रविवार, १४ ऑगस्ट, २०२२

कोकणातील प्रसारमाध्यमे

साप्ताहिक जगन्मित्र रत्नागिरी
२० ऑगस्ट १८६६



‘वर्तमानपत्र’ ही रद्दी नसून त्या त्या भागाच्या इतिहासाचा मार्गदर्शक आरसा आहेत. नितीमूल्यांच्या पायावर उभ्या असलेल्या प्रसारमाध्यमांची जबाबदारी कोकणाने निष्ठेने पार पाडली आहे. म्हणून कोकण भूमीत शे-दीडशे-पाऊणशे वर्षांसह सहज पन्नाशी गाठलेली, इतिहास बनून राहिलेली वर्तमानपत्रे आपल्याला भेटतात. भारतात स्वातंत्र्यानंतर ‘विकास’ हे प्रसारमाध्यमांचे ध्येय राहिले आहे. विकासाची आवड, विषयाची जाणीव, अभ्यास, सत्य आणि वस्तुनिष्ठ माहितीचा शोध घेण्याची तळमळ, नेमकेपणाने केली जाणारी मांडणी, शुद्ध हेतू, मांडणीत अतिरंजितपणा, सनसनाटी आणि दिशाभूल नसणे, दीर्घकालीन शाश्वत विकासाचा हेतू, वैयक्तिक फायद्याचा त्याग आदी भूमिकांचा प्रभाव कोकणातील पत्रकारितेत दिसतो. मात्र स्वातंत्र्योत्तर कालखंडात हा प्रभाव एका मर्यादेच्या पलिकडे न गेल्याने कोकणचा ‘राजकीय’ आवाज राज्यभर अथवा राजधानी दिल्लीत गाजल्याची उदाहरणे अपवादात्मक दिसतात. याचा परिणाम कोकणच्या विकासावर झाला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरु असताना कोकणात दिसणारे दारिद्र्य, मागासलेपणा, दु:ख, विकासाच्या नावाखाली होणारा इथल्या स्वर्गीय सौंदर्याचा ऱ्हास, असमतोल विकासाचा आर्थिक अनुशेष पाहिला की कोकणातील विकासात्मक पत्रकारितेची आवश्यकता जाणवते. भारतीय विकासाच्या जत्रेत आणि प्रसारमाध्यमांच्या गोंगाटात आजही कोकणी माणूस घराच्या दाराची कडी अथवा बेल वाजवत घरी येणाऱ्या घडी घातलेल्या वर्तमानपत्राची वाट पाहात असतो. वर्तमानपत्र हातात घेऊन वाचल्याशिवाय आजही त्याचं समाधान होत नाही. या निर्विवाद सत्याच्या पार्श्वभूमीवर आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील प्रसारमाध्यमांचा मागोवा घेऊ या.

माहिती-तंत्रज्ञान आणि सोशल मिडीयाच्या जमान्यात कोकणातील समाजजीवनही कमालीचे गतिमान बनलेले आहे. माहिती आणि ज्ञान यांची गल्लत सुरु आहे. जुनी पिढी-नवीन पिढी हा वैचारिक संघर्ष कोकणातही आहे. ‘ज्ञान’ हेच पत्रकारितेतील शहाणपण आहे हे मान्य करून सर्वच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी कार्यरत होण्याची गरज आहे. कोकणात महिला संपादक-पत्रकारांची संख्या वाढायला हवी आहे. पूर्वीसारखं संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारं, वाचनाचा आणि विचारांचा आनंद देणारं वर्तमानपत्र आज किती उरलीत? अशा चर्चा कोकणात होत असतात. तरीही कोकणात असलेली उपजत ज्ञानसंवर्धनवृत्ती सध्याच्या काळात अधिक वाढू लागल्याने माणूस प्रथा-परंपरा आणि विधी संकेतांपासून दूर जातोय असे वाटत असतानाच तो त्याला अधिक जवळ करताना दिसतो. सामाजिक परिवर्तनाच्या काळात आपली लोकसंस्कृती टिकवण्याची धडपड कोकणात आजही दिसते. उत्सवी काळात स्थानिक आणि राज्यातील, देशातील विविध प्रसारमाध्यमे याचीच ‘री’ ओढताना दिसतात. या साऱ्याचे प्रतिबिंब आपल्याला प्रसारमाध्यमात दिसते. उलट घटना जितकी अधिक चमत्कारिक आणि सध्याच्या काळात विश्वास ठेवायला कठीण वाटावी तितकी ती विविध प्रसारमाध्यमांच्या दुनियेत अधिक वाचनीय ठरते. देशासह कोकणात कृषिप्रधान संस्कृती नांदलेली आहे. कोकणी माणूस डोंगरदऱ्यात, कातळावर, किनारपट्टीलगत राहाणारा आहे. पूर्वांपार इथली घरे एकमेकांपासून दूर आहेत. कोकणी माणूस इथल्या निसर्गाप्रमाणे मनमोकळा, आखीव-रेखीव जीवन जगणारा आणि काहीसा लहरी व सडेतोड आहे. कदाचित या स्वभावगुणांमुळे सर्वाधिक भारतरत्न लाभलेल्या या भूमीत मराठी प्रसारमाध्यमांचे जनक जन्मूनही विकासाचा अनुशेष कायम आहे. ही कोकणी स्वभाव वैशिष्ट्ये विविध पद्धतीने प्रसारमाध्यमांनी नोंदवलीत. ‘पु.ल.’ यांचा ‘अंतुबर्वा’ याचे उत्तम उदाहरण ठरावे. पुरुषप्रधानता असली तरी चाकरमान्यांच्या पाठीमागे स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कोकण सांभाळण्यात गावोगावच्या आया-बहिणींनी आपापले आयुष्य पणाला लावले आहे. चुलीपुरते शहाणपण सांभाळणाऱ्या या महिलांनी चूल-मूल आणि शेती सांभाळली. कोकणातील घराघरात वाडवडिलांनी घालून दिलेली देवाधर्माची परंपरा, देवकार्य, कुळाचार, नवस-सायास, जत्रा, लग्नविधी, बारसे, मर्तिककार्य, प्रपंचाची उभारणी, मुलाबाळांचे संगोपन, सामाजिक आणि कौटुंबिक नातेसंबंधांची जपणूक आदी सारे लोकाचार तिने सांभाळले. अपवाद वगळता कोकणातील प्रसारमाध्यमांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.


रत्नागिरीतील सत्यशोधक साप्ताहिकाचा
१८८८चा शिळा प्रेसवरील हस्तलिखित अंक


सध्याचे ‘बातमी’चे युग टी.आर.पी.चे आहे. टी.आर.पी.च्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता विविध वृत्त वाहिन्यांवर परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद, आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. अनेकांच्या मनात याबाबत खदखद असते. प्रगत जमान्यात सोशल मिडीया नामक प्रसारमाध्यमावर ती वेळोवेळी व्यक्त होत असते. भारताचे ४८वे आणि विद्यमान सरन्यायाधीश नुथलपती वेंकट रमणा यांनी नेमकी याबाबत स्पष्ट भूमिका मांडल्याने जनसामान्यांच्या भूमिकेला जणू पाठबळ मिळाले आहे. रमणा यांनी न्यायमूर्ती सत्यव्रत सिन्हा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांची येथे (२३ जुलै २०२२) आयोजित व्याख्यानमालेत बोलताना, ‘वृत्तवाहिन्यांवर विशिष्ट हेतू बाळगून घडविण्यात येणाऱ्या चर्चांपासून लोकशाहीस धोका आहे’ असे म्हटले होते. माध्यमांची न्यायालये ही प्रत्यक्ष न्यायालयात लागणाऱ्या निकालांसाठी मार्गदर्शक ठरू शकत नाहीत. अतिशय अनुभवी न्यायाधीशही ज्या जटिल प्रकरणी सहज न्यायनिवाडा करू शकणार नाहीत, त्या मुद्द्यांवर माध्यमे अगदी सहज मतप्रदर्शन करतात. निर्णय देतात. चुकीच्या माहितीच्या आधारे, विशिष्ट हेतू मनात बाळगून वाहिन्यांवर घडविल्या जाणाऱ्या चर्चा लोकशाहीच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. माध्यमांकडून होणाऱ्या पक्षपाती दृष्टिकोनाच्या प्रचाराचा नागरिकांवर परिणाम होत आहे. यामुळे लोकशाहीचे खच्चीकरण होते. न्यायदानावर याचा नकारात्मक परिणाम होतो. आपल्यावरील जबाबदारी पार न पाडणारी माध्यमे लोकशाहीस दोन पावले मागे नेत आहेत. काहीवेळा माध्यमांमध्ये न्यायाधीशांविरोधात मोहीम चालवली जाते, यात सोशल मीडिया आघाडीवर असतो. सर्व प्रकारच्या माध्यमांचा विचार केला तर मुद्रितमाध्यमे आजही विशिष्ट प्रमाणात जबाबदारी व बांधिलकी मानतात. इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे उत्तरदायित्व शून्य आहे. ते जे काही प्रक्षेपित करतात ते हवेत विरून जाते, अशी परखड मते रमणा यांनी मांडली होती. स्वातंत्र्योत्तर काळात शासकीय यंत्रणेचे कोणतेही नियंत्रणात्मक निकष नसल्याने दूरचित्रवाणी हे प्रसारमाध्यम अमर्याद स्वातंत्र्य उपभोगत असल्याच्या पार्श्वभूमीवरील सरन्यायाधीश रमणा यांचे विचार महत्त्वाचे आहेत.

ज्या समाजात धनाची सत्ता चालते तिथे लेखकांना व पत्रकारांना शनी प्रकाशकांच्या आर्थिक परिस्थितीवर नि इच्छेवर अवलंबून राहावे लागते अशा भावना ‘वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य खरे की काल्पनिक’ या मथळ्याखाली व्यक्त होऊ लागल्या असताना तिकडे १९९० नंतर दूरचित्रवाणी क्षेत्रात क्रांती होत गेली. १९९९ नंतर अनेख खाजगी वाहिन्या सुरु झाल्या. एकविसाव्या शतकात इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि समाज माध्यमे यांनी जनमनाची एवढी पकड घेतली की वर्तमानपत्रांचे अस्तित्व संपुष्टात येतेय की काय? असे वाटू लागले होते. जग ‘पेपरलेस’ युगाकडे वाटचाल करू लागले होते. परंतु आजही नवीन वृत्तपत्रे सुरु होत असल्याने मुद्रित माध्यमांच्या अस्तित्वाविषयी शंका घेण्याची गरज नसावी. जगभरातील वृत्तपत्रांच्या खपाच्या आकडेवारीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तंत्रज्ञानातील गतिमान बदल लक्षात घेत डिजिटलआणि समाजमाध्यमांची आवश्यकता सर्वांनी स्वीकारली आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यशैलीत खूप मोठा बदल घडला आहे. कोरोना काळात अनेक प्रसारमाध्यमांनी आपापला कर्मचारी वर्ग कमी केला. एका आकडेवारीनुसार राज्यभरातील किमान हजारभर पत्रकारांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या. अनेक वृत्तपत्रांनी आपल्या आवृत्त्या, पृष्ठसंख्या कमी केली. मुद्रित माध्यमांसमोर असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल केला. काहींनी वृत्तपत्रांच्या वेब एडिशनसाठी ‘उपसंपादक’ नेमायला सुरुवात केली. आज कोकणासारख्या ग्रामीण भागात अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल, मोबाईल डेटा, वायफाय, लॅपटॉप, टॅब यांसारख्या सुविधा पोहोचल्यात. एका क्लिकवर बातम्या, माहिती उपलब्ध होण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रत्येक मुद्रित माध्यमाला स्वतंत्र वेबसाईट, अ‍ॅप तयार करणे अपरिहार्य बनले आहे. वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांचे कमी झालेले आयुष्य डिजिटलमाध्यमांमुळे औट घटकेचे ठरते आहे. डिजिटल दुनियेत कोकणासह देशभर मुद्रित वर्तमानपत्रांच्या खपाचा आकडा घसरला असला तरीही गुणवत्ता टिकून आहे. किंबहुना विविध प्रसारमाध्यमात त्यांची विश्वासार्ह्यता किंचित अधिक आहे. मे २०२२ मध्ये द सीएमओ आणि मार्केटिंग शेर्पा या संस्थांनी केलेला निष्कर्ष प्रसिद्ध झाला होता. त्यात मार्केटिंगची पाऊले पुन्हा पारंपारिक वळणावर असे म्हटले होते. ज्यामागे डिजिटल जाहिरातींचा प्रचंड भडीमार, डिजिटल जाहिरांतींचा सततचा त्रास, व्हिडिओ पाहण्याआधी जाहिराती बघाव्या लागणे आणि वृत्तपत्रीय जाहिरातींवर असलेला विश्वास ही कारणे नमूद होती. म्हणजे मुद्रित माध्यम लोकांना हवे आहे हे सत्य आहे. नव्वदच्या दशकातील जागतिकीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्याचे सारे श्रेय प्रसारमाध्यमांना जाते. जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले ध्येय गाठण्यासाठी अपवाद वगळता प्रसारमाध्यमांनी नितीमूल्यांची चौकट ओलांडण्याची भूमिका घेतलेली दिसते. समाजमनासाठी चांगलं काय? हे पाहण्याऐवजी त्यांना ‘हवंय काय?’ ते देणाऱ्या, क्षणिक करमणूक साधणाऱ्या वर्तमानपत्रांनी १८९० नंतर कोकणात जम बसवला. कोकणात आज वृत्तपत्रे, आकाशवाणी, एफ.एम. रेडीओ, २४ तास बातम्या देणाऱ्या विविध दूरचित्रवाहिन्या, यु-ट्युब चॅनेल, फेसबुक-व्हॉट्सअॅप आदी सोशल मिडिया ही प्रसारमाध्यमे जनमत घडविण्याचे काम करत आहेत. आज आपण जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात घडलेली कोणतीही घटना घरबसल्या पाहू शकतो आहोत. आज समाजमाध्यम वापरणारा माणूस दिवसाचे किमान तीनेक तास भ्रमणध्वनी आणि संगणकावर घालवत असतो. ‘फेसबुक’च्या सवयीमुळे माणसाला स्वतःच्या ‘फेस’कडे पाहायला की बुक वाचायला वेळ शिल्लक राहिला नाही हेही सत्य आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आजचे कोकणी समाजमन जणू कुटुंबियांशी संवाद साधावा तसे चर्चा करताना दिसते आहे, हा वर्तमान प्रसारमाध्यमांचा इथल्या लोकजीवनावर पडलेला प्रभाव आहे. एकविसाव्या शतकात प्रसारमाध्यमांसमोर तथ्यात्मक सादरीकरणाचे आव्हान उभे राहिले आहे. आपल्या लोकशाहीत दृष्टिकोनाचे वैविध्य, मतभेद आणि असहमती यांना असलेले महत्त्व प्रसंगी अडचणीत येतेय की काय? असे वाटू लागले आहे. प्रसारमाध्यमांकडून केले जाणारे विश्लेषण एकांगी असल्याची चर्चा सुरु झाली आहे. ‘लोकशिक्षण’ हेच पत्रकारितेचे मुख्य उद्दिष्ट आहे हे लक्षात घेता, हाती आलेल्या माहितीची सत्यासत्यता तपासून त्याचे विश्लेषण करणारे, नेमके तथ्य लोकांपुढे मांडणारे आधुनिक ‘शस्त्र’ प्रसारमाध्यमांनी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.


साप्ताहिक बलवंत १६ जानेवारी १९४६


खरंतर जगातले पाहिले वर्तमानपत्र एक हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये निघाले होते, त्याचे नाव ‘चिंगपाओ’ म्हणजे राजधानीतल्या बातम्या असे होते. जगातले पहिले दैनिक ‘मॉर्निंग पोस्ट’ हे १७७२ साली लंडनहून प्रसिद्ध झाले. आपल्या भारतात २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी यांनी ‘सर्वांसाठी खुले, मात्र कोणाचाही प्रभाव नाही’ हे उद्दिष्ट ठेवून ‘बंगाल गॅझेट’ नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले होते. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात ‘मुंबापुरी वर्तमान’ नावाचे नियतकालिक असल्याची जाहिरात १८२८ च्या ‘बॉम्बे गॅझेट आणि बॉम्बे कुरिअर्स’ या अंकात प्रसिद्ध झाली होती. मात्र त्याची अधिक माहिती कोठेही मिळत नसल्याने मराठी वृत्तपत्राचे जनकत्त्व बाळशास्त्री जांभेकर यांचेकडे जाते. जांभेकर यांनी समाजजागृती, लोककल्याण, ज्ञानप्रसार आणि लोककल्याणासाठी मुंबईतून ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे द्विभाषिक (इंग्रजी व मराठी) पाक्षिक वर्तमानपत्र सुरु केले होते. रघुनाथ हरिश्चंद्र आणि जनार्दन वासुदेव हे या वर्तमानपत्राचे चालक होते. ४ मे १८३२ नंतर ते साप्ताहिक झालं. ‘दर्पण’ हे भारतातील पाहिले मराठी दैनिक होय. जांभेकर हे मूळचे कोकणातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावाचे होत. जांभेकर यांनी १८४० दरम्यान ‘दिग्दर्शन’ मासिकही सुरु केले होते. विशेष म्हणजे आधुनिक हिंदी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाबूराव पराडकर हे सुद्धा कोकणातील मालवण तालुक्यातील पराड या गावचे होते. समाजसुधारकी विचारांचे स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी पराडकर हे बनारसहून प्रकाशित होणाऱ्या आजचे संपादक राहिले. त्यांचे कुटुंबीय व्यवसायानिमित्त पराडहून बनारसला गेले होते. १८६७ ते १९३७ या काळातील दर्जेदार मासिक ‘ज्ञानविस्तार’चे मालक-संपादक पुरुषोत्तम नाडकर्णी यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील कसालचा! मराठी मासिक आणि नियतकालिकांमध्ये आधुनिक युग निर्माण करणारे मासिक मनोरंजनचे संस्थापक-संपादक काशिनाथ रघुनाथ तथा का. र. मित्र हेही सावंतवाडी तालुक्यातील आजगावचे होत. जानेवारी १८९५ साली त्यांनी मासिक मनोरंजनसुरू केले होते. डॉ. राम मनोहर त्रिपाठी हे मंत्री असताना पराडला राष्ट्रीय स्तरावरचे स्मारक व्हावे यासाठी आग्रही होते. पण ते घडले नाही. २००४ साली महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मध्ये मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांचे त्यांच्या जन्मगावी ‘पोंभुर्ले’ येथे पहिले स्मारक उभारले. २०२२मध्ये चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपल्या सभागृहाला ‘बाळशास्त्री जांभेकर सभागृह’ असे नाव दिले. कोकणात प्रसारमाध्यमांनी काम तर केले आहेच पण या मातीने खूप मोठे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषिक पत्रकार देशाला दिलेत. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीशांच्या विरोधात वादळ उभे करण्यात ही सारी वर्तमानपत्रे आघाडीवर होती.

‘दर्पण’नंतर १८४८ ते १८५० दरम्यान पुण्यातील ‘प्रभाकर’ या साप्ताहिकात मूळचे कोकणातील वतनदार असलेल्या गोपाळ हरी देशमुख (लोकहितवादी) यांची ‘शतपत्रे’ (१०८ छोटे निबंध) प्रसिद्ध झाली होती. या शतपत्रातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले होते. मुंबई-पुणे बड्या शहरांत वृत्तपत्रे सुरु होत असताना ग्रामीण महाराष्ट्रात वृत्तपत्र सुरु होत नव्हती. त्यामागे दळणवळण साधने, शिक्षणाचा प्रसार-प्रचार, मुद्रणतंत्राचा अभाव ही कारणे होती. अशाही स्थितीत ग्रामीण महाराष्ट्रातील अहमदनगर आणि कोल्हापूर पाठोपाठ कोकणात रत्नागिरी येथे ‘संस्कृततज्ज्ञ’ जनार्दन हरी आठल्ये यांनी १८४८ साली ‘जगन्मित्र’ छापखाना सुरु करून हा १८५३ साली ‘जगन्मित्र’ हे साप्ताहिक सुरु केले. कोकणातील हे पाहिले वृत्तपत्र होते. आठल्ये यांना शास्त्री म्हणत. १८४२ साली ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी अहमदनगर तेथून सुरु झालेल्या ‘ज्ञानोदय’च्या पार्श्वभूमीवर ‘जगन्मित्र’ने ख्रिस्ती धर्माच्या विरोधात उघड भूमिका घेतलेली होती. पाच रुपये वार्षिक वर्गणी असलेल्या या ‘जगन्मित्र’चे सुरुवातीला १७ वर्गणीदार होते. वर्गणीदारांत महाराष्ट्रातील विद्वज्जन, मिस्टर कँडी, मुंबईचे गव्हर्नर आदींचा समावेश होता. या पत्राला रत्नागिरी आणि बाहेरील मराठी माणसांकडून चांगले सहकार्य मिळत होते. ‘रत्नागिरीचे गॅझेट’ असा गौरव ‘जगन्मित्र’चा होत असे. आठल्ये यांनी १८९० पर्यंत साप्ताहिक जगन्मित्र शिळाप्रेसवर चालवले. जगन्मित्र छापखान्यात मराठी कायद्याची, धार्मिक पुस्तकं छापली जात होती. मनुष्य ज्या प्रचंड विश्वाचा भाग आहोत त्याचं शक्य तितकं ज्ञान मिळवण्यासाठीची धडपड हा मनुष्याच्या विकासाचा भाग आहे. यासाठीचा पूरक प्रयत्न म्हणून रत्नागिरीतील जनार्दन हरी आठल्ये यांनी १८७८-७९ मध्ये 'विद्यामाला' चालू केली होती. १८९० मध्ये ‘जगन्मित्र’ बंद पडलं.

१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्ध काळात, वृत्तपत्रांना १८३५ साली मिळालेले स्वातंत्र्य संपुष्टात आले होते. साऱ्या वृत्तपत्रांचे संपादक सुशिक्षित विद्वान होते. १८६०च्या दशकातील ‘ज्ञानप्रकाश’च्या विविध वर्गणीदारांची उपलब्ध यादी तपासली असता त्यात आपल्याला कोकण भूमीतील काही नावे भेटतात. यात सरकारी अधिकारी श्रीनिवासराव शेषो दप्तरदार, गुरुराव कृष्ण दप्तरदार, श्रीनिवास शेषो, (रत्नागिरी), नारायण त्रिंबक मुनसफ बाबाजी श्रीपत (चिपळूण), भास्कर नारायण (रायगड), गोपाळ रावजी मांडे (पनवेल), ‘कलेक्टर’ विठ्ठल सदाशिव डे, आनंदराव हेड कारकून, भास्कर नारायण शिरस्तेदार (ठाणे), मि. कुंवरजी सापूरजीभाई (जव्हार) आनंदराव शिवाजी व नारो बाबाजी (उत्तर कोकण) ह्या कोकणात तत्कालिन वास्तव्य असलेल्या व्यक्ती आणि नेटिव्ह लायब्ररी ठाणे, वसई, सावंतवाडी, भिवंडीचे जज गणपतराव मांडे, दाभोळचे स्कूलमास्तर रामजी आगाशे, भिवंडीचे सखाराम शिवराम, मुरुडचे विनायक जगन्नाथ, कल्याणचे नारो भास्कर देवधर, वसईचे त्र्यंबक केशव परचुरे, अलिबागचे गोविंदबाबा, तळे येथील विनायक गोविंद आदी.


साप्ताहिक किरात स्वातंत्र्यदिन १९४७ विशेषांक


रायगड (कुलाबा) जिल्ह्यातून अलिबाग सत्यसदन छापखान्यात १८७० साली रावजी हरी आठवले यांनी साप्ताहिक ‘सत्यसदन’ सुरु केले. ‘जगन्मित्र’नंतर पंधरा वर्षांनी १८७१ मध्ये रत्नागिरीतून साप्ताहिक ‘सत्यशोधक’ सुरु केले. हरी नारायण लिमये हे त्याचे संस्थापक-संपादक होते. सत्यशोधक १८८९ पर्यंत वळणदार हस्ताक्षरात ‘शिळाप्रेस’वर छापलं जात असे. तळकोकणचे वृत्तपत्र म्हणून या साप्ताहिकाने मोठे काम केले आहे. आजही नियमित प्रकाशित होणाऱ्या या साप्ताहिकाने नुकताच आपला शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा केला. महात्मा फुल्यांनी १९७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक चळवळीशी संबंधित हे वृत्तपत्र नव्हते. ‘सत्यशोधक’ला साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर १९३१ सालच्या ‘थोडासा पूर्ववृत्तांत व आत्मनिवेदन’ या संपादकीय मजकुरावरून नजर फिरवली असता आपल्याला कोकणातील प्रसारमाध्यमांची तत्कालिन स्थिती ध्यान्यात येते. ‘१८७१ साली आंग्ल शिक्षण आजच्यासारखे बहरीस आलेले नव्हते. त्यावेळची बहुतेक वृत्तपत्रे मराठी शिक्षणतज्ज्ञांच्या संपादकत्वाखाली निघत असत. आपल्या हातून देशसेवा घडावी या हेतूने अनेकांनी सरकारी शाळा मास्तरकी स्वेच्छेने झुगारून वृत्तपत्र सुरु केली होती. स्वराज्य प्राप्यर्थ सर्वांचे लक्ष लागलेले असताना जनतेला आणि सरकारला प्रामाणिक सल्ला देण्याचे काम सत्यशोधक करत होते. अस्पृश्यता निवारणाच्या महत्त्वाच्या प्रश्नावर स्पष्ट अभिप्राय निर्भयपणे देण्याचे कर्तव्य बजावत असल्याचे नमूद होते.’ साहित्यसम्राट न. चि. केळकर केसरीचे संपादक असताना रत्नागिरीत आले होते. तेव्हा त्यांनी, ‘सर्व जिल्ह्यातील साप्ताहिक मराठी वर्तमानपत्रात जिल्ह्यातील संपूर्ण माहिती व महत्त्वाची वर्तमाने वगैरे देण्याचे कामी ‘सत्यशोधाक’ला पहिला नंबर देण्यास मुळीच हरकत नाही’ असे म्हटले होते. यावरून आपल्याला कोकणातील वर्तमानपत्रांची स्वातंत्र्यपूर्व मांडणी ध्यानात यावी.

विठ्ठल गोविंद बाणवलीकर यांनी १८७५ साली ‘वेंगुर्ले वृत्त’ हे सायं साप्ताहिक सुरु केले होते. त्याची छपाई मालवणातील शिळा प्रेसवर होत असे. १८९१ मध्ये ते ‘लोकमत’मध्ये विलीन करण्यात आले. ‘लोकमत-वेंगुर्ले वृत्त’ अशा जोडनावाने १९०३ पर्यंत ते चालू होते. सावंतवाडीत नाटककार श. गो. साठे व सी. द. आजगावकर यांनी काही काळ ‘कुंजविहारी’ हे मासिक चालविले. १६ ऑक्टोबर १८८२ रोजी मालवणहून ‘विचारशील’ हे साप्ताहिक सुरू झाले. हे पत्र मालवण येथे गणेश विश्राम पाटकर यांच्या विचारदर्शक छापखान्यात छापले जात असे. मालवणातून १८८२ साली ‘तरुण मित्र’ मासिक पत्र प्रसिद्ध होत होते. याशिवाय अंकुश रामचंद्र गाडेकर संपादित सत्यवक्ता-वेंगुर्ले १८९७ (१८९९ साली २७५ प्रती छापले जात होते), धनंदा वेंगुर्ले (१८९७) ही वृत्तपत्रे प्रकाशित होत असल्याचा उल्लेख आढळतो. नारायण पुंडलिक सामंत संपादित ‘वार्तादर्श’ (मालवण) हे १८९९ साली ते २०० प्रतीत छापले जात होते. १८८२ मध्ये रत्नागिरीहून गांधी यांनी ‘बकुळ’ साप्ताहिक सुरु केले. १८९९ साली ते २९० प्रतीत छापले जात होते. त्यानंतर काळात रायगड जिल्ह्यातून ‘सद्धर्मदिप’ (१८७८), ‘अबला मित्र’ हे स्त्रीयांचे मासिक (१८७९), ‘रात्र’ (१८८१), ‘शरभ’ (१८८२) सुरु झाले. हा तो काळ होता, जेव्हा अधिकतर अशिक्षित असलेल्या कोकणात ना दळणवळणाची साधने होती ना वीज. तरीही कोकणातल्या या मंडळींनी वर्तमानपत्र सुरु करायचा निर्णय घेतला होता. कॉंग्रेसची स्थापना १८८५ ची असल्याने या वर्तमानपत्रांच्या मागे पक्षीय राजकारण असण्याचा संबंध नव्हता. निवळ लोकजागृतीसाठी हे चाललेलं होतं. ध्येयवादी सामाजिक कार्याची दृष्टी यामागे होती. १८८८-८९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ५ वर्तमानपत्रं निघत होती. ती १५३४ वाचकांपर्यंत पोहोचली होती. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात मुंबई-पुण्याबाहेर साताऱ्याचा अपवाद वगळता ही वृत्तपत्र आणि वाचक संख्या सर्वाधिक होती. १८८१ च्या जनगणनेनुसार मुंबई इलाख्यात हिंदू लेखकांची संख्या कोकणात सर्वाधिक नोंदवलेली आहे. गुजरात, कोकण, दख्खन, कर्नाटक आणि मुंबई शहर मिळून ही एकूण संख्या २३ हजार ५०९ असताना कोकणात ती १० हजार ४७२ होती. १८९१ साली चिपळूणातून सदाशिव वि. फडके यांनी साप्ताहिक ‘चंद्रोदय’ सुरु केलं. १८९९ साली ते ५०० प्रतीत छापले जात होते. ‘मदतनीस’, ‘स्पष्टवक्ता’, ‘घेनंदा’ (१८९७), ‘वार्तादर्श’ (मालवण १९०२), ‘ब्रह्मोदय’ (महाड १९०६), ‘राष्ट्रमुख’ (१९०८) हीही वृत्तपत्र तेव्हा कोकणात प्रकाशित होत होती.

महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्र ही राष्ट्रीय चळवळीचा भाग बनली ती १८८१ ला, ‘मराठा’ (इंग्रजी ; संपादक लोकमान्य टिळक) आणि ‘केसरी’मुळे (मराठी ; संपादक गोपाळ गणेश आगरकर) ! त्याकाळी कोल्हापूरचे दिवाण बर्वे यांच्या विषयीच्या आक्षेपार्ह लेखनासाठी टिळक आणि आगरकर यांना कारावास भोगावा लागला होता. वृत्तपत्रीय लेखनासाठी कारावास भोगावा लागण्याची ती पहिली घटना होती. या दोन्ही वृत्तपत्रांच्या संपादन कामात १७ मार्च १८९६ पासून साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांचा सहभाग राहिला. ते मूळचे देवगड तालुक्यातील वानिवडे गावचे होत. वेंगुर्ला येथून ‘धनदा’ नावाचे पाक्षिक वर्तमानपत्र सुरु होते. शंकर रा. राजाध्यक्ष त्याचे संपादक होते. १८९९ साली ते ७०० प्रतीत छापले जात होते. वेंगुर्ला येथून ‘वेंगुर्ला वृत्त’ नावाचे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु होते. विठ्ठल गोविंद बनवलीकर त्याचे संपादक होते. १८९९ साली ते ११० प्रतीत छापले जात होते. ठाण्यातून साप्ताहिक ‘हिंदू पंच’ सुरु होते. श्रीधर वामन साठ्ये त्याचे संपादक होते. १८९९ साली ते ६०० प्रतीत छापले जात होते. विठोबा गंगोजी चिंधारकर संपादित साप्ताहिक ‘पेण समाचार’ १८९९ साली १२५ प्रतीत छापले जात होते. नारायण मंडलिक संपादित साप्ताहिक ‘सुधाकर’ (पेण) हे १८९९ साली ते ३०० प्रतीत छापले जात होते. १९०६ मध्ये सावंतवाडीहून साप्ताहिक ‘सरदेसाई विजय’ सुरु झालं होतं. मात्र ते  अल्पायुषी ठरलं.  १९१७ मध्ये अलिबागमधून ‘खरे स्वराज्य’ हे पाक्षिक सुरु झाले. त्याचवर्षी बाळासाहेब चिटणीस संपादक असलेले ‘सुमन’ हे मुलांचे मासिक अलिबागेतून सुरु झाले. २५ ऑक्टोबर १९१९ रोजी ‘कुलाबा समाचार’ सुरु झाले. विष्णू नारायण मंडलिक याचे संपादक होते मात्र राजाभाऊ मंडलिक यांचे पत्र म्हणून ते साठ वर्षे ओळखले जात होते. रायगड जिल्ह्यातील त्याकाळचे महत्त्वाचे पत्र अशी याची ओळख सांगावी लागेल. एकाचवेळी अनेक वृत्तपत्रे चालवणाऱ्या रावजी हरी आठवले यांनी १९२० मध्ये ‘खरे स्वराज्य’ हे पत्र काही काळ चालवले.

कोकणातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळीसाठीची देशव्यापी सडेतोड पत्रकारिता १९२० नंतर देशभर ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’ नावाने बहरत गेली. बहिष्कृत भारतची कल्पना १९२७ साली महाड (रायगड) येथे भरलेल्या अधिवेशनात पुढे आली होती. व्यापक संपादकीय विचार आणि जातिधर्म निरपेक्ष धोरण राबवणाऱ्या बाबासाहेबांनी आपल्या ‘बहिष्कृत भारत’मध्ये लोकहितवादींच्या शतपत्रांचे पुनर्मुद्रण केले होते. रायगड जिल्ह्यात १९२१ मध्ये विनायक नारायण उर्फ काकासाहेब मनोहर यांनी ‘कुलाबा वृत्त’ हे पाक्षिक सुरु केले. त्या दरम्यानचे यशवंतराव गुर्जर यांचे साप्ताहिक ‘कुलाबा’ (१९२४) अल्पजीवी ठरले. ३ जानेवारी १९२७ मध्ये श्री. ना. पटवर्धन यांनी अलिबाग मधून साप्ताहिक ‘कोकण’ सुरु केले. तीन वर्षानंतर ते १९२५ साली सुरु झालेल्या दा. पां. आगाशे यांच्या ‘कुलाबा सदवृत्त’मध्ये विलीन करण्यात आले. कोकण शेती समाचार, ग्रामोद्धार आदी वृत्तपत्र याच काळात रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध होत होती. ग. भा. पंडित आणि दादासाहेब साखळकर यांनी अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पाक्षिक ‘विधायक’ सुरु केले होते मात्र तेही लवकरच बंद करावे लागले. १९३५ मध्ये राष्ट्रमत प्रसारक मंडळी यांच्यावतीने कॉंग्रेस प्रचारासाठी ग. भा. पंडित यांनी साप्ताहिक ‘राष्ट्रतेज’ सुरु केले होते. १९२६-२७ मनोहर पाटील यांचे पाक्षिक ‘इन्कलाब’, कृ. के. रहाळकर यांचे धार्मिक मासिक ‘कनकेश्वर’, रणभेरी सुरु झाली. पश्चिम किनाऱ्यावरील एकेकाळचे भरभराटीचे बंदर असलेल्या वेंगुर्ले शहरातून गेली शंभर वर्षे किरातसाप्ताहिक प्रकाशित होत आहे. वेंगुर्ले हे दक्षिण कोकणातील स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र असल्याच्या काळात १९२२-२३ मध्ये अनंत वासुदेव मराठे यांनी याची सुरुवात केली होती. वेंगुर्ले येथील जॉर्ज इंग्लिश स्कूल (पाटकर हायस्कूल)ची स्थापना करण्यात मराठे यांचा सहभाग राहिला. त्यांनी या शाळेत शिक्षक म्हणून विनामूल्य काम केले होते. कोकण रेल्वेचे उद्गाते अ. ब. वालावलकर हे याच शाळेत मराठे यांचे विद्यार्थी होते. रेल्वे खात्यात नोकरीला लागल्यानंतर कोकण रेल्वेचा आराखडा आणि कोकण रेल्वेची आवश्यकता याबाबतचे त्यांचे लेख सर्वप्रथम किरातमधून प्रसिद्ध झाले होते. वृत्तपत्रांच्या दुनियेत जिल्हा आवृत्त्या निघण्यापूर्वी पर्यंतच्या स्वातंत्र्योत्तर किरातसारख्या वृत्तपत्रांचे महत्व खूप मोठे होते. ‘किरात’नेही नुकतीच आपली शताब्दी साजरी केली. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत साप्ताहिकाचा अंशात्मक भाग यु-ट्युबवरून प्रसारित करण्याची अभिनव कल्पना किरातच्या विद्यमान संपादक सीमा शशांक मराठे यांनी सुरु केली आहे.


२६ जुलै १९५६ चंद्रोदय चिपळूण


कोकणातल्या लहानश्या ‘सावंतवाडी’ संस्थानी भूमीला स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरचं जग बाहेरच्या जगाला जोडण्यासाठी वर्तमानपत्राची उणीव होती. मेघश्याम दत्तात्रय शिरोडकर (संपादक), ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर (सहसंपादक) आणि श्री गुरुदत्तात्रेय छापखान्याचे सदाशिव साप्ते (मुद्रक) यांनी मिळून साप्ताहिक ‘वैनतेय’ सुरु केलं. सावंतवाडी संस्थान १८३८ पासून कार्यरत होतं. तिथला कारभार ब्रिटीशांच्या अखत्यारित चालायचा. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी संस्थानचे सुविद्य व तरुण अधिपती बापूसाहेब महाराज सिंहासनारूढ व्हायच्या दिवशी राज्याधिकाराचं औचित्य साधून बलिप्रतिपदा, २९ ऑक्टोबर १९२४ ला ‘वैनतेय’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला होता. ‘वैनतेय’ हे नाव वि. स. खांडेकरांनी दिलेलं. याबाबत ‘एका पानाची कहाणी’त ते म्हणतात, ‘हे नाव निवडताना माझ्या डोळ्यासमोर दोन गोष्टी होत्या. जिकडे-तिकडे डोंगरांनी वेढलेला दक्षिण कोकणचा भाग. त्या डोंगराच्या खडकावर बसून सूर्याकडे टक लावून पाहणाऱ्या गरुडासारखं काम आपल्याला करायचं आहे. धार्मिक, सामाजिक, राजकीय सर्व बाबतीत लोकं गतानुगतिक आहेत, भित्रे आहेत. अशा समजत प्रत्येक आठवड्याला विचारजागृती करणाऱ्या वृत्तपत्राला ‘वैनतेय’ नाव शोभून दिसेल. शिवाय, हे केळकर, शिवरामपंत परांजपे अशा गुरूंपासून वृत्तपत्राचे धडे घेऊन आले होते. ही सारी परंपरा ‘केसरी’ची होती. सिंह हा जसा पशूंचा राजा, तसा गरुड हा पक्ष्यांचा राजा. तेव्हा आपल्या त्या दृष्टीनंसुद्धा वृत्तपत्राला ‘वैनतेय’ हे नाव देणं उचित होईल. खांडेकरांनी मांडलेल्या या भूमिकेत आपल्याला तत्कालिन कोकणी मानसिकता स्पष्ट दिसते. ‘वैनतेय’चं ध्येय सूचित करणाऱ्या श्लोकात खांडेकर यांनी ‘वसे दास्यी माता’ अशा शब्दात भारतमातेच्या पारतंत्र्याचा उल्लेख केला होता. ‘दक्षिण कोकणाचा जागल्या’ अशी या वृत्तपत्राची ओळख होती. आजची माध्यमं मोजक्या शब्दात पुस्तक परिचय करून देत असताना अवघ्या चार पृष्ठांचं ‘वैनतेय’ वाङ्मयीन अभिरुची जोपासण्यासाठी पृष्ठच्या पृष्ठ खर्च करायचं. सावंतवाडी संस्थानचं विलीनीकरण, गोवा स्वातंत्र्यसंग्राम, मिठाचा सत्याग्रह, आणीबाणी विरोध आणि सातत्याने समाजवादी विचारधारेचं समर्थन ‘वैनतेय’ने केले. महात्मा गांधीही कोकणात आले होते. १९३०चा मिठाचा सत्याग्रह तत्कालिन मुंबई-गोवा सीमेवरील शिरोडा या गावी झाला. या साऱ्या घडामोडींचं वार्तापत्र प्रसारण करण्यात वर्तमानपत्र आघाडीवर राहिली. कोकण बुद्धीने श्रीमंत होता पण अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य यांत अडकून होता. कोकणी समाजमनावर परंपरा, धर्म, चमत्कार, चेटूक, भुताटकी यांचा पगडा होता. देवावर भरिभार घालून स्वस्थ बसणाऱ्यांवर कोरडे ओढायचे काम खांडेकरांनी केले होते. ‘गीता, अंधश्रद्धा आणि कोकण’ या २८ डिसेंबर १९२६ च्या लेखात त्यांनी ‘हिंदूधर्म सर्व जगात श्रेष्ठ म्हणून बडबड करायची व सात कोटी माणसांसारख्या माणसांना अमानुषपणे अस्पृश्य लेखायचे. आम्ही निवृत्तीपर म्हणून बढाई मारायची व पैसाठी भावाच्या मानेवर सुरी ठेवायची, अशी दृश्ये जोपर्यंत हिंदू समाजात दृष्टीला पडत आहेत तोपर्यंत हिंदुधर्माचे श्रेष्ठत्व कोणाला पटणार? भुतेखेते, जुगार-जत्रा, नवस-सायास, प्रसाद-अवसर, मंत्र-तंत्र इत्यादिकांत धर्म साठविला आहे अशी समजून असणाऱ्या कोकणात गीतेच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार होणे जरुरीचे आहे.’ असे म्हटले होते. मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिन स्मरणिकेतील नोंदीनुसार २ ऑगस्ट १९६४ च्या मुंबईतील फोर्ट येथील तांबे हॉल मध्ये झालेल्या वर्धापन दिनाचे महनीय प्रवक्ते वक्ते ‘वैनतेय’चे संस्थापक शिरोडकर होते. तत्पूर्वी मो. दि. जोशी, रत्नागिरी (१९४९), अ. वि. फडके, चिपळूण (१९५३) यांनी वर्धापन दिनाचे महनीय प्रवक्तेपद भूषविले होते. आणीबाणीच्या काळात प्रकाशनावर बंदी असलेले ‘वैनतेय’ हे तळकोकणातले एकमेव वृत्तपत्र होते. ‘वैनतेय’च्या कार्याचं यश हे की स्वातंत्र्योत्तर काळात याचे दोन संपादक श्याम कोचरेकर आणि जयानंद मठकर हे आमदार म्हणून निवडून आले. तळकोकणात समाजवादी चळवळीचा प्रसार करण्यात ‘वैनतेय’चे मोठे योगदान राहिले आहे.

रत्नागिरीच्या गजानन पटवर्धन यांनी १९२३ साली साप्ताहिक ‘बलवंत’ सुरु केले. १९३१ ते १९५६ मध्ये बलवंतचे संपादक असलेल्या मोरेश्वर दिनकर तथा मोरोपंत जोशी यांनी आमदार-खासदार म्हणूनही काम केले. त्याकाळात बलवंत राज्यभरात आतुरतेने वाचला जात असे. गजानन पटवर्धन यांच्यानंतर श्री. वा. दात्ये आणि सध्या बाळासाहेब माने याचे संपादक आहेत. ऑगस्ट १९२८ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ‘यंग मुस्लिम’ हे साप्ताहिक सुरु झाले होते. सुरुवातीचा वर्षभराचा काळ त्याचे मुद्रण सत्यशोधक प्रिंटींग प्रेस मध्ये होत होते. १८९९ साली ते ६०० प्रतीत छापले जात होते. ‘यंग मुस्लिम’ची जाहिरात आपल्याला १ जुलै १९२८ च्या साप्ताहिक सत्यशोधकमध्ये पाहायला मिळते. तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यात मुस्लिम लोकसंख्या ऐंशी हजाराच्या आसपास होती. ‘यंग मुस्लिम’चे ध्येय हिंदू व मुस्लिम यांच्यात एकी घडवून आणणे हे होते. सुरुवातीची वार्षिक वर्गणी टपालासह तीन रुपये तेरा आणे होती. १९३० साली सरदार बाबासाहेब घोरपडे यांनी साप्ताहिक ‘नवप्रभा’ सुरु केले. त्र्यंबक अण्णाजी ऊर्फ बाप्पा धारणकर यांनी १९३८ मध्ये सावंतवाडी येथून साप्ताहिक सत्यप्रकाश सुरू केले. मूळचे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगावचे धारणकर १९३० साली सावंतवाडीत स्थायिक झाले होते. सावंतवाडीत त्यांनी १९३४ साली छापखाना सुरू केला. त्यांनी आपल्या मृत्युपर्यंत (२५ जुलै १९८३) सत्यप्रकाश निष्ठेने, धडाडीने आणि एकहाती चालविले. ‘सत्यप्रकाश’चा सावंतवाडीत दबदबा होता. याच काळात १९२४ साली मालवणहून शाहू प्रकाश आणि मालवण समाचार, ‘सिंधुदुर्ग’ (१९३१) रत्नागिरीतून मराठी मासिक भासप्रकाश (१९३२), ‘अरुण’ (१९३८), सावंतवाडीतून प्रसिद्ध होणारी ‘हरहर महादेव’(१९२१), युवाक्रांती (१९४४), स्नेहदीप, कोकणसमाज, ‘कडेलोट’, मालवणी बोलीतून प्रसिद्ध होणारे ‘कोकण समाज पत्रिका’, अध्यात्म विषयाला वाहिलेले ‘कोकणरत्न’ कणकवलीतून प्रा. मुकुंद कदम यांचे दैनिक सिंधुदुर्ग समाचार (१९०१) ही काही प्रमुख पत्रे सुरु होती. ऑगस्ट १९३५ मध्ये ‘अखिल भारतीय वृत्तपत्र परिषद’ वृत्त कोकणातल्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. १९३१-३२ च्या महात्मा गांधींच्या असहकार, सत्याग्रह आणि कायदेभंगाच्या काळात राष्ट्रीय वृत्तीच्या वर्तमानपत्रांना जमीनदोस्त करण्याकरिता सरकारने कायदे केल्याचे या परिषदेत नमूद करण्यात आले होते. ‘सरकार वृत्तपत्रांना आपले शत्रू समजते. वृत्तपत्रे ही लोकमत प्रदर्शनाची आणि लोकांना दिशा लावण्याची साधने आहेत. भारतीय राष्ट्राभिमान, स्वराज्य, स्वातंत्र्य आदी भावनांचा झालेला विकास वृत्तपत्रांवर पायबंद घालून निस्तेज करण्याचा सरकारचा हेतू आहे.’ अशी भूमिका मांडण्यात आली होती. यावरून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व वृत्तपत्र स्थिती ध्यानात यावी.

७ जून १९३७ रोजी अलिबाग जवळच्या पेझारी येथून शेतकऱ्यांचे नेते नारायण नागू पाटील यांनी ‘कृषीवल’ हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केले. १९३३ साली रायगड जिल्यातील ‘चरी’ येथे शेतकऱ्यांचा संप सुरु झाला होता. ‘कृषीवल’ हे त्या संपाचे अपत्य मानले जाते. खोतीविरुद्धचा लढा यशस्वी करण्यात ‘कृषीवल’चा सहभाग राहिलेला आहे. एस.टी. सुरु झाल्यानंतरच्या काळात ‘कृषीवल’ एस.टी.ने जाई. साक्षरता, लोकांची आर्थिक ताकद कमी होती. रायगड जिल्ह्यातील गावागावात त्याचे वाचन होत असे. तेव्हा रायगड जिल्ह्यात ‘केसरी आणि कृषीवल’ पोहोचत होता. अलिबागचे ‘पत्रकार भवन’ हे कै. प्रभाकर पाटील यांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. पाटील कुटुंबियांची चौथी पिढी आज ‘कृषीवल’चे संपादन पाहात आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर (सावंतवाडी), अ. सी. केळुसकर, आत्माराम सावंत (आकेरी सावंतवाडी), गंगाधर मनमोहन महांबरे (मालवण), कमलाकर नाडकर्णी ही प्रसारमाध्यमात राज्यभर गाजलेली सिंधुदुर्गातील काही नावे आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधप्रांतात मराठी संस्कृती होती. त्याकाळी मराठा एज्युकेशन सोसायटीच्या रामचंद्र तातोबा सावंत यांनी कराचीत ‘सिंध मराठा’ हे साप्ताहिक सुरु केले होते. दत्तात्रय वासुदेव तथा द. वा. अणावकर त्याचे संपादक होते. भारताची फाळणी होईपर्यंत ते सुरु होते. १९३७ साली अणावकर यांनी महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहाय्याने मासिक ‘समाचार’ सुरु केले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात, महाराष्ट्रात नियतकालिकांमध्ये १९३५ पासून सुमारे पस्तीस वर्षे साप्ताहिक-मासिक वर्तमानपत्रात वैशिष्ट्यपूर्ण शैलीत ‘राशीभविष्य लेखन’ करणारे ‘होराभूषण-रत्न’ वसंत लाडोबा म्हापणकर हेही मूळचे मालवण होत. चित्रा, मौज, धनुर्धारी, मराठा आदी दैनिकात ते भविष्यलेखन करीत. त्यांनी लिहिलेले भविष्य वाचण्यासाठी त्याकाळी धनुर्धारीविकत घेणारे वाचक होते. कोकणातील प्रसारमाध्यमांचे आणखी एक अंग हे विषयानुरूप प्रसिद्ध होणाऱ्या अंकांचे आहे. २ जानेवारी १९३५ रोजी कोकणात वामन गोविंद काळे यांनी आर्थिक आणि औद्योगिक विषयाला वाहिलेले ‘अर्थ’ साप्ताहिक सुरु केले. ते त्यांनी १९७० पर्यंत म्हणजे सलग चाळीस वर्षे चालवले. ते पुण्याच्या फर्ग्युसनमहाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मराठी माणसाला मराठी भाषेतून आर्थिक प्रगती आणि व्यापार याची माहिती मिळावी म्हणून त्यांनी हे साप्ताहिक चालवले. ‘अर्थ’ साप्ताहिकाचे राष्ट्रीय कार्य महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार चिंतामणराव देशमुख यांनी काढले होते. १९३५ मध्ये पारुजी नारायण मिसाळ यांनी ‘कणकवली’तून ‘बालसन्मित्र’ हे मुलांचं मासिक सुरु केलं होतं. बालसाहित्य चळवळ सुरु करण्याचा मान त्यांच्याकडे जातो. ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक याच मासिकात लिहून पुढे नावारूपाला आले. कॅप्टन दिलीप भाटकर यांचं जहाज जगताला वाहिलेलं ‘कोकण शिल्प’ आणि राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचं मोटार या विषयाला वाहिलेलं ‘मोटार जगत’ हीही अशीच कोकणातील वेगळी उदाहरणे म्हणून नोंदवायला हवीत.


साप्ताहिक सागर चिपळूण वर्ष २ अंक १२


देशातील सर्वच प्रसारमाध्यमांचा स्वातंत्र्यपूर्व कालावधी हा स्वातंत्र्य, प्रबोधन आणि सामाजिक चळवळीच्या संघर्षाचा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत जगाच्या बाजारात वृत्तपत्रांना महत्त्व प्राप्त झाले होते. त्या त्या राष्ट्राचा जीवंतपणा दर्शवण्याचे काम वृत्तपत्र करत होती. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरची ही सारी वर्तमानपत्र स्वातंत्र्यलढ्याला पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम करत राहिली. विविध विषयांची माहिती देण्यासोबत शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनवादी विचार मांडत असत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या रत्नागिरीतील वास्तव्याच्या काळात त्यांच्या साऱ्या कार्याला वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला असला तरी ‘कोकणातल्या वृत्तपत्रांनी खोतांची तळी उचलून धरली’ अशी नोंद रत्नागिरीतील प्रसिद्ध चरित्रकार ‘पद्मभूषण’ धनंजय कीर यांनी केली आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात लोकशाहीचे रक्षण आणि प्रगतीला पोषक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी वृत्तपत्रांकडे होती. वृत्तपत्रांतील त्रुटीमुळे लोकमताचा तोल बिघडण्याची शक्यता होती. म्हणूनच एका ब्रिटीश मसुद्याने संसद आणि वृत्तपत्रे यांनी लोकशाहीचे दोन आधारस्तंभ म्हटले होते. स्वातंत्र्यानंतर वृत्तपत्रांचे महत्त्व अधिक वाढले. स्वातंत्र्य अमर्यादित झाले. लोकांचे प्रश्न, अडचणी, अन्याय यांना वाचा फोडता येऊ लागली. त्याचा परिणाम वृत्तपत्रांच्या लोकप्रियतेवर झाला. वृत्तपत्र व्यवसायात भांडवलाची गरज वाढली. वृत्तपत्रांकडे भांडवलदारांचे लक्ष वळले. हळूहळू पत्रकारिता बदलत गेली. पत्रकारिता हे राजकीय आणि सामाजिक प्रबोधनाचे साधन राहिले नाही. वृत्तपत्रे हा निखळ व्यवसाय बनला. स्वातंत्र्योत्तर काळात विविध राजकीय पक्षांना विचारांच्या प्रचाराचे साधन म्हणून स्वतःच्या वृत्तपत्राची आवश्यकता वाटू लागली. कोकणात काही नवी वर्तमानपत्रे सुरु झाली. समाजात नवीन वातावरण तयार झाले. स्वातंत्र्यप्राप्तीचा उत्साह होता. आकाशवाणीसह दूरदर्शन आणि त्यानंतर एकविसाव्या शतकात दूरसंचार क्रांती झाली. मात्र याच्या सुरुवातीला पाहिलं तर राज्यस्तरावर मराठी पत्रकारितेत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून जन्मलेल्या आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’ या दैनिकाची कामगिरी महत्त्वाची ठरली होती.

१९४८ मध्ये समाजवादी विचाराच्या तरुण मंडळींनी ‘साथी’, ‘विचार’ ही पत्रे सुरु केली. एस.टी. कामगार नेते चंद्रकांत वाडकर यांनी काही काळ पाक्षिक ‘कामगार समाचार’ चालवले. १९५२ साली मधु पानवलकर यांनी ‘समाजसत्ता’ हे समाजवादी विचारांचे साप्ताहिक सुरु केले होते मात्र ते अल्पायुषी ठरलं. अ‍ॅड. श्री. स. खांडाळेकर यांनी १९५४ मध्ये मालवणातून साप्ताहिक जनयुग तर १९५९ मध्ये विठ्ठल पै यांनी साप्ताहिक ‘शिवसंदेश’ सुरु केले. १९५८ साली स्वातंत्र्य सैनिक ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर यांनी कुडाळमधून साप्ताहिक ‘व्याध’ सुरु केले. गांधी जयंतीदिनी, २ ऑक्टोबर १९५८ रोजी स. रा. शिखरे आणि भाई शेट्ये यांनी रत्नागिरीतून ‘समानता’ हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केलं. भाई बेर्डे हे याचे सलग अठ्ठेचाळीस वर्षे संपादक होते. आणीबाणीच्या कालखंडावर ‘समानता’ने निर्भीड टीका केली होती. सर्वोदयवादी कार्यकर्त्यांनी १९५८ साली ‘नवकोकण’ हे साप्ताहिक सुरु केले. मोरोपंत जोशी यांनी ‘नवकोकण’चे संपादक म्हणूनही काही काळ काम पाहिले. नवकोकणचे दैनिकात रुपांतर झाल्यावर संपादक म्हणून बाळ भिसे यांनी जबाबदारी सांभाळली. ‘नवकोकण’ने २६ जुलै १९७८ रोजी सागरी महामार्गावर ‘प्रलोभने नकोत’ असा अग्रलेख लिहिला होता. आजही हा सागरी महामार्ग पूर्ण झालेला नाही. पुढे बाळ भिसे यांनी आपलं ‘आरसा’ साप्ताहिक सुरु केलं. १९४८मध्ये शिक्षणासाठी वाहिलेले म्हणून सुरु झालेले साप्ताहिक ‘सेवक’ कालांतराने ते ‘नवकोकण’मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. साप्ताहिक ‘किसानसाद’ हे ‘लोकनेते’ शामराव पेजे यांनी सुरु केले होते. आमदार शिवाजीराव जड्यार, हरिश्चंद्र गीते, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी त्याची जबाबदारी सांभाळली. सध्या नितीन लिमये त्याचे संपादक आहेत. अलनासिर काझी यांच्या ‘आकाशगंगा’ वृत्तपत्राने अल्पसंख्यांकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. जयवंत जाधव यांच्या ‘धडक मोर्चा’ने दलितांचे विषय हाताळले. दापोलीचे ‘कोकणराजा’ लोकप्रिय होते. १९५९ मध्ये आ. ग. साळवी यांनी शिक्षणाला वाहिलेले ‘नवशिक्षण’ हे वृत्तपत्र सुरु केले होते.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कालखंडाचा आढावा घेताना इथल्या जनमानसात प्रसारमाध्यम म्हणून आकाशवाणी (ऑल इंडिया रेडीओ)चे राहिलेले स्थान समजून घेणे आवश्यक आहे. भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले होते. बी.बी.सी.च्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबईत केंद्र निर्माण केले होते. प्रत्यक्ष प्रसारणाची सुरुवात १९२४ साली मद्रास येथे एका खाजगी संस्थेने केली. तेव्हाच इंग्रजांनी भारतीय प्रसारण संस्थेला मुंबई व कलकत्ता येथे रेडिओ यंत्रणा स्थापित करण्याची परवानगी दिली होती. १९३६ साली या संस्थेचे ‘ऑल इंडिया रेडिओअसे नामकरण झाले. स्वातंत्र्यानंतर १९५७ साली ‘आकाशवाणीहे नाव ठरविण्यात आले. प्रसिद्ध हिंदी कवी पं. नरेंद्र शर्मा यांनी ते सुचविले होते. जून १९६० मध्ये आकाशवाणीच्या पुणे केंद्राने ‘जिल्हापत्रांचे कार्य’ या विषयावर एक परिसंवाद घडवला होता. त्याचे प्रसारण कोकणातही झाले होते. मोठ्या शहरातून राहणाऱ्या व्यक्तींना जगभरातील बातमी वाचावयास मिळत असली तरी आपल्या गावाकडची बातमी जाणून घेता येत नव्हती. तेव्हा भारतातील सर्व दैनिकांच्या एकूण खपापैकी ५५ टक्के खप शहरात होत होता. जिल्हास्तरावरील वृत्तपत्रांची स्थिती त्यावेळी वाईट होती. स्थानिक खून, मारामाऱ्या, अपघात आदी वृत्त सनसनाटी पद्धतीने मांडून वर्तमानपत्राचा खप वाढू शकतो पण त्याने वृत्तपत्राचे त्या भागाची सेवा करण्याचे ध्येय साधत नसल्याचे म्हटले होते. या परिसंवादात जिल्हा स्तरावरील कोणत्या बातम्यांना प्राधान्य द्यायला हवे याचेही विवेचन करण्यात आले होते. ज्ञान, मनोरंजन, माहिती, शिक्षण आदी कार्यक्रम सादर करणाऱ्या आकाशवाणीचा प्रभाव कोकणातील लोकांवरही राहिलेला आहे. १९७३ नंतर सुरु झालेल्या ‘युववाणी’ कार्यक्रमाने जिल्हास्तरावरील प्रतिभेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. आज संपूर्ण देशाच्या नव्वद टक्केहून अधिक भूभागावर रेडीओ प्रक्षेपण होत असते. कोकणातील स्वातंत्र्योत्तर प्रसारमाध्यमांमध्ये टेलिफोनचे योगदानही आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात तीनशे टेलिफोन एक्स्चेंज आणि ८ हजार ३०० कनेक्शन होते. आजमितीस टेलिफोन एक्स्चेंजची संख्या ३७ हजार ५६५ हून अधिक आहे. तर आशिया खंडातील सर्वात मोठे टेलिकॉम नेटवर्क भारताचे आहे. आकाशवाणी नंतरच्या काळात १५ सप्टेंबर १९५९ला ट्रांसमीटरद्वारे सुरु झालेल्या दूरदर्शनने चित्रवाणी माध्यमांच्या क्षेत्रात मोठे काम केले. १९६५ साली दररोज एक तास वृत्त प्रसारण सुरु झाले. १९७२ साली मुंबई केंद्र सुरु झाल्यावर याचा प्रभाव कोकणात निर्माण होऊ लागला. १५ ऑगस्ट १९८२ रोजी रंगीत दूरचित्रवाणी सुरुवात झाली होती. १५ जुलै १९८४ला दूरदर्शनने ‘हमलोग’ ही पहिली दीर्घ मालिका प्रसारित केली होती. त्यानंतर कोकणात गावोगावी दूरचित्रवाणी संच अवतरले. ‘दूरचित्रवाणी’ ही जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा ठरत असताना १९९० नंतर देशात वृत्तवाहिन्या सुरु झाल्या. तेव्हा सी.एन.एन. या अमेरिकन वृत्तसंस्थेने आखाती युद्धाच्या काळात युद्धाच्या बातम्या जीवंतपणे देण्यास सुरुवात केली होती. आज भारतात राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्त वाहिन्यांनी येथील जनमानसात आपले स्थान निर्माण केले आहे. कोकणातही याचा प्रभाव जाणवतो. अलिकडच्या काळात कोकणातही स्वतंत्र वृत्तवाहिन्या सुरु झाल्या आहेत. दूरचित्रवाहिनीवरील वार्तांकनाचे पाहिले पहिले प्रतिनिधी रत्नागिरीतील ‘कोकण दिनांक’चे संपादक अभिजित हेगशेट्ये हे आहेत. रत्नागिरीत वृत्तवाहिनी पत्रकारितेचा पाया त्यांनी घातला. आज साऱ्या वृत्तवाहिन्या सतत ‘ब्रेकिंग’ मोडवर असलेल्या दिसतात. या गतीचा परिणाम मराठी भाषिक रचना आणि संज्ञापनाची शैली यांवर होत असतो. भन्नाट वेगात बातम्या ‘ब्रेक’ करायच्या नादात मराठीचे सांधे खिळखिळे होत असतात. यावर अनेकदा अनेकजण व्यक्तही होत असतात. पण त्याकडे सर्वांचे सोयीस्कर दुर्लक्ष होत असते.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर २० जून १९६५ रोजी चिपळूणातील निशिकांत माधव तथा नानासाहेब जोशी यांनी ‘दैनिक सागर’ हे तालुका स्तरावरून प्रसिद्ध होणारे अखिल भारतीय पाहिले वर्तमानपत्र सुरु केले. सुरुवातीच्या काळात ते साप्ताहिक म्हणून प्रसिद्ध होत होते. १९७५ पासून ते दैनिक स्वरुपात निघू लागले. ‘वैनतेय’ प्रमाणेच ‘सागर’च्या संपादक नानांना चिपळूणकरांनी आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून विधिमंडळात नेतृत्व करण्याची संधी १९८५-९० या कालखंडात दिली होती. नानांनी आपल्या प्रसिद्ध ‘प्रवाह’ स्तंभलेखनासह इतर लेखनातून कोकणासह जगभरातील स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील असंख्य ऐतिहासिक घटनांची पन्नासहून अधिक वर्षे अभ्यासपूर्ण मांडणी केली. सहज सोपी, ओघवती भाषाशैली हे कोकणातील पत्रकारितेचं चालतं-बोलतं विद्यापीठ असलेल्या नानांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. शासन कोकणची सतत उपेक्षा करत असल्याच्या निषेधार्थ एकदा नानांनी अग्रलेख स्तंभ कोरा ठेवला होता. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला शंभर पानांचा अंक प्रकाशित करून नानांनी मराठी पत्रकारितेत नवा विक्रम नोंदवला होता. अशा नानांसोबतच्या ‘गप्पा’ हा अनेकांसाठी संस्मरणीय आठवणींचा ठेवा आहे. ते बोलताना एखादा विषय कधी सुरु करत आणि त्यातून कधी दुसऱ्या विषयात अलगद शिरत हेच समजत नसे. चिपळूण शहराला ‘कोकणची सांस्कृतिक राजधानी’ दर्जा मिळवून देण्यात येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासह दैनिक सागरचे अमूल्य योगदान आहे. तर नानांनी सागर सुरु केला तेव्हा कोकणात संगणक, मोबाईल, कुरियर नव्हते. टपाल किमान दोन दिवसांनी मिळायचे. फोनही अगदी तुरळक होते. स्थानिक फोन करावयाचा झाल्यास तोही ऑपरेटर मार्फत मागवावा लागायचा. सायकल हे श्रीमंत वाहन होते. चिपळूणला जेमतेम वीज होती. त्यावेळचे कोकणातील पत्रकार त्या त्या ठिकाणी महिना-दीड महिन्यातून एकदा कोणाच्या तरी घरी एकत्र यायचे. बातम्यांवर चर्चा व्हायच्या. नवशक्ती, केसरी, सकाळ, तरुण भारत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, नवाकाळ, बलवंत, समानता आदी वृत्तपत्रे तेव्हा होती. १९७१ साली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे बावीसावे अधिवेशन कोकणात परशुरामाला संपन्न झाले होते. अधिवेशनाला कलकत्यापासूनचे मराठी पत्रकार आलेले होते. तेव्हा चिपळूणला हॉलची उपलब्धी नव्हती, हॉटेल नव्हते. नानांचे वडील भाऊसाहेब जोशी तेव्हा परशुरामचे सरपंच होते. परशुराम देवस्थान आणि गावाच्या उत्साही साहाय्याने जेमतेम साडेनऊ हजार रुपयांत हे अधिवेशन संपन्न झाल्याची नोंद खुद्द नानांनी आपल्या एका प्रवाह मध्ये केलेली आहे. ह्या नोंदी तत्कालिन स्थितीवर भाष्य करतात. नानांच्या पश्चात श्रीमती शुभदा निशिकांत जोशी मॅडम या सागरच्या संपादक म्हणून काम पाहात आहेत. 

तळकोकणातून पहिले स्वातंत्र्योत्तर दैनिक सुरु करण्याचा मान १९६६ च्या प्रजासत्ताक दिनी सुरु झालेल्या भि. रा. पालांडे यांच्या ‘रत्नभूमि’ला जातो. १९७३ साली देवगड मधून ‘देवदुर्ग’ साप्ताहिक शि. स. देसाई यांनी सुरु केले होते. १९८० मध्ये राज्यात डेस्क टॉप पब्लिशिंग (डीटीपी)चे आगमन झाले. त्यातच शिक्षणाचा वाढता प्रसार, साक्षरता, विकासकामे यांमुळे १९८० नंतरच राज्यात विविध वर्तमानपत्रांच्या आवृत्त्या सुरु होत गेल्या. त्याची सुरुवात बहुदा सकाळने केली असावी. १९८० मध्ये उल्हास घोसाळकर यांनी ‘रत्नागिरी टाईम्स’ सुरु केलं. गांभीर्याने सुरु असलेल्या पत्रकारितेने वाचकांना चटकन भावणाऱ्या बातम्यांचे वळण घेतले. हक्काच्या वाचक वर्गाच्या बळावर ‘रत्नागिरी टाईम्स’ने आवृत्यांच्या माध्यमातून कोकण व्यापलं. रायगड जिल्ह्यात १९८० नंतरच्या कालखंडात पत्रकारांची फळी उभी करण्यात महाड मधून १ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या दैनिक शिवतेज कुलाबाचे संस्थापक संपादक अॅड विजयसिंह जाधवराव आणि त्यांचे सहकारी राहिलेले कार्यकारी संपादक अरुण जाधव (पोलादपूर) यांचे खूप मोठे योगदान राहिले आहे. नव्वदच्या दशकात शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यांमुळे वृत्तपत्र ही सर्वसामान्यांची गरज बनली होती. वृत्तपत्र व्यवसायात आमुलाग्र परिवर्तन झाले. लोकशाही व्यवस्थेला तीन दशके झाली होती. रेडीओची जागा दूरदर्शन घेण्याच्या तयारीत होता. देशभर मोठमोठी सरकारी विकासकामे सरू होती. सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. स्थानिक वृत्तपत्रांसह कोकणात १९९५-९६ पासून राज्य पातळीवरील सकाळ, पुढारी, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत, नवराष्ट्र आदी वर्तमानपत्राच्या आवृत्त्यांचे आगमन होत राहिले. १९९६ साली रमेश कीर यांनी रत्नागिरीतून दैनिक ‘रत्नागिरी एक्सप्रेस’ सुरु केलं. ते आजही प्रकाशित होत आहे. दापोलीतून सुहास मातोंडकर यांनी साप्ताहिक ‘अस्त्र’ सुरु केलं. एकविसाव्या शतकात सुरु झालेलं दोन दशकांपासून सुरु असलेलं चिपळूणातील सतीश कदम यांचं साप्ताहिक ‘कोकण एक्सप्रेस’, प्रमोद कोनकर यांचं साप्ताहिक ‘कोकण मिडिया’, राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचं ‘कोंकणी माणूस’ ही आवर्जून दखल घ्यावीत अशी वृत्तपत्रे आहेत.

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला संगणकाने ‘कागदाशिवाय वृत्तपत्र’ ही संकल्पना अस्तित्वात आणली. विविध वृत्तपतत्रांच्या ई-आवृत्या सुरु होत गेल्या. मराठी वृत्तपत्रे जगभरातील मराठी माणसापर्यंत पोहोचली. आजही नवीन वृत्तपत्रे सुरु होत असतात, त्यामुळे मुद्रित माध्यमांच्या अस्तित्वाविषयी शंका घेण्याची गरज नसल्याचे मानणारा एक वर्ग आहे. जगभरातील वृत्तपत्रांच्या खपाच्या आकडेवारीतही भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. तंत्रज्ञानातील गतिमान बदल लक्षात घेत डिजिटलआणि समाजमाध्यमांची आवश्यकता सर्वांनी स्वीकारली आहे. कोकणातील असंख्य पत्रकारांनी काळानुरूप यु-ट्युब चॅनेल आणि ऑनलाईन वृत्तवाहिन्या सुरु केल्यात. याचे मूळ असलेल्या ‘वेब जर्नालिझम’ची सुरुवात कोकणात सुदेश शेट्ये यांनी ‘कोकण टुडे’ म्हणून पहिल्यांदा केली होती. आज सर्वच प्रसारमाध्यमांच्या कार्यशैलीत खूप मोठा बदल घडला आहे. ‘छापून येते ते खरे’ या विधानावरील सामन्यांचा विश्वास हळूहळू कमी होत गेला आहे. सर्वत्र सामाजिक, कला, आणि साहित्यक्षेत्रातल्या चळवळींची गती खूप कमी झालेली आहे. तुलनेने विचार करता कोकणने आपली गती काही प्रमाणात आजही राखलेली आहे. कोरोना विषाणू संक्रमणाच्या काळात (२०२०-२१) अनेक प्रसारमाध्यमांनी आपापला कर्मचारी वर्ग कमी केला आहे. काहींनी जुन्या कर्मचार्‍यांना कमी केले. मुद्रित माध्यमांसमोर असलेल्या वृत्तवाहिन्यांच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यशैलीत बदल केला. काहींनी वृत्तपत्रांच्या वेब एडिशनसाठी ‘उपसंपादक’ नेमायला सुरुवात केली. आज ग्रामीण भागातही अ‍ॅण्ड्रॉईड मोबाईल, मोबाईल डेटा, वायफाय, लॅपटॉप, टॅब यांसारख्या सुविधा असतात. एका क्लिकवर बातम्या, माहिती उपलब्ध होण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने प्रत्येक मुद्रित माध्यमाला स्वतंत्र वेबसाईट, अ‍ॅप तयार करणे अपरिहार्य बनले. वृत्तवाहिन्यांमुळे बातम्यांचे कमी झालेले आयुष्य डिजिटलमाध्यमांमुळे औट घटकेचे ठरते आहे. अपवाद वगळता आजचे पत्रकार हे ‘अधिकारी आणि राजकारणी’ सांगतील ते छापणारे वाहक बनताहेत अशी स्थिती आहे.  महाराष्ट्रातील सुशिक्षित, बुद्धिजीवी मध्यमवर्गीयांसाठी साहित्य-कला-वृत्तपत्रे हे विषय नियोजनपूर्वक वेळ देऊन वाचणे बिनमहत्त्वाचे ठरू लागले आहे. म्हणून मराठीतल्या नियतकालिकांची स्थिती शोचनीय झाली आहे. वाचकसंख्या रोडावली आहे. वर्षानुवर्षे वर्गणीदार वाढत नाही आहेत. आर्थिक भांडवलाअभावी प्रयत्नांना मर्यादा पडताहेत. भारतीय पोस्ट खात्याकडे असलेलं मनुष्यबळ आणि त्यांच्याकडे येणारा रोजचा पत्रव्यवहार यांचं प्रमाण पूर्णपणे व्यस्त असल्याचा मोठा परिणाम मराठी नियतकालिकांच्या वितरणावर झालेला दिसतो. कोकणातही आम्हाला हेच चित्र दिसतं. कोणत्याही नियतकालिकांचे अंक १५ दिवसांनी दिले काय? आणि महिन्याने एकदम दिले काय? फारसं नुकसान होत नाही, असा विचार यामागे असावा. विशिष्ट ध्येयाने सुरू झालेल्या नियतकालिकांची आजची स्थिती भयावह आहे. कोकणचा विचार करता कुडावळे येथून प्रकाशित होणारं दिलीप कुलकर्णी यांचं गतिमान संतुलनहे निसर्ग-विज्ञानविषयक दृष्टिकोन रुजवण्याच्या प्रेरणेने चालणारं नियतकालिक बंद होणं दुर्दैवी आहे.

शासकीय नोंदीनुसार आज ठाण्यातून दैनिक अंबरनाथ टाईम्स, अमृत कलश, आदर्श बदलापूर, आपलं नवे शहर, कोकण सकाळ, गावकरी, जनखुलासा, जनतेचे जनमत, जागल्या, ठाणे वैभव, धम्मशासन, धावते नवनगर, परशुराम समाचार, बदलापूर विकास, बहुजनरत्न लोकनायक, बित्तंबातमी, महाराष्ट्र जनमुद्रा, महाराष्ट्र सम्राट, मुंबई लाईफ, लोकदृष्टी, विशाल जागृती संदेश, सन्मित्र, सहकार संदेश, स्वराज्य तोरण, नालंदा एक्सप्रेस (सांज दैनिक) यांसह साप्ताहिक अखिल लोकक्रांती, आपला भगवा, आपले नवे शहर, आहुती, उल्हास प्रभात, कल्याण नागरिक, कालसंकेत, जन परिवार, जनकल्याण सेवा, ठाणे व्यापारी मित्र, धम्मसूर्य, नवीन कल्याण डायरी, पाचमुखी, प्रतिष्ठा ठाणे टाईम्स, बदलापूरनामा, बापाचा बाप, भारत लोकधारा, मराठा राजपुत्र, लव अंकुश, लोकज्वार, वार्तादीप, विधान परिवार, शहरवासियांचा पुकार, शिवगर्जना, सर्वश्रेष्ठ राजसत्ता, सहज वार्ता प्रकाशित होत आहे. पालघरमधून दैनिक आमची मुंबई, डहाणू टाईम्स, नरवीर चिमाजी, महासागर, राजतंत्र, शोषितांचे समर्थन यांसह साप्ताहिक आयुक्त वार्ता, क्राईम संध्या, जगत भारती, नवयुग पालघर, पालघर मित्र, समर्थन प्रकाशित होत आहे. रायगडमधून रामप्रहर (१८ जुलै २००८), दैनिक कर्नाळा (२०१०), रायगड टाईम्स, रायगड नगरी, रायगड वृत्तवेध, रायगडचा आवाज, किल्ले रायगड, निर्भीड लेख, बहुजनरत्न लोकनायक, महाराष्ट्र जनमत, वादळवारा, विश्वरूप यांसह साप्ताहिक उरण समाचार, एकात्मता, कुलाबा वैभव, कोकण कडा, जनमत, झुंजार मत, पनवेल टाईम्स, ब्रिगेडियर, महाड पोलादपूर टाईम्स, महाडचा आवाज, रसायनी टाईम्स, रायगडचा युवक, वतन कर्नाळा प्रकाशित होत आहे. रत्नागिरीमधून साप्ताहिक आकाशगंगा, गोळीबार, दर्यावृत्त प्रकाशित होत आहे. सिंधुदुर्गमधून दैनिक प्रहार (रत्नागिरी व मुंबई स्वतंत्र आवृत्ती) प्रकाशित होत आहे.

‘सामान्य नागरिकांच्या हिताचे रक्षण करणे’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर भारतीय प्रसारमाध्यमांचा वैचारिक प्रवास सुरु झाला होता. स्वातंत्र्यचळवळीत भारतीय जनमत तयार करण्यात प्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी प्रसारमाध्यमांपुढे असलेले हे ध्येय स्वातंत्र्य मिळताच नष्ट झाले. प्रसारमाध्यमांचे स्वरूप बदलून त्याचा व्यवसाय झाला. ‘अंतरजाल आणि समाजमाध्यम’ यांचा प्रभाव असलेल्या एकविसाव्या शतकात संपर्क क्षेत्रातील क्रांतीचा सहभाग महत्त्वाचा ठरल्याने प्रसारमाध्यमांचे स्वरूप अंतर्बाह्य बदलले. समाजमाध्यमांच्या आगमनामुळे लोकांसाठी माहितीचे अमर्याद स्रोत उपलब्ध झाले. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळाली. असंख्य स्रोतांतून वाहाणारा माहितीचा प्रवाह हे खरंतर लोकशाहीच्या सकसतेचे लक्षण होते. पण एकदम सर्वचजण मते मांडू लागल्याने समाजमाध्यमांत व्यक्त होण्याचा परिणाम समाजमनावर झाला. संपर्काचे हे नवे माध्यम आपल्या जगण्याचा भाग बनले. प्रसारमाध्यमांची विश्वासार्ह्यता आणि लोकप्रियतेसमोर तथ्यात्मक सादरीकरणाचे आव्हान उभे राहिले. इतके की एखाद्या घटनेसंदर्भात जनमत तयार करण्यासाठी चुकीच्या माहितीचा हेतुपुरस्सर प्रसार केला जाऊ लागला. आज राजकीय, आर्थिक आणि सामजिक मुद्द्यांवर खोट्या बातम्या पसरवणे चिंतनीय ठरले आहे. देशाची विविधता आणि बहुलता पाहाता एकात्मता टिकवून ठेवण्याची आणि लोकांची बौद्धिक पातळी वाढवण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर आहे. स्वातंत्र्यापूर्वी चळवळीत सहभागी प्रत्येकाची नाळ ही पत्रकारितेशी जुळलेली होती. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वतंत्र करणे किती महत्त्वाचे आहे? याचे प्रबोधन, लोकशिक्षण होत होते. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांच्या मनात स्वराज्यासाठी असलेली तळमळ आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना सुराज्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी असायला हवी. आजच्या प्रसारमाध्यमांपुढील ते सर्वात मोठे आव्हान आहे. 

 

धीरज वाटेकर चिपळूण

मो. ९८६०३६०९४८

ई-मेल :: dheerajwatekar@gmail.com    

 

उपयुक्त संदर्भ व माहिती स्त्रोत ::

०१.   कोकण : विविध दिशा आणि दर्शन – संपादन डॉ. लीला दीक्षित (२०११)

०२.   मासिक योजना जानेवारी २०२२

०३.   समुद्रमंथन : वि. स. खांडेकर – संपादक सुनीलकुमार लवटे

०४.   साप्ताहिक कोकण मिडिया (२६ मार्च २०२१)

०५.   भारतीय पत्रकारिता कोश खंड २ – विजयदत्त श्रीधर (हिंदी २००८)\

०६.   ८२व्या वर्षात प्रवेश करताना... प्रसाद केरकर (७ जून २०१८)

०७.   https://www.batmidar.in : प्रथम झाला सन्मान जिल्हा दैनिकांचा (६ सप्टेंबर २०१८)

०८.   सिंधुदुर्गच्या भूमीला पत्रकारितेचा अभिमानास्पद वारसा ! दैनिक प्रहार (६ जानेवारी २०१६)

०९.   दैनिक सागर - प्रवाह - पत्रकार संघटना – एक आठवण एन.एम. (१६ जानेवारी २०१०)

१०.   साप्ताहिक कोंकणी माणूस, रत्नागिरी (२-८ जानेवारी २०२२)

११.   अलिबाग नगर परिषद शतकोत्तर सुवर्णमहोत्सव स्मृतिग्रंथ (२०१४)

१२.   साप्ताहिक सत्यशोधक, रत्नागिरी ‘शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी विशेषांक’ (६ जानेवारी २०२२)

१३.   महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमे काल आणि आज :: डायमंड पब्लिकेशन्स (नोव्हेंबर २००९) 

१४.   http://kiratonline.in

१५.   History of Modern India with special reference to Maharashtra – UMESH KUDALE (APR 10, 2020) 

 

(तळटीप :: कृपया या लेखातील ऐतिहासिक नोंदी वाचताना जिज्ञासू वाचकांना संदर्भीय कमतरता, त्रुटी जाणवल्यास आपल्याकडील उपयुक्त नोंदी जरूर कळवाव्यात, ही विनंती.

शुक्रवार, ३ जून, २०२२

कोकणातील आपत्ती रोखायला हव्यात !



तांत्रिकदृष्ट्या निसर्गनिर्मितअशी नोंद असलेल्या आपत्तींचे अलिकडच्या काळातील सततच्या होणाऱ्या आगमनामुळे ह्या आपत्ती मानवनिर्मितअसल्याचे स्पष्ट झाले आहे. आपत्तीला मानवनिर्मित बनविणारी विकासप्रक्रिया कोकणवासियांनी नाकारायची आवश्यकता आहे. शासन कोणतेही असेना, त्यांना सर्वसामान्यांच्या भूमिकेचा विचार करावा लागत असल्याचे दाखले उपलब्ध असल्याने जल-जंगल-जमीन यांचा कोकणातील अमर्याद वापर थांबवून आपण आपल्या भविष्याला चांगले जीवन प्रदान करण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे आहे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल हरवल्याने कोकणची कोंडी झाली आहे. नैसर्गिक संपत्ती मुबलक असलेला आणि निसर्गाने भरभरुन दिलेल्या वरदानामुळे वेगळे आकर्षण ठरलेल्या कोकण प्रदेशाला आपत्तींचे ग्रहण लागलेले आहे. कोकणातील आपत्ती रोखणारी पर्यावरणपूरक भूमिका घेणे, त्यादृष्टीने कार्यरत होणे, आपल्या भूमिकेच्या बाजूने शासकीय यंत्रणेचे सहकार्य मिळवणे, सातत्याने त्याचा आढावा घेणे हेच काम इथून पुढच्या प्रत्येक जागतिक पर्यावरण दिनाला कोकणवासियांनी करायला हवे आहे.

कोकणवासियांनी जमिनी विकण्यासह पर्यटन विकास म्हणून केलेली रिसॉर्टसह सर्व प्रकारची स्थापत्यकामे अधिकाधिक पर्यावरण स्नेही कशी होतील याकडे लक्ष द्यायला हवे आहे. कोकणातल्या वर्तमान आपत्ती बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम आहे. कोकणात होणाऱ्या वृक्षतोडीत सरकारी जमिनीपेक्षा खाजगी जमीन अधिक आहे. कोकणात उन्हाळ्यात लावले जाणारे वणवे, जंगलांना लावण्यात येणाऱ्या आगी, कोकणाची वाढती लोकसंख्या, वाहने, औद्योगिकरण, कचरा, प्लास्टिक पिशव्या, गाळाने भरलेल्या नद्या, धरणे, तलाव आदी प्रकारच्या निसर्गाच्या छेडछाडीमुळे आपत्ती वाढल्या आहेत. हवामान बदलाचे दुष्परिणाम आज देशभर भोगावे लागताहेत, त्यात कोकणही मागे नाही. भविष्यात याचे परिणाम पर्यटनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोकणात महापूराच्या पातळीने आधीचे विक्रम मोडीत काढले आहेत. कोकण आणि त्याला जोडलेला पश्चिम घाटातील सह्याद्रीचा परिसर हा पारंपारिक प्रचंड पावसाचा प्रदेश आहे. त्याच्या पूर्व-पश्चिम वहन मार्गातील वनश्री संपुष्टात ल्याने तो जमिनीत झिरपता थेट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे धावत सुटतो आहे. कोकण भूमीत २००५ सालचा महापूर, २००९ सालचे फयान चक्रीवादळ, २०२० सालचे निसर्ग चक्रीवादळ, २०२१ चे तोक्ते चक्रीवादळ २००५ च्या महापुरातील उंचीचे सारे रेकॉर्ड ब्रेक करणारा जुलै २०२१चा महापूर आणि त्याच्या जोडीला सह्याद्रीत कधी नव्हे इतक्या घडणाऱ्या भू-सख्खलनाच्या घटना धक्कादायक आहेत.

 

मागील वर्षी कोकणात २२ ते २३ जुलै २०२१च्या दरम्यानही खूप मोठा पाऊस पडला. कोकणातील नद्यांना पूर येण्यात नाविन्य नाही. पण महापूराचा विचार आणि उपाययोजना करताना आम्हाला नदीची व्यवस्था नीट समजून घ्यावी लागेल. ती समजून घेतल्यानंतर त्याद्वारे येणारे निष्कर्ष जमिनीवर उतरविणाऱ्या सर्व संबंधितांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण द्यावे लागेल. कारण सध्याच्या यंत्र युगातील अमानवीयकामे निसर्गाच्या मुळावर उठलीत. हे आपल्याला मुंबई-गोवा महामार्गाच्या निर्मितीसाठी फोडलेल्या घाट-डोंगरांची सध्याची अवस्था पाहिली असता लक्षात येईल. कोकणातील नद्यांचे पात्र पावसाळ्यात फुगते. आजूबाजूला गाळाचे मैदान तयार होते हे माहिती असताना आम्ही नद्यांची रुंदी का कमी केलीय?’ हे अनाकलनीय आहे. नद्यांचा गाळ काढायचा आहे?’ हे आम्हा सर्वांना फक्त पावसाळा जवळ आला कीच का बरे आठवते? या प्रश्नांची तीव्रता यंदा कमी झाली.  यंदा महापूरग्रस्त शहरातून वाहणाऱ्या नद्यांचे गाळ काही प्रमाणात का होईना काढले गेलेत. तरीही नदीच्या नैसर्गिक स्वभावाच्या विरोधातील आमची मानसिकता महापूरांचे प्रमुख कारण आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची व्यवस्था आम्ही मोडून काढली आहे. दरडी का कोसळताहेत?’ कोकणातील बहुतांश दरडी या डोंगराळ भागात आणि मुसळधार पावसाळ्याच्या दिवसात कोसळतात. नको असलेले मोठाले झाड थेट तोडता येत नसेल तर त्याच्या बुंध्यात आग लावण्याची अघोरी प्रथा आम्ही आजही जोपासून आहोत. तसेच अवैज्ञानिक पद्धतीने आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी डोंगररचना अस्थिर करतो आहोत, म्हणून हे सारे घडते आहे. पूर्वी ही प्रक्रिया अतिशय संथ असायची. आताच्या विकासाच्या यंत्र युगात हा वेग वाढल्याने आपत्ती वाढल्या आहेत. हे चक्र थांबवणे, त्याची तीव्रता कमी करणे आमच्या हातात आहे. डोंगराचा विध्वंस थांबविला नाही तर पुढील काळात मोठ्या दुर्घटना घडतीलअशी स्पष्ट भूमिका ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ (सर) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मांडत आलेत. आम्ही याचा विचार करायला हवा आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला अतिवृष्टी आणि महापूराचा तडाखा बसला की हजारो कोटींची हानी होते. डांबरामध्ये ऑईलची अधिक भेसळ असलेले कित्येक रस्ते जमिनीतून उखडले जातात. रस्ते खचतात. पूल वाहून जातात. वीजेचे खांब कोसळतात, वाकतात. वीज पुरवठा खंडित होतो. पाणी पुरवठा योजना बंद पडतात, खराब होतात. दरडी कोसळतात. गावागावांचे संपर्क तुटतात. लोकांच्या शेतीचे, घरांचे नुकसान होते. अनेकांना स्थलांतरित व्हावे लागते. पाळीव पशूंचा जीव जातो. अशा काळात निकषाप्रमाणे शासकीय आणि स्वयंसेवी संस्थांची मदतही मिळते. शासन काही भूमिकाही ठरवते, त्या कार्यान्वित व्हायला हव्यात. २०२१ च्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवरही सरकारने दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार सुरु केल्याचे मासिक लोकराज्य ऑगस्ट २०२१ वर नजर फिरवली असता लक्षात येते. कोकणातील आपत्ती आणि निसर्गहानी विषयासंदर्भातील आजवरच्या साऱ्या अहवालांचे एकत्रीकरण करून त्यातून तज्ज्ञांच्या साहाय्याने परिणामकारक उपाययोजना निश्चित करणे, महाड आणि चिपळूण मधील महापूर नियंत्रणासाठी तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार वाशिष्ठी, गांधारी, सावित्रीनदीतील गाळ व कचरा काढणे, मॉडेल स्टडीच्या आधारे पूर संरक्षण भिंत उभारणे, डोंगर कोसळण्याच्या घटना आणि कोयना अवजलाच्या वापराचा मुंबई लिंक प्रकल्पासाठी निर्णय घेणे, कोकणच्या २६ नदी खोऱ्यात पूर इशारा देणारी आरटीडीएस प्रणाली निर्माण करणे, आपत्कालीन बचाव यंत्रणा उभी करणे आदी मुद्द्यांचा समावेश आहे. ही कामे व्हायला हवी आहेत. जुलै २०२१ च्या चिपळूण महापुराचा विचार करताना येथील ज्येष्ठ जलतज्ज्ञ आणि आंबा उत्पादनाशी निगडीत डिफ्युझर तंत्रज्ञानाचे जनक विजय जोगळेकर यांची सह्याद्रीत लहानमोठी धरणे बांधून पावसाचे पाणी अडवण्याबाबत मांडलेली भूमिका अधिक रास्त आहे. तिच्यानुसार दीर्घकालीन उपाययोजना व्हायला हव्यात. चिपळूणचे पाणलोट क्षेत्र हे दक्षिणेकडे कुंभार्ली घाटमाथा ते उत्तरेकडे श्रीक्षेत्र नागेश्वर-वासोटा किल्ला आणि पश्चिमेच्या बाजूला वाशिष्ठी नदीच्या खाडी किनारी चिपळूण शहर असे विस्तारलेले आहे. या सर्व क्षेत्रातील पावसाचा एकत्रित परिणाम म्हणून चिपळूणला महापूर येत असतो. चिपळूणच्या पूर्वेकडील चिपळूण ते सह्याद्री या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या ६/७ उपनद्यांमध्ये योग्य ठिकाणी 'नियंत्रित जलनिस्सारणतत्वाप्रमाणे लहानमोठी धरणे बांधून पाणी अडवून ठेवले तर चिपळूणला येणाऱ्या महापूराची तीव्रता कमी होईल. दुसऱ्या राज्य सिंचन आयोगाने धरण क्षमता वाशिष्ठी खोऱ्यात प्रस्तावित केलेली आहे. या प्रस्तावित धरणक्षेत्रात मानवी वस्ती फारशी नसल्याने तेथे विस्थापितांचाही प्रश्न नाही आहे. धरणे ही निसर्ग आणि पर्यावरणाला पूरक नाहीत हे सत्य असले तरी बिघडलेल्या पर्यावरणीय वातावरणात कोकणातील महापूरासारख्या आपत्ती रोखण्यासाठी सह्याद्रीत लहान-मोठी धरणेहाच पर्याय अधिक संयुक्तिक वाटतो आहे. कोकणात महापूर येणाऱ्या इतर शहरातही हाच उपाय संयुक्तिक ठरू शकतो.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कोकणासह सगळीकडे कोस्टल रेग्युलेटरी झोनचे नियम डावलून सुरु असलेला विकास पुढच्या दहा-वीस वर्षांत जमीनदोस्त होण्याचा धोका तज्ज्ञ वर्तवत आहेत. जिथे नद्या, ओढे समुद्राला मिळतात तिथल्या चिखलाट जमिनीत फोफावणारी खारफुटीची जंगलं समुद्राच्या लाटांचा हल्ला पेलतात. ती टिकवायला हवीत. कोकणात काही समुद्रकिनारे खडकाळ आहेत, काही रेतीच्या पुळणीचे आहेत. खारफुटी नसलेल्या काही किनाऱ्यांवर ब्रिटिशपूर्व काळात स्थानिकांनी उंडीच्या झाडांची एक तटबंदी उभारलेली होती. हा साठ फुटांपर्यंत उंच होणारा वृक्ष डोलकाठीसाठी खास उपयोगात यायचा. पुढे इंग्रजांनी कब्जा केल्यावर किनाऱ्याजवळची ही तटबंदी आरमारासाठी त्यांनी तोडून टाकली. अशी नोंद आपल्या एका लेखात डॉ. गाडगीळ सरांनी केलेली आहे. म्हणून आपण पुन्हा खारफुटी वाढवली पाहिजे. उंडीच्या झाडांची तटबंदी उभारली पाहिजे. त्सुनामी, वादळ, महापूर काळात पाण्याचा लोंढा रोखून आजूबाजूच्या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खारफुटीची मदत होते. लाटा आणि वाऱ्यांची तीव्रता खारफुटीची भिंत कमी करते. किनाऱ्यांची धूप कमी होते. निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळांत कोकण किनारपट्टीवरील अनेक नागरिकांनी खारफुटीमुळे तडाखा कमी बसल्याचे स्पष्ट केले आहे. खारफुटीची जंगले देखणी वाटत नसली तरी परिसंस्थेमध्ये त्यांचे महत्त्व मोठे आहे. कोकणातील समुद्रकिनारे आम्हाला वाऱ्यापासून संरक्षित करावे लागणार आहेत. यासाठी जास्तीत जास्त किनाऱ्यांवर सुरू, केतकी/केवडा यांची लागवड करावी लागेल. दापोली तालुक्यातील आडे-आंजर्ले-पाडले आदी भागात केवड्यांचे बन आम्ही नष्ट करत चाललो आहोत. कोकणात आपत्ती रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी निसर्गाच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरु व्हायला हवी आहे.

कोकणच्या निसर्ग संपदेला, पर्यावरणाला बाधक ठरणारे प्रकल्प येऊ नयेत अशी मागणी पर्यावरण तज्ज्ञ सातत्याने करत आहेत. विकास म्हणून दळणवळणाची साधने, चौपदरी रस्ते, खेड्यापाड्यांपर्यंत जोडणाऱ्या रस्त्यांचे डांबरीकरण हे सारे आवश्यक आहे. पण तरीही आधुनिक शिक्षण आणि अत्याधुनिक वैद्यकीय सोयी वगळता कोकणात गाव आणि शहरे यातील फरक शिल्लक असायला हवा. प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. उमेश मुन्डल्ये यांच्या मतानुसार,आपल्याला कोकणासह देशभरात स्थलानुरूप उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. जलसंधारणाची कामं स्थलानुरूप (site specific) असणं आवश्यक आहे. शेजारच्या दोन गावांमध्ये कदाचित वेगळे उपाय करणं योग्य असू शकेल. त्यामुळे सरसकट सर्वत्र एकाच प्रकारचं काम न करता, लोकसंख्या, पाणी साठवण्याची क्षमता, नदीच्या पात्राची रुंदी, खोली, आजूबाजूच्या परिसरातील शेतजमिनी आणि वस्त्यांचं प्रमाण इत्यादी बाबींचा अभ्यास करून मग कामं केली, तर कोणाचंच नुकसान न होता सर्वांचा फायदा होऊ शकतो.ब्रिटिशांनी कब्जा करताच भारताचं वर्णन वृक्षांचा महासागरअसं केलं होतं. ही वृक्षराजी ग्रामसमाजांनी, आदिवासी समाजांनी सांभाळली होती. जिंकलेला देश लुटण्यासाठी ब्रिटिशांनी या समाजसंघटना मोडून, वनसंपत्ती सरकारच्या ताब्यात घेऊन आदिवासी आणि स्थानिकांना दुर्दशेच्या खाईत लोटलं. स्वतंत्र भारत स्वावलंबी गावांचं गणराज्य बनेल,’ असं स्वप्न महात्मा गांधीजींनी पाहिलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळताच हे व्हायला हवं होतं. परंतु आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाचं काय चित्र दिसतं? आपण सर्वांनी मिळून भारतातील वृक्षांचा महासागर संपवला आहे. आपत्ती त्याचा परिणाम आहे. कोकणात घाटमाथ्यावर अति प्रचंड पडतो. तरीही कोकणात अनेक भागात जानेवारीत पाण्याची टंचाई भासते. आम्ही पावसाचे पाणी जमिनीत जिरवायला कमी पडतो आहोत.

 

इंडियन ब्युरो ऑफ माईन्सचे महासंचालक राहिलेल्या देवकीनंदन भार्गव यांनी आपल्या एका लेखात यापुढे खनिजोत्पादन स्थानिक समाजांच्या सहकारी संस्थांकडे सोपवणे उचित आहे, त्या संस्था परिसराला सांभाळत, आज जशी चाललेली आहे तशी ओढ्या-नद्यांची नासाडी न करत, अवाजवी यांत्रिकीकरणाच्या फंदात न पडता, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्माण करत खनिज व्यवसाय सांभाळतील,’ असे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विचार करता, रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याच्या घटना खूप होऊ लागल्याचे दिसते. रायगड जिल्ह्यातील तळीये गाव मलब्याखाली गाडले गेले. तळीयेसह रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे ही याची अलिकडची उदाहरणे आहेत. जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सिंधुदुर्गातल्या दोडामार्ग येथे कळणे गावात लोहखनिजासाठी खाणकाम सुरू असलेल्या भागात अतिवृष्टीमुळे खाणीच्या वरच्या बाजूला असेला उभा कडा ढासळला आणि त्यात साचलेल्या पाण्यासकट हा सगळा मलबा खाणीच्या खालच्या बाजूला असलेल्या गावात घुसला. खरंतर १९६७ च्या भूकंपापासून सह्याद्रीचा कोकणातील पट्टा भूस्स्खलनाला पूरक ठरू लागला असावा. एका आकडेवारीनुसार १९८३ साली रत्नागिरी जिल्ह्यात ५६ ठिकाणी लहानमोठ्या दरडी कोसळून २३ व्यक्ती मरण पावल्या होत्या. २००५ साली महाड तालुक्यात १७ ठिकाणी दरडी कोसळून कोडविते, दासगाव, रोहन, जुई येथील १९७ व्यक्ती मरण पावल्या होत्या. चिपळूण नजीकच्या परशुराम घाटाखालील पेढे गावातील कुंभारवाडीवर घसरून चार लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असलेली दरड सक्षम मनुष्यबळाच्या अभावाचे कारण ठरावी. हे थांबवण्यासाठी आपण कोकणच्या पर्यावरणाकडे आत्मियतेने पाहायला हवे आहे.

सन १९५० नंतर, कोयना धरणाच्या निर्मितीपासून चिपळूणात औद्योगीकरणाचे वारे वाहू लागले. सध्याच्या परिस्थितीला आम्ही सारे कोकणी दोषी आहोत. पूर्वी कोकणात कोणत्याही घाटातून उतरलं की अल्याड आणि पल्याड डोंगर हिरवेगार डोंगर दिसायचे. आज ते उघडे बोडके होऊन त्यांचे कडे कोसळू लागलेत. हल्ली कोकणात १५ ते २० दिवसात कोसळणारा पाऊस हा ढगफुटी सदृश होऊन एकाच दिवसात कोसळण्यामागे आणि चक्रीवादळाचं प्रमाण वाढण्यामागे वातावरणातील बदल हे महत्वाचे कारण जवळपास पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करताहेत. देशात घरोघरी सोलर प्रकल्प उभारायला हवेत. आपल्याकडे उन्हाळा सर्वाधिक असल्याने ते अवघड नाही. कोकणाबाबत, ‘मी एकट्याने करून काय होणार आहे?’ असा नकारार्थी विचार न करता, ‘मी केले तर निश्चित होणार आहे,’ हा सकारात्मक द़ृष्टिकोन ठेवून आपल्याला कार्यरत व्हावे लागेल. कोकणच्या पश्चिमेकडील रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या अंबा घाटातून संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे वाहणारी काजळीनदी पावसाळ्यात महापूर घेऊन येत असते. २०२१ मध्ये हे घडले नाही. कोकणातील साखरपा गाव पुरापासून वाचलेअशा बातम्या माध्यमात झळकल्या. याला कारण नॅचरल सोल्युशन्स आणि नाम फाऊंडेशन या संस्थांच्या सहकार्याने गावकऱ्यांनी केलेली नदीतील गाळमुक्ती. काजळीनदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आलं. स्थलानुरूप उपाययोजना कोकणात प्रभावी ठरत असल्याने साखरप्यातील उपचार सर्वत्र लागू होईल असे नाही. मात्र आपत्तींवर उपचार होऊ शकत नाही असे अजिबात नाही. म्हणून मी केले तर निश्चित होणार आहे,’ हा विचार कोकणात अंगिकारला जायला हवा आहे.

महाराष्ट्र शासन, वनविभाग आणि सामाजिक वनीकरण यांनी आपल्या वृक्ष लागवड आणि रोपे निर्मिती कार्यक्रमातून विदेशी वृक्ष प्रजातींना वगळावे. वृक्षारोपणामध्ये केवळ स्थानिक वृक्ष प्रजातींना प्राधान्य द्यावे याबाबतचा धोरणात्मक निर्णय व्हावा यासाठी कोकणातील चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी महसूल व वन, पर्यावरण, सामाजिक वनीकरण,रोजगार हमी योजना आदी मंत्रालयांकडे पत्रव्यवहार केला आहे. सर्वसामान्यपणे रस्त्यांच्या सुशोभिकरणासाठी विदेशी वृक्ष प्रजातींपैकी गुलमोहर, निलमोहर, प्लटोफोरम, कॅशिया, रेन्ट्री, काशीद, ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, मॅन्जीयम आदी झाडांची मुळे खोलवर जात नाहीत. या झाडांच्या फांदया, खोडाचे लाकूड ठिसूळ असते. अशी झाडे वादळत तग धरू शकत नाहीत. स्थानिक वृक्ष प्रजातींची वाढ मर्यादशीर असूनही मुळे खोलवर जातात. त्यांचे लाकूड चिवट आणि कठीण असते. ही झाडे वादळात सहसा पडत नाहीत. २०२१ मध्ये आलेल्या तौक्ते चक्रीवादळात मुबंई शहरात जे मोठे वृक्ष आणि त्यांच्या फ़ांद्या कोसळून अपिरमित हानी झाली त्यात ७० टक्के विदेशी प्रजातीचे वृक्ष (ऑस्ट्रेलियन ऑकेशिया) होते असे मुबंई महानगरपालिकेचे निरीक्षण आहे. पालिकेनेही यापुढे मुबंई शहरात आणि परिसरात विदेशी वृक्ष प्रजाती न लावण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्तींचा विचार करता शासनानेही हा निर्णय घेणे सार्वजनिक हिताचे आहे. नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत. पण अलिकडची पर्यावरणीय संकटे अधिक मानवनिर्मित आहेत. क्लायमेट चेंजचे परिणाम आपण प्रत्यक्षात अनुभवतो आहोत. या पुढे असे पूर-महापूर वारंवार येत राहणार आहेत. त्यामुळे त्याचे परिणाम कसे कमीतकमी करता येतील, आपत्ती कशा रोखता येतील याकडे आपण लक्ष द्यायला हवे. अशा काळात महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये एकमेकांत समन्वय नसल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतात, हे बदलावे लागेल. कोकणसह महाराष्ट्र राज्याला दुष्काळ, महापूर आणि जंगलात लागणाऱ्या आगी वादळे या महत्त्वाच्या आपत्तींना सामोरे जावे लागते. महापूर, चक्रीवादळ आणि भूस्खलन अशा तिहेरी अस्मानी संकटांच्या कोंडीत कोकण सापडले असताना ‘हवामान बदल या जागतिक स्तरावरील व्यापक कारणाकडे बोट दाखवून आपल्याला स्वस्थ बसता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती हा टाळता न येण्यासारखा प्रकार असला तरी आजच्या आधुनिक शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या युगात या आपत्तींना सामोरं जाताना पूर्वीची हतबलता का येत असावी? असा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणून आपत्तीमुळे कमीत कमी वित्तहानी होईल आणि जीवितहानी होणार नाही या दृष्टीनं नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी आपली पाऊले पडायला हवीत.

निसर्गचक्रीवादळानं गुहागर, दापोली आणि मंडणगड सह रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातला. निसर्ग काय किंवा तौक्ते वा २००९चं फयान याजीवितहानी झाली नाही, हे सत्य आहे. अर्थात या तिन्ही वादळांची आंध्रप्रदेश-ओडिशाच्या किनाऱ्यांवर धडकणाऱ्या चक्रीवादळांच्या तीव्रतेशी तुलना केली तर यातलं गणित लक्षात येईल. या वादळांचा सामना करण्यासाठी कोकणात विशेष पूर्वतयारी असायला हवी आहे. पावसाळ्यात पूर येणं हे कोकणच्या निसर्गजीवनाचं अविभाज्य अंग आहे. एखाद्या वर्षी धो धो पाऊस पडून नदी-नाले दुथडी भरून वाहिले नाहीत, त्यांच्या किनाऱ्यांवरच्या घर-बाजारात किंवा शेतांमध्ये पुराचं पाणी खेळून गेलं नाही तर कोकणात पावसाळा साजरा होत नाही. पण कधीकधी हा विध्वंस महागात पडतो. पर्यावरण संवर्धनासाठी आम्ही आपणहून गावागावातून संपूर्ण कुऱ्हाड बंदी, वणवे न लागणे, मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग साकारताना दुतर्फा नव्याने वृक्ष लागवड चळवळ, असे मुद्दे घेऊन कार्यरत व्हायला हवे आहे. चिपळूणात एकच देऊ नारा संपवू वणवा साराहे ब्रीद डोळ्यासमोर ठेवून अखंड कोकण वणवामुक्त व्हावं म्हणून गेल्या दोनेक वर्षांपासून वणवा मुक्त कोंकणकार्यरत झाली आहे. सह्याद्री निसर्ग मित्रसंस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या टीमला या काळात आलेले सर्वांगीण अनुभव पाहाता वणवा लागणारच नाही यासाठी समाज म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहाणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. वणवा न लावता, न लावू देता सामाजिक स्तरावर वणवा जाळण्याऐवजी वणवा लावणारी प्रवृत्ती जळून जाण्याची आवश्यकता आहे. कायद्याने गुन्हा असलेली वणवा लावण्याची प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी सध्याच्या जंगलातील वणव्यांच्या ऋतू हंगामात जनजागृतीची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. 

 

कोकणच्या लाल मातीत कार्यरत हाताला रोजगाराच्या विविधांगी संधी उपलब्ध करून देण्याची अमर्याद क्षमता असलेला, मागील तीन दशकात हळूहळू सर्वदूर विस्तारत असलेला पर्यटनउद्योग अधिकाधिक हरितअसायला हवा आहे. अर्थात पर्यटनातून येणारा पैसा औद्योगिकरणातून येतो !हे जरी खरं असलं तरी कोकणाभूमिपुत्रांना आत्मनिर्भर बनविणारं, पर्यावरण जपणारं पर्यटन हवंय’, ही भूमिका असायला हवी आहे. पर्यटनाच्या नावाने चैन, चंगळवाद, एका विशिष्ठ मर्यादेबाहेरील मौजमस्तीस कोकणी माणसाने विरोध करायला हवा आहे. प्रकृती दर्शन आणि निसर्ग निरीक्षणहेच कोकण पर्यटनाचे मुख्य अंग असायला हवे आहे. यापुढे जाऊन कोकणात ‘पर्यावरण पर्यटन संकल्पनेला अधिक बळ द्यायला हवे आहे. म्हणजे नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, पर्यावरणाचे संरक्षण, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृती शिकण्याच्या उद्देशाने नैसर्गिक भागाकडे प्रवास करणारे लोक असा कोकण पर्यटनाचा अर्थ शिकविला जाण्याची गरज आहे. कोकणात पर्यावरण आणि पर्यटन एकत्र चालायला हवे आहे. संपूर्ण कोकणासाठी आम्ही कोकणी लोकांनी एकत्र यायला हवे आहे.

सह्याद्रीच्या मुख्य धारेपासून स्वतंत्र असलेली कोकणभूमी म्हणजे निसर्गाचे वरदान लाभलेला प्रदेश. अशी नैसर्गिक संपन्नता क्वचितच कोणत्या प्रदेशाला मिळाली असेल. मात्र बदलत्या निसर्गचक्रामुळे कोकणातल्या लोकांना निर्धास्त जगणे अवघड होईल की काय? अशी स्थिती येऊन ठेपली आहे. यावर उपाययोजना शासनाने कराव्यात म्हणून कोकणवासियांनी तशा मागण्या नोंदवायला हव्या आहेत. स्वतंत्र भारतात १९५० पासून वृक्षारोपणाचे सोहोळे सुरु आहेत. १९७६ च्या एका वृत्तात राज्यातील एका मंत्र्यांनी म्हटले होते, ‘मागील दोन पिढ्यांनी वृक्षांची तोड करण्यापलिकडे दुसरे कोणते कार्य केलेले नाही. ज्या पद्धतीने वृक्ष संवर्धन व्हावयास हवे तसे ते झाले नाही. वृक्षजोपासना व जंगलवाढ करणे हे एकट्या शासनाचे काम नाही. त्यासाठी समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे.’ सरकारी वृक्षारोपण चळवळीस समाजाची साथ मिळालेली नाही. हीच अनास्था आज कोकणच्या पर्यावरणाच्या मुळावर उठली आहे. आगामी काळात कोकण भूमीचा विचार करताना आम्हाला संकुचित विचारातून बाहेर येत सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या पर्यावरणीय उपक्रमांना आमच्या सार्वजनिक जीवनात प्राधान्यक्रम द्यावा लागेल. कोकणच्या पर्यावरणाला धक्का लावणाऱ्या प्रत्येक मुद्याबाबत आम्हाला सामुहिक भूमिका ठरवावी लागेल. कोकणातील आमच्या आजूबाजूच्या पर्यावरणीय समस्या समजून घेऊन त्यावरील उपाययोजना सांगणारी, दैनंदिन भौतिक सुविधा कमी करणारी इकोजीवनपध्दती अंगीकारावी लागेल. कोकणच्या स्वर्गीय सौंदर्याला लागलेले आपत्तींचे ग्रहण थोपविण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

 

धीरज वाटेकर, चिपळूण.

dheerajwatekar@gmail.com

नदीसोबतचे नाते घट्ट व्हायला हवे!

  जागतिक नदी दिन विशेष यंदाच्या जागतिक जलदिनी (२२ मार्च) कोकणात प्रथमच गुहागर तालुक्यातील परचुरी बंदर येथे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मो...