तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात दोन दिवस मुक्कामी होतो तेव्हाची घटना. त्या दोन दिवसात मलबार राखी धनेशाची (मलबार ग्रे हॉर्नबिल - Ocyceros griseus) भेट झालेली. खरंतर कोकणातील जंगलमय भागात फिरताना अनेकदा त्याचे दर्शन झाले होते. पण निवांत भेट झालेली नव्हती. दोडामार्ग तालुक्यातील एका गावात नदी किनाऱ्यावरील आपली बागायत सांभाळणाऱ्या मित्राकडील नंदनवनात ती झाली. मलबार राखी धनेशाने या बागेतील एका रातांब्याच्या (कोकम) झाडावरील ढोलीत आपला संसार फुलविला होता. आपसूकच त्याचे तिथे वारंवार येणे-जाणे सुरु झालेले. त्यामुळे आम्हालाही त्या दोन दिवसात त्याला निवांत भेटण्याची आणि निरीक्षण करण्याची संधी मिळाली. ते दोन दिवस मलबार राखी धनेशाच्या सान्निद्ध्यात घालवताना यापूर्वी त्याच्याविषयी वाचलेलं, पक्षी अभ्यासकांकडून ऐकलेलं आम्हाला अनुभवता आलं.
यावर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तळकोकणात अवकाळी पावसाचे आगमन झाले. त्यावेळी आम्ही कुटुंबासह दोडामार्ग तालुक्यात होतो. ज्या गावी मुक्कामी होतो तिथे गाव हद्दीतून वाहणाऱ्या धबधब्याचा प्रवाह बागायतीजवळून वाहात होता. दोडामार्ग तालुक्यात कोकणातील थोडेफार शब्दशः ‘जंगल’ म्हणावे असे क्षेत्र शिल्लक आहे. याच क्षेत्रात जागतिक अमूल्य जैवविविधता नांदते आहे. तिचे नीटसे मार्केटिंग केले तर हीच जैवविविधता इथल्या स्थानिकांना पर्यटनाच्या माध्यमातून भक्कम रोजगाराच्या संधी मिळवून देऊ शकते. त्यामुळे या भागात मुक्कामी असल्यावर काहीतरी छानसे पाहायला मिळणार आणि इथला मुक्काम संस्मरणीय होणार याची जाणीव होतीच. ती खरी ठरली. म्हणून कोकणातील दोडामार्ग तालुका हा जलद शहरणीकरणापासून दूर ठेवण्याची नितांत आवश्यकता वाटते आहे. हॉर्नबिल हा उष्ण कटिबंधीय प्रदेशातील मोठ्या जंगली पक्ष्यांचा समूह आहे. हॉर्नबिलच्या जगातील ५४ प्रजातींपैकी नऊ भारतात आढळतात. त्याच्या बहुतेक प्रजातींमध्ये मोठ्या वक्र चोची असतात. मलबार ग्रे हॉर्नबिल हा एक सुंदर आणि आकर्षक पक्षी आहे. ही हॉर्नबिल मधील सर्वात लहान प्रजाती आहे. तो पश्चिम घाट आणि दक्षिण भारतातील स्थानिक आहे. भारतातील सह्याद्रीच्या पश्चिम घाट पर्वतरांगांच्या वर्षावनांमध्ये महाराष्ट्रातील नाशिकपासून दक्षिणेकडील टेकड्यांपर्यंत आणि ओलसर पानझडीच्या जंगलांमध्ये त्याचे वास्तव्य आढळते. बहुतेकदा घरगुती बागांमध्येही आढळतो. मलबार राखी धनेशाची मोठी चमकदार नारिंगी चोच, सोनेरी तपकिरी बुबुळ असते. मादीची चोच तुलनेने लहान, फिकट रंगाची आणि तिचे बुबुळ गडद तपकिरी असते.
हा सर्वभक्षी पक्षी आहे. तो स्वतःचे घरटे (ढोली) खोदत नाही. मोठ्या झाडांमध्ये आधीच अस्तित्वात असलेल्या पोकळींचा वापर करतो. यांचा प्रजनन हंगाम सामान्यतः फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो. पाहाणी पूर्ण झाल्यावर मादी पक्षी पोकळीत शिरते. ती तिच्या चोचीने घरट्याचे प्रवेशद्वार दुरुस्त करते. नराने पुरविलेल्या फळांचा गर, स्वतःची विष्ठा आणि लाळ मिसळून ती पोकळीचे प्रवेशद्वार जवळपास बंद करते. मादी या पोकळीला नैसर्गिक सामग्रीद्वारे अधिक सुरक्षित आणि आरामदायक बनवते. आता प्रवेशद्वार केवळ अरुंद, उभ्या स्लिटसारखे उघडे असते. याच उघड्या प्रवेशद्वारातून नर तिला खायला घालतो. मादीचा पोकळीच्या घरट्यातील प्रजनन कालखंड सुमारे तीन महिने चालतो. हा पक्षी नदी/ओढ्याकाठच्या अधिवासात घरटे करण्यावर अधिक भर देतो. म्हणून नदीकाठच्या अधिवासाचे संरक्षण करण्यावर भर दिला पाहिजे. यांच्या घरट्यांच्या पोकळ्या सामान्यतः मोठ्या खोडांच्या झाडांवर जमिनीपासून ९ ते १८ मीटर उंचीवर आढळतात. भक्षक आत चढू नयेत म्हणून घरटे जास्त उंचीवर असतात. त्यांचा घरट्यातील एकूण प्रजनन कालावधी सरासरी ८६ दिवसांचा असतो. अंड्यांचा उष्मायन कालावधी सुमारे ४० दिवसांचा तर नवजात अर्भकांचा घरट्यातून बाहेर येण्याचा कालावधी ४६ दिवसांचा असतो. पिल्ले मोठी झाल्यावर घरटे सोडून बाहेर पडतात. स्वतःचे जीवन जगण्यास सुरुवात करतात. सर्वसाधारणपणे मादी चार अंडी घालते. सीलबंद प्रवेशद्वार तोडून कधी मादी सुरुवातीला तर कधी मादी आणि पिल्ले (स्क्वॅब) घरट्यांमधून एकाचवेळी बाहेर पडल्याच्या नोंदी आहेत.
हा एकपत्नी पक्षी वर्षानुवर्षे घरट्यांवरील एकनिष्ठता दाखवतो. हॉर्नबिलच्या प्रजनन वर्तनाचे एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी पारंपारिकपणे वापरल्या जाणाऱ्या घरट्यांच्या पोकळीत परतणे होय. आम्ही भेट दिलेल्या घरट्याबाबतचा पूर्व तपशील मात्र आम्हाला मिळू शकला नाही. घरट्याच्याच झाडावर बसून हॉर्नबिल जोडप्याची वीण झाल्याच्याही नोंदी आहेत. हॉर्नबिल घरट्यांच्या पोकळ्यांसाठी आपापसात स्पर्धा करतात. घरटे शोधताना एका जोडीला दुसऱ्या जोडीचा पाठलाग करतानाही आपण पाहू शकतो. अन्नाच्या गरजेसाठी मादी या काळात आपल्या जोडीदारावर पूर्णपणे विश्वास ठेवते. नर दररोज अन्न गोळा करण्यासाठी आवश्यक प्रवास करतो आणि मादीला झालेले अन्न पुरवतो. एकाचवेळी त्याला स्वत:सह मादी आणि पिल्ले यांना खाद्य आणावे लागत असल्याने निसर्गाने त्याच्या मानेच्या खाली विशिष्ठ पिशवी दिलेली आहे. यात तो फळं भरतो. घरट्याजवळ आल्यानंतर तो मानेला विशिष्ट झटका देतो. त्यामुळे पिशवीतील फळे वर चोचीत येतात. आम्ही पाहिलेल्या नराच्या मानेखालच्या पिशवीत फळे तर होतीच पण तोंडात छोटासा कीटकही होता. दिवस उगवल्यापासून ते मावळेपर्यंत दिवसभरात नर धनेश पक्षाला जंगल ते आपले घरटे अशा फेऱ्या माराव्या लागतात. आवश्यकतेनुसार वेळोवेळी घरट्याची स्वच्छताही पाहावी लागते. घरट्यातील विष्ठा व कचरा त्याच झाडाखाली पडू न देण्याची खबरदारी घ्यावी लागते. घरटं असलेल्या झाडाखाली, बुंध्याशी विष्ठा, कचरा पडला तर साप, मांजर व इतर शत्रूंना सुगावा लागू शकतो. क्वचित प्रसंगी बाहेर पडलेल्या नर धनेशाचे काही बरे वाईट झाले, तर एक-दोन दिवस वाट पाहून मादी घरट्यातून बाहेर पडते. खाद्यपदार्थ गोळा करून आपल्या पिलांना जगवते. हॉर्नबिलच्या या साऱ्या प्रजनन सवयी अद्वितीय, इतर पक्ष्यांपासून वेगळ्या आहेत. त्याची एकनिष्ठ जीवनशैली आणि त्यासाठीच्या खडतर परिश्रमातील सातत्य मानवाला प्रेरणादायी आहे.
फायकस कुळातील वड, पिंपळ, उंबर या झाडांची फळे या पक्षांना फार आवडतात. फिकस झाडे (नांदरूख) आणि फिशटेल पामची (भेरलीमाड) फळेही सामान्यतः प्रजनन आणि प्रजनन नसलेल्या हंगामातही हॉर्नबिल आवडीने खातात. याही बागेत भेरली माड (सुरमाड) फळाची (Ficus glomerata) झाडे होतीच. धनेश आणि या झाडाच्या फळांचा जवळचा संबंध आहे. मूलतः फळांवरच आधारित आहारामुळे मलबार ग्रे हॉर्नबिलचा वृक्ष प्रजातींशी घनिष्ठ संबंध आहे. मलबार ग्रे हॉर्नबिल जंगलातील परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतो. काही महत्त्वाच्या वृक्षांची बियाणे ही पक्ष्यांच्या किंवा सस्तन प्राण्यांच्या आतड्यातून गेल्यावरच अंकुरत असतात. मलबार ग्रे हॉर्नबिल बियाणे पसरवणारा पक्षी मानला जातो. मलबार ग्रे हॉर्नबिल आकाराने इतर पक्ष्यांच्या तुलनेने मोठे असल्याने ते मोठ्या बिया सर्वदूर पसरवण्यास मदत करतात. त्यामुळे जंगलाची वाढ आणि भरभराट होण्यास मदत होते. त्यामुळे स्थानिक वन्यजीवांच्या संख्येला अप्रत्यक्षपणे आधार मिळतो आणि मानव-प्राणी संघर्ष मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे हॉर्नबिल असलेल्या जंगलांचे आरोग्य आणि हिरवे वातावरण उत्तम राहाते.
घरट्यांच्या पोकळीसाठी हॉर्नबिल पक्षी मोठा घेरा असलेल्या उंच झाडांना प्राधान्य देतो. तो जिवंत झाडांचा उपयोग करतो. क्वचित प्रसंगी मृत झाडेही अभ्यासकांनी नोंदवली आहेत. आम्ही पाहिलेल्या मलबार ग्रे हॉर्नबिलने कोकमाच्या झाडावर घरटे केलेली पोकळी जमिनीपासून सुमारे १०-१२ फुट अंतरावर होती. हे घरटे काहीशा कमी उंचीवरील वाटले. या घरट्याच्या प्रवेशद्वाराची दिशा वायव्य होती. जी घरट्यात थेट येऊ शकणारा सूर्यप्रकाश कमी करण्यास मदत करणारी जाणवत होती. हे घरटे फळबागेत आणि काहीसे मानवी वस्तीजवळ होते. आम्हाला पिल्लांचे (स्क्वॅब) आवाज आणि घरट्यातील त्यांची हालचालही टिपता आली. नर अन्न घेऊन आल्यावर प्रथम जवळच्या झाडावर उतरत होता. घरट्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी काही वेळ आजूबाजूची पाहाणी करताना दिसला. आजूबाजूला कोणतेही भक्षक नाहीत याची खात्री केल्यानंतरच तो घरट्याच्या झाडावर परतत होता. विशेष म्हणजे, माणसांव्यतिरिक्त इतर प्राण्यांकडून प्रौढ मलबार राखी हॉर्नबिलची शिकार करणे दुर्मिळ असतानाही त्याने इथल्या मानवांना धोकादायक मानले नसावे. कारण आम्ही या घरट्यापासून जेमतेम २० फुट अंतरावरून निरीक्षण करत असतानाही त्याने निर्भयपणे मादीला खायला दिले होते. महाराष्ट्र आणि गोव्यात आढळणारे हॉर्नबिल पक्षी धार्मिक श्रद्धेमुळे काहीसे संरक्षित असावेत. हिंदू पौराणिक कथेनुसार त्याला ‘रक्षक’ (भगवान विष्णूचा वाहक) पक्षी म्हणतात.
दोन दिवसांच्या मुक्कामात आम्हाला या पक्ष्याची झाडावरील बंद असलेली घरटे-पोकळी, मादीने घरट्याच्या आत राहून स्लिटसारख्या प्रवेशद्वारातून पिल्लांचे मलमूत्र बाहेर काढून केलेली साफसफाई, अन्न वितरण आदी क्रियाकलापांचे जवळून निरीक्षण करता आले. नर या प्रजनन काळात मादीला आणि नंतर पिलांना फळे, पृष्ठवंशीय प्राणी आणि कीटक आणून देत असतो. आम्हीही नराने मादीला फळांसह बेडूक, कीटक आणून दिल्याचे पाहिले. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यापूर्वी मादीला दिल्या जाणाऱ्या आहारात फळांची संख्या सर्वाधिक असते. अंड्यातून पिल्ले बाहेर आल्यावर त्यात घट होत जाते. अंडी उबवल्यानंतरच्या टप्प्यात फळांपेक्षा प्राण्यांच्या अन्नाची वारंवारता जास्त राहाते. नराच्या घरट्याकडे अन्न घेऊन येणाऱ्या फेऱ्याही वाढतात. या टप्प्यात वाढत्या पिल्लांसाठी उच्च दर्जाचे पौष्टिक अन्न निवडले जाते. यात टोळ, साप, सरडे, बेडूक, लहान पक्षी आणि काही अज्ञात कीटकांचा समावेश असतो. कोकणात पावसाचे आगमन आणि मलबार ग्रे हॉर्नबिलकडून घरट्यात होणारा विविध प्राण्यांचा पुरवठा हा पिल्लांच्या अंड्यातून बाहेर पडण्याच्या वेळेशी जुळतो.
पश्चिम घाट जगातील जैवविविधतेच्या महत्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. परंतु धरणांची उभारणी, शेती आणि इतर विकासात्मक कामांसाठी झालेली आणि आजही होत असलेली बेसुमार आणि अनिर्बंध जंगलतोड यांमुळे वनक्षेत्र नष्ट झाले आहे. वनस्पतींच्या अनेक प्रजातींची संख्या मर्यादित झाली आहे. हॉर्नबिल पक्ष्याला आवडती असलेल्या फायकस कुळातील वड, पिंपळ, उंबर या झाडांवर माणसांनी मोठ्या प्रमाणात कुन्हाड चालवल्यामुळे ती आता दुर्मिळ झाली आहेत. मलबार ग्रे हॉर्नबिल सारख्या पश्चिम घाटातील स्थानिक पक्ष्याचे अस्तित्व जंगलतोडीमुळे धोक्यात आले आहे. हा पक्षी झाडाच्या खोडात स्वतः पोकळी खोदण्यास असमर्थ आहे. तो नैसर्गिक पोकळींवर अवलंबून आहे. व्यावसायिकदृष्ट्या पोकळी असलेली झाडे किफायतशीर नसल्याची धारणा आहे. परंतु हॉर्नबिलच्या प्रजनन चक्रासाठी अशी झाडे महत्त्वाची आहेत. हॉर्नबिलचे संवर्धन केवळ मोठ्या झाडांचे संरक्षण करण्यावर अवलंबून आहे.
कोणत्याही
अहवालांनुसार वनक्षेत्र कितीही वाढलेले दिसले तरी जंगलांची गुणवत्ता कमी होत आहे. दाट
जंगले कमी दाट होत आहेत, हे वास्तव आहे. मलबार ग्रे हॉर्नबिल त्याच्या प्रजननासाठी
अधिवास आणि झाडांच्या वैशिष्ट्यांपेक्षा पोकळीच्या (ढोली) वैशिष्ट्यांना अधिक
प्राधान्य देत असावा. असं आम्ही कुठेतरी वाचलं होतं. ते निरीक्षण आम्हाला इथं रातांब्याच्या
(कोकम) झाडाच्या पोकळीचा उपयोग दिसल्यावर पटलं. त्या दोन दिवसात या मनमोहक
पक्ष्याला भेटून आम्हाला खूप आनंद झाला. प्रजनन काळातील त्याच्या आकर्षक
प्रेमसंबंधाचे वर्तन अनुभवता आले. त्यांच्यातील विश्वास आणि बंधन समजून घेता आले.
आजवर या पक्ष्याविषयी अभ्यासलेल्या संदर्भांचा नेत्रसुखद ‘सृजन सोहळा’ अनुभवण्याचा
हा आनंद केवळ शब्दातीत राहिला.
धीरज वाटेकर
(सर्व
छायाचित्रे - धीरज वाटेकर)
![]() |
दोडामार्ग तालुक्यातील मलबार राखी धनेशाचे वास्तव्य असलेला बागायती परिसर... |
![]() |
बागायती जवळून वाहणारा आणि उगमापासून हाकेच्या अंतरावर असलेला नदी परिसर |
![]() |
मलबार राखी धनेशाचे वास्तव्य असलेल्या रातांब्याच्या झाडाचा परिसर |
मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य बेडूकसह मलबार राखी धनेश |
रातांब्याच्या ढोलीतील मलबार राखी धनेशच्या पिल्लाचे दर्शन |
मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य किटकासह मलबार राखी धनेश |
मादी व पिल्लांसाठी आणलेल्या खाद्य फळांसह मलबार राखी धनेश |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा