शुक्रवार, ११ एप्रिल, २०२५

भारतीय निसर्ग परंपरेचा उलगडा करणारे ‘देवराई आख्यान’



डॉ. अर्चना जगदीश यांनी लिहिलेला ‘देवराई आख्यान’ हा ग्रंथ देवराई, पवित्र निसर्ग परंपरा, पर्यावरणासारख्या विषयात रुची घेऊन काम करू इच्छिणाऱ्यांसाठी मौलिक मार्गदर्शक दस्तऐवज आहे. निसर्ग आणि परंपरा यांची सांगड घालणाऱ्या भारतातील एका प्राचीन परंपरेचा दुवा म्हणून या ग्रंथाकडे पाहायला हवे आहे. देवराया या जैवविविधता संरक्षणासाठी मोठी संधी उपलब्ध करून देत आहेत. सरकारी प्रयत्न आणि कायदा याशिवाय जैवविविधता टिकू शकते? याचे उदाहरण म्हणजे पारंपारिक ‘देवराया’ आहेत. प्राचीन काळातल्या एखाद्या मोठ्या जंगलाचा आजही टिकून असणारा भाग म्हणजे देवराई होय. नव्याने जंगल तयार करताना किंवा मानवी विकृतीतून तोड झालेल्या जंगलांचं पुनर्जतन करण्यासाठी संदर्भ म्हणून बघता येईल असं रान म्हणजे देवराई. देवराया या पुरातन काळातल्या वनस्पती आणि परिसंस्थांच्या वाढीची शेवटची जागा आहेत. आजूबाजूचा कित्येक एकर परिसर उजाड असताना तिथेच नजरेला जाणवणारी देवराईतील मोजकी हिरवाई पर्यावरणीय आशेचा शेवटचा परिणामकारक किरण असल्याचे ‘देवराई आख्यान’ समजावून सांगते आहे.

देवराई म्हणजे देवळाभोवती लावलेले नुसते जंगल नव्हे! जिथेजिथे जुन्या संस्कृती होत्या तिथे देवराया दिसतात. देवराईला परंपरा आहे. संस्कृती आहे. माणसांच्या श्रद्धा जोडलेल्या आहेत. तिथे कितीतरी गूढ गोष्टी आणि हकिकती आहेत. लोकांच्या मनात निसर्गाबद्दलचा आदर, देवतांबद्दल वाटणारी भिती आणि प्रेम आहे. आजच्या पेक्षा पूर्वी निसर्ग अधिक चांगल्या स्थितीत असूनही आपल्या पूर्वजांना देवराया राखून ठेवाव्याशा वाटल्या होत्या. पूर्वी लोकं निसर्गाबद्दल खूप खोलवर विचार करायचे. तेव्हा देवरायांचे नियम होते. ते नियम मोडणाऱ्यांना शिक्षा होत्या. सर्वात महत्त्वाचे देव शिक्षा देईल अशी भीती होती. या देवरायांनी निसर्गाला आणि समाजाला जोडले होते. या साऱ्याचा विचार करून डॉ. अर्चना जगदीश यांनी पूर्वी त्यांच्या AERF संस्थेच्या कामाचा भाग म्हणून ‘कोकणातील देवराया’ नावाची छोटी पुस्तिका लिहिलेली होती. ती पुस्तिका अद्ययावत करण्याचा विचार त्यांच्या मनात सुरु होता. कोरोना संक्रमण काळात याकडे त्यांनी अधिक लक्ष दिले. तेव्हा गत काळात त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन देवरायांसंदर्भात केलेल्या साऱ्या नोंदी नव्याने समोर आल्या. तेव्हा ‘देवराया’ या विषयाच्या सगळ्या बाजू वाचकांसमोर येतील असं लेखन करायचं त्यांनी ठरवलं आणि त्यातून ‘देवराई आख्यान’ हा ग्रंथ साकार झाला आहे.

भारतासह जगभरात पसरलेल्या देवराईतील दैवते आणि वैदिक देवता यांचा संबंध, तिथली संस्कृती यांच्या अद्भुत परंपरेची ओळख हा ग्रंथ करून देतो. देवराई या विषयात मागील तीसेक वर्षे काम केल्यावर आलेले अनुभव, मिळालेले यश आणि अपयश या सगळ्या पार्श्वभूमीवर सातत्याने प्रत्यक्ष कामासह देवराईच्या परंपरेचे लोकांना निसर्गाशी नव्याने जोडण्यासाठी पुनरुज्जीवन करण्याची आवश्यकता आपल्याला हा ग्रंथ समजावून सांगतो. सह्याद्रीत दोन विसंवादी चित्र दिसतात. एकीकडे इथल्या निसर्ग संपदेचा ह्रास होत आहे तर दुसरीकडे सह्याद्रीच्या अभ्यासाला-संवर्धनाला वाहून घेतलेली कार्यकर्त्यांची फळी संवर्धनाचे आणि संरक्षणाचे प्रयत्न करत आहे. खरंतर भारतातील देवराया आणि त्यांच्या समस्यांबद्दल लिहावं तेवढं कमी आहे. तीन दशकांहून अधिक काळ देवराया आणि पवित्र निसर्ग यांवर डॉ. गोडबोले संशोधन करीत आहेत. देवराई म्हणजे पवित्र वन. शेकडो वर्षे अतीव श्रद्धेने माणसांनी देवरायांची जपणूक केली आहे. पर्यावरण क्षेत्रात देवरायांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणूस आणि सृष्टी यांच्या आदिम नात्यातून निर्माण झालेल्या आणि संस्कृतीच्या अतिदीर्घ प्रवासात टिकून राहिलेल्या या वनांमागील लोकधारणांचा आसेतुहिमाचल वेध या ग्रंथात घेतलेला आहे. या पुस्तकात आपल्याला १००हून अधिक सविस्तर संदर्भ वाचायला मिळतात.

देवरायांचा जगभर झालेला विचार, देवराई विषयाचे आजचे संदर्भ या अंगाने देवराई आख्यान’ची मांडणी करण्यात आली आहे. ‘तीन दशकांहून अधिक काळ देवराई आणि पवित्र निसर्ग यावर संशोधन आणि देवराई संरसक्षणासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या अर्चना जगदीश यांचे देवराई आख्यान म्हणजे या विषयाची समग्र माहिती, आजची परिस्थिती, त्यामागच्या  संकल्पना आणि संस्कृती, आणि निसर्गाशी  माणसाला जोडून घेण्याची निकड या सगळ्याचा गोष्टीवेल्हाळपणे वेध घेणारा ग्रंथ आहे. जागतिक  पातळीवर तसेच भारतभरात देवराई, निसर्ग संरक्षण परंपरा कश्या तयार झाल्या, टिकल्या आणि नष्टही झाल्या? या सर्व विषयांना स्पर्श करत  सांगितलेलं हे अनुभवसिद्ध आख्यान म्हणजे देवराई अभ्यासातला मैलाचा दगड आहे. जगभरातल्या माणसांनी निर्माण आणि जतन केलेल्या निसर्ग संरक्षणाच्या परंपरांची ओळख करून देत असतानाच या परंपरांचा आदर करत पर्यावरणविषयक नव्या आव्हानांना सामोरे कसे जाता येईल, याचा विचार करणारे हे अनुभवसिद्ध आख्यान म्हणजे देवरायांच्या अभ्यासातला मैलाचा दगड आहे.’ असं डॉ. अरुणा ढेरे यांनी प्रस्तावनेत म्हटलं आहे. त्याची प्रचिती हा ग्रंथ वाचताना येते. या ग्रंथाचे प्रकाशन ९२व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष व जेष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते २२ जून २०२४ रोजी पुणे येथे झाले. २०२५च्या मराठी भाषा गौरव दिनी ‘देवराई आख्यान’ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा, उत्कृष्ट सामाजिक-सांस्कृतिक-वैचारिक ग्रंथासाठी देण्यात येणारा श. ना. जोशी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. अर्चना जगदीश (मॅडम)


डॉ. अर्चना जगदीश या अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन (AERF)च्या संस्थापक संचालक आहेत. पवित्र जंगलांचे पालन, पवित्र जंगलांना खाजगी वन संवर्धनाशी जोडणे हे त्यांच्या संस्थेचे धोरण आहे. प्लांट टॅक्सोनॉमिस्ट आणि एथनो बायोलॉजिस्ट म्हणून शिक्षण घेतलेल्या डॉ. अर्चना यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मंचांवर कार्य केले आहे. त्यांच्या संस्थेने शाश्वत नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले आहे. याचे दाखले या ग्रंथात भेटतात. 'अप्लाइड एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन' या संस्थेने देवराया आणि खासगी मालकीच्या जमिनीवरील जंगले यांच्या संरक्षणासाठी संस्थेने केलेले काम अत्यंत मोलाचे आहे. प्रोत्साहन आधारित संवर्धन किंवा incentive-based conservation ही या संस्थेची भूमिका सफल झाल्याचे दाखले सह्याद्रीत बऱ्याच ठिकाणी दिसतात. डॉ. अर्चना यांनी सहा वर्षे ईशान्येकडील नागालँडसारख्या अतिदुर्गम भागात स्थानिक समुदायांसोबत काम केले आहे. तेथील आदिवासी जमातींच्या परंपरागत पर्यावरण रक्षणाच्या पद्धतींचा अभ्यास केला आहे. याही अभ्यासावरील त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्यांच्या लेखणीतून साकारलेले अत्यंत तरल भावनिक आवेगाचे दर्शन घडविणारे ‘नात्यास नाव अपुल्या’ हेही पुस्तक एकदा हातात घेतल्यावर खाली न ठेवता वाचून पूर्ण करावे अशा पठडीतील आहे. एकाचवेळी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात भान बाळगून खंबीरतेने किती काम उभं करता येऊ शकतं? याचं मूर्तिमंत दर्शन या ग्रंथातून घडतं. दोन्ही ग्रंथांचे विषय स्वतंत्र असले तरी ते विषय जगणारी संशोधक-लेखिका एकच असल्याने हे विषय आणि अनुभव समजून घेताना कर्त्याव्यक्तीविषयी मनात नकळत आदरभाव निर्माण होतो.

“लोकांनी फक्त बकेटलिस्ट म्हणून देवरायात जाऊ नये. देवरायात गेल्यावर, ‘मला निसर्गाशी जोडून घेता येईल का? मी दोन झाडं लावली तर त्याची काळजी घेतो आहे का? निसर्गाबद्दल मी संवेदनशील कसा होईन? नीती मूल्यांचा ह्रास होत असल्याच्या काळात, अति हव्यासातून बाजूला होऊन आपण समाधानी व्हायला शिकू का?’ याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. त्यामुळे मनुष्य प्राण्याचे पृथ्वीवरचे वास्तव्य वाढेल.” अशी स्पष्ट भूमिका डॉ. गोडबोले मांडत असतात. आजच्या काळात लोकांची पावले मंदिरांकडे अधिक वळताहेत. मात्र देवरायातील नैसर्गिक पावित्र्य दुर्दैवाने कमी होत चालले आहे. लोकांच्या देवावरील श्रद्धा कायम असताना पूर्वांपार निसर्गाशी जोडलेला माणूस आज निसर्गापासून दूर गेलेला दिसतो आहे. देवारायांची तोड होऊन मंदिरांचे झपाट्याने आधुनिकीकरण होतेय. अशा वेळी हा डोळे उघडवणारा ग्रंथ समोर येणे आश्वासक आहे. हा ग्रंथ अधिकाधिक वाचला जाणे आवश्यक आहे. या अजोड ग्रंथ निर्मितीसाठी डॉ. गोडबोले यांना धन्यवाद!

 

पुस्तकाचे नाव - देवराई आख्यान

लेखक -            अर्चना जगदीश

किंमत -            ८०० रुपये

प्रकाशक -        प्रफुल्लता प्रकाशन पुणे

(संपूर्ण रंगीत आणि कॉफीटेबल बांधणीचा ४४० पृष्ठसंख्या असलेला ग्रंथ)

 

धीरज वाटेकर

मो. ९८६०३६०९४८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

भारतीय निसर्ग परंपरेचा उलगडा करणारे ‘देवराई आख्यान’

डॉ. अर्चना जगदीश यांनी लिहिलेला ‘देवराई आख्यान’ हा ग्रंथ देवराई, पवित्र निसर्ग परंपरा, पर्यावरणासारख्या विषयात रुची घेऊन काम करू इच्छिणाऱ्या...