निसर्गरम्य देवभूमी
कोकणातील पर्यटन जिल्हा अशी ओळख असलेल्या सिंधुदुर्गला ‘कायमस्वरूपी निवासी
वास्तव्य ठिकाण’ म्हणून निवांतपणासाठी पसंती मिळू लागल्याला आत अनेक वर्षे लोटलीत. गावाकडील घर (सेकंडहोम) ही आयुर्वृद्धी
साधणारी अत्यावश्यक गरज असल्याचे कोरोनाने साऱ्या जगाला सांगितल्याचे या विषयातील
अहवाल आणि सर्व्हे सांगताहेत. मोठ्या शहरात नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना
निसर्गाच्या सुरक्षित सानिद्ध्यात गावातल्या घरांचे महत्त्व कोरोनाने पटवून दिले आहे. याकाळात भाड्याच्या घरात राहताना,
पगार घटल्याने घरमालक आणि भाडेकरू यांच्यात वितुष्ट येण्याच्या घटना घडल्या आहेत.
लोकांना कुटुंबासोबत एकत्र राहाण्याचे महत्त्व पटलेले आहे. त्यामुळे निवासी सदनिका,
मोकळे प्लॉट, स्वतंत्र ड्युप्लेक्स घरे यांसह वर्षानुवर्षे ज्यांची कोकणातील
पारंपारिक घरे दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत, ज्यांकडे ममत्त्वाने पाहिले गेलेले
नाही अशा घरांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे वाढण्याचे संकेत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘निसर्ग सान्निद्ध्य’ हा या साऱ्यातला केंद्रिभूत घटक
असल्याने त्याची पुरेशी काळजी घेत बांधकाम प्रकल्पांच्या विकासवाटा विकसित होत
राहिल्यास त्या विकासकांना व्यावसायिक यशातील सातत्य देण्याबरोबरच ग्राहकांसाठीही आनंददायी
ठरतील.
सर्वत्र दसऱ्या-पाडव्याला
नवीन खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. निसर्ग सान्निद्ध्याच्या अपेक्षेने कोकणात नवीन वास्तू / घर खरेदी
करताना त्या घरात राहाणाऱ्या सर्वांची पसंती, वाढत्या मासिक
खर्चाचे नियोजन, शहरापासून दूर जाताना दैनंदिन प्रवासाचे नियोजन करायला हवे. मासिक
मेन्टेनन्स खर्च, नवीन घरात लागणाऱ्या नवीन वस्तू, साफसफाईचे नियोजन, लोडशेडिंग आणि
इनव्हर्टरची आवश्यकता तपासायला हवी. खरेदी करत असलेल्या जागेचा / फ्लॅटचा लेआऊट, बिनशेती आदेश,
पुरेसा गाडीरस्ता, किती क्षेत्रफळ बांधकाम परवानगी, भूखंड / बंगला / फ्लॅट आपल्याला हवा
तेव्हा विकता येईल का ? हे पाहायला हवे. कारण इथं आपली स्वप्न जोडली गेलेली असतात. आयुष्याची पुंजी आपण
गुंतविणार असतो. म्हणून ही जागरूकता आवश्यक ठरते. कोरोनाचा फटका बांधकाम
क्षेत्रालाही बसलेला आहे. त्यातून हे क्षेत्र उभारी घेत असले तरी अनेकांचे बजेट
कोलमडले आहे. पैसा सर्वत्र खेळता राहायला हवा आहे. मोठ्या शहरात बकालपणामुळे,
व्यावसायिक स्पर्धेमुळे, घड्याळाला बांधलेल्या आयुष्यामुळे अनेकांना मानसिक तणावाला
सामोरे जावे लागते. त्यावर उपाय म्हणून, ‘शहरापासून दूर जा’ असे वैद्यकशास्त्रही सांगते.
खेडेगावात, निसर्गाच्या सान्निद्ध्यात तणावापासून दूर गेल्यामुळे शरीराला मानसिक
लाभ होतो. वर्षातून दहा दिवस कोकणात जाणाऱ्यांना इथला निसर्ग छानच वाटतो. पण इथं कायमचं
राहायची वेळ आली तर महिन्याभरात कंटाळा येईल अशी इथल्या विकासाची गती नक्की नसावी.
शहरातल्या घरांत कामावरून घरी आल्यानंतर अनेकदा आपल्याला ताजेतवाने आणि आरामदायी
वाटतेच असे नाही. कौटुंबिक सदस्यांसोबतचा संवाद, शांत झोप याही बाबी अडचणीच्या
ठरतात. गावात आपली वास्तू ही अशी जागा असते
जिथे आपण विश्रांती घेतो. आपल्या कुटुंबासोबत सर्वाधिक वेळ घालवतो, भावनिक
क्षणांचा आनंद जगतो. अर्थात इथले वातावरण आरामदायक असायला हवं. त्यासाठी निसर्गाची
सोबत हवी. ती सोबत कोकणात, सिंधुदुर्गात सहज मिळू शकते.
सेकंडहोम हे वाढत
चाललेली संचयीवृत्ती, चंगळवाद,
महत्त्वाकांक्षा आणि आनंदाच्या बदललेल्या व्याखेचं प्रतिक असल्याचं पूर्वी बोललं
गेलं असलं तरी कोरोनाने तिला अत्यावश्यक गरजेच्या स्वरुपात पुढे आणलं आहे. विकास
आणि निसर्गसंवर्धन याचा ताळमेळ घालण्याची संधी असलेला सिंधुदुर्ग जिल्हा इतरांना
दिशादर्शक ठरेल असे काम उभे करू शकतो. अलिकडे कोकणातील नागरी क्षेत्रातील पहिल्या,
देवगड-जामसंडे नगरपंचायत अखत्यारित बेघर नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत
२५.३० कोटी रुपयांच्या २४० घरांच्या प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे. हे
महत्त्वाचे आहे. कोणाही लोकांनी गाव सोडून शहरात जाण्याच्या मानसिकतेमागे आवडीपेक्षा गरजेचं कारण अधिक
आहे. ही माणसं कोरोना काळात जीव वाचवायला गावाकडे धावलेली आपण पाहिलीत. मागच्या
काही महिन्यात कोकणात आंब्यासारख्या नगदी पीकाचे नुकसान झालेय. मासेमारीसह
इथल्या पर्यटन उद्योगाला फटका बसलाय. निसर्ग चक्रीवादळ, ढगफुटी, अतिवृष्टीने
बागांचे पिकांचे न भूतो... नुकसान केलेय. या पार्श्वभूमीवर कोरोना पश्चात नव्या
घरांच्या मागणीत वाढ होऊ शकते आहे. सध्याच्या वैश्विक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर
ग्राहकांची मानसिक अवस्था काहीशी संभ्रमित आणि निर्णय क्षमता मंदावलेली असू शकते. ग्राहकांच्या
हाती येणारे कमी अर्थार्जन वाजवी दरातील पर्यायांना अधिक पसंती मिळवून देईल.
यास्तव व्यावसायिकांनीही आपल्या मोबदल्याच्या गणितात थोडा बदल करणे त्यांच्यासाठी फायदेशीर
ठरू शकते. विकासाच्या नावाने निसर्गाची हानी न होता सेकंडहोमचा पर्याय
आनंददायी ठरायला हवाय. डॉ. माधव गाडगीळ सरांसारखी व्यासंगी माणसं लोकांच्या मनामध्ये जे पर्यावरण
प्रेमाचं आणि संवर्धनाचं बीज पेरत असतात, आपला वर्तमान विकास त्याला साजेसा असायला
हवा. स्वतःचं गाव
सोडून शहरात गेलेल्यांनी सुट्टीपुरतं गावात येऊन, गाव बदललं म्हणणं दुर्दैवी आहे.
यातली कळकळ हृदयस्थ असायला हवी. कारण गावाचं गावपण टिकवणं हे आपल्या सर्वांच्या
हातात आहे. आजही तळकोकणातील, सिंधुदूर्गातील गावे नव्या प्रकल्पांच्या विकासवाटा
वाटा चालत असताना आपलं गावपण टिकवून आहेत. गावपण टिकवण्यासाठी, विकासगरजा ह्या
किमान पक्का रस्ता, दळणवळणाची साधने, वीज, पिण्याचे स्वच्छ पाणी, शिक्षणाची सोय, गरजेच्या
वस्तूंची उपलब्धी, वैद्यकीय सुविधा आणि काळाची गरज म्हणून इंटरनेट अशा मर्यादेत
असायला हव्यात. अन्यथा जास्तीच्या हावरटपणाने सत्यानाश होण्याची शक्यता बळावते. डोंगर-नद्यांच्या
काठाने पण त्यांच्या जीवावर न उठणारे वाट्टेल तसे बांधकाम न करता सामाजिक संतुलन
साधणारे, निसर्ग आणि मानव सहसंबंध जोपासणारे प्रकल्प लोकांच्या मनाची सहज पकड घेतात
हे वास्तव आहे.
कामाच्या व्यस्त
धावपळीपासून काही क्षण निवांत घालविण्यासाठी सेकंड होमची कल्पना आकारास आली.
तेव्हा ते ठिकाण निसर्गरम्य असावं अशी प्रमुख गरज असल्याने नैसर्गिक वैविध्याने
नटलेल्या सिंधुदुर्गासह भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील रमणीय कोकणप्रदेश आकर्षक
आणि उत्तम पर्याय म्हणून पुढे आला. सध्या मुंबई गोवा महामार्गाचे सूरू असलेले चौपदरीकरण
पूर्ण होताच येथे विविध व्यावसायिक घटना वेगाने घडायला सुरुवात होईल. भौगोलिकदृष्टय़ा
संपन्न असलेलं कोकण हे संस्कृती, वास्तूरचना, समुद्रकिनारे, फळफळावळे, हिरवाई,
मंदिरे, किल्ले, घरे-वाडे आदिंनी प्रसन्न आहे. व्यस्त जीवनशैलीत जगणाऱ्या समूहाला वीकेण्डच्या
मर्यादित काळात निसर्गाच्या कुशीत निवांत सामावणे, गड-किल्यांवर भटकणे, निसर्गवाटा
तुडविणे, अध्यात्मिक अनुभूती घेणे, शेतीत रमणे असे अनेक पर्याय कोकणात उपलब्ध आहेत.
वाढत्या पर्यटनामुळे या पर्यायांना व्यापकता प्राप्त झालेली आहे. त्याचा आनंद
घेण्यासाठी आपणही आपली हक्काची वास्तू उभारु यात !
धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा