कोरोना लॉकडाऊन काळात, पुस्तकांची
सोयरिक माणसांना प्रकर्षाने जाणवली. कधीही पुस्तकं न वाचणाऱ्यांनीही पन्नासेक पुस्तकं
वाचल्याचं सोशल मिडीयावर जाहीर केलं. कोणी १९३० ते २०२० पर्यंतच्या कादंबऱ्या
वाचल्या. कोणी सांप्रदायिक पुस्तक वाचली तर कोणी आणखी काहीतरी ! काहींना पैसा
कमावण्याच्या नादात आपण जीवनातील आनंद हरवून बसल्याची जाणीव पुस्तक वाचनाने झाली. कोणाला
संत तुकाराम महाराजांचं, ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असू द्यावे समाधान’
या भावनेमागचं मर्म समजलं. सामान्य माणूस एका आयुष्यात एकच जीवन जगतो पण वाचन
करणारा एका आयुष्यात अनेक जीवन जगत असल्याची जाणीवही काहींना झाली. हा सारा सोयरिकतेचा
प्रभाव होय. पालकांनी मुलांसाठी अवांतर पुस्तके खरेदी करण्याचा सपाटा लावला. सोशल
मिडीयाने वाचकांना अधिकाधिक सगेसोयरे मिळवून दिले. तेथे पुस्तकांवर चर्चा होऊ
लागल्या. ज्यातून अनेकांना पुस्तकं अधिक समजायला मदत झाली. वाचनातून मनन, चिंतनाची
प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी सुरु झालेला वाचन प्रेरणा दिन समजून घेताना सरकारी अनास्थेमुळे
वाचन संस्कृती चळवळ थांबल्याचे अनेकांना जाणवले. वाचनसंस्कृती खेड्यापर्यंत
रुजविण्याचे प्रयत्न करताना राज्यातील अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्यिक मूल्य असलेल्या
पुस्तकांच्या विक्रीची दुकाने नाहीत, हे सत्य कोरोनाने सर्वांसमोर आणले. लोकांनी
वाचलेल्या पुस्तकांच्या ढीगांचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेले आपण पाहिले. त्या
फोटोजना प्रतिसादही मिळाला. अशा वाचकांना कोणी, ‘आमच्या वाचनालयाला भेट द्या असं
सुचवलं’, कोणी, ‘वेळेचा सदुपयोग केल्याचं कौतुक केलं’. कोणी त्यातली आवडलेल्या ४/५
पुस्तकांची नावंही विचारली. काहींनी अतिशय जगावेगळा छंद म्हणून कौतुक केलं.
लॉकडाऊनमध्ये बहुसंख्य लोकांचा वेळ जात नसताना, वाचनाशी सोयरिक जोडलेल्यांना वेळ पुरत
नव्हता. कोणीतरी हे पुरूषांना शक्य आहे म्हणालं. त्यावर आणखी कोणीतरी आवड असली तर सवड
मिळते असंही सांगून मोकळं झालं. कोणीतरी वाचन प्रेरणा दिनाचं निमित्त साधून आपल्या
आवडत्या पुस्तकांसाठी साठवलेल्या पैशातून कपाट खरेदी करून आला. what’s on your
mind ? असं विचारणाऱ्या सोशल मिडीयावर मनातलं सगळं पोस्ट करता येत असल्याने हेही पोस्टीत
आलेलं. मूळ पोस्टपेक्षा त्याला मिळालेला प्रतिसाद सोयरिकतेतील गहिरेपणा सांगणारा
होता. पुस्तके आणि कपाट विकत घेण्यासाठी बचतीचा मार्ग अनेकांना भावला. कोणीतरी अशी
५० कपाट व्हावीत म्हणून शुभेच्छा दिल्या. माणूस वयाने बुजुर्ग होत जातो, पण ग्रंथ
जागच्या जागी असतात. आपल्याला मनाने ताजातवाना ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतात. म्हणून
विशेष आवडलेली पुस्तकं विकत घेऊन संग्रहित करावी, हवी तेव्हा वाचता येतात. खरंतर एकच
पुस्तक आपण वर्षांच्या अंतराने वाचले तरी आपली गृहीतके, आकलन आणि अनुभवानुसार
त्यातले पैलू भावत जातात. विचारसरणी बदलणाऱ्या, समृद्ध जीवनानुभव देणाऱ्या
वाचनाच्या सोयरिकतेचं मी अनुभवलेलं गम्यही अफलातून आहे.
लहानपणी माझ्यानं
शालेय पुस्तकं वाचून होत नव्हती. अवांतर वाचन लांब राहिलं. पण घरात ग्रंथसोबत
होती. एखाद्या भाषाशास्त्राच्या अभ्यासकाच्या घरी शोभावं असं ग्रंथस्नेही वातावरण नांदत
होतं. आजही नांदतंय ! तेव्हा मला वह्यांची उरलेली कोरी पाने फाडून दाभणाने शिवून
वापरायला मजा वाटायची. त्या ‘कच्च्या’ वहीत मनातलं ‘पक्क’ व्यक्त होता यायचं. माझं
अक्षर तुलनेनं मोठ्ठं ! पण कच्ची वही संपू नये म्हणून, बारीक अक्षर काढून लिहायची
सवय लागलेली. ज्याची बघून लागलेली तो मात्र वही लवकर संपते म्हणून बारीक अक्षर
काढायचा. हे मला कळेस्तोवर शाळा सुटली होती. अर्थात माझ्याही घरी काही वह्यांचं
दुकान वगैरे नव्हतं. पण आपल्यासारखं मुलांच्या शिक्षणाचं आबाळ होऊ नये म्हणून वडिलांनी,
शक्य तेवढी काळजी घेतलेली. वडिलांनी घरात आणलेल्या नव्या पुस्तकांना उघडून त्याचा
वास नाकातोंडात भरून घ्यायला मला आवडायचं. पुस्तक विकत घेऊन वाचण्यातला वडिलांचा आनंद
समजत नव्हता तेव्हा. आपणही अशीच पुस्तकं विकत घेऊन वाचायची असंही मनात आलं नव्हतं.
घरातल्या धार्मिक वातावरणात, श्रावणातील ग्रंथवाचन परंपरेची लागलेली ओढ वगळता बारावी
होईपर्यंत, सांगण्यासारखं विशेष नसलेला मी यथा-तथा विद्यार्थी होतो. दहावीपर्यंतचं
शिक्षण, वडील शिक्षक असलेल्या शाळेत कमालीच्या धाकात पार पडलेले. पुढे बारावीला तो
धाक संपला आणि आम्हांला शिंग फुटली. त्याचा परिणाम बारावीच्या निकालावर झाला. लहानपणापासून
स्थापत्य शाखेची आवड म्हणून रत्नागिरीच्या शासकीय तंत्रनिकेतनात प्रवेश घेतला आणि
त्याचवर्षी, १९९७ साली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या झालेल्या दुसऱ्या प्रतिभासंगम
युवा साहित्य संमेलनात मी ओढला गेलो. मला आपल्याकडे ओढण्याचे काम भिंतीवरल्या एका
पोस्टरने केलेलं. तेव्हा मला चरित्र-आत्मचरित्र वाचनाची गोडी लागलेली. लोकांचे भन्नाट
अनुभव वाचताना आपण जणू तेच आयुष्य जगतोय असा भास व्हायचा. अ.भा.वि.प. कार्यकर्ता
म्हणून जरी मी त्या संमेलनात सहभागी झालो असलो तरी संमेलन कार्यक्रमात कानावर
पडलेल्या साहित्य चर्चांनी माझ्यात चरित्रवाचनाने जागृत केलेल्या भासाला वर्तमानात
आणायला सुरुवात केली. लिहिणं सुरु झालं. शब्दांशी सोयरिक जडली. स्थानिक वर्तमानपत्रात
प्रसिद्ध होऊ लागलेल्या स्फुटलेखांची गरज म्हणून फिरणं आणि संदर्भ शोधणं सुरु
झालं. शिक्षण संपल्यावर लिहिलेलं छापून येणं अवघड बनताच पत्रकारितेकडे मोर्चा
वळवला. वाचन आणि लेखन होत राहिलं. यातलं ठरवून असं काहीही घडलं नाही. जेजे जसंजसं
समोर येत गेलं तेते मी स्वीकारत गेलो. नंतर केव्हातरी, ‘वाचण हे पेरणं असतं आणि
लिहिणं हे उगवणं म्हणून पेरत चलूयात ! कधीतरी ते उगवेलच !’ हे ज्येष्ठ संपादक आणि
साहित्यिक उत्तम कांबळे यांचं वाक्य ऐकलं आणि ‘मी इथवर कसा आलो ?’ याचं कोडं
उलगडलं. अर्थात या साऱ्याच्या मुळाशी घरचं, वडिलांचं प्राथमिक मार्गदर्शन होतंच ! ‘आपल्याला
लिहिण्यासाठी आवश्यक संदर्भ आपल्या संग्रही असायला हवेत’, ही वडिलांची सूचना मनावर
घेतल्याने स्वतःचा ग्रंथसंग्रह जमा होऊ लागला. कालांतराने याच सूचना चिपळूणला
कोकणची सांस्कृतिक राजधानी बनविण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या स्वर्गीय नानासाहेब
जोशी आणि प्रकाशकाका देशपांडे या ज्येष्ठ मार्गदर्शकांकडून ग्रहण करायला मिळाल्या.
संदर्भ तपासून लेखन करण्याच्या पद्धतीमुळे कोकण इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांचे
आमच्याकडे लक्ष गेले. त्यांच्याच सूचनेनुसार वाचन संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या वस्तूसंग्रहालय
संकल्पाने मेंदूत शिरकाव केला. त्याला आता काही वर्षे झालीत. संग्रहालयांसह पुस्तकांच्या
आणि रद्दीच्या दुकानात सर्वाधिक रमणाऱ्या मला, चाळीशी पार केल्यावर माझ्या ‘परमचिंतन’
अभ्यासिकेत तिथल्या संदर्भीय सोयऱ्यांसोबत वावरताना जो आनंद मिळतो तो शब्दात पकडणे
कठीण आहे.
मला वाटतं, माणूस
बिन चेहऱ्याचा जन्माला येतो. त्याचा दिसणारा चेहरा हा अवयव असतो. अशा माणसाला आत्मविश्वासाने
व्यक्त होणाऱ्या चेहऱ्याची गरज असते. पुस्तकं माणसाची ती गरज पूर्ण करतात, व्यक्त
व्हायला शिकवतात. लेखकही व्यक्त होण्यासाठीच लिहितात. जो व्यक्तच होत नाही, तो
माणूस कसला ? ‘पुरुष ते महापुरुष’ घडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला पुस्तकं भेटतात.
म्हणून ‘वाचन हेचि सकळ सोयरे आमुचे’ असं म्हणावसं वाटतं. जिकडेतिकडे पुतळे
उभारण्यात आपली सोयरिक कामी येत असल्याचे आपण पाहातो. पण पुतळ्यांच्या विचारांचा विचार
काही मनात रुजत नाही. कारण वाचन संस्कृती नाही. म्हणून आजचे पुतळे पत्ता
सांगण्यापुरते राहिलेत. देशाच्या गल्लोगल्लीत विचारवंतांचे पुतळे असताना तिथे वैचारिक
दारिद्र्य का पाहायला मिळतं ? वाचन संस्कृतीशी असलेला सोयरिकतेचा अभाव हेच
त्यामागचं कारण आहे. पुस्तकं आजच्या भपकेबाज दृश्य माध्यमांइतकी परिणामकारक नसली
तरी विश्वासार्ह नक्की असतात. अर्थात सोयरिक कोणाबरोबर करावी हा ज्याचा त्याचा
प्रश्न आहे. वाचनाशी सोयरिक करण्याचे फक्त फायदेच आहेत, तोटे नाहीत. माणूस जीवनात
व्यवहार्य वावरतो. फायदे-तोटे पाहून निर्णय घेतो. मग वाचनाशी सोयरिक करायला काय
हरकत आहे ? आयुष्याचं जगणं समृद्ध होण्यासाठी माणसं, वाचनाचं वातावरण, जीवनपद्धती अवतीभवती
असावं लागतं. यातून माणूस, ‘कसं जगावं ?’ हे नकळत शिकत जातो. शब्दांशी केलेली सोयरिक
आजूबाजूच्या परिस्थितीचं वाचन करायला शिकविते. आपली सततची भूक ही चांगलं काम
करण्याची असावी घाईघाईने व्यक्त होण्याची नसावी हे जाणवत राहातं. ‘मला काहीतरी
सांगायचं आहे आणि ते न सांगितल्यामुळे मला झोप लागत नाही आहे’, असं आपल्याबाबत
जेव्हा होतं तेव्हा दर्जेदार कलाकृती जन्माला येते. याचं भान पुस्तकं आपल्याला
देतात. या वाचनानंदाच्या वाटेवर पहिल्यांदा वाचकाला पुस्तकाचा शोध लागतो. नंतर
माणूस त्या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. आपल्या बोलण्यात त्यातले संदर्भ द्यायला
लागतो. नंतर नंतर तर जीवनात माणसांना
पर्याय म्हणून पुस्तकं उभं राहातं आणि सोयरिक जन्माला येते. ही सोयरिक नसानसांत
भिनत जाते. त्यातून वाचकाला पुस्तकाचा पुनर्शोध लागतो. शेवटी वाचक आपल्याजवळ
उत्तमोत्तम पुस्तकांची समृद्ध संपत्ती तयार करतो. आयुष्याच्या शेवटी, हा वाचक
आपल्याकडील ज्ञानाचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपुर्द करता होतो. या साऱ्या
प्रक्रियेतून जाणारा वाचक हा उत्तम सोयरिकतेचा प्रवास अनुभवत असतो, या बाबतीत मीही
नशीबवान आहे.
सध्याच्या सोशल
मिडीयाच्या काळात दूरचित्रवाणीसह करमणूकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरीही त्यातून
वरवरची करमणूक होत असल्याचा फील अनेकांना आला असेल, मला येतो. पण वाचन करताना आपण
एका वेगळ्या वातावरणात, विश्वात रममाण होत असतो. पुस्तकातील मजकूर मनातून मेंदूकडे
सरकताना समाधान देऊन जातो. ‘वीकएन्ड’ला निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करणाऱ्यांना
आनंद तर मिळतो पण त्याच निसर्गरम्य ठिकाणाच्या बारकाव्यांचे अफलातून वर्णन असलेलं
एखादं पुस्तकं हाती पडलं तर प्रत्यक्ष स्थळी न जाताही तिथल्या निसर्गाचा गारवा अनुभवता
येतो. केवळ मनोरंजन म्हणून पुस्तकांचे वाचन करणाऱ्यांना नंतर त्यातले तत्वज्ञान खुणावते.
लिहिणाऱ्यांची विद्वत्ता पाहून ही माणसं तपस्वी असल्याबाबत श्रद्धाही निर्माण
होते. आपल्या मनाचा उत्तम व्यायाम सुरु होतो. हे सारं लक्षात आलेल्या माणसांकडून
आज बड्या शहरात ‘ग्रंथ तुमच्या दारी / पुस्तकपेटी’ उपक्रमांना प्रतिसाद मिळताना
दिसतो. वृद्धापकाळाकडे झुकलेली माणसं पुस्तकांच्या सोबतीनं छान आयुष्य जगताना
दिसतात. त्यांनी उमेदीच्या काळातही सकस वाचनाची आवड जोपासलेली असते. म्हणून
उतारवयात देवदर्शन करू म्हणत आयुष्य घालविल्यावर शेवटी देवदर्शन करताना दुखणारे
गुडघे अशांकडे नसतात, असतो तो केवळ जीवनानंद ! आणि खऱ्या सोयऱ्याचे हेच प्रामाणिक
लक्षण आहे ना !
गुगलने
माहितीच्या क्षेत्रात जी क्रांती केली आहे त्याने माणसांना अपंग बनवले आहे. त्यामुळे
तात्पुरते, कामचलाऊ जगणे वाढीस लागून संदर्भ, अवांतर वाचन, सखोल ज्ञान मिळवण्याची
जिद्द संपुष्टात येऊ लागली आहे. सुपरफास्ट स्पीडच्या जगात सारे धावताहेत. धावण्याच्या
या शर्यतीत आयुष्याची, जगण्याची उमेद
संपतेय. माणसाला यशाचा आनंद उपभोगायलाही वेळ नाही. पुढे जेव्हा तो मिळेल तेव्हा
शरीर साथ देत नसेल. अशात ज्ञान, माहिती, उपदेश, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद
आणि मार्गदर्शन करणाऱ्या पुस्तकांच्या वाचनाची आवड वरदान असून त्यासाठी वाचनालयाचे
सभासदत्त्व घेणे ही पहिली पायरी ठरावी. मानवी इतिहासात अक्षरवाङ्मय निर्मिती सुरु
झाल्यापासून आजवर लाखो लोकांनी शेकडो वर्षे त्याचे अनुकरण केले आहे. तरीही माणसाची
आजची स्थिती आपल्याला काय दर्शविते ? याचा विचार केल्यास बालपणी आनंद देणारे वाचन तरुणपणी चारित्र्याचे
रक्षण तर वृद्धपणी
दुःख दूर करते. चांगल्या ग्रंथांची सोयरिक नेहमीच हितकारक ठरते.
वाचन संस्कृतीशी
आपली सोयरिक इतकी महत्त्वाची असताना त्याकडे दुर्लक्ष का होतंय ? ज्या महाराष्ट्रात,
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीचा राजव्यवहार कोष तयार केला, त्या महाराष्ट्रात भाषिक
समृद्धीसाठी काम करणाऱ्या संस्था भाषातज्ज्ञांना भरकटलेल्या का वाटतात ? सरकार
त्यांचे का ऐकत नाही ? समर्थ आणि सक्षम तरुण माणसांना कामाची संधी का मिळत नाही ? भाषेच्या
शिक्षणाचा अभाव का होतो आहे ? मराठी विद्यापीठाची मागणी पूर्ण का होत नाही ? इंग्रजी
ही भाषा नसून ती एक संस्कृती आहे, हे आजही आमच्यातल्या बहुसंख्य माणसांना का
कळलेले नाही ? वाचनाशी सोयरिक वाढविण्याच्या टप्प्यावर असे अनेक प्रश्न उभे
राहतात. आपली विचार करण्याची भाषा ही मातृभाषा आहे. पण आपण तिला विकासाची आणि
रोजगाराची भाषा बनवू शकलेलो नाही. आजही वर्तमानपत्र न वाचणाऱ्यांची संख्या मोठी
आहे. त्यामुळे माणसांना दर्जेदार जीवन जगणं जमेनासं झालंय. पूर्वी गावोगावचा माणूस
छापलेलं तर वाचायचाच पण तो निसर्ग, जंगलं, पशुपक्षी, प्राणी, नदी हेही वाचायचा. तो
माणूस ग्रंथांशी निगडीत होता. आता तोही वेग मंदावलाय. सोशल मिडीयावर तयार सामग्री खूप
आहे अन् उपयोग करणारे अत्यल्प ! आज आधुनिकता माणसांना सभ्यता वाटते आहे. मूळ संस्कृतीपासून तुटल्याने माणसाने रेडीमेड
संस्कृती अंगिकारायला सुरुवात केली आहे. ग्रंथांपर्यंत वाचक पोहोचायला हवा म्हणून आम्ही
काय करतो ? हा प्रश्न आहे. ग्रंथालयातला माणूस ग्रंथशत्रू होण्याऐवजी ग्रंथस्नेही जाणवायला
हवा. तर माणसांची ग्रंथांशी सोयरिक वाढेल.
माणसाला प्रस्थापित
व्यवस्थेत आपली जागा बनविताना जेव्हा ही व्यवस्था आपल्याला नकळत संपवत असल्याची
भिती वाटते तेव्हा वाचनानंदासारखा सोयराच मदतीला धावतो. मळलेल्या त्याच त्या वाटांवरून
चालण्याऐवजी स्वतःची वेगळी वाट चोखाळू पाहणाऱ्यांचा सुरुवातीला सार्या जगावर अफाट
विश्वास असतो. हळूहळू जसजसे अनुभव येत जातात तसतसा या विश्वासाला सुरुंग लागतो.
इथेही वाचनाने आलेली प्रगल्भताच माणसाला सांभाळते. कार्य कोणत्याही क्षेत्रातील
असुदेत, ते वाढायला लागले की त्याला समाजमान्यता मिळू
लागते. तसे अनेकजण सहकार्यासाठी पुढे सरसावतात. ते शक्य झालं नाही तर दूर होतात, प्रसंगी
स्पर्धक बनतात. वापर करू पाहातात. विश्वासघात करतात. तेव्हा खचायला, एकटं पडायला
होतं. जगण्यातली गंमत संपू लागते. तेव्हा नव्याने हरिओम करण्यासाठीची मानसिक तयारी
करण्याचं काम ग्रंथ करतात. सगेसोयरे तरी अशाप्रसंगी वेगळं काय करतात ? मग या ‘वाचन’
नावाच्या संस्कारक्षम सोयऱ्याचं हे आपल्यावरील ऋण आपण कसं फेडणार ? कृतज्ञता
व्यक्त करणं सोपं असतं. पण तेवढ्यानं समाधान होत नाही. म्हणून, ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी शिकवावे। शहाणे करून
सोडावे । सकळ जन ।।‘ ही समर्थ रामदासांची शिकवण जगत संपर्कात येणाऱ्या नव्या पिढीशी, ‘वाचन’ संस्कृतीशी
सोयरिक घडवून आणण्याचा संकल्प या दीपावलीपासून करू यात !
धीरज वाटेकर
मो. ९८६०३६०९४८
(प्रसिद्धी : दैनिक सागर दिवाळी पाडवा विशेष 'सोयरे सकळ' टॅॅब्युलर पुरवणी २०२०)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा