मागच्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणसह महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरु असताना कामानिमित्त इंदोरला (मध्यप्रदेश) गेलेलो. नेहमीप्रमाणे ‘अचानक’ योगावर उज्जैन येथील जगातील एकमेव दक्षिणमुखी पवित्र ज्योतिर्लिंग श्रीमहाकालेश्वर आणि माता नर्मदेसह श्रीओंकारेश्वर या दोन्ही ज्योतिर्लिंगांची दर्शनं घेता आली.
विशेष म्हणजे यावेळी उज्जैन प्रवासात आम्ही शिप्रा, गंडकी आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगम घाटावर स्थित, श्रीशनी देवाचे तपश्चर्या स्थान आणि शनीदेव शिवलिंग (पिंडी) रूपात विराजमान असलेल्या भारतातील एकमेव नवग्रह शनि मंदिरात दर्शन घेतले. दोनेक हजार वर्षांपूर्वी उज्जैनचे महान सम्राट राजा विक्रमादित्य यांनी स्थापन केलेले हे नवग्रह शनीमंदिर. मंदिरात अभिषेक केला. राजा विक्रमादित्याने त्याच्यावर असलेली शनीची साडेसाती संपल्यानंतर आणि शनी महाराज प्रसन्न झाल्यानंतर या मंदिराची स्थापना केली होती. त्यांनी येथे नवग्रहांची स्थापना शिवलिंग रूपात केली. या मंदिराच्या स्थापनेनंतरच राजा विक्रमादित्याने जगप्रसिद्ध 'विक्रम संवत' (हिंदू पंचांग/कॅलेंडर) सुरू केले. असेही मानले जाते की प्राचीन काळात स्वतः शनी देवानी या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली होती. आवर्जून भेट द्यावी असे हे रम्य ठिकाण आहे. उज्जैनच्या श्री हरसिद्धी माता मंदिराच्या छतावर आतील बाजूस कोरलेले 'श्री यंत्र' वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या प्रांगणात सुमारे ५१ फूट उंच असलेले दोन अवाढव्य दीपस्तंभ आहेत जे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.
खरंतर
मध्यप्रदेशात कारने आलोय तर यावेळी किमान नर्मदामैय्या दर्शन जमवूया,
असं मनात होतं. तसा जाता येताच्या प्रवासात खळघाट मिळणारच होता. पण सायंकाळी
सूर्यास्ताला 'संरक्षक देव' श्रीकालभैरव
यांचे दर्शन घेऊन उज्जैन सोडताना ओंकारेश्वर ठरलं नि थोडी वाट वाकडी करून रात्री
बारा वाजता तिथे पोहोचलोहि! या रस्त्यात आम्ही, कोकणचे
स्वामी भगवान परशुराम यांची मुख्य जन्मभूमी जानापाव कुटी (Janapav Kuti)चे बोर्ड पाहिले. जाणं शक्यच नव्हतं. पुन्हा केव्हातरी! आता
नर्मदामैय्यासह यमुनेचं संगम दर्शन ठरलेलं. नर्मदा नदीच्या 'ॐ'
आकाराच्या मांधाता बेटावर वसलेले ओंकारेश्वर हे भगवान शंकराच्या १२
ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख पवित्र तीर्थक्षेत्र. सकाळी सकाळी नर्मदा घाटावर
पोहोचलो. बोटीने 'ॐ' आकाराच्या बेटाला
अर्ध प्रदक्षिणा केली. त्रिवेणी संगम अनुभवला. या बेटाला प्रदक्षिणा मारणे अत्यंत
पवित्र व धार्मिक मानले जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता नर्मदेच्या जलाने
ओंकारेश्वर शिवलिंगावर मंत्रोच्चारासह अभिषेक करता आला. शब्दात काय वर्णावं,
अफाट आनंदाचा क्षण होता तो!
परतीच्या प्रवासात विचार करू लागलो, कारने फिरताना इंदोर शहरातील अपवाद वगळता संपूर्ण प्रवासात हायवेवर एकाही ठिकाणी एकाही पोलिस आदींनी अडवलं नाही हे आठवलं. खरं सांगायचं तर आम्हाला महामार्गावर, अगदी टोल नाक्यासह कोठेही पोलिस दिसले नाहीत. हे पाहून माझ्या डोळ्यासमोर एकदम कोकणसह महाराष्ट्रातील महामार्गांवरील चित्र उभं राहिलं, असो!
सर्वांना श्रावण मासाच्या मनापासून शुभेच्छा !
धीरज वाटेकर
