या निसर्गावर आणि आजूबाजूच्या साऱ्या परिसरावर विणीच्या
हंगामासाठी पक्ष्यांनी पसंतीची मोहर उमटवली होती. भक्तीचा उंबरठा घेऊन निवासी
वास्तूत वावरणाऱ्या आम्हाला आकांक्षांचे पंख घेऊन आकाशी उडालेली पिल्ले पाहाताना
झालेला आनंद शब्दातून व्यक्त होण्यापलिकडला राहिला.
धीरज
वाटेकर, चिपळूण
 |
२६ मे २०२५ - चिपळूणच्या खेंड येथील निवासी वास्तूमधील हॉलच्या खिडकीतील डाव्या कोपऱ्यात नीलिमा पक्ष्याने केलेले घरटे
|
 |
| २६ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले पहिले अंडे |
 |
| २७ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले दुसरे अंडे |
 |
| २८ मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले तिसरे अंडे |
 |
| ३० मे २०२५ - नीलिमा पक्ष्याने दिलेले चौथे अंडे |
 |
| ९ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले |
 |
| ११ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले |
 |
| १० जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची जन्मलेली नवजात पिल्ले |
 |
| १७ जून २०२५ नीलिमा पक्षी आपल्या पिल्लांसह |
 |
| १८ जून २०२५ - नीलिमा पक्ष्याची पिल्ले |
 |
| २० जून २०२५ - घरट्यातून उडालेल्या पिल्लासह नीलिमा पक्षी |
 |
| नीलिमा पक्षी
|