बुधवार, १४ मे, २०२५

विवाहाच्या पन्नाशीचा ‘अपूर्व’ योग

पूर्वपुण्याई लाभलेला आणि तिचा पुरेपूर उपयोग केलेला भाग्यवान पुरुष आणि कर्तृत्ववान स्त्री यांच्या विवाहाची पन्नाशी अनुभवणं हा अपूर्व योग आहे. अशा सुवर्णमहोत्सवी विवाह सोहळ्याचे उत्सवमूर्ती दाम्पत्य आदरणीय सासरे ज्येष्ठ पत्रकार अरुण दाजी जाधव (सर) आणि वंदनीय मातोश्री सौ. संगीता अरुण जाधव (पूर्वाश्रमीच्या राजकन्या बाजीराव गोलाईत भंडारज अमरावती) यांच्याविषयी मी बोलत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आज (१३ मे २०२५) इथे तीन पिढ्या एकत्र आल्यात. एखाद्या विवाहाची पन्नाशी अनुभवणं भविष्यात सोपं नसेल. म्हणून ही पीढी आणि हा क्षण अनुभवणारे आम्ही सर्वचजण भाग्यवान आहोत.

खरंतर जन्माला येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही. पण मिळालेल्या जन्माचं सार्थक करण्यासाठी झटणे खूप मोठी गोष्ट आहे. या उभयतांनी आपल्या संसारासाठी खस्ता खाल्यात. ‘कर्तृत्त्वाचे सौंदर्य मोठे असते’, असे म्हणतात. आज या दिवशी आपल्याला मातोश्रींच्या कर्तृत्त्वाचे सौंदर्य एक-दोन नव्हे तब्बल पाच सुगंधी फुलांनी बहरलेलं दिसतं आहे. आपल्या कामावरील निष्ठा, समाधानी वृत्ती, भरपूर संयम, ममता आणि अंगभूत कामसूपणा या पंचसुत्रीच्या बळावर मातोश्रींनी आपल्या संसाराची गोल्डन ॲनिव्हर्सरी गाठली आहे. पन्नास वर्षांचा हा प्रवास निश्चित सोपा नव्हतामातोश्रींचे जीवन इतक्या खाचखळग्यांनी भरलेलं आहे की त्याबाबत त्यांची सविस्तर मुलाखत घेऊन ‘एका विवाहाची पन्नाशी’ असा लेख लिहिण्याची माझी इच्छा आहे, ‘मातोश्री मुलाखत कधी देताहेत?’ त्याची मी वाट पाहतोय.


‘घाईघाईने लग्न करा आणि फुरसतीने (निस्तरा) पश्चात्ताप करा’ अशी एक म्हण आहे. आजची पिढी (निस्तरणे) पश्चाताप करण्यावर विश्वास ठेवत नाही, ती पर्याय निवडते. पण पश्चातापाचे दुर्दैवी क्षण कितीही जीवनात आले तरी नियतीने आपल्या ताटात जे वाढलंय ते मनस्वी स्वीकारून त्यातून नवी पाऊलवाट निर्माण करण्याचे सामर्थ्य लाभलेल्या पिढीच्या ‘मातोश्री’ प्रतिनिधी आहेत. मेहनत आणि आपल्या कष्टाने-कर्तृत्वाने आयुष्याचा मळा हिरवागार करण्याचे अंगभूत सामर्थ्य दुर्दैवाने आता कमी होते आहे. दुर्दम्य इच्छा, सहनशक्ती, अपमान पचवण्याची क्षमता औषधालाही शिल्लक न राहिलेल्या आणि छोट्या-मोठ्या घटनांनी अरे-तुरेवर किंवा हमरातुमरीवर येणाऱ्या आजच्या आमच्या पिढीला मातोश्रींच्या हाल-अपेष्टांनी भरलेल्या ‘प्रेरणादायी’ जीवनाचं गणित कळेल? मला प्रश्न आहे. मातोश्रींचे कर्तृत्व सभोवतालच्या प्रत्येकासाठी आशेचा आणि शक्तीचा किरण आहे. त्यांच्या जीवनसरितेने सर्वांगसुंदर मार्गांने प्रवास करत जीवनाच्या विविध काठांना स्पर्श केला आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधणे यासारखे दुसरे सुख नाही. आमच्या मातोश्री लेकरा-नातवंडात, एकत्रित कुटुंबात अशी सुखे शोधत जगत आल्यात. उभयतांचा संसार काळाच्या कसोटीवर खरा उतरला आहे. 


आता थोडा, आदरणीय सासरे ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांच्याकडे वळतो. प्रपंचात राहून सुद्धा माणूस किती विरक्त असू शकतो? याचं उत्तम उदाहरण म्हणजे माझे सासरे अरुण दाजी जाधव. अन्यथा ६० वर्षांपूर्वी मंत्रालयात नोकरी मिळालेली असताना, उतरत्या वयात असलेल्या आईच्या सेवेचे कारण स्वीकारून पोलादपूरला परतण्याचा निर्णय कसा आणि कोण घेईल? पण यांनी तो घेतला. नुसता घेतला नाही तर ते जीवनभर तो पाळला. ४/५ वीत शिकत असताना खाऊसाठी वडिलांनी दिलेल्या एक आण्याचा दैनिक लोकसत्ता विकत घेऊन वाचणारा आणि पुढे पोलादपूर तालुक्यातील पहिला पत्रकार असं बिरूद जगलेले हे गृहस्थ! चुळबुळ्या स्वभाव, काही ना काही चांगले करण्याची वृत्ती असलेले, चाळीस वर्षे एकटाकी लिहिणारे आणि ‘आपला काळ गाजवलेले’ हे पत्रकार! वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नव्हती त्या काळात मैलोन मैल पायपीट किंवा सायकल चालवून त्यांनी सुरुवातीला शिक्षकी आणि नंतर पत्रकारिता पेशा सांभाळला. ‘मी कुणाच्या पाच पैशाच्या चहाचाही मिंधा नाही’ असं आजही स्मृतिभ्रंश होऊ लागलेल्या काळात ठामपणे सांगणारे सासरे हे ‘जगण्याचं जणू एखादं जगावेगळं व्रत घेऊन वावरावं’ असं जीवन जगलेत. ‘पैसे मिळवणं हे आयुष्याचं ध्येय न ठेवलेल्या माणसाची परमेश्वर काळजी करतो’, यावर माझा अजिबात विश्वास नाही. मात्र माझे सासरे आणि माझे वडिल यांच्या जीवनाकडे पाहिलं की मला या दैवीभूत वाक्यातील सत्यता पटू लागते. आपल्या जीवनातील आनंद शोधण्याची परिमाणं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. सासऱ्यांचीही वेगळी होती. 

मागच्या दोन वर्षांपर्यंत त्यांची मनमती विलक्षण शाबूत होती. आता वयोमानपरत्त्वे किंचित शारीरिक कुरबुरी सुरु झाल्यात. कुरबुर सहन करण्याची सवय नसलेल्या सासऱ्यांना त्या मोठ्या वाटत असल्याने त्या गोंजारण्यात आणि त्यांना कोऱ्या चहाचा नैवेद्य दाखवण्यात यांचा दिवस कधी निघून जातो ते यांचे यानांच कळत नसेल! खरंतर शारीरिक कुरबुरी तुलनेने मातोश्रीना अधिक असणार असं आमचं ठाम मत आहे. पण जीवनभर अशा एकनाअनेक कुरबुरी भल्या पहाटे उठून चुलीवरच्या अंघोळीच्या पाण्यात टाकून उकळून प्यायलेल्या मातोश्रीपुढे शारीरिक तक्रारींचे आजही विशेष काही चालत नाही, हे कौतुकास्पद आहे.


ज्या सासऱ्यांनी आयुष्यभर घरातल्या ‘फोटोफ्रेम’मधील श्रीगणेशाची-आई श्रीकाळकाईची उपासना केली. जणू त्या काळकाईनेच त्यांच्या अर्धांगिनीच्या, म्हणजे मातोश्रींच्या पाठीमागे अज्ञात शक्ती बनून उभी राहून उभयतांच्या संसाराचा सांभाळ केला असावा! अन्यथा ‘आंधळ्याच्या गायी देव राखतो’ हे वचन सत्यात उतरलेलं आपल्याला तरी कधी पाहायला मिळालं असतं?

धीरज वाटेकर













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध मुख्याध्यापकांची सेवानिवृत्ती

शिक्षणाची शतकोत्तर परंपरा लाभलेल्या चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर विश्वनाथ वाचास...